मसालेभात

Submitted by सायो on 25 October, 2011 - 13:53
masalebhat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त भात तेवढा मोजून घेते. बाकीचे सगळेच पदार्थ अंदाजे.
बासमती तांदुळ- एक वाटी तांदळाला साधारण दोन, सव्वा दोन वाट्या पाणी,
तोंडली- उभी चिरुन, मावेत, कुकरला वाफवून,
काजू- मूठभर तरी हवेतच,
गरम मसाला- २,३ लवंगा, २,४ मिरीचे दाणे, १ दालचिनी, १,२ तमालपत्र,
फोडणीतः जिरं, मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्यांना उभी चीर देऊन, कढिपत्ता.
गोडा मसाला- १,२ टीस्पून,
मसालेभाताचा मसाला- साधारण पाव वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस, १,२ टे स्पून जिरं, तेवढेच धणे आणि लाल सुक्या मिरच्या- चवीप्रमाणे- हे सगळं खमंग भाजून ह्याची पूड करावी.
वरुन घालायला- भरपूर ओलं खोबरं, कोथिंबीर, आणि सढळ हाताने साजून तूप.

क्रमवार पाककृती: 

बासमती तांदुळ धुवून निथळत ठेवावेत.
मोठ्या पातेल्यात जरा जास्त तेल घेऊन त्यावर फोडणीचे जिन्नस घालून, काजू, गरम मसालाही परतून घ्यावा. त्यावर वाफवून घेतलेली तोंडली टाकून झाकण घालून वाफ येऊ द्यावी.
त्यावर निथळून घेतलेले तांदुळ परतावेत. मोजून पाणी घालावं. भात शिजत असताना मसालेभाताकरता केलेला मसाला, गोडा मसाला, मीठ घालावं.
वाढताना साजूक तूप, कोथिंबीर, ओलं खोबरं घालून वाढावा.

वाढणी/प्रमाण: 
१ वाटी तांदुळाचा एकाला भरपूर, दोघांना जेमतेम होईल बहुतेक.
अधिक टिपा: 

ज्यांना तोंडली आवडत नसेल त्यांना बटाटे उभे चिरुन घालता येतील. तोंडली नसतील तर मी तसाही करते.
ह्याबरोबर टोमॅटोचं सार मस्त लागतं.

माहितीचा स्रोत: 
मसालेभाताच्या मसाल्याची कृती मुंबईमसाला.डॉट.कॉमवर मिळाली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो?

रैना, नाही. मी मसालेभाताची कृती कधीच टाकलेली नाही आधी.
बाजो, तुम्ही करा नी फोटो टाका आणि मग ह्याला रेसिपी म्हणा Happy
एवेएठिचे बाफ शोधले फोटो करता पण मिळाले नाहीत. पुन्हा करेन तेव्हा आठवणीने काढेन.

मस्तच पाकृ.
टिपा पण मस्तच. सगळ्या अजमावून बघण्यात येतील.
गोडा मसाला, गरम मसाला घालायचा नसला की मी २-३ हिरव्या मिरच्या, खोबरं, लसूण, कोथिंबीर मिक्सरला वाटून घेते. तूपावर हा मसाला परतुन आवडत्या भाज्या घालयच्या.

मस्त रेसिपी सायो. माझ्या सा. बाई आणि आई फार चविष्ट मसालेभात करतात, म्हणुन मी कधीच प्रयत्न केला नाही. पण ह्या कृतीने करुन पाहीन. वर सांगितल्याप्रमाणे त्याही फेटलेलं दही घालतात आणि साखर घालतात. साखरेमुळे चव छान येते आणि भात चमकदार दिसतो.

सायो! जियो !! मस्त झाला होता भात एकदम!! मसाले भात आपल्याला लग्नातल्यासारखा जमणे शक्यच नाही ही खंत दूर झाली!! Happy

>>>मसाले भात आपल्याला लग्नातल्यासारखा जमणे शक्यच नाही ही खंत दूर झाली!!
अगदी अगदी!!! नेहमी आलं लसणाची वाटणं आणि तळलेल्या मसाल्याचे उग्र मसालेभात केल्यानंतर हा चवदार आणि सौम्य मसालेभात फारच आवडला. खरंच लग्नातल्या जेवणात मिळतो तसा लागला. (तुपाच्या धारेकडे फार डोळेझाक करावी लागते मात्र! )

भारी फोटो आहे!!
मी माझ्या मैत्रिणीने दिलेल्या कृतीने करते. २ वाट्या तांदूळ असेल तर १ वाटी सुके खोबरे, अर्धी वाटी जिरे आणि पाव वाटी धणे चमचाभर तेलावर परतून मिक्सरमध्ये बारीक करुन घेणे तो मसाला वापरते.
आता या पद्धतीने करुन पाहीन. धन्यवाद.

पाकृ मस्त आहे. Happy

काय लाळगाळू फोटो टाकलेत एकेकीने.. झक्कास!!

भात होता होता दही फेटून घालण्याची आयड्या लय भारी आहे. मी मृण्मयीच्या मसुराच्या खिचडीत तसं दही फेटून घातलं. मस्त रंग आणि चवही एकदम चटकदार छान आली.

मी पण केला काल संध्याकाळी - आज डब्यात घेउन आले आहे. मी तांदुळ न वापरता दलीया वापरला. मस्त झाला. पाणी थोडं जास्त झालं पण चव मस्त!! आरती सारखं मी पण मठ्ठा केला वर शेव पण पेरली..... यंम्मी

सायो, तुझ्या रेसिपीने आणि संपदाच्या टिप्स् वापरून काल मसाले भात केला होता .. मस्त झाला .. धन्यवाद रेसिपी आणि टिप्स् करता .. (तोंडली वाफवून घेतली नाहीत ; भाताबरोबरच शिजवली .. :))

Masale bhaat 1.jpgMasale bhaat 2.jpg

Pages