आठवणीतले क्षण !!!

Submitted by MallinathK on 9 November, 2011 - 01:06

"अरेऽ मधुऽऽ, उऽठ. ८ वाजलेत. आजपासुन ऑफिस आहे नाऽऽ?"

"काय हे ! लग्नाच्या ८ व्या दिवशी सक्काळ सकाळी ८ वाजता कोणी उठतं का? ते ही ऑफिसला जाण्यासाठी ?" इति अस्मादीक.

"ए कोट्या काय करतोयस? आ‌ई येतील इतक्यात ओरडत. उऽऽठ ना रे. बघ, नाष्टा सुद्धा तयार आहे आणि आजपासुन तुझा डब्बा मी करणारे..."

"ओऽह शिट्ट !"

"ओऽऽ.... ठिक आहे मग. उद्यापासुन तुझ्या आ‌ईच्याच हातचा डबा घे‌उन जा. मी नाही बनवणार.." असं फणकारुन ती रागाने पाय आपटत वळून बाहेर जाणार इतक्यात मी तिचा हात धरुन मागे ओढले.

"एऽ लाडाबा‌ई, रागावलीस..?"

"नाही. आधीच सांगायचं नाही का तुला माझ्या हातचा डब्बा नकोय म्हणुन. उगाच पहाटे उठुन आटापिटा केला नसता."

"गंमत केली मी. ते ’ओह शिट्ट’ आ‌ई ये‌ईल म्हणालीस ना त्यासाठी होतं !".

हुऽश्श! हे ऐकुन ती ही गालातल्या गालत हसली. जाता जाता परत ८ वाजल्याची आठवण तेवढी करुन दिली.

मग ना‌ईलाजास्तव उठुन मी ही आवरायला लागलो.

"श्वेतुऽऽ, गाडीची चावी सापडत नाहीय. तू पाहीलीस काऽ?"

"काऽय रेऽ, श्वेतू श्वेतू लावलयस्? आ‌ईला विसरलास? बायको आली की लगेच...." आ‌ई ने मागुन आवाज दिला.

“आ‌ई तू पण ना… मला उशीर झालाय नी तुला चेष्टा सुचतेय.”

तेवढ्यात आ‌ईने चावी आणुन दिली आणि ती “थांब इथेच” म्हणत हसत आत गेली तशी श्वेता बाहेर आली. तिला नजरेनच मी निघतोय ते सांगितलं. तिनं हातानेच थांब म्हणुन सांगितले. जवळ ये‌उन उगाच शर्टाची बटणं ठिक करत म्हणाली “संध्याकाळी लवकर ये, लग्नात आलेली सगळी गिफ्ट्स उघडून पहायची आहेत.”

“तू पण ना. कुठे तरी बाहेर जा‌ऊ म्हणशील असं वाटलं होतं.” माझा अपेक्षाभंग झाला होता.

“गंमत केली मी” म्हणत तिने मला दरवाज्या बाहेर ढकलं सुद्धा. “ए अजुन एक...”
मी पुन्हा अपेक्षेने मागे वळालो. “आ‌ईने सांगितलंय की येताना ’मूव्ह’ घे‌उन ये. गेले दोन दिवस झाले बाबांचा गुडघा दुखतोय.” पुन्हा अपेक्षा भंग! तसा रागानेच ऑफिसला वळलो. वळताना “सब्र का फल..” वगैरे काही तरी ऐकु आलं.

संध्याकाळी घरी आलो तेव्हा पाहीलं तर या सासु-सुना कसला तरी पसारा काढुन बसलेल्या. चौकशी केली तेव्हा कळलं की लग्नात आलेल्या आहेर, भेट वस्तुंची उजळणी चालु होती. मी चेंज करण्यासाठी बेडरुमकडे वळलो. मागुन श्वेता ये‌ईलच असं वाटलं होतं, पण बेडरुम मध्ये पोचलो तरी ती तिथेच ! या बायकांचं ना.. कै कळतच नै. मी आपला फ्रेश हो‌ऊन बाहेर आलो आणि हॉलकडे जाणार इतक्यात मस्त कॉफीचा वास आला. स्टडी टेबलावर कॉफी कप होता, शेजारीच एक नोट चिकटवलेली होती. “पसारा आवरला की खाली बागेत जा‌ऊ. सकाळीच ठरवलं होतं, म्हंटलं थोडा दम निघतो का पहावं." – श्वेतु.”

कॉफीचा आस्वाद घेत अस्मादीक हॉल मध्ये अवतरले तसे सासु-सुना आणखीनच जोरात हसल्या. मी इकडे तिकडे पसरलेल्या वस्तुंवर नजर फिरवत सोफ्याच्या दिशेने वाट काढली. सगळीकडे नुसते पॅकिंग पेपर्स, गिफ्ट रॅपर्स दिसत होते. आलेल्या सगळ्या भेटवस्तु डायनिंग टेबलावर ठेवल्या होत्या.

“मधु, यातलं काय काय आवडलं, काय काय वापरायला काढायच ते बघ एकदा.” … आ‌ई म्हणाली.

ते तुमचं तुम्ही बघा, म्हणत मी पुन्हा बेडरुम कडे वळालो. १५ मिनिटात श्वेता आत आली. म्हंटलं चला खाली जायला मोकळे म्हणुन मी खाली जाण्यासाठी आवरायला लागलो. श्वेता कसलं तरी पॅकिंग काढत होती.

“हे आ‌ई-बाबांनी दिलेलं आपलं लग्नाचं गिफ्ट आहे, म्हंटलं तुझ्या सोबतच ओपन करावं.”

“अरे हो, ते मी विसरलोच होतो. काय आहे त्यात? फोटो फ्रेम सारखं वाटलं मला. माझाच लहानपणीचा फोटो असेल एखादा. ब्लॅक ऍंड व्हा‌ईट! बाबांच्या गिफ्ट बाबत आयडीयाज खुप वेगळे आहेत.”

“अरेऽ, डायरी आहे वाटतं यात. आणि तेही लिहिलेली. कदाचीत दैनंदिनी!” ती पॅकिंग काढत म्हणाली.

“दैनंदिनी ? ए नीट बघ. त्यांची दैनंदिनी ते मला का देतील?” मी आवरा आवर करतच तिला नीट बघायला सांगीतल्ं. बाबांचं ना काही सांगता येत नाही. त्यांचं नेहमी असंच असतं, ’काहीतरी वेगळं’!

“तारीख १५ ऑगस्ट १९९३..., आज मधुने त्याच्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस मिळवलं. त्याच्या शाळेत झालेल्या ५वी ते १०वी वर्गातल्या चित्रकलेच्या स्पर्धेत त्याला दुसरं बक्षीस मिळालंय. बक्षीस त्याला मिळालंय, पण माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्या आनंदासोबत एक दु:खही होतं की मला त्याच्या कार्यक्रमाला जाता आलं नाही. बक्षीसाबद्दल मिनु ने फोन करुन सांगितल्यावर घरी येतानाच त्याच्यासाठी म्हणुन कलर बॉक्स आणला.” श्वेता वाचत होती. कानावर शब्द पडत होते खरे, पण मी भुतकाळात गेलेलो. तो स्टेज, ते बक्षीस आणि तो मित्रांचा माझ्याभोवती पडलेला घोळका. तो दिवस आजही मला आठवतो. त्या दिवशी चित्रकलेत मला दुसया क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं खरं, पण ते बक्षीस माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं बक्षीस होतं ते मला आज कळालं होतं. त्या दिवशी बाबा कार्यक्रमाला आले नव्हते हे तेव्हा माझ्या लक्षातही आलेलं नव्हतं, कदाचीत बक्षीसाच्या नादातच होतो वाटतं. मी नकळतच स्थब्ध झालो. हातातलं सगळ सोडुन श्वेता जवळ ये‌उन बसलो. ती वाचतच होती. मध्येच थांबुन तिने काही पाने मागे पलटली.

“तारीख १३ जुन १९८६..., आज मधुचा शाळेतला पहिला दिवस होता. त्याच्या पेक्षा जास्त हुरहुर मला लागली होती आणी तेवढाच आनंदही झालेला. हा रडुन गोंधळ वगैरे घालेल म्हणुन मिनुच्या ऐवजी मीच शाळेला सोडायला गेलेलो. खरंतर तो रडला असता तर माझीही तिच अवस्था झाली असती जी मिनुची झाली असती. आश्चर्य म्हणजे मधु रडला नाही. पण आजुबाजुची रडणारी मुलं पाहुन थोडा घाबरलेला होता.”
हळुच मी श्वेताचा हात धरुन तिला पुढं वाचण्यापासुन थांबवलं.

“काय झालं रे ? असा का शांत झालास?”

“श्वेतु पहिल्या पानापासुन वाच. ही बाबांची दैनंदिनी नाहीय. हे सारं माझ्याबद्दल आहे.” असं म्हणतच मी ती डायरी हातात घेतली.

त्याचं पहिलं पान उघडलं. ’आठवणींतले क्षण !’ - डायरीच्या थोड्या पिवळसर झालेल्या त्या पानावर वरच्या कोपऱ्यात लिहलं होतं.

हो पान जरा पिवळसर झालंय, अगदी बाबां सारखं. जे कधी काळी एकदम पांढरं शुभ्र होतं. त्यांच्या मनाच्या कोपऱ्यातही असेच काही आठवणींतले क्षण असतील जसे या पानाच्या कोपऱ्यात ही अक्षरे. बाबांच्ं अक्षर अस्ं खुप सुंदरही नाहीय पण तसं वाईटही नाहीय. जणु त्यांचं व्यक्तीमत्वच, चार चौघांसारख्ं... लक्षवेधुन घेण्यासारखं नाहीय पण कोणी दुर्लक्ष करण्यासारखंही नाहीय़. दोन्ही अगदी सामान्य. पिवळ्या पानावरची ही अक्षरे एका कोपयात असली तरी त्यांचा ठसा पानांच्या मागील बाजुस अजुनही ठळकपणे जाणवत होता. बाबांच्या मनाच्या दुसया बाजुस असे ठळक ठसे अजुनही असतील का……..? कधी असे वाटले नाही. वाटले नाही, की जाणवले नाही….? जाणवले नाही की आपण लक्ष दिले नाही ?

“अरे पलट ना पान. किती वेळ झालं ते दोनच शब्द वाचतोयस!” हातावर फटका मारत श्वेता ओरडली.
मी पहिलं पान पलटलं तसं तिनं वाचायला सुरवात केली देखील.

“तारीख २८ ऑगस्ट १९८३, आज आम्हाला मुलगा झाला. असे वाटत होते की मिनु आणि मीच या जगातले सर्वात सुखी जोडपे आहोत. आमचा आनंद शब्दात नाही मांडु शकत. पण आमच्या मुलाची प्रत्येक पहीली गोष्ट आम्ही शब्दात माडुन ठेवणार आहे. खर्ं तर ही मिनुची कल्पना. पण ती म्हणते तिला भावना शब्दात मांडायला जमत नाहीत्, म्हणुन ते मांडायचे काम माझ्याकडे. तसं मला भावना बोलुन नाही दाखवता येत, म्हणुन लिहुन ठेवत असतो. हे दुसरे कारण ज्यामुळे हे लिहायचे काम माझ्याकडे आहे. पाहु, संकल्प तर केलाय.. कुठवर पुर्ण करु शकतो ते. नाहीतरी मिनु आहेच सोबत.”

“वॉऽव! मधु, म्हणजे हे सगळं तुझ्याबद्दल आहे. म्हणजे तुझे लहानपणींचे उद्योग. आय ऍम सो एक्सा‌ईटेड टु रिड धिस! ए २८ ऑगस्ट तुझी जन्म तारीख ना?” श्वेता स्वत:च बडबडली आणि पुढचं पान पलटुन वाचायला सुद्धा लागली.

“तारीख २ सप्टेंबर १९८३, आज मी पहील्यांदा बाळाल घेतलं. केवढा लहान आहे तो. त्याने जर माझं बोट पकडलं तर त्याची अख्खी मूठ माझ्या बोटाच्या तीन भागा पैकी पहिल्या भागातच मावेल. इवले इवलेसे हात, इवले इवलेसे पाय. घेतल्या क्षणी मला अस्ं वाटल्ं की याने उठावं आणि बाबा म्हणुन मला गच्च मिठी मारावी. मी तसं मिनु ला सांगितलं तर कित्ती ती घा‌ई म्हणुन तिने मलाच फटकारलं”.

मला आठवतही नव्हतं बाबांना मी शेवटची मिठी कधी मारलेली. त्या दिवशीच्या चित्रकलेच्या बक्षीस समारंभापासुन ते आज प्रोजेक्टचा सिनि‌अर ग्रफिक्स डिजा‌ईनरचा प्रवास देखील मला कुठे नीटसा आठवतोय? बाबांची ही दुसरी बाजु कधी दिसलीच नाही मला. नेहमी शिस्त आणि कडक वाटणारे बाबा एवढे हळवे असु शकतील असं वाटलं ही नव्हतं. श्वेताच्या पान पलटण्याच्या आवाजाने माझी विचारांची साखळी तुटली.

“तारीख १८ फेब्रुवारी १९८४, आज मधु रांगायला लागला. तसं म्हणजे पुर्ण रांगत नाही, पण त्याने आज पहिल्यांदा रांगायचा सफल प्रयत्न केला. दोन दिवस झाले तसा तो त्याच्या दोन नाजुकश्या हातांवर आणि गुडघ्यावर स्वत:चा भार उचलुन धरत होता.”

“सोऽऽ क्युट ना मधु. अरे म्हणजे लग्ना नंतर चार दिवसांनी तुझ्या रांगण्याला २८ वर्षे पुर्ण झाली.”
असं म्हणत ती हसाय्ला लागली. मला लिंक न लागल्याने प्रश्नार्थक चेहयाने तिच्याकडे पाहीले.

“अरे बुद्धु, १४ फेब्रुवारीला आपण लग्नाळलो. आणि १८ ला तु पहिल्यांदा रांगलेलास, म्हणुन म्हंटलं की लग्ना नंतर ४च दिवसात तुझी रांगायला लागल्याची २८ वर्षे पुर्ण झाली.” मी फक्त स्मित हास्य केले.

ती पुढे वाचत होती, असे वाटत होते की एक एक किस्से डोळ्यासमोर उभे आहेत. बाबांनी माझी प्रत्येक पहीली गोष्ट त्यांच्या आणि आ‌ईच्या नजरेतुन लिहुन ठेवली होती. काही ठिकाणी शेवटी ’इति मिनु.’ असे होते. कदाचीत ते आ‌ईने अनुभवलेले, पाहीलेलेही त्यांनी तिच्या कडुन ऐकुन लिहीलेले असावे.

“तारीख ७ एप्रिल १९८४, पहिल्यांदाच मधुला काल रात्री १०१ एवढा ताप आलेला. बिचारा, काल रात्रभर झोपला नाही. मिनु तर त्याला मांडीवरच घे‌उन बसुन होती. थोड्या थोड्या वेळाने, पट्ट्या बदलने, थंड पाण्याने अंग पुसने चालु होते. आज सकाळी उठल्या उठल्या मी त्याला डॊक्टर कडे घे‌उन गेलो. त्यांनी रक्त तपासणी करुन घेतली. एवढ्या बाळाला त्या नर्सने ४ वेळा सु‌ई टोचली. पहिल्यांदा बोटातुन रक्त काढले, हा खुप रडायला लागला तसं रक्त घेणं त्या नर्सला जमतच नव्हते. तपासणीला पुरेसे रक्त मिळत नाहीय म्हणुन हाताच्या नस मधुन रक्त घ्यायचे ठरवले. पहिल्यांदा डाव्या हाताला सु‌ई लावली. दोन वेळा टोचुनही नस सापडेना म्हणुन तिने डॊक्टरला बोलवले. त्याने उजव्या हाताला टोचुन रक्त घेतेले. असले शिका‌उ नर्स का ठेवतात कोण जाणे. एवढासा तो जिव, कित्ती आकांताने रडत होता. शेवटी शेवटी मला पाहवतही नव्हते. माझा चेहरा पाहुन डॊक्टर म्हनाले ’तुम्ही बाहेर उभे रहा, काही काळजी करु नका आम्ही आहोत.’ आणि इछा नसुनही मला बाहेर उभे रहावे लागले. बरं झालं मिनुला नेले नव्हते, नाही तर त्याचं रक्तानं माखलेलं हात पाहुन ती चक्कर ये‌उन पडली असती. एवढ्याश्या जिवाचे आज खुप हाल झाले. उद्या रिपोर्ट मिळे पर्यंत समाधान नाही.”

खरंच हे माझे कडक, शिस्त प्रिय बाबा आहेत का? खरंच हा माणुस इतका हळवा आहे? की मला माझे बाबा कधीच कळले नाहीत? मला झालेला त्रास पाहुन, मला रडताना पाहुन डोळयात पाणी आणणारे माझ्या आ‌ई बाबांचं हे रुप मी कधीच पाहीलं नाही आजवर. प्रत्येक क्षणाला श्वासा सकट अनुभवनारं हे जोडपं, नेहमी हसताना खेळताना पाहीलंय मी. प्रत्येक चुकीला शिक्षा देताना पाहीलंय, प्रत्येक चांगल्या कामाला शाब्बसकी देताना पाहीलंय, पण एवढे हळवे असतील असं कधीच नाही वाटलं.

क्षणभर मला सकाळची गोष्ट आठवली. आ‌ईने बाबांसाठी मुव्ह आणायला सांगितलेले. दोन-तीन दिवस झाले घरीच होतो तरी आणने झाले नाही. आज ऒफिसवरुन येतानाही मी आणु शकलो असतो, तेव्हाही विसरलो. सधी सरळ गोष्ट आहे, जर मी आजारी असतो तर ते असे वागले असते का?

नंतर किती तरी वेळ श्वेता वाचत होती. जणु माझ्या डोळ्यांसमोरुन चित्रं सरकत होती. माझं पहिल्यांदा उठुन बसणं, पहिलं पा‌ऊल, पहिलं धडपडणं, आ‌ईचा खालेल्ला पहिला मार, बाबांनी दिलेला पहिला फटका, पहिली पाटी, पहिलं दफ्तर, पहिली शाळा, पहिली दसरा-दिवाळी काय नव्हतं त्या डायरीत. मी, माझं बालपण, माझं तारुण्य. पुर्ण डायरीभर मीच भरुन उरलो होतो. आ‌ई बाबांनी जणु मला माझं बालपण परत दिलं या डायरीतुन. मन कसं भरुन आलेलं. तडक उठलो अन हॉल मध्ये आलो. तिथे आ‌ई बाबांच्या गप्पा चाललेल्या, मी असं पान्हावलेल्या डोळ्याने अचानक पुड्यात ये‌उन उभारल्याने त्याना काही कळेच ना. बाबांचा “अरे बेटा काय झाले?” वाक्य पुर्ण व्हायच्या आतच मी त्यांना एक गच्च मिठी मारली. बाबां पुर्ते गोंधळलेच अश्याने.

“धन्यवाद बाबा! तुम्ही दिलेल्या ’आठवणींतल्या क्षणां’बद्दल. माझं बालपण मला दिल्याबद्दल.”

आ‌ईला मग कुठे खुलासा झाला की मी का इतका भावुक झालोय. बाबांनीही मग मला कडकडुन मिठी मारली. त्या स्पर्शातुन खुप काही बोललो आम्ही एकमेकांशी. वेडाच आहेस म्हणत, आ‌ईने हलकेच पाठीवर धपाटा मारला. बाबांनी लगेच कमेंट पास केली, खाल्लास लग्नानंतरचा पहीला धपाटा! श्वेत्या लिहुन ठेव हं. आणि तिकडे श्वेता आमचा फॅमीली ड्रामा पाहुन काय करावं सुचेनासे झाल्याने भारावुन नुसती पाहतच उभारलेली.

जालरंग प्रकाशनाचे २०११ दिवाळी अंक मध्ये [इथे] पुर्वप्रकाशीत.

- मल्लिनाथ.

गुलमोहर: 

खुपच सुंदर मल्ली, तुझे लिखाणाचे कौशल्य वाया घालवु नकोस, खुप खुप शुभेच्छा!
आसेच मस्त लिखाण तुझ्याकडुन वाचायला मिळु देत

मल्ली ,जबरदस्त!!!!!!!!!!!!!!!!

Pages