'काय एशिझेड काय?' 'नाय आर्केलॉजिचे काम हाय'.
देउळच्या या पहिल्या संवादातच हा सिनेमा कशाबद्दल बोलणार आहे, लेखक-दिग्दर्शकाचा नव्या ग्रामिण अवकाशाचा अभ्यास, त्याची नर्मविनोदी शैली सगळं एकदम समोर येतं. आणि सिनेमा तुमची एकदम पकड घेतो.
वळू आणि विहिरमधून दिसलेले पश्चिम महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपर्यातले गाव. कोरडे,उजाड, प्रचंड माळ. इरसाल, बेरकी, भोळी; माणसासारखी खरीखुरी माणसं. वळू आणि विहिरी प्रमाणेच 'देऊळ' कथानकाचा मुख्य मुद्दाही आणि रुपकही. तारशहनाईच्या आसमंत भरुन टाकणार्या लकेरीही तशाच.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा, माणुसकी आणि व्यवहार, विकास आणि त्याचे राजकारण, शहरी आणि ग्रामिण; अशा अनेक धाग्यांचा वापर करुन तयार केलेला हा पट. आता हा विषयच इतका मोठा की त्यातले सगळे ताण आणि गुंते एकदम दाखवणे शक्य नाही. एका बाजूला त्याचा डॉक्यु-ड्रामा होण्याचा आणि दुसर्या टोकाला काहीतरी उथळ टिकाटिप्पणी यापलीकडे न जाउ शकणे, नुसतेच कोरडे समालोचन होणे असाही धोका. लेखक-दिग्दर्शकाने हे दोन्ही टाळण्यात यश मिळवले आहे कारण हा सिनेमा गावाचे नुसते चित्रण करीत नाही तर त्याच्या पोटात शिरुन तुम्हाला त्यांच्यापैकी एक करुन टाकतो. त्यांचा संघर्ष आपला बनतो, त्यांचा मुद्दा आपल्याला पटतो. आपल्याला 'दत्त दिसले' ह्या केश्याच्या ठामपणावर आपला विश्वास बसतो, 'कुठेतरी काहीतरी चुकतेय' ही अप्पांची सलही जाणवते आणि 'सगळा चकच़काट फक्त शहरात? इथली शांतता जायला नको म्हणून आम्ही कायम शेणातच रहायच?' हा भाउंचा प्रश्नही अनुत्तरित करतो.
'सर्वंकष विकास' किंवा इनक्लुझिक डेव्हलपमेंट ही संकल्पना गेल्या काही वर्षात जोरात आहे. शहरीकरणाच्या रेट्याखाली खेडी पिचत आहेत अशा आरोळ्याही उठत आहेत. शहरीकरण करणारे आणि या आरोळ्या मारणारे दोन्ही शहरीच. खेड्यातल्या लोकांना काय हवे आहे हा प्रश्न त्यांना कोणी विचारलाय? राजकारणी आपल्या साठमारीत दंग. अशा परिस्थितीत समोर जो सर्वात आकर्षक पर्याय येतो त्याला स्विकारणे ही आपल्या ग्रामिण भागाची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. मग तो देऊळ बांधण्याचा असो वा साखर कारखाना काढण्याचा. ही अपरिहार्यता आणि असहाय्यता अत्यंत टोकदारपणे दाखवण्यात या सिनेमाने यश मिळवले आहे.
हा सिनेमा प्रश्नांची सोपी, रेडीमेड उत्तरे देत नाही, पण विचार करायला भाग मात्र पाडतो. केश्याचे पात्र अर्थातच सिनेमाच्या कथनाचा आत्मा आहे. त्याच्या 'विश्वासा'मुळे सुरु झालेले प्रश्नचक्र तो त्याच्या पद्धतीने सोडवतो, ते उत्तर त्याच्यासाठी बरोबर आहे. असा प्रवास आपणही करावा आणि निदान स्वतःपुरतेतरी उत्तर मिळवावे एवढा धक्का तरी हा सिनेमा देतोच.
सिनेमाच्या तांत्रिक बाजू हा तर स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा. ग्रामिण महाराष्ट्राचे इतके यथार्थ चित्रण फार क्वचित पहायला मिळते. फाट्यावरील चहाच्या दुकानातल्या कपापासून ते 'बोलेरु' पर्यंत सगळे काही अचूक! सुरुवातीच्या श्रेयनामावलीतला 'सँड आर्ट्'चा वापरही अप्रतिम. छायाचित्रण नेत्रसुखद (रखरखीत माळभाग किती सुंदर वाटू शकतो, विषेशतः रात्रीच्या दृष्यात!) तर आहेच पण अत्यंत बोलके आहे. मध्यंतरानंतरच्या पहिल्याच फ्रेममधे, तयार झालेले देऊळ आणि त्यासरशी गावाचा बदलेला तोंडवळा एका झटक्यात शंभर वाक्ये बोलून जातो.
पात्रांचे 'कॅरेक्टरायझेशन' तर उत्तमच अगदी 'शून्य मिनिटात' सगळीकडे पोचणार्या भाउंपासून, 'जांबुवंतराव जेवतायत' चा ठसका दाखवणार्या बाईपर्यंत, अगदी लहान पात्रेही जिवंत होउन येतात. या बाबतीत प्रभावळकरांचा आप्पाच थोडा कमी जमला आहे. कदाचित प्रोमोजमुळे 'नाना-दिलीप' जुगलबंदी दिसणार अशी अपेक्षा वाढली होती त्याचाही प्रभाव असेल. 'दत्त दत्त दत्ताची गाय' या परंपारिक रचनेचा कथा पुढे नेण्यासाठी अत्यंत चपखल वापर केला आहे.
'तू झोप... मी जागा आहे!' म्हणत आपल्याला जागे करणारा हा सिनेमा............ बघाच!
मस्तच लिहीलंय. अगदी मनातल.
मस्तच लिहीलंय. अगदी मनातल. चित्रपट सुरेखच.
अतिशय सुंदर लिहिलंत आगाऊ!
अतिशय सुंदर लिहिलंत आगाऊ!
फारच सुन्दर लिहिले आहे
फारच सुन्दर लिहिले आहे तुम्ही. सिनेमा तसाच आहे. सिनेमाच्या सुरुवातिला मायबोलि चा लोगो पाहुन फार छान वाटले. दिलिप प्रभावळकराना त्या मानाने कमी वाव मिळाला आहे अस वाटल.
छान लिहिलं आहेस.
छान लिहिलं आहेस.
सिनेमाच्या सुरुवातिला मायबोलि
सिनेमाच्या सुरुवातिला मायबोलि चा लोगो पाहुन फार छान वाटले.>>> अगदी अगदी, आपणच निर्माते आहोत असे वाटले
सिनेमाच्या तांत्रिक बाजू हा
सिनेमाच्या तांत्रिक बाजू हा तर स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा>>>> अनुमोदन! पण चंद्रप्रकाशातले प्रसंग काहीसे फिके, संदिग्ध वाटले. माझ्यामते ते अजून परीणामकारक करता आले असते.
माझ्या मते सिनेमाचे संवादही अतिशय सुंदर आणि चपखल झाले आहेत.
या बाबतीत प्रभावळकरांचा आप्पाच थोडा कमी जमला आहे.>>>> दिलीप प्रभावळकरांच्या वाट्याला जेवढे प्रसंग आलेत, त्याचं त्यांनी सोनं केलं आहे असं मला वाटतं. त्यांची देहबोली, संवादफेक आणि चेहर्यावरचे भाव मला अतिशय आवडले.
>>>>सिनेमाच्या सुरुवातिला
>>>>सिनेमाच्या सुरुवातिला मायबोलि चा लोगो पाहुन फार छान वाटले.>>> अगदी अगदी, आपणच निर्माते आहोत असे वाटले <<<<<
मी अजुन बघू शकलो नाहीये, पण बघेन लौकरच
पण, वरील वाक्यान्शी सहमत!
निर्माते? मला तर असे वाटते की पुढल्या चित्रपटासाठी सत्यकथेवर आधारीत "ग्रामिण जीवनावरील जरा चाकोरीबाहेरील सकारात्मक मुलखावेगळ्या प्रयत्नांची" कथा-पटकथा देखिल माझ्या डोक्यात तयार आहे ती ऐकवली अस्ती! असो.
छान लिहीलय
दिलीप प्रभावळकरांच्या
दिलीप प्रभावळकरांच्या वाट्याला जेवढे प्रसंग आलेत, त्याचं त्यांनी सोनं केलं आहे असं मला वाटतं.>>> एकदम मान्य, अभिनयाबद्दल प्रश्नच नाही. पण पटकथेचा विचार करता ते पात्र नीट रुजले आहे असे वाटत नाही. भाउंना त्यांचा नैतिक दरारा का वाटतो ते ही अस्पष्ट आहे.
चित्रपट सुरेखच आहे.
चित्रपट सुरेखच आहे.
चित्रपट बघण्याची उत्सुकता
चित्रपट बघण्याची उत्सुकता वाढली. छान लिहिले आहे.
भाउंना त्यांचा नैतिक दरारा का
भाउंना त्यांचा नैतिक दरारा का वाटतो ते ही अस्पष्ट आहे.>>> दिलीप प्रभावळकरांच्या संवादांवरून हे पात्र शहरात नोकरी करून, निवृत्त होऊन मंगरूळात येऊन स्थायिक झालंय असं वाटतं. म्हणजे बाकी गावकर्यांच्या तुलनेत 'शिकलेला आणि दुनिया बघितलेला माणूस'. त्यामुळे भाऊ कदाचित त्यांना 'मानत' असावेत.
आगाऊ, चांगले लिहिले आहेस.
आगाऊ, चांगले लिहिले आहेस. सिनेमा पाहणार आहे.
पण पटकथेचा विचार करता ते
पण पटकथेचा विचार करता ते पात्र नीट रुजले आहे असे वाटत नाही. >> अनुमोदन.
केशाला १०० टक्के अधिक १!
सध्यातरी तूम्हा सग़ळ्यांच्या
सध्यातरी तूम्हा सग़ळ्यांच्या लेखनावरच समाधान मानावे लागतेय. बघायला कधी मिळेल ?
आगावा, चांगलं लिहिलं आहेस
आगावा, चांगलं लिहिलं आहेस
सध्यातरी तूम्हा सग़ळ्यांच्या
सध्यातरी तूम्हा सग़ळ्यांच्या लेखनावरच समाधान मानावे लागतेय. बघायला कधी मिळेल ?>>>>> अगदी अगदी.
भारताबाहेर राहणार्यांना काय करता येईल?
पाहणार नव्ह्ते सिनेमा, पण आता
पाहणार नव्ह्ते सिनेमा, पण आता तू लिहीलेले वाचून पहायचे ठरवले आहे.
धन्यवाद रे.
रैना
रैना
बापरे! रैना, आवडला नाय तर लेख
बापरे! रैना, आवडला नाय तर लेख परत
चित्रपट सुंदरच आहे,, दोन
चित्रपट सुंदरच आहे,, दोन "आडनाव बंधू" (कुलकर्णी) एकत्र आले की हे "साहजिकच" आहे..
पण शेवट जरा ताणल्या सारखा वाटला..
जर रुग्णालयाला फाटा मारून "देऊळ" बांधलं गेलं तर काहीतरी "प्रसंग" दाखवून "रुग्णालयाचे" महत्व पटवता आलं असता, असं वाटलं.. आणि यात दिलीप प्रभावळकरांच्या भूमिकेला पण अजुन प्रसंग मिळाले असते..
बाकी वादंच नाही.....
नमस्कार, खरंच पाहा. फारच
नमस्कार,
खरंच पाहा. फारच चित्रपट सुंदर आहे.
सुंदर चित्रपट. तूनळी च्या
सुंदर चित्रपट.
तूनळी च्या क्रुपेने संपूर्ण सिनेमा बघाय्ला मिळाला..
कालच पाहिला हा चित्रपट आणि
कालच पाहिला हा चित्रपट आणि अतिशय आवडला.
नसरूद्दीन शहाचा गेस्ट अॅपिअरन्स सुखद. पण त्याचे मराठी बोलताना उच्चार खटकत होते.