बंड्याची दिवाळी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 28 October, 2011 - 03:24

आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही. ती तशीच बाकी आहे.

किंचित सुटलेलं पोट ढगळ टी-शर्ट व जीन्सच्या आड लपवत 'शर्मा स्वीट्स'च्या बाहेर उभा असलेला बंड्या पाहून मी त्याला जोरदार हाळी दिली, ''काय बंड्या, काय म्हणतोस? '' (दचकू नका, मला अशी सवय आहे रस्त्यात जोरदार हाळी द्यायची!! ) बंड्याने हातातली सिगरेट घाईघाईने चपलेखाली चुरडली आणि ओळखीचे हसत माझ्या समोर आला, ''कायऽऽ मग!! आज बर्‍याच दिवसांनी!!''
हे आमचे सांकेतिक संभाषण प्रास्ताविक असते. किंवा खूप दिवसांनी भेटल्यासारखं ''वा वा! अलभ्य लाभ!! '' म्हणत हस्तांदोलन करायचं. (आम्ही भल्या सकाळी तापवायला ठेवलेलं दूध नासलं म्हणून चरफडत गल्लीतल्या वाण्याकडून किंवा डेअरीतून दुधाची पिशवी पारोशी, अजागळ अवतारात घेऊन येत असताना रस्त्यात एकमेकांशी झालेली नजर-भेट ही प्रत्यक्ष भेटीमध्ये गणत नाही हे प्लीज नमूद करून घ्यावे!) नशीब हेच की अजून तरी बंड्या ''लाँग टाईम नो सी यार.... '' ने गप्पांची सुरुवात करत नाही. तर, त्याही दिवशी त्या ''बर्‍याच दिवसांनी''च्या गजरानंतर अपेक्षित क्रमाने आजचे तापमान, पुण्याची हवा, रस्त्याचे ट्रॅफिक, वाढते बाजारभाव, सुट्ट्या आणि ऑफिसातले काम यांची ठराविक स्टेशने घेत घेत आमची गाडी एकदाची दिवाळीच्या खरेदीवर आली.

''काय मग, या वर्षी काय म्हणतेय दिवाळी? '' मी नेहमीचा प्रश्न विचारला. त्यावर मला त्याचे नेहमीचेच उत्तर अपेक्षित होते. (लक्षात ठेवा, इथे अनपेक्षित उत्तरे येणे अजिचबात अपेक्षित नसते. कारण त्यावर तितका काथ्याकूट करण्याइतका वेळ दोन्ही संभाषणकर्त्या पक्षांकडे असावा लागतो! )

पण बंड्याने या खेपेस आपण बदललोय हे सिद्ध करायचेच ठरविले असावे बहुदा! दोन्ही हात डोक्यामागे घेत एक जोरदार आळस देत तो उद्गारला, ''आऊटसोर्स केली दिवाळी यंदा! ''

''आँ?? .... म्हणजे रे काय? ''

''अगं सोपंय ते.... तुला(ही) कळेल! ''

''अरे हो, पण म्हणजे नक्की काय केलंस तरी काय? ''

''काय म्हणजे... नेहमीची ती दिवाळीची कामं, सफाई, सजावट, फराळ, आकाशकंदील, किल्ला.... सगळं सगळं आऊटसोर्स केलं... ''

''ए अरे वत्सा, मला जरा समजेल अशा भाषेत सांग ना जरा! ''

''अगं, पहिलं म्हणजे ती घराची सफाई.... आई-बाबा, बायको जाम कटकट करतात त्याबद्दल. मला तर वेळ नसतोच आणि बायकोला देखील इतर खूप कामं असतात. मग मी पेपरमध्ये नेहमी जाहिरात येते ना एक... त्या घराची सफाई करून देणार्‍या एका कंपनीलाच आमचं घर साफ करायचं कंत्राट देऊन टाकलं. त्यांनी पार गालिचा, सोफासेट व्हॅक्युम करण्यापासून भिंती-छत-खिडक्या वगैरे सगळं साफ करून दिलं बरं का! है चकाचक! पैसा वसूऽऽल!''

''मग बायकोनं बाकीची किरकोळ स्वच्छता घरकामाच्या बाईंकडून करून घेतली. एक दिवस मी चार प्रकारच्या मिठाया, सुकामेवा घरी आणून ठेवला. फराळाची ऑर्डर बाहेरच दिली. श्रेयासाठी रविवार पेठेत एक मस्त रेडीमेड किल्ला विकत मिळाला. आकाशकंदील तर काय झकास मिळतात गं सध्या बाजारात! त्यातला एक श्रेयाच्या पसंतीने खरेदी केला. आणि हे सगळं एका दिवसात उरकलं, बाऽऽसच! तेव्हा दिवाळीच्या घरकामाचं नो टेन्शन! मलाही आराम आणि बायकोलाही आराम! ''

''वा! '' मी खूश होऊन म्हटलं, ''मग आता बाकीची दिवाळी मजेत असेल ना? ''

''येस येस! '' बंड्या खुशीत हसला. ''या वेळी बायको पण जाम खूश आहे! तिला पार्लर आणि स्पा ट्रीटमेंटचं गिफ्ट कूपन दिलं दिवाळी आधीच! मी देखील स्पा मध्ये जाऊन फुल बॉडी मसाज वगैरे घेऊन आलो. सो... नो अभ्यंगस्नान! आता दिवाळीचे चारही दिवस रोज सकाळी वेगवेगळे नातेवाईक, मित्रमैत्रिणींना भेटायला आम्ही मोकळे!! ''

''म्हणजे? रोज घरी बोलवताय की काय त्यांना? '' मी आश्चर्याने बंड्याचा घरी माणसांची गर्दी होण्याबद्दलचा फोबिया आठवत विचारलं.

''छे छे!! तसलं काय नाही हां! कोण त्यांची उस्तरवार करणार! त्यापेक्षा आम्ही रोज एकेका ग्रुपला एकेका दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला भेटतो. कार्यक्रम आवडला तर सगळा वेळ तिथे बसतो, नाहीतर तिथून कलटी मारतो. मग मस्तपैकी बाहेरच कोठेतरी ब्रेकफास्ट किंवा ब्रंच करायचा.''

''आणि बाकीचा दिवस?''

''रोज स्पेशल प्लॅन बनवतो आम्ही! लांब ड्राईव्हला जायचं... पुण्यात भटकायचं. कुठं प्रदर्शन असेल तर ते बघून यायचं. दुपारी मस्त डाराडूर झोप काढायची. संध्याकाळी सोसायटीत काहीतरी कार्यक्रम असतोच. परवा दीपोत्सव होता. ते रांगोळ्या, आकाशकंदील - किल्ला बांधायची स्पर्धा, फॅशन शो, कॉमन फराळ, गाण्यांचा कार्यक्रम वगैरे असं असतंच काहीतरी... नाहीतरी फॅडच आहे त्याचं सध्या! आमच्या नाही तर शेजारच्या सोसायटीत, तिथं नाही तर जवळच्या बागेत असे कार्यक्रम असतातच गं! तुला मजा सांगू? आमच्या सोसायटीत तर आम्ही या वर्षीपासून फटाके फुल बॅनच केलेत. गेल्या वर्षी पाठाऱ्यांच्या पोरानं पार्किंगमधील वाहनंच पेटवायची बाकी ठेवली होती फटाके पेटवायच्या नादात! आगीचा बंब बोलवायला लागला होता. त्यामुळे नो फटाके.... नो ध्वनिप्रदूषण! सोसायटीत जायचं किंवा क्लबमध्ये. आणि तिथं बोअर झालो तर मग नदीकाठी फायरवर्क्स बघायला जायचं. भन्नाट मजा येते! येताना पुन्हा बाहेरच काहीतरी खायचं किंवा घरी पार्सल. रात्री डीव्हीडीवर किंवा टाटा स्कायवर मस्त पिक्चर टाकायचा.... किंवा गप्पा... अंताक्षरी... फुल धमाल! ''

''सह्ही आहे रे! खरंच मस्त एन्जॉय करताय दिवाळी तुम्ही. आता भाऊबीजेला बहिणींकडे जाणार असशील ना? ''

''नो, नो, नो! त्यांनाही आम्ही सर्व भावांनी बाहेरच भेटायचं ठरवलंय... प्रत्येकीकडे जाण्यायेण्यातच खूप वेळ जातो! शिवाय त्याही नोकऱ्या करतात... त्यांनाही काम पडतं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एका हॉटेलमध्ये टेबल बुक केलंय, तिथेच त्या मला व इतर भावांना ओवाळतील, त्यांना त्यांच्या गिफ्ट्स द्यायच्या, ट्रीट द्यायची की झालं! ''

''अरे ते नातेवाईकांचं ठीक आहे... पण तुझ्या कलीग्ज आणि बॉस लोकांकडे तरी तुला स्वतःला जावं लागत असेल ना? ''

''हॅ हॅ हॅ... अगं आमच्या ऑफिसात दिवाळी पार्टी त्यासाठीच तर अ‍ॅरेंज करतात.... तिथल्या तिथं काय त्या शुभेच्छा, गिफ्ट्स वगैरे एक्सचेंज करायचं. फार कटकट नाही ठेवायची! ''

''गुड! म्हणजे ही दिवाळी अगदी टेन्शन-फ्री दिवाळीच म्हण की! ''

''मग!!??!! इथं रोज मर मर मरायचं कामाच्या अन् टेन्शनच्या ओझ्याखाली, आणि हक्काच्या मिळालेल्या दोन-तीन सुट्ट्या देखील ती लोकांची उस्तरवार करण्यात, घरात काम करण्यात नाहीतर नको असणार्‍या लोकांच्या भेटीगाठीत घालवायची म्हणजे फार होतं! हे कसं सुटसुटीत! ''

''अरे पण एवढे सगळे खर्च जमवायचे म्हणजे जरा कसरत होत असेल ना? ''

''ह्यॅ! तो खर्च तर तसाही होत असतोच! तू सांग मला... कुठं होत नाही खर्च?.... मग स्वतःच्या आरामावर खर्च केला तर कुठं बिघडलं? ''

बाप रे! यह हमारा ही बंड्या है क्या? मी डोळे फाडफाडून बंड्याकडे बघत असतानाच त्याचा सेलफोन वाजला आणि तो मला ''बाय'' करून फोनवर बोलत बोलत दिसेनासा झाला. पण माझ्या मनातलं विचारचक्र सुरू झालं होतं....

बंड्याचं लॉजिक तर ''कूल'' होतं. येऊन जाऊन खर्च करायचाच आहे, तर तो स्वतःसाठी का करू नये? स्वतःच्या व कुटुंबाच्या ''हॅपी टाईम'' साठी का करू नये? आणि तरीही त्याच्या बँक बॅलन्सची मला उगाच काळजी वाटू लागली होती. एवढे सगळे खर्च हा आणि ह्याची बायको कसे जमवत असतील? कदाचित वर्षभर त्यासाठी पैसे वेगळे काढत असतील.

एखाद्या गुळगुळीत कागदाच्या कॉर्पोरेट ब्रोशर सारखी बंड्यानं त्याची दिवाळीही गुळगुळीत, झुळझुळीत कशी होईल ते पाहिलं होतं. त्यात कचरा, पसारा, गोंधळ, धूळ, घाम, धूर, प्रदूषणाला किंवा टेन्शनला काहीएक स्थान नव्हतं. नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं घराबाहेर बारा - चौदा तास राहणाऱ्या, कामापायी रोज असंख्य प्रकारच्या तणावांना झेलणाऱ्या बंड्यासारख्या तरुणांना आपले सुट्टीचे दिवस तरी कोणत्याही गोंधळाशिवाय, आपल्या मर्जीनुसार घालवायचं स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, नाही का? की तिथेही आपल्या आशा - अपेक्षांचं ओझं त्यांच्या माथी मारायचं?

बंड्याच्या आईवडीलांना पटत असेल का हे सारं? पण त्यांचा तरी तसा थेट संबंध येतोच कुठं? गेली दोन वर्षं बंड्या वेगळा राहतो. तो मजेत, त्याचे आईवडील मजेत. सगळेच तर मजेत दिसत होते....

मग माझ्या मनात ही कोणती सूक्ष्मशी कळ उमटत होती?

कदाचित बंड्याच्या लेखी दिवाळी हा फक्त एक ''एन्जॉय'' करायचा ''हॉलिडे'' म्हणून उरला होता, त्याबद्दल होती का ती कळ? की कोणत्या तरी जुन्या बाळबोध स्मृतींना उराशी कवटाळून ते चित्र आता किती वेगानं बदलतंय या रुखरुखीची होती ती कळ? गेल्या अनेक पिढ्या दिवाळी अमक्या ढमक्या पद्धतीने साजरी व्हायची, म्हणून आपणही ती तशीच साजरी करायची या अनुकरणशील धाटणीच्या विचारांना छेद जाण्याची होती का ती कळ? त्या वेदनेत आपली वर्तमान व भविष्याबद्दलची, आपल्या आचार-विचारांबद्दलची अशाश्वती जास्त होती, की आधीच्या पिढ्यांनी जे केलं ते सगळंच सगळं चांगलं, उत्तम, हितकारीच असलं पाहिजे हा भाबडा विश्वास?

कोणीतरी म्हटल्याचं आठवलं, ''Ever New, Happy You! ''

काळाप्रमाणे बदलत गेलं तर त्यात खरंच का आपला ''र्‍हास'' होतो? आणि र्‍हास नक्की कशाचा होतो.... व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा की देशाचा? की विचारांचा व मूल्यांचा? जे चांगलं असेल ते टिकेल हाही एक भाबडा विश्वासच, नाही का? नाहीतर आधीच्या कितीतरी चांगल्या गोष्टी मुळात लयाला गेल्याच नसत्या! कुटुंबसंस्था बदलली तशी सण साजरे करायची पद्धतही बदलत गेली व बदलते आहे. नशीब हेच की आजच्या पिढीला किमान दिवाळी साजरी करायची असते हे तरी माहीत आहे आणि मान्यही आहे. तशीही उठसूठ दिसणार्‍या व मनःपटलावर आदळणार्‍या जाहिरातींची व मालिकांची ती एक प्रकारे कृपाच आहे! संस्कृतीचे दळण लावून लावून ते जाहिरातदार व मालिका दिग्दर्शक एखादा सण साजरा करण्याचे व तो ठराविक स्टॅंडर्डने साजरा करण्याचे प्रेशरच आणतात तुमच्यावर! तुमच्या मानगुटीवर जाहिरातीतील सुळसुळीत कल्पना ते इतक्या बिनबोभाट बसवतात आणि त्या कल्पनांच्या तालावर आपण कधी नाचायला लागतो तेच आपल्याला कळत नाही....!!!

मग संस्कृती खरंच कुठे लुप्त पावते का? की एक अंगडाई घेऊन नव्या साजशृंगारात सामोरी येते? नव्या आचारतत्वांनुसार तिनेही का बदलू नये? कदाचित आणखी दहा-वीस वर्षांनी दिवाळी हा ग्लोबलाईझ्ड सण असेल. किंवा भारतात जगाच्या कानाकोपर्‍यातले, सर्व धर्म-संस्कृतींमधले यच्चयावत सण साजरे होत असतील. तसंही पाहायला गेलं तर दिवाळी किंवा इतर सणांमागच्या पौराणिक कथांशी तर नव्या पिढीचा संपर्क तुटल्यात जमा आहे. त्यांना त्या गोष्टींशी त्या आहेत तशा स्वरूपात रिलेटच करता येत नाही. त्यांच्या १००१ प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं नाहीत. (कारण आम्ही ते प्रश्न कधी विचारलेच नाहीत.... ना स्वतःला, ना मोठ्या मंडळींना! ना त्यांच्यावर कधी विचार केला...!! ) आता ही चिमखडी पोरं जेव्हा पेचात टाकणारे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना काहीतरी सांगून त्यांचे शंकासमाधान करावे लागते. पण त्यांचे कितीतरी प्रश्न अनुत्तरितच राहतात.....

इतर ठिकाणी ग्लोबलाईझ्ड अर्थव्यवस्थेची मूल्ये अंगिकारायची - नव्या विचारधारा - आचार - जीवनपद्धती स्वीकारायची, मात्र सांस्कृतिक - सामाजिक चित्र जसे (आपल्या मनात) आहे तसेच राहावे अशी इच्छा ठेवायची यातील विरोधाभास कितपत सच्चा व कितपत मनोरंजक?

बंड्यानं किमान स्वतःपुरतं तरी ''हॅपी दिवाळी'' चं सोल्युशन शोधलं आहे. त्याच्या उत्तरानं त्याचा काय फायदा, काय तोटा होईल हे काळच सांगेल... पण त्यात इतरांचा तरी आर्थिक फायदाच आहे! आणि कोणास ठाऊक, कदाचित आणखी आठ - दहा वर्षांनी त्याची मुलगी श्रेया जरा मोठी होईल, तोवर त्याचं हेही समीकरण बदलेल. कारण तेव्हाची संस्कृती पुन्हा वेगळं वळण घेऊ पाहत असेल!!

-- अरुंधती

गुलमोहर: 

अरुंधती छान लिहिलं आहेस.
स्वतःला दमवुन न घेता आणि घरातल्या इतरांवर चिडचिड न करता जमेल तेवढे करणे आणि आनंदात रहाणे हा मंत्र आहे Happy
(पण कधीकधी आजुबाजुच्या / नातेवाईकांच्या दबावापाई तो पाळणे कठीण आहे असे वाटते.)

मस्तच!
आवडली बंड्याची दिवाळी, लॉजिक पटले. मला विचाराल तर फटाके,फराळ, अभ्यंग, ओवाळणी हे सगळे बाह्यरुप आहे. घरातील सगळ्यांनी एकत्र येऊन निवांत गप्पा मारता येणे, एखादा सिनेमा टाकणं, एकमेकाचा प्रेझेन्स एंजॉय करणं हे महत्वाचे. सणाचा/सुट्टिचा उद्देश प्रत्येकाने आपला आपण ठरवावा, तीच त्या व्यक्तिची वा घराची स्वतःची संस्कृती मानता येईल.

इन फॅक्ट फराळाबाबत मला उलटं वाटायला लागलय..
जेव्हा आपण विकत आणतो तेव्हा त्यात नक्की काय काय आहे ते न कळल्यानं चापलं जातं.. शंकरपाळ्यातलं/चकल्यातलं तेल आणि तूप आणि साखर जवळून पाहिल्यावर काय बिशाद त्या विकत आणून खायची Proud
वर्षातनं एकदा - रिअ‍ॅलिटी चेक रहावा म्हणून तरी घरी केलं पाहिजे छोट्या प्रमाणात.. Wink

हा एक मुद्दा सोडला तर एकंदर बंड्याची पद्धतच स्टँडर्ड आहे सध्या आणि रोज घरात/घराबाहेर मिळून राबल्यावर गरजेची पण आहे..

>सगळं आपापल्या दृष्टिकोनावर आहे .... ज्याला ज्यात आनंद मिळतोय त्यानं ते करावं.... ज्याला आवड, उसंत, वेळ, सवड असेल त्यानं सण खुश्शाल हवे तसे/ पारंपारिक पद्धतीने साजरे करावेत. पण ज्याला वेळेची मारामार आहे, इतर भरपूर व्याप आहेत आणि सणासुदीला दमछाक होईपर्यंत धावपळ न करता शांतपणे, मजेत, सुहृदांबरोबर चार निवांत क्षण घालवायचेत त्यानं त्याच्या पद्धतीनं साजरे करावेत सण

हे शाब्बास! एकदम पटलं. १००१ मोदक!

आवडेश Happy

रिअ‍ॅलिटी चेक रहावा म्हणून तरी घरी केलं पाहिजे छोट्या प्रमाणात..<<
रिअ‍ॅलिटी चेक हा हेल्थ कॉन्शस म्हणून की आपल्याला येतं म्हणून? आणि कोणी केलं पाहिजे? Proud

मला आवडली बंड्याची दिवाळी. मी पण पहिल्यांदाच ह्यावेळी काहीच केले नाही. एक पैशाचे फटाके आणले नाहीत कि मिठाई. लक्षमी पूजनाला मस्त शिरा केला, एक अ‍ॅपल कापले. पूजा मात्र मनो भावे. साळी, बत्ताशे वाया जातात म्हणून ते ही आणले नाही. मस्त चॉकोलेट्स, आइस्क्रीम, आणले. दोन तीन दिवस बाहेर मस्त जेवलो. हवी ती शॉपिन्ग केली. सर्वांना मजबूत बोनस वगैरे दिल्हे. घरचाच जुना दिवा रंगवून लावला.
ठाण्यात घेतलेली तुकड्यांची रांगोळी घरासमोर लावली. ( खूप डॉग ट्रीट्स पण आणल्या. कुत्रे फटाक्याला घाबरतात म्हणून त्यांना जवळ घेऊन बसले थोडा वेळ.) शॉर्ट अन स्वीट. खूप फटाके पाहिले मात्र. Happy

लेख आवडला आणि पटला.

इनमिन एका दिवसाची सुट्टी त्यात सकाळी फराळ, जेवन, रांगोळी, पुजा , नैवेद्य, फटाके आणि दुसरे दिवशी पाडव्याला नेहमीसारखे ऑफिसला यायची गडबड. नवीन वर्षाची सुरवात जुन्या प्रकारे! कसला पाडवा आणि कसली दिवाळी! भाउबिजेला फोनवर शुभेच्छा!

आवडली बंड्याची दिवाळी साजरी करायची पद्धत. अकु मस्तच ग Happy
मी सुद्धा यावेळी बंडीण झाले होते. नवर्‍याला सुट्टी नव्हती त्यामुळे दोन्ही लेकी आणि मी फक्त आणि फक्त मज्जाच केली. अर्थात मी चकली आणि शंपा केलेले बाकी काहीही नाही.
रोज सकाळी आपापल्या वेळेनुसार उठणे, बाहेर भटकणे आणि खाऊनच घरी येणे. दुपारी मस्त झोप आणि संध्याकाळी नवरा आल्यावर नटुन थटुन पुजा झाली की परत काहीतरी जेवायला बाहेर किंवा पार्सल.
आम्ही सगळेच वर्षभर लवकर उठतो त्यामुळे अजिबात आग्रही नाही आहोत दिवाळीत लवकर उठण्यासाठी. गोडाधोडाचे पदार्थ अट्टाहास करुन करायचे आणि आपणच बोटभर चाखायचे मग कशाला खटाटोप?

छान लिहीलंयस. :). जेव्हा ज्यावर्षी वेळ असेल तेव्हा आपल्याला आवडेल ते करावं. बाकी आउटसोर्स. तसंही आपण स्वच्छता आणि खरेदी वर्षभर गरजेनुसार करतच असतो.

बंड्याची दिवाळी एकदम पटेश Proud
<<बंड्यानं किमान स्वतःपुरतं तरी ''हॅपी दिवाळी'' चं सोल्युशन शोधलं आहे. त्याच्या उत्तरानं त्याचा काय फायदा, काय तोटा होईल हे काळच सांगेल... पण त्यात इतरांचा तरी आर्थिक फायदाच आहे! >> अगदी अगदि

मला नाही आवडली बंड्याची दिवाळी. धावपळ केल्याशिवाय, स्वत राबून घर स्वच्छ केल्याशिवाय दिवाळी वाटतच नाही मला. आणि नंतर एखादा दिवस करायचा आराम. त्यात काय मोठंसं. सणाचा उत्साह सगळ्यांनी मिळून आपल्या घरासाठी काहीतरी करण्यातच आहे. त्यामुळेच मनं एकत्र येतात. आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करतय ही भावना फार छान असते मग ते बायकोने नवर्यासाठी किंवा मुलांसाठी केलेलं फराळाचं असुदे अथवा सगळ्यांनी मिळून केलेला आकाशकंदिल असुदे. आपल्या लोकांसाठी त्या निमित्ताने आपण काहीतरी करतो नाहीतर नोकरी ताणतणाव हे आहेच की नेहमीचं.
पण जसं वनराई म्हणतात हा माझा दृष्टिकोन आहे.
<सगळं आपापल्या दृष्टिकोनावर आहे .... ज्याला ज्यात आनंद मिळतोय त्यानं ते करावं>

धन्यवाद! Happy

नानबा, घरगुती व्यवसाय (लघु-उद्योग) म्हणून चांगल्या दर्जाचे व चांगला माल वापरून फराळाचे पदार्थ करून विकणारी खूप कुटुंबं पाहण्यात आहेत. त्यांची व समस्त छोट्या व्यावसायिकांची (फुलवाले, शिंपी, दिवाळीसाठीच्या वस्तू विकणारे) दिवाळी खरं तर आपली दिवाळी संपल्यानंतरच होते. निवांत. Happy

घरगुती व्यवसाय (लघु-उद्योग) म्हणून चांगल्या दर्जाचे व चांगला माल वापरून फराळाचे पदार्थ करून विकणारी खूप कुटुंबं पाहण्यात आहेत. <<<<
अश्यांचे व्यवसाय टिकवणं ही माझी नैतिक जबाबदारी समजते मी. Happy
यात अर्धा विनोदाचा भाग सोडला तरी घरगुती लघु-उद्योगांना, महिला बचतगटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल असे बघणे आणि त्यातून ते उद्योग मोठे होण्यास हातभार लावता येईल का बघणे यासाठी वेळ द्यायला मला जास्त आवडेल घरचा फराळ रांधत बसण्यापेक्षा. माझ्यामते तो वेळ जास्त सत्कारणी लागेल माझा.

मस्त.. माझ्याकडे गेली ८ वर्षे बंड्याचीच दिवाळी.. ! Proud

कंदिल आणि इतर माळा सजावट मी करत नाही.. कारण वीज वाया जाते.. फटाके लावत नाही कारण ध्वनी आणि वातावरण प्रदुषण.. जमल्यास आम्ही दिवाळीला केसरी किंवा सचिन किंवा कोकणातल्या आमच्या घरी (पाहुणे म्हणून) जातो.. घरी गेल्यास आजे सासुबाई.. मेधासासू काय सांगेल ते रितीनुसार्/प्रथेनुसार सगळे एकत्र (दीर.. नवरा.. सासरेबुवांसकट) करतो..!

खरा ताप केंव्हा होतो.. जेंव्हा बंडीण्/बंडू आपली दिवाळी कोणाशी शेअर करू पहातात तेंव्हा.. "ही तुमची आयटीवाल्यांची थेर.. आमच्याकडे किनै चालतच नाही केल्याशिवाय.. आमच्याकडे कुण्णी हात लावत नाहीत बाहेरच्या फराळाला.. चिकटवलेली रांगोळी? मी तर रोजच दाराबाहेर पुस्सून घेऊन दिवा लावते नि रांगोळी घालते, नाही तर मुलांवर संस्कार कसे होणार (तुमच्या)?" असं नाक उडवत, तुक टाकत त्यांना ऐकवत तेंव्हा! आणि मग सुरू होतात पीअर प्रेशर.. गिल्टी फिलिंग.. दिवाळी सेलेब्रेशन्स!

जाजु, आपण करतो तेच किती चांगले आणि बाकीचे करतात ते कसे क्षुद्र / वाईट / फुटकळ इ. इ. भ्रम / समज बाळगणारे लोक जगाच्या पाठीवर सर्व देशांमध्ये दिसतात. सर्व संस्कृतींमध्ये दिसतात!! इथे रांगोळी, फराळ, आकाशकंदील इ. गोष्टींचा संदर्भ दिवाळीमुळे येतो... कोठे अन्य धर्मातील वा देशातील अन्य काही सण साजरा करण्यावरून येतो. ज्यांना घरात किचनमध्ये दिवसाचे बारा-सोळा तास खटून पदार्थांचे डबे भरण्यात धन्यता वाटते, तासन् तास बेकिंग - फ्रायिंग - कुकिंग - क्लीनिंग मध्ये घालवण्यात समाधान मिळते त्यांना तर तो पर्याय खुलाच असतो की! पण त्याचा अर्थ इतर कोणी वेगळ्या पद्धतीने तोच सण साजरा करत असेल तर त्यात नाके मुरडण्यात काहीच पॉईन्ट नाही! Vice versa! Happy

>>पण त्याचा अर्थ इतर कोणी वेगळ्या पद्धतीने तोच सण साजरा करत असेल तर त्यात नाके मुरडण्यात काहीच पॉईन्ट नाही! Vice versa!

आणि कोणी असं नाक मुरडत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं हेच उत्तम. त्यांनी असं काही म्हटलं की नुस्तं एक स्मित करावं आणि विषय बदलावा. म्हणजे आपोआप आपण त्यांच्या म्हणण्याला फारशी किंमत देत नाही हे त्यांना कळतं. हे दोन्ही पध्दतीने दिवाळी साजरी करणार्‍यांना सारखंच लागू.

जे काही करायचे, साफसफाइ, फराळाचे पदार्थ इ. इ. ते सर्व मनापासून आवडत असेल तर करावे. ''यंदा दिवाळीला मी किल्ला करीन, आकाशकंदिल करीन, फराळाचे करीन, असे स्वतःला मनापासून वाटत असले तर करावे." (कारण अनेक वर्षांच्या चालिरिती, "संस्कार" असतात म्हणून).

या दिवसात बाहेर छान छान गोष्टी मिळतात म्हणून त्या आणाव्या असे वाटत असेल तर तसे करावे. घरीच केले पाहिजे असे काहीहि नाही. तसे दिवाळी बद्दल काही वाटतच नसेल, तर ते तरी कशाला?

फक्त लक्षात ठेवा, जे काही निर्णय तुम्ही घ्याल, जसे आपल्या मनाला शिकवाल, त्यातून जसे होईल, त्याची जबाबदारी स्वतः उचला. उगाच मला आवडत नाही म्हणून समाजाने बदलावे, मला नावे ठेवू नये असे रडायचे असेल तर काही अर्थ नाही.

झक्की Happy

Pages