बंड्याची दिवाळी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 28 October, 2011 - 03:24

आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही. ती तशीच बाकी आहे.

किंचित सुटलेलं पोट ढगळ टी-शर्ट व जीन्सच्या आड लपवत 'शर्मा स्वीट्स'च्या बाहेर उभा असलेला बंड्या पाहून मी त्याला जोरदार हाळी दिली, ''काय बंड्या, काय म्हणतोस? '' (दचकू नका, मला अशी सवय आहे रस्त्यात जोरदार हाळी द्यायची!! ) बंड्याने हातातली सिगरेट घाईघाईने चपलेखाली चुरडली आणि ओळखीचे हसत माझ्या समोर आला, ''कायऽऽ मग!! आज बर्‍याच दिवसांनी!!''
हे आमचे सांकेतिक संभाषण प्रास्ताविक असते. किंवा खूप दिवसांनी भेटल्यासारखं ''वा वा! अलभ्य लाभ!! '' म्हणत हस्तांदोलन करायचं. (आम्ही भल्या सकाळी तापवायला ठेवलेलं दूध नासलं म्हणून चरफडत गल्लीतल्या वाण्याकडून किंवा डेअरीतून दुधाची पिशवी पारोशी, अजागळ अवतारात घेऊन येत असताना रस्त्यात एकमेकांशी झालेली नजर-भेट ही प्रत्यक्ष भेटीमध्ये गणत नाही हे प्लीज नमूद करून घ्यावे!) नशीब हेच की अजून तरी बंड्या ''लाँग टाईम नो सी यार.... '' ने गप्पांची सुरुवात करत नाही. तर, त्याही दिवशी त्या ''बर्‍याच दिवसांनी''च्या गजरानंतर अपेक्षित क्रमाने आजचे तापमान, पुण्याची हवा, रस्त्याचे ट्रॅफिक, वाढते बाजारभाव, सुट्ट्या आणि ऑफिसातले काम यांची ठराविक स्टेशने घेत घेत आमची गाडी एकदाची दिवाळीच्या खरेदीवर आली.

''काय मग, या वर्षी काय म्हणतेय दिवाळी? '' मी नेहमीचा प्रश्न विचारला. त्यावर मला त्याचे नेहमीचेच उत्तर अपेक्षित होते. (लक्षात ठेवा, इथे अनपेक्षित उत्तरे येणे अजिचबात अपेक्षित नसते. कारण त्यावर तितका काथ्याकूट करण्याइतका वेळ दोन्ही संभाषणकर्त्या पक्षांकडे असावा लागतो! )

पण बंड्याने या खेपेस आपण बदललोय हे सिद्ध करायचेच ठरविले असावे बहुदा! दोन्ही हात डोक्यामागे घेत एक जोरदार आळस देत तो उद्गारला, ''आऊटसोर्स केली दिवाळी यंदा! ''

''आँ?? .... म्हणजे रे काय? ''

''अगं सोपंय ते.... तुला(ही) कळेल! ''

''अरे हो, पण म्हणजे नक्की काय केलंस तरी काय? ''

''काय म्हणजे... नेहमीची ती दिवाळीची कामं, सफाई, सजावट, फराळ, आकाशकंदील, किल्ला.... सगळं सगळं आऊटसोर्स केलं... ''

''ए अरे वत्सा, मला जरा समजेल अशा भाषेत सांग ना जरा! ''

''अगं, पहिलं म्हणजे ती घराची सफाई.... आई-बाबा, बायको जाम कटकट करतात त्याबद्दल. मला तर वेळ नसतोच आणि बायकोला देखील इतर खूप कामं असतात. मग मी पेपरमध्ये नेहमी जाहिरात येते ना एक... त्या घराची सफाई करून देणार्‍या एका कंपनीलाच आमचं घर साफ करायचं कंत्राट देऊन टाकलं. त्यांनी पार गालिचा, सोफासेट व्हॅक्युम करण्यापासून भिंती-छत-खिडक्या वगैरे सगळं साफ करून दिलं बरं का! है चकाचक! पैसा वसूऽऽल!''

''मग बायकोनं बाकीची किरकोळ स्वच्छता घरकामाच्या बाईंकडून करून घेतली. एक दिवस मी चार प्रकारच्या मिठाया, सुकामेवा घरी आणून ठेवला. फराळाची ऑर्डर बाहेरच दिली. श्रेयासाठी रविवार पेठेत एक मस्त रेडीमेड किल्ला विकत मिळाला. आकाशकंदील तर काय झकास मिळतात गं सध्या बाजारात! त्यातला एक श्रेयाच्या पसंतीने खरेदी केला. आणि हे सगळं एका दिवसात उरकलं, बाऽऽसच! तेव्हा दिवाळीच्या घरकामाचं नो टेन्शन! मलाही आराम आणि बायकोलाही आराम! ''

''वा! '' मी खूश होऊन म्हटलं, ''मग आता बाकीची दिवाळी मजेत असेल ना? ''

''येस येस! '' बंड्या खुशीत हसला. ''या वेळी बायको पण जाम खूश आहे! तिला पार्लर आणि स्पा ट्रीटमेंटचं गिफ्ट कूपन दिलं दिवाळी आधीच! मी देखील स्पा मध्ये जाऊन फुल बॉडी मसाज वगैरे घेऊन आलो. सो... नो अभ्यंगस्नान! आता दिवाळीचे चारही दिवस रोज सकाळी वेगवेगळे नातेवाईक, मित्रमैत्रिणींना भेटायला आम्ही मोकळे!! ''

''म्हणजे? रोज घरी बोलवताय की काय त्यांना? '' मी आश्चर्याने बंड्याचा घरी माणसांची गर्दी होण्याबद्दलचा फोबिया आठवत विचारलं.

''छे छे!! तसलं काय नाही हां! कोण त्यांची उस्तरवार करणार! त्यापेक्षा आम्ही रोज एकेका ग्रुपला एकेका दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला भेटतो. कार्यक्रम आवडला तर सगळा वेळ तिथे बसतो, नाहीतर तिथून कलटी मारतो. मग मस्तपैकी बाहेरच कोठेतरी ब्रेकफास्ट किंवा ब्रंच करायचा.''

''आणि बाकीचा दिवस?''

''रोज स्पेशल प्लॅन बनवतो आम्ही! लांब ड्राईव्हला जायचं... पुण्यात भटकायचं. कुठं प्रदर्शन असेल तर ते बघून यायचं. दुपारी मस्त डाराडूर झोप काढायची. संध्याकाळी सोसायटीत काहीतरी कार्यक्रम असतोच. परवा दीपोत्सव होता. ते रांगोळ्या, आकाशकंदील - किल्ला बांधायची स्पर्धा, फॅशन शो, कॉमन फराळ, गाण्यांचा कार्यक्रम वगैरे असं असतंच काहीतरी... नाहीतरी फॅडच आहे त्याचं सध्या! आमच्या नाही तर शेजारच्या सोसायटीत, तिथं नाही तर जवळच्या बागेत असे कार्यक्रम असतातच गं! तुला मजा सांगू? आमच्या सोसायटीत तर आम्ही या वर्षीपासून फटाके फुल बॅनच केलेत. गेल्या वर्षी पाठाऱ्यांच्या पोरानं पार्किंगमधील वाहनंच पेटवायची बाकी ठेवली होती फटाके पेटवायच्या नादात! आगीचा बंब बोलवायला लागला होता. त्यामुळे नो फटाके.... नो ध्वनिप्रदूषण! सोसायटीत जायचं किंवा क्लबमध्ये. आणि तिथं बोअर झालो तर मग नदीकाठी फायरवर्क्स बघायला जायचं. भन्नाट मजा येते! येताना पुन्हा बाहेरच काहीतरी खायचं किंवा घरी पार्सल. रात्री डीव्हीडीवर किंवा टाटा स्कायवर मस्त पिक्चर टाकायचा.... किंवा गप्पा... अंताक्षरी... फुल धमाल! ''

''सह्ही आहे रे! खरंच मस्त एन्जॉय करताय दिवाळी तुम्ही. आता भाऊबीजेला बहिणींकडे जाणार असशील ना? ''

''नो, नो, नो! त्यांनाही आम्ही सर्व भावांनी बाहेरच भेटायचं ठरवलंय... प्रत्येकीकडे जाण्यायेण्यातच खूप वेळ जातो! शिवाय त्याही नोकऱ्या करतात... त्यांनाही काम पडतं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एका हॉटेलमध्ये टेबल बुक केलंय, तिथेच त्या मला व इतर भावांना ओवाळतील, त्यांना त्यांच्या गिफ्ट्स द्यायच्या, ट्रीट द्यायची की झालं! ''

''अरे ते नातेवाईकांचं ठीक आहे... पण तुझ्या कलीग्ज आणि बॉस लोकांकडे तरी तुला स्वतःला जावं लागत असेल ना? ''

''हॅ हॅ हॅ... अगं आमच्या ऑफिसात दिवाळी पार्टी त्यासाठीच तर अ‍ॅरेंज करतात.... तिथल्या तिथं काय त्या शुभेच्छा, गिफ्ट्स वगैरे एक्सचेंज करायचं. फार कटकट नाही ठेवायची! ''

''गुड! म्हणजे ही दिवाळी अगदी टेन्शन-फ्री दिवाळीच म्हण की! ''

''मग!!??!! इथं रोज मर मर मरायचं कामाच्या अन् टेन्शनच्या ओझ्याखाली, आणि हक्काच्या मिळालेल्या दोन-तीन सुट्ट्या देखील ती लोकांची उस्तरवार करण्यात, घरात काम करण्यात नाहीतर नको असणार्‍या लोकांच्या भेटीगाठीत घालवायची म्हणजे फार होतं! हे कसं सुटसुटीत! ''

''अरे पण एवढे सगळे खर्च जमवायचे म्हणजे जरा कसरत होत असेल ना? ''

''ह्यॅ! तो खर्च तर तसाही होत असतोच! तू सांग मला... कुठं होत नाही खर्च?.... मग स्वतःच्या आरामावर खर्च केला तर कुठं बिघडलं? ''

बाप रे! यह हमारा ही बंड्या है क्या? मी डोळे फाडफाडून बंड्याकडे बघत असतानाच त्याचा सेलफोन वाजला आणि तो मला ''बाय'' करून फोनवर बोलत बोलत दिसेनासा झाला. पण माझ्या मनातलं विचारचक्र सुरू झालं होतं....

बंड्याचं लॉजिक तर ''कूल'' होतं. येऊन जाऊन खर्च करायचाच आहे, तर तो स्वतःसाठी का करू नये? स्वतःच्या व कुटुंबाच्या ''हॅपी टाईम'' साठी का करू नये? आणि तरीही त्याच्या बँक बॅलन्सची मला उगाच काळजी वाटू लागली होती. एवढे सगळे खर्च हा आणि ह्याची बायको कसे जमवत असतील? कदाचित वर्षभर त्यासाठी पैसे वेगळे काढत असतील.

एखाद्या गुळगुळीत कागदाच्या कॉर्पोरेट ब्रोशर सारखी बंड्यानं त्याची दिवाळीही गुळगुळीत, झुळझुळीत कशी होईल ते पाहिलं होतं. त्यात कचरा, पसारा, गोंधळ, धूळ, घाम, धूर, प्रदूषणाला किंवा टेन्शनला काहीएक स्थान नव्हतं. नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं घराबाहेर बारा - चौदा तास राहणाऱ्या, कामापायी रोज असंख्य प्रकारच्या तणावांना झेलणाऱ्या बंड्यासारख्या तरुणांना आपले सुट्टीचे दिवस तरी कोणत्याही गोंधळाशिवाय, आपल्या मर्जीनुसार घालवायचं स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, नाही का? की तिथेही आपल्या आशा - अपेक्षांचं ओझं त्यांच्या माथी मारायचं?

बंड्याच्या आईवडीलांना पटत असेल का हे सारं? पण त्यांचा तरी तसा थेट संबंध येतोच कुठं? गेली दोन वर्षं बंड्या वेगळा राहतो. तो मजेत, त्याचे आईवडील मजेत. सगळेच तर मजेत दिसत होते....

मग माझ्या मनात ही कोणती सूक्ष्मशी कळ उमटत होती?

कदाचित बंड्याच्या लेखी दिवाळी हा फक्त एक ''एन्जॉय'' करायचा ''हॉलिडे'' म्हणून उरला होता, त्याबद्दल होती का ती कळ? की कोणत्या तरी जुन्या बाळबोध स्मृतींना उराशी कवटाळून ते चित्र आता किती वेगानं बदलतंय या रुखरुखीची होती ती कळ? गेल्या अनेक पिढ्या दिवाळी अमक्या ढमक्या पद्धतीने साजरी व्हायची, म्हणून आपणही ती तशीच साजरी करायची या अनुकरणशील धाटणीच्या विचारांना छेद जाण्याची होती का ती कळ? त्या वेदनेत आपली वर्तमान व भविष्याबद्दलची, आपल्या आचार-विचारांबद्दलची अशाश्वती जास्त होती, की आधीच्या पिढ्यांनी जे केलं ते सगळंच सगळं चांगलं, उत्तम, हितकारीच असलं पाहिजे हा भाबडा विश्वास?

कोणीतरी म्हटल्याचं आठवलं, ''Ever New, Happy You! ''

काळाप्रमाणे बदलत गेलं तर त्यात खरंच का आपला ''र्‍हास'' होतो? आणि र्‍हास नक्की कशाचा होतो.... व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा की देशाचा? की विचारांचा व मूल्यांचा? जे चांगलं असेल ते टिकेल हाही एक भाबडा विश्वासच, नाही का? नाहीतर आधीच्या कितीतरी चांगल्या गोष्टी मुळात लयाला गेल्याच नसत्या! कुटुंबसंस्था बदलली तशी सण साजरे करायची पद्धतही बदलत गेली व बदलते आहे. नशीब हेच की आजच्या पिढीला किमान दिवाळी साजरी करायची असते हे तरी माहीत आहे आणि मान्यही आहे. तशीही उठसूठ दिसणार्‍या व मनःपटलावर आदळणार्‍या जाहिरातींची व मालिकांची ती एक प्रकारे कृपाच आहे! संस्कृतीचे दळण लावून लावून ते जाहिरातदार व मालिका दिग्दर्शक एखादा सण साजरा करण्याचे व तो ठराविक स्टॅंडर्डने साजरा करण्याचे प्रेशरच आणतात तुमच्यावर! तुमच्या मानगुटीवर जाहिरातीतील सुळसुळीत कल्पना ते इतक्या बिनबोभाट बसवतात आणि त्या कल्पनांच्या तालावर आपण कधी नाचायला लागतो तेच आपल्याला कळत नाही....!!!

मग संस्कृती खरंच कुठे लुप्त पावते का? की एक अंगडाई घेऊन नव्या साजशृंगारात सामोरी येते? नव्या आचारतत्वांनुसार तिनेही का बदलू नये? कदाचित आणखी दहा-वीस वर्षांनी दिवाळी हा ग्लोबलाईझ्ड सण असेल. किंवा भारतात जगाच्या कानाकोपर्‍यातले, सर्व धर्म-संस्कृतींमधले यच्चयावत सण साजरे होत असतील. तसंही पाहायला गेलं तर दिवाळी किंवा इतर सणांमागच्या पौराणिक कथांशी तर नव्या पिढीचा संपर्क तुटल्यात जमा आहे. त्यांना त्या गोष्टींशी त्या आहेत तशा स्वरूपात रिलेटच करता येत नाही. त्यांच्या १००१ प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं नाहीत. (कारण आम्ही ते प्रश्न कधी विचारलेच नाहीत.... ना स्वतःला, ना मोठ्या मंडळींना! ना त्यांच्यावर कधी विचार केला...!! ) आता ही चिमखडी पोरं जेव्हा पेचात टाकणारे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना काहीतरी सांगून त्यांचे शंकासमाधान करावे लागते. पण त्यांचे कितीतरी प्रश्न अनुत्तरितच राहतात.....

इतर ठिकाणी ग्लोबलाईझ्ड अर्थव्यवस्थेची मूल्ये अंगिकारायची - नव्या विचारधारा - आचार - जीवनपद्धती स्वीकारायची, मात्र सांस्कृतिक - सामाजिक चित्र जसे (आपल्या मनात) आहे तसेच राहावे अशी इच्छा ठेवायची यातील विरोधाभास कितपत सच्चा व कितपत मनोरंजक?

बंड्यानं किमान स्वतःपुरतं तरी ''हॅपी दिवाळी'' चं सोल्युशन शोधलं आहे. त्याच्या उत्तरानं त्याचा काय फायदा, काय तोटा होईल हे काळच सांगेल... पण त्यात इतरांचा तरी आर्थिक फायदाच आहे! आणि कोणास ठाऊक, कदाचित आणखी आठ - दहा वर्षांनी त्याची मुलगी श्रेया जरा मोठी होईल, तोवर त्याचं हेही समीकरण बदलेल. कारण तेव्हाची संस्कृती पुन्हा वेगळं वळण घेऊ पाहत असेल!!

-- अरुंधती

गुलमोहर: 

.

मुली, तुला नवे बाफ - नवे वाद घालायचे आखाडे तयार करायची अशी अतीव इच्छा का व्हावी बरं?? Light 1

Et tu, Brutus??
परत एकदा 'आपली संस्कृती', धर्म, शहाणे/नालायक पूर्वज, परंपरा, त्यांचं जतन, उच्चवर्णीयांनी हजारो वर्षं चालवलेले शोषण... मग पुढे वेद, वैज्ञानिक शोध, आर्यांचा उगम, परकीय आक्रमणे, अशी स्टेशने घेत घेत इथे रामायण-महाभारत होईल हे तुला दिसत नाही का? Uhoh

रच्याकने, नेहेमीप्रमाणेच छान लिहिलंयस Happy

वरदा Lol लिहिलं नसतं तर झोप नसती आली!! Proud त्यापेक्षा मनातलं लिहून टाकलं.... हवं तर घ्या, न्हायतर सोडून द्या.... आपला आग्रह नाही कोणालाच!!

थँक्स शैलजा Happy

(भरत.... धन्यवाद देखील कंसातच देतेय :हाहा:)

वरदे, वादच घालायचा असेल तर त्यांच्या कळफलकाला कोण अटकाव घालणार!!??!! Wink आणि वाद घालून आजूबाजूला दिसणारं वास्तव जर ''बदलणार'' असेल तर घालोत खुशाल वाद बापडे! की फर्क पैंदा?

सर्वांचे आभार! Happy

chaan aahe....mi suddha same kele.... ek tar suttya milat nahi .... natevaik dya sodun gharatlyanshi suddha bolayla milat nahi... Happy

दिवाळी आधी स्वतःच्या हाताते केलेली घराची रंगरंगोटी/सजावट, घरांत दरवळणारा फराळाचा सुगंध, घरच्या आवडीने बनवलेल्या फराळाची चव, त्यासाठी आवर्जुन मनापासुन पैसे खर्चुन केलेली दिवाळीची खरेदी, आवडीने बनवलेला आकाश कंदील...,
ते सकाळी ब्रह्ममुहुर्तावर उठुन नैसर्गिक उटणे लावुन केलेले अभ्यंग स्नान, स्नाना नंतर तुळशी समोर फोडलेली कार्टी/त्यांची सक्काळ सक्काळ जिभेवर घेतलेली कडवड चव व ती जाण्यासाठी देवापुढे प्रार्थना करुन मग गोडधोड फराळावर मारलेला ताव...मोठ्यांच्या उपस्थित लहानांचे फटाके फोडतानाचा उत्साह.....
अजुन खुप काही....
(नाही 'संस्कृती, परंपरा वैगरे बद्दल.. असं मी काही म्हणत नाहीय)

ज्यांनी पुर्विपासुन अशी दिवाळी आनंदाने साजरी केली त्यांसाठी....आधुनिक दिवाळी 'पाणचट'.
बंड्याने जे साजरे केले तो कोणतातरी 'आधुनिक सण' असु शकतो.... दिवाळी नाही.....हेही स्वगत.

पण आंधुतै 'वेगळे पणा' छान मांडला आहेस... Happy

मला बंड्याची दिवाळी आवडली.
घरातल्या सगळ्यांना आराम करता येईल आणि एकत्र येऊन आनंदही लुटता येईल ह्याचं भान त्याला आहे.
लेखही आवडला. शेवटचं चिंतन भारी आणि प्रांजळ...

बाकी लाथाळी होऊ नये म्हणून शुभेच्छा! Happy

वरदा Proud

हे मलादेखील मनापासून आवडलं.

खासकरून या सर्वामागचं बंड्याचं लॉजिक पटून गेलं. आपल्यालाच त्रास करून घेऊन कुठलाच सण साजरा करण्यात काहीच अर्थ नाही. हेच लॉजिक वापरून मी कुठलेच उपवास करत नाही!!!

नंदिनी, नी - खरंच मलापण हे लॉजिक खूप आधीच पटलंय. बंगाली समाजात सहसा कसलेही कुळधर्म/ कुळाचार नसतात. वर्षातून फक्त लक्ष्मी आणि सरस्वती पूजा (त्याही सगळ्यांकडे असतातच असं नाही). फारसे कसलेही उपास नाहीत. आणि इथे उपासाला पोळीभाजी चालते Proud
शिवाय सगळ्यात मोठा सण दुर्गापूजेचा, तेव्हा खूपशा ठिकाणी सार्वजनिक पूजेत सगळ्यांना सकाळी प्रसादाचं जेवण असतं. त्यामुळे सक्काळपासून तमाम महिलावर्ग सुंदर साड्या नेसून इकडून तिकडे हिडत असतो. पूजेत संध्याकाळी सर्व बंगाली बाहेरच जेवतात अलिखित नियम असल्यासारखा... ४ दिवस घरी चुली थंडच असतात. नो फराळ, नो पक्वान्नं, नो स्ट्रेस.... आणि यावरून बंगाली बायका आळशी आहेत असा ग्रह कृपया कुणी करून घेऊ नये. बहुतेक जणी रोज दहाठाव स्वयंपाक करतात....

आणि यात कुठेही परंपरा खंडित झालीये असा आक्रोश कुणीही वयस्कर बंगाली आजपर्यंत करताना मला तरी दिसला नाहीये. पूर्वी त्यांच्याकडेही पूजेच्या आधी मिठाया/ फराळ करून ठेवायची पद्धत होती. पण आता ती कधीच नामशेष झालीये..

आता याचा अर्थ हा समाज कमी धार्मिक/ सांस्कृतिक वारसा न जपणारा आहे असं समजायचं का??
शेवटी सगळ्यांनी मिळून आनंद लुटणं महत्त्वाचं की आपली परंपरा या अट्टाहासापायी 'सग्गळं सग्गळं' करत रहाणं हे ज्याचं त्यानी ठरवावं. आणि आपण जितकी हौस असेल/ जमत असेल तितकं करतोच की घरात.... शेवटी आपण आणि आपलं कुटुंब कशात आनंदी रहातं याचा सुवर्णमध्य काढता आला की झालं Happy

अकु,बंड्याची दिवाळी आवडली..सर्व पाईंट्स पट्याश!!!!
या वेळी फराळ घरी करता आला नाही कारण ते करायला लागणारं कोणतंही रॉ मटिरियल इथे उपलब्ध नव्हतं,कोण टेंशन आलेलं होतं मनावर.. आपण काहीच करत नाहीये दिवाळी करता..( म्हंजे तासन्तास किचन मधे पाय मोडेस्तोवर उभं राहून काहीच बनवत नाहीये!!) या विचाराने बेचैन बेचैन(गिल्टीसुद्धा!!) वाटलं होतं.
पण यावर्षी आमची दिवाळी पण बंड्या सार्खीच साजरी झाली Happy .. अगदी आनंदात!!!

बदलत्या काळाप्रमाणे सण साजरा करण्याची पद्धत बदलत जाते. उदाहरणार्थ दिवाळीतील फटाके आणि आकाशकंदिल ह्या अविभाज्य समजल्या जाणार्‍या गोष्टी मूळच्या भारतीय नसून देखील कित्येक वर्षांपूर्वी त्या अंगिकारल्या गेल्या. हा देखील एक प्रकारचा बदलच म्हणावा लागेल.

पूर्वापार चालत आलेल्या पद्धती, (विशेषत: दिवाळीचा फराळ) जिवापाड मेहनत करून जपण्याचा आटापिटा करण्याच्या नादात, त्रास किंवा टेंशन ओढवून घेण्यापेक्षा आपल्या आर्थिक कुवतीनुसार थोडाफार बदल घडवून सणातील आनंद घेण्याचा प्रयत्न केला गेल्यास वावगं काहीच नाही.

याबरोबरच दिवाळीसारख्या सणांच्या माध्यमातून नातेवाईक, मित्र इ. एकत्र भेटणे ही गोष्टदेखील सामजिक दृष्टीकोनातून तितकीच महत्वाची आहे हे विसरून चालणार नाही. बर्‍याचदा सण, उत्सव यामागचे मूळ उद्दिष्ट विसरले जाऊन औपचारिकतेवर भर दिला जातो. हे टाळून ग्रॅज्युअली काही बदल घडत/घडवत गेल्यास अधिक योग्य ठरेल.
(थोडक्यात, “जपण्याजोगे जुने जपूनी, नवीन उत्तम निवडत जा” म्हणजेच जुन्या आणि नव्यामधला सुवर्णमध्य गाठणे)
---------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखन आवडलं. विषयाची मांडणी सहज वाटली. शेवटचा परिच्छेद विचार करायला लावणारा .... मस्तच.
---------------------------------------------------------------------------------------------------------------

अवांतर :
बंड्या या नावाऐवजी सॅंकी(=संकेत)/ सॅंडी(=संदीप) किंवा अल्या(=आलोक) अशासारखं नांव घेतलं असतं तर ते कालानुरूप अधिक संयुक्तिक वाटलं असतं. .......(ज्याप्रमाणे बंड्याच्या मुलीच नांव : श्रेया)

छान लिहीलंय. मला पण आवडली बंडयाची दिवाळी.
या दिवाळीत मलाही अनेक गोष्टी बदलाव्याशा वाटल्या. सर्वात जास्त म्हणजे इतक्या प्रमाणात फराळाचे पदार्थ बनवणे. आणि तेच तेच पदार्थ सगळ्यांकडे. मिठाया वगैरे ची तर निव्वळ नासाडी होते.
पुढच्या वर्षी ठरवलय की, केवळ सगळा फराळ केलाच पाहिजे म्हणुन सगळे पदार्थ करायचे नाहीत , आणी जे करायचे तेही थोड्या प्रमाणात.
लोकान्ना घरी बोलवायचे झाल्यास सरळ एखादा चटपटीत प्रकार करायचा किंवा बंड्यासारखे हॉटेलातच भेटायचे. अगदी सुट्सुटीत.

बंद्याची दिवाळी लई भारी !
सण साजरे करायच्या ज्या पद्धती आनंद न देता नुसतंच दमवून टाकतात त्या खरोखर बदलायला हव्यात.
आईकडे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो.
मला चांगलंच आठवतंय....अभ्यंगस्नानासाठी भल्या पहाटे उठल्यामुळे दिवसभर पेंगुळल्यासारखं वाटणं, त्यात पुपोचा स्वयंपाक, पूजेची गडबड, दाराबाहेर रांगोळी काढायची घाई....एवढं सगळं करेपर्यंत संध्याकाळी हळदीकुंकवासाठी बायका येणार म्हणून सजून-धजून बसण्याची इच्छाच रहायची नाही.
दरवर्षी मी आईला सांगायची, आपण पुपोच्या ऐवजी सोप्पं काहीतरी बनवत जाऊ. पण तिला ते पटायचं नाही,त्यामुळे मलाच बोलणी खावी लागायची फिदीफिदी
परवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आईला फोन केल्यावर ती म्हणाली, " ये आम्रखंड खायला "
मी तीनताड उडालेच. आज पुपो ऐवजी आम्रखंड ??? जरा शंकासुद्धा आली, सगळं बरं आहे की काही वाद झालेत घरात ?
पण सगळ्यांशी बोलून खात्री केल्यावर लईच आनंद झाला. ( ह्या 'यशा' बद्दल मनातल्या मनात वहिनीला शाब्बासकी सुद्धा दिली.)
तर अशा प्रकारे बंड्याची दिवाळी आमच्याकडेही हळूहळू शिरकाव करायला लागली आहे....आणि मला त्याचा भरपूर आनंद झाला आहे.
सासरी मात्र अजूनही ४-५ दिवस बाकी काही न करता किचनमध्ये राबण्याचा प्रकार अजूनही आहेच. अरेरे
पण लांब असल्याने त्याची मला प्रत्यक्ष झळ बसत नाही.

मला बंड्याची दिवाळी खूप खूप आवडली. इथे सगळ्यांबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद्!! चला देशात गेल्यावर सणांची फार दगदग करायची गरज नाही. अता अशीच साजरी करणार दिवाळी!!

सगळं आपापल्या दृष्टिकोनावर आहे .... ज्याला ज्यात आनंद मिळतोय त्यानं ते करावं.... ज्याला आवड, उसंत, वेळ, सवड असेल त्यानं सण खुश्शाल हवे तसे/ पारंपारिक पद्धतीने साजरे करावेत. पण ज्याला वेळेची मारामार आहे, इतर भरपूर व्याप आहेत आणि सणासुदीला दमछाक होईपर्यंत धावपळ न करता शांतपणे, मजेत, सुहृदांबरोबर चार निवांत क्षण घालवायचेत त्यानं त्याच्या पद्धतीनं साजरे करावेत सण...

दिवाळी काय किंवा आणखी कोणता सण काय, त्यात बदल हे कालनुरूप घडतच जाणार... शंभर वर्षांपूर्वी जशा प्रथा होत्या त्या प्रथांनी सण साजरे करणं आता नामशेष झालंय.... आताच्या प्रथाही कालौघात नामशेष होतील. महत्त्वाचं असेल ते जवळच्या लोकांनी एकत्र जमून आनंद साजरा करणं.... ते झालं तरी खूप आहे!

प्रतिसादाबद्दल आभार्स मंडळी!! Happy

अकु. महत्त्वाचं असेल ते जवळच्या लोकांनी एकत्र जमून आनंद साजरा करणं आणि कुणीच एकाने राबण्याचा मक्ता न घेणं. Happy

वरदा, इथे उपासाला पोळीभाजी चालते आमच्याकडेपण उपासाला पोळीभाजी (सगळ्या भाज्या नाही) चालते. तांदूळाचा नसणारा कुठलाही पदार्थ चालतो. "साबुदाणा" नामक पचायला जड आणि भयंकर पित्तकर असा पदार्थ (त्यात परत बटाटा-शेंगदाणे वगैरे घालून) महाराष्ट्रातच उपवासाला चालतो. Happy

मलाही बंड्याची दिवाळी खुप खुप आवडली ! Happy

सगळं आपापल्या दृष्टिकोनावर आहे .... ज्याला ज्यात आनंद मिळतोय त्यानं ते करावं.... ज्याला आवड, उसंत, वेळ, सवड असेल त्यानं सण खुश्शाल हवे तसे/ पारंपारिक पद्धतीने साजरे करावेत. पण ज्याला वेळेची मारामार आहे, इतर भरपूर व्याप आहेत आणि सणासुदीला दमछाक होईपर्यंत धावपळ न करता शांतपणे, मजेत, सुहृदांबरोबर चार निवांत क्षण घालवायचेत त्यानं त्याच्या पद्धतीनं साजरे करावेत सण.......>>>

अरुंधती, सोला आने सच बात कही | जियो अरुंधती जियो | Happy

Pages