सुप्रसिद्ध कवी श्री. स्वानंद किरकिरे यांनी 'देऊळ' या चित्रपटातली तीन गाणी लिहिली आहेत. त्यांपैकी 'वेलकम' हे गाणं तर चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. 'बावरा मन देखने चला एक सपना' या कवितेनं रसिकांच्या मनावर गारुड करणार्या श्री. स्वानंद किरकिरे यांच्याशी केलेली ही बातचीत.
छायाचित्र - गॉर्की
या चित्रपटात तुमची तीन गाणी आहेत, आणि ही तीनही गाणी वेगवेगळ्या जातकुळीची आहेत. ’वेलकम’ हे आयटम साँग आहे, तर इतर दोन भजनं आहेत..
’देऊळ’मधली मी लिहिलेली दोन्ही भजनंही तशी वेगळी आहेत. ’फोडा दत्त नाम टाहो’ हे भजन असलं तरी त्याचा बाज मात्र रॅप गाण्याचा आहे. एकूण परिस्थितीवर केलेलं भाष्य या गाण्यात आहे. 'तू झोप..मी जागा आहे' हे भजनही तसं वेगळं आहे. ’देवा तुला शोधू कुठं’ हे भजन श्री. सुधीर मोघे यांनी लिहिलं आहे. या भजनाची चाल पारंपरिक आहे. गावातल्या आस्थावान मंडळींच्या तोंडी असलेलं, तत्त्वज्ञान सांगणारं हे भजन आहे. या भजनात एक खूप छान अशी निरागसता आहे. देवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. मी लिहिलेल्या दोन्ही भजनांमध्ये मात्र गावाच्या शहरीकरणामुळं आलेल्या वखवखलेपणाचं प्रतिबिंब आहे.
आणि ’वेलकम’?
’वेलकम’ हे ’आयटम साँग’ आहे, असं म्हटलं जात असलं, तरी माझ्यासाठी ती एक कविता आहे. या कवितेतही मी शहरीकरणावर, वखवखलेपणावर भाष्य केलं आहे. आपण हल्ली फार पोकळ आयुष्य जगतो. वैचारिक शैथिल्य आहे सर्वत्र. ’आर्थिक प्रगती’मुळं अगदी लहान गावांमध्येही अतिशय महागड्या वस्तूंचा हव्यास केला जातो. तिथे वीज नाही, पण टीव्ही आहे. दोन वेळचं खायला नाही, पण बघायला फॅशन टीव्ही आहे. हे सर्व व्यवहार मला अश्लील वाटतात, आणि ही जी जीवनशैली तयार होऊ पाहते आहे, तिच्यावर मी या गाण्यातून आणि भजनांतून भाष्य केलं आहे.
उमेश, गिरीश आणि मंगेशबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
माझ्यासाठी उमेशबरोबर काम करणं, हा एक फार महत्त्वाचा आणि मोठा अनुभव होता, कारण तो खर्या अर्थानं एक चित्रकर्मी आहे. त्याला जे सांगायचं आहे, ते तो अतिशय प्रभावी शैलीत पडद्यावर मांडतो. चित्रपटाच्या तंत्रावर त्याची जबरदस्त हुकुमत आहे. त्याच्या आधीच्या दोन चित्रपटांमधून त्यानं हे सिद्ध केलंच आहे. मला अतिशय आवडले होते हे दोन्ही चित्रपट. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला मिळणं, ही माझ्यासाठी खूप आनंददायक अशी गोष्ट होती.
’देऊळ’मधली गाणी मी लिहिली असली, तरी या गाण्यांची खरी कल्पना उमेशचीच आहे. ’वेलकम ओ राया’ हे गाणं करणं आम्हां दोघांसाठीही फार वेगळा अनुभव होता. ’प्लास्टिकचा बॉल, प्लास्टिकची बॅट, लावा बोली आता, खेळू नाइट क्रिकेट’ अशा ओळी असणं ही त्या गाण्याची आणि चित्रपटाची गरज होती, अशा लैंगिक प्रतिमांचा वापर करून आम्ही ते गाणं पुरं केलं. या गाण्याचा बाज आयटम साँगचा असला तरी या गाण्यातून फार थेट भाष्य केलं आहे, आणि उमेशबरोबर असं काम मला करता आलं, याचा आनंद मला आहे, कारण अशा प्रकारचं काम करण्याची माझी पूर्वीपासून इच्छा होती. लोक अशाप्रकारची गाणी करायला घाबरतात. पण उमेशनं मात्र अतिशय जबाबदारीनं या गाण्याचा वापर केला आहे.
मंगेश हा अतिशय प्रतिभावान असा संगीतदिग्दर्शक आहे. शास्त्रीय संगीताची त्याला खूप चांगली जाण आहे, आणि संगीताबद्दल खोलात जाऊन तो विचार करतो. या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच त्यानं गाणी संगीतबद्ध केली आहेत, पण मला त्याचं नवखेपण कुठंही जाणवलं नाही. उमेश, गिरीश, मंगेश आणि मी, अशा चौघांनी ही गाणी तयार करण्याची प्रक्रिया खूप एन्जॉय केली. उमेशनं मला गाणी लिहिण्याबद्दल विचारलं, तेव्हा मी दोनतीन हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहीत होतो. मला अजिबात वेळ नव्हता. त्यामुळे मी उमेशला नकारच दिला होता. पण उमेशनं माझा फारच पिच्छा पुरवला, आणि मग आम्ही या गाण्यांवर काम सुरू केलं. मला जसा वेळ मिळे, तसा मी पुण्याला येत असे. उमेशच्या बहिणीच्या घरी आम्ही चौघं एका खोलीत स्वत:ला बंद करून घेत असू. एका दिवसात एक गाणं पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असे. ही गाणी पूर्ण होण्यात गिरीशचाही मोठा वाटा होता. तो उत्कृष्ट लेखक आहे. भवतालच्या परिस्थितीची त्याला उत्तम जाण आहे. त्याच्या, आणि उमेश-मंगेशच्या मदतीमुळे मी चांगली गाणी लिहू शकलो, हे समाधान आहे.
मुलाखत वाचून झाल्यावर 'मोठ्या
मुलाखत वाचून झाल्यावर 'मोठ्या मनाचा माणूस' असंच मनात येतं. इतकी सुंदर गाणी लिहून सुद्धा श्रेय सगळ्यांना वाटून दिलं. 'देऊळ' यालाच म्हणत असावं. अभिनंदन आणि आभार सुद्धा.
'तू झोप... मी जागा आहे' हे
'तू झोप... मी जागा आहे' हे भजन आहे? मला ती या चित्रपटाची कॅचलाईन वाटली होती.
छान आहे मुलाखत.
छान, आटोपशीर मुलाखत. स्वानंद,
छान, आटोपशीर मुलाखत.
स्वानंद, प्रसून जोशी, इर्शाद कामिल हे नव्या पिढीतले चांगले हिंदी गीतकार आहेत. स्वानंद यांचे मराठीतले काम पाहण्यास (ऐकण्यास) उत्सुक आहे.
छान झालीय मुलाखत
छान झालीय मुलाखत
अतिशय आटोपशीर आणि छान झालेय
अतिशय आटोपशीर आणि छान झालेय मुलाखत
नव्या पिढीचा, वेगळ्या
नव्या पिढीचा, वेगळ्या जातकुळीचा गीतलेखक. आवडलं स्वानंदचं मनोगत.