भयानक : भाग ४

Submitted by यःकश्चित on 16 October, 2011 - 10:54

भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३

--------------------------------------------------------------------------
त्यांनी समोर उभ्या असलेल्या विश्वासकडे पहिले. त्यांच्या चेहऱ्यावर अचानक हास्य आले. एका आशावादी नजरेने त्यांनी विश्वासकडे बघितले. ते विश्वासकडे पाहून आनंदाने ओरडले,

विश्वाsssssssss तू आलास..........

...आणि पलंगावरून उठून विश्वासकडे झेपावले.

ते विश्वासजवळ आले, विश्वासला कडकडून मिठी मारली.

मोहनराव हे दृश्य बघून चक्रावले होते. नाना दरवाजा उघडतील का नाही असं वाटत असताना त्यांनी दरवाजा नुसता उघडला नाही तर विश्वासला ते चक्क बिलगले. मुळातच विश्वास या घरात नवखाच आणि त्याची ओळख करून देण्याच्या उद्देशाने नानांकडे आणले होते. पण इथे काही वेगळेच चित्र दिसत होते. कधी कधी समोरची व्यक्ती ओळखीची नसतानासुद्धा आपण बिलगतो पण ते ओळख करून घ्यायच्या हेतूनेच पण नानांनी विश्वासला 'विश्वा' म्हणून पुकारले. त्यांना विश्वासचे नाव कसे काय कळाले ?

विश्वासला भेटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असे भाव होते की एखादी व्यक्ती बऱ्याच वर्षांने भेटत आहे आणि तिला भेटून खूप आनंद होतो आहे. तो आनंद विश्वास आणि नानांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. शिक्षणासाठी गेलेला आपला मुलगा अमेरिकेवरून परत आल्यावर बापाला जो आनंद होतो ना, अगदी तस्सा आनंद नानांना झाला होता. इकडे मोहनरावांच्या मनात मात्र शंकांचा धांगडधिंगा सुरु होता.

विश्वास अजूनही नानाच्या मिठीतच होता. अचानक नानांनी मिठी सोडवली आणि ते विश्वासच्या खांद्याला धरून त्याच्याकडे पाहू लागले. हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळत गेले. त्या हास्याची जागा काळजीने घेतली आणि त्यांचे डोळे पाणावले. विश्वासच्या डोळ्यात पहात ते म्हणाले,

" विश्वा... कशाला आलास रे ? आता तो तुला सोडणार नाही. अजून वेळ आहे. माझं ऐक तुझ्या तुझ्या घरी जा. नाहीतर विनाश अटळ आहे. तुला पाहून मला आनंद झाला खरा, पण सत्य काही वेगळेच जे तुला माहित नाहीये."

विश्वासच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्यांना असा वाटलं की विश्वासला आपलं म्हणणं पटत नसाव. ते जरावेळ थांबून परत बोलू लागले,

" मला कळतंय की तुला माझं बोलणं पटत नाहीये. पण नाईलाज आहे रे. जे व्हायचं ते मी टाळायचा प्रयत्न करत होतो पण शेवटी नशिबात जे आहे ते आपण थोडीच बदलू शकतो. आता जे व्हायचं ते होणार . त्याला कुणीही अडवू शकत नाही. कारण तो आता आधीपेक्षा ताकदवर झाला आहे. त्याला अडवणं आता आपल्या हातात नाही. माझे सारे प्रयत्न वायफळ ..."

आणि त्यांच्या गालावरून अश्रूचा ओघोळ वहात गेला. त्यांनी आपले हात विश्वासच्या खांद्यावरून काढले आणि उदास चेहऱ्याने ते परत पलंगावर जाऊन मान खाली घालून बसले. त्यांचा उदास चेहरा पाहून विश्वास त्यांच्याजवळ गेला, नानांची मान त्याने वर केली आणि म्हणाला,

"नाना, किती हो काळजी करता ! आता मी आलोय ना , मग आता काळजी करण्याचं काहीही कारण नाही. कुणीही काहीही करणार नाहीये. सगळ्या गोष्टी मला माहित आहेत. तुम्ही आजिबात घाबरू नका. खरंतर आता मी आलोय म्हणाल्यावर तुम्ही कसलीही काळजी घेतली नाही पाहिजे. पण तुम्हीतर अजूनच काळजी करू लागलात. तुम्हीच म्हणायचात ना , की 'आयुष्य म्हणजे एक प्रश्नपत्रिका आहे , त्यातला प्रत्येक प्रश्न नवीन संकट घेऊन येतो, त्या संकटावर मात करून आपल्याला ती प्रश्नपत्रिका सोडवायची असते, कुठलाही प्रश्न न गाळता.' मग आता कशासाठी माघार घेताय ? तुम्हीच असे बोलू लागलात तर मग आम्ही काय करायचं ? दोघे मिळून लढूया आणि संकटाला पळवून लावूया. राहता राहिला प्रश्न 'त्या'चा. तुमच्या म्हणण्यानुसार 'तो' ताकदवर झालाय पण वरती जो सर्वशक्तिमान आहे, त्याच्यापेक्षा नक्कीच ताकदवर नसणार. मग वरचाच आपल्या बाजूने असल्यावर कुणाची भीती कशाला बाळगायची ? पटतंय का नाही माझं म्हणणं ? "

नानांनी नुसतीच मान डोलावली. याव्यतिरिक्त ते तरी दुसरं काय करू शकणार होते. कारण जे व्हायला नको तेच घडत होतं. विश्वासही काही ऐकायला तयार नव्हता. उलट 'त्या'च्या विरुद्ध तो लढू इच्छित होता. खरी परिस्थिती काय आहे हे नाना पक्के जाणून होते. पण या सर्वांशी अनभिज्ञ असलेल्या विश्वासला हे कोण सांगणार !

मोहनराव या दोघांकडे नुसतेच पहात होते. काहीच कळत नव्हते. विश्वासला काय झालं आहे ? आपणच त्याला नानांशी ओळख करायला इथे आणलं. पण इथे सारं चित्र पालटलं होतं. आधी नानांनी विश्वासला मिठी मारली आणि आता तर ते 'तो' जो कुणी आहे, त्याच्याबद्दल बोलत होते. विचार करता करता ते त्या दोघांकडे पहात होते.

अचानक विश्वास मगाशीसारखे हावभाव करू लागला. परत त्याला कसल्याश्या वेदना होऊ लागल्या. तो डोके धरून त्या वेदनांवर मात करण्याचा प्रयत्न करत होता. पण वेदना काही केल्या कमी होत नव्हत्या. त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. नाना आणि मोहनराव त्याला त्याच्या जवळ गेले. नानांनी विश्वासचे डोके आपल्या मांडीवर ठेवले आणि मोहनरावांना पाणी आणायला सांगितले.

मोहनराव पाणी घेऊन आले व विश्वासच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडू लागले.

"आता याला काय झालं ? हा असा अचानक बेशुद्ध का झाला ? ", नाना.

"मगाशी आम्ही तुमच्याकडे येत होतो तेंव्हासुद्धा हे असेच बेशुद्ध झाले होते. मी पाण्याचा ग्लास आणेपर्यंत ते शुद्धीवर आले सुद्धा. नाना, मी एक विचारू का ? "

"विचार ना ? परवानगी कसली घेतो आहेस ? "

"तुम्ही विश्वासरावांना कसे काय ओळखता ?"

नाना काहीच न बोलता विश्वासच्या तोंडावर पाणी शिंपडत राहिले. नाना उत्तर देत नाहीत पाहून मोहनरावांनी परत एकदा तोच प्रश्न विचारला. नानांनी बोलण्यासाठी तोंड उघडले तेवढ्यात विश्वास हालचाल करू लागला. तो शुद्धीवर येत होता. त्याला शुद्ध आलेली पाहून नानांनी मोहनरावांना विश्वासला घेऊन जाऊन खाण्यापिण्याची व्यवस्था करायला सांगितली. तसेच 'सध्या त्याला विश्रांती घेऊ दे आणि त्याची काळजी घे ' असे म्हणाले. मोहनराव विश्वासला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेले.

मोहनरावांनी विश्वासला त्यांच्या रुममध्ये आणला. त्याला पलंगावर बसवून ते म्हणाले,

" विश्वासराव, तुम्हाला फारच थकवा आलेला दिसतोय. तुम्ही थोडावेळ पडा इथे. मला जरा काम आहे. मी पंधरा-वीस मिनिटात जाऊन येतो. मग आल्यावर आपण जेवायला जाऊया. "

विश्वासने नजरेनेच होकार दिला आणि तो पलंगावर आडवा झाला. मोहनराव बाहेर आले. त्यांनी खोलीचे दार पुढे केले आणि चालू लागले. त्यांची पावले नानांच्या खोलीकडे वळाली. त्यांच्या डोक्यात चाललेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ते नानांकडे जात होते. नानाकडे जाताना त्यांच्या डोक्यातले विचार थांबत नव्हते.

नाना विश्वासला कसे ओळखतात ? विश्वास इकडे प्रथमच आला आहे. मग ते त्याला कसे काय बिलगले ? समजा नाना काहीतरी हेतूने बिलगले पण तरीही विश्वासने त्यांना ओळखायला नाही पाहिजे. पण तोसुद्धा नानांना ओळखतो. नुसता ओळखताच नाही तर विश्वासला 'त्या'च्याबद्दलसुद्धा माहिती आहे. हे कसे काय घडू शकते ? मुळातच हे कळत नाहीये की नाना गेल्या पाच-सहा महिन्यांपासून विचित्रपणे वागायचे, मधूनच काही असंबंध बडबडायचे, ते अचानक व्यवस्थित कसे झाले ? सारं काही उलट सुलत घडत होत.

विचार करता करता मोहनराव नानाच्या खोलीसमोर आले. खोलीचा दरवाजा अजून उघडाच होता. ते आत आले. समोर पलंगावर नाना नेहमीप्रमाणे मान खाली घालून बसले होते. पावलांचा आवाज ऐकताच त्यांनी मान वर केली. समोर मोहनरावांना पाहून हाताने शेजारी पलंगावर बसायची खुण केली. मोहनराव नानांच्या शेजारी बसले.

"बोल. कशासाठी आला आहेस ?"

"नाना, मी आत्ताच विश्वासरावांना विश्रांती घ्यायला सांगून आलोय. थोडावेळाने आम्ही जेवायला जाऊ. त्याआधी येण्याचे कारण असे की मगाशी या खोलीत जो प्रकार झाला त्यातल्या काही गोष्टी मला कळल्या नाहीत. तसेच गेल्या काही दिवसात अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यांच्यावर विश्वास बसत नाहीये. त्यामुळे माझ्या डोक्यात काही प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांची उत्तरे मला सापडत नाहीयेत. "

" तुला जे काही विचारायचं आहे ते सरळ सरळ विचार. उगीच आढेवेढे घेत बसू नकोस. "

" ठीक आहे. मी सरळ मुद्द्यालाच हात घालतो. नाना, विश्वास हा एक प्रथितयश लेखक आहे. गेल्या बारा वर्षात त्याने बऱ्याच प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्याने गेल्या आठवड्यात 'भयानक' नावाची रहस्य कादंबरी लिहिली आहे. ती मी वाचली. त्यामधील बहुतांश भाग तुमच्या आयुष्यातील काही घटनांशी साधर्म्य दर्शवतो. तसेच तुम्हीसुद्धा गेल्या पाच-सहा महिन्यांपासून इतके विचित्र वागत होतात. डॉक्टरांना दाखवल्यावर ते म्हणाले की ' यांना मानसोपचार तज्ञांकडे न्यावे लागेल. यांची अवस्था बघता कदाचित तिथे यांना शॉक ट्रिटमेंट द्यावी लागेल.' पण तुमच्यावरच्या काळजीपोटी घरून शॉक ट्रिटमेंटला विरोध झाला. त्यामुळे ते रद्द झालं. मग एक वेडा विचार माझ्या मनात आला की बहुधा विश्वासरावांकडे काहीतरी उपाय मिळेल. विश्वासरावांच्या कथेतील साधर्म्य आणि तुमच्या आजाराचे रहस्य जाणण्याच्या उद्देशाने मी विश्वासरावांकडे गेलो. पण तिथे आम्ही कोड्यात आणखी अडकत गेलो. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेला किडा जसा जितकी हालचाल करेल तितका अजून गुरफटत जातो तसे आम्ही रहस्यांचा जाळ्यात अडकत होतो. शेवटचा उपाय म्हणून तुमच्याकडे आलो तर इथेही तेच. "

मोहनराव शांत झाले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागले,

" विश्वासराव आणि तुम्ही एकमेकांना कसे ओळखता ? तुम्ही तर आजारी होतात, मग बरे कसे काय झालात ? तुम्ही दोघे ज्या 'तो'बद्दल बोलत होतात. 'त्या'चा संबंध दामले घराण्याशी असेल तर विश्वासराव 'त्या'ला कसे काय ओळखतात ? विश्वासरावांचा आपल्याशी आणि 'त्या'च्याशी कसा काय संबंध ? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे विश्वासराव दामले घराण्याचे वारसदार -"

" काय ? " , वारसदार हा शब्द ऐकताच नाना जवळजवळ ओरडलेच.

त्यांच्या ओरडण्याने मोहनराव जरासे बिचकले. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून अंदाज घेत नाना बोलू लागले,

"म्हणजे कशावरून म्हणतोस ? "

" मी जेंव्हा विश्वासरावांकडे गेलो होतो. तेंव्हा विश्वासला मी तुमची वही वाचायला दिली होती. त्या वहीच्या मागच्या पुठ्ठ्यातून त्याला एक पत्र मिळाले. त्यात असा उल्लेख होता. पण हे कसं शक्य आहे ? "

" हुश्श.. ", नाना दीर्घ सुस्कारा सोडत म्हणाले, " मला वाटलं की..."

"म्हणजे हे खरं आहे ना की विश्वासरावांचा आपल्या घराण्याशी संबंध आहे !! "

नानांनी गप्प राहणं पसंद केलं.
नाना जरी गप् बसले तरी त्यांच्या चेहऱ्यावर मूक होकार दिसत होता. मोहनराव त्यांच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाले ,

" विश्वासराव आपले कोण लागतात ? त्यांचा आपल्याशी कसा संबंध येतो ? "

" तू म्हणतोयस ते खरं आहे. विश्वास दामलेंचा वारसदार आहे. "

मोहनरावांना हे ऐकून धक्काच बसला.
पुन्हा एक नवीन कोडं ...! आधीच काय कमी प्रश्न म्हणून त्यात या नवीन प्रश्नाची भर पडली होती. आता विश्वास आणि दामले एकमेकांशी जोडले गेले होते. त्यांच्यात काय संबंध आहे हे फक्त नानांनाच माहित होतं आणि तेच आता या साऱ्या रहस्यांचा गुंता सोडवू शकणार होते.
मोहनरावांनी नानांना पुन्हा प्रश्न केला,

" विश्वासराव आपले वारसदार कसे काय ? "

" या साऱ्यामागे खूप मोठी कहाणी आहे. वेळ आल्यावर ती सर्वांनाच कळणार आहे. "

" पण आता - "

नानांनी मोहनरावांकडे पाहून बोलणं थांबवण्याचा इशारा केला. त्यांनी आपला पंजा मोहनरावांच्या दिशेने वर केला आणि मान खाली करून जमिनीकडे पाहू लागले. मोहनराव परत बोलण्याचा प्रयत्न करू लागले.

" नाना.. "

नानांनी मान वर केली. त्यांनी मोहनरावांकडे नजर टाकली तसे मोहनराव बिचकले. नानाचे डोळे लालभडक झाले होते, मुद्रा क्रोधित होती. मोहनराव काही बोलणार इतक्यात -

" तू इथे काय करतोयस ? चालता हो इथून ... ", ते मोहनरावांच्या अंगावर खेकसले.

मोहनराव क्षणभर स्तब्ध झाले. त्यांना काय करावे ते सुचेना. ते नुसतं नानांकडे पहात राहिले. मोहनराव जात नाहीयेत हे पाहून नाना उभे राहिले आणि त्यांनी डोळे मोठे करून मोहनरावांकडे पहात पुन्हा ओरडले ,

" जातोस का नाही मुकाट्याने .. पटकन जा ... आणि पुन्हा मला तोंड दाखवू नकोस. "

मोहनराव आधीच त्यांचा हा अवतार बघून बिचकले होते. ते काही न बोलता खोलीच्या बाहेर पडले. ते बाहेर पडताच नानांनी दार लावून घेतले. नाना पलंगावर जाऊन बसल्याचा आवाज झाला. हताश झालेले मोहनराव परत आपल्या खोलीकडे जाऊ लागले.

मोहनराव आपल्या खोलीचा दरवाजा उघडून आत आले. विश्वास अजून झोपलेलाच होता. त्यांना विश्वासला झोपेतून उठावावेसे वाटले नाही. ते आरामखुर्चीत बसून त्याच्या उठण्याची वाट पाहू लागले. त्यांच्या डोक्यातील प्रश्नमंजुषा पुन्हा सुरु झाली.

नाना अचानक असे का ओरडले ? त्यांना असा झटका बऱ्याचदा यायचा पण याआधी ते इतके भडकले नव्हते. आज मात्र नेहमीचे नाना कुठेतरी हरवले होते. सुरुवातीला नाना नीट बोलत होते पण नंतर ते एकदम अंगावर आले आणि खोलीतून चक्क हाकलून लावलं. एकाही प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. उलट नवनवीन प्रश्न निर्माण होत होते.

विचार करता करता कधी डोळा लागला ते कळलंच नाही. सारखा विचार करून करून मेंदूला शीण आला होता. सक्त विश्रांतीची गरज होती. मोहनरावांनीपण झोप घ्यायला हवी होती. पण या सतत उद्भवणाऱ्या प्रश्नांनी त्यांची झोप उडवली होती.

विश्वासला जाग आली. तो उठला आणि मोहनरावांना उठवले. ते दोघे जेवायला गेले. त्याचं स्वयंपाकघर तसं प्रशस्त होतं. वाडा जरी जुना दिसत असला तरी अत्याधुनिक सोयी होत्या. ते दोघे डायनिंग टेबलवर समोरासमोर बसले. बाकीच्यांची जेवणे झाली होती. फक्त मोहनराव आणि विश्वास जेवायचे राहिले होते. त्यांनी जेवायला सुरुवात केली. जेवतानासुद्धा मोहनरावांच्या मनातले विचार जात नव्हते. ते विश्वासकडे पहात जेवत होते. विश्वास अगदी निवांत जेवत होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडाही ताण वा कसली चिंता दिसत नव्हती. जणू काही घडलंच नाही अशा अविर्भावात तो जेवत होता. मगाशी इतके सारे घडूनही हा माणूस कसा काय निवांतपणे जेवू शकतो ? असा विचार मोहनरावांच्या मनात आला. विश्वासच्या प्रश्नाने त्यांची विचार शृंखला तुटली.

" अहो मोहनराव असे काय बघताय माझ्याकडे ? "

" अं..काही नाही.. ", ते भानावर येत म्हणाले, " विश्वासराव, तुम्हाला एक विचारू का ? "

" निःसंकोचपणे "

" तुम्ही नानांना कसे ओळखता ? ", विश्वासच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून ते पुढे म्हणाले, " म्हणजे तुम्ही याआधीपासून नानांना ओळखता काय ? "

" नाही हो. "

" पण मला असा वाटतंय की फार पूर्वीपासूनच नाना आणि तुमचा काहीतरी संबंध आहे. "
थोड्या वेळापूर्वीच नानांनी विश्वास हा दामलेंचा वारसदार असल्याचा गौप्यस्फोट केला होता, तरी विश्वासकडून काही नवी माहिती मिळवावी म्हणून ते काही माहित नसल्याचे दाखवत होते.

" काहीतरीच काय बोलताय मोहनराव. मी कसा काय ओळखेन नानांना ! तुमच्याकडूनच प्रथम मी नानांच नाव ऐकलं. नानांबद्दल तुम्ही जी काही थोडीफार माहिती दिली आहे, तेवढंच काय ते ओळखतो. आणि मी नानांना ओळखणार कसा ? कारण मुळात मी अजून नानांना भेटलोच नाहीये. "

हे शेवटचं वाक्य ऐकताच मोहनरावांना धक्काच बसला. घास खाण्यासाठी तोंडात घातलेला हात तोंडातच राहिला.

क्रमशः

गुलमोहर: 

उत्कंठा वाढत चाललीय... छान झालाय हा पण भाग....
शिल्पा आणि तृष्णा यांना अनुमोदन. शुद्धलेखनाकडेही जरा लक्ष द्या.

पु.ले.शु. Happy

छान

प्रणव, माफ करा पण हा भाग वाचताना मजा नाही आली.
तुम्ही कथा खूप छान लिहिताय आणि प्लॉट तर मस्तच आहे. आधीच्या तीन भागांमधे उत्सुकतासुद्धा मस्त ताणली गेली होती पण ह्या भागात फारसं काहिच घडलं नाही असं वाटतय. तेच तेच प्रश्न परत परत वेगवेगळ्या प्रकारे लिहिले आहेत आणि त्यातले बरेचसे सहाजिक असे वाटले. (ते कथेतील पात्राच्या विचारांद्वारे प्रस्तूत केले नसते तरी वाचकांच्या मनात आले आहेतच). त्यामुळे कथा फारशी पुढे सरकली नाही.
कृपया वाईट मानून घेऊ नका. आपल्यावर टीका करण्याचा हेतू नाही, तर आपलं पुढील लिखाण अजून मनोरंजक व्हावं असं वाटतं म्हणून मत व्यक्त करतो आहे.

पु.ले.शु.

चौकटराजा >> कथा लिहून झाल्यावर मलासुद्धा असंच वाटलं की कथा जरा रेंगाळली आहे....
तुमचे मत अगदी रास्त आहे ( अशा मतांची माझ्यासारख्या नवख्याला गरज आहे ) ...
रहस्यकथा म्हणल्यावर रहस्ये आणि थोडी भीती...त्याबाबतीत हा भाग जरासा मागे पडतो...
पण काळजी करू नका...
पुढच्या भागात खुपश्या रहस्यांचा गौप्यस्फोट होणार आहे आणि रहस्यमय घटनांचा धुमाकूळ असणार आहे...

तरी कथा रेंगाळल्याबद्दल पुनश्च सॉरी ....

>>पुढच्या भागात खुपश्या रहस्यांचा गौप्यस्फोट होणार आहे आणि रहस्यमय घटनांचा धुमाकूळ असणार आहे.

आता तर हा पुढला भाग लवकर टाकाच Proud

>>पुढच्या भागात खुपश्या रहस्यांचा गौप्यस्फोट होणार आहे आणि रहस्यमय घटनांचा धुमाकूळ असणार आहे.>>

लवकर येऊद्यात. वाट बघतोय Happy

आज २३ ऑक्टो झाले.....................लवकर टाका...........