रविवारची पहाट बर्याचजणांना माहीतच नसते.. रविवार उजाडावा तरी कसा.. तर डोळे उघडतील तेव्हा सूर्यदेवाची किरणे प्रखर झालेली असतील.. भलामोठा आssळस अशे अनेक आळस देत उठायचे.. घडयाळाकडे ढुंकूनही नाही बघायचे.. आज कसलीच घाई नाही म्हणत टिव्ही लावून वृत्तपत्र चाळत बसायचे.. चहाचे घुटके अगदी दिमाखात घेत किचनमध्ये तयार असलेल्या नाश्त्याचा अंदाज घ्यायचा इति इति...
पण आमचा २५ सप्टेंचा रविवार ट्रेकवर जाण्याचा होता.. साहाजिकच ट्रेकला जाण्याचा रविवार थोडा हटकेच.. पहाटे तीन(!!) वाजता नविनचा (मायबोली आयडी- नविन) फोन 'निघालास का, चार वाजलेत !' क्षणात झोप उडते काय.. पटकन घडयाळ्यात बघतो काय.. मग या वेडयाने मला वेडा बनवले हे कळते काय.. नि रागाच्याभरात ह्याला लाखोली वाहत पुन्हा झोपतो काय...
बोरिवलीहून पहाटे सव्वाचारची चर्चगेटच्या दिशेने जाणारी ट्रेन चुकली.. मग नंतरची ४.४० वाजता ट्रेन पकडून दादरसाठी रवाना.. नविनला फोनले तर भाई अंथरुणातच.. तर तिथे रोहीत (मायबोली आयडी -रोहीत. एक मावळा) अंघोळीसाठी !!! जल्ला काय सुख आहे सेंट्रल लाईनला राहणार्यांचे.. अर्थात ट्रेकर्सलोकांबाबत म्हणतोय मी.. आम्हा वेस्टर्नवाल्यांना तर (मुंबईतील पश्चिम उपनगरे) अर्धवट झोपेत आपली अंघोळ तर सोडा पण ब्रश, प्रार्तविधी कसेबसे झटपट आटपून निघावे लागते..! अरेरे..
इतके करून पण माझी ट्रेन चुकलीच.. आता दादरहून पहाटे ५.२१ वाजता कसार्याला जाणारी ट्रेन पकडायचे ठरवले.. मी बोरिवलीहून पकडलेली ट्रेन पहाटे ५.१७ वाजता दादरला टच होणार होती.. पण दादर रेल्वेस्थानक येण्याअगोदरच ट्रेनला सिग्नल लागला नि मला 'कसारा- कसारा' होउ लागले. एकदाची ट्रेन स्थानकात शिरली नि मी फलाटावर लगेच उडी मारून पूलाच्या दिशेने दौड.!! (भाग.. भाग..) नुसता पुल चढून फायदा नव्हता तर सेंट्रलच्या फलाटाच्या दिशेने पळायचे होते.. कारण कसारा ट्रेनची वेळ होउन गेली होती.. झाले.. माझ्यात 'उसेन बोल्ट' अवतरला नि पाठीवरच्या सॅकचे वजन विसरून जी काय धूम ठोकली ती अगदी त्या फलाटावरून निघत असलेल्या 'कसारा' ट्रेनच्या डब्यात उडी घेइपर्यंत !! (भाग.. भाग) कृपया धावत्या गाडीतून चढू वा उतरू नये..
ट्रेन कुर्ल्याला आली तसा नविनला फोन केला.. 'रिक्षा मिळत नाहीये' असे फालतू कारण देउ लागला.. म्हटले विद्याविहार हे एकच मध्ये स्थानक आहे तोपर्यंत काहीकरून घाटकोपरच्या फलाटावर उभा रहा.. एवढयाने भागणार नव्हते म्हणून त्याला अजुन एक गोष्ट सांगून उत्तेजीत केले.. 'डब्यात इडलीवाला चढलाय.. तेव्हा तुझी वाट बघतोय.. नाहीतर..' ट्रेन फलाटावर आली पण ह्या हिरोचा काही पत्ता नाही.. म्हटले आता एकटयानेच इडली सांभार खावे लागणार.. तोच फोनाफोनी झाली नि कळले ह्याने पण कशीबशी पळत ट्रेन पकडलीय.. पुढच्या स्थानकात भेटू म्हणेस्तोवर पुढचे स्थानक आले.. दरवाज्यातून वाकून पाहिले तर लांबून हा सुसाट पळत येताना दिसला..(भाग.. भाग..) ट्रेन सुटता सुटता हा डब्यात शिरला.. आता इतके पळल्याने थोडा दम खायचा तर ते सोडून हा भाई थेट इडलीवाल्याकडे ऑर्डर द्यायला गेला.. ! मग काय ठाणे स्थानक येइपर्यंत प्लेटवर प्लेट मागवत खात बसलो..
तिकडे ठाण्यात उभ्या असलेल्या उपाशी रोहीतची तर 'कधी ह्यांची ट्रेन ठाण्यात येतेय नि कधी इडली-वडा खातोय' अशी अवस्था झाली होती..ट्रेन ठाण्यात पोहोचली पण हा मावळासुद्धा चुकीच्या ठिकाणी उभा.. झाले.. भेट पुढच्या स्थानकावर ढकलली गेली.. पुढचे स्थानक आले पण हा मावळा पळत पळत येइपर्यंत ट्रेन सुटली..(भाग.. भाग..) नि आमची भेट पुन्हा एक स्थानक पुढे सरकली.. पुढील स्थानक आले नि एकदाचे आमचे त्रिकुट एकत्र आले.. अर्थात रोहीतसाठी पार्सल घेतलेली इडली-वडा प्लेट समोर आणलीच..
तर आमच्या रविवारची सुरवात ही अशी धावत-पळतच झाली होती.. रोहीतकडून कळले मागून येणार्या गाडीत अजून एक मायबोलीकर मावळा- आनंदयात्री हा 'कविता नवरे' च्या ट्रेकींग ग्रुप बरोबर जात होता..म्हटले भेटलो तर भेटू कल्याण स्थानकावर.. हो ट्रेन जरी 'कसारा'ची असली तरी कल्याण गाठायचे होते.. तिथूनच मग नगरला जाणार्या एसटीने कल्याण-मुरबाड-माळशेज घाट-खुबी फाटा (प्रवास भाडे प्रत्येकी ६६/- रुपये)असा प्रवास करत 'करजाळे फाटा' इथे उतरायचे होते.. इथूनच मग आम्ही ट्रेकसाठी प्लॅन केलेल्या 'सिंदोळा' किल्ल्यावर चढाई करणार होतो..
माळशेज घाट परिसराजवळच वसलेला हा सिंदोळा किल्ला.. उंची अंदाजे ३५० मीटर.. 'हडसर', 'निमगीरी' यांचा शेजारी.. प्राचिन आहे पण ऐतिहासिक माहिती विशेष उपलब्ध नाही.. साहाजिकच फारसा प्रसिद्धही नाही..
कल्याणहून साडेसहाच्या दरम्यान आमची एसटी सुटली. आनंदयात्रीशी भेट चुकलीच. एसटीत शेवटची सीट मिळाली तेव्हा बसल्या बसल्या उडया मारणे अटळ होते.. आमच्या लगेच ट्रेकींग गप्पा सुरू झाल्या.. दुसरा विषय तरी काय असणार.. हा किल्ला करूया.. तो किल्ला करूया.. हे बघायचेय.. ते पाहिले का.. इति इति.. या बडबडीत बाहेर पाहीले तर आजुबाजूच्या धुक्याच्या दुलाईतून सुर्यकिरणांचे तेज हळुहळू पसरत होते.. पावसाने माघार जरी घेतली असली तरी त्याच्या खूणा आजुबाजूच्या हिरवाईमुळे जाणवत होत्या.. याच प्रवासात पहिल्यांदाच नाणेघाटाचे प्रत्यक्षात दर्शन घेतले.. पाउस नसला तरी आकाशातील ढगांचे साम्राज्य मात्र अजुनही शाबूत होते.. साहाजिकच सभोवतालच्या डोंगररांगा ढगांच्या विळख्यात सापडलेल्या.. तासभरातच माळशेज घाटातून प्रवास सुरु झाला.. आतापर्यंत मायबोलीकर'जिप्सी'च्या फोटोंमधून या घाटाला नीटसे पाहिले होते.. पण आता प्रत्यक्षात बघत होतो.. पाउस नव्हता.. अगदी सकाळची वेळ.. त्यामुळे पर्यटकांची गर्दीही नव्हती.. साहाजिकच माळशेज घाटातील शुभ्र धबधबे मनमोकळेपणाने श्वास घेत होते.. !
घाटाच्या कुशीतून वळणा-वळणाच्या रस्त्याला हलत-डुलत पार करत आमची एसटी अंदाजे दोन तासाच्या प्रवासानंतर 'खुबी फाटया'ला आली.. ट्रेकर्सलोकांची पंढरी अशी ख्याती असलेल्या 'हरिश्चंद्रगडा'कडे खिरेश्वर मार्गे जाताना ह्याच फाटयाला उतरावे लागते.. खुबी फाटयाच्या पुढेच अंदाजे दिडेक किमी अंतरावर 'करजाळे फाटा' लागला.. नि आमचा एसटीचा 'खडखड धडधड' प्रवास इथेच संपुष्टात आला... रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या टपरीत चहाची ऑर्डर दिली नि आजुबाजूचा परिसर पाहू लागलो....
लख्ख उन पडले असले तरी वातावरण धुक्यामूळे थोडेफार धुसरच होते.. परिसर अर्थात शांतच.. समोर उभा असलेला सिंदोळा किल्ला अगदी रस्त्यालाच खेटून उभा असलेला.. त्याचा माथा ढगांचा मुकूट परिधान केलेला !
प्रचि १:
- - - - -
तरी रस्त्याच्या दुसर्या बाजूस करजाळे गावाकडच्या 'पिंपळगाव जोगा' नावाच्या धरणाचे पाणी पसरलेले... तिथलेच एक सुंदर दृश्य..
प्रचि२:
पंधरा-वीस मिनीटांतच सुमारे साडेनऊच्या सुमारास आम्ही ट्रेकला सुरवात केली.. रस्त्याच्या पलिकडूनच मळलेली वाट जाते.. त्याच वाटेने कूच केले.. सुर्यदेवांना पाठमोरे ठेवून आमची चढाई सुरु झाली. त्या सोप्प्या वाटेने पुढे गेलो असता दहा पंधरा मिनीटांतच सुक्या धबधब्याच्या मार्ग लागला. इथून फारसे पाणी वाहत नव्हते.. प्रवाह अगदीच छोटा असला तरीसुद्धा शांततामय परिसरात 'खळखळाट' करण्यास तो समर्थ होता..ह्या पाण्याच्या वाटेला ओलांडून आम्ही पुढची वाट धरली.. थोडेसे चढण चढत गेलो नि पठारावर आलो.. आजुबाजूस दोन तीन कोपर्यात विसावलेले भातशेतीचे मळे दिसले... फारशी चढण झाली नव्हती पण घाम गळायला एव्हाना सुरवात झाली.. हवा फारशी नव्हती त्यात पाठीला उन होते.. मागे वळून पाहिले तर करजाळे गावाकडचा परिसर मस्तच दिसत होता...
प्रचि ३:
(उजवीकडे करजाळे गाव नि मागे 'पिंपळगाव जोग' धरणाचे पाणी..)
तर समोर सिंदोळ्याचा डोंगर पसरला होता.. त्याच्या डावीकडच्या सोंडेवरून चढायचे लक्षात होते.. नेटवर तशी माहिती वाचली होती.. तरिपण खात्री करण्यासाठी एका कातकरीला मार्ग विचारून घेतला.. तेव्हा कळले की चालत असलेली वाट त्या सोंडेच्या मध्यभागी जाते नि तिथूनच उजवीकडे चढण पार केले की खडकांचा दरवाजासदृश पॅच सर करायचा. म्हणजे पोहोचलो सिंदोळ्याच्या खांद्यावर.. ! इति माहिती देउन तो कातकरी चालू पडला..
(वरील प्रचि नेटवरून साभार - संकेतस्थळ: http://www.shrikantescapades.com/2010/12/sindola-fort-trek-page-1.html)
[वरील फोटोत जी खिंड म्हटलीय तोच पॅच.. तिकडे पोहोचलो की सिंदोळाच्या खांद्यावर]
प्रचि ४:कातकरी
आम्ही त्याचे आभार मानून पुढे गेलो. त्याने सांगितल्याप्रमाणे अगदी दाट नाही पण झुडुपांचे जंगल लागले.. पण वाट ठळक आहे.. इथेच पुढे एक वाट उजवीकडे सरळ जात होती.. पण कातकरीने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या वाटेने न जाता डावीकडे जाणार्या वाटेने वळालो.. या झुडूपाच्या जंगलात विविध फुलपाखरे नांदत होती.. त्यात क्षणभर का होईना उनापासून आमची सुटका झाली होती सो बरेच वाटत होते..
लवकरच आम्ही ते जंगलातील चढण पार करून सोंडेवर आलो.. अन समोरील दृश्य पाहून भर उनातच बसलो.. आतापर्यंत आम्हाला या डोंगराची एकच बाजू दिसत होती.. पण आता सोंडेवर आल्यावर पलिकडची बाजूही दिसत होती.. अगदी दूरवरचा परिसर.. उजवीकडे सिंदोळा किल्ला 'मीच तो मीच तो' करत उभा होता.. तर डावीकडे अर्धा किलोमीटर पर्यंत पसरलेली डोंगराची सोंड निमुळती होत गेली होती.. सोंड कसली अगदी हिरवा गालिचाच ! तसेपण रंग हिरवे हिरवे जिकडे तिकडे चोहीकडे दिसत होते.. पण हा भाग खासच वाटत होता.. त्यात पण सोंडेच्या अगदी टोकाला एकुलते एक झाड बरोबर मध्यभागी होते नि त्या झाडापर्यंत जाणारी मातीची एक छोटी पाउलवाट त्या हिरव्या गालिच्यावर रेघ मारल्यागत वाटत होती..
प्रचि ५:
प्रचि ६: पलिकडची बाजू..
(फोटोत कौलारु घरे दिसतात ते पारगाव नि मागे निमगीरी-हनुमंतगड)
इथूनच 'हडसर' किल्ल्याचे धूसर दर्शन झाले.. आम्हाला हवे होते तसे अगदी स्पष्ट वातावरण मिळाले नव्हते.. पण हेही नसे थोडके... आता 'आधी किल्ला की त्या सोंडेचे टोक ?' असे करत करत शेवटी त्या टोकावरचे झाड गाठले.. इकडून कल्याण-आळेफाटा मार्गे 'मड'कडे जाणारा रस्ता स्पष्ट दिसत होता.. अगदी तेथील पूलही दुरुन मस्तच दिसत होता..
प्रचि ७:
इथेच मग त्या झाडाच्या संगतीने एक उडी कार्यक्रम सोहळा पार पाडण्यात आला.. त्या प्रखर उनातदेखील उडया मारताना एक आगळाच जोश आला.. उडयांचे फोटोसेशन आवारून आम्ही पुन्हा नव्या दम्याने चढाईला सुरवात केली... जास्त उंच नाही पण बर्यापैंकी चढ आहे.. वरती जाणार्या वाटेने कुठूनही चढले तरी त्या खडकांपर्यंत (खिंड)पोचायचे होते जिथे अगदी गडाचे दारच असल्यासारखे वाटत होते..
प्रचि८: वरती त्या खडकांच्या दरवाज्याकडे जाणारी वाट..
प्रचि९: त्या खडकांच्या दरवाज्यावर बसलेला नविन..
प्रचि १०: त्या सोंडेवरुन रोहीत वरती येताना..
इकडे पोहोचलो नि खर्या अर्थाने सिंदोळाच्या खांद्यावर पोहोचल्याची जाणीव झाली.. सिंदोळा किल्ल्याचा माथा सारखा खुणावत होता..
प्रचि ११ : सिंदोळा
इथे येइस्तोवर सुर्यदेवांनी वातावरण चांगलेच तापवले होते..त्यामुळे लवकरात लवकर मार्गाक्रमण करण्याचे ठरवले.. आता पुढील वाट अगदी त्या सिंदोळ्या किल्ल्याला जाउन भिडणार होती.. पण तिथूनच डावीकडून वळसा घालून जाणारी वाट असल्याचे ऐकून होते.. नि हाच टप्पा या ट्रेकमधील किंचीत कठीण हेही वाचले होते.. पावसात खूप जपून जावे लागते असे वाचले होते.. पण आता पाउस नव्हता.. मात्र पावसाच्या कृपेने इथे अस्ताव्यस्त रान माजले होते..!! नशिबाने वरती येताना मी एक लाकूड घेतले होते.. मग त्याचाच उपयोग करत गवत आडवे करत वाट शोधू लागलो.. या रानात वाट तर शोधायची होतीच शिवाय पायाखाली काही येणार तर नाहीना हेही बघणे मस्ट होते. कारण गुडघ्याखालचा भाग काहीच दिसत नव्हता.. !! पाचेक मिनीटांत त्या वळसा घालणार्या पाउलवाटेचा माग लागला नि पुढे सरकलो..
कोणीच फिरकले नसावे म्हणून वाट शोधण्यात श्रम घ्यावे लागत होते.. गवताखाली लपलेली वाट शोधताना पाय जपून टाकावा लागत होता.. कारण ही वळसा घालणारी वाट अगदी अरुंद.. त्यात माजलेल्या रानातून जाताना उजवीकडील गवताचा भार डावीकडच्या दरीत लोटण्याचा प्रयत्न करत होता.. तर दुसरीकडे 'ऑक्टोबर हिट' ची चाहूल देणार्या उनामुळे अंगाची लाही होत होती... थोडक्यात ह्या सगळ्या त्रासामध्ये जर पाय चुकला तर गवतातून घरंगळत सरळ खाली दरीमध्ये.... एरवी ही वाट सोप्पी वाटणारी असेलही पण आताची स्थिती बिकट होती.. या वाटेने जाताना सिंदोळाच्या माथा उजवीकडे राहतो नि वाटेत त्या माथ्याला असलेल्या दोन घळ ठराविक अंतराने दिसतात.. पण इथून चढणे मुश्किल आहे.. ही वाट पुर्णतः वळसा घालून मागच्या बाजूने वरती जाते हे ऐकून होतो सो आम्ही पुढे गेलो...
प्रचि १२: कडे कडेने..
इथून जाताना गवताची खाज अंगाला लागली नि आमच्या त्रासात अजून भर पडली.. नविन आणि रोहीतचे अर्धबाह्याचे टिशर्ट होते. पण माझे पुर्णबाह्याचे शर्ट असूनही माझी पण त्या खाजेतून सुटका नव्हती.. कधी एकदा सावलीत येउन पोहोचतोय असे झाले होते.. पण पटापट चालताही येत नव्हते..
प्रचि १३:वळण धोक्याचे.. !
लवकरच तिसरी घळ लागली.. ही वाट सुक्या धबधब्याच्या मार्गासारखी आहे.. पण यावेळी सगळीकडे जंगल झाल्यामुळे आधी थोडा अंदाज घेतला.. इथेच मग पटकन नजरेत न येणार्या कोरलेल्या दोन-तीन छोटया पायर्या दिसल्या.. मग काय लगेच चढाई सुरु केली.. जवळपास पोहोचलोच याची आम्हाला जाणीव झाली.. ही वाटसुद्धा तशी मागे वळून पाहिले तर दिसायला थोडीफार भयानकच होती...
प्रचि १४:शेवटचा टप्पा
मघाशी ती वळसा घालणारी वाट सुरु झाली नि खर्या अर्थाने ट्रेक सुरु झाला होता.. आम्ही आता जसजशे वर जाउ लागलो तशी ओढ वाढत गेली.. कारण वरती घळीमध्ये सावली दिसत होती.. इथे पोहोचलो नि ब्रेक घेण्याचे ठरवले.. कारण आतापर्यंत वार्याने बरीचशी कंजूषी दाखवल्याने घामटा चांगलाच निघाला होता.. शिवाय माथ्यावरती सावली देणारे झाड असेल की नाही याबाबत साशंक होतो..
क्षणभर विश्रांती घेत असलेल्या या जागेत घळीच्या एका बाजूस कातळात अगदी छोटया अश्या दोन गुहा दिसल्या.. त्यातली तर एक खणून काढलेली दिसते.. नविनने तर त्याच गुहेचा आश्रय घेत आखडून बसला.. इथेच मग सॅकमधून सफरचंद काढली नि ट्रेकमधील पहिल्या पेटपूजेला आरंभ झाला.. पाणी वगैरे पिउन जीवात जीव आला.. नि पुढे सरावलो.. बघतो तर काय आम्ही बुरुजाखालीच आश्रय घेतला होता.. पण सभोवताली वाढलेल्या गवातामुळे ध्यानातच आले नाही.. म्हटले बरे झाले.. आम्हाला किल्ल्याची पहिली ओळख दिसली..
प्रचि १५:
इथे दरवाजा वगैरे काही शिल्लक नाही वा दिसले नाही.. पण त्या गुहेचा वापर कदाचित देवडया म्हणून केला जाता असावा.. आम्ही वरती आलो तर समोरच श्रीगणेशांची कोरलेली लंबोदर मूर्ती नजरेस पडली.. बाजुलाच अजुन एक मुर्ती आहे..
प्रचि १६:
इथवर पोहोचलो खरे पण आता पुढे फिरायचे कसे हा प्रश्ण होता.. कारण चहुबाजूंनी टोपली कारवीचे साम्राज्य पसरले होते.. कुठे जमिन दिसेल तर शप्पथ.. म्हटले आधी अगदी टॉपवर जाऊ मग बघू म्हणत अजून वरती गेलो.. आमचा अंदाज खरा ठरला...इथेही वेगळी परिस्थिती नव्हती.. एकही झाड नव्हते जिथे विश्रांतीसाठी बसायला मिळेल.. पण इथून जो काही नजारा दिसत होता तो लाजवाबच.. संपूर्ण परिसरात एकच जागाच उभे राहण्यासाठी सुरक्षित नि सर्वोत्तम वाटत होती ती म्हणजे सिंदोळाचा एक कडा..
प्रचि १७:
इथूनच मग सभोवतालच्या परिसराचे गुगलींग चालू केले.. पण मन भरून फोटो काढून घेउ असा विचार येइस्तोवर आमच्यावर अचानक कसल्यातरी वेगळ्याच माश्यांनी हल्लाबोल केला.. तो इतका की थोडेही स्तब्धपणे उभे राहू देत नव्हते.. 'आपण त्यांना त्रास नाही दिला तर त्या काही करणार नाहीत' अशी नविन समजूत काढत होता.. पण माश्यांनी आम्हाला त्या जागी उभेच राहू न देण्याचे ठरवले होते.. एकाचवेळी १०-१२ माश्या अंगावर बसत होत्या.. फोटो काढून घेउ तर कॅमेर्यावर सुद्धा बसत होत्या.. या गोंधळात नविनने पळ काढला.. तिकडूनच म्हणतो कसा.. 'अरे ती माशी चावली तर जाम जळजळते.. नि चामडी लाल होते' अर्थातच पहिला अनुभव त्याने घेतला होता.. तोसांगेपर्यंत इथे रोहितचाही त्यांनी बाईट घेतला.. (माझे पुर्णबाह्याचे शर्ट असल्याने मी बचावलो.. ही ही हा हा.. )
पण शेवटी नाईलाजास्तव त्याही परिस्थितीत दोन- तीन फोटो घेउन आम्ही दुसर्या दिशेने गेलो.. तिथलेच काही टिपलेले फोटो..
प्रचि १८: सौंदर्य माळशेज घाटाचे..
प्रचि १९: खिरेश्वरचा पटटा नि ढगांमध्ये गडप झालेली हरिश्चंद्रगडाची डोंगररांग..
एकच मोक्याची जागा होती जिथे उभे राहणे सोयीस्कर होते.. पण माश्यांनी आमचा तिरस्कार केला नि आम्हाला ती जागा सोडावी लागली.. सिंदोळाच्या माथ्याचा विस्तार फारच कमी.. पण टोपली कारवीचे जंगलच इतके होते की अंदाजपंचे पाउले टाकत सावकाशाने जात होतो.. क्षणातच आम्हाला अपेक्षित असणार्या पाण्याच्या टाक्यांकडे आलो.. गडाच्या पुर्वेकडील बाजूस या तीन-चार पाण्यांच्या टाक्या आहेत पण पाणी पिण्यायोग्य नाही..
प्रचि २०: पाण्याच्या टाक्या
इथेच मग खाज घालवण्यासाठी त्या पाण्याने हात-पाय धुतले तेव्हा कुठे बरे वाटले.. रोहितर मात्र माश्यांनी त्याच्यावर केलेल्या लवबाईटसचा अंदाज घेत चोळत बसला होता.. आम्ही विचार केला होता की टॉपवरुन जाउन जेवण उरकू पण इथे तशी निवांतपणे बसण्यास जागा मिळालीच नाही.. तेव्हा जेमतेम पंधरा -वीस मिनीटांतच आम्ही माघारी फिरलो..
प्रचि २१: टोपली कारवी
प्रचि २२: रोहित त्या कारवीतून मार्ग काढताना..
उनाचा रखरखीत पणा वाढत चालला होता.. खरे तर इथे येण्यामागचे येण्याचे प्रायोजन म्हणजे मी आणि रोहित दोघेही येथील परिसरात येण्यास खूप उत्सुक होतो.. इथून दुरदुरवरचा परिसर वातावरण जर स्वच्छ असेल तर मस्तच दिसतो.. पण आम्हाला अगदी हवे तसे वातावरण मिळाले नव्हते तरीसुद्धा ट्रेकींगचा आस्वाद घेत होतो हेही नसे थोडके...
प्रचि २३: घळीतून उतरताना..
प्रचि २४: सह्याद्रीची लाडकी 'सोनकी'
वाटेत विविध रंगाची रानफुले दिसली नाही तर नवलच..
प्रचि २५:जरिमरीचे फूल
प्रचि २६: निळाई (नाव ?)
प्रचि २७: आपण यांना ओळखता का ? पुर्ण फूलही फुलले नव्हते पण दिसायला सुंदरच..
मघाशी चढताना असलेल्या वाटेचे स्वरुप बघून नविनला 'उतरण्याची' काळजी वाटत होती.. पण हाच भाऊ उतरताना मात्र आमच्यात पुढे राहीला होता.. तसेही दरीकडे तोंड करून उतरताना जी काय मजा असते ती औरच नाही का.. खरेतर इथे पाठमोरे उतरुन जाण्यासारखे नव्हते.. फक्त तोल सांभाळणे नि काळजीपूर्वक पाउल टाकत जाणे हेच महत्त्वाचे होते.. बेसावध राहूच नये.. तरीपण त्या वळसा घालणार्या वाटेत माजलेल्या रानात माझा एकदा पाय चुकलाच.. रोहितही धडपडला.. याच वाटेमुळे सिंदोळा किल्ल्याचा ट्रेक हा जरी सोप्पा असला तरी मध्यम श्रेणीत मोडतो..! पावसाळ्यात हा पॅच काहीसा अवघडच म्हटला पाहिजे..
आम्ही उतरून पुन्हा सिंदोळयाच्या खांद्यावर आलो.. इथेच मग नविनने विश्रांतीसाठी वाटेतच असणार्या एका झाडाची निवड केली. आम्हा तिघांना सामावून घेइल बरोबर इतकाच काय तो त्या झाडाच्या सावलीचा विस्तार होता.. इथेच मग मघासपासून वाट बघत असलेल्या दुपारच्या पेटपूजेचा कार्यक्रम सुरु केला.. उत्सुकता होती कारण रोहितच्या आईने दिलेला डबा.. मेनू होता अंडाकरी... अगदी भरुन दिलेला डबा नि भाकरीसारख्या भल्या मोठया अश्या पंधरा चपात्या !!! अगदी सहा माणसांना पुरेल असा दिलेला डबा बघूनच तिची माया दिसून आली..(भल्यापहाटे उठून डबा बनवून देणार्या आईचे कितीही आभार मानले तरी कमीच..) मस्त मस्त चवदार नि भरपेट जेवण झाल्यामुळे रविवार सार्थक झाल्यासारखे वाटले..
प्रचि २८:अंडाकरी
इथेच मग फलाहार करत शांतपणे पडून समोरील निसर्ग न्याहाळू लागलो. वाराही आता मूडमध्ये आल्यागत वाहू लागला.. वातावरणात एकदम थंडावा वाटू लागला.. खालून कुठून तरी मोरांचे आवाज कानावर पडत होते.. मन एकदम प्रसन्न झाले.. साहाजिकच मग नविनने त्याच्या सुरेल आवाजात गाणी सुरु केली नि मग आम्हीसुद्धा त्याला कोरसमध्ये बेसुर साथ देउ लागलो..
प्रचि २९: 'पारगावा' त चालणारा खेळ उनसावलीचा..
या गावातूनही सिंदोळ्याकडे येणारी वाट आहे.. खासकरुन पुण्याहून येताना ' पुणे-नारायणगाव-जुन्नर-गणेश खिंड-पारगाव फाटा' करत पारगावात यायचे..अन्यथा पारगाव फाटयाहून डावीकडे न वळता सरळ पुढे वेलखिंड पार करत करजाळे फाटा गाठावा..
प्रचि ३०: हम तीनो गाने के मूडमे !
तब्बल अर्धापाउण तास विश्रांती करुन आम्ही उठलो.. खरेतर झोप काढण्याचा मूड आला होता.. पण आवरते घेतले नि उतरु लागलो.. आता आकाशात ढगांनी दाटी केली होती.. अशातच आम्ही खिंडीजवळ उडीसोहळा सुरु केला.. आताशे तीनच वाजत आले होते तेव्हा बिनधास्तपणे मजा करु लागलो.. आतापर्यंत सवय झाल्याने उडी क्लिक करणे हे रोहितला आणि मला जमत होते.. पण यंदा 'नविन'मध्ये होतकरु फोटुग्राफर निर्माण करण्याच्या उद्देशाने आम्ही त्याला कॅम दिला.. पण जल्ला दहा उडया पडल्या तरी परत एकदा परत एकदा करत होता.. शेवटी तो शिकलाच नि नशिबाने आमच्या दोघांच्या एकसाथ उडया टिपल्या गेल्या.. बाकी यांवर आधारीत रोहीतने बनवलेली चित्रमालिका इथे बघता येइल..
खाली तासभरात पोहोचू हा विश्वास होता पण तिथून कल्याणला गाडी कधी मिळेल याचा मात्र भरवसा नव्हता.. तेव्हा मनसोक्त उडया मारूनच पुढे कलटी घेतली.. परतीच्या वाटेवर आता सांजकाळी चरण्यासाठी आलेली गुरे इथे तिथे दिसत होती..
प्रचि ३१: गुरांसोबत आमचा काउबॉय !
लवकरच आम्ही अगदी सुरवातीला लागणार्या त्या पिटुकल्या धबधब्यावर आलो.. आम्ही खरे तर कुठेच थांबणार नव्हतो.. पण अचानक मुड चेंज.. नि सरळ त्या थंडगार पाण्यात अंग गार केले !! एकदम रिफ्रेश होउन गेलो.. जास्त नाही अवघ्या दहा मिनीटांत आटपून आम्ही रस्त्याच्या दिशेने निघालो..
प्रचि ३२:
एकदाचा रस्ता गाठला.. अगदी वेळेत संध्याकाळी चार- सव्वाचारच्या सुमारास आम्ही किल्ला करुन परतलो ! एकदिवसाच्या ट्रेकसाठी खरच हा ट्रेक मस्त आहे.. फक्त येण्या जाण्याचाच काय तो त्रास.. हो कारण आता आम्हाला परतीच्या प्रवासासाठी लिफ्ट मागावी लागत होती.. नशिबाने अगदी दुसर्याच प्रयत्नात लिफ्ट मिळाली.. तीपण क्वालिस नि फक्त ड्राईव करणाराच एकटा होता.. म्हटले वा.. ! पण गाडी सुरु होताच वेग वाढला.. अगदी फॉर्मुल्या वनच्या कारमध्ये बसलो की काय वाटू लागले... मनात शंका येण्याअगोदरच त्या हिरोने एका बिसलेरी बॉटलमध्ये काळसर दिसणारे द्रव्य दाखवून ' घेणार का' विचारले.. मग कळले हे तर 'ड्राईव एन्ड ड्रींक' चालू आहे..जल्ला म्हटले खरे नाही.. नविन त्याच्याशेजारीच बसून गप्पागोष्टी करत होता.. आमचे ट्रेकचे प्रताप सांगत त्याच्यावर लक्ष ठेवून होता.. तर इथे माझी नि रोहीतची बोलतीच बंद झाली होती.. तो स्वतः इन कंट्रोल वाटत होता पण ज्या वेगाने गाडी मारत होता म्हटले कोण आडवा आला तर हा उडवणार ! कधी एकदा कल्याण येतेय असे होउ लागले.. पण त्याचा वेग पाहता कल्याण अब दूर नही असेही वाटत होते.. आमच्यातल्या कोणीही त्याला हळू चालव वगैरे सल्ला दिला नाही.. कारण एकतर तो आम्हाला घाबरवत असावा वा स्वतःच्या ड्रायविंगची शायनिंग मारत असावा.. वर म्हणतो कसा.. "तुम्ही अशे गप्प का.. मला कोणी विचारले तर मी काय सांगेन की तिघेजण भेटले होते.. गड करुन आले होते.. नि तुम्हाला कोणी भेटले तर तुम्ही सांगाल की आम्ही लिफ्ट मागितली.. मिळाली. पण बघतो तर दारुडा गाडी चालवतोय.." अखेरीस नविनने डोके लढवून आम्हाला शहाड(कल्याणच्या अगोदरचे स्टेशन) लाच सोड म्हणत त्या फेरारी की सवारीतून सुटका करून घेतली.. नि आम्ही चक्क सव्वापाचला शहाड स्टेशनवर.. ! तब्बल दिडेकतास वाचला होता.. प्रवासात कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने आमचाही जीव सुखावला.. त्या हिरोने आमच्याकडून एकही दमडी घेतली नाही हे विशेष.. अर्थात नविनने त्याचे गाडीचे कसलेतरी एक काम फोनवरुनच करुन दिले होते म्हणूनही असेल कदाचित.. जल्ला ट्रेकमध्ये कधी धास्ती वाटली नाही ती त्या हिरोच्या फेरारीतून प्रवास करताना वाटली..!
असो.. आमच्या ट्रेकचा शेवट इतका भन्नाट असेल असे स्वप्नातदेखील पाहिले नव्हते.. शहाडला सायंकाळी ५.३० ची सि.एस. टी ला जाणारी गाडी आली..नि आम्ही मुंबईत परतण्यासाठी गाडीत शिरलो.. पहाटे ४.४० वाजता सोडलेल्या बोरिवलीत पुन्हा परतण्यास संध्याकाळचे आठच वाजणार होते यामुळे तर मी भलताच खुष होतो .. कारण कधी नव्हे ते पहिल्यांदाच एकदिवसीय ट्रेकमध्ये असा लवकर घरी पोचणार होतो.. थँक्स टू सिंदोळा ! थँक्स टू फेरारी की सवारी ! देवाचे आशिर्वाद असतातच.. बाकी हम भटके दोस्तलोक्स मिलतेही रहेंगे !
समाप्त नि धन्यवाद
अरे भारी! छान लिवलंयस! आमचीही
अरे भारी!
छान लिवलंयस!
आमचीही "गणपती गडद" ची ट्रेक कम ट्रिप मस्तच झाली बरं का!
नेहमीप्रमाणेच अ प्र ति म
नेहमीप्रमाणेच अ प्र ति म वर्णन आणि फोटोही क्ला स च!!!
तो नेटवरून घेतलेल्या फोटोत कसला ईझी वाटतोय किल्ला
नविन आणि रोहीतचे अर्धबाह्याचे टिशर्ट होते. पण माझे पुर्णबाह्याचे शर्ट असूनही माझी पण त्या खाजेतून सुटका नव्हती.. कधी एकदा सावलीत येउन पोहोचतोय असे झाले होते.. पण पटापट चालताही येत नव्हते..>>>>>>>आणि कुणीतरी ट्रेकला Deo/Perfume मारून आलं होतं असंही कुठतरी ऐकलं :फिदी:.
बाकी तुमची भागम भाग सह्हीच.
योची चौफेर फटकेबाजी...!! मस्त
योची चौफेर फटकेबाजी...!! मस्त वृ आणि फोतोझ.
-मला 'कसारा- कसारा' होउ लागले.
-रोहिततर मात्र माश्यांनी त्याच्यावर केलेल्या लवबाईटसचा अंदाज घेत चोळत बसला होता..
त्या क्वालीसवाल्याचा नं. घेतला कां? फुडच्या ट्रेकला उपयोगी पडेल कारण ट्रेक संपल्यावर परतीचा प्रवास नेहमीच खूप लां ss s s s s ब वाटतो...
अरे, यो मित्रा, कॅमेरा अन
अरे, यो मित्रा, कॅमेरा अन लेखणी कशी सहज चालवायची याचा उत्तम नमुना म्हणजे हा लेख.......दिल खुश हुवा.....यावरुनच तुझे डोके, डोळे अन पाय यांची ही " क्लासिक (चुकून क्वालिसच लिहिणार होतो) चाल" लक्षात येते......सर्व वर्णन, फोटो....क्या बात है.... या सदरातले. मनापासून धन्यवाद..........
अ प्र ति म वर्णन आणि फोटोही
अ प्र ति म वर्णन आणि फोटोही क्ला स च!!!पण मीत्रानो गाईड का घेतला नाही? ' रीस्क नही लेनेका. '
मस्तच
मस्तच
प्रचि, ४ आणि १७ भारी ! मस्त
प्रचि, ४ आणि १७ भारी !
मस्त सचित्र वृत्तांत
मीत्रानो गाईड का घेतला नाही?
मीत्रानो गाईड का घेतला नाही? >> शेखरजी गाईडची गरज नव्हती... खुप छोटा ट्रेक आहे.. पण येथुन दिसणारा नजारा अवर्णनीय असाच आहे... माझ्याकडचे फोटु टाकीन लवकरच..
यो मस्तच लिव्हलय ...
रोहिततर मात्र माश्यांनी त्याच्यावर केलेल्या लवबाईटसचा अंदाज घेत चोळत बसला होता.. >> हो रे आधी वाटल त्या प्रेमाने कुरवाळतायत पण नंतर त्यांनी आपला रंग दाखविला.
हो अन फरारी की सवारी .. मस्तच
यो .. मस्तच, अगदी यो शैलीतला
यो .. मस्तच, अगदी यो शैलीतला लेख.
कॅमेरा अन लेखणी कशी सहज चालवायची याचा उत्तम नमुना >>> अगदी.
सगळ्यात मस्त प्रचि २८
या साठी मी कुठलाही ट्रेक करायला आणि उडीबाबा बनायला तयार आहे .
:आज लंचमध्ये भेंडी आणलेला बाहुला:
धन्यवाद मंडळी नच्या.. तुझा
धन्यवाद मंडळी
नच्या.. तुझा वृ. कधी ?
फोटोत कसला ईझी वाटतोय किल्ला >> जिप्सी.. जिथून हा फोटो काढला आहे त्याच्याअगोदर एक दम काढणारा चढ पार करावा लागतो.. मग ह्या पठारावरती आल्यावर ईझी म्हणायला धाप लागतेच...
कारण ट्रेक संपल्यावर परतीचा प्रवास नेहमीच खूप लां ss s s s s ब वाटतो...>> अनुमोदन हेम पण ती फेरारी की सवारी नको पुन्हा...
सगळ्यात मस्त प्रचि २८ >> इनमीनतीना... नेक्स्ट टाईम नक्की ये.. पण भेंडी नको आणूस..
काय लिहू ? बोलती बंद !
काय लिहू ? बोलती बंद !
लै भारी
लै भारी
योगी, मस्तच... आणि ते २८ वं
योगी, मस्तच... आणि ते २८ वं प्रचे तर जबरदस्तच...
रच्याकने.... उडीबाबा कुठाय?
फेरारी की सवारी नको पुन्हा...
फेरारी की सवारी नको पुन्हा... हा हा हा.....................हा...........................................................................................................
बाद् वे माझ्याकडे
बाद् वे माझ्याकडे क्वालीसवाल्याचा नं. आहे, आताही...!
यो वृत्तांत आणि फोटो भारीच
यो वृत्तांत आणि फोटो भारीच as usual
फेसबुक वर छायाचित्रण स्पर्धा सुरु आहे त्यात टाक कि तुझ्याकडे असलेले भारी भारी फोटू
मस्त फोटो आणि वर्णन!
मस्त फोटो आणि वर्णन!
>>काय लिहू ? बोलती बंद !>>
>>काय लिहू ? बोलती बंद !>> होय माझी पण !!! सा. न.
हिरवळीच्या पार्श्वभूमीवर निळे
हिरवळीच्या पार्श्वभूमीवर निळे निळे आकाश.......सहसा ट्रेक मध्ये निळसर आकाश दिसत नाही........वेगळा आणि छान फोटो वाटला....
मस्त फोटो, सुंदर वर्णन
मस्त फोटो, सुंदर वर्णन
<<अरे, यो मित्रा, कॅमेरा अन
<<अरे, यो मित्रा, कॅमेरा अन लेखणी कशी सहज चालवायची याचा उत्तम नमुना म्हणजे हा लेख.......दिल खुश हुवा.....यावरुनच तुझे डोके, डोळे अन पाय यांची ही " क्लासिक (चुकून क्वालिसच लिहिणार होतो) चाल" लक्षात येते......सर्व वर्णन, फोटो....क्या बात है.... या सदरातले. मनापासून धन्यवाद..........
<<<
अनुमोदन!! यो चे डोके, कॅमेरा नि लेखण्या सरसर चालतात.
निळ्या फुलांचा फोटो अ प्र ति म! निसर्गदत्त देणगी लाभलेले 'पारगाव'वासी नशिबवान आहेत.
रविवारी सुद्धा पहाटे उठण्याचं तुमचं डेअरींग वाखाणण्यासारखं आहे.
धन्यवाद मित्रमंडळी सारंग..
धन्यवाद मित्रमंडळी
सारंग.. जमले तर बघतो..
निसर्गदत्त देणगी लाभलेले 'पारगाव'वासी नशिबवान आहेत. >>अगदी
भारीच एकदम
भारीच एकदम
झक्कास...एक नंबर झालाय हा
झक्कास...एक नंबर झालाय हा ट्रेक...
कसले कल्ला फोटो आलेत...
अरे यो, त्याने त्या वेबसाईटवर दिले तसे आपणपण करू शकू की..थोडा फोटोशॉप वापरावा लागेल पण फार अवघड नाहीये...
पुढच्या ट्रेकपासून आता हेही द्यायला सुरु करू...
चॅम्पा +१
चॅम्पा +१
कॅमेरा अन लेखणी कशी सहज
कॅमेरा अन लेखणी कशी सहज चालवायची याचा उत्तम नमुना म्हणजे हा लेख.... >>> अगदी अगदी ! यो, अप्रतिम वर्णन आणि फोटोही अप्रतिमच !
मस्त ट्रेक झाला तरं, प्र.ची.
मस्त ट्रेक झाला तरं, प्र.ची. अन वर्णन आवडलं !
चॅप, आम्हाला नाही जमलं तर
चॅप, आम्हाला नाही जमलं तर तुला कंत्राट देऊ..!
धन्यवाद.. आणि हो रे चँप.. करु
धन्यवाद.. आणि हो रे चँप.. करु रे सुरवात.. फोटो,माहिती आम्ही देउ पण फोटोशॉपच्या भानगडी तू बघ.. आपल्याला काय ते जमत नाय..
अरे लेका, तु ट्रेकला जाऊन
अरे लेका, तु ट्रेकला जाऊन आल्यावर फोटो टाकलेस तर जल्ला मला काय कळणार वाट कुठून जाते. ते तुच दाखवायला पाहिजेस ना...:)