आतली गोष्ट!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

हा लेख 'माहेर' मासिकाच्या मार्च २०११ च्या महिला दिन विशेषांकामधे पहिल्यांदा प्रसिद्ध झाला होता.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मैत्रिणीची मुलगी, वय वर्ष चौदा. अचानक पोक काढायला लागली. थोडी दडपणात वागायला लागली. विचारल्यावर समजलं तिच्या आजूबाजूच्या मुली तिला हसतात तिच्या गोलाकारांवरून. तू फारच मोठी दिसतेस म्हणतात. हसणार्‍या सगळ्या अगदी बारीक चणीच्या. तेराचौदा वयाला मुलगा म्हणून खपून जातील अश्या. मैत्रिणीने मुलीला समजावलं की या मुलींकडे जे नाहीये ते तुझ्याकडे आहे. पुढे जाऊन याच मुली खटपट करतील आपले आकार योग्य बनवण्यासाठी. वय वर्ष चौदा खुश झालं. समजूत पटली पण बाईपणाच्या एका विचित्र चढाओढीत मुलगी कायमची अडकली.

मला आठवले माझे ज्युनियर कॉलेजचे दिवस. एनसीसीचा ड्रेस फक्त मलाच चांगला बसतो असं म्हणणारी अशीच उफाड्याची असलेली मैत्रिण. तो ड्रेस घालून आपलं रूप आरशात बघत ‘आपण पुरेशी मुलगी वाटत नाही’ असं सत्रांदा मनात येऊन खट्टू होणार्‍या आम्ही. ‘आम्ही आपापल्या वडिलांच्या वळणावर गेलोय’ असे केविलवाणे विनोद करणार्‍या आम्ही.

हे कसंतरी मागे टाकून आपलं आयुष्य घडवायला घेतलं. बरंच पुढे आल्यावरही या मापांच्या चढाओढीने या ना त्या पद्धतीने पाठपुरावा केलाच. कापडचोपड आणि त्याच्या इतिहासाबद्दल शिकताना बरीच अंजनं डोळ्यात घातली गेली.

नुकतीच इकडच्या तिकडच्या संस्थळावर ‘ब्राज्वलन’ हा शब्द व त्याविषयी ‘उद्बोधक’ चर्चा वाचली. चर्चेचा एकंदर सूर स्त्रियांची आणि स्त्रीवादाची हेटाळणी, स्त्रीमुक्ती या संकल्पनेची उडवलेली खिल्ली असा होता. मुद्दा अंतर्वस्त्राचा आणि त्यातही स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचा त्यामुळे चर्चेमधे जोडीला स्त्रीशरीराची एक वस्तू या पातळीवर केलेली आचरट आणि आंबटशौकीन वर्णनेही होती. हे नवीन नाही. कधीही कुठेही ‘ब्राज्वलन’(ब्रा-बर्निंग बाय फेमिनिस्टस) या घटनेसंदर्भाने वेगळे काही ऐकू येत नाही.

एखादी वस्तू अंगावर असणे वा नसणे यामुळे चळवळ होत नाही असे म्हणणारे एखादी वस्तू अंगावर असण्यानेच स्त्रीच्या चारित्र्याची ग्वाही मिळते हे मात्र छातीठोकपणे म्हणतात. हे गमतीशीर जरूर आहे पण यात नवल वाटण्यासारखं काही नाही. लाज, इभ्रत, प्रतिष्ठा या केवळ बाईनेच जपायच्या गोष्टी असताना ते सगळं वेशीवर टांगून आपलं एक अंतर्वस्त्र या बाया जाळतात म्हणजे त्यांची डोकीच फिरली असली पाहिजेत असं सहजपणे समजणारा समाज अजून जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहे.

१९६८ च्या मे महिन्यात अटलांटिक सिटी मधे होत असलेल्या मिस अमेरिका पॅजन्टच्या वेळेस अमेरिकेतील काही बायांनी एकत्र येऊन आपल्या ब्रेसियर्स जाळल्या ही ती घटना. ही घटना मोठ्या प्रमाणात वगैरे काही घडली नाही. ब्यूटी पॅजन्ट म्हणजे बाईला एक सुंदर वस्तू म्हणून पुरूषांच्या मान्यतेसाठी प्रदर्शनाला उभी करणे असा विचार धरून या स्पर्धेला विरोध म्हणून निदर्शने केली गेली. या निदर्शनांचा एक भाग म्हणून ‘फ्रीडम ट्रॅश कॅन’ असं नाव दिलेल्या एका कचर्‍याच्या डब्यामधे ब्रेसियर्स, गर्डल्स, खोट्या पापण्या, प्लेबॉयची मासिके, उंच टांचाची पादत्राणे असं सगळं जाळलं जाणार होतं. बायांनी खरोखर ब्रेसियर्स जाळल्या का आणि किती बायका यात सामील झाल्या याबद्दल खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. या निदर्शनांचं नेतृत्व जिच्याकडे होतं त्या रॉबिन मॉर्गनच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्यक्षात काहीच जाळलं गेलं नाही. घोषणा, फलक आणि मोर्चा यांच्यातूनच केवळ विरोध जाहीर केला गेला. त्यामुळे मॉर्गन बाईंच्या म्हणण्याप्रमाणे जाळण्याची घटना ही संपूर्णपणे प्रतिकात्मक होती. परंतु काही बायांनी ब्रेसियर्स वापरणे या दरम्यान बंद केले हे मात्र निश्चित. अर्थात ब्रेसियर्स जाळणे या कृतीमधे नाट्यमयता जास्त असल्याने स्त्रीवादविरोधी लोकांनी ह्या कृतीचं भरपूर भांडवल केलं स्त्रीवादाची चेष्टा करण्यासाठी. माध्यमांनी यातून ब्रा-बर्निंग फेमिनिस्ट (ब्रेसियर जाळणारे स्त्रीवादी) असा एक वाक्प्रचार कुत्सितपणाच्या फोडणीसकट रूढ केला. गैरसोयीच्या स्त्रीवादाला टोकाचा, अतिरेकी स्त्रीवाद म्हणण्यासाठी हा शब्द वापरला गेला, रूळला. स्त्रीवादी बायका म्हणजे ब्रेसियर्स न घालणार्‍या, हातापायावरचे केस न काढलेल्या आणि लेस्बियन अशी एक व्याख्या प्रचलित केली गेली. या व्याख्येचे पडसाद म्हणून अजून अजून सौंदर्यप्रसाधने वापरत आणि सौंदर्याच्या ठराविक संकल्पनांनाच जोपासत अनेक बायकांनी अर्थातच आम्ही ‘त्यातल्या’ नाही हे सांगण्याची पराकाष्ठा केली.

मात्र प्रतिकात्मक का होईना पण या घटनेने काही बायांनी ब्रेसियर्स वापरणे बंद केले आणि त्यातून कुठेतरी सौंदर्य म्हणजे ठराविक आकार, ठराविकच उभार अश्या कल्पना मोडायला सुरूवात झाली. अंतर्वस्त्रांच्या खपावर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागताच अंतर्वस्त्रे डिझाइन करणार्‍यांनी सर्वसामान्य बायांना उपयोगी होतील अश्या ब्रेसियर्स डिझाइन करायला सुरूवात केली. इथून अंतर्वस्त्रातून शरीराचा अनैसर्गिक आकार घडवणे या पद्धतीला मोठ्या प्रमाणात खीळ नक्कीच बसली. यातूनच जास्तीत जास्त नैसर्गिक आकार आणि आधार देणार्‍या ब्रेसियर्सचा जन्म झाला. अंतर्वस्त्रांमुळे होणारा शरीराचा छळ या घटनेनंतर काही प्रमाणात कमी होत गेला. हा या घटनेनंतर आत्तापर्यंतचा म्हणजे गेल्या तीस-चाळीस वर्षांचा इतिहास.

पण असं आव्हान का केलं गेलं असेल? काही बायांनी ब्रेसियर्स घालणं बंदच का केलं असेल?

जेव्हापासून माणूस कपडे घालू लागला त्यानंतर लवकरच अंतर्वस्त्रे जन्माला आली. मुळात शरीराच्या नाजूक भागांचं रक्षण, हवामानापासून बचाव अश्या महत्वाच्या उद्देशांपोटी अंतर्वस्त्रे निर्माण झाली. त्यांचे आकार, स्वरूप अर्थातच आजच्यापेक्षा खूप वेगळं होतं. हल्लीची ब्रेसियर हे मुळातलं पाश्चात्य जगातून भारतात आलेलं प्रकरण आहे. त्यामुळे अर्थातच पाश्चात्य जगातल्या अंतर्वस्त्राच्या प्रवासाविषयी आपण आधी समजून घेतलं पाहिजे.

काळाच्या ओघात अंतर्वस्त्रांच्या मूळ उद्देशांपेक्षाही शरीराला विशिष्ठ आकार देणे, बसण्याउठण्यात विशिष्ठ ढब निर्माण करणे, घाम व इतर स्त्रावांपासून बाहेरच्या कपड्यांचा बचाव करणे यासाठी या काही अंतर्वस्त्राचा वापर होऊ लागला. शरीराच्या छाती, कंबर, पोट या भागांना योग्य त्या आकारउकारातच ठेवणारे जे वस्त्र होते त्याला कॉर्सेट असे म्हणले जाई.

हे कॉर्सेट म्हणजे मुळात कंबर आवळून ती कमी करणारे आणि छाती पूर्ण सपाट करण्यासाठी किंवा छातीला जास्त उभार देण्यासाठी वापरले जाणारे वस्त्र. विविध प्राचीन संस्कृतींमधे अश्या प्रकारचे वस्त्र वापरले गेल्याचे संदर्भ मिळालेले आहेत. परंतु इ.स. १३०० -१४०० दरम्यान कॉर्सेट किंवा कॉर्प्स सर्रास वापरायला सुरूवात झालेली दिसते. कॉर्सेट हा शब्द अठराव्या शतकानंतर अस्तित्वात आला. तोवर कॉर्प्स, स्टे, बॉडिस असे शब्दच वापरले जात. हा कपडा कापडांचे अनेक थर एकमेकाला जोडून आणि जिथे गरज आहे तिथे कडकपणासाठी इतर वस्तूंचा वापर करून विशिष्ठ आकारात बनवलेला असतो. हे प्रकरण समजून घ्यायचं तर एका ठराविक आकारात बनवललेला पिंजरा आणि पिंजर्‍याच्या पट्ट्या खुपू नयेत म्हणून त्यावरून चढवलेले कापडाचे अनेक थर अशी कल्पना करावी लागेल.

01-ELIZABETHAN.jpg
पुनरूत्थानाच्या (रेनेसान्स) सुरवातीच्या काळामधे कंबर अगदी बारीक, छाती पुढून पूर्णपणे सपाट, शरीराचा वरचा भाग इंग्रजी व्हि आकाराचा दिसेल असा निमुळता आणि उंच असा आकार शरीराला असणे हे योग्य, सुंदर, सभ्य इत्यादी मानले जायचे त्यामुळे अर्थातच कॉर्सेटरूपी पिंजरा त्या आकाराचा असायचा. मग पुढे पुढे पहिल्या एलिझाबेथ राणीच्या काळात तर कंबर अजूनच निमुळती होत गेली आणि धडाची उंची वाढत गेली. याच काळात संपूर्णपणे लोखंडी पट्ट्या असलेल्या आणि बिजागर्‍यांवरील स्क्रू फिरवून घट्ट करायच्या कॉर्सेट ही होत्या. पहिल्या एलिझाबेथ राणीने या कॉर्सेटबद्दल ‘मला पिंजर्‍यात ठेवल्यासारखे वाटतेय’ असे उदगार काढले आहेत.

02-A-BARO&ROCO.jpg02-B-ROMANTIC&VICTO.jpg
नंतरच्या काळात धडाची उंची कमी झाली, छातीची गोलाई सूचक पातळीवर दिसणं गरजेचं ठरू लागलं आणि कॉर्सेटचे आकार तसे तसे बदलत गेले. लोखंडी पट्ट्यांच्याऐवजी प्राण्यांची हाडे, लाकडाच्या पट्ट्या, स्टीलच्या पट्ट्या, बांबूच्या पट्ट्या अश्या गोष्टींचा वापर होऊ लागला. चित्र क्रमांक २ मधील तिन्ही कॉर्सेटमधे आकार साधारण सारखा दिसत असला तरी वापरल्या जाणार्‍या वस्तू, त्यांची बेतण्या-शिवण्याची पद्धत, कॉर्सेटशिवाय शरीराला आकार देणारी इतर अंतर्वस्त्रे यांच्यामधेही या काळामधे बदल होत गेला. ‘गॉन विथ द विंड’ या चित्रपटाची नायिका पूर्वी अठरा इंच असलेली कंबर आता बाळंतपणानंतर कॉर्सेट घट्ट आवळूनही वीस इंच झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करते हे दृश्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेलच. ही गोष्ट रोमॅन्टीक काळातीलच.

03-MONOBOSOM.jpg
नंतर बेल इपॉक(१८९५-१९१४) काळामधील कॉर्सेटमधे अति आवळून लहान, म्हणजे सोळा ते अठरा इंच केलेली कंबर नक्कीच होती. परत पुढच्या बाजूला छातीचा खालचा भाग आणि पोट अतिशय सपाट करण्याची योजना होतीच. तसेच ही कॉर्सेट नितंबांच्यावरूनही येत असे. स्त्रियांना केवळ श्वास नीट घेता यावा म्हणून स्तनांचा भाग हा फक्त बाहेरच्या दोन्ही बाजूंनी आधार दिलेला असे. यामुळे दोन स्तनांचा आकार वेगळा न दिसता एकत्रच दिसे. म्हणून या कॉर्सेटला मोनोबुझम असे नाव आहे. बाजूने बघितल्यास शरीराचा आकार इंग्रजी एस या अक्षराच्या आकाराचा किंवा कबुतरासारखाही दिसे. यामुळे या प्रकारच्या आकाराला पिजनबुझम असेही म्हणले जाई. कॉर्सेट नितंबांच्यावरून असल्याने साधे भराभरा चालणेही शक्य नसे.

04-corset-damage.jpg
आकारामधे बदल घडलेले असले तरी एक गोष्ट अगदी कायम होती की तथाकथित योग्य आकारामधे शरीर येण्यासाठी लहानपणापासूनच मुलींचे शरीर या कॉर्सेट/ स्टे/ कॉर्प्स प्रकारात बांधले जाई. हे नुसतं वाचत जाताना कदाचित यातलं क्रौर्य जाणवणार नाही. पण मुलीच्या वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून किंवा अगदी जन्मल्यापासूनही एका ठराविक आकाराच्या पिंजर्‍यामधे / पट्ट्यामधे शरीर घट्ट आवळून बांधून ठेवलं जात असे ज्यायोगे शरीर त्याच आकारात वाढत असे. या अश्या पिंजर्‍यामुळे पाठीचा कणा काही प्रमाणात कमकुवत होत असे. बरगड्यांची वाढ खुरटत असे किंवा खालच्या बरगड्या आतल्या बाजूला वळत असत. शरीराच्या आतले इतर अवयव वाढीसाठी योग्य जागा न मिळाल्याने इकडे तिकडे सरकून अयोग्य पद्धतीने वाढत. त्यामुळे जेवण खूपच कमी असे. पचनाच्याही समस्या निर्माण होत. त्यामुळे अर्थातच शरीराला योग्य पोषण मिळत नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यांमुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था व प्रजननसंस्था मुळातूनच कमकुवत रहात आणि सर्वांगीण आरोग्यही धोक्यात येत असे. परत शरीरावर हा असा पिंजरा बांधून फिरणे काही कमी कटकटीचे नव्हते. जरासुद्धा वाकणे, बसणे या पिंजर्‍यामुळे शक्य नसे.

05-A-FARTH&PANNIE.jpg05-B-CRINO&BUSTLE.jpg
केवळ कॉर्सेट हा एकच पिंजरा नव्हे तर त्याबरोबर मोठ्या धातूच्या रिंगा लावलेला स्कर्ट घातला जाई. याचे नाव फार्दिंगेल. हा पण अजून एक वेगळा पिंजरा जो कमरेवर बांधलेला असे ज्यामुळे स्कर्ट हा कायमच फुललेला दिसत असे. फार्दिंगेलची फॅशन लयाला गेली तेव्हा पॅनिए नावाचा छोटा पिंजरा नितंबांचा आकार वाढवण्यासाठी कमरेवर बांधणे सुरू झाले. मग बसल नावाचा प्रकार आला. या स्कर्टशी संबंधित वस्तूंनी शरीरावर हानीकारक परिणाम केले नाहीत तरी साध्या साध्या हालचालीही आखडून ठेवल्या. सगळी वेशभूषा पूर्ण झाल्यावर बसणे सुद्धा शक्य नसे.

कपड्यांच्या आतून हे असे विविध प्रकारचे पिंजरे अंगावर वागवण्याला आळा बसला पहिल्या महायुद्धाच्या चाहुलीने. बेल इपॉकच्या शेवटच्या काळातच युरोप अमेरिकेतील स्त्रियांनी काही प्रमाणात कचेर्‍यांमधे नोकर्‍या करायला सुरूवात केली होती. माणसे कमी पडायला लागल्यावर युद्धकाळात स्त्रियांनाही सैन्यात भरती करून घेतले जाऊ लागले होते. कचेर्या, युद्धक्षेत्र किंवा सैन्याच्या कचेर्‍या या ठिकाणी काम करताना घोळदार कपडे आणि आतून पिंजरा याची अर्थातच अडचण होऊ लागली आणि कॉर्सेट इतिहासजमा झाली. त्याऐवजी बस्ट (छातीवर बांधायचा टक्स घातलेला पट्टा) आणि गर्डल(कंबर बांधून ठेवणारे वस्त्र) अशी दोन वेगळी वस्त्रे निर्माण झाली. बस्ट या वस्त्रातूनच छातीला आधार देणारे एक वस्त्र जन्माला आले. १९०७ मधील व्होग मासिकामधे या वस्त्राची पहिली नोंद आढळते. या वस्त्राचे नाव ब्रेसियर. ज्याचा मूळ फ्रेंच भाषेतील अर्थ आधार असा होतो.
06-vogue-bra.jpg

त्यानंतर १९६० पर्यंत या अंतर्वस्त्रांमधे अपेक्षित आकार, वापरले जाणारे कापड, बेतण्या-शिवण्याचे प्रकार यामधे अनेक बदल होत गेले. यातले बरेचसे बदल हे सौंदर्याच्या ठराविक कल्पनांपायी होते. शरीराचा छळ कमी झाला असला तरी ठराविक माप-आकार-उभार यांचा आग्रह या काळापर्यंतही संपला नव्हता.
07-sweatergirl.jpg

पण पहिल्या महायुद्धापूर्वीपर्यंततरी इतके भयंकर परिणाम होत असताना बायका कॉर्सेट आणि इतर सगळा साज का वागवत असत अंगावर? अगदी साधी सोपी कारणं आहेत याची. वरती जे काळानुरूप बदल आपण बघितले ते बदल घडण्यामागे महत्वाचं कारण होतं ते म्हणजे सौंदर्याच्या व सभ्यतेच्या बदलत्या कल्पना. पण मुळात स्त्रीने सुंदरच दिसले पाहिजे ह्याबद्दल असणारा पुरूषी आग्रह आणि स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या शरीराच्या ठराविक मापात, आकारात आणि उभारात केली जाणे हे सर्व काळात कायम होते. अमुक मापाची-आकाराची व उभाराची स्त्री ही सभ्य, सुशील आणि आदरणीय बाकीच्या वाईट चालीच्या किंवा कमी प्रतीच्या किंवा निम्नस्तरीय इत्यादी असं वर्गीकरण केलं गेलं. मग ते ते माप-आकार-उभार मिळवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले गेले. अगदी शरीराचे हाल सोसूनही केले गेले. तसंही बाईने सोसण्याचं उदात्तीकरण जगातल्या कुठल्याही संस्कृतीत सारखंच.

चिनी संस्कृतीतले मुलींचे पाय बांधणं, अजून कुठेतरी मान उंच करण्यासाठी लहानपणापासून मानेमधे लाकडी रिंगा अडकवून ठेवणं हे ही सौंदर्याच्या कल्पनांपायी स्त्रीच्या शरीराचे हाल या प्रकारात मोडणारं. त्याचं अवास्तव महत्व आणि उदात्तीकरण यात जगभरात कुठेही कणभरही फरक नाहीच.

१९६० च्या दशकात सुरू झालेल्या स्त्रीवादाच्या वार्‍यांनी विशिष्ठ माप-आकार-उभार म्हणजेच सुंदर आणि सभ्य, आदरणीय स्त्री ह्या समीकरणातला फोलपणा स्पष्ट केला. समाजाने ठरवून दिलेल्या सौंदर्य आणि सभ्यतेच्या मापांपेक्षा निसर्गाने घडवलेले आकार तसेच राहू देणं आणि अंगावरच्या कपड्यामधे आराम वाटणं, सर्व हालचाली व्यवस्थित करता येणं महत्वाचं आहे अश्या भावनेतून अनेकींनी ब्रेसियर्सचा वापर बंद केला.

हे समजून घेतल्यावर मला तरी या घटनेकडे टोकाचा व अतिरेकी स्त्रीवाद म्हणून बघता येत नाही. स्त्रीकडे प्रथम एक माणूस म्हणून बघण्याच्या प्रवासातला हा स्त्रीच्या शरीराशी निगडीत असलेला हा एक महत्वाचा टप्पा मला वाटतो. तरीही ह्या टप्प्याने सौंदर्याच्या कल्पनांपायी शरीराचे हाल थांबवले हे म्हणायला मात्र जीभ रेटत नाही. तथाकथित ‘योग्य’ मापांच्या सोसापायी खाल्लेलं अन्नं ओकून काढणार्‍या बुलिमिक पोरी, अनोरेक्सियाने अगदी लहान वयात मृत्यूमुखी पडलेल्या पोरी, फॅड डाएट किंवा महिन्याभरात २०-२५किलो वजन कमी करून देणार्‍या तथाकथित आहारतज्ञांच्याकडची गर्दी, करीना कपूरच्या साइझ झिरोचे मेडियाने केलेले नको इतके कौतुक, सर्व जाहिरातींमधून, दृश्य माध्यमांमधून दिसणारी अतिशय सडपातळ अशी स्त्रीची प्रतिमा, हॉलिवूडमधील अमुक एक नटीने बाळंतपणानंतर दोन महिन्यात वजन उतरवले याबद्दल तपशीलांसकट वाचायला मिळणारी कहाणी या सगळ्या गोष्टी सध्या माझ्या आजूबाजूला मला दिसत वा ऐकू येत रहातात.

बाईने कुठल्याही परिस्थितीत सुंदर असायला हवं आणि सुंदर बाई म्हणजे अमुक एक माप, रंग इत्यादी ह्यात काहीच बदल झालेला दिसत नाही. बायांच्या मनातही. ‘अमुक एक’ चे तपशील बदलत रहातात फक्त. तरीही १९६० च्या दशकातल्या घटनेने बर्‍याच मोठ्या प्रमाणात सामान्य बायांचे हाल कमी केले हे नाकारता येणार नाहीच.

बाकी ब्रा-बर्निंग संदर्भाने चेष्टा, आंबटशौकीन वर्णनं होतच रहाणार. तुम्ही करायची का नाही हे तुमच्या माणूसपणाच्या पातळीवर अवलंबून. नाही का?

- नीरजा पटवर्धन

विषय: 
प्रकार: 

अतिशय अभ्यासपूर्ण लेख नी!
माझ्या या विषयाच्या ज्ञानात एवढी मोलाची भर घातल्याबद्दल अनेक धन्यवाद.

चांगली माहिती, नीधप.
(भारतीय स्त्रिया या बाबतीत तरी नशीबवानच म्हणायच्या मग - असं मनात आल्यावाचून राहिलं नाही. Happy )

हम्म! लेखाला अनुमोदन!

इथे अजुनही कोर्सेट्स खपतात भयंकर... त्यातल्या एका प्रकाराला मॅजिक पँट्स म्हणतात का बहुदा? इथे भयंकर खप आहे.. ३ मुले झाल्यावरही सप्पाट पोट दिसलच पाहिजे हा अट्टाहास का बरे?
वायर्ड ब्रा आणि प्लास्टीक बेल्ट्स ह्या पण माझ्या दृष्टिने आधुनिक छळ साधनात मोडतात.

पण मुळात स्त्रीने सुंदरच दिसले पाहिजे ह्याबद्दल असणारा पुरूषी आग्रह आणि स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या शरीराच्या ठराविक मापात, आकारात आणि उभारात केली जाणे हे सर्व काळात कायम होते. अमुक मापाची-आकाराची व उभाराची स्त्री ही सभ्य, सुशील आणि आदरणीय बाकीच्या वाईट चालीच्या किंवा कमी प्रतीच्या किंवा निम्नस्तरीय इत्यादी असं वर्गीकरण केलं गेलं. मग ते ते माप-आकार-उभार मिळवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले गेले. अगदी शरीराचे हाल सोसूनही केले गेले. तसंही बाईने सोसण्याचं उदात्तीकरण जगातल्या कुठल्याही संस्कृतीत सारखंच.

चिनी संस्कृतीतले मुलींचे पाय बांधणं, अजून कुठेतरी मान उंच करण्यासाठी लहानपणापासून मानेमधे लाकडी रिंगा अडकवून ठेवणं हे ही सौंदर्याच्या कल्पनांपायी स्त्रीच्या शरीराचे हाल या प्रकारात मोडणारं. त्याचं अवास्तव महत्व आणि उदात्तीकरण यात जगभरात कुठेही कणभरही फरक नाहीच.>>>>>
==============================

समाजाने ठरवून दिलेल्या सौंदर्य आणि सभ्यतेच्या मापांपेक्षा निसर्गाने घडवलेले आकार तसेच राहू देणं आणि अंगावरच्या कपड्यामधे आराम वाटणं, सर्व हालचाली व्यवस्थित करता येणं महत्वाचं आहे >>>>>>
===============================

मला तरी या घटनेकडे टोकाचा व अतिरेकी स्त्रीवाद म्हणून बघता येत नाही. स्त्रीकडे प्रथम एक माणूस म्हणून बघण्याच्या प्रवासातला हा स्त्रीच्या शरीराशी निगडीत असलेला हा एक महत्वाचा टप्पा मला वाटतो.>>>

==============================

याही धाग्यावर मेल्सनी रिप्लाय करणे चूक ठरू शकेलही, पण साहस!

अत्यंत अभ्यासपूर्ण लेख व सर्वात काय आवडले असेल तर सर्व माहिती देताना:

१. दृष्टिकोन 'स्त्रीला माणूस म्हणून वागवणे जरूरीचे' हा ठामपणे जाणवत राहतोच

२. कोठेही आक्रस्ताळेपणा नाही

३. आवश्यक ते सर्व संदर्भ देण्याची तयारी आहेच

आणि

४. साहसी विषयाचे (साहसी = टिंगल वगैरे होऊ शकते हे ज्ञात असूनही प्रकाशित करणे) संतुलीत सादरीकरण!

अधिक उणे बोललो असल्यास किंवा मुळातच बोललो हेच चूक असल्यास क्षमस्व!

=================================

एक शंका : एका इंग्लीश स्त्री मासिकाने अंतर्वस्त्रांच्या फॅशनसंदर्भात एक पूर्ण लेख लिहून त्यात वर एक असेही स्टेटमेन्ट केले होते की 'इफ यू वॉन्ट यूअर ब्रा टू बी सीन, मेक अ स्टेटमेन्ट'! यात त्यांनी 'विशिष्ट दर्जाची, किंमतीची, ब्रॅन्ड्सची, स्टाईलची' (इत्यादी) अंतर्वस्त्रे वापरावीत असा सल्ला दिलेला होता. आपण वर लिहिलेल्या लेखाच्या अनुषंगाने असे विचारावेसे वाटले की 'स्त्री सौंदर्याच्या या अशा व्याख्या' करण्यात पुरुषांचा सहभाग (क्रूरपणे व अमानवीपणे) असतो पण असे काही वेळा होऊ शकते काय की स्त्रियाही स्त्रियांना असे काही करण्यास भाग पाडत असतील !!

-'बेफिकीर'!

(भारतीय स्त्रिया या बाबतीत तरी नशीबवानच म्हणायच्या मग - असं मनात आल्यावाचून राहिलं नाही>>> अगदी असंच वाट्ले.
माहितीपुर्ण लेख. आवडला.

सगळ्यांचे आभार.
स्वाती, हो गं निदान या एका बाबतीत भारतीय स्त्री काही अंशी नशीबवान म्हणायला हवी. उष्ण हवामान आणि कापडाची मुबलकता पथ्यावर पडली. Happy
बेफिकीर, त्या मासिकातील लेखाची लिंक देऊ शकलात तर तो लेख वाचून मगच उत्तर देता येईल.

लेख आवडला.. आतल्या गोष्टीचा इतिहास सांगून या गोष्टींबद्दलच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद नी.. Happy

नीरजा, अतिशय अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणार लेख. (तू चांगली शिक्षिका असशील असं वाटतं.) लेखाबद्दल आधी आभार.

स्त्री-वादाबद्दल चर्चा वाचताना युद्धाला विरोध असा विचार काही लेखकांनी मांडला आहे, उदा. करूणा गोखले. पुरूषांशी समानता करण्याच्या नादात युद्धखोरी, इगो वगैरे 'मूल्य' स्त्रियांनी उचलू नयेत याबद्दल कळकळ दिसते, जी मान्य करण्यासारखी आहे. पण युद्धामुळाचे पाश्चात्य स्त्रियांची या छळवादातून मुक्तता झाली आहे याची थोडी गंमत वाटली.

"ब्रा-बर्निंग" असो वा "स्लट-वॉक", मूळ मुद्दा लक्षात न घेता त्याची टर उडवणं अनेक ठिकाणी दिसतं. स्त्रियांकडूनही या गोष्टींचा गैरवापर होताना दिसतो.

लेखाची सुरूवात वाचून हा लेख आठवला. (गंमतीदार मुद्दा असा की ही लिंक देणारा एक पुरूष मित्रच आहे आणि सौंदर्याच्या कल्पना कशा बदलल्या यावरून आम्ही बोलत होतो.)

अवांतरः ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेसच्या नावाखाली फेसबुकावर जे काही चालतं त्यामुळे अवेअरनेस कसा होतो हे मला समजलेलं नाही. त्याबद्दल कोणी काही लिहीलेलं आहे का?

नीरजा लेख खूपच चांगला झाला आहे. तुझा त्या विषयाचा अभ्यास आहे हे जाणवतं. मला पण स्वातीचं पटलं पण अर्थात तिने ते लिही पर्यंत जाणवलंच नाही Happy
कुठेही आदळाअपट न करता(लिहिताना ती कशी करतात म्हणे?), तावातावाने न लिहिता छान समजावून सांगत लिहिलं आहेस.

या लेखासाठी माझी कॉश्च्युम हिस्टरी ची प्रॉफ पॅट्रिशिया हन्ट-हर्स्ट चे आभार मानायला हवेत मला. ती इतकं अप्रतिम शिकवायची. आणि कपड्यांच्या इतिहासातले सामाजिक बदलांशी, मानसिकतेशी असलेले दुवे ती इतकं मस्त समजवून द्यायची. गोष्टी डोक्यात फिट्ट एकदम. Happy

उत्तम लेख नीधप.
मला पण, आपण भारतातील बायका ह्या बाबतीत नशिबवान हाच विचार आला, जेव्हा ५-६ वयाच्या मुलींना पण अशा भयानक गोष्टी घालुन जगावे लागायचे ते वाचुन.
बेफिकिर, ४ही पॉईंट्स पटले.

लेख आवडला. जून्या इंग्रजी सिनेमात असले घोळदार झगे बघताना
आधी हसू येत असे. पण त्या बायका काय सोसत होत्या, हे कळल्यावर मात्र
वाईट वाटू लागले.

Pages