पुस्तकाचे नावः मृगजळीचा मासा
कवयित्री: कविता महाजन
प्रथम आवृत्ती: ऑगस्ट २००८
राजहंस प्रकाशन.
कविता कोणाला काय देते याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असले तरी कवितेचं हे देणं तिच्यासारखंच उत्कट व भरभरून असतं. आपण कधी नकळत, कधी जाणूनबुजून, कधी वेळ काढून हक्काने तिच्याकडे जात राहतो ही गोष्ट सगळ्यांतला समान दुवा आहे.
कवितासंग्रह हा काही एका बैठकीत वाचून काढायचा साहित्यप्रकार नाही. आस्वाद घेत चवीचवीने, रेंगाळत, एकेका कवितेला मुरवून घेत पुढे जाण्यात खरी मजा असते. खासकरुन कवितेच्या बाबतीत असं तेव्हा होतं, जेव्हा कविता आपल्याला, मग ती कळत असो वा नसो, चटकन आपलीशी वाटते. आणि असं रेंगाळावंसं वाटत असतानाही वाहवा देत देतच आपल्याला पुढच्या कवितेकडे अधाशीपणे वळावसं वाटणं यांत कवितेचं यश असतं.
'कविता' या साहित्यप्रकाराच्या सामान्य माणसांतील लोकप्रियतेबद्दल मतंमतांतरे असू शकतात. पण प्रत्येक लेखकाच्या- अगदी थोडं फार लिहू शकणार्याच्याही मनात कवितेविषयी एक विशिष्ट जागा असतेच. कदाचित त्यामुळेच एखाद्या कथा-कादंबर्या लिहिणार्या लेखकाच्या कवितासंग्रहाविषयीदेखिल रसिकांना तेवढीच उत्सुकता असते.
कविता महाजन यांचा "मृगजळीचा मासा" हा काव्यसंग्रह अशाच उत्सुकतेने वाचून काढला. 'ब्र' आणि 'भिन्न' सारख्या सामाजिक विषयांवरच्या कादंबर्या वाचल्यानंतर जेव्हा त्यांचं 'ग्राफिटी वॉल' वाचलं तेव्हा त्या कादंबर्या जणू नव्याने वाचल्यासारखं वाटलं. सगळी पार्श्वभूमी एका वेगळ्या कोनातून समजली आणि त्याचवेळी त्यांची कवितेविषयीची मतंसुद्धा समजली. त्या म्हणतात - "वास्तवाने निबर झालेल्या त्वचेवर एखाद्या कोवळ्या स्पर्शाने उगवलेली शिरशिरी म्हणजे कविता." आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे, कविता हा आयुष्याच्या सगळ्या धबडग्यातून मिळालेला मोकळा श्वास आहे हे सांगणारं त्यांचं हे वाक्य - "कविता! बाकी गोष्टी कृत्रिम श्वासोच्छवासासारख्या! प्रेम-प्रतिष्ठा- प्रसिद्धी- पैसा- इत्यादी काहीही कवितेमुळे मिळत नसलं तरी मी तिच्या ऑक्सिजनमुळेच तर जिवंत आहे. "
त्यांच्या या मतांमुळे तर पुस्तक वाचायला घेताना प्रचंड उत्सुकता होती. आणि त्यांचं कादंबरीकारापेक्षा एक खूप वेगळं रुप पहायला मिळेल याची खात्रीही. अर्थातच हा संग्रह अपेक्षा पूर्ण करणाराच ठरला. त्यांनी दिवास्वप्नांना हे पुस्तक अर्पण केलंय! "त्यांनीच जणू बळ दिलं खरी स्वप्नं पहायला आणि ती प्रत्यक्षात उतरवायला." आणि अनुक्रमात दिलेल्या कविता सुरु होण्याआधी एक अजून अर्पणपत्रिका दिसते जी उखडलेल्या हातांविषयी बोलते, कारण पंख तर तसेही काल्पनिक असतात. पुस्तक आपली पकड घेतं ते इथपासून!
या संग्रहाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर एक स्त्री आहे म्हणून त्यांच्यातला माणूस मागे पडत नाही आणि माणूसपणाला जागत स्त्रीत्व नाकारण्याचा वेडेपणाही त्या करत नाहीत. कदाचित म्हणूनच कवयित्रींच्या लिखाणाविषयीच्या सगळ्या पारंपारिक गृहितकांना मोडीत काढत या संग्रहातली त्यांची कविता आयुष्याच्या अनेक अंगाना सहज स्पर्श करुन जाते, वाचकाला अंतर्मुख बनवते.
कवितेत वापरलेल्या नवनवीन प्रतिमा महानगरीय जाणिवांतून आल्याच कळतं, पण त्यातूनही भेटणारा महानगरांतला असा एक वेगळा निसर्ग त्या प्रतिमांतून आपल्यासाठी तरी (शहरांतील लोकांसाठी) अधिक दृश्यमान आणि परिचित वाटतो.प्रतिमांचा वेगळेपणा नजरेत भरणारा असला तरी तो केवळ वेगळेपणाच्या हेतूने आलेला नाही. कवितेइतक्याच प्रतिमाही सहज आहेत.
नात्यांत एकाकडून दुसर्यावर होणार्या अन्यायाविषयी किंवा झालेल्या चुकांविषयी बोलण्याच्या पारंपारिक मानसिकतेपेक्षा नात्यांत अपरिहार्यपणे होत जाणारे बदल - ज्यात खरंतर कोणीच दोषी नसतं - आणि त्यातूनही जिवंत राहणारी नात्यांची मुळं ही कवितेला प्रगल्भ तर बनवतातच पण वाचकाला जास्त भिडतातसुद्धा. खूप जवळच्या नात्यांतले गुंते जगताना मनाच्या आंतरिक पातळीवर चाललेला कोलाहल, ज्यातला कुठलाच एक धागा स्वतंत्रपणे बाजूला करता येत नाही पण त्यांची स्वतंत्र व सगळी मिळून असणारी उत्कटता शब्दातीत असते, अशा भावना खूप सुट्या, स्वतंत्र मांडण्यात आणि तरीही त्यांतील उत्कटता अबाधित ठेवत मांडण्यात त्या कमालीच्या यशस्वी झाल्यात.
बाहेरच्या वर्णनातून सुरु झालेली कविता मग हळू हळू 'त्याच्या'वर येते.. त्याच्यावर थबकल्यासारखी वाटतेय तोवरच हे सगळे भ्रम आहेत हे जाणवून अधिक आत्ममग्न होते. कवितेचा हा शोधाचा प्रवास चालू राहतो, कधी मनाच्या कडेने तर कधी मनाच्या प्रवाहात झोकून देऊन! हा शोध मग येऊन थांबतो मरणापाशी आणि त्यातूनही बाकी राहतं कवितेचं देणं! सगळ्या कवितासंग्रहाचा आकृतीबंध मांडायचा झाला तर असा मांडता येईल. पण मुक्तछंदाच्या कोणत्यातरी ४ ओळी काढून त्यांचा दाखला देणं हा कवितांवर शुद्ध अन्याय होईल. या कविता अनुभवायच्या आहेत आपल्या आपणच.
अतिशय सुरेख लयीत चाललेल्या कविता समेवर शेवट कराव्या अशा संपतात.. एक अख्खं आवर्तन घेऊन. पण ही लय त्यातल्या सुरांची नसते तर विचारांची असते, कविता वाचताना डोळ्यांसमोर उभ्या रहाणार्या दृश्यांची असते, कधी कल्पनेची असते.
स्वतःविषयी निर्विकार होत जातानाच्या, स्वत:च्याच विस्मरणात जातानाच्या अनाहत भावनेतून स्वतःच्या घराकडे आणि घरातील लोकांकडे पहाण्याची दृष्टी बदलते आणि त्यातूनच कधी एका क्षणी फुलून येते प्रतिकाराची ठिणगी.. हा क्षण कसा असतो? कायमच इतरांना समजेल अशा भाषेत बोलणं आपल्यालाही टोचतंच की कधी कधी. असह्य होतं मग अशावेळी आणि कंठातून फुटतो आपल्या सूरांतला आपला शब्द. कदाचित हा आवाज ब्र असतो.. आणि ब्र उच्चारल्यावर पुढचं बोलू लागतो आपण. पण हा 'ब्र' फुटण्याचा एक क्षण कसा असतो? हे असे अनेक पकडायला अवघड क्षण नेमकेपणाने समोर येत जातात आणि आपल्या मनाचा तळ ढवळून येताना रोखणं मग आपल्याही हातात रहात नाही.
कविता क्लिष्ट आणि दुर्बोध नसल्या तरी त्यांनी विलक्षण खोली आहे. पूर्वार्धात लिहिलेल्या काही कविता स्वतःबाहेर फारशा जात नाहीत पण तरीही त्या बंदिस्त वाटत नाहीत. स्वतःतच एक आसमंत मोकळा झालाय त्यांच्यासाठी.. एक जग आहे.. खूप एकटं तरी खूप परिचित .. अशा जगाची सफर करुन येतो आपण. अर्थात स्वतःच्याच आत एक फेरी मारुन येतो. त्यात प्रत्येकाला काही ना काही समान सापडेल हे नक्की.
इंदिरा संत किंवा शांताबाईंच्या कवितांमधला स्त्रीत्वाचा तरल आणि अतिशय गाभ्यातून यावा असा आविष्कार घडतोच यात पण काळानुरुप बदलून आल्याने जास्त आपलासा वाटतो, प्रामाणिक वाटतो. वास्तवाच्या जवळ जातानादेखील या कविता आपल्यातली तरलता हरवू देत नाहीत हे विशेष. आत्यंतिक निराशेच्या आणि एकाकीपणाच्या अनुभूतीदेखील रोजच्या जगण्यातील साध्या वर्णनातून त्या अशा समोर उभ्या करतात की पुस्तक मिटल्यावरही त्या अनुभूती मनभर व्यापून रहातात. मरणाविषयी त्यांनी अखेरी ज्या बर्याच कविता लिहिल्यात त्यात मरणाविषयीची कुतूहल, कधी दाटलेल्या शिणवट्यातून त्याची वाटणारी गरज तर कधी भीती, कधी त्याची केलेली आळवणी, कधी चपखल शब्द वापरणार्या कवीनेप्रमाणे चपखलपणे माणसं निवडणारं मरण तर कधी प्रियकरासारखी त्याच्या मिलनाची पाहिलेली स्वप्नं अशा अनेकानेक अंगांनी त्या भावना मांडल्यात. आणि त्यातूनही राखेतल्या कोंबासारखा आशावाद डोकावत असतो. कवयित्रीच्या मनातील कवितेविषयीच्या भावना, 'कवितेविषयी चार पत्रं' यात समोर येतात आणि मग लेखकाच्या नजरेतून दिसणारी कविता वाचता वाचता, वाचणार्या प्रत्येकाच्याच आयुष्यात कविता किती रुजून गेली आहे, आपल्यासोबत आपल्या तळहातावरच्या रेषांसारखी जन्माला आली आहे हे जाणवतं.
हा कवितासंग्रह मला तरी एखाद्या अॅब्स्ट्रॅक्ट चित्रासारखी वाटला. प्रत्येक कविता म्हणजे रंगाचा सुरेख, घाटदार फटकारा आहे. घोटवलेल्या तानेसारखा, अस्सल, लखलखीत! स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व जपणारा. आणि हे सगळं मिळून तयार होणारं जे चित्रं असतं ते आपलंच असतं. आपलीच प्रतिमा. किंवा आपल्या मनाची. म्हणूनच अॅब्स्ट्रॅक्ट तरीही खूप समजणारी.
छान लिहिलंय! हे वाचून मलातरी
छान लिहिलंय!
हे वाचून मलातरी कवितासंग्रह वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे!
अवांतरः यातली वाक्ये तुझ्या शैलीला साजेशी!
खुद्द कवयित्री कविता महाजन या
खुद्द कवयित्री कविता महाजन या रसग्रहणाच्या प्रेमात पडतील इतकी मला खात्री वाटत आहे. 'ब्र' 'भिन्न' ग्राफिटी वॉल' माझ्याकडे आहेत, अर्थात वाचलीही आहेत, पण 'मृगजळीचा मासा' कसे हुकले हे जाणवत नाही, मात्र आत्ता या क्षणी मुक्ता यांचे हे अप्रतिम रसग्रहण वाचल्यावर ते हुकल्याचे वाईट वाटत आहे. मिळवीन आता.
"पण मुक्तछंदाच्या कोणत्यातरी ४ ओळी काढून त्यांचा दाखला देणं हा कवितांवर शुद्ध अन्याय होईल. या कविता अनुभवायच्या आहेत आपल्या आपणच." ~ हे तुम्ही फार छान मांडले आहे मुक्ता. होते असे की - विशेषतः कवितेच्याबाबतीत - रसग्रहण करणारा एका हेतूने त्या दोनचार ओळी बाजुला घेतो, पण तिकडे कवीच्या मनात त्या ओळीबद्दलच्या भावना वेगळ्याच असतात. मर्ढेकरांनी लिहिलेच होते की :
"इरेस पडलो तर बच्चमजी
मुक्तछंद तर लिहीन मीही,
ऐसपैस अन् लफ्फेबाज
लुगड्याचा जणु पदर इरकली..."
याचा अर्थ मर्ढेकरांनी जे काय लिहिले ते इरेस पडून असे म्हणता येत नाही. तो एक आविष्कार आहे त्या त्या वेळेच्या भावनेचा. त्यामुळे कविता महाजन यांच्या कवितेतील आविष्कार त्या कविता पूर्णत्वाने वाचूनच समजणार असल्याने प्रत्येक कवितेतील दोनचार ओळी देऊन त्या आधारे कवितेचे रसग्रहण करणे खुद्द कवयित्रीला आवडले नसते.
"हा कवितासंग्रह मला तरी एखाद्या अॅब्स्ट्रॅक्ट चित्रासारखी वाटला. प्रत्येक कविता म्हणजे रंगाचा सुरेख, घाटदार फटकारा आहे. " ~ नक्कीच असणार असे खात्रीलायकरित्या मी हे रसग्रहण वाचल्यानंतर म्हणू शकतो. इंदिरा संतांच्या एका कवितेमध्ये :
"किती उशीर लावण्या
.....एक कुंकवाचे बोट"
अशी एक जबरदस्त ओळ आहे. ती वाचल्याक्षणीच 'रंगबावरी' घेण्याची ओढ निर्माण झाली. तुमच्या वरील वाक्यातील 'रंगाचा घाटदार फटकारा...' देखील तीच भावना जागृत करते.
अशोक पाटील
आनंदयात्रीला अनुमोदन,
आनंदयात्रीला अनुमोदन, त्याच्या तळटीपेसह! अभिनंदन!!
कवितासंग्रहाचं शीर्षक 'मृगजळीचा मासा' असं का ठेवलंय, हे त्यातल्याच एखाद्या कवितेचं शीर्षक आहे का आणि असेल तर त्याच कवितेचं का? रसग्रहणासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असू शकतात किंवा अगदीच बिनमहत्त्वचे; कवीचा शीर्षकनिवडीमागचा विचार काय आहे यावर ते अवलंबून आहे.
आवडलं रसग्रहण. महाजनांच्या
आवडलं रसग्रहण. महाजनांच्या फक्त कादंबर्याच वाचल्या आहेत अजून. हे वाचेन आता.
एक स्त्री आहे म्हणून त्यांच्यातला माणूस मागे पडत नाही आणि माणूसपणाला जागत स्त्रीत्व नाकारण्याचा वेडेपणाही त्या करत नाहीत. >> हे फार महत्वाचं.
क्या बात है... आवडलं!!! मी
क्या बात है... आवडलं!!!
मी महाजनांच काहीही वाचलेल नाही... आता वाचेन म्हणतो
छान! थोड्या ओळी लिहायच्या
छान! थोड्या ओळी लिहायच्या असत्या.
सर्वांचे खूप
सर्वांचे खूप आभार..
आनंदयात्री,
शैली? ह्म्म... अजून शोधतेय मी...
अशोक, ग्राफिटी वॉल आणि त्यांच्या ब्लॉगवरच्या काही कविता वाचून तर जास्त उत्सुकता निर्माण होते.
http://kavita-mahajan.blogspot.com/
ही त्यांच्या ब्लॉगची लिंक.
झाड, या संग्रहात एक कविता आहे त्या नावाची. पण मला वाटतं की मृगजळीचा मासा ही कल्पनाच पराकोटीची आभासी आहे. आणि या संग्रहातल्या बर्याचशा कविता मनातल्या भ्रमाचे खेळ जोखत रहातात. कदाचित म्हणूनच नाव हे दिलं असावं.
साजिरा..
गिरीश, नक्की वाचा..!
बी, अहो सगळी कविता लिहिणं शक्य नाही आणि मुक्तछंदातल्या कविता आणि त्याही अशा- की शेवटची ओळ टर्निंग देणारी असते- त्यातल्या ४ ओळी देणं हा "रसभंग" आहे.. आणि इथे रसग्रहण करायचं होतं..
सर्वांचे पुनश्च आभार..!
हा कवितासंग्रह मला तरी
हा कवितासंग्रह मला तरी एखाद्या अॅब्स्ट्रॅक्ट चित्रासारखी वाटला. प्रत्येक कविता म्हणजे रंगाचा सुरेख, घाटदार फटकारा आहे. घोटवलेल्या तानेसारखा, अस्सल, लखलखीत! स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व जपणारा. आणि हे सगळं मिळून तयार होणारं जे चित्रं असतं ते आपलंच असतं. आपलीच प्रतिमा. किंवा आपल्या मनाची. म्हणूनच अॅब्स्ट्रॅक्ट तरीही खूप समजणारी.
हे खूप खूप भावलं मुक्ता. कवितांच्या ओळी न देताही काव्यसंग्रहाची पुरी ओळख या तुझ्या चार ओळींत झाली आहे. रसग्रहण खूप सही केलंस.
धन्यवाद क्रांति. तुमचा
साजिरा आणी क्रांती +१
साजिरा आणी क्रांती +१
पहिल्या ओळीपासून शेवटची ओळ
पहिल्या ओळीपासून शेवटची ओळ वाचेपर्यंत रसग्रहण वाचतो, असे मला वाटलेच नाही.
जणू काही कविताच वाचतो आहे असे वाटले.
कवितेच्या पुस्तकाकडे आणि आतील कवितांकडे पाहण्याचा एवढा चांगला दृष्टीकोन असेल तर
जे जन्माला येत त्याला कविताच म्हणावी लागेल.
आवडलं.
धन्यवाद कविता.. गंगाधर मुटे,
धन्यवाद कविता..
गंगाधर मुटे,
खूप खूप आभार..
वाचायला हवं. धन्स मुक्ता.
मुद्दाम कवितासंग्रह वाचेन
मुद्दाम कवितासंग्रह वाचेन याची शक्यता कमी.(त्यांची बाकिची पुस्तके वाचली आहेत तरी)
पण हे लेखन मात्र खुपच आवडलं.
सुरेख रसग्रहण. आवडले.
सुरेख रसग्रहण. आवडले.
नक्कीच वाच आयडू.. दिनेशदा,
नक्कीच वाच आयडू..
दिनेशदा, लेखन आवडल्याबद्दल धन्यवाद..!
http://kavita-mahajan.blogspot.com/
ही त्यांच्या ब्लॉगची लिंक. कदाचित इथे काही कविता वाचून अजून कविता वाचाव्याशा वाटतील तुम्हाला..
खूप आभार राजकाशाना..!
रसग्रहण एकदम आवडल... कविता
रसग्रहण एकदम आवडल... कविता महाजनाची आधीची पुस्तकं वाचलेली पण हा कवितासंग्रह माहित नव्हता. तू इतका आपुलकीने आणि सही लिहिलयस की 'मस्ट रीड' मध्ये टाकतोय हे पुस्तक.
" पण मला वाटतं की मृगजळीचा मासा ही कल्पनाच पराकोटीची आभासी आहे. आणि या संग्रहातल्या बर्याचशा कविता मनातल्या भ्रमाचे खेळ जोखत रहातात. कदाचित म्हणूनच नाव हे दिलं असावं. "
खुपच छान लिहिलयस.. Blog ची link दिल्याबद्दल धन्यवाद. 'भ्रम', 'संध्याकाळ' superlike..
मुटेजींना
मुटेजींना अनुमोदन...
काव्यात्मक रसग्रहण...
"ब्र " आणि "भिन्न" जबरदस्त पुस्तके आहेत महाजनांची.
वा! सुरेख रसग्रहण.
वा! सुरेख रसग्रहण.
धन्यवाद अमित.. ब्लॉग वाचून
धन्यवाद अमित..
ब्लॉग वाचून पुस्तक अजूनच मस्ट मस्ट रीड मध्ये गेलं असेल याची खात्री वाटते..
शशांक, शैलजा..
धन्यवाद..! प्रतिसादाबद्दल खूप आभार..
कविता कशी अन का आवडते याचं
कविता कशी अन का आवडते याचं विवेचन आवडलं, पुस्तक मिळवून वाचणार .
तुम्ही लिहिलेलं हेही आवडलं...
तुम्ही लिहिलेलं हेही आवडलं... पुस्तक मिळालं तर वाचेन कधीतरी...
मेधा, हितचिंतक धन्यवाद..!
मेधा, हितचिंतक
धन्यवाद..!
कवितेचं रसग्रहण कसं असावं
कवितेचं रसग्रहण कसं असावं याचा आदर्श नमुना आहे हा लेख म्हणजे.... चांगली माहिती.