भीती ही मानवी मनाचा अविभाज्य भाग आहे. या भीतीचा अनुभव घेणंही कधीकधी आनंददायक असतं, कारण तिचा संबंध गूढतेशी, रहस्याशी, साहसाशी असतो. गूढ, रहस्यमय असं काही अनुभवणं ही मानवी मनाची गरजच असते, आणि चित्रपटांमधून, पुस्तकांमधून काही अंशी ती पूर्णही होते. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी गेली काही दशकं खिळवून ठेवलं आहे. आता हृषिकेश गुप्ते या तरुण लेखकानं आपल्या गूढकथांद्वारे हा वारसा पुढे नेला आहे.
हृषिकेशाने लिहिलेला ’अंधारवारी’ हा गूढकथासंग्रह मनोविकास प्रकाशनानं नुकताच प्रसिद्ध केला आहे. ’काळ्याकपारी’, ’गानूआजींची अंगाई’, ’ती गेली तेव्हा’, ’वॉचमन’, ’गोष्ट अजून संपली नाही’ आणि ’बांदेकरांचं बाळ’ अशा सहा कथा या संग्रहात आहेत. या कथांची हाताळणी अतिशय संयत आहे. भीतीची जाणीव करून द्यायला हिंसा, किंवा ओंगळवाणं अशा काहीची आवश्यकता नसते, हे या कथा दाखवून देतात. मुख्य म्हणजे प्रेम, दु:ख, मत्सर, क्रौर्य या मानवी भावभावनांच्या जोडीनं येणारं गूढत्व आणि भीती या कथांना वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.
मनोविकास प्रकाशनाच्या हृषिकेश गुप्तेलिखित 'अंधारवारी' या गूढकथासंग्रहातली 'बांदेकरांचं बाळ' ही कथा...
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Andharvari.html

बांदेकर जागे झाले तेव्हा बाळ रडत होतं.
त्यांनी भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकली. मध्यरात्रीचे अडीच वाजले होते.
दुखणारं डोकं शांत करण्यासाठी तळहात टाळूवर मारत ते बिछान्यात उठून बसले आणि अर्धवट राहिलेल्या स्वप्नाचा विचार करू लागले. पुन्हा एकदा तेच स्वप्न.
...आणि पुन्हा एकदा अर्धवट राहिलेलं.
हे असं सलग महिनाभर घडत होतं. बाळ रात्री-अपरात्री कधीही रडत उठायचं. तासन्तास रडत बसायचं. बांदेकरांची झोप तशी नाजूक होती. ते चटकन जागे व्हायचे. त्यानंतर रात्रभर त्यांना झोपच लागायची नाही. दुसर्या दिवशी बॅंकेत सतत टाळूवर हात मारण्याचा उद्योग. सततची डोकेदुखी, डोळ्यांवर झोप, त्यामुळे कामात लक्षच लागायचं नाही. झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी गेल्या काही दिवसांपासून हॉलमध्ये झोपायला सुरुवात केली होती; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एकदा का बाळ रडू लागलं, की त्यांना जाग यायचीच. भरीस भर म्हणून ही स्वप्नं. त्यांनी पुन्हा एकदा स्वप्नं आठवण्याचा प्रयत्न केला.
पण छे!
काही केल्या आठवेचना.
हल्ली हल्ली त्यांना तीच ती विशिष्ट प्रकारची स्वप्नं पडायची. म्हणजे स्वप्नांची एक साखळीच होती ती. आठ-दहा वेगवेगळ्या स्वप्नांचे तुकडे. त्यांना स्वतंत्रपणे विशेष असा काही अर्थ नव्हता; पण ती सारी स्वप्नं एकत्र ओवली असती तर त्यातून काहीतरी अर्थ नक्कीच निघाला असता; पण बांदेकरांना तसं करता येत नव्हतं, कारण जागं झाल्यावर त्या स्वप्नशृंखलेतील काही स्वप्नं त्यांना मुळी आठवतच नसत.
त्यांनी कसोशीने स्वप्न आठवण्याचा प्रयत्न केला; पण निसरड्या वाटेवरून पाय घसरावा तशा त्यांच्या स्मृती घसरू लागल्या.
आपण दवाखान्यात आहोत एवढंच त्यांना आठवत होतं; पण पुढे काहीच नाही. नुसती कोरी पाटी.
ते उठून बेडरूममध्ये गेले. बाळ आता रडायचं थांबलं होतं. जानकीनं त्याला छातीशी धरलं होतं. आपले इवलेसे ओठ लपकलपक हलवत ते दूध पित होतं.
बांदेकरांना एकाएकी प्रेमाचा उमाळा आला आणि ते स्वत:शीच हसले. त्यांना तसं हसताना पाहून जानकीही हसली.
"डोकं थांबलं का?'', जानकीनं विचारलं.
बांदेकरांनी नकारार्थी मान हलवली.
"जा. झोपा जा. उद्या कामावर जायचं आहे ना?''
बांदेकरांनी नुसतं 'हूं' केलं आणि ते तिथेच जानकीशेजारी बसले. त्यांना शांतपणे दूध पिणार्या बाळाचं मोठं कौतुक वाटलं.
त्यांचं बाळ होतंच तसं.
गोरेगोबरे गाल, पाणीदार डोळे, इवलीशी जीवणी आणि लालजर्द ओठ. त्यांना बाळाचे सतत मुके घ्यावेसे वाटायचे, पण बाळ खूपच छोटं होतं, अजून बाळाला स्वत:कडे घ्यायचा त्यांना सराव नव्हता.
इतक्यात त्यांचं लक्ष पाळण्याकडे गेलं आणि ते अस्वस्थ झाले. तो जुना लाकडी पाळणा होता. त्यांच्या आईनं गावाकडून जानकी बाळंत व्हायच्या चार महिने आधीच पाठवून दिला होता. त्यांचं बालपणही याच पाळण्यात गेलं होतं म्हणे!
ते अधिकच अस्वस्थ झाले. अस्वस्थपणा हळूहळू भीतीकडे वळू लागला. त्यांच्या पायांना कंप सुटला. तळहात घामेजले. हे असं अलीकडे वारंवार होत असे. त्या पाळण्याकडे पाहिलं की त्यांना ते स्वप्न आठवे आणि स्वप्न आठवलं की ते अस्वस्थ होत.
हे स्वप्नसुद्धा त्या शृंखलेतलंच होतं; पण हे स्वप्न त्यांना जागेपणी आठवे.
स्वप्न तसं साधंच होतं; आणि तसं पाहता साधं नव्हतंही.
ते बेडरूममध्ये असायचे. बेडरूमच्या खिडक्यांतून नव्या कोर्या चंद्राचा प्रकाश पाझरलेला. खिडक्यांचे पडदे मंद वार्याने हलताहेत. स्वप्नातही ते अस्वस्थच आहेत. अस्वस्थ आणि विमनस्क.
खोलीच्या मधोमध आईनं गावाकडून पाठवलेला तो पाळणा.
काळ्या कोरीव लाकडापासून बनवलेला. प्राचीन वाटावा इतपत जुना पाळणा. पाळण्यावर पांढरं पांघरूण टाकलेलं. आतमध्ये कुणीतरी शांतपणे झोपलंय; पण कोण हे त्यांना कळत नाही. बहुतेक त्यांचं बाळच. ते हळूहळू पाळण्यापाशी येतात. पाळणा झुलतो आहे. कोण झोका देतंय ते त्यांना दिसत नाही. त्यांना खरं तर ते पांढरं पांघरूण बाजूला सारून आतमधल्या बाळाला उचलून घ्यायचंय.
पण त्यांना भीती वाटते आहे. स्वप्नातही ते भ्यालेले आहेत.
ते पाळण्यापाशी तसेच उभे राहतात. मग त्यांचं लक्ष समोरच्या भिंतीकडे जातं.
भिंतीवर एक तसबीर लटकवलेली. ते पुन्हा एकदा घाबरतात.
यावेळी अधिकच.
त्यांचा हात भिंतीवर असणार्या दिव्याच्या बटणाकडे जातो आणि...
आणि ते दचकून जागे होतात.
हे स्वप्न त्यांना गेल्या दोन महिन्यांत कितीतरी वेळा पडलं होतं. अगदी असंच आणि एवढंच. लांबीरुंदीत, स्थळकाळात किंचितही तफावत नाही. जणू त्याच चित्रपटाचा एखादा तुकडा पुन:पुन्हा पाहावा तसा.
बाळाला दूध पाजणार्या जानकीशेजारी बसले असताना त्यांना हे सारं आठवलं.
त्यांनी जानकीकडे पाहिलं. तिचेही डोळे जडावले होते. ते उठले आणि पुन्हा एकदा झोपायला निघाले.
"सकाळी उठवू नकोस. उद्या दांडीच मारतो'', असं म्हणत ते स्वयंपाकघरामध्ये गेले. एक अॅनासिनची गोळी तोंडात टाकली आणि फ्रिझमधल्या पाण्यासोबत गिळून टाकली.
अंथरुणावर पडल्यानंतरही बराच वेळ झोप लागली नाही. त्यांच्या मनात सतत ती स्वप्नंच रेंगाळत होती.
खरं तर आताशा त्यांना त्या स्वप्नांची भीतीच वाटू लागली होती. स्वप्नात सतत दिसणारी ती तसबीर कुणाची आहे, हे त्यांना पाहायचं होतं; पण ते दिसण्याआधीच स्वप्न संपायचं नेहमी.
जागं झाल्यावर हृदय नेहमी धडधडत असायचं. कपाळावर, मानेवर घाम जमा झालेला असायचा.
त्यांना असं सतत वाटत राहायचं, की या सार्याचा संबंध आपल्या बाळाशी आहे, पण कसा हे त्यांना कळत नव्हतं. मग अपविचारांची पाल मनात सतत चुकचुकत राहिली की ते दिवसभर अस्वस्थ होत. मनाची तगमग वाढे. कामात चुका होत. कधी कधी स्वप्नांच्या भीतीने त्यांना झोपच लागत नसे.
त्यांना सर्वांत जास्त भीती वाटायची ती त्यांना जागेपणी न आठवणार्या स्वप्नांची; आणि ही भीती अधिक खोल होती. तीक्ष्ण, अणकुचीदार होती. ती एकदा का मनाच्या कातडीवर रोवली गेली, की त्यांचा श्वास कोंडला जाई.
एक वेळ माहीत असणार्या स्वप्नांचा अर्थ माणूस बौद्धिक कसरतींनी लावेल, धैर्याने त्यांचा सामना करेल, पण अज्ञात स्वप्नांचं काय? जी स्वप्नं एक स्वप्न म्हणून अस्तित्वात आहेत; पण जागेपणी आठवत नाहीत त्यांचं काय? अर्थाचे, मथितार्थांचे कोणते ओघळ त्या स्वप्नांतून वाहत असतील?
अंथरुणावर पडून मिटल्या डोळ्यांनी जागृत विचार करणार्या बांदेकरांचा ताबा हळूहळू सुप्त विचारांनी घेतला आणि बांदेकर पुन्हा एकदा स्वप्न पाहू लागले.
ते जागे झाले तेव्हा खोलीभर लखलखीत उजेडाचा भपका मारत होता. सकाळचे आठ वाजले होते.
बरीचशी स्वप्नं पडून गेली होती; पण त्यातलं एकही आठवत नव्हतं. 'बरंच आहे', ते स्वत:शीच समजूत घातल्याप्रमाणे म्हणाले आणि पुढील कामांना लागले.
जानकी अजून झोपली होती. बाळाच्या झोपेप्रमाणे तिला स्वत:च्या झोपेच्या वेळा बदलाव्या लागल्या होत्या; पण असं सर्वांच्याच बाबतीत घडतं. बांदेकर सुज्ञ, समजूतदार आणि प्रेमळ पती होते.
बांदेकरांनी चहा केला. बाळ झाल्यापासून सकाळचा चहा तेच करत असत. जानकी उठल्यानंतर पुन्हा एकदा तो उकळवून पित असत. अंघोळ उरकून ते नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला बाहेर पडणार, तोच फोन वाजला.
"हॅलो", बांदेकरांनी फोन उचलत म्हटलं.
फोन त्यांच्या आईचा होता. अर्थात जानकीची, बाळाची चौकशी. बराच वेळ बोलल्यानंतर त्यांनी फोन ठेवला. फोन ठेवला आणि ते दचकले.
आईचा फोन आला होता का नक्की?
त्यांना त्या फोनच्या संदर्भात काहीही आठवत नव्हतं. किती वेळ झाला होता फोन येऊन? दोन मिनिटं झाली असतील आणि तरी ते त्या फोनचे सारे संदर्भ विसरून गेले होते. त्यांनी कॉलर आयडीची बटणं दाबून, फोन नक्की आला होता का, आल्यास तो आईचाच होता का, हे तपासून पाहिलं. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी कोकणातल्या त्यांच्या घरच्या फोनवरून त्यांना फोन आला होता. ते तब्बल दहा मिनिटं बोलत होते, हे कॉलर आयडीवर स्पष्ट दिसत होतं; पण याउपर त्या फोनविषयी त्यांना काहीही आठवत नव्हतं.
बांदेकर गोंधळले... चकित झाले.
त्यांनी मेंदूवर ताण देत आठवण्याचा प्रयत्न केला; पण...
छे! त्यांना काहीही आठवत नव्हतं. त्यांनी मान हलवली आणि लॅच की खिशात टाकून दरवाजा ओढत ते बाहेर पडले.
पाऊस नुकताच भुरभुरून गेला होता. त्यामुळे वातावरण छान होतं. बांदेकर उल्हसित झाले. शीळ वाजवत झपझप चालत ते पार्कपाशी आले. पार्कमध्ये गर्दी होती. त्यातल्या त्यात रिकामं बाक पाहून बांदेकर त्यावर बसले.
त्यांना आता शांतपणे विचार करायचा होता...
त्यांना पडणार्या स्वप्नांचा...
त्यांना एक कळलं, की दिवसभरात त्यांना ही छोटी-छोटी स्वप्नं पडायची. ती स्वप्नं त्यांना जागेपणी आठवत नसली तरी स्वप्नांचा रोख एकच होता. तो रोख त्यांच्या बाळाच्या दिशेनं होता.
बाळाचा विचार मनात डोकावताच बांदेकर पुन्हा एकदा अस्वस्थ झाले. बाळाचा जन्म झाला आणि या गोष्टींना सुरुवात झाली. आधी बाळाच्या अनियमित झोपेच्या वेळांमुळे त्यांना होणारी जागरणं आली. मग न आठवणारी स्वप्नं आली, आणि हल्ली तर त्यांना दिवसाढवळ्या स्मृतिभ्रंशाचे झटके येऊ घातले होते.
आपल्याला मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे... शेवटी ते एका निष्कर्षाप्रत येऊन ठेपले.
हरकत नाही.
आपण वेडे नाही याची त्यांना खात्री होती; पण त्यांच्या मनातल्या सारासार विचारशक्तीच्या वाटा आता निसरड्या होऊ लागल्या होत्या आणि हे आठवण्याइतपत त्यांचा मेंदू ताळ्यावर होता. घरी परतताना त्यांना वाटेत त्यांच्याच बॅंकेतला मराठे भेटला. त्याच्याशी जुजबी बोलणं झालं; पण घरी आल्यावर त्यांना ते बोलणंही आठवेना. इतकंच काय, मराठे नक्की भेटला होता का, याची शंका त्यांच्या मनात डोकावू लागली, पण बांदेकरांनी त्यावर विचार करणं सोडून दिलं. जानकीनं त्यांच्यासमोर पोह्यांची डिश ठेवली आणि जाहीर केलं,
"संध्याकाळी छोटीला घेऊन देवळात जायचंय हं.''
बांदेकरांनी अवाक् होत तिच्याकडे पाहिलं.
"काही नाही होत. मी मागे बसेन. व्यवस्थित गुंडाळून नेऊ. आता चार महिन्यांची झालीये. शिवाय मी बाबांना म्हटलं होतं, तुमच्या पायाशी आणीन म्हणून."
जानकी नंतर बरंच काही बडबडत राहिली. बांदेकर घरात वावरत राहिले. जानकीची बडबड पार्श्वभूमीवर होती, पण बांदेकरांच्या मनात प्रामुख्याने स्वप्नंच होती.
दुपारी त्यांची जेवणं झाल्यानंतर बाळ उठलं. जानकी आत गेली. आता बाळाची अंघोळ आणि इतर सगळा कार्यक्रम होता. बांदेकर आडवे झाले आणि स्वप्नं पडायला सुरुवात झाली.
पुन्हा तेच स्वप्न.
बाळाची अंधारी खोली. तोच जुना लाकडी पाळणा. समोरच्या भिंतीवर कुणाचीतरी तसबीर.
ती तसबीर कुणाची आहे, तेवढं कळायला हवं. मग साराच उलगडा होईल...
स्वप्नातही बांदेकरांना जाणवत राहिलं.
स्वप्न जागृतीच्या कड्याच्या टोकाशी येऊन थांबलं होतं. कडेलोट व्हायच्या आधी त्यांना भिंतीवरचं बटण दाबून विजेचा दिवा लावणं आवश्यक होतं. दिव्याच्या प्रकाशात त्यांना ती तसबीर कुणाची आहे हे पाहता आलं असतं आणि सार्याच गोष्टींचा उलगडा झाला असता. ते झपाट्याने भिंतीकडे वळले. त्यांनी आपला हात बटणाकडे नेला. ते दिवा लावणार एवढ्यात जानकीची हाक कानावर आली.
"अहो, उठा आता. कामावर दांडी मारून दिवसभर झोपूनच आहात. चला, मी तयार झाले. देवळात जायचंय ना. तुम्हीही तयार व्हा पाहू."
बांदेकर चरफडत उठले.
स्वप्न पडलं होतं; पण पुन्हा एकदा अर्धवट राहिलं होतं.
सगळी तयारी करून बाळाला घेऊन ते दोघं बाहेर पडले तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते.
त्यांनी देवळात बाबांचं दर्शन घेतलं, बाहेर येऊन भेळ खाल्ली, बागेत जाऊन बसले; पण नेमकं घरी परतताना स्कूटरला किक मारतेवेळीच रेगेमावशी दिसल्या. रेगेमावशी बांदेकरांच्या आईची मैत्रीण. आईचं आणि जानकीचं पटत नसे, त्यामुळे रेगेमावशीचाही जानकीवर राग होता. त्यांच्यासोबत जानकीला पाहताच रेगेमावशींनी रस्ता बदलला आणि जानकीच्या तोंडाचा पट्टा चालू झाला.
"बघितलंत. थेरडीनं बाळाची म्हणून तरी चौकशी करायची; पण नाही. तुमच्या आईचीच मैत्रीण ना."
"अगं त्यांचं लक्ष नव्हतं." बांदेकरांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.
पण घरी पोहोचेपर्यंत जानकीच्या तोंडाचा पट्टा काही थांबला नाही. घरी पोहोचल्या पोहोचल्या थकलेलं बाळ झोपेची मागणी करत रडू लागलं आणि बांदेकरांची सुटका झाली.
रात्रीचं जेवण घेताना बांदेकरांना अचानक आठवण झाली. त्यांनी जानकीला विचारलं,
"अगं, आला होता का गं पुन्हा फोन साहेबांचा?"
"कोण साहेब?"
"अगं आमचे बॅंकेतले सामंतसाहेब."
"नाही. आणि पुन्हा म्हणजे? एकदा येऊन गेला होता का?"
"अगं असं काय करतेस? सकाळी तूच तर घेतला होतास ना?"
"काहीही काय!" जानकीनं विचित्र चेहरा करत म्हटलं.
"अगं असं काय करतेस?"
"जा. झोपा जा. हल्ली तुमचं हे रोजचंच झालंय. साध्या साध्या घटना विसरता. न घडलेल्या घटना आठवतात."
बांदेकर काहीही न बोलता थेट फोनकडे गेले. त्यांनी कॉलर आयडी तपासून पाहिला. दुपारी दीड वाजता बॅंकेतून फोन आला होता; पण तो कुणी घेतला होता?
जानकीनं की त्यांनी?
त्यांना नेहमीप्रमाणे साहेबांशी झालेलं बोलणं आठवलं नाही.
बांदेकर खूपच अस्वस्थ झाले.
काय झालं होतं त्यांना?
विचार करून करून थकल्यानंतर ते एका निष्कर्षाप्रत आले.
या सार्याच्या मुळाशी ते स्वप्न होतं. स्वप्नातली ती तसबीर तेवढी दिसायला हवी. मग सार्या कोड्यांचा उलगडा होईल. त्यांना का कोण जाणे, पण असं सारखं वाटत होतं.
पण मग त्यांना एक अनामिक भीतीही वाटू लागली. तो तसबिरीतला चेहरा अंधारात आहे तेच चांगलं आहे, असं त्यांना एकदा प्रकर्षाने वाटून गेलं. तसबिरीतल्या त्या चेहर्याच्या विचारानं त्यांच्या मनात कालवाकालव झाली. हृदयाची धडधड वाढली. श्वास जलद झाला. रक्तदाब वाढेल अशानं. त्यांना भीती वाटली. ते उठले. त्यांनी फॅन हाय स्पीडला लावला आणि ते टीव्हीसमोर येऊन बसले.
कितीतरी वेळ टिव्हीवरचे ते बकवास कार्यक्रम त्यांच्या मनाने मोठ्या उत्साहानं सहन केले. स्वप्नांच्या विचारांची किनारही त्यांच्या मनाला शिवली नाही. बर्याच वेळानंतर जेव्हा डोळे जडावले तेव्हा ते अंथरुणावर आडवे झाले.
त्यांनी डोळे मिटले आणि स्वप्नांना सुरुवात झाली.
निद्रावस्थेच्या एका टोकाशी बांदेकर दडून बसले होते. त्यांना आज ती स्वप्नं जवळून पाहायची होती. जागं झाल्यावर त्यांना ती स्वप्नं विसरायची नव्हती.
झोप तर आलीच. पण ती सावध होती.
निद्रेच्या त्या गर्द रानात ते पूर्ण हरवून गेले नव्हते. शांत समुद्रकिनारी हळूहळू लाटा थडकाव्यात तशी त्यांच्या अंतर्मनातून स्वप्नं बाहेर येऊ लागली.
बापरे! किती ही स्वप्नं!
किनार्यावरून तुरुतुरु पळणार्या खेकड्यांच्या छोट्या पिल्लांप्रमाणे असंख्य स्वप्नांचा जमाव त्यांच्या मनावर चालून आला.
सुरुवातीचं स्वप्न दवाखान्यातलं. बाळ झालं तेव्हाचं. नंतर घरातलं. मग ते हरेश्वरला गेले होते तेव्हाचं. बॅंकेतलं. आईचं. ताईचं. सासरेबुवांचं... सारी स्वप्नं त्यांना कशी अगदी व्यवस्थित आठवत होती. लख्ख सूर्यप्रकाशात पायाखालची जमीन दिसावी त्याप्रमाणे. आणि मग ते शेवटचं स्वप्न सुरू झालं.
पण हे स्वप्न थोडसं वेगळं होतं.
म्हणजे स्वप्न नेहमीचंच होतं. तीच बाळाची अंधारी खोली, तोच झुलणारा लाकडी पाळणा... सारं काही तेच; पण तरीही काहीतरी वेगळं होतं.
म्हणजे इतर स्वप्नं कशी, भूतकाळातल्या घटना सर्रकन मन:पटलावरून सरकून जाव्या तशी निघून गेलेली; पण या स्वप्नाला ताजे संदर्भ होते. स्थळ, काळ, घटना त्याच होत्या; पण समोरच्या भिंतीवर नेहमी फडफडणारं कॅलेंडर आज नव्हतं, कारण आज सकाळीच त्यांनी ते कॅलेंडर मागल्या वर्षीचं म्हणून रद्दीत दिलं होतं.
पण मग हे स्वप्न तरी होतं का?
स्वत:लाच विचारलेल्या या प्रश्नानं बांदेकर खडखडून भानावर आले. ते बाळाच्या खोलीत होते. खोली अंधारानं गिळून टाकलेली. समोर हलणारा लाकडी पाळणा.
म्हणजे ते स्वप्न पाहत नव्हते. ते पुढे आले. त्यांनी पाळण्यावर टाकलेली चादर काढली.
त्यांचं बाळ आत शांत झोपलं होतं.
बांदेकरांचा जीव भांड्यात पडला.
त्यांनी कौतुकानं बाळाकडे पाहिलं. किती निरागस दिसत होतं त्यांचं झोपलेलं बाळ!
फक्त बाळाला एक पाय नव्हता. डावा डोळा मिटलेला होता; पण उजव्या डोळ्याची पापणी उघडीच होती. एका हाताचं बोट गळून पडलं होतं. हरकत नाही.
उद्या दुकानातून दुसरं बाळ आणता आलं असतं.
त्यांनी बाळाला हलकेच उचललं आणि बाळाची पापी घेतली. मग बाळाला शेजारच्या कपाटात ठेवून दिलं. त्या कपाटात अशी आणखी बरीच प्लास्टिकची बाळं होती.
ते आता निवांत झाले होते. त्यांना आता स्वप्नांची भीती वाटत नव्हती, कारण त्यांचं बाळ सुरक्षित होतं.
पण काय भयंकर स्वप्नं होती ती!
नुसत्या कल्पनेनं त्यांच्या अंगावर शहारा आला.
काय तर म्हणे आई, ताई, सासरेबुवा सारेच त्यांचं सांत्वन करतायत. काहीही...!
बाळ गेलं म्हणे. जन्मत:च. मग त्या इवल्याशा बाळाच्या अंत्यसंस्काराचं स्वप्न. मग हरेश्वरला ते बाळाचं श्राद्ध करतायत.
इतकी हिडीस स्वप्नं पडतात का कधी?
आणि मग एकाएकी त्यांना जाणवलं, ही असली स्वप्नं त्यांना दिवसाढवळ्या जागेपणीही पडत होती.
हो तर!
सकाळी आईचा फोन आला. ती म्हणत होती, आता धक्क्यातून सावर.
स्वप्नच तर होतं ते.
काहीही...
सामंतसाहेब म्हणत होते, "चार महिने झाले दुर्घटना होऊन. झालं ते झालं. आता कामावर परत या".पण ते तर रोजच कामावर जातायत.
सकाळी पार्कमध्ये भेटलेला मराठे काय किंवा देवळापाशी भेटलेल्या रेगेमावशी काय, त्यांच्या स्वप्नातली माणसं अशी विचित्र का वागताहेत? म्हणजे सतत त्यांच्या बाबतीत अशी सहानुभूती दाखवल्यागत?
बांदेकरांचं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं.
भिंतीवर तीच तसबीर होती.
त्यांनी धडधडत्या हृदयानं दिवा लावला.
अरे!
तसबीर तर जानकीची होती. फक्त सुकलेल्या फुलांचा एक जुना हार त्या तसबिरीला लटकवलेला होता.
पण मग ही तसबीर दिसेल या कल्पनेनं आपल्याला भीती का वाटावी?
काय मूर्ख स्वप्नं असतात ही!
बांदेकरांनी वैतागत मान हलवली.
आणि मग त्यांना ते सुरुवातीचं दवाखान्यातलं स्वप्नही आठवलं. काय तर म्हणे, दवाखान्यात सगळे कुटुंबीय मोठमोठ्याने रडताहेत आणि डॉक्टरांनी जाहीर केलंय, की बाळाला जन्म देताना बाळासोबत जानकीही दगावली.
कसली क्रूर स्वप्नं पडतात!
म्हणूनच ही असली निर्घृण स्वप्नं आपल्याला जागेपणी आठवत नसावीत, बांदेकरांना वाटलं.
जानकी झोपलेल्या संपूर्ण रिकाम्या बेडवर नजर टाकत मग ते म्हणाले,
"जानकी बाळ रडतंय. उठ पाहू."
आणि मग ते हॉलमध्ये जाऊन टिव्ही पाहत बसले.
अंधारवारी
लेखक - हृषिकेश गुप्ते
मनोविकास प्रकाशन
पृष्ठसंख्या - १६८
किंमत - रु. १६०
सहिच आहे, वाचायला पहिजे.
सहिच आहे, वाचायला पहिजे.
वाह! मस्त! मला फार आवडतात
वाह! मस्त! मला फार आवडतात भयकथा वाचायला. नारायण धारप मी बरेच वाचले. अर्थात त्यात तो ओंगळवाणी वर्णनं असायची. तरी सैतान आवडली होती.
खरच वाचायला हवं पुस्तक...
खरच वाचायला हवं पुस्तक... मस्त लिहिलय
भ्याsssss अर्थात छान लिहिलीये
भ्याsssss
अर्थात छान लिहिलीये कथा... ते जागेपणी स्वप्नं, स्वप्नातलं जागेपण.... अप्रतिम.
खुपच छान.. मस्त
खुपच छान.. मस्त लिहीलेय...कल्पकता जबरदस्त आहे त्यामुळे कथेला पकड छानच आली आहे..
धन्स चिनूक्स ह्या पुस्तकाची
धन्स चिनूक्स ह्या पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल. पण कथेचा शेवट इथे दिला नसता तर बरं झालं असतं असं वाटतं. तेव्हढी उत्सुकता राहिली असती
मस्त. गानूआजींची अंगाई एका
मस्त. गानूआजींची अंगाई एका दिवाळी अंकात वाचली होती. तिही आवडली होती. धन्यवाद चिनूक्स.
खरच खुपच छान भयकथा आहे.
खरच खुपच छान भयकथा आहे.
अप्रतीम......................
अप्रतीम............................ एक मानसीक आजार झाल्या वर काय वाटते कसे वाटते हे अप्रतिम लिहिले आहे
सुरेख कथा. इन्सेप्शन मध्ये
सुरेख कथा. इन्सेप्शन मध्ये ती दीज आर नॉट ड्रीम्स, दीज आर मेमरीज म्हणते ते आठवले.
भाऽऽरी!! आवडली कथा!
भाऽऽरी!! आवडली कथा!
सही आहे कथा. भयकथा गुढकथा
सही आहे कथा. भयकथा गुढकथा मलाही आवडातात. मी वाचणार हे पुस्तक.
धन्यवाद चिन्मय.
अप्रतिम कथा मी हे पुस्तक
अप्रतिम कथा
मी हे पुस्तक वाचले आहे... सगळ्याच कथा सुंदर (खरं म्हणजे भितीदायक) आहेत... पण मला अंधारवारी कथा जास्त आवडली...
रात्रीचे ११:३३ वाजलेत आणि मी
रात्रीचे ११:३३ वाजलेत आणि मी ही कथा वाचलेय,
............ रात्र अजून बाकी आहे
मस्त माहिती करुन दिली !
मस्त माहिती करुन दिली ! वाचायला आवडेल..
प्रसिक..
पुस्तक वाचायला आवडेल. गूढकथा
पुस्तक वाचायला आवडेल. गूढकथा फारशा वाचल्या नाहीत. ओळख करुन दिल्याबद्दल अक्षरवार्ता टीमला धन्यवाद
हे पुस्तक वाचायला निश्चित
हे पुस्तक वाचायला निश्चित आवडेल.......!!!!!! विकत घेत आहे.....!!!!!
चिनुक्स, थँक्स पुस्तकाच्या
चिनुक्स, थँक्स पुस्तकाच्या माहितीबद्द्ल. खुपच इंटरेस्टिंग वाटतं आहे आणि एक कथा दिल्यामुळे अजुनच उत्सुकता वाटते आहे पुर्ण वाचण्याची. नक्की घेणार हे पुस्तक या विकेंडला.
रहस्यम्य , सुन्दर
रहस्यम्य , सुन्दर
वा फार छान लिहिलीये! अस्वस्थ
वा फार छान लिहिलीये! अस्वस्थ करणारी आहे.
धन्यवाद चिनूक्स!
बाप रे.. मस्तय कथा!
बाप रे.. मस्तय कथा!
खूप छान आहे कथा
खूप छान आहे कथा
सुंदर मांडणी आहे कथेची
सुंदर मांडणी आहे कथेची .पाल्हाळीक पण नाही. वाचणाऱ्याच्या मनाची घट्ट पकड घेत आहे.
किंडल च्या कृपेने विकत घेतलं
किंडल च्या कृपेने विकत घेतलं हे पुस्तक. अधाशासारख्या ५ गोष्टी वाचून काढल्या. पकड घेणारं पुस्तक आहे शंकाच नाही.
आणि वॉचमनची कथा वाचून काटाच आला अंगावर.
जाधवची
> भीतीची जाणीव करून द्यायला
> भीतीची जाणीव करून द्यायला हिंसा, किंवा ओंगळवाणं अशा काहीची आवश्यकता नसते, हे या कथा दाखवून देतात. > पटलं! चांगली आहे कथा.