पोळी - चपाती - फुलके इत्यादी संदर्भात चर्चा

Submitted by क्ष... on 28 April, 2011 - 17:04

मायबोलीवर दर दोन महिन्यांनी पोळ्या नीट होत नाहीत, तवा कोणता वापरू? पीठ कोणते वापरू अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते सगळे एकत्र करण्यासाठी हे पान.

भाकरी आणि फुलक्यांचा व्हिडीओ - http://www.maayboli.com/node/14935

जुन्या मायबोलीवरील पोळ्यांची चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/4519.html

अजुन एक चर्चा इथे पण मिळेल - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/111686.html?1225813423

माझे काय चुकले? आणि युक्ती सांगा या दोन्ही बा.फ. वर यासंदर्भात असंख्य वेळा विचारले गेले आहे. तेच सर्व इथे डकवले जाईल.

पोळ्यांसाठी कोणता तवा चांगला? ते इथे सापडेल
- http://www.maayboli.com/node/25369
जुन्या मायबोलीवरची तव्यासंदर्भातली चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103164.html?1157632534

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी कुडी | 25 October, 2010 - 15:43

काल पोळ्या बनवायचा प्रयत्न केला पण अगदी पापड झाला होता. करताना काही चुकत असेल का?

रूनी पॉटर | 25 October, 2010 - 15:50

तवा खूप जास्त गरम असणे, पोळ्या लाटतांना खूप जास्त पीठ लावले जाणे, कणीक घट्ट मळली जाणे, इंडीयन ग्रोसरीतून जूने किंवा मैदा घातलेले पीठ येणे अशी अनेक कारणे असू शकतात पोळ्या पापडासारख्या होण्याची.
कणीक पोळ्या करायच्या तासभर आधी गरम दूधात/पाण्यात मळून झाकून ठेवा. तसेच मळतांना तेलाचा हात लावा.

* प्रतिसाद

मराठी कुडी | 25 October, 2010 - 16:11

धन्यवाद रुनी. मी २-३ वेगळे कणकेचे ब्रँड वापरुन बघीतले पण काही फरक नाही पडला. सध्या आशीर्वाद ची कणीक ट्राय करतीये. भिजवताना गरम पाणी वापरुन बघते. किती गरम करु पाणी? कोमट का त्याहुनही गरम?
पीठ जास्त लावलेल गेल्याची शक्यता आहे पण पोळ्या लाटताना चिकटत होत्या.

पूर्वा | 25 October, 2010 - 16:32

मराठी कुडी, तू नविनच पोळ्या करायला लागली आहेस का? कारण तीन एक वर्षांपूर्वी सवय नसल्याने माझ्या पोळ्या अशाच होत असत.मी पण कणकेचे खूप ब्रँडस बदलले.पण आता सवय झाल्याने कुठल्याही कणकेच्या चांगल्या पोळ्या करु शकते.रुनीच्या टिप्स ट्राय कर नाहीतर हळूहळू सवय होईल तश्या चांगल्या पोळ्या जमतील स्मित
इथे मिळणारी कणिक तशी ठीक असते.अजून एक पोळी लाटताना थोडी जाड लाटून बघ.

सायो | 25 October, 2010 - 16:44

मराठी कुडी, आशिर्वाद चांगला आहे. मी तोच वापरते. सुजाताही चांगला आहे. कणकेत जरं रवाळ, खरखरीत कणीक आली असेल तरी पोळ्या बिघडतात. तसंच कणीक भिजवताना कोमट पाणी घातलंत तरी चालेल. हळूहळू अंदाज घेत घाला. खूप पाणी घातलं किंवा जास्त तेल घातलं तरी पोळ्यांचं तंत्र बिघडतं. तसंच कणीक भिजवून एक दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवा आणि मग लाटायला घ्या. गॅस मध्यम असायला हवा.

मराठी कुडी | 25 October, 2010 - 16:46

पूर्वा, हो आत्ताच सुरुवात केलिये पोळ्या करायला. शिकायचा प्रयत्न करतीये. पहिली पोळी जाडच लाटलेली पण मग आतून कच्ची राहिली म्हणून पुढच्या पातळ लाटल्या.
सवयीचा पण प्रश्न असेल कदाचीत. स्मित

मराठी कुडी | 25 October, 2010 - 16:49

सायो, मी गॅस एकदम हाय वर ठेवलेला. मध्यम वर ठेवून आणि गरम पाण्यात भिजवून पाहते आणि कळवते.
(मला अहो नका म्हणू. अग म्हट्ल तर जास्त बर वाटेल स्मित )

पूर्वा | 25 October, 2010 - 18:49

तवा चांगला तापल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेव स्मित

सायो | 25 October, 2010 - 18:58

मराठी कुडी, तुला पोळ्यांचा फार अनुभव नाही असं दिसतंय तेव्हा मी सुचवेन की चालत असल्यास आधी फुलके करुन बघ आणि हात बसला, सगळं तंत्र जमलं की पोळ्या कर.

सुलेखा | 25 October, 2010 - 20:49

गोल्डन टेम्पल कं.च्या कणकेची पोळी [फुलका] पांढरी-मऊ होते पण थंड झाली कि चिवट होते ..आशिर्वाद कं.च्या कणके चा फुलका थंड्/शीळा झाल्यावर ही मऊ रहातो..तेल्,गरम पाणी न घालता साध्या पाण्यात भिजवुन लगेच फुलके लाटले तरी मऊ रहातात....

मराठी कुडी | 25 October, 2010 - 22:15

चालेल, फुलके करुन बघते. फ्रोझन पोळ्या खाऊन नवरा आणि मी दोघेही खूप कंटाळलो म्हणून हा पोळ्यांचा प्रयत्न.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद टीपांबद्द्ल. नक्की कळवेन कस जमतय सगळ. अ़जून मदतीची गरज भासेल बहुतेक.

दक्षिणा | 24 April, 2011 - 22:06

पुन्हा पोळ्यांबद्दल शंका.. (फिरून फिरून गंगावेशीत..)
माझ्या पोळ्या मऊ होतात, फुगतात, पातळही होतात.. फक्त मी तव्यावर भाजताना जाडी वाढेल या भीतीने अजिबात तेल लावत नाही. त्यामुळे त्या कोरड्या वाटतात..
बरेच लोक अशा पोळ्या करतात पण त्यांच्या पोळ्या मस्त मॉईश्चर्ड दिसतात. त्या कशा काय? अ ओ, आता काय करायचं
माझं चुकतं कुठे? कणिक मळताना, लाटताना, कि भाजताना?
कणिक मळताना मी तेल घालते, आणि कणिक मध्यम असते... (थोडी घट्टकडे झुकणारी) लाटताना पोळीच्या घडीत तेल लावते, काही लोक पीठ ही घालतात. मी ही लावायचे थोडं पण त्यानेही पोळी कोरडी होते असं मला कोणितरी सांगितलं म्हणून ते बंद केलं. भाजताना पोळी तव्यावर टाकल्या वर लगेच मी परतते... त्यामुळे मऊ होते... (माझा अनुभव)
प्लिज मार्गदर्शन करा..

मंजूडी | 24 April, 2011 - 22:21

दक्षिणा, पोळ्यांचे जाणकार योग्य मार्गदर्शन करतीलच, पण माझ्या मते, तू फुलके का नाही करून बघत? फुलके लाटताना घडी घालत नाहीत, त्यामुळे घडीत तेल लावायचा प्रश्न नाही, मग तेच तेल तू फुलका झाल्यावर वर लावू शकतेस, म्हणजे फुलका मऊ राहिल.

दक्षिणा | 24 April, 2011 - 22:36

मंजु आयडीया मस्त आहे, पण फुलका पुर्ण फुगण्यासाठी कापडाने ठिकठिकाणी दाबावा लागतो ना? मग तिथे कडक नाही होत का? की तु विस्तवावर भाजतेस? अ ओ, आता काय करायचं
अवांतर - माझी ताई फुलका लाटून तव्यावर टाकते लगेच पलटते आणि शेजारच्या विस्तवावर भाजते..

मंजूडी | 24 April, 2011 - 22:47

मला घडीची पोळी अजिबात जमत नाही त्यामुळे मी फुलकेच करते. फुलक्यांसाठी तवा पूर्ण तापवून मग गॅस बारीक करून ठेवते. फुलका लाटून झाला की पोळपाटाकडची बाजू तव्यावर टाकते. त्याचा रंग बदलला (पांढरट झाला) की बाजू पलटून गॅस मध्यम मोठा करते. तव्याकडच्या बाजूवर चॉकलेटी ठिपके पडले की डाव्या हाताने चिमट्यात तवा पकडून बाजूला घेते आणि उजव्या हातात फुलक्याच्या चिमट्याने फुलका पकडून पांढरी बाजू गॅसवर टाकते, गॅस मोठा करून फुलका फुगवते आणि खाली काढून एका मऊ कापडावर ठेवते. म्हणजे वाफेमुळे फुलके ओलसर होत नाहीत. सगळे फुलके करून झाले की प्रत्येकाला जरा तेलाचं बोट पुसून ठेवते.

दक्षिणा | 24 April, 2011 - 22:50

ओके, साऊंड्स रियली ग्रेट.. करून पाहते.. स्मित
थॅंक्स मंजू.. स्मित

दिनेशदा | 25 April, 2011 - 00:50

दक्षिणा, पण फुलके ताजेताजेच खायला पाहिजेत. जर ठेवायचे असतील, तर मी खाकरा करणे पसंत करतो. तो वरणाबरोबर, आमटी बरोबर सुद्धा खाता येतो.

दक्षिणा | 25 April, 2011 - 01:15

खाकरा करता येत नाही मला.. अरेरे

प्रज्ञा९ | 25 April, 2011 - 06:38

दक्षिणा, मीही पोळ्या येत असून झगडून फुलके शिकले कारण इकडच्या हवेत पोळ्या खूप मऊ रहात नव्हत्या. आणि मला आणि नवर्‍याला फुलके आवडत नव्हते. पण गेले ७-८ महिने फुलकेच.
मीही मंजूसारखंच करते. फुलका गॅसवरून उतरवला की वेताच्या छोट्या टोपलीत पेपर टॉवेल घालून त्यावर ठेवते, आणि लगेच त्यातली वाफ काढून टाकते. वर तूप लावते. स्मित ही टोपली मी तुळशीबागेतून पोळ्यांसाठीच आणली, फक्त आणली तेव्हा त्याला वरून छान फॅन्सी कव्हर वगैरे होतं. ते रोज धुतलं नाही तर पोळ्यांना वास येतो म्हणून मी ते काढून टाकलं आणि आतली टोपली वापरते. स्मित

ज्ञाती | 25 April, 2011 - 06:59

दक्षिणा, माझा अनुभव असा की कणीक सैलसर असल्याशिवाय पोळ्या मऊ होत नाहीत. मी फूड प्रोसेसर मध्ये कणिक मळते, मग तेल लावून २-३ मिनिटे हाताने मळते. मग १० मिनिटांनी पोळ्या लाटायला घेते. बाकीचे बरेच फॅक्टर आहेत पण असे केले की माझ्या सकाळी केलेल्या पोळ्या संध्याकाळपर्यंत मऊ राहतात.

सीमाला विचार, तिने केलेया पोळ्यांइतक्या मऊ पोळ्या मी आजवर खाल्य्या नाहीत.

चिवा | 25 April, 2011 - 14:29

सीमा....अगं कुठे राहतेस तू...कशा करतेस पोळ्या... अ ओ, आता काय करायचं (हा टाहो समजावा.)

सावली | 25 April, 2011 - 16:31

मंजूडी अगदी अगदी असच करते बर्का मी पण स्मित आणि हि पद्धत दहा वर्षापूर्वी मी ट्रेन मधे एक मुलगी/बाई तीच्या मैत्रिणीला सांगताना ऐकली होती, आणि तेव्हापासुन करायला लागले होते. ती तूच तर नव्हतीस? डोळा मारा

रूनी पॉटर | 25 April, 2011 - 16:37

सीमा तू एक पोळ्या-१०१ नावाचा व्हिडीओ टाक बाई, त्याने बर्‍याच लोकांच्या पोटाचा प्रश्न सुटेल.

दक्षिणा | 25 April, 2011 - 21:08

सीमा...... $$$$$$$ किधर हो.... जल्दी आओ..

ज्ञाती अगं कणिक सैलसर मळली की फार प्रॉब्लेम नाही येत मला लाटायला पण पोळपाटाला चिकटणे, पीठ जास्ती लावावं लागणे... हे सकाळच्या गडबडीत छळवादी वाटतात.. अरेरे

आशूडी | 25 April, 2011 - 21:16

कणीक घट्ट असणे, पोळ्या फार पातळ लाटणे, लाटताना जास्त पीठ लावणे, तव्यावर सारखी पलटणे, जास्त भाजणे,भाजून झालेल्या पोळ्या फॅनखाली उघड्या ठेवणे इ. आतापर्यंत मला सापडलेली कडक पोळ्यांची कारणे. कणीक भिजवताना थोडे मीठ घातले तर पोळ्या फुगतात, हलक्या होतात. हे काहीच नसेल तर गहू /पीठ बदलून पाहणे हा अंतिम उपाय.
'पोळ्या जमणे' म्हणजे काय? योग्य पोळी कशी असते? एक व्याख्या प्लीज हेडरमध्ये टाका.

सीमा | 25 April, 2011 - 21:31

अरे देवा अ ओ, आता काय करायचं मी नाही गं एक्स्पर्ट बायांनो.
दक्षिणा , ज्या अर्थी पीठ पोलपाटाला चिकटतय त्या अर्थी पीठ चांगल मळल जात नाही. व्यवस्थित ,लुसलुशीत मळलेली कणिक अजिबात चिकटत नाही. पीठाची कंसिस्टन्सी बरोबर झाल्यावर कणिक , हाताला तेल लावून चांगली मळुन घे. कणिक अशी गुळगुळीत दिसायला पाहिजे मळल्यावर. फुड प्रोसेसर मध्ये किंवा हाताने कशीही मळली तरी. तसच चपाती लाटताना अति पीठ लावल्यामुळ पण चपाती कोरडी होत असेल.
घडी घालताना तेला बरोबर पीठ लावल कि चपातीला छान पापुद्रे सुटतात.

माझ्या आईच्या मते चपाती नुस्ती मऊ नाही तर मऊ आणि खुसखुशीत व्हायला पाहिजे. मी अजुन शिकत आहे तिच्यासारख्या चपात्या करायला.
कणिक मळुन झाल्यावरचा फोटो टाकायचा प्रयत्न करते. स्मित

स्निग्धा | 26 April, 2011 - 00:40

दक्षिणा, मी सुध्दा थोडी घट्ट भिजवते कणिक, पण तेल लावुन १० मी. झाकून ठेवते मग फुलके करते. त्या १० मी. कणिक मुरुन थोडी मऊ होते. हा माझा अनुभव.

दक्षिणा | 26 April, 2011 - 01:57

सीमा माझी कणिक तु म्हणतेयंस तशी गुळगुळित होते छान.. पोळपाटाला चिकटत नाही सध्या, पण सैल भिजवली तर त्रेधा तिरपिट उडते.. अरेरे

दिनेशदा | 26 April, 2011 - 02:25

चपाती, भाकरी, दही लावणे, तूप कढवणे ..... आणि फ्लॅक्स सीड्स यांचे स्वतंत्र बीबी झालेच पाहिजेत आणि त्यांच्या लिंक्स या बीबीच्या माथ्यावर झळकल्याच पाहिजेत..

गंम्मत करतोय.. पण हे व्हावेच नाही का ?

रैना | 26 April, 2011 - 03:25

नको. मग तुळशीचे बी = फ्लॅक्स सीडस = जवस = तीळ = कारळं = हळीव
हे प्रश्न कुठे विचारणार आँ?
फिदीफिदी

मायबोली FAQ's मध्ये सर्वाधिक खपाचे प्रश्न .

अवल | 26 April, 2011 - 03:47

दक्षिणा, मलाही वाटते की बहुदा कणीक घट्ट भिजवतेस म्हणून पोळ्या मऊ होत नाहीत. जरा सैल कणिक भिजवली की मऊ होतात पोळ्या. शिवाय १० मिनिटं झाकून ठेवायची कणिक अन मग परत थोडी मळून घायची . अन हो, फार बारिक गॅसवर भाजली पोळी तरी ती कोरडी होते तेव्हा तवाही नीट तापलेला हवा स्मित
फुलके करतानाही कणिक भिजवून १० मिनिट झाकून ठेवायची पुन्हा मलायची, मऊ होतात तेही .
आवडत असेल तर कणिक भिजवताना २ चमचे दही टाकत जा , त्यानेही मऊ होते पोळी.

प्राची | 26 April, 2011 - 03:56

माबो FAQ धागा काढून आधी झालेल्या चर्चांच्या लिंक्स तिथे दिल्या तर? स्मित

दक्षिणा | 26 April, 2011 - 03:56

आरू, दह्याची आयडीया करून पाहते गं... स्मित
ईंट्रेस्टींग वाटतेय.. स्मित

प्रज्ञा९ | 26 April, 2011 - 06:47

दक्षिणा, दही किंवा थोडं कोमट दूध सुद्धा घालून बघ हवं तर. किंवा भिजवताना कोमट पाण्यात भिजव आणि १०-१५ मिनिटं ठेव कणिक मुरायला. मावे असेल तर १० सेकंदात पाणी पुरेसं कोमट होईल.
कणिक मळताना दोन्हे हाताने भरपूर दाब देऊन मळून घे. "पीठाचा अणूरेणू मळला गेला की पोळ्या-भाकर्‍या मऊ होतात" असं मला साबा म्हणाल्या होत्या. स्मित

काळजी नको करू गं, जमतं सगळं! स्मित
(हे ल तों मो घा सारखं वाटेल, पण इथे आल्यावर एकदा नवरा म्हणाला, की "सिरिअसली तू डबा द्यायचा विचार काही दिवस थांबवतेस का.. आपण रात्री गरम पोळ्या खाऊ, आणि फोनवर परत विचारू पाहिजे तर काय कराय्चं असतं पोळ्या नीट व्हायला ते..पण डब्यात पोळ्या नीट लागत नाहियेत..." कारण खाताना त्याला त्रासच होत असे. हे ऐकून मी दुपारी घरी एकटी बसून चक्क रडले होते! त्यामुळे या सगळ्यातून मी गेली आहे म्हणून सल्ले देतेय. रागवू नको! स्मित )

ज्ञाती | 26 April, 2011 - 07:50

ज्ञाती अगं कणिक सैलसर मळली की फार प्रॉब्लेम नाही येत मला लाटायला पण पोळपाटाला चिकटणे, पीठ जास्ती लावावं लागणे...>>> यापेक्षा थोडी कमी सैल हवी फिदीफिदी

मी नाही गं एक्स्पर्ट बायांनो.>>>> सीमा इज बीइंग वेरी पोलाइट बर्का बायांनो,
सीमा अजिबात अतिशयोक्ती नाही, खरंच फार मऊसूत पोळ्या होतात तुझ्या. स्मित
तु वर लिहीलं आहेस तशी कणीक मळायला लागल्यापासून बरीच सुधारणा आहे माझ्या पोळ्यात

avani१४०५ | 26 April, 2011 - 08:02

कणीक भिजवताना तेल जरा जास्त घातला तरी मऊ होतात पोळ्या..
न शक्यतो सकाळ ची कणीक रात्रीच भिजवुन ठेवायची..

अंजू | 26 April, 2011 - 10:10

"पीठाचा अणूरेणू मळला गेला की पोळ्या-भाकर्‍या मऊ होतात" >> १००% अनुमोदन.
पीठ चांगल मळल्यावर फार मऊसूत पोळ्या होतात.

दक्षिणा | 26 April, 2011 - 21:19

अवनी सेम पिंच.
सकाळी कणिक मळून पोळ्या करून मग हापिसला जायचं म्हणजे इम्पॉसिबल आहे. त्यामुळे मी कणिक रात्रीच मळून फ्रिजात ठेवत असते, त्याने भिजते ही चांगली आणि वेळ ही वाचतो.... त्यात ही काही टिप्स असल्या तर सांगा.. स्मित
वर सांगितल्याप्रमाणे दही/कोमट दूध/पाणि घालून एकदा मळून पाहते.
बरं मग करायला शिकले की कोण कोण येणार माझ्या हातच्या पोळ्या खायला? फिदीफिदी

मवा | 1 February, 2011 - 02:42
वर मैदायुक्त पीठांविषयी लिहील्याप्रमाणे, आशिर्वाद चे प्रॉडक्ट्स पण वाईट आहेत असे कोणाला माहीत आहे का ? कारण मी नेहमी वापरते आणि फुलके/पोळ्या चांगल्या होतात. पण फार ब्राऊन नाही दिसत.

भान | 1 February, 2011 - 03:19
आशिर्वाद मस्त आहे,आणि मैदा नसावा,असल्यास अगदीच कमी असावा कारण त्याच्या पोळ्या लाटताना रबरासारख्या ताणल्या जात नाहित.

मवा | 1 February, 2011 - 03:23
नाही मी खरेच विचारतेय , कारण तसे असेल तर मी ही गहू आणून दळून आणेन. आई पण गहूच दळून आणते व मलाही नेहेमी तेच कर असे सांगते, पण मी आपली आशिर्वाद वर काम भागवते. पण खरंच ते वाईट असेल आरोग्यासाठी तर बदलेन, म्हणून विचारले.
हो भान, बरोबर. शिवाय मी सध्या तो आशिर्वाद चाच Multigrain आणते आहे, तोही चांगला वाटतोय.

ललिता-प्रीति | 1 February, 2011 - 03:25
देशपांडे फ्लोर मिल्सची कणिक उत्पादने अतिशय सुंदर आहेत >>> अनुमोदन. मी गेले ७-८ महीने त्यांचीच पिठं वापरतेय. कणीक, भाकरीची पिठं अप्रतिम असतात. जरा महाग आहेत त्यांचे दर पण पोळ्या-भाकरी इतक्या छान होतात की त्यापुढे जरा जास्त पैसे द्यावे लागले तरी त्याचे काही वाटत नाही. शिवाय घरपोच मिळते.
आशू, वृंदावनमधे त्यांचा एक एजंट आहे - सुधीश गुप्ते. फोन नं. - ९६१९२०००४९, सौ. गुप्ते - ९८६९५०३३०४

अंजली | 1 February, 2011 - 16:51
मी इथे अमेरीकेत गेली ५ वर्षे आशिर्वादची गव्हाची कणीक वापरली आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे त्यात अजिबात मैदा नाही. पोळ्या अतिशय मऊ होतात. दुसर्‍या दिवशीपण छान मऊ असतात. सुजाता, नेचर्स फ्री वगैरेचा माझा अनुभव अजिबात चांगला नाही.

सिंडरेला | 1 February, 2011 - 17:38
मला वाटते प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे पीठाचा मी सुजाता, नेचर्स फ्रेश किंवा अन्नपूर्णा वापरते. आमच्या इथे मिळणार्‍या नेचर्स फ्रेशच्या पॅकमध्ये आधी किडे आणि नंतर अळया (हो मोठ्या पांढर्‍या अळया) निघाल्यावर आणि दोनदा १० एलबीवाले पॅक फेकून द्यावे लागल्यावर आता अन्नपुर्णाचं किंवा सुजाताचं २ एलबीचं पॅक आणते. पण पोळ्या तीनही पीठांच्या छान मऊ होतात. फुलके नुसत्या तव्यावर भाजले तरी टम्म फुगतात. वातड पोळ्या किंवा फुलके दोन्ही होत नाहीत.

अगो | 1 February, 2011 - 18:56
अमेरिकेत आल्याआल्या पंजाबी मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे गोल्डन टेंपल आटा आणला होता. अगदी मैदा कळतो डोळ्यांना आणि पोळ्या अजिबातच चांगल्या होईनात ( हाडाच्या सुगरणींना जमतात. माझी एक मराठी मैत्रिण ह्याच आट्याच्या उत्तम पोळ्या करायची ) मग सुजाता आणत होते. सध्या आशीर्वाद. सध्या कॉईल असल्याने फुलक्यांसारख्या लाटते ( घडी न घालता ) आणि पोळ्यांसारख्या भाजते. तव्यावरुन उतरुन तुपाचा हात लावून फॉईलमध्ये ठेवल्यास चांगल्या लागतात. अमेरिकन ग्रोसरीत डकोटा मिल्सचे स्टोन ग्राऊंड होल व्हीट फ्लोअर मिळते. शुद्धतेबद्दल शंकाच नाही पण त्याची कणीक लगेच काळी पडते म्हणून आणवत नाही

दक्षिणा | 1 February, 2011 - 21:05
@सिंडरेला पॅक उघडल्या उघडल्या आळ्या निघाल्या असतील तर स्टोर मध्ये परत का केले नाहिस?
@अगो >> कणीक लगेच काळी पडते म्हणून आणवत नाही
>> मळल्यावर किती वेळात काळी पडते? लगेच का? की तो स्टोरेज बद्दल बोलतेयंस? कशी स्टोर करतेस मळलेली कणिक...

मीरा | 1 February, 2011 - 22:19
धन्स माहीतीबद्दल. आशीर्वाद, अन्नपुर्णा, सुजाता पैकी लहान पाकीटे आणून बघते एकेक करून.

सिंडरेला | 2 February, 2011 - 08:21
दक्षिणा, नवेच पॅक होते. दुकानदाराला सांगितले तर म्हणे आमच्याइथले नाहीये हे. ते त्यांचे नेहमीचे उत्तर असते. आता तर २ नवी दुकानं झालीत इथे. त्यामुळे ते सरळ 'नव्या दुकानातून घेत नका जाऊ....' वगैरे लांबण लावतात. शक्य झाल्यास जर्सीहुन आणते पीठं. पण प्रत्येकवेळी जमेलच असे नाही.

ज्ञाती | 2 February, 2011 - 08:30
मीही इथे आल्याआल्या गोल्डन टेम्पल वापरते होते. पोळ्या गरम असतील तरच खायला बर्‍या लागायच्या, गार झाल्या की वातट. मी बरेच दिवस तो माझ्या स्ययपाकाचा दोष समजत होते.
सध्या अन्नपूर्णा सगळ्यात चांगले वाटले. ते मिळत नसेल तर सुजाता/स्वर्ना आणते. पीठ दुकानातून आपण घेण्यापूर्वी किती दिवस्/महिने तिथे पडून आहे त्यावर अवलंबून आहे, बरेच जुने असल्यास सुजाताच्याही पोळ्या चांगल्या होत नाहीत.
मध्यंतरी मायबोलीकर सीमाच्या हातच्या इतक्या मऊ पोळ्या खाल्ल्या, तिचे पाहून कणीक सैल मळायला सुरुवात केली. मळल्यावर तेलाचे बोट लावून २ मिनिटे तिंबुन घेते. आता बर्‍याच मऊ होतात.

भरत मयेकर | 2 February, 2011 - 08:36
मैद्याच्या (किंवा पिठासारख्या मैद्याच्य अथवा मैद्यासारख्या पिठाच्या )चांगल्या पोळ्या करता आल्या तरी त्यांच्या पोषणमूल्याचे काय? भारताबाहेरच्या लोकांचा नाइलाज असेल पण भारतातल्या लोकांनी पर्यायांचा विचार करायला हवा.
एका न्युट्रिशनिस्टने मैद्याला व्हाइट पॉयझन म्हटले होते.

प्रज्ञा९ | 2 February, 2011 - 08:39
मी लग्न ठरल्यावर पोळ्या करायला शिकले आणि इकडे आल्यावर खर्‍या अर्थाने पोळ्यांची जबाबदारी आली. लग्नानंतर १५ दिवसांत आले इकडे. मग इकडच्या कणकेशी जमेना. आधी स्वाद , मग सुजाता, आणि शेवटी आशीर्वाद.
त्यात नवीन तवा खराब झाला. मग इकडे calphalon चा Hard anodized घेतला. त्याचं गणित जमेना. एक दिवस नवर्‍याने डबा खाऊन झाल्यावर ऑफिसमधूनच विचारलं, की तू खरंच डबा न द्यायचा विचार करशील का..अगदीच कडक होतायत पोळ्या...

मग बराच रिसर्च झाला आणि जमलं प्रकरण! आता मी कणीक सैल भिजवते, आणि अजिबातच तेल घालत नाही. नुसतं मीठ आणि कोमट पाणी.
फुलका गॅसवरून काढून वाफ काढली की लग्गेच तूप लावते थोडं. आणि डब्यासाठी देताना थोड्या कोमट झाल्या की अ‍ॅल्युमिनियम फॉईलमधे रॅप करून देते.

सायो | 2 February, 2011 - 08:47
मी ही आशिर्वाद गेले चार एक वर्ष वापरते आहे. त्यात मैदा असावा असं वाटत नाही. सुरुवात सुजातापासून केली. एखाद वर्ष तो वापरल्यावर मगच्या लॉटमध्ये अगदी खरबरीत कणीक आली तेव्हा आशिर्वादला स्विच केलं. पण परवा इथल्या छोट्या ग्रोसरीमध्ये आशिर्वाद मिळाला नाही म्हणून सुजाताची लहान पिशवी घेऊन आलेय. आता एडिसन गाठायला हवं.

स्वाती_आंबोळे | 2 February, 2011 - 08:50
मीही आशीर्वादच वापरते. छान होतात पोळ्या/फुलके.

मवा | 2 February, 2011 - 09:19
मैद्याच्या (किंवा पिठासारख्या मैद्याच्य अथवा मैद्यासारख्या पिठाच्या )चांगल्या पोळ्या करता आल्या तरी त्यांच्या पोषणमूल्याचे काय? >>> हाच प्रश्न मी काल विचारला होता. की मी गेली बरीच वर्षे आशीर्वाद चे पीठ वापरत आहे व त्याच्या पोळ्या/फुलके अतिशय छान होतात, तसेच मैदा असलेली पीठे ओळखण्यासाठीचे जे निकष वर दिले आहेत त्याप्रमाणे देखील त्यात मैदा असल्याचे लक्षण दिसत नाही, तसेच कोणी आत्तापर्यंत मला तसे सांगितलेही नाही. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसे भारतातल्या लोकांना पर्याय असले तरी जर हे पीठ चांगले नाही असे खात्रीलायक रित्या समजले तर पर्यायांचा विचार केला जाईल कारण सध्या तरी सार्वत्रिकपणे हा पर्याय सोपा वाटतो, नोकरी वै करणार्‍या स्त्रियांना.

लाजो | 2 February, 2011 - 16:29
मी आशिर्वाद किंवा पिल्सबरी वापरते. दोन्हीच्या पोळ्या, फुलके चांगले होतात. मैदा असेल अस वाटत नाही.
मुंबईत साबा आशिर्वाद वापरतात आणि पुण्यात आईकडे सकस.
मध्यंतरी इथे पार्ले चा आटा मिळाला होता... पार्लेच आहे, चांगल असाव म्हणुन २ किलो पाकिट आणुन बघितलं... पोळ्यांना बेक्कार.... धपाटे, पराठे यात वापरुन संपव

अगो | 2 February, 2011 - 17:58
मळल्यावर किती वेळात काळी पडते? लगेच का? की तो स्टोरेज बद्दल बोलतेयंस? कशी स्टोर करतेस मळलेली कणिक... >>> दक्षिणा, लगेच नाही काळी पडत पण एक दिवस फ्रिझमध्ये राहिली की काळी पडते. मी शक्यतोवर दोन दिवसांची कणिक मळून टप्परवेअरसारख्या डब्यात घालून फ्रिझमध्ये ठेवते. त्याहून जास्त ठेवली तर कुठलीही कणिक काळी पडते. डकोटा मिल्सची कणिक थोडी भरभरीतही असते. पोळ्या लगेच खाल्ल्या तर गरमगरम चांगल्या लागतात पण ठेवून नाही चांगल्या लागत.

रूनी पॉटर | 2 February, 2011 - 18:12
अगो
माझीपण कुठलीही कणीक फ्रीजमध्ये ठेवल्यावर २ दिवसात काळी पडायची. आई इथे आली होती तेव्हा तिने सांगितले की मी वापरतेय तो टपर वेअरचा डबा बर्‍यापैकी पातळ आहे. इथे मग मी टपर वेअर ऐवजी दुसरा अगदी जाड प्लास्टीकचा डबा आणला कणीक ठेवायला. आता नीट तेलाचा हात लावून ठेवली त्या डब्यात तर अजिबात काळी पडत नाही. तुझेही असेच काही होतेय का चेक कर.

अगो | 2 February, 2011 - 18:18
ओह, असंही असतं का ! करुन बघते मी. जास्त प्रमाणात कणिक भिजवून आयत्यावेळी गरम पोळ्या लाटणे सोयीचे पडते. बराच वेळ वाचतो. पण काळपट कणकेच्या खाववत नाहीत म्हणून खूप जास्तही भिजवून ठेवता येत नाही. टिपेबद्दल धन्यवाद रुनी

मीरा | 31 January, 2011 - 16:20
गव्हाच्या पीठात मैदा आहे का हे कसे ओळखायचे? मागच्या महीन्यात नेचरल चे पीठ आणले पण पोळ्या वातड्या होत होत्या. या महीन्यात स्वर्ण चे आणून बघीतले- पोळ्या खुप पान्ढर्या वाट्तात ; बहुतेक मैदा असावा का?

रूनी पॉटर | 31 January, 2011 - 17:09
माझ्यामते पांढरट पोळ्या होतात म्हणजे त्यात मैदा असावा. भारतीय दुकानातुन घेतलेल्या बहुतेक सगळ्याच पीठांमध्ये कमीअधिक प्रमाणात मैदा असतो. पोळ्या अगदी ब्राऊन रंगाच्या कधीच होत नाहीत.

प्रज्ञा९ | 31 January, 2011 - 20:20
मला आशिर्वाद आटाचा चांगला अनुभव आहे इथे. आधी माझ्यापण पोळ्या वातड होत. अर्थात मी आता पोळ्यांचा नाद सोडून फुलकेच करते. पोळ्यांपेक्षा फुलके जास्त वेळ मऊ राहातात असा अनुभव आला. डब्यासाठी तरी फुलकेच. मग रात्रीच्या जेवणात वाटलं तर पोळ्या करते कधीतरी, नाहीतर तेही फुलकेच.

सायो | 31 January, 2011 - 20:50
मीरा, माझा 'आशिर्वाद' ह्या ब्रँडचया कणकेचा अनुभव अगदी उत्तम आहे. तो मिळत नसेल तर मग सुजाता वापर.
प्रज्ञा९ची पोस्ट जरा उशीराच पाहिली. तिला अनुमोदन.

दक्षिणा | 31 January, 2011 - 21:53
बाहेरच्या कणिकेत म्हणजे आटा असं लिहिलेल्या पॅकेटस मध्ये शक्यतो मैदा असतोच. जाहिरातीत दाखवतात ते फुलकेच असतात आणि ते गरम गरम खाल्ले जातील अशी जाहिरातदारांची अपेक्षा असते. मैदा असलेल्या कणिकेत पाणी भरपूर मावते. कणिकेत मैदा आहे की नाही हे ओळखण्यासाठी अजून एक सोप्पा उपाय म्हणजे कणिक मळून झाल्यावर आणि भिजल्यावर (साधारण अर्ध्या तासात) त्याची क्वान्टिटी थोडी वाढल्यासारखी (फुगल्यासारखी) वाटते. दुसरा मार्ग म्हणजे पोळी लाटताना, लाटणं फिरवल्यावर रबरासारखी ताणल्या प्रमाणे दिसून पुर्ववत होते.
आशिर्वाद अन्नपुर्णा सारखे आटे फक्त फुलके करून गरम खायचे असतील तरंच वापरावेत, तरिही विचार करावाच कारण मैदा कमी/अधिक प्रमाणात रोज खाणं आरोग्यास चांगलं नाहीच, त्याने पचनक्रियेवर खूप परिणाम होतो.
त्यापेक्षा सकस, अग्रज सारख्या लोकल कंपन्या ट्राय कराव्यात. काही छोटे मोठे किराणा दुकान चालक सुद्धा कणिक ठेवतात, नविन ट्राय करताना कायम एखादा किलो वापरून मग जास्ती प्रमाणात घ्यावी शक्यतो.

मिनोती | 31 January, 2011 - 21:59
दक्षीणा, हे भारतात करणे शक्य आहे पण इथे उसगावात देसी स्टोरमधे मिळणार्‍या जवळपास सगळ्या पिठांची वर लिहीलेय तशी बोंब असते.
किंग आर्थर ब्रांडचे पूर्ण गव्हाचे पीठ मी मधे कित्येक महीने आणत होते. पण ती कणीक कमीतकमी तासभर भिजवून ठेवावी लागते नाहीतर पोळ्या चामट होतात.

मंजूडी | 31 January, 2011 - 22:25
जे मायबोलीकर विकतची कणिक वापरतात आणि मुंबई-नवी मुंबई इथे राहतात त्यांच्यासाठी :
देशपांडे फ्लोर मिल्सची कणिक उत्पादने अतिशय सुंदर आहेत. साधी कणिक (एम. पी. सिहोर), लोकवन गव्हाची कणिक, मेथी मिश्रीत, सोयाबिन मिश्रीत, फुलक्यांसाठी कणिक, भाकरीची पिठे, पराठ्यासाठी कणिक, बेसन इत्यादी बरीच उत्पादने आहेत. त्यांच्या कणकेच्या पोळ्या अतिशय मऊसूत होतात आणि शिळ्या झाल्या तरी तशाच मऊ, सुरेख राहतात हा स्वानुभव आहे. बाहेरपेक्षा थोडी महाग आहेत ही उत्पादने, पण वर्थ आहेत.
त्यांच्या पार्ल्याच्या मुख्य केंद्राचा नंबर - ०२२-२६८२७४७१
इच्छुकांनी इकडे फोन करून आपल्या जवळपासच्या एजंटचा नंबर घ्या आणि संपर्क साधा. बरेचसे एजंट घरपोच माल पोचवतात.

दिनेशदा | 31 January, 2011 - 22:31
एका मिलचा प्रत्यक्ष अनुभव म्हणून लिहितोय. मिलमधे मैदाच तयार केला जातो (गहू भिजवून ते रोलरमधे प्रेस करतात. आतला जो गर निघतो त्याची कुटून पावडर करतात, तो मैदा, त्याचेच जरा रवाळ मिश्रण केले कि तो रवा) कारण मैद्यालाच जास्त मागणी असते. असा मैदा आधी पांढराशुभ्र नसतो. हवेशी संयोग झाल्यावर तो पांढरा होतो.
वरचे जे टरफल असते त्यापासून ब्रान वेगळे करतात. त्यापैकी काही परत मैद्यात मिसळतात आणि ते मिश्रण आटा म्हणून बाजारात येते. अखंड गहू दळून जसे चक्कीवर पिठ तयार केले जाते, तसे क्वचितच एखाद्या तयार पाकिटात असेल. गहू असे दळल्यावर त्यापासून मैदा करणे शक्य नाही, पण मैद्यापासून जे काही मिश्रण तयार करतात, ते आटा असण्याचा भास मात्र, निर्माण करता येतो.
रवाही वर लिहिले आहे तसाच करतात. गव्हाचा दळून रवा केला तर तो पाण्यात नीट शिजणार नाही (व त्याच्या कुरड्या वगैरे होणार नाहीत.) दलिया मात्र गहू दळून करतात, म्हणून तो शिजायला वेळ लागतो.

दक्षिणा | 31 January, 2011 - 22:32
ओहो मिनोती मग त्या केसमध्ये फुलकेच बरे तुम्हा लोकांसाठी नाही का? गरम गरम करून वाफ काढून लगेच निट झिपलॉक मध्ये ठेवले तर नरम राहतील थोडे..
@मंजुडी - यांची एखादी शाखा पुण्यात असेल तर विचारून मला विपु करशील का प्लिज?

मंजूडी | 31 January, 2011 - 22:37
दक्षिणा, अगं सध्या तरी त्यांनी मुंबई-नवी मुंबईपुरतीच सेवा मर्यादित ठेवली आहे. तरीही वर जो मुख्य शाखेचा नंबर दिलाय तिथे मी फोन करून विचारते आणि तुला सांगते.

दक्षिणा | 31 January, 2011 - 22:38
दिनेश, मस्त माहिती दिलित..

दक्षिणा | 31 January, 2011 - 22:40
मंजू ढण्यवाद 
सध्या मी पुण्यात सहस्त्रबुद्धेंची सकसची कणिक वापरते, कधी कधी ती खराब लागते पण एकूण बरी असते.. अगदी नावाजावी अशी नाही. अग्रज वगैरे पण बर्‍या आहेत अगदी आऊटस्टॅंडींग नाही. ऑफिसच्या वेळांमूळे तयार कणिकच बरी पडते.

अवल | 31 January, 2011 - 22:45
दक्षिणा पुण्यात अग्रजची सगळी पीठ अतिशय उत्तम असतात. मी गेली १०-१२ वर्षे वापरते. खुपच छान आहेत, नक्की ट्राय कर . फक्त सगळी कडे मिळत नाहीत. टिळकरोडला त्यांचे प्रमुख दुकान आहे. आमच्या इथे देवेशच्या दुकानाजवलही आहे, डहाणुकर कॉलनीतही आहे... नक्की बघ वापरून

निकिता | 1 February, 2011 - 00:15
मुबंई पुण्यात राहणारे गहु दळुन का नाही आणत. सोप्प पडेल ना?
पार्ल्याच्या ह्या मिलचं नाव मी पण ऐकलं आहे.

अवल | 1 February, 2011 - 00:54
निकिता, अगंखात्रीने दरवेळेस चांगला गहू मिळतोच असं नाही. अन आता वर्षाचा गहू साठवणं अन सगळी जिकझिक आता नको वातते 
शिवाय थोडाफार हिशोब बदलतो , पण त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, कष्ट अन होणारा संभाव्य त्रास पाहता, नव्या सोई स्विकारायला हरकत नाही वातत मला !

दक्षिणा | 1 February, 2011 - 01:02
अवल नक्की पहाते वापरून 
निकिता.. अगं दळायला जमेल एक वेळ पण त्यासाठी गहू पण आणावे लागतात, ते चांगले वाईट तपासावे लागतात, निवडावे लागतात, त्यासाठी वेळ मिळत नाही.

निकिता | 1 February, 2011 - 01:04

मी गहु आणते, चांगले बघुन (star bazzar) मधुन. निवडावे नाही लागत. मग द्ळुन आणते. पण महिन्याचे. वर्षाचे नाही.

मंजूडी | 1 February, 2011 - 01:12
निकिता, तुमचा गिरणीवाला त्यात ज्वारी/बाजरी/भाजणी/बेसन इत्यादी पिठे मिसळत नाही??? तू भाग्यवान आहेस

निकिता | 1 February, 2011 - 01:16
नाही मिसळत. प्रत्येक धान्याची वेळ ठरलेली असते. ज्वारी बाजरी रात्री. गहु सकाळी आणी दुपारी. भाजणी वगैरे असेल तर मीच तांदुळ पण देते आणि तांदळावर दळायला सांगते.

दक्षिणा | 1 February, 2011 - 02:15
निकिता, तु स्वत: उभं राहून दळण करून घेतेस का? कारण बरेच गिरणीवाले पीठं मारतात त्याचा ही प्रॉब्लेम नाही पण कशावरही काहीही दळतात.. एकदा ज्वारी अशी चिकट झाली होती आमची की बास. त्यापेक्षा विकत पीठ आणलं की वेळ पडली तर त्या माणसाच्या डोक्यावर नेऊन हाणता येतं

निकिता | 1 February, 2011 - 02:22
गहु उभी राहुन करुन घेते. बाकीचं नाही. अजुन इतका प्रॉब्लेम आला नाही कधी. मला नाही जमंत विकतच पीठ. आत्ता दिनेशदांच पोस्ट वाचुन बिलकुल्च नाही जमणार

भान | 1 February, 2011 - 02:30
घरातच चक्कि घ्यायची

चिंगी | 12 October, 2010 - 05:15
साध्या चपात्या बनवुन डीप फ्रीज मध्ये ठेवल्या व सकाळी भाजुन घेतल्या तर चालतील का?
अजुन दुसरा काही उपाय असेल तर सांगा प्लीज.
सकाळी लवकर ऑफिसला जायच्या गडबडीत पोळी-भाजी डब्यात नाही नेता येत.

दिनेशदा | 12 October, 2010 - 05:20
मी पराठे करुन पूर्ण भाजून ठेवायचे. (साधे घडीचे) ते फ्रिजमधे ठेवायची गरज नसते. बाहेरही खराब होत नाहीत. वाटलेच तर सकाळी परत हलके गरम करुन घ्यायचे. भाज्या आदल्या रात्री करता येतात. सकाळी परत चांगल्या गरम करायच्या.
शिवाय झटपट करता येण्यासारखे अनेक प्रकार इथे आहेत.

मंजूडी | 12 October, 2010 - 06:33
फुलके रात्री करायचे, सुट्टे सुट्टे ठेवून पूर्ण गार करायचे, तेल तूप न लावता प्रत्येक फुलक्याच्या मध्ये एकेक paper napkin ठेवून ती पूर्ण चळत अॅल्युमिनीअम फॉईलमध्ये गुंडाळून डीपफ्रीजमध्ये ठेवायची. सकाळी मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेता येईल किंवा ऑफिसात मायक्रोवेव्ह असल्यास तिथेच गरम करून घेता येईल.

पीहू | 12 October, 2010 - 09:23
मंजुडी हे फुलके किती दिवस टिकतात
आणि दिनेशदा पराठे कसे करायचे, जाड केले तर तुट्तात किंवा कच्चे लागतात.

सुलेखा | 12 October, 2010 - 12:00
पराठे-कणीक चवीपुरते मीठ,थोडेसे मोहन घालुन भिजवुन घ्यावी..आतुन पुसटसे तेलाचे बोट फिरवुन दोन घड्या करुन त्रिकोणी पराठा लाटुन तव्यावर दोन्ही कडुन तेल्/तुप न सोडता भाजुन घ्यावा..असे थंड केलेल्या दोन पराठ्यांमधे पेपर ठेवावे...असे ४ किंवा ६ पराठे एकावर एक चळत ठेवुन त्याचा रोल बनवुन तो अल्यु .फोइल मधे गुंडाळुन फ्रीझर मधे ठेवावा,लागेल तसा रोल काढुन पराठा गरम तवा/मायक्रो,/ओव्हन मधे गरम करावा..असेच मेथी-पराठे हि करता येतात..३ आठवडे छान रहातात..[अजुन एक--भाजुन ठेवल्रेल्या पराठ्यावार गरम असताना एकदा च तुपात बुड्वलेला चमचा पराठ्याच्या दोन्ही साईड नी फिरवावा..गरम केल्यावर ताज्यासारखा लागतो..]अशीच पुरणपोळी,आलु-पराठा न तळता प्रत्येकी २ पॅक करुन ठेवावे..

मेधा | 12 October, 2010 - 12:43
साधे फुलके गार करून एका वेळी लागतील इतके फुलके छोट्या झिपलॉक मधे घालून फ्रीझर मधे ठेवावे. रोज एक बॅग डब्यात न्यावी जेवणाच्या वेळे पर्यंत मस्त थॉ होतात. किचन पेपर टावेल वर दोन थेंब पाणी शिंपडून त्यावर फुलके ठेवून २०-२५ सेकंद माय्क्रोवेव्ह करावे, मस्त गरम फुलके तयार .
अमेरिकेतल्या फ्रीझरमदे ६ महिनेपर्यंत चांगले रहातात .
दोन तीन दिवस तर फ्रीज मधे सुद्धा चांगले रहातील - एकाच डब्यात २०-२५ फुलके ठेवण्यापेक्षा एका दिवसाला लागतील एवढेच एका डब्यात ठेवावेत.

मिनी | 12 October, 2010 - 12:47
दोन तीन दिवस तर फ्रीज मधे सुद्धा चांगले रहातील >> हो मी एका वेळेला लागतील तेव्हडे फुलके अ‍ॅल्युमिनिअम फॉईल मध्ये गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवायचे. ३-४ दिवस सहज चांगले राहतात. खातांना १५-२० सेकंद गरम करुन घ्यायचे.

अदिती | 26 August, 2010 - 04:37
मी ४ दिवसाच्या ट्रिपसाठी तिखटमिठाच्या पुर्‍या करुन नेल्या होत्या. चौथ्या दिवशीच त्या खराब झाल्या. केल्यावर गार करुन फॉईलमध्ये गुंडाळल्या होत्या. इकडे हवाही फार गरम नाहीये.
टिकाऊ पुर्‍यांसाठी युक्ती सुचवा.

दिनेशदा | 26 August, 2010 - 06:37
आदिती, खराब झाल्या म्हणजे काय झाले ? बुरशी आली का ?
एकतर त्या पुर्‍यांचे पिठ घट्ट भिजवावे लागते. शिवाय लाटल्यावर थोड्या वार्‍यावर पसरुन वाळवून मग तळायच्या असतात. बुरशी आली असेल, तर कुठेतरी पाणी लागले वा राहिले असे असेल.
पुर्‍या फॉईलमधे गुंडाळण्यापेक्षा एखाद्या हवाबंद डब्यात ठेवायला हव्या होत्या.
खवट झाल्या का ? तेल खराब वा एकदा वापरलेले असेल तर असे होईल.
आंबल्या का ? शक्यता कमी आहे, कमी तळल्या गेल्या असतील.
या पुर्‍या तळल्यावर डब्यात भरण्यापुर्वी त्या पुरत्या खुसखुशीत झाल्या आहेत का ते बघावे. मऊ वा तेलकट असू नयेत. तसेच वरुन थोडे मीठ भुरभुरावे.

prady | 30 August, 2010 - 07:40
कुणी फ्रोजन पोळ्या ट्राय केल्या आहेत का? (रोटी , पराठा , नान नाही. पोळ्याच) असतील तर एखादा चांगला ब्रँड सुचवू शकाल का? जवळच्या देसी ग्रोसरीतल्या फ्रेश पोळीच्या नावाखाली मिळणार्या पोळ्या नाही आवडल्या कुठल्याच. येता आठवडा बिझी आहे खूप. साग्रसंगीत सगळा स्वयपाक करणं कठीण आहे.

मेधा | 30 August, 2010 - 09:36
प्रॅडी
फ्रोझन नाही केल्या कधी , पण जवळच्या देसी ग्रोसरी मधल्या ताज्या पोळ्या वेगवेगळ्या झिपलॉक मधे फ्रीज मधे ठेवल्या तर आठवडाभर चांगल्या रहातात . कॉस्ट्कोमधे पण रोटी मिळायच्या त्याही चांगल्या होत्या. पण त्या कच्च्या असायच्या अन तव्यावर भाजून घ्यायला लागायच्या. २-३ महिन्यांपूर्वीपर्यंत आणल्या आहेत त्या. ( आता आई इथे आहे ना )

सिंडरेला | 30 August, 2010 - 09:40
देसी दुकानात फ्रोझन पोळ्या अजिबात चांगल्या मिळत नाहीत. पराठे चांगले असतात. पण कॅलरीज लै. काहीच नाही जमले तर होल फूडमधला व्हीट टॉर्टिया चांगला लागतो. पोळीसारखा एक-एक बाजू भाजून घेतली तर छान टम्म फुलतो. तूप लावून खायचा. मात्र डब्यात नाही नेऊ शकत. वात्तड होतो.

मिनी | 30 August, 2010 - 09:43
मी ट्राय केल्या होत्या फ्रोजन पोळ्या. टुक्कार लागतात एकदम. त्यापेक्षा देसी दुकानातल्या ताज्या पोळ्या पुष्कळ बर्‍या लागतात. मी कवा/ दीप ट्राय केल्या होत्या. कवा बर्‍या त्यातल्या त्यात. पिल्सबरीच्या मावेमध्ये होणार्‍या पण मिळतात असं ऐकुन आहे, मला नाही दिसल्या कधी पटेलमध्ये.

सीमा | 30 August, 2010 - 09:44
रोटी लँड कॉस्टको.
दीप चे गव्हाचे पराठे , मेथी पराठे, मसाला पराठे.
(ताज्या चपात्याशी कंपेअर न करता हे ब्रँड मला बरे वाटले.)

prady | 30 August, 2010 - 13:10
रोटी लँड आवडल्या होत्या पण अपॅरेंटली अटलांटाच्या कॉस्टको मधे मिळत नाही. ( कॅलिफोर्नियाच्या कॉस्टको मधे भारावून गेले होते अगदी नानकची रसमलाई , हल्दीराम स्नॅक्स, रोटीलँडच्या रोटीचं सँपलिंग वगैरे बघून.) एकूण फ्रोजन पोळ्यांचा ऑप्शन चांगला नाही असं दिसतंय. बघते मग देसी ग्रोसरीतून फ्रेश पोळ्याच आणीन. (आलीया भोगासी..) धन्यवाद सगळ्यांना.

सायलीमी | 30 August, 2010 - 10:29
प्रॅडी, देशी दुकानात पण रोटी लँड चा १२ चा पॅक मिळतो.

prady | 30 August, 2010 - 10:36
अगं नाही मिळत ईकडे तो ब्रँड.. विचारलं मधे बर्याच ठिकाणी. जे मिळतंय ते घेइन आता.

बस्के | 30 August, 2010 - 12:57
प्रॅडी, कवन च्या पोळ्या चांगल्या वाटल्या मला. पिल्सबरीच्या मायक्रोवेवेबल पोळ्या छान मऊसुत वगैरे असतात पण आकार लहान असतो. फुलकेच पण तेही पातळ.. त्यामुळे फार खावे लागतात...
बाकी रोटीलँडच्या पोळ्या त्यातल्या त्यात जास्त आवडल्या मलाही.. सद्ध्या तोच सहारा आहे मला.. (पूर्वी कॉस्कोमध्ये मिळायच्या या, परंतू आता आम्ही इंडीयन स्टोअर मधूनच आणतो..)
बाकी दीपबिप काही आणू नकोस.. आम्ही एकदा असंच ट्राय करायला प्रत्येक ब्रँडची पोळ्यांची पाकीटं आणलेली त्यातून काढलेला हा निष्कर्श आहे..

prady | 30 August, 2010 - 13:10
धन्यवाद भाग्यश्री

सावनी | 30 August, 2010 - 13:25
पिल्सबरी च्या मावे मध्ये करण्याच्या आहेत चांगल्या.मऊसूत असतात. अजून एक कॅनेडिअन ब्रँडच्या मिळतात आमच्या इथे. त्या छान आहेत. आकाराने पण मोठ्या आणि मावेमध्ये गरम करता येतात. घरी गेले की नाव सांगते.

अदिती | 31 August, 2010 - 04:40
धन्यवाद दिनेश.
आंबल्या होत्या पुर्‍या. तुम्ही म्हणता तसे करुन बघेन पुढच्या वेळी.

रमा | 27 July, 2010 - 13:55

मी पण हल्लि कणकेत सोयाबिन पीठ मिसळते (एका वाटिला एक चमचा ह्या प्रमाणात), पण पोळ्या फार कडक होतात. सोयाबीनःकणकेच नक्कि प्रमाण कोणि सांगु शकेल का?

मिनोती | 27 July, 2010 - 14:08

रमा, अग सोयाबीनच्या पिठापेक्षा टोफु घालून पहा. सिल्कन सॉफ्ट टोफु १/४ स्लॅब साधाराण १५ एक चपात्यांसाठी या प्रमाणात वापरून पहा.

sneha1 | 27 July, 2010 - 14:31

चार वाट्या कणिक, अर्धी वाटी सोयाबीन. हे प्रमाण मालती कारवारकरांच्या पुस्तकात आहे.

रमा, अग सोयाबीनच्या पिठापेक्षा टोफु घालून पहा. सिल्कन सॉफ्ट टोफु १/४ स्लॅब साधाराण १५ एक चपात्यांसाठी या प्रमाणात वापरून पहा>>>> टोफु पीठ मळताना घालायचा का, किसुन घालावा लागेल ना?

आपण घडीच्या पोळ्या करतो ना त्याला किती पापुद्रे सुटतात? माझ्या नॉरमल पोळ्या काठा पासुन पोटा पर्यंत फुगतात फुलक्याप्रमाने आणि मी त्रिकोणी घडी घालुन केली तरी पण ती तशीच फुगते,म्ह्णजे दोनच पापुद्रे. माझं काय चुकतं?

टोफू ब्लेंडरने प्युरी करून घ्यायचा. आणि त्यात कणीक भिजवायची लागेल तसे पाणी घालायचे.

घडीच्या पोळीला टेक्नीकली ४ पदर सुटायला हवेत. लहान पोळी लाटली की तिला थोडेसे तेल लावायचे, थोडे पीठ भुरभुरायचे, अर्धी करायची तसेच तेल-पीठ लावून त्रिकोण करायचा. खुप दाब न देता लाटायची!!

हल्ली Multi Grain आटा मिळतो भारतीय वाणसामानाच्या दुकानात.. (सोया, ओट, मका, गहू) असतो म्हणे त्यात. एक पिशवी आणून फुलके करून बघितले (बायकोने).. मस्त होतात .. (म्हणजे काही Problem नाही आला).

पोळ्यांसंबंधी प्रश्ण/तक्रार आहे - तुम्हा experts कडून मार्गदर्शन हवे आहे.
९-६ नोकरी करून संध्याकाळी जर ताज्या पोळ्या करायच्या असतील तर कसे planning करावे?
मला जास्तीत जास्त १ तास मिळतो स्वयंपाकासाठी. भाज्यांसाठी - चिरलेल्या भाज्या, तयार वाटण, प्रेशर कुकरचा वापर इ. इ. टिप्स आहेत. पण पोळ्यांसाठी काय करता येइल? पोळ्यांमागुन स्वच्छता हा एक मोठा overhead असतो. त्याबद्द्ल पण मदत करा.
जेवण शिजवून, जेऊन, नंतरचे आवरून, किचन स्वच्छ करणे, डिशवॉशर चालु करणे यासाठी ८:३० हा हार्ड स्टॉप आहे. Happy आता रोटी लँडच्या पटकन भाजुन घेतो म्हणुन हे सगळ रुटीन मस्त बसलय. पण त्या पोळ्यांमधे बरच फॅट आहे. (अनुभवाचे बोल आहेत :)) काही मैत्रिणी खूप फास्ट काम करतात. मला नाही जमत ते. पण प्रयत्न करायला पाहीजे. Sad
अवघड आहे!>>>> चांगल्या मऊसुत पोळ्या करणं अवघड आहे खरं>>> १००००% खर.

धनश्री, रोज कणीक भिजवणं नको असेल, शक्य नसेल तर दोन दिवसांची कणीक एकत्र भिजवणं शक्य आहे. बरं, भिजवून फ्रिजरला टाकायची गरज नाही. नॉर्मल फ्रिजमध्ये दोन दिवस चांगली रहाते.
हाताशी कणीक असेल तर पोळ्या पटकन होतील आणि ताज्या पोळ्या खायला मिळतील.

हल्ली Multi Grain आटा मिळतो भारतीय वाणसामानाच्या दुकानात.. (सोया, ओट, नाचणी, गहू) असतो म्हणे त्यात. एक पिशवी आणून फुलके करून बघितले (बायकोने).. मस्त होतात .. (म्हणजे काही Problem नाही आला).>>>>>>
देसाई सुजाता ब्रँड का?
मी पण हेच विचारायला आले होते
मी सुजाता ब्रँड्ची Multi Grain कणीक पाहिली. सोया,कॉर्न,ओट गहू मिक्स आहे. कोणी ट्राय केले आहे का?

बरोबर सुजाता... त्याबद्दलच लिहिलं... Happy

बाकी ब्रँडच्या बाबतीत माझं म्हणणं तुम्हाला माहीतच आहे (५%)

मी पण पाहिला परवा इंडियन ग्रोसरी मधे सुजाताचा मल्टी ग्रेन आटा. पण पहिल्यांदाच पाहिल्याने घ्यायचा
धीर झाला नाही. आता अगदी confidently पुढ्च्या वेळेस घेईन.

मायक्रोवेव्ह मध्ये बनण्यार्‍या पोळ्या मिळत नाहीत का? मी गुगल केले होते...पण काही मिळाले नव्हते.. कोणी प्रयत्न केला आहे का मायक्रोवेव्ह मध्ये...कमीत कमी अर्धी भाजून मग २-३ दिवसांनी मायक्रोवेव्ह मध्ये?

आनंद,
कुठल्याही देशी स्टोअर च्या फ्रोजन सेक्श्न ( अ‍ॅक्चुली डिप फ्रिझर सेक्शन नाही, दूध दही असते त्या नॉर्मल फ्रिज सेक्शन मधे) पिल्स्बरी च्या कच्च्या लाटलेल्या पोळ्या (फुलके) मिळतात, छोटं पाकिट असतं, साधारण ७" X ७" साइझ चं , रिझनेबल रेट्स आहेत.
तवा तापवून दोन्ही साइड ने भाजायचे फक्त, चांगले होतात.

ok..
मी ते वापरले आहेत्...पण मला मायक्रोवेव्ह मध्ये होणार्‍या पोळ्या कुठेही दिसल्या नाहीत.. म्हणून विचारले...कोणी घरी प्रयोग केला आहे का? मी केला तेव्हा पोळ्या पुर्ण पणे ओल्या झाल्या... बहूतेक वाफ जायला जागा मिळाली नसेल...

आनंद, पिल्सबरीच्याच मावे मधे करता येण्यासारखे फुलके/पोळ्या मिळतात. त्यावर स्पेसिफिकली लिहिलं असतं. तसचं एक क्रिस्पी रोटी म्हणून कनेडिअयन ब्रँड आहे. त्यांच्या पण मावे मधे करता येतात.

मागच्या वेळी मी ही शंका विचारली तेव्हा मला मिळालेल्या उत्तराचा फायदा झाला. मी आता एका छोट्या इंडिअन दुकानातून आठवड्याच्या पोळ्या घेऊन येते. अॅल्युमिनियम फॉइलात गुंडाळून एअरटािट डब्यात ठेवते. त्या चांगल्या राहतात. लागतील तशा मायक्रोवेव्ह केल्या की मऊ होतात. एकदम सुटलाच माझा पोळ्यांचा प्रश्न. Happy

धन्स सायो. २-३ दिवसांचि कणीक भिजवून बघते. कदाचित जमेल पण प्रामाणिकपणे सांगायच झाल तर मला इतर उद्योग सांभाळत रोजच्या पोळ्या जरा महान काम वाटतय. कामाचा उरक वाढवला पाहिजे. Happy

Pages