शाळेची निवड

Submitted by माधव on 6 July, 2011 - 06:05

आज आपल्या भोवती अनुदानीत / विनाअनुदानीत, मराठी / इंग्रजी माध्यम, SSC / ICSC / CBSC असे वेगवेगळे बोर्ड अशा अनेक पर्याय असलेल्या शाळा उपलब्ध आहेत. आपल्या पाल्याला नक्की कुठल्या शाळेत घालावे याचा गोंधळ उडतो. या विविध पर्यांयांचे फायदे / तोटे आणि त्याच्या अनुषंगाने इतर बाबींची चर्चा करण्यासाठी हा बाफ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना मी काही वर्षे इंदूरला होतो, तिथल्या माझ्या कार्यालयीन सहकार्‍यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण हिंदीतून घेतले होते.
मराठीतून पदवीपर्यंतचे शिक्षण घ्यायची सोयही असावी बहुधा.
सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा आणि मुलाखत भारतीय भाषेतून द्यायची सोय आहे.
http://www.upsc.gov.in/general/civil.htm
Candidates who have opted for an Indian Language as language medium for the Main Examination have an option of being interviewed either in English or in the same language which they have opted for the Main Examination

मराठीतून पदवीपर्यंतचे शिक्षण घ्यायची सोयही असावी बहुधा <<< माझ्या माहितीनुसार विज्ञान शाखांकरता (बीएस्सी, फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी इ.) नाही.

मराठीतून पदवीपर्यंतचे शिक्षण घ्यायची सोयही असावी बहुधा. >> आहेच महाराष्ट्रात सुध्दा.. पदवीच काय पण पदव्यूत्तर शिक्षण ही मराठीत उपलब्ध आहे. Happy वाणिज्य आणि कला.
मला वाटलच ग तुला मायदेश म्हंजे महा. म्हणायचे असेल म्हणून. Happy

सहकार्‍यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण हिंदीतून घेतले होते.>> माझ्यामते उ.प्र., बिहार या राज्यात पण अशी सोय आहे. तिथे पदवी परिक्षेमधले टक्के बघितले की भोवळच येते.

विज्ञानासंबंधी पदव्या किंवा अभियांत्रिकी कुठल्या विद्यापीठातून मराठीत शिकता येते अनघा?
मला माहित नाही. खरेच विचारते आहे.
बीकॉम मराठीत करता येते? सर्व विषय?

धन्यवाद भरत. हे तुम्ही दिलेल्या दुव्यावर मिळाले.
Candidates have the option to answer all the question papers, except the language papers, viz, Paper-I and Paper-II, in any one of the languages included in the Eighth Schedule to the Constitution or in English

धन्यवाद मंजूडी.

बीकॉम मराठीत करता येते? >>> रैना, हो. माझ्या माहितीप्रमाणे पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठात इथे तरी हा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय CA आणि CS चे अभ्यासक्रम हिंदीतून शिकण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

माझं एम ए - नाट्य मराठी माध्यमातूनच झालेलं आहे. ललित कला केंद्रातील सर्व स्ट्रीम्सच्या (नाटक, संगीत व नृत्य) बॅचलर आणि मास्टर्स डिग्र्या मराठी माध्यमातीलच आहेत.
मुंबई विद्यापिठाचे एम ए नाटक हे हिंदी माध्यमाचे आहे. औरंगाबादमधील विद्यापिठातही बहुतेक आमच्या विभागात हिंदी माध्यमच आहे. तेच वर्धा आणि नागपूरमधील नाट्यविभागांसाठी.
दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयात हिंदी माध्यमच आहे बहुतकरून. गोव्याच्या कला अकादमीमधेही आत्तात्तापर्यंत तसेच होते. आता ते शिक्षण गोवा विद्यापिठाला जोडले जाणार असल्याने कोकणी माध्यम असणार आहे.
सांगण्याचा उद्देश इतकाच की मराठी माध्यमातून १० वी नंतर शिक्षण नाही हे खरे नाही.

सांगण्याचा उद्देश इतकाच की मराठी माध्यमातून १० वी नंतर शिक्षण नाही हे खरे नाही.>> ओके. धन्यवाद नी.
म्हणजे अनघा म्हणाली तेच बरोबर असावे की कला आणि वाणिज्य शाखेत मराठीतून शिक्षण उपलब्ध आहे.
पण गजानन म्हणतो तसे विज्ञान शाखांकरता नाही. <माझ्या माहितीनुसार विज्ञान शाखांकरता (बीएस्सी, फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी इ.) नाही.>
व्यवस्थापन ?
मानसशास्त्र? (कला शाखेत येते त्यामुळे असायला हवे)
विधी (लॉ) ?
पत्रकारिता/ मिडीया स्टीज ?

दुसरे,
प्रमाण आणि आकडेवारी.
आज कार्यरत असलेल्या कला आणि वाणिज्य शाखांमधील पदवीधारकांपैकी किती जणांनी मराठीत पदवी घेतली आहे आणि किती जण आज महाराष्ट्रातील कार्यालयीन कामकाजासाठी ही भाषा रोज वापरतात?

पुर्वी पोस्टल पे ऑर्डर्सचे फॉर्म्स मराठीत लिहून घेतलेले आठवतायत.

कदाचित सेंट्रल गव्हर्नमेंट असल्याने मराठी चालत असेल पण अपरिहार्य नसेल.

माझे पदवीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातुन झाले. (बी.ए. राज्यशास्त्र) मग लॉ ला इंग्रजी माध्यम होते. लॉ मराठी मधुन पण आहे.. पण मला नही वाटले की मला जमेल. कारण खुप तांत्रिक मराठी वापरणे आणि लक्षात ठेवणे, अवघड वाटले.

माझ्या मुलासाठी पण हाच प्रश्न आहे. आम्हाला चर्च वाल्या शाळा नकोत, आणि मराठी शाळांची स्थिती केविलवाणी. आम्हाला मनापासुन मराठी माध्यम हवे आहे....
मी १-२ बी.बी. वर हा प्रश्न विचारलेला पण होता...

वाणिज्य शाखेत अकाउंटसी प्रमुख विषय असेल तर त्यात भाषेचा वापर नगण्य असतो. असेच इंजिनीरिंगच्या बाबत असेल (का?).
तसेही पदवीसाठी घेतलेल्या वाणिज्य शाखेतल्या शिक्षणाचा पुढे नोकरी/व्यवसायात फार काही उपयोग होतो असे वाटत नाही. बी एस्सी झालेले पण आर्थिक क्षेत्रांत नोकर्‍या करतात आणि त्यांचे काही अडत नाही.

वाणिज्य शाखेत अकाउंटसी प्रमुख विषय असेल तर त्यात भाषेचा वापर नगण्य असतो. असेच इंजिनीरिंगच्या बाबत असेल (का?).

इथे अद्यापन / आद्ययनाची भाषा अपेक्षीत असेल तर नगण्य म्हणता येणार नाही. वाणिज्य असो की अभियांत्रिकी.

अकाउंटन्सी Happy
त्यात भाषेचा वापर नगण्य असतो म्हणजे काय?

वाणिज्य शाखेच्या शिक्षणाचा पुढे नोकरी/ व्यवसायात फार काही उपयोग होतो असे नाही>>
भरत मयेकर, तुमचं हे आणि यापुढचं विधान फारच धाडसी आहे.
इथे फक्त शिक्षणासाठी कोणतं माध्यम निवडावं एवढीच चर्चा चालू आहे. कुठल्या शिक्षणाचा कुठे कसा उपयोग होतो हा या बाफचा विषय नाही.

आपल्या अपत्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घातले तरच आपले मराठी भाषेवरचे प्रेम सिद्ध होते का?

मंजु, तू लिहिलेले हे मागच्या पानावर गेले तरी त्यावर लिहिते कारण शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्न हा भाषाप्रेमापेक्षा मोठा आहे. तिथे इमोशनल होऊन निर्णय घेऊन चालत नाही तर मुलाला काय योग्य आहे ते जाणुन घेऊन ठरवावे लागते. मला मराठीबद्दल प्रेम आहे म्हणुन मी मुलीला मराठीत टाकले नाही तर तिची मातृभाषा मराठी म्हणुन टाकले. आणि हा निर्णय घेताना मराठीबद्दल प्रेम असल्याने निर्णय सोपा झाला. जर वर लिहिलेल्या काहींप्रमाणे माझे विंचवासारखे बि-हाड असते/एक पालक अमराठी असल्याने घरात मराठी वातावरण नसते/मी परदेशात असल्याने मुलीला जन्मत:च इंग्रजीतुन बोलायची सवय असती तर मला मराठीबद्दल कितीही प्रेम असले तरी तिला मराठी माध्यमाच्या शाळेत घालता आले नसते.

पण त्याचवेळी वर लिहिल्याप्रमाणे परिस्थिती नसताना, मला मात्र व्यक्तीशः मराठीपेक्षा इंग्रजी जवळची वाटत असती/मराठीपेक्षा इंग्रजीवर जास्त प्रेम असते तरीही मी तिला मराठीतच टाकले असते कारण मुलाचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच झाले पाहिजे यावर माझा तरी ठाम विश्वास आहे.

माझ्या मुलीने नर्सरी ते पहिली इंग्रजीत केले कारण चांगली मराठी शाळा घराच्या आजुबाजुला नव्हती. पण चांगली शाळा मिळतात ती दुसरीपासुन मराठीत जायला लागली. हे मुद्दाम लिहिण्याचे कारण हे आहे की हा बदल करताना नी केल्यावर मला प्रचंड हेटाळणीला सामोरे जावे लागले. ही हेटाळणी शाळेतुन झाली, घरातुन झाली नी बाहेर समाजातुनही झाली.

तिला मराठीला टाकले म्हणजे इंग्रजीत जमत नसणार हे सगळ्यांनी गृहित धरले. कित्येकानी 'मुलीला इंग्रजी जमत नाही तर डबल शिकवणी लाव, जमेल आपोआप. तरीही जमत नसेल तर डॉक्टरला दाखव पण मराठीत घालुन सुरवातीलाच तिला 'weak start' देऊ नकोस' असेही सांगितले. मुलगी मराठीला जातेय म्हणजे तिच्यात काहीतरी कमी आहे हे गृहित धरुनच पुढचे संवाद व्हायचे. सांगणा-याचे काहीच चुकायचे नाही कारण तो काळजीनेच सांगत असायचा.

मी तर नंतर लोकांना तिचे माध्यम सांगायचे टाळायचे कारण माध्यमाबद्दल बोलले नाही तर लोक ते इंग्रजीच असणार हे गृहित धरतात. पण लेक मात्र कोणी कितवीत जाते विचारले की 'अमुक इयत्ता, मराठी मिडियम' हे सांगायची. मग परत ते सगळे प्रश्न नी माझी तीच ती उत्तरे. पुढे सैनिक शाळेत गेल्यावरही तेच. 'तिथे इंग्रजी मिडियमच आहे ना?' हा पहिला प्रश्न. आणि मग सगळे कळल्यावर ऐकणा-याच्या तोंडावरचे 'एकेकजण काय वेडपट असतात' हे भाव स्पष्ट वाचता यायचे. जाम वैतागलेय मी तिच्या शिक्षणाच्या बाबतीत.

आणि पुढेही वैताग चालुच असणार आहे कारण ८८% मार्क असुनही तिने कलाशाखेला जाऊन पुढे भारतीय किंवा परदेशी भाषेमध्ये मेजर करायचा निर्णय घेतलाय. आणि वर परत नव्या मुंबईत राहुन रुपारेलला प्रवेश मिळावा ही अपेक्षा ठेवलीय. पण हा या बीबीचा विषय नाहीय.

मराठी मिडीयम म्हणजे खालचा दर्जा हे निदान मुंबईत तरी सगळ्यांनी मान्य केलेले समीकरण आहे. मुलाला अजिबात बुद्धी नसेल तर मराठीत घाला, जराजरी बुद्धी असेल तरी इंग्रजीला घाला, बुद्धी आपोआप वाढेल. हे सगळे मी मुद्दाम कोणाला टार्गेट वगैरे करुन लिहित नाहीय तर मुलीला दुसरीत घातल्यापासुन आलेल्या एकुण अनुभवांचे सार आहे. लोकांनी स्वतःचे असे समज का करुन घेतलेत ते मला तरी माहित नाही. पण हे एक प्रकारचे व्हिशीयस सर्कल आहे, मुळात आपण आपल्या मुलांना मराठीत घालायचे नाही, मग ज्यांना बौद्धिक कुवतीमुळे किंवा इतर कशामुळे कुठेच प्रवेश मिळत नाही ती मुले तिथे येतात, मग आपण 'क्राऊड चांगला नाहीय म्हणुन इंग्रजीत घातले' म्हणायचे. (बालमोहनमध्ये मराठीतुन शिकलेल्या माझ्या एका मैत्रिणीने आपल्या मुलांना त्याच शाळेच्या इंग्रजी माध्यमात घालायचे हे कारण मला सांगितलेले Happy )

मुंबईबाहेरचे मला माहित नाही. इतर प्रांतात तिथल्या भाषेच्या शाळांची काय अवस्था आहे तेही माहित नाही. वर अनघा-मिरा ची कमेंट वाचुन असे वाटते की बहुतेक काही ठिकाणी मातृभाषेतले प्राथमिक/माध्यमिक शिक्षण अनिवार्य असावे.

परत मुळ विषयाकडे - मातृभाषेत शिक्षणाचे फायदे जे मला दिसले -

मुलगी दुसरीला जाऊ लागल्यावर काही दिवसांनी तिला विचारल्यावर तिने 'मला आता टिचर वर्गात जे बोलते ते सगळे कळते, आधी फक्त ५०% कळायचे' हे सांगितले. काही दिवसांनी ती टिचरने शिकवायच्या आधीच मराठी पुस्तकातल्या गोष्टी नी कविता वाचायला लागली. कारण 'अगं मला वाचल्यावर कळते ना काय लिहिलेय ते, आधी टिचर सांगेपर्यंत अजिबात कळायचे नाही.' यातुनच पुढे वाचनाची गोडी लागली. आज तिने इंग्रजीही वाचावे म्हणुन मी मुद्दाम प्रयत्न करतेय, मराठीसाठी तसे अजिबात करावे लागले नाही. आज गप्पा मारताना अगदी सहजपणे कुठलीतरी कविता आठवते, कोण्या लेखकाची वाक्ये आठवतात, मस्त चर्चा होते. मला मराठीबद्दल प्रेम असल्याने मला तरी खुप बरे वाटते.

एकुण माझ्या अनुभवावरुनही ज्यांना शक्य आहे, नी चांगली शाळा उपलब्ध आहे त्यांनी तरी मराठीचा विचार जरुन करावा. मुले मातृभाषेत जास्त सहजपणे शिकतात हे जगभरच्या शिक्षणतज्ज्ञानी मान्य केलेय. शक्य असेल तर मुलाला हा आनंद जरुर द्या.

आणि गजानन, १० वर्षांपुर्वीची नी आताची परिस्थिती यात खरेच खुप फरक आहे. बाकीचे फरक सोडुन फक्त माध्यमाचा विचार केला तर तेव्हा मराठी हे एक माध्यम म्हणुन निदान त्यावर फुली मारण्यापुरता तरी लोक त्याचा विचार करायचे. आज मराठी हे एक माध्यम उपलब्ध आहे यावरच लोकांनी फुली मारलीय. माझ्या सगळ्यात धाकट्या भावाचा मुलगा या जुनपासुन नर्सरीला जायला लागला. त्याच्या पालकांनी मराठी माध्यम हा शब्दही घरात उच्चारला नाही. शाळेत घालायचे म्हणजे इंग्रजीत हे त्यानी गृहितच धरलेले.

फार छान लिहिलय साधना, धन्यवाद. सध्या मुलांना मराठी माध्यमात घातलं आणि १०-१२ वर्षानंतर (कॉलेज/डीग्री वेळी) असं वाटलं की त्याचवेळी इंग्रजी माध्यमात घालायललाहवं होतं ही भावना बळावू शकेल अशी भिती वाटतीय. Sad

मराठी माध्यमातून जर शिक्षण झाले असेल आणि जर वाणिज्य/ विधी शाखेची निवड केली तर किमान इंग्रजी भाषेची आवड असणे गरजेचे आहे. ११वी मधे सगळेच विषय इंग्रजीतून असतात. त्यावेळी मला आपण इंग्रजी माध्यमातून शिकलो असतो तर बरे झाले असते असे वाटायचे. ११ वी चे पूर्ण वर्ष शब्दकोष घेउन अभ्यास करावा लागला होता. पण मला स्वतःला भाषा विषयांची आवड असल्याने जमून गेले. पदवी पर्यंत चे शिक्षण मराठी माध्यमातून घेण्यात मला तरी काहिच तथ्य वाटत नाही (जरी तसे पर्याय उपलब्ध असतील तरी). वर कोणीतरी म्हटले आहे की CA/CS हिंदी माध्यमातून सुद्धा करता येते. CS हिंदी माध्यमातून करून काही फायदा होइल असे अजिबातच वाटत नाही. शिक्षण घेता येईल पण ते झाल्यावर त्याचा उपयोग अर्थार्जनासाठी पण होणे अपेक्षीत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेउन ज्यावेळी ११वी मधे गेलो त्यावेळी थोडा न्यूनगंडसुद्धा होता म्हणजे असे वाटायचे की आपण जे बोलत आहोत ते इंग्रजी व्याकरणद्रुष्ट्या बरोबर असेल ना? कोणी हसणार तर नाही ना? ई. ई.

रच्याकने, BMCC, पुणे, मधे असताना ११ वी ला अरुणा साठ्ये ह्या उपप्राचार्या आम्हाला Organization of Commerce हा विषय शिकवायच्या. त्यांचे पहिले लेक्चर मला अजून आठवते. मराठीमाध्यमातून किती मुले आली आहेत त्यांना हात वर करायला सांगितले. मग म्हणाल्या हे वर्ष जरा अवघड जाईल पण १२ वी ला मेरीट मधे तुमच्यामधलीच मुले जास्त असतील ह्याची मला खात्री आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही, स्पेलिंग आले नाही तर मला त्याक्षणी अडवा आणि विचारा (जे मी तरी अगदी तंतोतंत पाळले Happy ). त्यावेळी खरेच धीर वाटला होता त्यांच्या शब्दांचा..

अनघा-मिरा ची कमेंट वाचुन असे वाटते की बहुतेक काही ठिकाणी मातृभाषेतले प्राथमिक/माध्यमिक शिक्षण अनिवार्य असावे. >>> अनिवार्य नाही ग, मराठीतून उपलब्ध आहे अस मी लिहीलय. Happy
बाकी, तुझी पोस्ट मस्त. Happy इकडे मराठी मिडियम शक्य नसल्याने मुलीला दुसरीपासून इंग्रजी मि. द्यावे लागले. तिची बालवाडी, पहिली महाराष्ट्रात - मराठीत झाली. Happy दहावीपर्यंत तिला मातृभाषेत शिकवायचा विचार होता. पण आता असे वाटते की इं.मि. आहे ते बरे. कारण तिने सायन्स घेतले आहे.
(अर्थात आता महा. मध्येही काही शाळेत सायन्स & गणित इं तून अन बाकी विषय मराठीतून आहे म्हणे. आमच्यावेळी सर्वच विषय मराठीत, मग सायन्सच्या मुलांना काही महिने कठीण जात असेल. )

साधना,
तुझी पोस्ट वाचुन बरं पण वाटत आहे आणि वाईट पण :-(.
बर ह्यासाठी की कुणाला तरी मात्रुभाषेतुन शिक्षण हे पटतयं. आणि वाइट ह्यासाठी की पर्याय उपलब्ध नाही Sad

लंपन, मराठीतुन आलेल्या सगळ्यांची हीच अवस्था असायची आधी, माझेही असेच झाले होते. कारण इंग्रजीचे एवढे एक्स्पोजर आधी नव्हते. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता ५ वर्षाच्या मुलालाही त्याच्या वयाला झेपेल इतपत म्हणजे come here, dont do it, take this ... वगैरे इंग्रजीतुन बोललेले कळते कारण टिवीवरुन सतत त्यांच्यावर हे शब्द आदळत असतात. ८वी नंतर सेमी इंग्रजीचा ऑप्शन घेतल्यास पुढे ११वीला सायन्सलाही अडचण नको यायला.

शिवाय इंग्रजीतुन शिक्षण घेणा-या मुलांच्या मराठीकडे आपण मुद्दाम लक्ष देतोच ना, मग तसेच मराठीतुन घेताना इंग्रजीकडे द्यायचे. इथे जे लोक महाराष्ट्रा/भारताबाहेर राहताहेत ते आपल्या मुलांना कामचलावु मराठी यावे यासाठी प्रयत्न करतातच ना. इथल्या उप्क्रमांमध्ये त्यांच्या मुलांनी मराठीतुन काही लिहिले की आपण कौतुक करतोच ना, तसेच इथल्या पालकांनी इंग्रजीसाठी प्रयत्न करावेत.

पण जर संधी उपलब्ध असेल तर निदान मुलांना प्राथमिक शिक्षण तरी मराठीतुन द्या. माझ्या घरी मी हे सांगुन थकले, पण कोणीही ऐकले नाही Sad आणि हे संधी असुन. पार्ले टिळकसारखी शाळा घराशेजारीच असुन Sad

माझ्या एका भावाचा मुलगा अभ्यासात जरा मागे आहे. सिनियर केजीला त्याला शाळेने गरज नसताना वर्ष रिपिट करवले. १लीला मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमे उपलब्ध असतानाही केवळ प्रवेश मिळतोय म्हणुन इंग्रजीला घातले. मराठीला घालणे कमीपणाचे वाटले. आज तो मुलगा अभ्यासात धडपड करुन प्रयत्न करतोय, सोबत आईलाही डोकेफोड करावी लागते. अभ्यास करणे ही त्याच्यासाठी अतिशय भयाण गोष्ट आहे. सुदैवाने पालकांनी त्याची अभ्यासातली गती स्विकारली आहे, त्याला जेवढे झेपते तेवढेच करायला देतात, उगाच फोर्स करत नाहीत. त्याला संगीतात खुप गती आहे, एकदा ऐकलेले गाणे तो २-४ प्रयत्नात पेटीवर वाजवु शकतो. त्याला ह्याच क्षेत्रात पुढे कायम ठेवायचे असे पालकांनी ठरवले आहे. तो मराठीत शिकला असता तर त्याचे बालपण जास्त आनंदी झाले असते असे मला नेहमी वाटते. त्याच्या पालकांनाही वाटते पण लोक काय म्हणतील या भितीमुळे व आता माध्यम बदलले तर त्याचा आत्मविश्वास जाईल ह्या भितीमुळे त्यांनी माध्यम इंग्रजीच ठेवायचा निर्णय घेतला.

साधना छान पोस्ट. (दोन्ही)
मुलांना मराठी यावे यासाठी आटापिटा - खरतर लहानपणीच पुस्तक दिली. आपणही मराठी पुस्तकं मुलांसमोर वाचली तर आटापिटा करायची गरजच रहाणार नाही. आपसुकच मुलांना मराठी लिहिता वाचता बोलता येण्याची इच्छा निर्माण होईल. "मराठी शिकणे फारसे महत्वाचे नाही" असे आपण जाणवु दिले तर मात्र ते नक्कीच शिकणार नाही. हि भाषा व्यवहारात वापरली जात नाही हे ही खरे नाही. रोजच्या बोलण्यात आपण वापरतोच. सगळ्यांसाठीच हि अर्थाजनाची भाषा नसेलही पण तरीहि ती भरपुर वापरली जाते. गुगल सांगतो की ९० मिलियन लोक मराठी बोलतात.
बाकी वर लिहिलेल्या विषयात आयुर्वेद, संगित यांचा उल्लेख झालाय का? मला वाटते कि हे हि मराठी मधुन शिकता येत असावे ( मराठी येत नसेल तर संस्कृत शी संबंधीत काही शिकता येते का हा मलाच पडलेला प्रश्न आहे)

अजुन एक मुद्दा केव्हापासुन लिहायचे म्हणतेय पण राहुन जातोय.
<<आमच्यावेळी सर्वच विषय मराठीत, मग सायन्सच्या मुलांना काही महिने कठीण जात असेल.>> याविषयी.
मी पुर्ण मराठी माध्यमात शिकले. आणि दहावी नंतर लगेच इंजि. डिप्लोमाला गेले. तिथे अजिबातच जड गेले नाही, खरतर फारसा बदलही जाणवला नाही.
याचे कारण - पाचवी पासुन जेव्हा शाळेत इंग्रजी हा विषय शिकवायला सुरुवात झाली तेव्हापासुनच आईने इंग्रजीची वेगळी शिकवणी लावली. हि शिकवणी नुसते पाठ्यपुस्तक शिकवण्यापेक्षा व्याकरण आणि इतर लिखाण यावर भर होता. माझे हे शिक्षक मराठी माध्यमाच्या बॉम्बे म्युनिसिपाल्टीच्या शाळेत दहावीला इंग्रजी शिकवणारे शिक्षक होते. अतिशय चांगले शिकवायचे. या शिकवणी साठी ते रविवारी सकाळीच लवकर घरी यायचे. पाच वर्षे म्हणजे मी दहावी होईपर्यंत हि शिकवणी चालू होती.

तेव्हा इंटरनेट नव्हते, लहान मुलांसाठी अवांतर इंग्रजी पुस्तके नव्हती, शिवाय इतर काही संवादासाठी नव्हते. आता हे सगळे आहेच. शिवाय आपल्यासारखे पालक सुद्धा मधे मधे सवय होण्यासाठी "५ मिनीटे इंग्रजी संवाद" सारखे गेम खेळु शकतो. इंग्रजी बातम्या बघु शकतो. त्यामुळे मराठी माध्यमात राहुनही इंग्रजीचा सराव आणि नविन शब्द माहित होऊ शकतात. हि जागरुकता ठेवली तर मराठी माध्यमातल्या मुलांनाही ११वीला नक्कीच जड जाणार नाही.

साधना तुम्ही म्हणत आहात तो मुद्दा मान्य आहे. हल्ली मुलांना टी व्ही आणि इतर माध्यमातून बर्‍याच गोष्टी शिकणे सहज शक्य झाले आहे. पण आज चांगल्या मराठी शाळा तरी कुठे उपलब्ध आहेत? संख्येअभावी बर्‍याच मराठी शाळा बंद पडत आहेत. खरेच मोठे दुष्टचक्र आहे हे.

आर्थिक स्तर आणि माध्यम ह्यांचेसुद्धा काही नाते आहे का? म्हणजे इतके कमावतो तेव्हा पाल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणे क्रमप्राप्त आहे असे Happy Snob Appeal?

Pages