(बदली शिक्षक म्हणून आमच्या राज्यात शाळांमध्ये काम करता येतं. त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील पदवी नसली तरी चालते, पण प्रशिक्षण घ्यावं लागतं. मी तीन चार वर्ष हे काम केलं, तेव्हा आलेल्या अनुभवांपैकी ह्या गमतीदार आठवणी. स्पेशल प्रोग्रॅमधली मुलं मात्र झोप उडवतात त्यांच्या वागण्याने आणि ती ज्या परिस्थितीत वाढत असतात ते पाहून. त्यावर नंतर केव्हातरी.)
महाविद्यालयात असताना घराजवळच्या पोलिस लाईनीतल्या मुलांच्या घेतलेल्या शिकवण्या एवढ्या पुण्याईवर मी अमेरिकेतल्या शाळेत शिकवायला जायचा बेत जाहिर केला आणि खिजवल्यासारखा हसला नवरा. तिकडे केलं दुर्लक्ष पण मुलगा म्हणाला,
"आई, तू गणित शिकवणार शाळेत जावून?"
"मग? शिकलेली आहे मी भारतात."
"पण तुला नाणी कुठे येतात ओळखता?"
"तुला कुणी सांगितलं?"
"मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला."
"हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? (नोटांवर असतात हे ठाऊक आहे, पण तेच मनात भिनलेलं आहे) नाही ना? मग कसं ओळखणार रे?"
"पण मग कशाला बघतेस चित्र?"
"उद्योग नाही म्हणून. पुढे बोल."
"क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो."
"भारतातली नाणी आणून दे मला. बघ किती पटकन ओळखते ते. तू अभ्यासाला बस आता."
त्याला घालवला खरा, पण पहिले धडे नाण्याचे घ्यावे लागणार हे लक्षात आलं. शाळेत जायच्या आदल्या दिवशी नवर्याला म्हटलं,
"काही आलं नाही तर तुला फोन केला तर चालेल ना?"
"तुझं अडणार म्हणजे गणित. एखादाच तास असेल तर चालेल."
त्याच्या आँफिसातला फोन मी शाळेत असताना सारखाच घणघणायला लागला.
"मला वर्क फ्राँम होम पोझिशन मिळते का पाहतो आता. म्हणजे दोन दोन नोकर्या घरातूनच करता येतील."
मी न ऐकल्यासारखं करत तयारी करत होते.
नाणी पुठ्यावर चिकटवून खाली नावं लिहली. मुलांसमोर फजिती नको.
पहिला दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechaun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेप्रचन? का काहीतरी वेगळाच. मी एकदा हा एकदा तो, दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येवून म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.
"हसु नको. नीट सांग काय ते."
"लेप्रीकॉन आहे ते" वर म्हणाला,
"तू माझ्या वर्गावर येवू नको. घरीच शिकव मला काय असेल ते."
त्याच्या नाही पण दुसर्या वर्गांवर जाण्याची माझी चिकाटी दांडगी. दुसर्या दिवशी गेले तर संगीताचा वर्ग माझ्या माथ्यावर मारलेला. सारेगमप ही मला कधी सुरात म्हणता आलं नाही तिथे मी काय संगीत शिकवणार आणि तेही इंग्लिशमध्ये.
मी कार्यालयात गेले. माझे थरथरणारे हात, भेदरलेला आवाज याने काही फरक पडला नाही,
"आज वेळ मारुन ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही."
धक्काच बसला, माझं काम वेळ मारुन नेणं होतं. मेलं, घरी तसंच, इथेही तेच. कुण्णाला म्हणून किंमत नाही माझ्या कामाची.
रागारागातच वर्गात सूर लावला. दिवसभर भारंभार मुलं येत होती संगीत शिकायला. आऽऽऽऽ लावता लावता थकून जायला झालं. कुणी काही विचारलं की थातूर मातूर उत्तरं देऊन भागत नाही पोरांसमोर. उलट सुलट विचारत राहातात. एकदा बिंगं फुटतय असं वाटलं तसं एका मुलाला वर्गाच्या बाहेर काढलं. तो हटून बसला.
"मिस, मी का जायचं वर्गाच्या बाहेर?"
"मला तोंड वर करुन विचारतो आहेस. जा म्हणतेय तर व्हायचं बाहेर." आमच्यावेळेस होतं का असं धाडस शिक्षकांना विचारण्याचं. त्यावेळेस मिळालेल्या काही काही शिक्षांचं कोडं मला अजून उलगडलेलं नाही पण हे त्या मुलाला काय कळणार, कप्पाळ. कारण सांगितलं तसा तो बसला बाहेर जावून. थोड्यावेळाने एक उंच शिडशिडीत माणूस दारावर टकटक करत.
’हा शिक्षक की पालक?’ विचार मनात येतोय तोच तो म्हणाला,
"बरं दिसत नाही मुल बाहेर, आत घे त्याला."
'बरं दिसायला काय ती झाडाची कुंडी आहे?' हे मनातल्या मनात
मी घरात नाही पण बाहेर जरा टरकूनच वागते. तू कोण सांगणारा वगैरे न विचारता मुकाट्याने त्याला आत घेतलं. नंतर कळलं की शाळेचा प्रिन्सिपाँल होता तो किडकिड्या.
त्यानंतर रोज रात्री इंग्लिश गाणी शिकण्याचा सपाटा लावला मी घरी, कारण इतकं सगळं होऊनही त्या शाळेने माझी सलग पंधरा दिवसासाठी संगीत शिक्षिका म्हणून नेमणुक करुन टाकली होती. पोरं कितपत शिकली देवजाणे पण मला बरीच गाणी यायला लागली आणि नवरा, मुलगा दोघांना जी काही इतर गाणी येत तीही विसरले ते दोघं. नवरा तर म्हणाला,
"तसा मी बरा कमावतोय की, तुला खरंच गरज आहे का गाणीबिणी शिकवण्याची?" मी उत्तर न देता मोठ्याने गाणं म्हणत राहिले.
सगळी गोरी मुलं मला तरी सारखीच दिसतात. त्यामुळे एखाद्या भारतीय मुलाला मी माझं लक्ष्य बनवायची वर्गाच्या बाहेर पडणार असू तर. तिथेही थोडाफार गोंधळ होतोच. सगळी दाक्षिणात्य मुलंही मला एकसारखीच वाटतात. त्या दिवशी मुलांना खेळायला घेऊन गेले मैदानावर. कसं कोण जाणे पण बाहेर जाताना नेलेली मुलं आत येताना बदलली. ती सुद्धा मुकाट्याने चला म्हटल्यावर रांग करुन उभी राहिली आणि आली आपली माझ्याबरोबर. वर्गापाशी पोचल्यावर कुणाचं तरी धाडस झालं,
"मिस...."
"मिस एम" माझ्या नावाची आठवण करुन दिली मी. नुसतं मिस काय...., आदर म्हणून नाही कार्ट्यांना.
"आम्ही तुमच्या वर्गातली मुलं नाही."
"ऑ?" मला पुढे काय बोलावं ते कळेना. दातखिळी बसल्यागत विचारलं,
"मग माझा वर्ग कुठे आहे? आणि तुमच्या शिक्षिकेला कळलं नाही तुम्ही माझ्याबरोबर निघालात ते?"
"ती सुद्धा तुमच्यासारखीच आहे."
"बापरे म्हणजे काय म्हणायचं आहे हिला?" माझ्या काळजातली धडधड लपवित विचारलं,
"म्हणजे सबस्टीट्युट का?"
"हो" हुऽऽऽऽश
मग आम्ही दोघी बदली शिक्षिकांनी परत मुलांची अदलाबदल केली.
हे तसे जरा बरे प्रसंग माझ्या आयुष्यातले. स्पेशल म्हणजे काय त्याचा अनुभव यायच्या आधीचे. स्पेशल वर्गात उभी राहिले आणि कल्लू आडदांड मुलं बघून घाम फुटला. मला वाटलं होतं वर्गात फक्त बारा मुलं आणि काहीतरी स्पेशल करायला मिळणार. पण दृश्यं वेगळं होतं.
"व्हॉटस युवर नेम?"
घाबरत मी म्हटलं.
"आय डोंट रिमेंबर"
"व्हॉट?"
"यू कॅन कॉल मी मिस जे." जेहत्ते ठायी काय असतं ते डोळ्यासमोर नाचलं.
तेवढ्यात;
"स्टुपिड"
"बास्टर्ड"
असं जोरजोरात किंचाळत दोन मुली मैदानात उतरल्या. चिंतातूर चेहर्याने मी नुसतीच पहात राहिले. त्याचं भांडण कसं संपवायचं ते कळेना. तितक्यात देवदूतासारखी एक शिक्षिका अवतरली. बटणं दाबल्यासारखी तिने "स्टॉप, स्टॉप" म्हणत दोघींच्या वेण्या ओढल्या. मला खरं तर आता रणांगण सोडून पळायचं होतं. यापेक्षा लेखन बरं.
"धिस इज जस्ट अ स्टार्ट." तिने धमकी दिल्यासारखं म्हटलं. मी घाबरुन मान डोलावली. दुर्दैवाने चारी बाजूने घेरणं म्हणजे काय हे मला थोड्याच वेळात कळायचं होतं. पोराना मैदानावर नेलं की आवाज, मारामारी, गोंधळ कुणाला समजणार नाही. मला हे सुचलं म्हणून मी माझ्यावरच खुष झाले. पण कसलं काय जेवणानंतर बाहेर धो, धो पाऊस. शाळेच्या जिममध्ये नेलं मग त्या कार्ट्याना.
"नीट खेळा, मी बसले आहे इथे बाकावर." एका दिशेने माना हलल्या.
मी ही निवांत वेळेची स्वप्न पहात बाकाच्या दिशेने मोहरा वळवला. कुठलं काय, माझी पाठ वळल्या वळल्या झोडपलं त्यांनी एकमेकांना बास्केटबॉलने. मलाही ओरडत ओरडत माझ्या दिशेने येणारा बॉल चुकवण्याच्या प्रयत्नात व्यायाम व्हायला लागला. हळूहळू एकेक जण लागलं, लागलं करत बर्फ लावायला शाळेच्या कार्यालयात. जेनीफर तर बेशुद्ध होवून खाली पडली. माझं मस्तक आता फिरलं. पोरांनी फार पिडलं. माझी असती तर....
"उठ मेले, तुला काही झालं तर आई, वडिल कोर्टात खेचतील मला. दिवाळच निघेल माझं."
दोन्ही खांदे धरुन तिला उभं केलं. गदागदा हलवलं.
"आय कॅन्ट ब्रीद...आय कॅन्ट ब्रीद" डोळे गरागरा फिरवत ती तेवढं मात्र म्हणू शकत होती.
"मी टू...." मी पुटपुटले. पण एकदम झाशीची राणी संचारली अंगात.
"जेने, तुझ्या शिक्षिकेने नोट लिहली आहे या तुझ्या वागण्याची. नाटक करु नकोस."
डोळे गरागरा फिरवले तिने. वाटलं हिच थोबाडीत देतेय की काय माझ्या नाटकी म्हटलं म्हणून. पण जादू झाल्यासारखी जेनीफर तरतरीत झाली. त्यानंतर पुन्हा सगळं त्याच क्रमाने पार पडत राहिलं. शेवटी मीही कार्यालयातून बर्फाचा भलामोठा तुकडा आणला आणि डोक्यावर ठेवला माझ्या.
रडत खडत मी बदली शिक्षिकेचं कार्य पार पाडत होते ते एका समरप्रसंगाला तोंड देईपर्यंत.
शाळेत पोचले तर बार्बरा जवळीक दाखवित पुढे आली.
"तुझ्यावर कठीण काम टाकणार आहे आज."
चेहरा पडलाच माझा. पण उगाचच हसले. चेहरा कुठे पडला ते समजत नाही त्यामुळे असं आपलं मला वाटतं.
"नवीन शिक्षक आहे आज तुझ्या मदतीला."
"नो प्रॉब्लेम." एवढं काय करायचं अगदी एखाद्याला अनुभव नसेल तर.
"आय नो हनी." याचं हनी, बनी म्हणजे पुढच्या संकटाची नांदी असते. मी कान टवकारले.
"द अदर टिचर इज डेफ..." ती घाव घालून मोकळी झाली. तो झेलायचा कसा हा माझा प्रश्न. माझ्या आत्मविश्वासाचा बंगला कोसळलाच. इथे सगळे अवयव धड असणार्यांशी माझ्या मराठी इंग्लिश बोलण्याची कोण कसरत. त्यात हा बहिरा. म्हणजे मग मुका पण असेल का?
जेफचं आगमन झालं आणि नकळत ओठ, तोंड, हात आणि अंग, एकेका शब्दाबरोबर सगळे अवयव हलायला लागले. फार अस्वस्थ झाले मी की बघतच नाही दुसरा ऐकतो आहे की नाही. बोलतच सुटते. त्याच्या ओठांच्या हालचालींशी ताळमेळ घालणं पाचव्या मिनिटाला माझ्या आवाक्याबाहेर गेलं. प्रत्येक मुलाला हातवारे करत आधी माझी आणि नंतर त्याची ओळख हा कार्यक्रम बराच वेळ चालला. त्याच्या ओठांच्या हालचाली समजेना झाल्या तसा मी कागद सरकावला.
"यु आर स्लो लर्नर...."
"व्हॉट?" मी एकदम डोळे वटारले.
"अदर्स अंडरस्टॅड्स माय लिपमुव्हमेंट क्विवली."
"मी अदर नाहीये पण."
दिवसभर आम्ही प्रेमपत्र लिहित असल्यासारखे चिठ्ठ्या फाडत होतो. मध्येच तो भारत पाक संबंधावरही घसरला, मग तर काय तागेच्या तागे फाडल्यागत मी लिहीत राहिले. नंतर नंतर मी तो बहिरा हे विसरुन जोरजोरात भाषणही दिलं त्याला या विषयावर. पोरं बिचारी कशीनुशी होऊन, न कळणारं सारं मुकाट ऐकत होती.
घरी आले की नवरा आणि मुलगा जादुच्या गोष्टी ऐकायला तयार असल्यासारखी सज्ज असायची. नवरोजी चहाचा आयता कप हातात देत श्रवण भक्तिला तयार. रोज एका चहाच्या कपावर इतकी करमणुक? त्यांना त्याची फार सवय व्हायला लागली तसा त्यांचा तो आनंद माझ्या पचनी पडेना त्यामुळे एक दिवस हे शिकवण्याचं महान कार्य सुरु केलं तसंच ते बंदही. माझ्या त्या निर्णयाने बर्याच मुलाचं कल्याण झालं असावं असं मी सोडून सर्वांचं ठाम मत आहे. असु द्यावे ते तसे बापडे
मज्जा वाटली वाचताना, चांगलं
मज्जा वाटली वाचताना, चांगलं लिहिलंय.
(No subject)
:) झकास.. अगदी डोळ्यांसमोर
झकास.. अगदी डोळ्यांसमोर उभे राहिले सगळे प्रसंग..
हसुन हसुन पुरेवाट झाली.
हसुन हसुन पुरेवाट झाली.
मोना, छान लिहिलेस. आणखी
मोना,
छान लिहिलेस. आणखी वाचायला आवडेल.
अनिलभाई, ही मोना कोण आहे?
अनिलभाई,
ही मोना कोण आहे?
छान लिहिलंय. वेगळेच अनुभव
छान लिहिलंय. वेगळेच अनुभव वाचायला आवडले.
स्पेशल प्रोग्रॅमधली मुलं
स्पेशल प्रोग्रॅमधली मुलं मात्र झोप उडवतात त्यांच्या वागण्याने आणि ती ज्या परिस्थितीत वाढत असतात ते पाहून.
खरे आहे. तो प्रकार जरा कठीणच. मी आपला साध्या नेहेमीच्या मुलांना शकवत असे शाळेत.
तुम्ही गणित शिकवताना नाच करून नाही दाखवलात का? मी केला होता नाच, गणित शिकवताना. आधी मला माहित नव्हते. दुसर्या बाईने सांगितले की 'असे केले की मुलांच्या चांगले लक्षात रहाते. तुम्ही नाही का असे शिकलात? तुमच्या लक्षात कसे रहाते!'
आता हिला काय कप्पाळ सांगणार? मास्तरांनी फॉर्म्युला सांगितला नि म्हणले उद्या शंभर गणिते सोडवून आणा! नाहीतर छड्या. काय बिशाद आहे लक्षात न रहाण्याची? आज चाळीस वर्षांनी झोपेतून उठवल्यावर सुद्धा घडा घडा म्हणुन दाखवीन.
बरं दिसत नाही मुल बाहेर, आत
बरं दिसत नाही मुल बाहेर, आत घे त्याला."
'बरं दिसायला काय ती झाडाची कुंडी आहे?' हे मनातल्या मनात>>>
"आय कॅन्ट ब्रीद...आय कॅन्ट ब्रीद" डोळे गरागरा फिरवत ती तेवढं मात्र म्हणू शकत होती.
"मी टू...." मी पुटपुटले. पण एकदम झाशीची राणी संचारली अंगात.
"जेने, तुझ्या शिक्षिकेने नोट लिहली आहे या तुझ्या वागण्याची. नाटक करु नकोस.">>>
एकेक पंचेस म्हणजे एकदम सहीच....
अजून असेच विनोदी लेख लिहा मोहना!!! खुप मज्जा आली....
मस्त लिहीलय, एकदम टिपी.
मस्त लिहीलय, एकदम टिपी.
हे धमाल उतरलंय... मजा आली
हे धमाल उतरलंय... मजा आली वाचताना....स्पेशल वर्गाच्या स्पेशल भागाची वाट बघतेय...
<<<<तुम्ही गणित शिकवताना नाच
<<<<तुम्ही गणित शिकवताना नाच करून नाही दाखवलात का? मी केला होता नाच.....
नाहीतर छड्या. काय बिशाद आहे लक्षात न रहाण्याची? आज चाळीस वर्षांनी झोपेतून उठवल्यावर सुद्धा घडा घडा म्हणुन दाखवीन.>>>> हा हा झक्की. नशीब मला नाचावे नाही लागले. नाहीतर पोरं सैरावैरा पळाली असती. आणि इकडे पण मारायचे बरं, परवा कार्यालयात एक जण सारखी पॅड्लड केलं म्हणत होती. मला कळेचना म्हटलं सायकलचं पॅड्ल म्हणतेय की काय ही. आधी मी आपली नुसतीच हसायचे काही कळलं नाही तर पण आता लोणच्यासारखी मुरलेय ना आमच्या कार्यालयात त्यामुळे म्ह्टलं साध्या इंग्लिशमध्ये बोल. तेव्हा कळलं मारणे, अरे मग spanking म्हण ना बाई.
(No subject)
सशल राजीनामा का दिलास ?
सशल राजीनामा का दिलास ?
मस्त उतरलंय ... ह्यांच्या
मस्त उतरलंय ... ह्यांच्या मोठ्या झालेल्या आवृत्त्या आमच्या हातात येतात, तेव्हा मूळ असंच काहीतरी असेल असं वाटत राहतं. पण काय हो, बाहेर घालवण्याची शिक्षा हे कल्पित की खरंच? युनिव्हर्सिटीमध्ये तर ते समोरच्या खुर्चीवर पाय ठेवून झोपले तरी मी काही म्हणत नाही. चालतंय तर चालू दे.
आई गं अजून किस्से येऊ देत
आई गं अजून किस्से येऊ देत मोहना...
छान लिहीलय
छान लिहीलय
मस्तयं..! आणखी वाचायला
मस्तयं..! आणखी वाचायला आवडतील.
खुसखुशीत लिहिलयं. अजून
खुसखुशीत लिहिलयं. अजून वाचायला नक्कीच आवडेल.
मोहना, मस्तं जमलय... एकदम
मोहना, मस्तं जमलय... एकदम खुसखुशीत. पोरांना कल्हई लावणं सोप्पं नाही... नै?
झक्कास शैली आहे... अजून येऊद्या.
एकदम झकास !!! घरी आले की
एकदम झकास !!!
घरी आले की नवरा आणि मुलगा जादुच्या गोष्टी ऐकायला तयार असल्यासारखी सज्ज असायची >> मस्त !! अजुनहि कहि पंचेस एकदम भारी ...
आवडल !
छान लिहले
छान लिहले
सुरवातीपासुनच पकड घेतलीत
सुरवातीपासुनच पकड घेतलीत मोहना!!
मस्त पंचेस!!
तुमच्या पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत-
मस्त लिहीलंय
मस्त लिहीलंय
(No subject)
मस्त लिहीलेय. हहपुवा
मस्त लिहीलेय. हहपुवा
छान!
छान!
खूप हसले. आपण सुरेख आणि
खूप हसले. आपण सुरेख आणि खुसखुशीत लिहीले आहे.
पण या खालील ठिकाणी अडखळले. हे पोलीटीकली करेक्ट नाही आणि योग्यही नाही कदाचित.
इथे सगळे अवयव धड असणार्यांशी माझ्या मराठी इंग्लिश बोलण्याची कोण कसरत. त्यात हा बहिरा. म्हणजे मग मुका पण असेल का? >> ?
कल्लू आडदांड मुलं >>? कोणी आपल्या मुलांना ती ब्राऊन बारकी मुलं म्हणलेलं चालेल का?
लेप्रीकॉन> असा असतोय होय उच्चार. थँक्स. मला कधीचा हवा होता.
<<मला खरं तर आता रणांगण सोडून
<<मला खरं तर आता रणांगण सोडून पळायचं होतं. यापेक्षा लेखन बरं.
"धिस इज जस्ट अ स्टार्ट." तिने धमकी दिल्यासारखं म्हटलं. मी घाबरुन मान डोलावली. दुर्दैवाने चारी बाजूने घेरणं म्हणजे काय हे मला थोड्याच वेळात कळायचं होतं>>> पुरेवाट लागली.
सर्वांना धन्यवाद. विनोदी
सर्वांना धन्यवाद. विनोदी लिहायचं बळ वाढलं आता
भास्कराचार्य :- <<<<बाहेर घालवण्याची शिक्षा हे कल्पित की खरंच?>>>> मी खर्ंच घालवलं होतं त्याला बाहेर, पण तो पठ्ठ्या कारण पटल्यानंतरच बाहेर जाऊन उभा राहिला. किती छान, नाहीतर आम्ही शिक्षक सांगतील ते प्रमाण मानायचो.
रैना - <<<इथे सगळे अवयव धड असणार्यांशी माझ्या मराठी इंग्लिश बोलण्याची कोण कसरत. त्यात हा बहिरा. म्हणजे मग मुका पण असेल का? कल्लू आडदांड मुलं ? कोणी आपल्या मुलांना ती ब्राऊन बारकी मुलं म्हणलेलं चालेल का?
>>>
कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही माझा. पण चुकीचं असलं तरी काही शब्द सर्रास वापरले जातात. ब्राऊन आणि बारकी मुलं म्हणतातच की आपल्या मुलांना, तोंडावर नाही पण मागून. आणि अगदी खरं सांगते बहिरा असेल तर तो मुका पण असेल का हा प्रश्न डोकावला मनात. पण आधीच त्याबद्दल माफि मागते मी. मला कुठल्याही वादात पडायची इच्छा नाही. तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा.
Pages