स्वरानंदवन

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

sw1.jpg

बाबांनी आनंदवन स्थापन केलं, त्याला आता साठ वर्षं पूर्ण होतील. एका रात्री बाबांना रस्त्यावर सडत पडलेला एक कुष्ठरुग्ण दिसला. बाबांना किळस वाटली. ते तिथून निघून गेले. पण मग या घृणेवर मात करण्यासाठी बाबा त्या कुष्ठरुग्णाला घरी घेऊन आले. त्याच्या जखमा स्वच्छ केल्या. भीतीवर मात केली. आणि मग उभं राहिलं आनंदवन. कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, वृद्ध, अनाथांचे आधारस्थान. त्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवणारे त्यांचे हक्काचे घर.

आज पाच हजार जणांचे आनंदवन कुटुंबीय कष्ट उपसून स्वावलंबनाने जगण्याचा यशस्वी प्रयोग करत आहेत. Work builds, charity destroys हा बाबांचा मंत्र. Give them chance, not charity. They can live without fingers but not without self respect, ही बाबांची घोषवाक्यं. हे केवळ स्वप्नरंजन नाही. आनंदवनात बाबांनी आणि नंतर विकासकाकांनी ते प्रत्यक्षात आणलं आहे. बरे झालेले कुष्ठरोगी, अंध, अपंग, मूकबधिर, अनाथ, वृद्ध इथे कष्ट करून ताठ मानेने स्वाभिमानाने जगतात. हातापायांची बोटं झडली आहेत, नाकाची फक्त भोकं आहेत. पण त्यांनी नऊ नऊ पुरुष खोल विहिरी खोदण्याचा, बांध-बंधारे घालण्याचा, रस्ते तयार करण्याचा, शेती करण्याचा पराक्रम केला आहे. आनंदवनात आज चहा, साखर, तेल, मीठ, अमृत अशा काही वस्तू सोडल्या तर कपड्यांपासून चपलांपर्यंत, गाद्यांपासून एसी, फ्रीजपर्यंत अनेक वस्तू तयार केल्या जातात. हातापायांना बोटं असलेल्या धडधाकटांना लाजेने मान खाली घालावी लागेल, अशी नवी दुनिया त्यांनी वसवली आहे.

या सार्‍या कार्यामागे जशी बाबांची प्रेरणा आहे, तशीच डॉ. विकास आमटे यांची अफाट मेहनतही आहे. प्रचंड दूरदृष्टी आणि कल्पकतेच्या मदतीने विकासकाकांनी आनंदवनाचे कार्य प्रचंड वाढवले आहे. आज इथे अंधांसाठी, अपंगांसाठी शाळा, कृषिमहाविद्यालय, पदव्युत्तर शिक्षण देणारी तीन महाविद्यालये आहेत. संधीनिकेतन, हिंमतग्राम असे अभिनव प्रयोग काकांनी करून दाखवले आहेत. असाच एक सुंदर प्रयोग म्हणजे स्वरानंदवन.

दोनशे कुष्ठमुक्त, अंध, अपंग आनंदवनवासीयांचा हा वाद्यवृंद. गायन, नृत्य, वादन याचा सुरेख मेळ साधणारा हा वाद्यवृंद दुर्दम्य इच्छाशक्तीचे एक प्रतीक आहे. १४ जुलै २००२ ला स्वरानंदवनाचा पहिला प्रयोग झाला. त्यानंतर आजतागायत या वाद्यवृंदाचे शेकडो प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही झाले आहेत. या कलाकारांनी आपली कला सादर करून आजपर्यंत सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी आनंदवनाला मिळवून दिला आहे. आपली कला सादर करून या आनंदवनवासीयांनी आनंदवनातील असंख्य प्रकल्पांना आर्थिक हातभार लावला आहे.

sw2.jpg

आयुष्यात 'आवाज' म्हणजे काय हे माहित नसणार्‍या, जन्मापासून बहिर्‍या असणार्‍या मुली जेव्हा एकही पाऊल न चुकवता 'डोला रे' सादर करतात, किंवा व्हीलचेअरवर बसून एखादा गायक रफीचं गाणं हुबेहूब तसंच सादर करतो, तेव्हा या कलाकारांना 'अपंग' म्हणण्यास आपण धजावत नाही.

असा हा अफलातून कार्यक्रम १७,१८,१९ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे. १७ व १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता गणेश कलाक्रिडा मंदिरात व १८ फेब्रुवारीला रात्री नऊ वाजता रामकृष्ण मोरे सभागृह येथे स्वरानंदवनाचे प्रयोग होतील. या कलाकारांचं कौतुक करून आनंदवनाला आर्थिक हातभार लावणं ही आपली गरज आहे. असंख्य संकटांतून मार्ग काढत स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या या थोर कलाकारांना सलाम करायला आपण उपस्थित राहावे, ही आग्रहाची विनंती.

देणगी प्रवेशिका पॉप्युलर बुक स्टोअर, खाऊवाले पाटणकर, शिरीष ट्रेडर्स, व सर्व प्रमुख नाट्यगृहांत उपलब्ध आहेत.

sw3.jpg

(प्रकाशचित्रे डॉ. शीतल आमटे यांच्या सौजन्याने)

प्रकार: 

खरोखर कौतुक! आपल्यात काहीही कमी नाही उलट तुमच्यापेक्षा काकणभर सरसच आहोत हे जगाला दाखवून देण्याची तीव्र इच्छाशक्तीच त्यांना इतकी जिद्द देत असेल. या सार्‍यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा!
चांगली माहिती दिलीस चिनूक्स. Happy
----------------------
एवढंच ना!

श्श्याsssssssss अफलातुन!
त्या पहिल्या फोटोतल्याचे पाय बघितले का? क्षणभर अन्गावर शहारा आला!
(अन डोक्यात आल, साला आपल्याला दोन्ही हात पाय धडधाकट अस्ताना, नेहेमीच्या जगण्यात असे काय मोठे दिवे लावतो आम्ही????)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

चिनुक्ष, धन्यवाद ही माहीती शेअर केल्याबद्दल. खरच अफाट आहेत ही मंडळी. शाळेतुन या कार्यक्रमाबद्दल माहीती आली आहे.

Give them chance, not charity. They can live without fingers but not without self respect>>> अगदी खरय

त्या पहिल्या फोटोतल्याचे पाय बघितले का? क्षणभर अन्गावर शहारा आला!
(अन डोक्यात आल, साला आपल्याला दोन्ही हात पाय धडधाकट अस्ताना, नेहेमीच्या जगण्यात असे काय मोठे दिवे लावतो आम्ही????)>>> लिंबुदा खरच असच वाटल फोटो बघून.

चिनुक्स,

मुंबई/ठाणा/डोंबिवलीत नाही का होत हा कर्यक्रम?

या माहितीबद्दल धन्यवाद

या माहितीबद्दल धन्यवाद

या माहितीबद्दल धन्यवाद

अशक्य आहे... पण हे वाचलं आणि बघितलं की वाटतं की अशक्य असं काहीच नाही...

लिंबू ला अनुमोदन....
-योगेश

खरचं त्या मुलाचा फोटो पाहून शहारे आलेत!!!!

प्रेरीत वाटलं वाचून या मुलांबद्दल आणि बाबांबद्दल.

एवढं मोठ काम करणार्‍या त्या महामानवांना प्रणाम!

चिनू(क्स) बाबा आणि इतर आमटेंना शतशः प्रणाम.

छान माहिती दिलीस चिनूक्स.... आत्तापर्यंतच्या कार्यक्रमांतून ७ कोटींचा निधी त्यांनी उभारला आहे हे वाचून खूप कौतुक वाटले. स्वरानंदवनच्या कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

आनंदवनात कोळश्याच्या खाणी असल्याचा शोध आता काही बिझनेसमन्सला लागला आहे. त्यांनी आनंदवन सरकारला मागीतले आहे अशी बातमी आली.

शतशः प्रणाम!!

ज्यांच्या शरिरांना समाजाने नाकारलं त्यांच्या मनाची भरारी बघा तरी... आपण अव्यंग म्हणायची ती माणसं... मनाने नक्की अव्यंग आहोत का? शरिराचं व्यंग नक्की कुठे असतं? कुठं नांदतं?
ह्या सुंदर माणसांना माझे शतशः प्रणाम! जगात अशाच सुंदर मनाची माणसं अजून हवीत...

पुण्यातला प्रयोग बघणे जमले नाही. पण हाच प्रयोग श्रीरामपुर ला बघितला होता. थक्क व्हायला होते त्यांची जिद्द बघुन.

त्याच बरोबर आनंदवन च्या स्टॉल वर उभे राहुन, चाळण्या, टोपल्या, खादीचे कापड असे काही - काही विकण्याचा आणि नंतर ताजने काकां बरोबर बसुन हिशोब लावण्याचा आनंद ही लुटला आहे एके काळी.

चिनुक्स, पुण्यातही असे स्टॉल लागत असतील आणि सयंसेवकांची आवश्यकता असेल तर जरुर कळव.