सौरकुंडी खिंड (१)

Submitted by मंजूताई on 27 June, 2011 - 10:58

३ मे - (होराथॅच)आजचाही ट्रेक जास्त नव्हता व चारवाजेपर्यंत पोचायचे असल्यामुळे निघायची गडबड-धावपळ नव्हती. आरामात नाश्ता करून, डबे भरून निघालो. नितांत सुंदर हिरवाई व सोप्पी चढण. काही-काही गोष्ट वर्णनातीत असतात. शब्दात सामावणं कठीण असतं. एकदा जाऊन आलो की आपण ह्या निसर्गाच्या अश्या काही प्रेमात पडतो की परत परत जावंस वाटतं. हिमालयाची शिखरं साद देत राहतात. काहीजण नुसतेच प्रेमात पडतात तर काही बनतात व्यसनी. पंचावन्न अधिक वयाच्या तडवीकाकांकडे बघून असंच वाटतं. ते लेह-लडाख माउंटन बायकिंगला गेले असताना त्यांचा पाय मोडला. मोडक्या पायाने बाइक चालवत लेह, लेह ते मुंबई विमान, मुंबई ते नाशिक हॉस्पिटल चारचाकी, असा प्रवास केला. पायात रॉड टाकावा लागला, चार महिने प्लॅस्टरमध्ये पाय होता. पण त्यानंतरही त्यांनी कितीतरी छोटे-मोठे ट्रेक केले आणि अजून काही करायची इच्छा आहे. कॅंप फायरमध्ये त्यांनी सांगितलेला हा अनुभव. त्यांचा इच्छाशक्तीला सलाम! हळूहळू, थांबत-थांबत निसर्गाचा आनंद लुटत चढायचे. चार वाजता 'होरा' मुक्कामी पोचलो. कालच्यापेक्षा आजचा कॅंप मोकळ्या जागेत मैदानावर तर होता पण 'त्याची' सोय नव्हती त्यामुळे सर्वेक्षण करून आडोशाच्या जागा शोधून ठेवल्या . पाच तास चालून आल्यावरही प्रत्येकात खेळण्याचा प्रचंड उत्साह होता. प्रदुषणरहित वातावरणाचा परिणाम! सगळ्यांनाच मोकळं मैदान बघून क्रिकेट ताप चढला. एकजात सगळ्यांनी खेळण्याचा आनंद लुटला जेवणाच्यावेळेपर्यंत. दोन दिवसाच्या सवयीमुळे विजेची उणीव आता भासेनाशी झाली होती.

४ मे -(मायली) सपाट जमिनीवरची शांत झोप मिळाल्यामुळे असेल कदाचित आजची सकाळ जरा जास्तच प्रसन्न वाटली. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू खूप यायचा पण प्रत्यक्ष डोळ्यांना कमी दिसायचे. पक्षिमित्र यतींद्र दुर्बीण घेऊन पक्षीनिरीक्षण तर करायचाच, पक्ष्यांशी संवादही साधायचा. बॅकेत नोकरी करणाऱ्या यतींद्रचे छंद पक्षी निरीक्षण व वयस्क लोकांसाठी ट्रेकींग कॅंपचे आयोजन करणे. अनेक पक्ष्यांचे आवाजही चांगले काढतो. त्याच्या जवळ सांगायला अनेक किस्से, अनुभव होते पण भाषेचा प्रश्न होता. ते किस्से, अनुभव भाषांतरित करून, त्याला उत्तम तऱ्हेने सजवून, विनोदाची पखरण करत आमच्यापर्यंत पोचवायचं काम करायचा 'संजय'. यतींद्र, त्याची बायको, फोनसुंदरी लता, एक जोडपं, पंधरा वर्षाचे मंदारा व अरूण असा त्यांचा बेंगलोरचा 'यतींद्र' ग्रुप. सुरवातीला ते एक कोडंच होत. नेमकी ही मुलं कुणाची आहेत? ते भावंडेही नव्हते तसेच ग्रुपमधल्या एकालाही आई-बाबा हाक मारत नव्हते. ती मुलं यतींद्रच्या दोन मित्रांची हे शेवटच्या दिवशी कळलं. धन्य ते आई-बाप, एवढ्या दूर अश्या ठिकाणी पाठवणारे, अन धन्य तो, जबाबदारी घेणारा यतींद्र! आजचा ट्रेकही चारकिमी नऊहजार फूट उंची. खालून सामान न पोचल्यामुळे व आचारीबुवा रुसल्यामुळे नाश्ता - डबा कसा काय मिळतो, चिंताच होती. वाटेत एखाद्या स्थानिकाने लावलेल्या टपरीवर फक्त चहा, कॉफी, ऑम्लेट व मॅगी मिळायचे. पण गरमा-गरम छोले-भटुरे, खीर व आमच्या आग्रहास्तव केलेला फोडणीचा भात व डबाही मिळाला. आजचा ट्रेक पाच किमी सातहजार फूट उंची. न थकवणारा, न शिणवणारा. आर्मीत नोकरी करणारा कॅंपलीडर आमची वाटबघत होता. हा कॅंप एका दरीत मोकळ्या जागेत होता. वॉव क्या सरकचित्रदर्शन
नजारा! निरभ्र आकाश, आजूबाजूला बर्फाच्छादित डोंगर, जमिनीवर अंथरलेले हिरवे तृण गालिचे आणि हवेत सुखद गारवा, केवळ अप्रतिम! माईंड ब्लोईंग! अश्या ह्या वातावरणात कॅंप फायरची रंगत वाढत असतानाच, अचानक मेघ दाटून आले. खूप जोराने पाऊस, वादळाची शक्यता दिसू लागली. कॅंप लीडरने घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका, तंबू उडू लागले तर खांबांना धरून ठेवा वैगेरे सूचना देऊन सावध केलं. प्रसन्न, उल्हसित मन भीतीने व्यापलं. पण ही अवस्था फार टिकली नाही. काय आश्चर्य! पाचच मिनिटात वातावरण पूर्ववत. मोसम बदलते देर नही लगती!

५ मे - मरण यावं तर हिमालयाच्या कुशीत, असं जरी वाटत असलं तरी पहाटे डोक्यावरच छप्पर आणि एकशेऐंशी डिग्रीत पहुडलेलं एकसंध जीवित शरीर बघून जीव सुखावला. आजचा ट्रेकची उंची नऊहजार फूट. नेहमी प्रमाणेच जेवण, विश्रांती घेत आरामाने पोचायचे होते. खूप ऊन नाही, खूप पाऊस नाही, आणि शरीर पण ह्या वातावरणाला सरावले होते, गर्द हिरवाईत चालायला मजा येत होती. छोट्या-मोठ्या हिमनद्या ओलांडत आगे कुच चालली होती. एका जरा मोठ्या हिमनदीजवळ जेवण
विश्रांतीसाठी थांबलो. दुसऱ्या दिवशी आठ तास बर्फातून जायचे आहे हे माहीत नव्हतं. मनसोक्त बर्फात खेळण्याचा आनंद घेत स्नोमॅनही बनवून टाकला. कॅंपलीडर आनंदने छान स्वागत केलं. कॅंपची जागाही छान होती. छोटंसं पठार. आजूबाजूला पाईन-देवदारची झाडे, चारी बाजूला बर्फाच्छादित डोंगररांगा, रम्य ठिकाण! जग विसरायला लावेल असं निसर्ग सौंदर्य! तारीख, वार विसरून गेलो होतो. जगात काय चाललंय हे कळायला वर्तमानपत्र, टीव्ही नव्हते आणि जाणून घ्यायची इच्छापण होत नव्हती. लादेन गेल्याची बातमी तेवढी कळली होती व आयपीएलची ताजा खबर क्रिकेटप्रेमी ठेवत होते. पण दहाहजार फुटावरची एक एचपीएल (हिमालय प्रिमियम लीग) बघण्याची मजा काही औरच होती. आपल्या अख्ख्या टीमला मागे टाकतील असे सहा पहाडी खेळाडू होते. त्यांची चपळाई बघून दंगच झालो. अंबानी किंवा तत्सम मालक मंडळी, नाही, फक्त अंबानींनी (सगळेजण मुंबई इंडियन्सवाले होते) इथल्या निदान ऑलराँउडर मलिंगा(आम्ही ठेवलेलं नाव)
तरी घ्यायलाच पाहिजे, अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती. मॅच बघण्यात जेवणाची वेळ केव्हा झाली ते कळलंच नाही. उद्याच्या ट्रेकची मानसिक तयारी करत पथारी पसरली. तेवढ्यात मेघगर्जनेसह धो-धो पाऊस कोसळू लागला. आमचा तंबू उतारावर असल्यामुळे पाणी आत शिरू लागलं. अंथरूण ओलं व्हायला लागलं. काठ्यांच्या साहाय्याने सगळ्यांनी मिळून एक नाली खोदली. आता पाणी आत येणं थांबलं होतं. दाटीवाटीने एका तंबूत चौदाजणी केव्हा झोपेच्या अधीन झालो कळलंच नाही.
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही वाचताना असंच वाटलं की फोटो असते तर अजून मजा येईल.

नितांत सुंदर हिरवाई व सोप्पी चढण. काही-काही गोष्ट वर्णनातीत असतात. शब्दात सामावणं कठीण असतं. एकदा जाऊन आलो की आपण ह्या निसर्गाच्या अश्या काही प्रेमात पडतो की परत परत जावंस वाटतं. हिमालयाची शिखरं साद देत राहतात. काहीजण नुसतेच प्रेमात पडतात तर काही बनतात व्यसनी.>>>:स्मित: माझी अवस्था काही वेगळी नाही.

हे सारखं 'सरकचित्रदर्शन' काय लिहिलंय? अर्थ नाही कळला.

फोटो टाकायचा प्रयत्नात आहे अजून यश आले नाही. आकारमानमोठे असल्यामुळे जमले नाही. शेवटच्या भागात एकत्रित टाकीन. मायबोलीवरचा हा माझा दुसराच लेख आहे इथे त्याचा दुवा का नाही दिसत? पहिल्या लेखात क्रमशः टाकलं होतं. असो प्रतिसादाबद्दल धन्यवाद!