अमेरीकेत मोगरा लावताना तुम्ही कुठल्या 'झोन' मध्ये राहता हे माहिती करून घेणं जरूरीचं आहे. http://www.garden.org/zipzone/ इथे वेगवेगळ्या 'झोन्स' बद्दल माहिती मिळेल. मोगर्याला फार थंड हवामान चालत नाही. त्यामुळे '९अ', '९ब', '१०अ', '१०ब', '११' या झोनमधे रहात नसल्यास मोगरा कुंडीत लावावा.
कुंडी 'रूट बॉल' च्या (मुळं आणि त्याभोवतीची थोडी माती) साधारण तिप्पट असावी. प्लास्टिकची असल्यास थंडीत आतबाहेर न्यायला आणायला सोपं जातं. कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा / holes असावेत. नसले तर करून घ्या.
मोगर्याला माती पाण्याचा व्यवस्थित निचरा (well-drained) होणारी लागते. त्यामुळे इथे मिळणारी 'टॉप सॉईल' (Top soil) किंवा 'गार्डन सॉईल' (garden soil) अजिबात वापरू नका. या मातीमुळे मोगर्याची मुळं कुजण्याचा धोका असतो. कुठल्याही चांगल्या कंपनीची 'पॉटींग सॉईल' (Potting soil) वापरा. मी मिरॅकल ग्रो या कंपनीची Potting soil वापरते आणि आत्तापर्यंत तरी चांगला अनुभव आहे. त्यात peat moss, perlite या गोष्टी घातल्या तरी चालेल. नसतील तर नुसती Potting soil वापरली तरी चालेल.
मोगर्याला खूप पाणी लागत नाही. माती हाताला ओली लागल्यास पाणी घालू नका. थंडीत मोगरा घरात आणाल तेव्हा आठवड्यातून एकदा अगदी थोडं पाणी घाला.
मोगर्याला खत घालताना 'overfeed' होणार नाही याची काळजी घ्या. मिरॅकल ग्रोचं 'All purpose plant food' चांगलं आहे. कमी concentrationचं (पाण्यात dilute केलेलं) खत नियमित देण्याने फायदा होतो. उन्हाळ्यात साधारण २ आठवड्यातून एकदा खत द्या. थंडीत खत घालणे पूर्णपणे बंद करा. मे-जून पासून सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत खत देणं योग्य.
एप्रिल-मे मध्ये 'फ्रॉस्ट' संपला, रात्रीचं तापमान साधारण ५० डिग्री फॅ पर्यंत गेलं की मोगरा बाहेर आणून ठेवा. बाहेर ठेवताना फायरप्लेस, कपड्यांच्या ड्रायरचा 'व्हेंट' समोर नाही ना, तिथून गरम हवा झाडाला लागत नाही ना याची खात्री करा. मोगर्याला भरपूर प्रकाश, दमट हवा लागते. ऑक्टोबर मध्ये तापमान कमी व्हायला लागतं तेव्हा घरात आणा, शक्यतो खिडकीजवळ - जिथे भरपूर सूर्यप्रकाश येतो तिथे - ठेवा. परत घरातल्या हिटरची हवा थेट झाडावर येत नाही ना याची खात्री करा.
जमल्यास दरवर्षी माती बदला. शक्य नसल्यास २ वर्षातून एकदातरी माती बदलावी. कुंडी बदलताना आधीच्या कुंडीपेक्षा २ ते ३ इंच मोठा व्यास असलेली कुंडी घ्यावी. मुळांचा भरपूर गुंता झालेला असल्यास धारदार सुरीने बाजूनं १/२ इंचाचे 'कटस' द्यावेत. यामुळे नविन मुळे येतात, मुळांची वाढ होते. माती/ कुंडी बदलल्यास २-३ दिवस प्रखर सूर्यप्रकाशात (direct sunlight) झाड ठेवू नका.
मे मधे मोगर्याची सगळी पानं हातानं तोडून टाका. फांद्यांची साधारण ५-६ इंच छाटणी करा. साधारण ३-४ दिवस पाणी देऊ नका. नंतर भरपूर पाणी द्या. यामुळे नविन पानं फुटताना प्रत्येक पानाबरोबर कळी येते. भरपूर फुलं येतात.
अमरिकेत मोगर्याचे बरेच प्रकार मिळतात. 'Maid of Orleans' (याला Arabian Tea Jasmine पण म्हणतात) हा सगळीकडे मिळणारा प्रकार. 'Belle of India', 'Mysore Mulli' , 'Grand Duke' (बटमोगरा) या बाकीच्या जातीपण मिळतात. 'Mysore Mulli' (याला मराठीत बहुतेक मदनबाण म्हणतात) आणि बटमोगर्याच्या फुलांना तीव्र सुवास असतो.
एका पुस्तकात मोगर्याला सुवासाची तीव्रता वाढण्यासाठी हिंगाचं पाणी द्यावं असं वाचलं होतं. मी हा प्रयोग करून पाहिला नाही. कोणी केला असल्यास सांगा.
जरः
पानं पिवळी दिसत आहेत: पाण्याचे किंवा खताचे प्रमाण जास्त होत आहे.
कळ्या गळून पडता किंवा लवकर फुलतात: पाण्याचे प्रमाण जास्त
पानं फिकट हिरवी दिसतात, मरगळलेली दिसतात: पाण्याची कमतरता
वर्षभर नविन फुलं किंवा नविन फांद्या येत नाहीत: पाणी आणि खताची कमतरता
झाडांना 'सखे सोबती' म्हटलय ते खरंच आहे. नविन कळी येताना, पानं फुटताना बघणे खरंच आनंददायी प्रकार आहे. झाडांचीही मग सवय होते. मोगरा नीट काळजी घेतली की वर्षानुवर्षे रहातो. झाड जूनं झालं की योग्य ती फांदी कट करून कलमपण करता येतं.
सही पुढच्या spring मध्ये
सही
पुढच्या spring मध्ये नक्की लावणार. अंजूताई, trade secret नसल्यास, कढीपत्याच्या झाडासाठी काय करतात ते पण लिही ना. मला सेम तुझ्यासारखं झाड हवं आहे. आमच्याकडे इंडीयन स्टोर मध्ये $३५ ल ४ पानांचा झाड आहे :(.
अर्रे वा! मस्त माहिती. (आता
अर्रे वा! मस्त माहिती.
(आता मिळायचा नाही बहुतेक. अगदी early spring मधे होम डेपोत मिळतो बहुधा. तसाच गार्डिनियाही.)
अंजली वर्षभर इनडोअर राहील का
अंजली
वर्षभर इनडोअर राहील का ग मोगरा, माझ्या अपार्टमेंटला बाल्कनी नाहीये. प्रकाश मात्र भरपूर आहे, हॉलची एक संपूर्ण भिंत काचेची आहे.
trade secret नसल्यास,>>>
trade secret नसल्यास,>>>
कडीपत्त्याचा वेगळा धागा काढते.
आमच्याकडे इंडीयन स्टोर मध्ये $३५ ल ४ पानांचा झाड>>> खूपच महाग आहे. लोकल नर्सरीमधे बघ. तिथे स्वस्त मिळण्याची शक्यता आहे.
रूनी, हो, वर्षभर इनडोअर राहिल
रूनी, हो, वर्षभर इनडोअर राहिल ना. फुलं थोडी कमी येतील, पण नक्की येतील. एकदा घरातल्या तापमानाची सवय झाली की भरपूर येतील.
हो का.... सही.... आता मिशन
हो का.... सही.... आता मिशन मोगरा सुरू करते.
अरे वा मस्त माहिती. धन्यवाद
अरे वा मस्त माहिती. धन्यवाद अंजली
अंजली, मस्त माहिती दिली आहेस.
अंजली, मस्त माहिती दिली आहेस. मला रोप लावताना उपयोगी पडेल.
ते नवीन म्हणायचं ते हेच का ?
ते नवीन म्हणायचं ते हेच का ?
चांगली माहीती दिलीस..
खूप छान माहिती! धन्यवाद!!
खूप छान माहिती! धन्यवाद!!
खूप छान माहिती दिलीयेस अंजली.
खूप छान माहिती दिलीयेस अंजली. मी २ वर्षे मोगरा लावला होता. एक वर्ष अबोली सुद्धा मिळाली होती होम डेपो मध्ये. पण थंडी सुरू होण्याच्या आधी आत बाहेर करण्यात काय चुकतं कुणास ठाऊक. जळून जातात झाडं. अबोली गेली तेव्हा तर खरचं मला इतकं वाईट वाटलं. पुढच्या वर्षी पुन्हा रोप दिसलं पण घ्यावसचं वाटलं नाही.
प्लीज जरा त्याबद्दल टीप्स द्या न . मी झोन ४ मध्ये राहते.
अंजलि, खुपच उपयुक्त माहिति
अंजलि,
खुपच उपयुक्त माहिति धन्यवाद!
सावनी, झोन ४ म्हणजे
सावनी,
झोन ४ म्हणजे तुमच्याकडे उन्हाळा फार कमी दिवस असेल. वर लिहील्याप्रमाणे मोगर्याला - खरंतर कुठल्याही tropical झाडांना - थंड हवामान अजिबात सहन होत नाही. आमच्या इथे एप्रिलमधे 'फ्रॉस्ट' संपतो. रात्रीचं तापमान ५० फॅ किंवा जास्त असतं तेव्हा मी मोगरा बाहेर ठेवते. पहिले काही दिवस लक्ष ठेवावं लागतं. रात्रीचं तापमान ५० फॅ च्या खाली जातं तेव्हा परत झाडं घरात आणावीत.
ऑक्टोबरच्या तिसर्या - चौथ्या आठवड्यात रात्रीचं तापमान ५०च्या खाली जायला लागतं, तेव्हा झाडं पूर्णपणे घरात आणावीत. थोडक्यात तापमाना कसं आहे त्याप्रमाणे झाडं आत किंवा बाहेर ठेवावीत .
या..हु मला या विकेन्डला
या..हु मला या विकेन्डला मैत्रीणीने मोगर्याचे झाड दिले, तिने मार्च मध्ये घेवून ठेवले होते माझ्यासाठी. मी ते आता मोठ्या कुंडीत लावले. साधारण अर्धा फूट वाढलेले आहे. आता बघुयात बर्षभर इनडोअर वाढतो का मोगरा.
मोगर्याला वर्षभर फुलं येतात
मोगर्याला वर्षभर फुलं येतात का? माझ्या मोगर्याला उन्हाळ्यात फुलं आली होती, पण आता नाही येत आहेत. मी मुंबईत राहाते. सध्या इथे भरपूर पाउस आहे. झाड तसं बरं वाढतय पण फुलं का येत नाहियेत कुणी सांगु शकेल?
कुणी सांगेल का??
कुणी सांगेल का??
मोगरा seasonal फूलतो.
मोगरा seasonal फूलतो. उन्हाळयातच येतो अशी माझी माहीती आहे.
कोकणात चुडत्याने उन्हाळ्याच्या सुरवातीला मोगर्याच्या झाडाला जाळुन काढतात, मग त्यानंतर त्याला नवीन् पालवी फुटते आणि मग फुले येतात असं ऐकले आहे.
जाणकार योग्य माहीती देतील..
मोगरा seasonal फूलतो.
मोगरा seasonal फूलतो. उन्हाळयातच येतो अशी माझी माहीती आहे. >> भारतात मोगरा फक्त उन्हाळ्यातच फुलतो. मार्च ते जून.
कोकणात चुडत्याने उन्हाळ्याच्या सुरवातीला मोगर्याच्या झाडाला जाळुन काढतात, मग त्यानंतर त्याला नवीन् पालवी फुटते आणि मग फुले येतात असं ऐकले आहे.>>> वर माहिती दिली आहे
पानं हातानं तोडायची. नंतर ३-४ दिवस पाणी द्यायचं नाही. याला ओढ देणं म्हणतात.
धन्यवाद, अंजली आणी manak..
धन्यवाद, अंजली आणी manak..
काल सहज होम डेपो मध्ये गेले
काल सहज होम डेपो मध्ये गेले होते तर तिथे मला मोगर्याचे रोप दिसले (पंधरा डॉलरला) Tropical Jasmine नावाने, लगेच आनंदाने उड्या मारल्या आणि झाड विकत घेतले. झाड चांगलेच वाढलेले आहे, २ फुट तरी असेल, Belle of India प्रकारचे आहे . आता माझ्याकडे Belle of India आणि Maid of Orleans अशी दोन मोगर्याची झाडे झाली. ह्या हिवाळ्यात त्यांना टिकवणे हे माझे मिशन आहे :). वर अंजलीने दुवे दिलेत ही फुले कशी दिसतात त्याचे.
कोणाला हवे असेल तर सांगा तुमच्यासाठी घेवून ठेवेन.
माझ्या वरच्या पोस्ट मध्ये
माझ्या वरच्या पोस्ट मध्ये लिहील्याप्रमाणे मी २ ऐवजी दीडच झाड हिवाळ्यात टिकवू शकले. एक झाड (वेली मोगरा) आता त्याला चांगल्या फांद्या फुटताहेत आणि एक फूल पण आले.
दुसरे झाड मात्र कसेबसे एका फांदीवर जगतेय, खूप काळजी घेतल्यावरसुद्धा हिवाळ्यात सगळे झाड वाळून गेले, एकच फांदी हिरवी उरली होती आता तिला कोवळी पालवी फुटतेय. त्यामुळे ते जगेल असे वाटतेय.
यंदा होमडेपोत अजून आलेली नाहीय मोगर्याची रोपे, आली की शोनू आणि इतरांसाठी घेवून ठेवेन.
सध्या माझ्याकडे मोगर्याची ३
सध्या माझ्याकडे मोगर्याची ३ झाडे आहेत. तिन्ही झाडे घरातच खिडकीजवळ ठेवली आहेत आहेत, १ वेलीमोगरा आणि २ मोगर्याची छोटी झाडे. या दोन्ही छोट्या झाडांना चांगल्या कळ्या लागल्या आहेत नियमित फुले येत आहेत, पण वेलीमोगरा नुसताच ४ फूट वाढला आहे त्याला अजून काहीच फुले/कळ्या आलेल्या नाहीत. वेलीमोगर्याला काही ठराविक काळानंतरच फुले येतात का? फुले येण्यासाठी याची वेगळ्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते का?
रूनी, have patience कदाचित
रूनी, have patience
कदाचित पुढच्या सीझनला येतील फुलं.
मग आता कटींग वगैरे करायची गरज
मग आता कटींग वगैरे करायची गरज आहे का वेलीमोगर्याची, की काहीच करायची गरज नाही. Just wait and watch भूमिका घ्यायची?
वेलीमोगरा म्हणजे काय? वेल
वेलीमोगरा म्हणजे काय? वेल असते का मोगर्याची? इथे मिळते का पहायला हवं. मी आतापर्यंत मोगर्याचं छोटं झाडच पाहिलं आहे.
शैलजा अगदी वेल नाही पण झुडूप
शैलजा अगदी वेल नाही पण झुडूप आणि वेल याच्या मधल्या प्रकारात मोडेल असा प्रकार, म्हणजे आधाराशिवाय वर वाढत नाही, फोटो टाकते माझ्या मोगर्याच्या झाडाचे म्हणजे कळेल. आधार दिला नाही तर जमिनीलगत पसरेल असे असते झाड.
रूनी, आत्ता काढू नकोस कटींग,
रूनी, आत्ता काढू नकोस कटींग, एखाद्या जाडसर फांदीवरची पानं तोडून बघ. नेहमीप्रमाणे पाणी आणि खत चालू ठेव. नविन पानं येताना कळ्याही येतील.
शैलजा हा बघ वेलीमोगरा.
शैलजा हा बघ वेलीमोगरा.

मी पण आणलाय मोगरा ह्यावर्षी.
मी पण आणलाय मोगरा ह्यावर्षी. घराजवळच्या लोकल नर्सरीमधेच मिळाला. $१५ ला. १ महीना झाला लावून. आणल्यावर लगेच ५-६ कळ्या येऊन गेल्या. तो बहर गेल्यावर मग बरीचशी पाने खुडून टाकली. पाणी नियमीत घालतेच. आता १०-१५ कळ्या आल्या आहेत.
खत कधी घालू आता? कळ्या असतानाच घातलं तर चालेल की हा बहर संपल्यावर घालू?
आणि कलम कसं करावं ते पण सांगेल का कोणी? पुढे कधीतरी ते पण करून बघायचयं.
रुनी, पहिल्यांदाच पाहिला असा
रुनी, पहिल्यांदाच पाहिला असा मोगरा. विचारून पाहीन इथे. फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद.
Pages