खमंग भेंडी

Submitted by प्रज्ञा९ on 13 June, 2011 - 10:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. भेंडी पाव किलो- नीट कोरडी करून काचर्‍या केलेली
२. बारीक चिरलेला कांदा भेंडीच्या अर्धा होईल इतका
३. शेंगदाणेकूट पाव वाटी
४. ४-५ लसूण पाकळ्या तुकडे करून (अमेरिकेतल्या मोठ्या लसणीच्या २ पाकळ्या पुरतील)
५. २ आमसुले.
६. चिमूटभर चाटमसाला/ आमचूर पावडर (ऑप्शनल)
७. फोडणीचे सामान, तेल.
८. लाल तिखट १ टीस्पून, धने-जिरे पूड १ टीस्पून, गोडा मसाला १ टीस्पून. मीठ, साखर चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती: 

१. कढईत तेल तापवून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा.
२. फोडणीतच आमसूल, लसूण तुकडे, कांदा घाला.
३. कांदा परतून गुलाबी होत आला की त्यात दाण्याचंकूट घाला. चमचाभर कूट बाजूला ठेवा.
४. कूट नीट परतून घ्या. बाजूने थोडं तेल सुटायला लागलं की भेंडी घाला.
५. मोठ्या आंचेवर भेंडी हळूहळू परता, आणि उरलेलं कूट घाला.
६. भेंडी थोडी परतून झाली की मग तिखट, धने-जिरे पूड, गोडा मसाला आणि साखर घाला. चाट मसाला/ आमचूर पावडर घाला.
७. सर्वांत शेवटी मीठ घालून, झाकण न ठेवता भाजी खरपूस परतून शिजवून घ्या.

आणि सोबत फेटलेलं दही आणि लिंबू लोणच्याचा खार! Happy

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी.
अधिक टिपा: 

खरं तर भेंडीच्या भाजीची पाकृ ती काय द्यायची असा विचार करत होते. पण भारतात जशी छान भेंडी मिळते तशी इथे प्रत्येकच वेळी मिळेल असं नाही. पूर्वी ३-४ वेळा मी केली ती फारच गोळा भाजी झाली होती. Sad
एकदा पटेलमधून भाजी घेताना इंटरनॅशनल हॉटेलमधे असलेला एक देसी शेफ भेटला आणि त्याने मला एक रेसिपी सांगितली भेंडीची. त्यात मी माझी भर घालून हा प्रयोग केला. इतर वेळी भेंडी खमंग व्हायला फोडाणीत तेल जरा जास्त घालावं लागतं, पण या भाजीत नेहेमीसारखं तेल पुरतं. दाण्याचं कूट फोडणीत घातल्यामुळे कमी तेल + खमंगपणा हे दोन्ही होऊन जातं. हा माझा शोध. Happy

यात तिखटाच्या आवडीनुसार धने-जिरे/ तिखट कमी-जास्त करता येईल.

माहितीचा स्रोत: 
पटेलमधे भेटलेले शेफ महाशय, स्वतःचे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपी, प्रज्ञा. भेंडीच्या भाजीत मी कांदा कधी घालत नाही, भाजी मऊ पडेल असं वाटतं म्हणून. तुझ्या रेसिपीने करून बघेन एकदा. फोटो मस्तच.

छान आहे. दाणकुटाऐवजी/शिवाय डाळीचं पीठही लावून बघ.
भेंडी उभी चिरून त्यात हा सगळा मसाला भरून (भाजून घेतलेलं डाळीचं पीठ + तिळाचं कूट + तिखट + मीठ + आमचूर + गरम मसाला) तेलावर परतली तरी छान लागते.

च्यायला, आज मी भेंडीच्या प्रेमात पडलोय Happy

प्रज्ञा, ही तुझी करामत आहे.

बादवे, कांदा थोडा कमी आहे (ना?)

भेंडी मसाला खायच्ये आता...

डुआय, बरोबर निरीक्षण. Happy
चिरलेला कांदा बराच होता. मी बरोब्बर भेंडीच्या अर्धाच घातलाय भाजीत. (तो मात्र अर्ध्याहून कमी नाहिये हां! Happy )

बाई, तुम्ही सांगितलिये तशीपण करून बघेन (आणि फोटो टाकेन Happy )

भेंडी सारखी बुळचट भाजी मला कधीच आवडली नाही पण एके दिवशी देशात सुनहरी भेंडी (अ‍ॅस अ स्टार्टर) खाल्ली आणि तेंव्हापासून स्टार्टर म्हणून भेंडी आवडली. मग भेंडी आमचुर वगैरे प्रकार पण आवडले.
न्युयॉर्क मध्ये दरबार नावाचे एक हॉटेल आहे. (लेक्झींग्टन आणि ४५ ), तिथे पण अगदी सुनहरी भेंडी नाही पण एकदम जबराट भेंडी स्टार्टर मिळतं.

ही भाजी दाणे कुट घालून आई करते, कोरडी मसाला भेंडी सारखी. कांदे टाकून पाहावेत. मजा येईल असे दिसते.

नवर्‍यावर प्रयोग करुन बघेन.
सावनी, भेंडीत कांदा घातला तर जरा सुसह्य होते. भाजी शिजल्यावर लिंबू पिळल्यास तारा निघून जातात.

छान रेसिपी. (वाट बघत होतो )
छान मिळाल्यात कि भेंड्या. नायजेरियात एक इंच व्यासाच्या आणि २ इंच उंचीच्या भेंड्या मिळायच्या (ओक्रा) तिथे ते लोक सूपला तार येण्यासाठी वापरतात. (हो त्यांना आवडते ) त्याची पण अशी परतून भाजी छान व्हायची.
गोव्यात छान लांब भेंड्या मिळायच्या. तिथे त्या नगावर विकतात.

हा ही प्रकार छान आहे. अमसुल घातल्यामुळे तारा पण येत नाहीत.
मी पण कुरकुरीत, भरली आणि कांदा,टॉमेटो,बटाटा, गरममसाला घालुन पण करते. सगळ्या प्रकारे छान लागते.

मस्तच प्रज्ञा,
मी पण कांदा नव्हते घालत इतके दिवस, आता करून पाहते. हो लिंबु पिळते मी सुद्धा. शेवटच्या फोटोत रसलिंबु आहे का ग? Happy

ह्म्म्म तोंडाला पाणी सुटलं... बाय द वे... भेंडिच्या भाजीला तार आली ना तर आमच्याकडे आज तारे बंधुंचं नाटक आहे वाटतं असा टोमणा मारतात Proud

मी भेन्डीची भाजी फोडणीला टाकून परतून मग चिन्चेचा कोळ, गुळ, तिखट आणि गोडा मसाला घालून करते, मस्त होते. अगदी अन्गासरशी रस ठेवायचा. तारही येत नाही. आता ही पण करेन.

मस्त मस्त. मी भेंडी फॅन आहे. ही चव बदल म्हणून करून बघेन. खरे सांगू ते लोणच्याचा खार अन पोळी पण भाव खाउन जातैत. दोन पोळ्या अन मग साईच्या दहीभाता बरोबर भेंडीची असली भाजी. टोटली वॉव.

मस्त!! माझीहि आवडती भेंडीची भाजी/ तिचे वेगवेगळे प्रकार.. आम्हीदेखिल अशिच बनवतो पण कुट न घालता किसलेलं खोबरं घालतो अगदि जास्त तेल न वापरता. मस्त होते.. छान रेसिपी हा पण. Happy

प्रज्ञा तोंडाला पाणि सुटलं तु सजवलेलं ताट पाहून.
भेंडी खूप आवडते मला... तुझी भाजी करण्याची पद्धत ही अगदी सुंदर.
आमचूर पावडर ऐवजी मी चिंच फोडणीच्या तेलातच घालते, त्याने भाजीला तार येत नाही म्हणे.. खूप लोक या भाजीत कांदा घालत नाहीत, पण मला आवडतो.. कूट मी कधीच वापरून पाहिले नाही. नेक्स्ट टाईम करेन तेव्हा घालून पाहिन. Happy

भाजी शिजताना झाकण लावलं की भेंडीला तार येते शिवाय तिचा रंग बदलतो. त्यामुळे ही भाजी पेशन्स ने उघडी ठेऊनच शिजवावी लागते.

Pages