खमंग भेंडी

Submitted by प्रज्ञा९ on 13 June, 2011 - 10:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. भेंडी पाव किलो- नीट कोरडी करून काचर्‍या केलेली
२. बारीक चिरलेला कांदा भेंडीच्या अर्धा होईल इतका
३. शेंगदाणेकूट पाव वाटी
४. ४-५ लसूण पाकळ्या तुकडे करून (अमेरिकेतल्या मोठ्या लसणीच्या २ पाकळ्या पुरतील)
५. २ आमसुले.
६. चिमूटभर चाटमसाला/ आमचूर पावडर (ऑप्शनल)
७. फोडणीचे सामान, तेल.
८. लाल तिखट १ टीस्पून, धने-जिरे पूड १ टीस्पून, गोडा मसाला १ टीस्पून. मीठ, साखर चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती: 

१. कढईत तेल तापवून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा.
२. फोडणीतच आमसूल, लसूण तुकडे, कांदा घाला.
३. कांदा परतून गुलाबी होत आला की त्यात दाण्याचंकूट घाला. चमचाभर कूट बाजूला ठेवा.
४. कूट नीट परतून घ्या. बाजूने थोडं तेल सुटायला लागलं की भेंडी घाला.
५. मोठ्या आंचेवर भेंडी हळूहळू परता, आणि उरलेलं कूट घाला.
६. भेंडी थोडी परतून झाली की मग तिखट, धने-जिरे पूड, गोडा मसाला आणि साखर घाला. चाट मसाला/ आमचूर पावडर घाला.
७. सर्वांत शेवटी मीठ घालून, झाकण न ठेवता भाजी खरपूस परतून शिजवून घ्या.

आणि सोबत फेटलेलं दही आणि लिंबू लोणच्याचा खार! Happy

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी.
अधिक टिपा: 

खरं तर भेंडीच्या भाजीची पाकृ ती काय द्यायची असा विचार करत होते. पण भारतात जशी छान भेंडी मिळते तशी इथे प्रत्येकच वेळी मिळेल असं नाही. पूर्वी ३-४ वेळा मी केली ती फारच गोळा भाजी झाली होती. Sad
एकदा पटेलमधून भाजी घेताना इंटरनॅशनल हॉटेलमधे असलेला एक देसी शेफ भेटला आणि त्याने मला एक रेसिपी सांगितली भेंडीची. त्यात मी माझी भर घालून हा प्रयोग केला. इतर वेळी भेंडी खमंग व्हायला फोडाणीत तेल जरा जास्त घालावं लागतं, पण या भाजीत नेहेमीसारखं तेल पुरतं. दाण्याचं कूट फोडणीत घातल्यामुळे कमी तेल + खमंगपणा हे दोन्ही होऊन जातं. हा माझा शोध. Happy

यात तिखटाच्या आवडीनुसार धने-जिरे/ तिखट कमी-जास्त करता येईल.

माहितीचा स्रोत: 
पटेलमधे भेटलेले शेफ महाशय, स्वतःचे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला हे भरली भेंडी/ भेंडी फ्राय वगैरे प्रकार करायचे आहेत एकदा, पण तेल जास्त लागेल म्हणून केलेच जात नाहीत! Sad

एकदा करून बघेनच. केली होती भरली भेंडी. पण एकूण भाजीचं रंगरूप बघून नवर्‍याने तूप-साखर पोळी खायला प्रेफरन्स दिला. मग माझा उत्साह मावळला.

मस्त Happy

भरलेली भेंडी भज्याच्या पीठात घोळवुन तळायची... यम्मी लागते Happy

@दिनेशदा, ते भेंडीच चिक्कट सूप प्यायल्येय मी... एका नायजेरीयन मित्राने मी व्हेजीटेरीयन म्हणुन खास त्याच्या पार्टीत ठेवलं होतं... बरं होतं.. पण ते खल्ल्यावर 'नरडं कस्स बुळबुळीत्त' झालं होतं Proud

काल या पद्धतीने केली होती भेंडी. छान झाली होती आवडली. मला भेंडी नुसती तेलावर हळद/मीठ घालून परतलेली आवडते त्यामुळे या भाजीत कांदा, शेंगदाणे वगैरे गोष्टी मला झेपत नाहीत. पहिल्यांदाच हे सगळे घालून भाजी केली आणि आवडली. धन्यवाद.
मृन्मयीने दिलेल्या पद्धतीने भेंडीची भाजी मी नेहमी पार्टीसाठी करते हमखास हीट होते.

प्रज्ञा, मी केली आज या पद्धतीने. छान झाली होती, धन्यवाद. मला भेंडी आवडतेच, परतून, चिंच-गुळाची तर प्रचंडच आवडते. भरली भेंडीही मस्त लागते.

आणखीन एक भाजी अ‍ॅड झाली. Happy

हो न नुसती जरासा भेंडीला चीर देवुन लसुण, मोहरीची फोडणी देवुन वरुन धणे-जिरेची पुड भुरभुरुन परतलेली भेंडी काय मस्त लागतात Happy
दक्षे हो ग.. मलाहि आश्चर्य वाटतं काहि लोकांना भेंडी आवडत नाहि हे ऐकुन.

भेंडी प्रेमींनो, गुगल सर्च मधे 'okra recipes' देऊन बघा. डझनावारी नव्या रेसिप्या सापडल्या मला.

@दक्षे, तुझ्यासाठी भेंडीच्या सूपची रेसिपी पण आहे त्यात Wink

भेंडी थोडा वेल झाकून शिजवल्यानंतर झाकण काढूनच परतली की तार येत नाही
भेंडीत लिंबू/आमचूर्/कोकम असे काही घातले की तार येत नाही.. अनुमोदन
टोमॅटोही चालतो टाकलेला.......
बाकी रेसेपी छानच प्रज्ञा...
नक्की करुन बघणार Happy

लाजो, चांगली तार आली म्हणजे चांगले सूप झाले, असे समजतात.
ओक्रा सूप म्हणतात. त्यात टोमॅटो, लाल मिरच्या,मक्याचे दाणे आणि एक प्रकारचा याम घालतात. मग कसावाची उकड काढून त्याचे गोळे करतात. आणि त्या गोळ्यांबरोबर खातात.

गुलकंदासारखा भेंडेकंद पण करतात. थापा नाही मारत, लक्ष्मीबाई घुरंधराच्या पुस्तकात आहे तो.

लाजो, चांगली तार आली म्हणजे चांगले सूप झाले, असे समजतात.<< हो ना... पण ते इतकं गिळगीळीत्त लागतं... त्याने एव्हढं माझ्यासाठी आठवणीने केलन म्हणुन मी पहिलं बोलभर गप खल्लं...आणि वर लेमोनेड ढोसलं.... Proud

अरे वा! इतक्या प्रतिक्रिया!
धन्यवाद! Happy

रूनी, आडो, करून इथे सांगितल्याबद्दल तुम्हाला अजून धन्यवाद Happy

नानबा, फार कशाला, खुद्द मला भेंडी आवडत नसे शाळेत असताना(खावी लागे ते वेगळं). मग कधी आणि कशी माहिती नाही, आवडायला लागली!

लाजो __/\__

अंजली, तू अजून ब्यॉक वगैरे लिहून वर तारा नको गं जोडू! Proud

भाजी करून बघायला हवी. लसूण कधी घातली नव्हती भेंडीच्या भाजीत, हा नवीन प्रयोग नक्कीच करून बघेन. माझ्या सासूबाई अशी भाजी करताना हळद, तिखट मीठ आणि आमसुलं भेंड्याच्या काचर्‍या चिरल्याबरोबर त्याच्यात मिक्स करून घेतात. तसं केलं तरी तारा सुटत नाहीत.

जर रसभाजी करायची असेल तर फोडणीत भेंडीचे तुकडे नीट परतून घ्यायचे, त्यावर आंबट चिंच्/आमसुल घालायचं आणि मग खोबर्‍याचं वाटण घालायचं म्हणजे तारा सुटत नाहीत.

मी नेहेमी अशी भेंडी करायचे पण कांदा कधीच घातला नव्हता. काल तुझ्या रेसिपिने कांदा घालुन करुन बघितली. मस्तच लागली Happy

कवळी भेंडीची भाजी कशीपण करा मस्तच लागते.

भेंडी जून असेल तर मात्र सरळ तिचे बिया काढून घेऊन त्याची भाजी करायची. ((भेंडी इतकी जून हवी की चाकूने सहज चिरता येणार नाही ) Happy

प्रज्ञा, भाजी केली .. मस्त झाली आहे ..

आधी वाटत होती नेहेमीच्या परतलेल्या भाजीत एव्हढे निरनिराळे मसाल्याचे पदार्थ कशाला .. पण एकूण रसायन जमलंय छान!

मस्त आहे रेसिपी. :). मी या भाजीत शेंगदाण्याचा कूट नाही घातला कधी, आता बघेन.
मी इथे करावली नावाच्या फेमस ठीकाणी एक अप्रतिम भेंडीची भाजी खाल्ली होती, जिरे-ओलं खोबरं घातलेली. एकदम छोटी आणि कोवळी भेंडीच लागते पण त्यासाठी. ओल्या खोबर्‍याची चव सहीच लागते त्यात, फार काही मसाले पण नव्हते घातलेले, पण मस्त परतून घेतली होती.

आज पहाटेच जाग आली म्हणून माबोवर आले तर हाच धागा वर होता. एक तर काळ उपास केलेला त्यात हे खमंग वाचूनच इतकी भूक लागली कि प्रतिसाद गी देता नाही आला. एनीवे, खूप छान आहे डिश Happy आता करून पाहीन.

भेंडी....ऑलटाईम फेवरेट !!
<< मला भेंडी नुसती तेलावर हळद/मीठ घालून परतलेली आवडते त्यामुळे या भाजीत कांदा, शेंगदाणे वगैरे गोष्टी मला झेपत नाहीत.>> रुनी, अगदी सेम !
पण ह्यापद्धतीने करून पाहीन आता.
लग्न झाल्यावर पहिल्याच महिन्याभरात मी मसाला भेंडी करण्याचा पराक्रम केला......इतक्या वर्षानंतरही मला त्या " चायनीज भेंडी " वरून ऐकावं लागतं Proud
परत मसालाभेंडी करायची अजूनही हिंमत झाली नाही !

Pages