सारी सेना घरात रे

Submitted by ह.बा. on 10 June, 2011 - 05:33

गडगडगडगड गडाट रे
पाऊस आला भरात रे
काऊ, खारू, भू भू, म्याऊ
सारी सेना घरात रे

सळसळसळसळ उठली रे
पाने खेळत सुटली रे
झाड नी वारा झिम्मड जोडी
पाऊस येता तुटली रे

टपटपटपटप टपोर रे
आभाळाची गलोर रे
नाकावरती थेंब मारते
जाता त्याच्या समोर रे

कडकडकडकड कडाक रे
वीज लखलखे लखाक रे
कुशीत घे ना आई लवकर
काळीज धडधड धडाक रे

क्षणात भरभर झरा भरे
खळखळखळखळ नाद करे
बांध तोडूनी अवखळ पाणी
हवी तशी मग वाट धरे

नाजूक नाजूक पाने रे
गवतावरती गाणे रे
धरणीआईसाठी पावसा
असेच व्हावे येणे रे!

गुलमोहर: 

छान

मस्तच Happy

मस्त Happy

छान आहे तालात लयीतली कविता!

आवाजदर्शक शब्दांमुळे वाचायला मजा येतेय!
आवडली Happy

Pages