मिठू मिठू पोपट, पेरु खातो कच्चा
आणि बाळाला म्हणतो... लुच्चा
आपल्या लहानपणीचे हे बडबडगीत. नुसते बडबडगीतच नव्हे तर आपल्या बालपणाच्या आठवणीत एक पेरुचे झाडही असतेच असते.
कचाकचा चावलेले तुरट दोडे पेरू, झाड मजबूत असल्याने, झाडावर चढण्यासाठी केलेला आटापिटा. चाळा म्हणून चबर चबर चावलेली पाने. कधीतरी एक नेमके खोड तोडून केलेली बेचकी. सहज नेम धरुन, गंमत म्हणून फ़ोडलेली कुणाची तरी काच..
समजा झाड नसेल तर शाळेच्या बाहेरचा पेरुवाला. अगदी निवडून निवडून घेतलेला, मोठ्यातल्या मोठ्या आकाराचा पेरु. पण तो फ़ार पिकलेला चालायचा नाही. जरा पोपटी रंगावरच असायला हवा असायचा. मग त्या भैयाकडून त्याच्या करुन घेतलेल्या चार फ़ोडी. त्यात भरुन घेतलेले तिखट मीठ. आणि मग एका खास मित्राला दिलेल्या त्यातल्या दोन फ़ोडी. कुडुम कुडूम चावलेल्या बिया.
आता जे चाळीशीत वगैरे आहेत त्यांना पेरुचा म्हणून असा एक खास आकार आठवत असेल. त्या आकाराचे पेरू आता फ़ार दुर्मिळ झालेत. आता दिसतात ते साधारण गोल आकाराचे. त्याला अॅपल गावा असा शब्द आहे. (स्ट्रॉबेरी गावा आणि लेमन गावा असेही प्रकार असतात, आणि ते अनुक्रमे गुलाबी व हिरवे असतात.) तरी आपल्याकडे गुलाबी आणि पांढरे पेरू दिसतात.
पेरुचे शास्त्रीय नाव Psidium guajava. हेच कूळ आहे जांभूळ, जाम आणि लवंगाचे. याचे मूळ मेक्सिको मानले जाते पण आता त्याचा प्रसार जगभर झालेला आहे. गावा हा मूळ स्पॅनिश शब्द आहे आणि पश्चिमेकडील बहुतेक देशांत साधारण अशाच उच्चाराचा शब्द या फ़ळासाठी वापरतात.
पेरु किंवा तत्सम शब्दाचा उगमही स्पॅनिश किंवा पोर्तूगीज भाषेतून आलेला आहे. (त्याचे साम्य पियर या शब्दाशी आहे ) भारताच्या आजूबाजूच्या अनेक देशांत तसाच शब्द वापरतात.
पेरुचे झाड आपल्याकडे साधारण मध्यम उंचीचेच आढळते. साधारण १५ ते २० फ़ूट उंचीचे असते. फ़ांद्या लवचिक असल्या तरी मजबूत असतात. पेरूची पाने साधी, समोरासमोर, खरखरीत असतात. त्या पानांना स्वत:चा असा एक खास वास असतो. पेरुची पाने चुरगळ्यावर हा वास जास्तच तीव्र येतो. (हे या कूळातील सर्वच झाडांना लागू पडते.)
हे वरच्या फ़ोटोत दिसणारे पेरुचे झाड मात्र बरेच उंच वाढलेय. हे माझ्या घरासमोरच आहे. फ़ळांनी नुसते लगडलेय. रोज पन्नासेक धम्मक पिवळे पेरू झाडाखाली पडलेले असतात. इतके अमाप पेरु लागतात कि पक्षीही खाऊन खाऊन कंटाळतात.
वरचाच फोटो जरा जवळून...
पेरू चे फूल हे पांढरे, पाच पाकळ्यांचे असते. पण यात पाकळ्यांपेक्षा पुंकेसरच जास्त मोठे असतात. फ़ूलाच्या मागे असलेल्या छोट्या भागाचाच पुढे पेरू होतो. आधी तूरट लागणारे हे फळ, पुढे गोड होत जाते. आणि पानापेक्षा वेगळा असा खास गंध या फळाला यायला लागतो.
या गंधामूळेच अनेक प्राणी याच्याकडे आकर्षित होतात आणि जंगलात या झाडाचा प्रसार त्यांच्या मार्फ़तच होतो. पोपटासारखे अनेक पक्षीही या फळावर तूटून पडतात. पण त्यांना गरापेक्षा बिया खायला जास्त आवडते. तरीही फळातल्या सगळ्याच बिया काही ते खात नाहीत. पेरुतल्या चिकट गरामुळे या बिया त्यांच्या चोचींना चिकटून बसतात आणि त्यांनी फ़ांद्याना चोच घासल्यावर बी तिथे पडते. आणि यथावकाश रुजते.
माणसाला मात्र या बिया खाताना त्रास होतो कारण त्या दातात अडकतात. त्यामूळे बिनबियांचे पेरू निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतात आणि त्यात काही प्रमाणात यश मिळालेही आहे. (अजून आपल्याकडे मात्र हे पेरू बाजारात दिसत नाहीत.)
साधेसे दिसणारे आणि मुबलक मिळणारे हे फ़ळ, गुणांनी पण श्रेष्ठ आहे. थोडेफ़ार प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ असले तरी, जीवनसत्व ए आणि सी, यात भरपूर असते. (पेरू खाऊन सर्दी होते हा गैरसमज आहे.) यात ब गटातील काही जीवनस्त्वे असतात तसेच फ़ॉस्फ़ोरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम देखील असते.
आपल्याकडे इलाहाबादचे पेरु जास्त प्रसिद्ध आहेत. पण नाशिक, शिरडी, नगर, पुणे भागातही याचे भरपूर पिक निघते. रस्त्यालगत याच्या गाड्या दिसतातच. बडोदा, जामनगर भागातही याची झाडे भरपूर आहेत.
पेरू आपण वर लिहिल्याप्रमाणे कापून तिखटमीठ लावून खातो. काळे मीठ वा चाट मसाला टाकूनही
तो छान लागतो. अतिपुर्वेकडच्या देशात तो सोया सॉसबरोबर खातात.
पेरुचा कायरस, चटणी, शिकरण उत्तम लागते. उंधियू सारख्या भाजीतही तो वापरता येतो. पेरुमधे पेक्टीनचे प्रमाण जास्त असल्याने, त्याची जेली, जॅम चांगले होतात. गोव्याकडे पेरुपासून एक खास प्रकारच्या वड्या करतात. (पेरू शिजवून छानून घेतात. एक किलो गराला ८०० ग्रॅम साखर घालून, ते मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवतात आणि मग त्याच्या वड्या पाडतात ) या वड्या बाजारात तयार मिळतात आणि त्या खुप चवदार लागतात.
पेरुच्या पानापासून तंबळी नावाची कढी पण करतात. पेरुच्या पानाचे इतरही औषधी उपयोग आता लक्षात
येत आहेत.
पेरूचा रस वा नेक्टर हा प्रकार मात्र आपल्याकडे अजून दिसत नाही. अरब देशांत तो लोकप्रिय आहे.
इजिप्त मधले पेरू या रसासाठी वापरतात.
वरच्या फ़ोटोतला रस इजिप्तमधलाच आहे. हा रस नुसता प्यायला उत्तम लागतो, पण दुधाबरोबर त्याची लज्जत आणखी वाढते.
पेरुचे लाकूड आणि पाला देखील, बार्बेक्यू साठी वापरतात. यावर भाजलेला मांसाला एक वेगळाच गंध येतो.
छानच माहिती, दिनेशदा. पेरू
छानच माहिती, दिनेशदा. पेरू काही माझ्या आवडत्या फळांत नाही. शिवाय पावसाळ्यात पेरूत पांढर्या आळ्या निघतात. त्यामुळे खाणे टाळावे किंवा निदान आधी कापून मीठ लावून ठेवून जरावेळाने खावे. आळ्या असतील तर बाहेर येतात.
पेरू म्हटलं की मला शाळेत बहुधा दुसरी की तिसरीला असलेला हा धडा आठवतो.
पेरू घ्या पेरू, पेरू घ्या पेरू
तीस पैशाला तीन पेरू.
ताजे ताजे पेरू, गोड गोड पेरू
आई पेरू घेतेस? चांगले ताजे दिसतात.
हाक मार पेरूवाल्याला, तीस पैसे दे, तीन चांगले पेरू निवडून घे
सुधा, उषा या. माधव पेरू आण. मी चिरून देते.
(इथे आई बहुधा चार चार फोडी करून आपल्या तीनही मुलांना देते. मग ते आईला पेरू मिळाला नाही म्हणून आपल्यातल्या दोन दोन फोडी देतात. मग आईकडे खुपच फोडी झाल्याने ती त्यांना एक-एक फोड परत देते असा कौटुंबिक जिव्हाळ्याचा संवाद होता. तो नीट आठवत नाहीये.) (भाषेबरोबरच गणितही शिकवण्याचा प्रयत्न!)
पेरू किती छान आहे. पेरू किती गोड आहे.
पेरूची फोड तर फारच गोड. आईची फोड तर फारच गोड.
मामी कित्ती छान आठवण करुन
मामी कित्ती छान आठवण करुन दिलीस.
मामी, परत गोव्याला गेलीस कि
मामी, परत गोव्याला गेलीस कि आवर्जून पेरूची जेली शोध. नक्की आवडेल तो प्रकार.
जागूशिवाय फोटोचे कुणी मनावर घेतलेले दिसत नाही !
पेरूची जेली मी खाल्लेय. कुठे,
पेरूची जेली मी खाल्लेय. कुठे, कधी आठवत नाहीये. पण मला मुळात पेरूचा वास काहीसा डोक्यात जातो. तरी पेरू खाते मी, पण फार आवडीनं नाही. त्यातल्यात्यात पेरू नेक्टर आवडतं. आता एकदा दुधात घालून पिऊन बघेन.
दिनेशदा मी तुमची जबरदस्त fan
दिनेशदा मी तुमची जबरदस्त fan आहे. देश-विदेशि पदर्थ खाणे आणि मग घरच्या लोकान्वर अत्याचार करणे माझा आवदता उद्योग आहे.
इथे बरच कहि लिहायचि इच्चा आहे. पण typing is such a tough task marathi typingsathi kahi suchavu shakal ka.
experiencing food, architecture people and culture is my way of traveling . and wish I can pen down .
Peru balpanat gheun gela . thanks.
by the way chorun khallelya peruchi chav sarvan mast aste na?
दिनेशदा, सहीच पेरुपुराण..
दिनेशदा, सहीच पेरुपुराण..
आता जे चाळीशीत वगैरे आहेत त्यांना पेरुचा म्हणून असा एक खास आकार आठवत असेल.>>>> असच काही नाही.. आम्हाला शाळेत पेरुचं चित्र काढायला लागायचं तेव्हा ते त्याच्या मुळ आकारातच काढावं लागत होतं.. त्यामुळे आमच्या पिढीलाही तो आकार माहित आहेच
जागु, प्रचि सुरेखच... भाउंच व्यचि पन भारी
झम्पि, नेटाने प्रयत्न करायचा,
झम्पि, नेटाने प्रयत्न करायचा, आम्ही संभाळून घेऊ.
चिमुरी... म्हणजे तूम्हीपण तिच चित्रं काढत होता का ?
कुंडितले फूल, आंबा, पेरु, केळे, झेंडावंदन, बोट, फूगेवाला, सूर्यास्ताचा देखावा.... मज्जा ना ?
दिनेशदा, छान लेख. मामी,
दिनेशदा, छान लेख.
मामी, धड्याने नॉस्टॅल्जिक केलं.
<< म्हणजे तूम्हीपण तिच चित्रं काढत होता का ?
कुंडितले फूल, आंबा, पेरु, केळे, झेंडावंदन, बोट, फूगेवाला, सूर्यास्ताचा देखावा.... मज्जा ना ?>>
दिनेशदा, तेव्हाचं सोडा. लेकाला चित्रं काढून दाखवताना आजही तीच चित्रं काढली जातात माझ्याकडून
Pages