फलश्रुती भाग ७ - पेरु

Submitted by दिनेश. on 4 June, 2011 - 01:58

मिठू मिठू पोपट, पेरु खातो कच्चा
आणि बाळाला म्हणतो... लुच्चा

आपल्या लहानपणीचे हे बडबडगीत. नुसते बडबडगीतच नव्हे तर आपल्या बालपणाच्या आठवणीत एक पेरुचे झाडही असतेच असते.

कचाकचा चावलेले तुरट दोडे पेरू, झाड मजबूत असल्याने, झाडावर चढण्यासाठी केलेला आटापिटा. चाळा म्हणून चबर चबर चावलेली पाने. कधीतरी एक नेमके खोड तोडून केलेली बेचकी. सहज नेम धरुन, गंमत म्हणून फ़ोडलेली कुणाची तरी काच..

समजा झाड नसेल तर शाळेच्या बाहेरचा पेरुवाला. अगदी निवडून निवडून घेतलेला, मोठ्यातल्या मोठ्या आकाराचा पेरु. पण तो फ़ार पिकलेला चालायचा नाही. जरा पोपटी रंगावरच असायला हवा असायचा. मग त्या भैयाकडून त्याच्या करुन घेतलेल्या चार फ़ोडी. त्यात भरुन घेतलेले तिखट मीठ. आणि मग एका खास मित्राला दिलेल्या त्यातल्या दोन फ़ोडी. कुडुम कुडूम चावलेल्या बिया.

आता जे चाळीशीत वगैरे आहेत त्यांना पेरुचा म्हणून असा एक खास आकार आठवत असेल. त्या आकाराचे पेरू आता फ़ार दुर्मिळ झालेत. आता दिसतात ते साधारण गोल आकाराचे. त्याला अ‍ॅपल गावा असा शब्द आहे. (स्ट्रॉबेरी गावा आणि लेमन गावा असेही प्रकार असतात, आणि ते अनुक्रमे गुलाबी व हिरवे असतात.) तरी आपल्याकडे गुलाबी आणि पांढरे पेरू दिसतात.

पेरुचे शास्त्रीय नाव Psidium guajava. हेच कूळ आहे जांभूळ, जाम आणि लवंगाचे. याचे मूळ मेक्सिको मानले जाते पण आता त्याचा प्रसार जगभर झालेला आहे. गावा हा मूळ स्पॅनिश शब्द आहे आणि पश्चिमेकडील बहुतेक देशांत साधारण अशाच उच्चाराचा शब्द या फ़ळासाठी वापरतात.

पेरु किंवा तत्सम शब्दाचा उगमही स्पॅनिश किंवा पोर्तूगीज भाषेतून आलेला आहे. (त्याचे साम्य पियर या शब्दाशी आहे ) भारताच्या आजूबाजूच्या अनेक देशांत तसाच शब्द वापरतात.

पेरुचे झाड आपल्याकडे साधारण मध्यम उंचीचेच आढळते. साधारण १५ ते २० फ़ूट उंचीचे असते. फ़ांद्या लवचिक असल्या तरी मजबूत असतात. पेरूची पाने साधी, समोरासमोर, खरखरीत असतात. त्या पानांना स्वत:चा असा एक खास वास असतो. पेरुची पाने चुरगळ्यावर हा वास जास्तच तीव्र येतो. (हे या कूळातील सर्वच झाडांना लागू पडते.)

हे वरच्या फ़ोटोत दिसणारे पेरुचे झाड मात्र बरेच उंच वाढलेय. हे माझ्या घरासमोरच आहे. फ़ळांनी नुसते लगडलेय. रोज पन्नासेक धम्मक पिवळे पेरू झाडाखाली पडलेले असतात. इतके अमाप पेरु लागतात कि पक्षीही खाऊन खाऊन कंटाळतात.

वरचाच फोटो जरा जवळून...

पेरू चे फूल हे पांढरे, पाच पाकळ्यांचे असते. पण यात पाकळ्यांपेक्षा पुंकेसरच जास्त मोठे असतात. फ़ूलाच्या मागे असलेल्या छोट्या भागाचाच पुढे पेरू होतो. आधी तूरट लागणारे हे फळ, पुढे गोड होत जाते. आणि पानापेक्षा वेगळा असा खास गंध या फळाला यायला लागतो.

या गंधामूळेच अनेक प्राणी याच्याकडे आकर्षित होतात आणि जंगलात या झाडाचा प्रसार त्यांच्या मार्फ़तच होतो. पोपटासारखे अनेक पक्षीही या फळावर तूटून पडतात. पण त्यांना गरापेक्षा बिया खायला जास्त आवडते. तरीही फळातल्या सगळ्याच बिया काही ते खात नाहीत. पेरुतल्या चिकट गरामुळे या बिया त्यांच्या चोचींना चिकटून बसतात आणि त्यांनी फ़ांद्याना चोच घासल्यावर बी तिथे पडते. आणि यथावकाश रुजते.

माणसाला मात्र या बिया खाताना त्रास होतो कारण त्या दातात अडकतात. त्यामूळे बिनबियांचे पेरू निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतात आणि त्यात काही प्रमाणात यश मिळालेही आहे. (अजून आपल्याकडे मात्र हे पेरू बाजारात दिसत नाहीत.)

साधेसे दिसणारे आणि मुबलक मिळणारे हे फ़ळ, गुणांनी पण श्रेष्ठ आहे. थोडेफ़ार प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ असले तरी, जीवनसत्व ए आणि सी, यात भरपूर असते. (पेरू खाऊन सर्दी होते हा गैरसमज आहे.) यात ब गटातील काही जीवनस्त्वे असतात तसेच फ़ॉस्फ़ोरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम देखील असते.

आपल्याकडे इलाहाबादचे पेरु जास्त प्रसिद्ध आहेत. पण नाशिक, शिरडी, नगर, पुणे भागातही याचे भरपूर पिक निघते. रस्त्यालगत याच्या गाड्या दिसतातच. बडोदा, जामनगर भागातही याची झाडे भरपूर आहेत.

पेरू आपण वर लिहिल्याप्रमाणे कापून तिखटमीठ लावून खातो. काळे मीठ वा चाट मसाला टाकूनही
तो छान लागतो. अतिपुर्वेकडच्या देशात तो सोया सॉसबरोबर खातात.
पेरुचा कायरस, चटणी, शिकरण उत्तम लागते. उंधियू सारख्या भाजीतही तो वापरता येतो. पेरुमधे पेक्टीनचे प्रमाण जास्त असल्याने, त्याची जेली, जॅम चांगले होतात. गोव्याकडे पेरुपासून एक खास प्रकारच्या वड्या करतात. (पेरू शिजवून छानून घेतात. एक किलो गराला ८०० ग्रॅम साखर घालून, ते मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवतात आणि मग त्याच्या वड्या पाडतात ) या वड्या बाजारात तयार मिळतात आणि त्या खुप चवदार लागतात.

पेरुच्या पानापासून तंबळी नावाची कढी पण करतात. पेरुच्या पानाचे इतरही औषधी उपयोग आता लक्षात
येत आहेत.

पेरूचा रस वा नेक्टर हा प्रकार मात्र आपल्याकडे अजून दिसत नाही. अरब देशांत तो लोकप्रिय आहे.
इजिप्त मधले पेरू या रसासाठी वापरतात.

वरच्या फ़ोटोतला रस इजिप्तमधलाच आहे. हा रस नुसता प्यायला उत्तम लागतो, पण दुधाबरोबर त्याची लज्जत आणखी वाढते.

पेरुचे लाकूड आणि पाला देखील, बार्बेक्यू साठी वापरतात. यावर भाजलेला मांसाला एक वेगळाच गंध येतो.

गुलमोहर: 

छान.

मस्त Happy

असं ऐकलं आहे की, पेरुमधे असलेल्या असंख्य बियांपैकी एक (एकच) ठराविक बी असते, जी सर्वात जास्त फायदेशीर असते. म्हणून पेरु चिरुन न खाता, अख्खा एकट्यानेच खावा, जेणेकरुन "ती" बी पोटात जाईल.

आणि तसंही पेरुच्या झाडावर चढून, झाडावरच बसून, पेरु तोडून तिथेच खाण्यातली मजाच निराळी!

दीनेश्दादा वैट्ट आहे. माला पेरू खूप आवड्तो. तर इथे नूसते फोटो टाकलेत. पेरू माझा ऑलटाईम फेवरिट फळ आहे. असे खास एक बी वाले पेरू मी खूप खाल्ले असणार कारण मी कधीच पेरू शेअर करत नाही. जास्त न पिकलेला व आतून स्वच्छ पांढरी, हिरवी कलर्स्कीम असलेला पेरू सर्वात बेस्ट. गाडीवाला तुमाला पीवळापेरू देऊ लागला तर घेऊ नका. पलून जा. एक ऐश्वर्र्या नावाचा पण पेरू अस्तो. गुलाबी पेरू ही शुद्ध फसवणूक आहे तो गोड लागत नाही. डेक्कन वर जगात सर्वात मस्त पेरू मिळतात.

नेहेमीप्रमाणे मस्तच !
@अश्विनीमामी > डेक्कन तुमच फेवरिट दिस्तय ! (तिथली तोंडली छान, पेरु छान):D .

दिनेशदा छान माहीती. तुमच्या वर्णनाने तोपासु.

पेरुचा पाला दाढ दुखत असेल तर कुटुन त्या दाढेत भरतात त्याने वेदना कमी होतात.

पेरुचा ज्युसही हल्ली बाजारात खुप प्रसिद्ध झाला आहे.

मी लहान असताना आमच्याकडे पेरुचे मोठ्ठे झाड होते. आम्ही लहान मुल त्या झाडावर चढुन उड्या मारायचो. आताही माझ्या सासर्‍यांनी इथे झाडे लावलेली आहेत. पावसात त्याला भरपुर पेरु लागतात आणि गोड आहेत.

माझे काही झब्बू हे मी काहीफोटो अजुन मिळाल्यावर प्रकाशचित्र मध्ये टाकणार आहे.
पेरुच्या कळ्या

पेरुचे फुल

छोटे पेरु

दिनेशदा.. मस्त माहिती. पेरूचा रस इतका स्वच्छ निघतो हे बघुन आश्चर्य वाटले. मला वाटले सिताफळासारख द्राव निघेल.

गुलाबी पेरू ही शुद्ध फसवणूक आहे तो गोड लागत नाही.
अश्विनी, आंबोलीला ये गुलाबी पेरू खायला. परत सफेद पेरुंकडे बघणारही नाहीस तु.

जागू, मला फूलाचा फोटो हवाच होता. मी म्हणालो नाही, पेरुच्या झाडाशी आपले बालपण निगडीत आहे म्हणून ?
साधना, बिया असलेल्या फळांचा रस काढण्यासाठी (डाळिंब, द्राक्ष, पेरू, संत्रे आदी) एक खास उपकरण मिळते. त्यात बिया न चुरडता केवळ रसच निघतो. काही फूड प्रोसेसर मधे पण ही सोय असते म्हणा, पण हे यंत्र हाताने चालवतात. याने अननस, सफरचंद आदी फळांचा पण छान रस निघतो.

सुंदर माहीती. आपल्याकडे नाशीकचे पेरु प्रसिध्द आहेत, द्राक्षा प्रमाणे. आकार आणि उत्तम चविसाठी. एकएक पेरु ३००ते४००ग्राम किंवा त्याहुन अधिक वजनाचा असतो.

३ वर्षापुर्वि वसई मध्ये ग्रिनगार्डन नर्सरीतील झाडावर मी १२किलो वजनाचा पेरु पाहिला होता.आणि झाड जेमतेम ५-६ फुटाचे होते.

दिनेशदा,
पेरुबद्दल छान माहिती मिळाली !
Happy
मी लहानपणी ३-४ प्रकारचे पेरु पाहिल्याचं आठवतयं,त्यांची शास्त्रीय नावे/जाती तर मला माहीतच नाहीत.
त्यातले शेतातल्या,रानात वाढलेल्या झाडावर पाहिलेले काही पेरु हे दिसायला थोडे कमी हिरवे,साधारण काळसर साल चावायला कठीण, बीया मोठ्या,चव कमी गोड.तर काही पेरु हे दिसायला लाईट हिरवे ,साल मऊ,चवीने खुप गोड, काही पेरु आतुन गुलाबी लालसर रंग असलेले पाहिले,तर काही पेरु अगदीच मऊ सालीचे लगेच पिकणारे,खुप बिया असलेलेही पाहिले.
Happy

मी लहान असताना आजोळी अंगणातच पेरुचे एक मोठ्ठे झाड होते. बहुतेकवेळा मी आणि एक जानी दोस्त (बहुतेक बाकीचे पोरं झाडावर चढायला मला/आजोंबाना घाबरायचे) त्या झाडावर चढुन उड्या मारायचो. मग झाडावरचे एक-एक चांगले आवडलेले पेरु शोधुन खाली द्यायच, आणि त्यातले १-२ पेरु मग फांदीवर निवांत बसुन खाऊनच खाली उतरायच. झाडावरच्या ऊंचटोकावर बसुन वरती आकाश आणि गल्लीतल्या आजुबाजुला काही घरांची बहुतेक कौलारु छत पुर्ण बघताना खुप मजा यायची.

पण मी ऐकल्याप्रमाणे पेरुचं झाड अगदी अंगणात किंवा मुख्य दरवाज्यासमोर असु नये अस म्हणतात यात काही तथ्य आहे का ?

>> हेच कूळ आहे जांभूळ, जाम आणि लवंगाचे.
आयला... काय साम्य आहे यात?!!

पेरूतील सगळ्या बियातील एक बी मुळे खोकला (का दुसरं काहितरी) बरं होतं असं लहानपणी म्हणत. मुलांनी अख्खा पेरू खावा म्हणुन मोठ्ठ्यांनी पसरलेली ही अफवा होती हे मला तेंव्हाच कळलं होतं.

सॅम, पानांचा प्रकार, पानांना येणारा तीव्र वास, पानांचा स्वाद, फूलांची रचना हि साम्यस्थळे.
लहानपणी कचाकचा चावून पेरू खाल्ले, आता बियांचा भाग काढूनच खातो... वय झालं.

छानच माहिती.
माझ्या आठवणीतलं आमच्या गांवच्या घराजवळचं एक पेरूचं झाड आहे/होतं; त्याचे बहुतेक पेरू कच्चे असताना गडद हिरवे व बियानी भरलेले असत. पण कांही मात्र कच्चे असतानाही फिकट, पिवळसर असत
व त्यांत बिया अजिबात नसत. नजरेने ते ओळखता येत व कच्चे खायलाही छान लागत.
पेरूच्या झाडाखालून जाताना त्याच्या पानांचा चुरगळून वास घेतल्याशिवाय मला राहवत नाही.
नाशिक, शिर्डी येथील ताज्या पेरूंचा स्वाद आगळाच ! [ डेक्कनचा अवमान करायचा अजिबात हेतू नाही. Wink ]
धन्यवाद ,दिनेशदा.

परफेक्ट पेरूच्या चकत्या कापून पण मस्त लागतात. फोडी तर आपण नेहमीच करतो. वरील सर्व ठिकाणी पेरू चेकिन्ग दौरा काढून तपासणी करण्यात येइल. Happy भाउ तुमच्या कडून चित्र नाही आले का?

पेरु कापताना चाकूने क्रिस क्रॉस कापले तर कमळ तयार होते. बाजारात पेरु विकनारे बर्‍याचदा असे कमळ करुन ठेवतात. Happy पोपटाने अर्धा खाल्लेला पएरु छान लागतो. लहान मुलाना बोलायला येत नसल्यास असा पेरु देतात, असे ऐकून आहे. ( हा वैद्यकीय सल्ला नाही.)

मी लहान असताना आज्जी मला पोपटाने खाल्लेले पेरु खायला द्यायची आणि सांगायची की पोपटाने खाल्लेले पेरु खाल्ले की मुल लवकर बोलायला लागतात.

<< आज्जी मला पोपटाने खाल्लेले पेरु खायला द्यायची >> पेरू ? जागूजी, मला वाटलं होतं तुम्हाला बाळक्डूच पाजलं होतं असणार - फक्त मासे ! Wink
<< भाउ तुमच्या कडून चित्र नाही आले का? >> हा उपरोध नाही असं गृहीत धरून हा व्यंगचित्राचा प्रयत्न -

dineshdaa.JPG

भाऊ चित्र भारीच. बाकी पोपटाने खाल्लेल्या पेरुचा किस्सा माझ्या आईला माहित नव्हता बहुतेक. मला र उच्चारता येत नव्हता म्हणून तिने, पिंपळाच्या पानाची पत्रावळ करुन तूपभात वाढला होता.
आणि खरंच मला र चा उच्चार यायला लागला.

माझा काका सांगतो, मला तो त्यावेळी हरियाली और रास्ता, असे म्हणायला सांगायचा. तर मी अय्यई ओ आत्ता, असे म्हणायचो.

इथे मी जो फोटो टाकलाय. त्यावर वेगळेच पक्षी येत्तात. त्यांचा फोटो काढता आला तर बघतो. हा वरचा फोटो मी घरातून म्हणजे सहाव्या मजल्यावरुन काढलाय. झाडाखाली उभे राहून एवढे पेरु दिसत नाहीत.

Pages