असा वसला महाराष्ट्र! महाराष्ट्राचा आदिम इतिहास

Submitted by वरदा on 24 September, 2009 - 04:31

jorwe pot.jpg(छायाचित्र प्रताधिकारः श्री पद्माकर प्रभुणे)

सहसा महाराष्ट्राचा सर्वात प्राचीन इतिहास म्हणजे आपल्याला सातवाहन काळातली लेणी वगैरे माहित असतं. ज्यांना थोडाफार जुनी पुस्तकं धुंडाळायचा नाद असतो त्यांनी महाराष्ट्राचे आद्य रहिवासी कोण? शक/नाग/आभीर, पुराणांतरींचे पुरावे काय सांगतात? वगैरे चर्चा वाचलेल्या असतात. पण या सगळ्या माहिती-चर्चा-वादाच्या जंजाळात पुरातत्वीय पुरावे सर्वसामान्यांपर्यंत फारसे चटकन पोचत नाहीत आणि अद्ययावत शास्त्रीय माहितीबद्दल बहुतांशी वाचक अनभिज्ञच रहातात. हे असं पुरातत्वीय संशोधन महाराष्ट्राच्या जडणघडणीबद्दल, इथल्या आद्य रहिवाशांबद्दल, त्यांच्या जीवनशैलीबद्दल काय सांगतं हे जाणून घेण्यासाठी, सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेखनप्रपंच. (इथे लिहिलं आहे त्यापलिकडे अजून संशोधन फारसं झालेलं नाही. जे झालंय/चाललंय ते प्रकाशित झालेलं नाही. जेव्हा होईल तेव्हा इथे अपडेट मारेनच. तेव्हा इथे जे लिहिलंय ते सध्यापुरतं अंतिम सत्य मानायला हरकत नाही)

मुळात महाराष्ट्राच्या इतिहासाची साकल्याने चर्चा इतिहासाचार्य राजवाडे, राजारामशास्त्री भागवत आणि ज्ञानकोशकार केतकर यांनी सुरू केली. याच्या थोडं आधीपासूनच भाऊ दाजी लाड, भगवानलाल इंद्रजी, जॉर्ज ब्यूह्लर (Bühler) इत्यादी इंडॉलॉजिस्ट्सनी प्राचीन इतिहासाची साधनं अभ्यासायला सुरूवात केली होती. त्याचबरोबर आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया च्या डी. आर. भांडारकर, हेन्री कझिन्स अशा अधिकार्‍यांनीही महाराष्ट्रातील (तेव्हाची बॉम्बे प्रेसिडेन्सी) पुराणवस्तू-अवशेषांचा अभ्यास करण्याचे काम हाती घेतले होते. पण तत्कालीन राजकीय पार्श्वभूमीमुळे जीवन झोकून देऊन स्वखर्चाने काम करणारे राष्ट्रवादी (nationalist) इतिहासकार आणि तितक्याच तळमळीने पण सरकारी संस्थांबरोबर/ त्यांच्या सहाय्याने काम करणारे इंडॉलॉजिस्ट्स आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ यांच्यात कायमच एक दरी राहिली. दुर्दैवाने दोघांनीही एकमेकांच्या कामाची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. त्यातच राष्ट्रवादी मराठीत लिहिणार तर सरकारी अहवाल आणि अमराठी लोकांनी केलेले संशोधन इंग्लिशमधे हा मुद्दा होताच. शिवाय बहुतेक राष्ट्रवादी इतिहासकारांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू स्वाभाविकपणे शिवकाळ / मराठा काळ होता तर प्राचीन इतिहास व संबंधित शिलालेख, नाणी, मंदिरे - लेण्या, उत्खनने हे सगळं बर्‍यापैकी सरकारी अखत्यारीत होतं - ज्याला आपण colonial Indology and archaeology असं म्हणतो.

१९४०-४५ पर्यंत महाराष्ट्रात अगदीच तुरळक उत्खनने झाली. उदा: निझाम सरकारच्या पुरातत्त्व खात्याने केलेले पैठण येथील व भारत इतिहास मंडळाने केलेले कराड येथील उत्खनन.. पण त्यात मिळालेले पुरावे अगदीच मर्यादित होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या रूपरेखेत फारसा बदल झाला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र पुरातत्त्वशास्त्रीय संशोधनाला महाराष्ट्रात चांगलाच वेग आला आणि या प्रदेशात मनुष्यवस्ती कधीपासून झाली आणि त्यात कसे आणि कोणते बदल होत गेले याचे एक बर्‍यापैकी सुसंगत चित्र आपल्यासमोर उभे राहिले.
अजूनही नित्य नूतन संशोधन होतच आहे. आज आपण इथे जी माहिती वाचणार आहोत ती बहुतांशी या पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक साधने आणि संशोधनावर आधारित आहे.

काय असतात ही साधने? हे पुरातत्त्वीय पुरावे?
आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पुरातत्त्वशास्त्रज्ञ भूभागाचे सर्वेक्षण करून जुन्या मानवी वस्तींची ठिकाणे शोधून काढतात आणि त्यातील महत्त्वाच्या ठिकाणी उत्खनन करून त्या वसाहतींच्या अवशेषांचा अभ्यास करतात. सर्वसामान्यपणे उत्खननात मिळणारे अवशेष म्हणजे घरांच्या जमिनी/ plans, खापरांचे तुकडे, हाडे, दगडाची व धातूची औजारे व हत्यारे, दफने, धान्याचे जळालेले दाणे, मणी, राख, माती, इ,. या सगळ्याचे परीक्षण करून विविध निष्कर्ष काढले जातात व शक्य असेल तिथे कालमापन पध्द्ती वापरून या अवशेषांचे वयोमान ठरवतात. इतिहासपूर्व काळात, लिखित स्वरूपाचे कुठलेही पुरावे नसताना, फक्त याच पुराव्यांचे दुवे जुळवत आपल्याला पुढे जायला लागते.
एकदा ऐतिहासिक कालखंडात आलं की या सगळ्या गोष्टींबरोबरच शिलालेख, ताम्रपट, नाणी, ग्रांथिक पुरावे, वास्तुकला, ही साधनेही मदतीला येतात. आणि या सगळ्याचा साकल्याने अभ्यास करून आपल्याला इतिहास लिहिता येतो.

१९४७ पर्यंत महाराष्ट्राचा इतिहास फक्त दोन हजार वर्षे मागे नेता येत होता. सातवाहन राजांचे शिलालेख, नाणी, तत्कालीन लेणी इ. पुराव्यावरून हे महाराष्ट्रातलं पहिलं राजकुल असावं असा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता. पण त्याआधी इथे कुणाची वसाहत होती? किती आधीपासून होती? या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळत नव्हती. मग त्या स्पष्टीकरणासाठी पुराणांतरी उल्लेख आलेल्या शक, नाग, हूण अशा वेगवेगळ्या कुलांच्या स्थलांतरांमधे धांडोळा घेतला जात होता (पहा :- राजवाडे, केतकर, भागवत, इ. इ.). हे सगळं चित्र अचानक बदललं. कसं? त्याचीही कहाणी तितकीच रंजक आहे..

भारतातल्या इतर लाखो खेडेगावांसारखंच एक जोर्वे होतं. संगमनेरच्या पूर्वेला ६ मैलांवर, प्रवरेच्या काठी वसलेलं एक सर्वसाधारण खेडं. आपल्याकडे तशी अधूनमधून अस्मानी संकटं येत असतात, त्याचाच एक प्रकार म्हणून १९४७ साली प्रवरेला मोठ्ठा पूर आला. या पुरात गावच नव्हे तर शेतंसुद्धा पाण्याखाली गेली. परत अशा प्रकोपाला तोंड देणं सोयीचं व्हावं म्हणून गावाने नदीच्या काठापासून थोडी आत, चढावर वस्ती हलवली आणि आसपासची जमीन शेतीखाली आणायचं ठरवलं. आणि काय आश्चर्य! शेतीत नांगरताना अफुट, अखंड, मातीची भांडी सापडायला लागली. नेहेमीसारखी करडी, काळी, लालसर माठाची मडकी नव्हेत तर अगदी उत्तम भाजणीची, लाल रंगाची, वरती काळ्या रंगाने सुंदर नक्षीकाम केलेली तोटीची भांडी! आणि तांब्याची कुर्‍हाडीची पाती.
कुठल्याही गावाला जशी स्थानिक परंपरा, मौखिक गोष्टींतून चालत आलेला इतिहास असतो, तसा जोर्वेला सुद्धा होता. म्हणे कोणे एके काळी ही खुद्द जरासंधाची नगरी होती. त्यामुळे ही मडकी नक्कीच अशी पुराणकाळातली असली पाहिजेत असं आसपासच्या लोकांना वाटलं असणार!
ही सगळी बातमी कानोकानी होत होत पोचली ती संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेन्ट बोर्डमधे काम करणार्‍या शंकर साळी नामक तरुणाकडे. त्याने उत्साहाने या गावाला भेट देऊन ती खापरं पाहिली आणि त्यासंबंधी एक छोटीशी बातमी दैनिक भारत या स्थानिक वृत्तपत्रात छापून आणली. आणि ही सगळी माहिती आणि खापरं घेऊन गाठलं या क्षेत्रातल्या एका जाणकाराला! डॉ. ह धी. सांकलिया यांना.

त्यावेळी पुण्याच्या डेक्कन कॉलेज या संस्थेत नुकताच पुरातत्त्वशास्त्राचा विभाग सुरू झाला होता. डॉ. ह. धी. सांकालिया या तरुण पुरातत्त्वशास्त्रज्ञाची तिथे नेमणूक करण्यात आली होती. मुंबईत संस्कृत शिकून, इंडॉलॉजीचा अभ्यास करून, नंतर इंग्लंडमधे खुद्द मॉर्टिमर व्हीलर नामक प्रख्यात पुरातत्त्वज्ञाच्या हाताखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. इथे विद्यापीठ पातळीवर सरकारी चौकटीच्याबाहेर नव्याने पूर्ण विभागाची/ज्ञानशाखेची उभारणी करण्याचं काम मोठ्या तडफेने त्यांनी सुरू केले. त्याचा एक भाग म्हणून नाशिक या पुरातनकालापासून अस्तित्वात असलेल्या नगरीचे उत्खनन करायचं ठरलं होतं. श्री. साळींनी आणलेली खापरं त्यांनी पाहिली आणि जोर्वेलाही छोटंसं उत्खनन करायचं असं ठरवलं.
१९५० साली उत्खनन केल्यावर ही खापरं एका ग्रामसंस्कृतीची निदर्शक आहेत हे कळलं; पण पुढच्या मागच्या वसाहतीचा कुठलाच मागमूस नसल्याने आणि तोपर्यंत शास्त्रीय कालमापन पद्धती अस्तित्वात नसल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कालानुक्रमात हे सगळं कुठं बसवायचं हा प्रश्नच होता! नाशिकच्या उत्खननाने मात्र हा प्रश्न समूळ सोडवला. तिथे सातवाहनकालीन वसाहतीच्या खालच्या थरांमधे अशीच रंगीत, नक्षीदार खापरं आणि ग्रामसंस्कृतीचे अवशेष मिळाले. आत्तापर्यंत हे ही स्पष्ट झालं की या समाजाला लोखंड बनवायचं तंत्रज्ञान अजून अवगत झालं नव्हतं. माहित होतं फक्त तांबं आणि दगड - म्हणून यांना ताम्रपाषाणयुगीन वसाहती म्हणतात.
अशा तर्‍हेने महाराष्ट्रातील वसाहतींचा इतिहास एकदम २००० वर्षे मागे गेला आणि इतिहासपूर्वकालीन महाराष्ट्राच्या संशोधनाला जबरदस्त चालना मिळाली!
एकदा जोर्वेचा शोध लागल्यानंतर आसपासच्या प्रदेशातून आणि पूर्ण पश्चिम आणि उत्तर दख्खनच्या पठारावर तसेच महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातही अनेक ताम्रपाषाणयुगीन वसाहती सापडल्या, सापडत राहिल्या. आणि डेक्कन कॉलेजच्या पुढाकाराने जवळजवळ २० स्थळांचे लहानमोठ्या प्रमाणात उत्खननही झाले. यात तापी खोर्‍यातील प्रकाश, सावळदा, बहाळ, टेकवडे, कवठे, गोदावरी-प्रवरा खोर्‍यातील दायमाबाद, नेवासा, आपेगाव तसेच भीमा खोर्‍यातील शिरूरजवळ इनामगाव, बारामतीजवळचं सोनगाव, थेऊर इत्यादी स्थळांचा प्रामुख्याने समावेश होतो. या उत्खननांमुळे आज आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासपूर्व कालीन आदिम वसाहतींचा चेहरामोहरा कसा होता हे सांगता येतं.
Picture1.jpg

(जाता जाता थोडं विषयांतर:- या शोधाने एका व्यक्तीचं आयुष्यच पूर्ण बदलून टाकलं. संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेंट बोर्डमधे नोकरीला असलेल्या श्री. शंकर अण्णाजी साळी या तरुणाचं. स्वतःची नोकरी सोडून हा चक्क पुरातत्त्वशास्त्राच्या विद्याभ्यासामागे लागला. एवढंच नव्हे तर डेक्कन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून ASI (Archaeological Survey of India) मधे चांगला हुद्दा पटकावला. आणि कालांतराने याच ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्थळ दायमाबाद याचे यशस्वीरित्या उत्खननही केले!!)

तर महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. हा अश्मयुगीन मानव समाज भटका आणि शिकारी असल्याने त्याच्या घराबिरांचे अवशेष मिळणार नाहीत हे उघडच आहे. आपल्याला मिळतात ती फक्त त्यांनी बनवलेली दगडांची हत्यारं. अशी ७ लाख वर्षांपूर्वीची प्राचीन हत्यारं सापडली आहेत मोरगाव (हो, गणपतीचं मोरगाव!), जुन्नरजवळ बोरी आणि नेवाश्याजवळ चिरकी नाला (अंदाजे ३.५ लाख वर्षं) येथील उत्खननात. अशीच एक - थोडीशी नंतरच्या काळातील - वसाहत सापडली जळगाव जिल्ह्यात पाटणे येथे. सुमारे २५ ते ३०,००० वर्षांपूर्वीच्या या हत्यारांबरोबरच रेघांनी सुशोभित केलेलं शहामृगाच्या अंड्याचं एक टरफलही सापडलं..

ही अशी लाखो वर्षं भटक्या अवस्थेत काढल्यानंतर सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हळुहळू सुरूवात झाली. भारतात शेतीच्या तंत्रज्ञानाचा उगम कमीतकमी ३ ठिकाणी स्वतंत्रपणे झाला असं आता संशोधकांना मान्य आहे. यातील एक केंद्र बलुचिस्तान प्रांत (ई.स. पू. ६०००) - ज्यातून पुढे सिंधू संस्कृती उदयाला येण्यास हातभार लागला, दुसरे विंध्य - कैमूर पर्वतातील अलाहाबाद आणि गंगा यामधला बेलन खोर्‍याचा भाग (ई.स. पू. ६००० - ७०००) आणि तिसरे ईशान्य भारत.

आपल्या आधी राजस्थान, गुजरात, माळवा या प्रदेशांमधे शेती करणारा समाज उदयाला आला होता. तिथेही ही वाटचाल अश्मयुगाकडून शेतीकडे अशी सलग झाली. त्यांच्याकडूनच उपजीविकेच्या या नव्या तंत्राची ओळख नर्मदेच्या दक्षिणेला रहाणार्‍या मानवसमूहाला झाली असं दिसतं. या सर्व प्रसारामधे मात्र एका लोकसमूहाने विविध ठिकाणी पांगून जाऊन, नव्या वसाहती करून शेतीची ओळख त्या त्या प्रदेशाला करून दिली असं काही दिसत नाही. त्या त्या प्रदेशातील स्थानिक लोकांनी शेजारच्या शेती करणार्‍या समाजांकडून हे नवं तंत्र आत्मसात करून घेतलं.

असो. परत येऊया महाराष्ट्रातील आदिम वसाहतींकडे..
आपल्याकडील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचा कालखंड सुमारे इ.स. पूर्व २४५० ते इ.स. पूर्व ९००/७०० असा आहे.
या वसाहतींचा आढावा घेताना आपण एकत्रच या सगळ्या कालावधीचा विचार करणार आहोत. अजूनही आपल्याला मध्याश्मयुगातून नवाश्मयुगात/ ताम्रपाषाणयुगात (म्हणजे आदिमानव ते शेतकरी - पशुपालक) समाजाची वाटचाल दाखवणारा कुठलाही ठोस पुरातत्त्वीय पुरावा महाराष्ट्रात सापडलेला नाहीये. आपल्याला उपलब्ध असलेल्या उत्खनित पुराव्यावरून असे दिसते की गुजरातमधून आपल्याकडे या शेती तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असावा.
धुळे जिल्ह्यातली कवठे इथली वसाहत अशा नव्याने शेती शिकलेल्या समाजाची प्रथम वाटचाल दाखवते. इ. स. पूर्व २४५० च्या आसपासचं हे गाव हंगामी होतं. जेवढं शेतीवर तेवढंच पशुपालन आणि शिकारीवर अवलंबून होतं. पूर्ण वर्षभर एकाच ठिकाणी मुक्काम करत नसल्याने अत्यंत कमी श्रमात बांधल्या जाणार्‍या गोल झोपड्यांचा वापर ते करत. या झोपड्यांच्या जमिनी थोड्याशा खोल खड्ड्यासारख्या केलेल्या असत (pit dwellings). एका 'घरात' रहाण्याच्या खड्ड्याशिवाय कोंबड्या ठेवायला/ साठवणीसाठी इ. २-३ खड्डे असत.

कवठे येथील घर
kaothe.jpg

अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही पालटले.
आजवर अशी १५०हूनही जास्त स्थळं उजेडात आली आहेत. जरी या सर्व वसाहती ग्रामीण होत्या तरीही त्यांच्यातही फरक होते. यातली काही गावे बर्‍यापैकी मोठी होती. दायमाबाद सगळ्यात जास्त - म्हणजे जवळजवळ ३०हेक्टर मोठं होतं आणि त्याला तटबंदी होती तर इनामगाव आणि प्रकाश ५ हे. च्या आसपास. बाकीच्या वस्त्यांचं आकारमान मात्र १ ते ३हे. च्या मधे होतं. यांमधे स्थायी स्वरूपाची खेडी, हंगामी वाड्या, असे विविध प्रकार होते. या सगळ्या वसाहती काळ्या मातीच्या (black cotton soil), चराऊ कुरणांच्या आणि जलस्रोतांच्या सान्निध्यात वसलेल्या होत्या.

गावात आखीवरेखीव रस्ते बहुदा नसतच पण आजच्या खेड्यांसारखंच घरांच्या मधल्या जागेचा वापर गल्लीबोळांसारखा केला जात असावा. बहुतेक सगळी घरं चौकोनी आणि कुडाची असत. शिवाय बाभूळ, सागवान, धावडा, खैर, बांबू, रोझवुड अशा झाडांची ला़कडे घरबांधणीत वापरली जात असत (मुख्यतः खांबांसाठी). जमिनी मुरूम्,माती टाकून चांगल्या चोपून मग मातीने, शेणाने किंवा क्वचित चुन्याने सारवलेल्या असत. बहुतेक घरं एक किंवा दोन खोल्यांची. एका मोठ्या खोलीत मधे कुडाने पार्टिशन करून एका बाजूला चूल आंणि साठवणीची जागा असंही बर्‍याच घरांमधे आढळून आलंय. अपवाद म्हणून काही घरं ४-५ खोल्यांची असत. ती कदाचित गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची असावीत. सगळ्या घरांना छान सारवलेली अंगणं असत. घरांची छपरं गवताने शाकारलेली असत. घरांमधे हमखास आढळणार्‍या गोष्टी म्हणजे चूल, साठवणाची सोय आणि पाटा-वरवंटा. (त्या काळातला पाटा थोडासा रगड्यासारखा खोलगट आणि वरवंटा म्हणजे गुळगुळीत गोटा असे..)
इनामगावला मिळालेल्या घरांचे आराखडे
inm.jpg

यात सर्वात लक्षवेधक काय असेल तर साठवणीसाठी असलेल्या विविध सोयी. आजच्यासारखंच बेभरवशी अर्धशुष्क हवामान तेव्हाही होतं. त्यामुळे वरकड धान्य साठवणं तेव्हाही महत्त्वाचं असणार! साठवणीसाठी वापरण्यात येणारे भक्कम मोठ्ठाले रांजण तर उत्खननांमधे सापडलेच आहेत. पण त्याशिवायही मातीत खड्डे खणून त्यांना चुन्याचा गिलावा देऊन धान्य साठवले जात असे. शिवाय मातीचे गोल कट्टे करून त्यात वाळू आणि बोरीचे काटे घालून (खालून उंदीर-घुशी लागू नयेत म्हणून) त्यावर कणग्या ठेवत असावेत. काही खास चार लांब पाय असलेले रांजण ४ दगडांच्या टेकूने किंवा ४ खळग्यांमधे उभे करून त्यातही साठवण केली जात असे. इनामगावला तर या सगळ्या घरोघरच्या साठवणीव्यतिरिक्त एक स्वतंत्र धान्याचं कोठारच होतं. बहुतेक गावाच्या मालकीचं.

चूल म्हणजे काही वेळा नालाच्या आकारात मातीने बांधून काढलेली पण बहुतेक वेळा एक उथळ खड्डा, त्यात मध्यभागी भांड्याला आधार म्हणून एक दगड किंवा मातीचा उंचवटा. या खड्ड्याचे काठ जमिनी पासून थोडे उचललेले - गरम राखबिख बाहेर सांडू नये यासाठी. काट्याकुट्यांच्या सरपणाबरोबरच शेणाच्या गोवर्‍याही इंधन म्हणून यात स्वाहा होत.

एरवी घरात भांडीकुंडी सगळी मातीची. या गाडग्यामडक्यांचे प्रकार तरी किती! रांजण, हंड्या, तपेली, लोट्या (तोटीच्या/ बिनतोटीच्या), छोटेमोठे वाडगे, थाळ्या, झाकणं, तसराळी, चंबू, गडू, इ.इ.. यातले काही प्रकार सोडले तर खूपशी भांडी गेरू-लाल रंगाची. आणि त्यावर काळ्या रंगाने ठसठशीतपणे काढलेली नक्षी - विशेषतः वाडग्यांवर. हे वाडगे म्हणजे तत्कालीन 'टेबल वेअर' म्हणाना! त्यामुळे आज जशी टेबल वेअरमधे विविध डिझाइन्स असतात, तसंच काहिसं! अगदी सुरुवातीच्या काळात भांड्यांवर प्राणी, पक्षी यांची चित्रं आढळतात. नंतर मात्र रेघारेघांची किंवा फ्री हँड नक्षी मोठ्या प्रमाणात दिसून येते. या भांड्यांबरोबरच छानपैकी चौकोनी, लंबगोल अशा आकाराच्या पणत्यासुद्धा मिळतात.
(या लेखाच्या प्रारंभालाच इनामगाव येथून मिळालेल्या एका संपूर्ण हंड्याचं छायाचित्र आहे त्यावरून रंगाची कल्पना येईलच. त्या हंड्यावर एक हरीण/अ‍ॅन्टेलोप काढलेलंही स्पष्ट दिसत आहे)
mlw ware.jpgbowls.jpglamps_0.jpg

रोजची औजारं-हत्यारं बघायची झालं तर दगडाची जास्त आणि तांब्याची कमी (कारण दगडाला असलेली जास्त धार आणि तांब्याची मर्यादित उपलब्धता). वाळूत घासून घासून गुळगुळीत चकचकीत केलेल्या दगडाच्या कुर्‍हाडी, गारगोटीचे छिलके काढून तयार केलेली सूक्ष्म पण अत्यंत धारदार पाती (ही लाकूड किंवा हाडाच्या खोबणीत एकापुढे एक बसवून विळा, कोयता, सुरी अशांसारखी हत्यारं तयार व्हायची!), तांब्याच्या कुर्‍हाडी, छिन्नी, तांब्याचे गळ, हाडांनी, दगडांनी तयार केलेली बाणाची टोकं, असं काय काय!

लोक कपडेबिपडे घालत होते की नाही हे समजायला फारसा पुरावा नाही. पण बहुदा भाजक्या मातीच्या 'टकळ्या' असाव्यात अशा काही वस्तू उत्खननांमधे मिळाल्यात. अर्थात इतर प्राचीन समाजांप्रमाणेच इथेही नाना प्रकारचे अलंकार वापरात असलेले दिसतात. भाजक्या मातीच्या, शंखाच्या, तांब्याच्या बांगड्या ;भाजक्या मातीची कर्णभूषणे ; आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या मण्यांच्या माळा - पांढरे पट्टेरी अ‍ॅगेट, केशरी कार्नेलियन, दुधाळ पांढरा चाल्सीडोनी, पारदर्शक स्फटिक, लालसर/हिरवा जास्पर, हस्तिदंत, सोनं, तांबं, माती, शंख असे किती किती मणी उत्खननांमधून मिळालेत.

उपजीविकेसाठी शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार, याच्याच जोडीला जंगलातून विविध गोष्टी गोळा करून आणणं (foraging) असे वेगवेगळे मार्ग हे लोक अवलंबत असत.
आपल्याला पुरावा पाहून आश्चर्य वाटतं पण ४००० वर्षांपूर्वीच दख्खनच्या पठारावर खरीप आणि रब्बी पिकं घ्यायला सुरुवात झाली होती. विविध प्रकारची धान्यं, डाळी, कडधान्यं, तेलबिया यांचा समावेश यात होता. गहू, जव, तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, राळं, मसूर, हरभरा, तूर, मूग, उडीद, कुळीथ, वाटाणा, वाल, अळशी, तीळ ही पिकं नियमितपणे घेतली जात होती. गव्हासारख्या पिकाला पाणी लागतं म्हणून इनामगावच्या लोकांनी नदीच्या पाण्याचा कालवा/ पाट काढून पुराचं जास्तीचं पाणी शेतीला मिळावं असी व्यवस्था केली होती.
शेतीसाठी वापरात आणलेली काही अवजारंही आपल्याला उत्खननात मिळाली आहेत. यात हरणाच्या शिंगापासून (antlers) बनवलेले छोटे नांगर, बैलाच्या खांद्याच्या हाडापासून बनवलेलं छोटं नांगराचं काम करणारं पातं, तसंच हरणाचं शिंग पोकळ करून त्यातून पेरणी करताना बिया सोडण्यासाठी केलेलं seed drill (याला मराठीत काय म्हणतात बरं?) यांचा समावेश आहे.

antler hoe.jpgseed drill.jpg

पाळीव प्राण्यांमधे गाय-बैल, म्हशी, शेळ्यामेंढ्या, गाढवं, कोंबड्या, डुकरं, आणि कुत्री, मांजरं यांचा पुरावा आढळतो. घोडा आढळतो पण तो अगदी शेवटच्या कालखंडात (बहुदा दक्षिण भारतातल्या लोहयुगीन लोकांच्या संपर्कामुळे).
शिकार करून आणलेल्या प्राण्यांची यादीही अशीच लांबलचक आहे - ८/९ जातींची हरणं, रानडुक्कर, नीलगाय, अस्वल, माकड, वाघ, बिबळ्या, मुंगूस, ससा, रानमांजर, कोल्हा, लांडगा, साळिंदर, घोरपड, खार, मगर, कासव, मोर, माळढोक, कबुतर, बदक, खेकडे, मासे, इ.
या लोकांच्या आहाराचा मुख्य घटक हा गोमांस होता. त्याच बरोबर इतर प्राण्यांचेही मांस, मासे, धान्य, कडधान्य हे होतंच. याचबरोबर वस्तीच्या आसपास सहज उपलब्ध होणारी फळं (बोरं, जांभळं, आवळे, शिंदीचा खजूर, चारोळ्या) पालेभाज्या (चाकवत, घोळ, मेथी) यांचाही समावेश खाण्यात होत असणार असं पुरावनस्पतिशास्त्रीय पुरावा आपल्याला सांगतो.

या सगळ्या रोजच्या उद्योगांशिवाय काही कारागिरीची कामंही केली जात. यात प्रामुख्याने कुंभार, तांबट, मणिकार, लोणारी (चुना तयार करणारा), अशा कारागिरांचा समावेश होतो. दगडांची हत्यारं बहुतेक सर्व कुटुंबं आपापलीच बनवत.
हे सर्व 'कुटिरोद्योग' ज्याच्यात्याच्या घरातच चालत. त्याच्यासाठी वेगळं वर्कशॉप वगैरेची भानगड नव्हती.
इनामगावच्या उत्खननात एक फार सुंदर कुंभाराचा आवा मिळाला. त्यात जास्तीची गरम हवा निघून जाण्यासाठी, इंधनासाठी वेगवेगळ्या वाटा केलेल्या होत्या. या भट्टीमधे ६००-७०० डिग्री सेंटीग्रेड तापमान कायम ठेवून छान खणखणीत गाडगी भा़जली जात. अशा प्रकारच्या भट्ट्या आणखीही असणार हे सरळ आहे. पुरावा म्हणजे ढिगाने सापडणारी खणखणीत वाजणारी रंगीत नक्षीदार खापरं!

kiln.jpg

आणि इतकंच तापमान, नियंत्रित करून हवा तितका वेळ ठेवल्याशिवाय तांबं तरी कसं गाळणार? तांबं देखील छोट्या भट्ट्यांमधे गाळलं जायचं. अशुद्ध गाळ एकीकडे तर शुद्ध रस खापराच्या मुशीत!

एकूणच ही गावं उपजीविकेच्या प्राथमिक पातळीवर तरी स्वयंपूर्ण होती. असं असलं तरीही खिल्लारं आणी शेळ्यामेंढ्या घेऊन निदान काही लोक तरी वर्षातील काही काळ चराऊ कुरणांच्या मागे भटकत असणार. कारण उपजीविकेच्या दृष्टीने फक्त वस्तीच्या आसपासच्या पर्यावरणाचा सतत उपभोग घेऊन त्या संसाधनांवर ताण पडू नये म्हणून बहुतेक प्राचीन समाज असा 'भटका' मार्ग स्वीकारत. चराऊ कुरणांच्या जवळ सापडलेल्या अनेक हंगामी छोट्या वस्त्या याचंच निदर्शक आहेत. शिवाय सामाजिक नातेसंबंध वाढवायचे असतील तर आसपासच्या समाजाशी कायमस्वरूपी संपर्क ठेवण्याची गरज असते.
या परस्पर संबंधांचा आणखी एक पुरावा म्हणजे दूरदूरच्या प्रदेशांतून आयात केलेल्या गोष्टी. या दख्खनच्या पठारावर रहाणार्‍या ताम्रपाषाणयुगीन लोकांचे अनेक प्रदेशांशी देवाणघेवाणीचे संबंध होते. उत्खननात सापडलेल्या खालील गोष्टींची यादी पुरेशी बोलकी आहे:-
तांबे (राजस्थान/गुजरात); शंख (गुजरातचा समुद्रकिनारा); सोनं (कोलार/हट्टी खाण?) सर्पंटाईन, अ‍ॅमेझोनईट हे दगड (अनुक्रमे कर्नाटक व गुजरात), हस्तिदंत (कर्नाटक?), इ.इ.
दळणवळणाची साधनं म्हणजे बैलगाड्या आणी होड्या (निदान मोठ्या नद्यांसाठी तरी) हे नक्की आहे. कारण चक्क त्यांची चित्रंच सापडली आहेत मातीच्या भांड्यांवर! शिवाय इनामगावला नदीकाठी एक छोटासा धक्काही मिळाला उत्खननात.
रांजणावर बैलगाडीचे रेखाचित्र
cart.jpg

हे झालं रोजच्या जगण्याबद्दल, पोटाची खळगी भरण्याबद्दल! पण त्यापलिकडे त्यांचं आयुष्य कसं होतं? सुरुवात करूयात त्यांच्या श्रद्धा-समजुतींपासून (इथे 'धार्मिक' हा शब्द मी मुद्दाम टाळलाय - कारण या समाजाचे वैदिक किंवा तत्सम known धर्माशी कुठलेही नाते नाही).
हे लोक मृतांचे दफन करत. ते ही वेगळ्या स्मशानात नव्हे तर घराच्या/ अंगणाच्या जमिनीत खड्डा करून. (फक्त बहाळ या गावाला नदीपल्याड वेगळं स्मशान होतं). मोठ्या (adult) व्यक्तींचे दफन खड्डयात झोपवून केले जाई तर लहान मुलांचे दफन दोन मोठे रांजण तोंडाला तोंड लावून तयार झालेल्या बंद जागेत मृतदेह ठेवून केले जात असे. मोठ्या माणसांचे पाय घोट्यापासून कापले जात ('त्या' जगातून परत इकडे येऊ नये म्हणून?). शिवाय त्याचा/तिचा अनंतातला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी काही निवडक भांडी (आत कदाचित खाद्यपदार्थ असावेत) त्या दफनात ठेवली जात. शिवाय मृताच्या शरीरावर माळ, बांगड्या इ. अलंकारही असत.

burial.jpg

बाकी त्यांच्या दैवत संकल्पनेविषयी सलग सुस्पष्ट पुरावा नाही. पण विविध प्रकारच्या स्त्री मृण्मूर्ती मिळतात. तेव्हा स्त्रीतत्त्वाची/ सुफलनाची संकल्पना इतर कुठल्याही आदिम समाजाप्रमाणेच इथेही महत्त्वाची असणार यात नवल नाही. शिवाय गुजरात, राजस्थान, माळवा इथल्या ताम्रपाषाणयुगीन समाजांप्रमाणेच इथेही बैलाच्या छोट्या मृण्मूर्ती अनेक मिळाल्यात. बैल कदाचित पुरुषतत्त्वाशी, शेती - समृद्धी या संकल्पनांशी निगडित असावा. इनामगावात एका घराच्या जमिनीखाली एका कच्च्या मातीच्या छोट्या डबीत एक शिरोहीन स्त्री मूर्ती व बैलाची मूर्ती मिळाली. ही निश्चितच कुठल्यातरी धार्मिक विधीशी संबंधित असणार पण आता तो तपशील आपल्यासाठी कायमचाच हरवून गेला आहे. याशिवाय एका मोठ्या रांजणावर एक अर्धा माणूस आणि कमरेखालचा भाग एका वन्य प्राण्याचा (बहुदा बिबळ्या) अशीही एक आकृती आढळते. याचाही संबंध त्यांच्या कुठल्या समजुतीशी असावा असा अभ्यासकांचा कयास आहे.
अग्निपूजेचाही एक पुरावा मिळतो दायमाबादमधे. तिथे काही खड्ड्याच्या स्वरूपातली अग्निकुंडे मिळाली आहेत. आणी त्यात जळालेली गाई-बैलांची हाडे व धान्याचे दाणे सापडले आहेत.

हे लोक मातृसत्ताक होते की पितृसत्ताक हे समजायला मार्ग नाही, पण ज्याला मानववंशशास्त्रात tribal म्हणतात तसे होते. म्हणजे कुटुंब आणि कुल (clan) यांच्या सामाजिक चौकटीतच वावरणारे. उपलब्ध पुराव्यावरून तरी यांच्यात सामाजिक विषमता होती, वर्गभेद होता असं दिसत नाही. शहरीकरणाच्या आधीच्या या संस्कृतीत राज्यसंस्था, राजेपद असंही काही असावं असं दिसत नाही. गावाचा कारभार गावप्रमुख पहायचा. त्याचा दर्जा साहजिकच इतरांपेक्षा थोडा वरचा किंवा वेगळा. इनामगावच्या उत्खननात मिळालेलं गावप्रमुखाचं घर ४-५ खोल्यांचं होतं पण याशिवाय त्या घरातून इतरांपेक्षा वेगळी अशी कुठलीच वस्तू मिळाली नाही. फरक होता तो दफनांमधे. या घरातून मिळालेली दोन पुरुषांची (बहुदा लागोपाठच्या पिढ्यांमधली) दफने ही इतरांसारखी खड्ड्यात झोपवून नव्हे तर ४ पायांच्या साठवणीच्या रांजणाचा वापर खुर्चीसारखा करून त्यात मृतदेहाला मांडी घालून बसवून केली होती. शिवाय या मृतदेहांचे पाय कापण्यात आले नव्हते! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावचं धान्यकोठार या घराच्या मागच्याच बाजूला होतं. बहुदा त्याची देखरेख आणि नियंत्रण हा गावचा प्रमुख करत असावा. (या अशा सामाजिक रचनेला इंग्लिश्मधे chiefdom असं म्हणतात).

chief.jpg

हे असे समाज भारतात इतर प्रदेशातही होते. हळूहळू यांना लोहतंत्रज्ञानाचा शोध लागला आणि इ.स. पूर्व ५-६व्या शतकानंतर येणार्‍या शहरीकरणाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली दिसते. अगदी विदर्भातही असाच सांस्कृतिक कालानुक्रम आढळतो. पण दख्खनच्या पठारावर मात्र काही वेगळंच घडलं!
इ.स.पूर्व १२०० -१००० च्या दरम्यान तापी, गोदावरी-प्रवरा खोर्‍यातल्या वसाहती उजाड झाल्या. पुढे अगदी इ.स.पूर्व ३-४थ्या शतकांपर्यंत या भूप्रदेशात मनुष्यवस्तीचा पुरावा संशोधकांना मिळालेला नाही. हे काय गौडबंगाल आहे? याचं उत्तर थोड्याफार प्रमाणात दिलं इनामगावच्या उत्खननाने. तापी, गोदावरी खोर्‍यांमधे न आढळणारी पण फक्त भीमेच्या खोर्‍यातच आढळणारा ताम्रपाषाणयुगाचा शेवटचा कालखंड इथे तपशीलवार अभ्यासला गेला.

अभ्यासकांच्या मते राजस्थानातील पुरापर्यावरणाच्या अभ्यासावरून असं दिसतं इ.स.पूर्व १२००-१००० च्या सुमारास पश्चिम भारतातील हवामान आणखी शुष्क व्हायला सुरुवात झाली. पर्जन्यमान घटलं आणि पाऊस आणखी बेभरवशाचा झाला. वारंवार दुष्काळही पडू लागले असावेत. या सगळ्याचा परिणाम मानवसमूहांवर झाला नसता तरच नवल!

इनामगावचा पुरावा असं दाखवतो की अचानक याच सुमारास लोकांच्या राहणीमानात बदल झाले. चौकोनी घरं सोडून आता हे लोक गोल झोपड्या बांधून राहू लागले. दफनंसुद्धा थोडी घाईगडबडीत उरकली जाऊ लागली. शेतीतही मोठे बदल झाले. गव्हाचं पीक आता कोणी घेइनासं झालं. जव, नाचणी यासारख्या तुलनेने कमी पाण्यात, पटकन होणार्‍या आणि फारसा खटाटोप न करता साठवता येतील अशा पिकांचं प्रमाण खूप वाढलं. जास्त पाणी, चारा लागणार्‍या गाईगुरांची खिल्लारं कमी होऊन शेळ्यामेंढ्यांचं प्रमाण वाढलं. आहारात गोमांस कमी होऊन काळविटाचं मांस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरला. खापरांवरची नक्षी खूपच कमी झाली आणि त्यांचा पोत खरखरीत झाला. भाजणीही आता तितकीशी उत्तम राहिली नाही. एकूणच रोजच्या जीवनातला तणाव वाढलेला दिसतो. खायचीप्यायची भ्रांतही अधूनमधून पडत असावी कारण एका कुत्र्याचाही समावेश आहारात केल्याचा पुरावा इनामगावात मिळाला आहे.

या सगळ्या पुराव्याचं विश्लेषण करून अभ्यासकांनी असं दाखवून दिलं की इतकी शतकं एक स्थिरस्थावर जीवन जगणारे हे महाराष्ट्राचे आद्य शेतकरी या अस्मानी संकटांशी झगडता झगडता टेकीला आले आणि नाईलाजाने आपल्या उपजीविकेचे मार्ग त्यांनी बदलले.
आजही जिथे अतीव दुष्काळात महाराष्ट्रातील शेतकरी घरदार, खिल्लार सोडून केवळ जगण्यासाठी वाट फुटेल तिथे जातो, वेळप्रसंगी शहरात भीकसुद्धा मागतो, तिथे अशा 'जास्तीच्या' लोकांना सामावून घेणारी शहरीकरणाची आर्थिक यंत्रणा नसताना या शेतकर्‍यांनी तरी काय करावं? मग संस्कृतीचं चक्र 'उलटं' फिरलं! परत एकदा स्थिर शेतीकडून हे लोक अर्ध-भटक्या (semi-nomadic) पशुपालन आणि शिकारीच्या जीवनाकडे वळले.
इनामगावसारख्या गावात कायमचे स्थायिक असलेले लोक जगायला बाहेर पडले आणि मग अधूनमधून काही काळच मुक्कामासाठी परतू लागले. हळूहळू हेही कमी झालं. मग इ.स. पूर्व ८व्या शतकात कधीतरी एकदा गावातून निघालेली कुटुंबं, त्यांच्या पुढच्या पिढ्या कधीच परतून आल्या नाहीत. पोटापाण्यासाठी भटकत कुठे दूर देशी गेले कुणास ठाऊक! त्यांची घरं मात्र तशीच त्यांची वाट पहात राहिली. कायमची.

इनामगावची आणि दख्खनच्या पठारावरच्या आदिम वसाहतींची गोष्ट पुरातत्त्वासाठी इथेच थांबते. पुढे आणखी ४००-५०० वर्षे कुठल्याही वसाहतींचा पुरावा आपल्याला अजून मिळत नाही. मग एकदम सातवाहन कालाच्या थोडं आधीपासून परत एकदा सगळीकडे गावं वसलेली दिसतात. प्रकाश, नेवासा अशा ताम्रपाषाणयुगीन वसाहतीही परत एकदा माणसांच्या वास्तव्याने नव्याने फुलून उठतात. (इनामगाव, दायमाबाद, सोनगाव मात्र परत कधीही कुठल्याही कालखंडात 'जिवंत' झाली नाहीत). सातवाहनांच राजकुल उदयाला येतं आणि दख्खनच्या पठाराचा लिखित इतिहासकाल सुरू होतो.

या ताम्रपाषाणयुगीन लोकसमूहाचे वंशज निश्चितच याही इतिहासकालाचा अविभाज्य भागच असणार. पण आजतरी आपल्यासाठी त्यांची ही ओळख ही एक गुपितच आहे.
कुणी सांगावं? माझ्या आणि माझ्यासारख्याच आणखी काही वेड्या संशोधकांच्या हाताला कधीकाळी तरी यश येईल, आणि मधले दुवे जुळवणारे पुरावे सापडतील. इनामगावची गोष्ट पूर्ण तर केली पहिजे ना.... या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी!! Happy

ताजा कलमः मायबोलीवरच लिहिलेल्या अन्य एका लेखातली माहिती इथे अपडेट करून पुरवणी जोडते आहे - भीमेच्या खोर्‍यातून या अंतकाळाचे फारसे पुरावे हाताला लागले नसले तरी कृष्णेच्या खोर्‍यातील सुपीक, बारमाही पाणी आणि उत्तम पावसाच्या प्रदेशातून (वारणा-मोरणेच्या संगमाजवळ) उत्तर जोर्वेकालीन वसाहती उजेडात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळ --> भटके जीवन हे गृहितक सगळ्याच वसाहतींना सरसकट लागू पडते का हा कळीचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. एकुणातच या अंतकालाचा नव्याने पुरावे शोधून साकल्याने फेरविचार करायची गरज आहे हे माझे मत मला परत एकदा 'पुराव्याने शाबित' करून अधोरेखित करता आले आहे. Happy

And the Quest goes on....

संदर्भः
वरील लेखात उल्लेखलेल्या सर्व पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन अहवाल
नकाशे आणी प्रकाशचित्रे -उत्खनन अहवाल व 'First Farmers of the Deccan' - M. K. Dhavalikar

गुलमोहर: 

वरदा, या लेखातल्या एकेका मुद्याबाबत सविस्तर वाचायला आवडेल. या विषयावर मराठीत फारच कमी वाचलय.
उदा. या चुलीबाबतच. असे चारीबाजूने उघडे डिझाईन म्हणजे, भांड्याला सगळीकडून उष्णता मिळणार. थडी असेल तर पुरा निवारा उबदार राहणार. पण अशी चूल खोलीच्या मधेच करावी लागणार. भिंतीलगत असू शकणार नाही. मग वार्‍यापासून आडोसा कसा करणार ?

उत्तम लेख व माहिती. पुस्तक लिहीलत तर नक्की घेणार.

छोट्या मुलासाठीचे कॉफिन अगदी गर्भाशयासारखे सेफ व सिक्युअर आहे. केवढी ही संवेदन शीलता.

अमा, तुम्ही 'नकळत' अगदी अगदी योग्य स्पष्टीकरणापाशी पोचलात. अभ्यासकांचाही तर्क असाच आहे की बहुदा मूल (क्वचित मोठी व्यक्तीही) आईच्या गर्भाशयात 'परतते' याचं प्रतीक म्हणजे हे हे २/३ दफनकुंभ... Happy

अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहेच यात शंकाच नाही. मला हा लेख अशासाठी आवडला की मी जपानी भाषेचा विद्यार्थी आहे आणि विशेष करून जपानी इतिहासात मला खास रस आहे. जपान मधील जोमोन पिरियड (इ.स.पू. १४००० ते इ.स.पू. ३००) या कालखंडातील मानवांचा अभ्यास मी थोडाफार केला होता आणि जपान मधील आओमोरि या प्रांतात असणार्या 'सान्नाइ-मारुयामा' या जोमोन् साइटला मी गतवर्षी जाउन आलो. त्या लोकांच्या अनेक पद्ध्ती जसे मेलेली लहान मुले छोट्या रांजणातून पुरणे, स्त्रियांचे पुतळे, पिट ड्वेलिंग्स, घरांचे साचे, कणग्या, शिकारीच्या सवयी इ.इ. आपण इथले जसे लिहिले आहे अगदी डिट्टॉ तसेच तिथले ही लोकांचे राहणीमान अन जीवन होते. पण मग माझ्यासार्ख्या सामान्य अभ्यासकाला प्रश्न पडतो तो हा की, ४ ते ५ हजार वर्षांपूर्वीचे हे ताम्रपाषाणयुगीन मानव जीवन एक सारखे कसे ? यावर काही प्रकाश टाकू शकाल का ?

वरदा, मस्त लेख. सुरुवातीला ह्युमन एलिमेंट छान वापरला आहे.

इसपु १२०० च्या सुमारास महाराष्ट्रात दुष्काळ पडले याचे वेगळे पुरावे आहेत का?
द्रविडीयन लोकांबरोबर महाराष्ट्रीयन लोकांचा संबंध केंव्हा आला?
रामटेक भागात इतक्यात काही उत्खनने सुरु आहेत ती बरीच अलिकडची का?
सध्या महाराष्ट्रात कुठे सुरु आहेत उत्खनने?
जो काही तुरळक/तुटपुंजा माहितीसमुह उपलब्ध आहे त्याच्या सहाय्याने अर्वाचीन प्रकारचे तक्ते पहायला आवडतील - उदा. गव्हाचे उत्पादन (as a function of time), घराचे क्षेत्रफळ, गावांच्या लोकसंख्या. अशा दृष्टीने काही उपलब्ध आहे का?

वरदा,
अप्रतिम. लेख फार आवडला.
मायबोलीवर अशासारखे लेख येतात म्हणूनच सार्थक वाटते.

श्री अत्रे,
तशी तर जगातील सर्व संस्कृती मधली mythology घुमुनफिरुन सारखी वाटते. पुराणे ही. युद्धेही. साम्यस्थळे खूपच आढळतात. Happy

मस्त लिहिलंय... केवढ्या मेहनतीच काम आहे सगळं!!! यातले काहीच माहिती नव्हते!! मिळालेले सगळे अवशेष कुठल्या संग्रहालयात आहेत का? जिथे हे अवशेष मिळाले तिथे भेट देण्याची काही सोय असते का?

सॅम, पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे संग्रहालय उत्तम आहे. कॉलेजमधे अनेक उत्तम पुस्तके पण विक्रीकरता उपलब्ध आहेत (जरा कपाटात कोंडलेली असतात व तिथल्या कोणाला तरी शोधुन आणावे लागु शकते, but its worth it).

जामोप्या,
दक्षिणापथ म्हणजे नर्मदेच्या दक्षिणेकडील सर्व भूभाग. हे नाव आपल्याला पहिल्यांदा मौर्यकाळात आढळते.

सॅम,
इनामगावच्या उत्खननातील बर्‍याचशा गोष्टी डेक्कन कॉलेजच्या म्युझियम मधे आहेत.

अश्चिग,
तुम्ही एकदम कळीचा प्रश्न विचारलाय... दुष्काळ या मुद्यावरून खूप वाद झडलेत Deccan chalcolithic (म्हणजे हे दख्खनच्या पठारावर रहाणारे ताम्रपाषाणयुगीन समाज) च्या विषयात.
मुळात दख्खनच्या पठारावर असं पुरापर्यावरणीय काम झालंच नाहीये. तर मग राजस्थानचा पुरावा सगळीकडे तेवढाच ग्राह्य धरता येईल का यावर तज्ज्ञांमधे मतभेद आहेत. शिवायही आणखी controversies आहेत, ज्या टाळून मी इथे एका सर्वसाधारण पातळीवर एक गोषवारा लिहिलाय.
शिवाय जर दुष्काळामुळे या वसाहती उजाड झाल्या तर मग फारसं वेगळं पर्यावरण नसलेल्या द्क्षिण भारतात असं का झालं नाही? हा प्रश्नच आहे!! अर्थात राजस्थानचा पुरावा, आणी इनामगाव मधला सांस्कृतिक/आर्थिक बदल या परिस्थितीजन्य पुराव्यामुळे सध्यातरी आपल्याला अभ्यासकांचे म्हणणे मान्य करावे लागते.
हा दुष्काळ पडला होता का? त्याचा कुठे किती जोर होता? मग वेगवेगळ्या प्रदेशात मानवसमूहांनी याला वेगवेगळ्या उपायांनी तोंड दिले का? असे खूप म्हणजे खूप प्रश्न आहेत. याच्यासाठी एक बर्‍यापैकी मोठा संशोधन-प्रकल्प हातात घ्यावा लागेल. शिवाय याला तेवढाच भक्कम आधार लागेल तो कालमापन पद्धतीचा. भारतात ही एक मोठी अडचण आहे. प्रकल्पाच्या पैशातून बाहेरच्या देशात नमुने पाठवायला तेवढे पैसे असतातच असं नाही. आणि भारतातल्या प्रयोगशाळांमधे लांबच्या लांब प्रतीक्षायाद्या असतात. हे फक्त साध्या कार्बन-१४ बद्दल झालं. TL Dating बर्‍यापैकी बेभरवशी असतं, कारण त्याच्या नमुने गोळा करण्यापासून काय पथ्य पाळायची याच्या हजार भानगडी असतात. AMS dating पण खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहे, शिवाय या सगळ्या मोठ्या संस्थांची स्वतःची शास्त्रीय कामं चालू असतात. त्यात पाहुण्या पुरातत्त्वीय नमुन्याला मागच्या बाकावर बसवलं जातं. शिवाय पूर्वी चालत असे, पण आता एकच तारीख मिळून चालत नाही. you need to have series of dates to make your chronology acceptable on international level.. इथे उत्खनन करण्यासाठी पैसे मिळवायला झगडावं लागतं, तर हे पुढचे विचार कोण करणार? शिवाय प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार काम करत असतो/ते. आत्ता या दख्खनच्या ताम्रपाषाणयुगावर माझ्याशिवाय कुणीच काम करत नाहीये!

द्रविडीयन/ दक्षिण भारतीय समाजाशी संपर्क असल्याचा पहिला पुरावा याच काळात मिळतो - विशेषतः कर्नाटकाबरोबर.

विदर्भाचा सांस्कृतिक कालानुक्रम ताम्रपाषाण, लोहयुग आणि इतिहासकाल असा सलग आहे.

तुम्ही म्हणता तसे अर्वाचीन तक्ते करायचे प्रयत्न झालेत या संस्कृतीबाबत. पण इथे किती लिहू? म्हणून खूप मुद्यांना काट मारली आहे.. खरं तर पूर्ण भारतात सिंधू संस्कृतीच्या खालोखाल जर सर्वोत्तम संशोधनकार्य झालं असेल तर या संस्कृतीविषयी झालंय. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही इनामगावचं उत्खनन भारतातलं सर्वोत्कृष्ट शास्त्रीय उत्खनन म्हणून प्रसिद्ध आहे. पण मराठीत याविषयी अत्यल्प लिखाण उपलब्ध आहे. म्हणूनच याची तोंडओळख करून द्यायचा खटाटोप केलाय. हे संशोधन माझ्या मराठीपणाचा एक महत्त्वाचा अभिमानबिंदू आहे!

माझ्या दुर्दैवाने मी विद्यार्थी म्हणून पुरातत्त्वात पाऊल टाकण्याआधीच ही सर्व उत्खनने संपली.. मी मात्र सर्वेक्षण करून या नाहीशा झालेल्या लोकांचा 'माग काढण्याचं' काम पूर्वीच हाती घेतलंय. निदान पुढच्या २० वर्षात तरी आणखी काहीतरी मिळावं, कुठलंतरी उत्तम उत्खनन करावं आणि या प्रश्नाचं उत्तर देता यावं अशी मनापासून इच्छा आहे. Only time will tell! Happy

धन्यवाद, वरदा!

> पण इथे किती लिहू? म्हणून खूप मुद्यांना काट मारली आहे..
understandable.

या बद्दल जास्त सजगता यायला हवी. उत्खननातील गोष्टी चोरीला जाण्याबद्द्ल ऐकतो तेंव्हा वाटते की त्या लोकांनी मृत व्यक्तींना "तिकडे" उपयोगी पडाव्या म्हणुन काही गोष्टी ठेवल्या, त्या गोष्टी हे लोक "इकडे" मिरवण्याकरता पळवतात, यांना का त्या स्वतःबरोबर "तिकडे" नेता येणार आहेत?

जमेल तसे लिहीत रहा. त्यासाठी शुभेच्छा.

वाव सुंदर लेख.. इतकी महेनत घेवून इथे टाकण्यासाठी खूप आभार.. पुस्तक रुपात आलं तर मस्त वाटेल वाचायला म्हणजे सविस्तर माहिती मिळेल..
अभ्यासू गटग मस्त आयडिया आहे.. रैना ला अनुमोदन.. अशा लेखांमुळे मा बो भारी वाटतं
एक भा. प्र. इथे ज्या गावांचा उल्लेख केलेला आहे तिथे जावून काही बघण्यासारख आहे का . कि हे सगळे भाग पुरावे म्हणून लोकांसाठी खुले नाहीत...

एक सिरीज बघितली होती नॅशनल जियोग्रफिक वर.. त्यात हि पूर आणि दुष्काळामुळे वस्ती हलवलेली दाखवली होती.. त्यानंतरचा जो भाग होता तो मात्र जबरी होता... त्यांचं म्हणणं होतं कि हजारो वर्षांपूर्वी पण अशी स्थलांतरे झाली होती.. तर आता जे सुनामी आणि दुष्काळ चालू आहेत ते हि पृथ्वी च्या वार्मिंग मुळे आहेत वगैरे हे खोडून काढू शकतो.. ग्लोबल वार्मिंग आहे कि असं नवीन युग चालू होण्याचा काळ आहे हे नक्की सांगता येत नाही..(त्याला उत्तर म्हणून बरेच एपिसोड आले ) काही हि असो पण आता सेमी नोमाडीक म्हणून लगेच स्थलांतर आपण करू का हा प्रश्न राहीलच आणि जातील कुठे स्थलांतर करून Happy

garbage archaeology, william rathje असा गूगल ला सर्च देऊन बघ.>>>हि पण मस्त माहिती दिलीत..Rubbish!: The Archaeology of Garbage रीडिंग लिस्ट मध्ये टाकेल आता..

प्रित, सॅम,
ही उत्खनन स्थळे पहायला फारशी अडचण नाही. फक्त आता तिथे काही दिसण्यासारखं नाही. पांढरीवर पडलेल्या खापरांशिवाय..
दायमाबाद पुणतांब्याजवळ आहे. त्याचा काही भाग संरक्षित आहे. इनामगाव पुणे - शिरूर रस्त्यावर न्हावरे गावाचा एक फाटा लागतो उजवीकडे, तिथे आत न्हावर्‍यापासून ४ किमी घोडनदीच्या काठावर आहे. गावापासून पांढर आणखी ३किमी उत्तरेला नदीकाठाला आहे. सोनगावची पांढर आता बहुदा पूर्णपणे गेली असणार - नीरा, कर्‍हा संगमाच्या बेटावर सोमेश्वर मंदिराच्या अगदी मागेच होती. पूर्वी ती जमीन फलटणच्या निंबकरांचं रान/ गवळी राजाचं टेकाड म्हणून माहित होती आसपास. प्रकाशला मीच गेली नाहीये अजून. पण तिथली पांढर अगदी मराठा काळात येऊन संपते त्यामुळे हे अवशेष वरती किती दिसतात माहित नाही. वाळकी, थेऊर, इ. चे मात्र आता नामोनिशाणही नाही... Sad
आताच्या कुठल्याही ग्रामस्थांना या ठेव्याची जाण असेल असं वाटत नाही. फक्त इनामगावला मध्यंतरी ग्रामस्थ साईट म्युझियम करणार असं ऐकत होते. पुढे काय झालं खरंच माहित नाही..

ह्म्म्म. खरतर या गोष्टींभोवती देखिल पर्यटन विकसित होउ शकतं. (म्हणजे टिपिकल पर्यटन-कम-जत्रा नाही..) मला स्वतःला ती जागा, उत्खनन कसं करतात, पुरावे कसे मिळतात हे प्रत्यक्ष पाहायला फार आवडेल. संग्रहालयातल्या गोष्टी फारच out of context वाटतात.

सॅम, इथे लॉस एंजिलस ला ला ब्रिआ पिट्स मधे दर उन्हाळ्यात उत्खनन सुरु असते, आणि लोक जाऊन ते पाहु शकतात. त्याच्याशी संलग्न एक संग्रहालयपण आहे. इथे डायनोसॉर्स नव्हते पण वुली मॅमथ होते.

खूपच सुंदर लेख... वाचून...मुख्यतः भांडी, दफन करायच्या पद्धती, त्यांचे फोटो अफलातून....

निवडक दहात!

आणि इतकी अमूल्य माहिती पुरवल्याबद्दल अनेक आभार..

वरदा, मस्त मस्त मस्त लेख...अजून एकदा वाचायलाच हवा.

शंकर साळी यांचा हेवा वाटला ... हो ...हेवाच वाटला खरंच.
इतकं काहीतरी आयुष्याचा स्वच्छ मार्ग दाखवणारं भेटणं हे काय नशीब आहे गं...

Pages