थँक्स फॉर द मायटोकाँड्रीआ, मॉम!

Submitted by लसावि on 7 May, 2011 - 03:44

आपली प्रत्येक पेशी (cell) अनेक यंत्रांनी बनलेल्या अत्यंत सुंदर आणि कार्यक्षम कारखान्याप्रमाणे आहे. पेशीचे केंद्रक (nucleus) म्हणजे त्याचा व्यवस्थापक, ज्याच्या आदेशाप्रमाणेच सगळी कामे होणार. परितालिका (cell membrane) आहे सुरक्षा अधिकारी, कारखान्याचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करणारी. गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझ्मीक रेटीक्युलम आणि रायबोसोम हे या कारखान्याचे कनव्हेअर बेल्ट्स कम प्रॉडक्शन मॅनेजर, तर वेगवेगळ्या प्रकारचे एंझाइम्स, प्रोटीन्स आणि आरएनए हे सुपरवायझर्स आणि कामगार!

मात्र या सगळ्या व्यापाला लागणारी उर्जा पुरवणारे उर्जाकेंद्र मात्र एकच- मायटोकाँड्रिआ!
आपण जे अन्न ग्रहण करतो त्यात साठवलेली रासायनिक उर्जा आपल्याला जशीच्यातशी वापरता येत नाही. उदा. तुम्हा काहीतरी बोलायचे आहे, तर या कृतीसाठी लागणारी उर्जा तुम्ही तुमच्या पेशीतील ग्लुकोज/ प्रथिनांपासून थेट मिळवू शकत नाही. त्यासाठी या पदार्थातील उर्जा ऑक्सिडेशनच्या मदतीने 'अ‍ॅडोनोसिन ट्राय-फॉस्फेट अर्थात एटीपी (ATP)' या रेणूंमध्ये रुपांतरीत करावी लागते. शरीरात होणारी प्रत्येक घटना उर्जेसाठी याच रेणूंवर अवलंबून असते त्यामुळे त्यांना 'शरीरातील उर्जेचे चलन (Energy currency)' असेही म्हटले जाते. अन्नाचे ऑक्सिडेशन आणि एटीपीची निर्मिती मायटोकाँड्रिआतच प्रचंड मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पेशी आणि अर्थातच संपूर्ण शरीरासाठी त्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे.

पण हे मायटोकाँड्रिआ आपल्या पेशीत येतात कुठून? आपण आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या आईच्या गर्भात फक्त एका पेशीपासून (zygote) करतो. त्या पहिल्या पेशीतले मायटोकाँड्रिआ कुणाचे असतात? ते असतात फक्त आपल्या आईचेच!!!
मानवी शुक्राणू (sperm cell) ही एक अत्यंत खास प्रकारची पेशी आहे. स्त्रीची अंडपेशी (ovum or egg cell) शोधून, फलनाची प्रक्रिया (fertilization) पूर्ण करणे या कामासाठी त्यांची रचना अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण आहे. एखाद्या माश्याप्रमाणे अत्यंत वेगाने 'व्हिपलॅश अ‍ॅक्शन'ने अंडपेशीपर्यंत पोचण्यासाठी शुक्राणूंना प्रचंड उर्जा लागते. ती अर्थातच त्यांच्या मध्यभागात (mid-piece) एकवटलेल्या मायटोकाँड्रिआकडून मिळते. मात्र जेंव्हा एखादा शुक्राणू फलनाच्या प्रक्रियेत असतो तेंव्हा मात्र त्याचा मध्यभाग अंडपेशीत प्रवेश करत नाही. त्यामुळे फलनानंतर तयार झालेल्या आपल्या पहिल्या पेशीत आपल्या शुक्राणूतील (वडिलांचे) मायटोकाँड्रिआ अजिबात नसतात. केवळ अंडपेशीतील मायटोकाँड्रिआच पुढे नवीन तयार होणार्‍या पेशीत जातात. त्यामुळे आपल्या प्रत्येक पेशीतील, आपल्याला सतत उर्जा देणारे सर्व मायटोकाँड्रिआ फक्त आणि फक्त आपल्या आईचीच देणगी असतात!

आता प्रश्न हा आहे की हे आपल्याला कळले कसे? मायटोकाँड्रिआचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचा डीएनए आहे जो आपल्या केंद्रकातील डीएनएपेक्षा वेगळा आहे आणि त्याचे कामही स्वतंत्रपणे चालते. या डीएनएमधील घटकांची क्रमवारी (DNA sequencing or mapping) लावता येते. अशा क्रमवारीचा अभ्यास केला असता हे स्पष्ट होते की तुमच्या मायटोकाँड्रिआच्या डीएनएची क्रमवारी, तुमच्या आईच्या मायटोकाँड्रिआतील डीएनएच्या क्रमवारीशी तंतोतंत जुळते. पण ही क्रमवारी तुमच्या वडिलांच्या क्रमवारीपेक्षा वेगळी असते. याचाच अर्थ हा की आपला प्रत्येक मायटोकाँड्रिआ केवळ आपल्या आईकडूनच आलेला असतो.

विचार करा, तुमच्या शरीरातील मायटोकाँड्रिआ तुम्हाला तुमच्या आईकडून मिळाला, तिला तिच्या आईकडून (म्हणजे तुमच्या आजीकडून), तुमच्या आजीला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून............ही साखळी अंतहीन आहे.....किंवा ती कोण्या एका आद्य, महामातेपर्यंत जाउन थांबते.

या मातृदिनी त्या मातेचे स्मरण करु आणि म्हणू ' थँक्स फॉर द मायटोकाँड्रिआ, मॉम!'
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तळटीपा:
१] काही कोटी वर्षापूर्वी मायटोकाँड्रिआ हे स्वतंत्र जीव असावेत आणि नंतर मोठ्या पेशींनी त्यांना आपले कायमचे रहिवासी बनवले, अशी एन्डोसिंबायोसीस थिअरी आहे.
२] मायटोकाँड्रिआतील डीएनएच्या मदतीने तुम्हाला तुमचे पूर्वज शोधता येणे आता शक्य आहे. खालील लिंकला भेट द्या- https://genographic.nationalgeographic.com/genographic/lan/en/participat...

गुलमोहर: 

मायटोकॉन्ड्रीयल DNA म्युटेशन रेट्स बद्दल काय म्हंटले आहे? ते सेल्युलर DNA च्या तुलनेत किती कमी अधीक असतात?>>> एमडीएनएचा म्युटेशन रेट सेल्युलर डीएनएपेक्षा जास्त असल्यानेच लिनिएज ट्रेसिंगसाठी ते आयडीअल आहेत. बेसपेअर्सची संख्याही कमी असल्याने मॅपींग सोपे आहे.

भारतात लिनिएज ट्रेसींग सुरु झाले आहे का (मोठ्या प्रमाणावर)? >>> माझ्या माहितिप्रमाणे भारतात त्याची फारशी सुरुवात झालेली नाही. पण ती होणे आणि त्यातून डेटा गोळा होणे फार आवश्यक आहे कारण आपला देश वेगवेगळ्या गुणसूत्रांची एक प्रचंड इंटरेस्टींग भेळ आहे.
काही महिन्यापूर्वीच्या सायंटीफिक अमेरिकनमधे भारतातील पहिल्या मोठ्या ट्रेसिंगचा रिपोर्ट आला होता. ते राजस्थानात केले गेले. लिनिएज हे जातीवर अवलंबून नसून एरिआवर ठरते असा प्रार्थमिक निष्कर्ष त्यातून निघाला. ह्याची व्याप्ती वाढवल्यास जातीव्यवस्थेच्या लॉजिकलाच सुरुंग लागू शकतो!

माबोकरांपैकी कोणी लिनिएज ट्रेसिंग केले आहे काय? केले असल्यास आणि त्याचे रिझल्ट शेअर करण्याची इच्छा असल्यास ते कृपया सांगावेत.
ज्यांना असे ट्रेसिंग करायचे आहे त्यांनी लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकचा वापर जरुर करावा.
मी ही ते करणार आहे पण सध्या बायकोकडून फंडींग मिळत नाहीए Happy

विचार करा, तुमच्या शरीरातील मायटोकाँड्रिआ तुम्हाला तुमच्या आईकडून मिळाला, तिला तिच्या आईकडून (म्हणजे तुमच्या आजीकडून), तुमच्या आजीला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून............ही साखळी अंतहीन आहे.....किंवा ती कोण्या एका आद्य, महामातेपर्यंत जाउन थांबते. >>>>> Happy

वाचायला सुरुवात केली तेव्हा सगळ्या बायोमधल्या टर्म्स वाचून शाळा कॉलेज आठवलं. नंतर लेखाने असं काही वळण घेतलं की मातृदिनासाठी यापेक्षा समायोचित आणि वेगळा लेख दुसरा कुठला वाचला नसेल.

आगाऊ , मस्त लेख आहे. आणि सोप्या भाषेत लिहीलंय .
मायटोकॉन्ड्रीया ला 'तंतुकणिका' असा मराठी प्रतीशब्द आहे [चु.भु.द्या.घ्या.] अस मला वाटते.
कोणाला माहिती असल्यास सांगावे.

लेख आवडला. तंतूकणिका बरोबर आहे.

>>भारतात लिनिएज ट्रेसींग
मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी ते जरा स्वस्त होणे गरजेचे आहे. होईल लवकरच.

छान लेख Happy धन्यवाद
[पण हे काय आगावा? पहिल्याच परिच्छेदात चातुर्वर्ण्याचे सारच मान्डले गेलय अस नै भासत??? Proud ]

लिंब्याभाउ आहात कुठे तुम्ही?
कोणत्याही 'सिस्टिम'चे वर्णन हे दुसर्‍या सिस्टिमला अ‍ॅनॉलॉजी म्हणून वापरता येतेच, पण म्हणुन ते काही 'सार' होत नाही. उलट भारतात लिनिएज ट्रेसिंग जितके जास्त प्रमाणात होईल तितका चातृवर्ण आणि जातीव्यवस्थेच्या तथाकथित 'शास्त्रीय' आधाराला सुरुंग लागेल असे दिसते! माझा याआधीचा प्रतिसाद वाचा.

आगाऊ, अरे तो वाचला म्हणूनच तर, जन्माधारीत जातीव्यवस्था नष्ट होईल या स्वप्नरन्जनात असलेल्या पण तरीही तूच (नकळत) वर्णन केलेल्या, "चातुर्वर्ण्यं मया सृष्ट्यम, गुणकर्म विभागशः" या वचनाचे एका पेशीतील साद्धर्म्याचे साक्षेपी रुप दाखवायचे धाडस केले!
वरील विषय गहन आहेच पण ते लिनिएज ट्रेसिन्ग केले तरी अनुवन्शिकतेचे सर्व गुढ सम्पत नाही, सुरुन्ग वगैरे लागणे फाऽऽर दूरची बात! Happy

आगावा मस्त माहीती. मायटोकाँड्रिआ मुळेच बहुतेक प्रत्येक मूल हे आईशी जास्त बांधलेले असते... Happy
लेख फार सुंदर.. आणि माहीतीपुर्ण..

पुलेशु!!

भारतात लिनिएज ट्रेसिंग जितके जास्त प्रमाणात होईल तितका चातुर्वर्ण आणि जातीव्यवस्थेच्या तथाकथित 'शास्त्रीय' आधाराला सुरुंग लागेल >>> पटलंच !!

एखाद्या जोडप्याला फक्त मुलीच झाल्या तर घराण्याच्या त्या साखळीचा निर्वंश झाला असं मानलं जातं. खरंतर त्या मुलीही आपल्या आईवडिलांचे डीएनए पुढे नेतच असतात. पण एखाद्या जोडप्याला फक्त मुलगेच झाले तर तो मात्र मायटोकाँड्रियाच्या तोपर्यंत अबाधित असलेल्या साखळीचा अंत असेल. त्या मुलाच्या अपत्यांपासून एक नवी मायटोकाँड्रियाची साखळी सुरू होईल. This is amazing !!

एखाद्या जोडप्याला फक्त मुलीच झाल्या तर घराण्याच्या त्या साखळीचा निर्वंश झाला असं मानलं जातं. खरंतर त्या मुलीही आपल्या आईवडिलांचे डीएनए पुढे नेतच असतात. पण एखाद्या जोडप्याला फक्त मुलगेच झाले तर तो मात्र मायटोकाँड्रियाच्या तोपर्यंत अबाधित असलेल्या साखळीचा अंत असेल. त्या मुलाच्या अपत्यांपासून एक नवी मायटोकाँड्रियाची साखळी सुरू होईल. This is amazing !!>>> ए खरंच की गं ललिता!!! हा विचार काय भन्नाट आहे! आणि आजवरच्या लोकांच्या विश्वासाला पूर्ण तडा देणारा असा!

लिनिएज ट्रेसिंगविषयीची लेखाच्या शेवटी दिलेली लिंक पाहिली. पूर्ण वाचली. आता हा लेख खर्‍या अर्थाने समजला आहे, असे म्हणू शकते! लिनिएज ट्रेसिंग करण्याची जरबदस्त इच्छा उफाळून आली आहे. त्यासाठी नवर्‍याला कन्व्हिन्स करणे सुरु आहे. कोणी मायबोलीकरांनी हे आधी केले असल्यास त्यांनी कृपया आपले अनुभव शेअर करावेत, असे त्याचे मत आहे. त्यानंतर आम्ही हे नक्की करायचे ठरवले आहे.

माबोकर, तुमच्या अनुभवांच्या जबरदस्त प्रतिक्षेत आहे!!!!! आगाऊ, तुला पण कोणी प्रत्यक्ष हे केलेले भेटले असतील, तर तू पण प्लिज ते आम्हाला कळू दे.

लले, वाकून नमस्कार!!! मी हा विचारच केला नव्हता. Happy
म्हणूनच लिनिएज ट्रेसिंग दोन प्रकारांनी केले जाउ शकते एकतर मायटोकाँड्रिअल डीएनएच्या मदतीने आईकडचे किंवा वाय क्रोमोसोमच्या मदतीने वडिलांकडचे. पुरुष अर्थातच दोन्ही पद्धतीने करु शकतात.

आगावा, खुप आधीच वाचला होता लेख पण प्रतिक्रिया आज देतेय, का ते तुला माहीतीय. Proud
काहीतरी नवीन आणि माहीत नसलेलं वाचायला मिळालं तुझ्या लेखातुन. Happy

मी हा लेख खूपच उशिरा वाचला,पण फारच आवडला,मुख्य म्हणजे बायो शी संबंध नसतानाही लेख कळला आणि रोचक वाटला.सोप्या शब्दांत समजाऊन सांगणं खूप अवघड असतं.पण तुम्ही खरंच ते सोपं करून मांडलंय. ललिता-प्रीति यांचा विचार मात्र विचार करायला लावणारा आहे.

याला मराठीत तंतुकणिका म्हणतात.. माझा मर्हाटी बोल कौतुके .. १० वी पर्यंत मर्हाटी काय सोडली नव्हती.. Happy

भारतात लिनिएज ट्रेसिंग जितके जास्त प्रमाणात होईल तितका चातुर्वर्ण आणि जातीव्यवस्थेच्या तथाकथित 'शास्त्रीय' आधाराला सुरुंग लागेल >>> पटलंच !!

अजुन काय पटायचं राहिलय.. ! सगळी माणसे माकडापासून तयार झालेली आहेत, या एकाच सत्यात सगळंच आलं की... Happy

जागोमारोतीप्यारे

खूपच उच्च! आगाउ फारच महत्वपूर्ण माहिती दिलीस बघ! आता आयुष्याकडे ह्या पुढे एक नव्या दृष्टीकोनातून पाहिलं जाईल.
ललीता प्रीति खूपच सही विचार केलाय खर्‍या अर्थाने आता पपंपरा चालवणार्‍या वारस मुलीच:)

शमा

Pages