थँक्स फॉर द मायटोकाँड्रीआ, मॉम!

Submitted by लसावि on 7 May, 2011 - 03:44

आपली प्रत्येक पेशी (cell) अनेक यंत्रांनी बनलेल्या अत्यंत सुंदर आणि कार्यक्षम कारखान्याप्रमाणे आहे. पेशीचे केंद्रक (nucleus) म्हणजे त्याचा व्यवस्थापक, ज्याच्या आदेशाप्रमाणेच सगळी कामे होणार. परितालिका (cell membrane) आहे सुरक्षा अधिकारी, कारखान्याचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करणारी. गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझ्मीक रेटीक्युलम आणि रायबोसोम हे या कारखान्याचे कनव्हेअर बेल्ट्स कम प्रॉडक्शन मॅनेजर, तर वेगवेगळ्या प्रकारचे एंझाइम्स, प्रोटीन्स आणि आरएनए हे सुपरवायझर्स आणि कामगार!

मात्र या सगळ्या व्यापाला लागणारी उर्जा पुरवणारे उर्जाकेंद्र मात्र एकच- मायटोकाँड्रिआ!
आपण जे अन्न ग्रहण करतो त्यात साठवलेली रासायनिक उर्जा आपल्याला जशीच्यातशी वापरता येत नाही. उदा. तुम्हा काहीतरी बोलायचे आहे, तर या कृतीसाठी लागणारी उर्जा तुम्ही तुमच्या पेशीतील ग्लुकोज/ प्रथिनांपासून थेट मिळवू शकत नाही. त्यासाठी या पदार्थातील उर्जा ऑक्सिडेशनच्या मदतीने 'अ‍ॅडोनोसिन ट्राय-फॉस्फेट अर्थात एटीपी (ATP)' या रेणूंमध्ये रुपांतरीत करावी लागते. शरीरात होणारी प्रत्येक घटना उर्जेसाठी याच रेणूंवर अवलंबून असते त्यामुळे त्यांना 'शरीरातील उर्जेचे चलन (Energy currency)' असेही म्हटले जाते. अन्नाचे ऑक्सिडेशन आणि एटीपीची निर्मिती मायटोकाँड्रिआतच प्रचंड मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पेशी आणि अर्थातच संपूर्ण शरीरासाठी त्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे.

पण हे मायटोकाँड्रिआ आपल्या पेशीत येतात कुठून? आपण आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या आईच्या गर्भात फक्त एका पेशीपासून (zygote) करतो. त्या पहिल्या पेशीतले मायटोकाँड्रिआ कुणाचे असतात? ते असतात फक्त आपल्या आईचेच!!!
मानवी शुक्राणू (sperm cell) ही एक अत्यंत खास प्रकारची पेशी आहे. स्त्रीची अंडपेशी (ovum or egg cell) शोधून, फलनाची प्रक्रिया (fertilization) पूर्ण करणे या कामासाठी त्यांची रचना अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण आहे. एखाद्या माश्याप्रमाणे अत्यंत वेगाने 'व्हिपलॅश अ‍ॅक्शन'ने अंडपेशीपर्यंत पोचण्यासाठी शुक्राणूंना प्रचंड उर्जा लागते. ती अर्थातच त्यांच्या मध्यभागात (mid-piece) एकवटलेल्या मायटोकाँड्रिआकडून मिळते. मात्र जेंव्हा एखादा शुक्राणू फलनाच्या प्रक्रियेत असतो तेंव्हा मात्र त्याचा मध्यभाग अंडपेशीत प्रवेश करत नाही. त्यामुळे फलनानंतर तयार झालेल्या आपल्या पहिल्या पेशीत आपल्या शुक्राणूतील (वडिलांचे) मायटोकाँड्रिआ अजिबात नसतात. केवळ अंडपेशीतील मायटोकाँड्रिआच पुढे नवीन तयार होणार्‍या पेशीत जातात. त्यामुळे आपल्या प्रत्येक पेशीतील, आपल्याला सतत उर्जा देणारे सर्व मायटोकाँड्रिआ फक्त आणि फक्त आपल्या आईचीच देणगी असतात!

आता प्रश्न हा आहे की हे आपल्याला कळले कसे? मायटोकाँड्रिआचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचा डीएनए आहे जो आपल्या केंद्रकातील डीएनएपेक्षा वेगळा आहे आणि त्याचे कामही स्वतंत्रपणे चालते. या डीएनएमधील घटकांची क्रमवारी (DNA sequencing or mapping) लावता येते. अशा क्रमवारीचा अभ्यास केला असता हे स्पष्ट होते की तुमच्या मायटोकाँड्रिआच्या डीएनएची क्रमवारी, तुमच्या आईच्या मायटोकाँड्रिआतील डीएनएच्या क्रमवारीशी तंतोतंत जुळते. पण ही क्रमवारी तुमच्या वडिलांच्या क्रमवारीपेक्षा वेगळी असते. याचाच अर्थ हा की आपला प्रत्येक मायटोकाँड्रिआ केवळ आपल्या आईकडूनच आलेला असतो.

विचार करा, तुमच्या शरीरातील मायटोकाँड्रिआ तुम्हाला तुमच्या आईकडून मिळाला, तिला तिच्या आईकडून (म्हणजे तुमच्या आजीकडून), तुमच्या आजीला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून............ही साखळी अंतहीन आहे.....किंवा ती कोण्या एका आद्य, महामातेपर्यंत जाउन थांबते.

या मातृदिनी त्या मातेचे स्मरण करु आणि म्हणू ' थँक्स फॉर द मायटोकाँड्रिआ, मॉम!'
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तळटीपा:
१] काही कोटी वर्षापूर्वी मायटोकाँड्रिआ हे स्वतंत्र जीव असावेत आणि नंतर मोठ्या पेशींनी त्यांना आपले कायमचे रहिवासी बनवले, अशी एन्डोसिंबायोसीस थिअरी आहे.
२] मायटोकाँड्रिआतील डीएनएच्या मदतीने तुम्हाला तुमचे पूर्वज शोधता येणे आता शक्य आहे. खालील लिंकला भेट द्या- https://genographic.nationalgeographic.com/genographic/lan/en/participat...

गुलमोहर: 

मस्तच रे..! छान माहिती आणि सोप्या भाषेत!! खरंच धन्यवाद. Happy

ललिता-प्रीतीचा प्रतिसाद वाचून एकदम थ्रिलिंग वाटले..!! असा विचारच केला नव्हता.

अप्रतिम लेख. मस्तच सोप्या भाषेत सांगीतल्याबद्दल धन्स. याच्या आधारे पोलीस अनाथ मुलांचा प्रश्न सोडवु शकतिल का???

याच्या आधारे पोलीस अनाथ मुलांचा प्रश्न सोडवु शकतिल का???>>>अर्थातच, पेरेंटल डिस्प्युट्स सोडवण्यासाठी डिएनए फिंगरप्रिंटींग सगळ्यात खात्रीचा मार्ग आहे.

आगाऊ, फारच उशीरा वाचला लेख, पण नशीब माझं वाचण्यात तरी आला.

लेखाच्या शिर्षकापासुनच तो छान आहे कारण नुसतं 'मायटोकाँड्रिआ' असं काही असतं तर मी उघडलाही नसता. इतका सहज सोप्या भाषेत लिहिला आहे कि पटकन समजला. तुझे विद्यार्थी खरंच लकी.

ललिताची पोस्ट वाचुन तर काटा आला अंगावर. हा विचार कधी आलाच नसता माझ्या डोक्यात.

आगाऊ ...सोलीड लेख. मुख्य म्हणजे आमच्या सारख्या फक्त लोकान्च्या पैश्याची काळजी करणार्‍या माणसन्ना कळेल अशा भाषेत लिहील्या बद्दल आभार.

प्रीति ...खरच काय सोच आहे!!! लै भारी.

एक किडा: मात्रुसत्ताक पध्धती पुर्वी दक्षिणेत होती . त्या लोकान्ना ह्याची माहिती असेल? ते धरतीला मुख्य समजत, बीजा ला नाही.

मस्त आहे लेख लसावि. सुरस आणि सोपा. आजच वाचला. आधी नव्हता वाचला.
तुम्ही शिक्षक असाल तर विद्यार्थी भाग्यवान आहेत तुमचे.

एकाच मूळ मायटोकाँड्रिआ डीएनए मुळे काही गुणधर्म ( चांगले / विपरीत कसेही) संबंधित स्त्रियांमध्ये अनुवंशिकतेने येतात का? जसे आजी-नात / नातू, मावस भाऊ-बहिणी, मावशी-भाची / भाचा नात्यात.

Pages