श्री. राजेश देशपांडे
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट पंच म्हणून झळकणारे एक मराठी नाव. माधवराव गोठोस्करांनंतर पंचगिरीच्या क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव. ठाण्याच्याच खंडू रांगणेकरांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर चमकणारे व्यक्तिमत्व. अंपायरिंग या क्षेत्राकडे पेशा म्हणून न पाहता Passion म्हणून पाहणारे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली सारख्या 'दादा' खेळाडूंकडून तसेच पिलू रिपोर्टर, माधव गोठोस्कर अशा मान्यवर पंचांकडूनही कौतुकास पात्र ठरलेले पंच. Bank of India मधली नोकरी सांभाळून पंचगिरी करणारे. Gentlemens' Game म्हणून ओळखल्या जाणार्या क्रिकेट या खेळातला हा Gentleman Umpire. क्रिकेट खेळाडू म्हणून करियर करता आली नाही तरी नाउमेद न होता क्रिकेटशीच संबंधित अशा अंपायरिंग या क्षेत्रात लोकप्रियता मिळवणारा एक मराठी माणूस.
अश्विनी: मायबोली डॉट कॉम या मराठी संकेतस्थळाच्या 'संवाद' या विभागामधे आपलं स्वागत! तुमच्या 'पंच' या करियरमधे सुरू केलेल्या वाटचालीबद्दलची माहिती मायबोलीकरांसाठी हवी आहे. त्या अनुषंगाने पुढे प्रश्न विचारते.
अश्विनी: तुम्ही पंच व्हायचा निर्णय कसा काय घेतलात?
श्री. देशपांडे: काय आहे माहिती आहे का, यासाठी मुळात क्रिकेटची खूप आवड पाहिजे. क्रिकेटच काय, कुठल्याही क्षेत्रात नाव कमवायचं म्हणजे त्या गोष्टीची आवड पाहिजे. क्रिकेटची आवड ही पहिल्यापासून होती. अगदी लहानपणापासूनच! मुंबईत राहिलेल्या प्रत्येक मुलाला (किंवा सगळ्यांनाच) क्रिकेटची आवड असतेच. क्रिकेट खेळायला तेवढं जमलं नाही. बर्याच गोष्टी असतात... आईवडिलांनादेखील कल्पना नसते काय आहे या क्षेत्रात याची! फिजिकल लिमिटेशन्स असतात. प्रत्येकाला खेळणं जमत नाही. मी कॉलेजतर्फे खेळलो. पण वरच्या लेव्हलला न जाऊ शकल्यामुळे कुठेतरी मनात रुखरूख होती. असं काही करायचं की ज्यामुळे आपण वरच्या लेव्हलला पोचू. म्हणजे खेळणं तर आहेच. मुळात प्रत्येक खेळात मुख्य अॅट्रॅक्शन खेळाडू असतो. खेळाडू सोडून इमिजिएट काय असेल तर तो पंच असतो! कारण काय, तो नेहमी एक्स्पोज होतो, प्रत्येक क्षेत्रात! जसं, स्कोअरिंग आहे, कोचिंग आहे.. पंच म्हणून मी त्याच वेळी विचार केला. पंच होण्यासाठी एक नेमकं टेंपरामेंट लागतं, स्वभाव लागतो. माझा स्वभाव बराचसा सूट होत होता. एक शांत स्वभाव! कुठल्याही कारणानं डिस्टर्ब व्हायचं नाही. म्हणून साधारण १९९३ मधे मनात विचार आला, बघू या! या दृष्टीने वाटचाल सुरू केली.
पंच व्हायचं तर काय करावं लागतं? तरी फारसा विचार नव्हता, कारण वय लहान होतं. त्याच साली, म्हणजे १९९३ मधे इंग्लंड विरुद्ध इंडिया अशी वानखेडे स्टेडियमवर मॅच होती, टेस्ट मॅच! त्या मॅचमधे पिलू रिपोर्टर होते, ठाण्याचे, हे त्यावेळचे नंबर वन अंपायर होते इंडियातले. १९९२ मधल्या वर्ल्डकपमध्ये पण होते, जो पाकिस्तानने जिंकला तो!
ते नेमके नशिबाने ठाण्यात रहात असल्यामुळे असा विचार आला की त्यांना भेटून बघू या. आणि ते नेमके त्या मॅचमधे अंपायरिंग करत होते. त्यांना भेटायला गेलो. ते फार मोठे होते त्यावेळी. मी तर कोणीच नाही. त्यांच्याशी काहीच ओळख नव्हती. त्यांच्या घरी गेलो. ते स्टेशनजवळ रहायचे. खंडेरावांच्या घरासमोर, ते नव्हते घरी. त्यांच्या मिसेस होत्या. म्हणाल्या, "नाही, ते असे नाही भेटणार. भेटायचं असेल तर नंतर ये. सध्या ते बीझी आहेत."
जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते म्हणाले, "जर तुला सिरियसली या क्षेत्रात काम करायचं असेल, नाव काढायचं असेल, तर तू क्लासेसना ये आमच्या." ही पहिली स्टेप! मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे क्लासेस घेतले जातात अंपायरिंगचे. इथे ठाण्यात ते स्वतः क्लासेस घ्यायचे. म्हटलं, 'ठीक आहे. त्या दृष्टीनं बघू या!' १९९३ च्या सप्टेंबरमधे त्यांचे क्लासेस सुरू झाले एम.एच. हायस्कूलमध्ये ते मी अटेंड केले. पहिल्या दिवशी गेलो तर मी एकटाच होतो. अंपायरिंगचं क्षेत्र इतकं वेगळं क्षेत्र आहे. पहिल्या दिवशी मी आणि ते! ते म्हणाले, "बघ, कोणी नाहीये. पुढल्या शनिवारी आपण सुरू करुया." पुढल्या शनिवारी गेलो तर ५-६ मुलं होती. ते म्हणाले, "एक हॉबी म्हणून बघणार असशील तर अंपायरिंगसाठी तुला सर्टिफिकेट वगैरे मिळणार नाही. प्रोफेशन म्हणून स्वीकारायचं असेल तर त्यासाठी खूप मेहेनत आहे. शॉर्टकट नाहीये इथे. मुंबईची प्रत्येक मॅच अटेंड करायला लागेल. दर रविवारी बाहेर जायला लागेल." त्यावेळी नुकतंच लग्न झालं होतं. घरून पण सपोर्ट होता. ते महत्वाचं होतं. कारण प्रत्येक रविवारी बाहेर जायचं म्हणजे ..! तर तेव्हापासून सुरुवात झाली. क्लासेस अटेंड केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनची परीक्षा पास झालो. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पॅनलवर (स्टेट पॅनलवर) सिलेक्ट झालो. यात जवळपास ५०० अंपायर्स आहेत. त्यावेळी २५० असतील. क्लासेस अटेंड करून परीक्षा पास झाल्यावर इथे पहिल्या स्टेट अंपायरिंगची सुरुवात झाली.
अश्विनी : अंतरराष्ट्रीय पंच व्हायला काय निकष आहेत?
श्री. देशपांडे : पहिली पायरी स्थानिक असोसिएशनची परीक्षा पास करणे. त्यानंतर तिथल्या असोसिएशनच्या ज्या काय मॅचेस असतात. उदा: कांगा लीग, टाईम्स शील्ड चं नाव तुम्ही ऐकलं असेल, या २-३ महत्त्वाच्या टूर्नामेंट्स मुंबईत खेळल्या जातात, त्यात पंचगिरी करावी लागते. स्टेट लेवलला जायला इथून सुरुवात करावी लागते. मुंबईत पण बरेच चांगले प्लेअर्स खेळतात. मुंबईला अंपायरिंग करणं खूप चॅलेंजिंग पण असतं तसं.
मुंबईपासून सुरुवात झाली. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) त्यांना गरज वाटेल तेव्हा ठराविक काही वर्षांनी परीक्षा घेतं. स्टेट लेव्हलच्या प्रत्येक असोसिएशनतर्फे साधारण ५ अंपायर्स रेकमेंड करायला सांगतात. ही परीक्षा पुढच्या लेव्हलला नेण्यासाठी घेतली जाते. मुंबईत तेव्हा २५०-३०० अंपायर्स होते. कुठल्या ५ जणांना पाठवायचं हा प्रश्न होता. मी तर त्यावेळी अगदी नवीन होतो. अंपायर्स कमी पडायला लागले की गरजेनुसार साधारण १०-१२ वर्षांनी ही परीक्षा होत असते. १९९१ नंतर ९७ मधे ही परीक्षा घेतल्या गेली. मी १९९४ मधे पहिली मॅच केली मुंबईत, आणि तीन वर्षांत ही संधी आली. प्रश्न एवढा होता की मुंबईनं सिलेक्ट केलं पाहिजे. ५ जणांना निवडायचं एवढ्या अंपायर्समधे! काही लोकांचं म्हणणं होतं की बरीच वर्ष अंपायरिंग करणार्या सिनियर अंपायर्सना निवडावं. अर्थात ४५ वर्षांच्या आत असण्याची एज लिमिट होती. पण नंतर त्यांनी असं ठरवलं की ५ जण घ्यायचेच तर आपण २००-२५० लोकांसाठी इथेही एक परीक्षा, एक क्वालिफाइंग एक्झाम घेऊ. त्यात जे पहिले ५ येतील, त्यांना रेकमेंड करू.
तर अशी काँपेटेटिव्ह एक्झाम घेतली गेली. ३ तासांचा पेपर होता. खरं तर कॉलेज सोडून बरीच वर्षं झाल्यामुळे लिहायची सवय नव्हती. तेव्हा आधीच्या ८-१० दिवसांत तशी तयारी केली. त्यांचं लॉगबुक वाचून, वेगवेगळे प्रश्न बघून, उत्तरं लिहिण्याची तयारी केली. त्या परीक्षेत मी दुसरा आलो. म्हणजेच मुंबईने रेकमेंड केलेल्या पाचांत निवड झाली. BCCI चे असे २६ स्टेट्स आहेत. एकूण १३० उमेदवार झाले. त्यातले त्यांना फक्त २० घ्यायचे होते. त्यात मी पास झालो. मुंबईचे एकूण दोघं तिघं निवडल्या गेले. तर असा मी BCCI लेवलला आलो.
बोर्डाच्या मॅचेस असतात. आपल्याला वाटतं, BCCI च्या मॅचेस म्हणजे फक्त रणजी ट्रॉफी. पण त्यांच्या भरपूर मॅचेस होतात. अंडर सिक्स्टीन, अंडर नाइन्टीन, अंडर ट्वेंटी टू, रणजी ट्रॉफी! या सगळ्या मॅचेस पंचगिरीसाठी मोजल्या जातात. सुरवातीला तर रणजी ट्रॉफी दिलीच नाही. म्हणजे इंडियातली मोठी, फर्स्टक्लास टूर्नामेंट. आम्हाला सुरवातीला १-२ वर्षं फक्त ज्यूनिअर मॅचेस दिल्या जायच्या. उदा: टीम अंडर १९. मी माझी पहिली मॅच पुण्याला केली . ती ज्यूनिअर मॅच होती, १६ वर्षांखालची. त्यानंतर मी बोर्डाच्या म्हणजे BCCI च्या लेव्हलला आलो. यानंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय लेव्हलला जाणार थेट. आधी जसं मुंबई, कर्नाटक खेळणार तसं इथे आता (आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा) प्रत्येक देश आला. म्हणजेच ICC बोर्डात क्रिकेट खेळणारे सगळे देश आले.
तर सुरुवातीला ज्युनिअर मॅचेस केल्या. काही वर्षांनी एस्टॅब्लिश झालो. रणजी सारख्या मॅचेसमधे रिपोर्टला फार महत्त्व असतं. प्रत्येक मॅचनंतर 'कॅप्टन्स रिपोर्ट' तयार होतो. अंपायरिंगसाठी काही परीक्षा नसतात. तर मॅच अखेरीस खेळणार्या दोन्ही संघांचे कॅप्टन्स अंपायरवर रिपोर्ट लिहितात. त्याचा एक फॉरमॅट असतो. यापुढचा तुमचा परफॉरमन्स या रिपोर्टवर अवलंबून असतो. उदा: एल बी डब्लू कसे दिले, प्रेशर कसं हँडल केलं, सगळ्या प्रकारच्या परिस्थितींत शांत होते का, याबद्दलची माहिती वरच्या लेवलला पाठवली जाते. त्यावरून पंचांचं पुढे सिलेक्शन होतं.
अश्विनी : भारताचे इतके कॅप्टन्स होऊन गेले, त्यातल्या प्रत्येकाची मानसिकता (मेंटॅलिटी) वेगळी होती. त्यानुसार त्यांनी दिलेल्या रिपोर्टवर काही फरक पडतो का? तुम्हाला कधी फरक पडलाय का?
श्री. देशपांडे : मॅचमधे कितीही काहीही झालं, माझ्यावर रिपोर्ट लिहिणार्या एखाद्या कॅप्टनला समजा चुकीचं आऊट दिलं गेलं, किंवा त्याच्या विरोधात एखादा निर्णय दिल्या गेला, तरी त्या कॅप्टनपदाच्या लेव्हलला ते इतके मॅच्युअर असतात (आंतरराष्ट्रीय पातळीला तर प्रश्नच नाही), की ते समजू शकतात, माणूस आहे तेव्हा चूक होणारच. तेव्हा एखाद्या चुकीबद्दल राग धरून रिपोर्ट लिहीत नाहीत. एकूण त्यांना चांगलं अंपायरिंग कळतं. सामन्यांत मात्र प्रेशर टाकायचा खूप प्रयत्न करतात. ते नैसर्गिक आहे. त्यांची टीम जिंकावी म्हणून केलेला तो प्रयत्न आहे. पण शेवटी ते समजावून सांगतात कोण चांगलं आहे, कोण वाईट. त्यांची टीम हरली, त्यांच्याविरुध्द काही निर्णय दिले गेले, तरी त्यांना माणूस चांगला (अंपायर) असल्याचं कळतं.
अश्विनी : मघाशी तुम्ही म्हणालात, आधी खेळाडू नसलेला मनुष्य सुध्दा पंच होऊ शकतो, तसंच खेळणारा फलंदाज सुध्दा पंच होतो. तर पंच होण्यापूर्वी खेळाडू असलेल्या आणि नसलेल्या अशा दोघांच्याही निर्णय देण्याच्या मानसिकतेत नेमका काय फरक असू शकतो?
श्री. देशपांडे : चांगला प्रश्न आहे. आधी खेळाडू असलेल्या पंचाला एका ठराविक लेव्हलपर्यंत (खेळाडू असल्याचा) फायदा होतो. तो त्या वातावरणातून गेलेला असतो. क्रिकेट कसं खेळलं जातं याचं बेसिक ज्ञान असतं. अंपायरवर टाकल्या जाणारे प्रेशर टॅक्टिक्स माहिती असतात. मैदानात उभा राहिलेला असतो. तो बेसिक फरक आहे. त्यामुळे मी म्हणेन की साधारण १०% फायदा होतो. मैदानात कधीही न गेलेला माणूस पंच म्हणून उभा राहिला तर काय होईल? त्या ऐवजी एखादा ५-६ वर्षं खेळलेला माणूस असला तर क्रिकेटचं ज्ञान असेल, म्हणजे पिच वगैरे. इतकी वर्षं अंपायरिंग केल्यामुळे आम्हाला 'एखादी विकेट स्पिनर्सना साथ देते, किंवा फास्ट बोलर्सना साथ देते' याचं थोडसं ज्ञान येतं. याचा फायदा आधी खेळून चुकलेल्याला लवकर मिळतो. पण ते तितपतंच. याच्यापुढे तुमचा स्वभाव, टेंपरामेंट, (कितीही खेळला असला तरी) अर्थातच रूल्सचं ज्ञान आणि त्यांचं इंप्लिमेंटेशन हे सगळं महत्वाचं.
खेळाडू तसा फ्री असतो. त्याची चूक झाली, त्याने कॅच सोडला तरी फारसं काही नसतं. पण अंपायरची चूक ही तिर्हाईत माणसाची चूक असं टीमला वाटतं. असे प्रसंग येतात तेव्हा तुम्ही ते कसे हाताळता, याचा पंच होण्यापूर्वी खेळाडू असण्याशी काही संबंध नाही. तर एकूण काय, खेळलेल्या माणसाला १० टक्के अॅडव्हांटेज आहे, पण ते तेवढंच! यापुढे २-३ वर्षं अंपायरिंग केलेला माणूस आणि ५-६ वर्षं खेळलेला माणूस शेवटी एकाच लेव्हलला असतात, त्यांच्यात फारसा फरक नाही.
अश्विनी: मघाशी तुम्ही म्हणालात, 'काही काही देशांचे खेळाडू, विशेष करून ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, पंचांवर दबाव आणतात'. तर अशा संघांच्या सामन्यांत पंचगिरी करताना काय वेगळं वाटतं?
श्री. देशपांडे : मुंबईचा असल्यामुळे सचिन तेंडुलकर, अजित आगरकर यांसारख्या बर्याचश्या स्टार खेळाडूंच्या सामन्यांतून गेलो आहे. हे मुंबईच्या स्थानिक पातळीवर खेळतात. त्यामुळे जे ग्लॅमर इंटरनॅशनल क्रिकेटर्सना कंट्रोल करायचं, त्यांच्या सहवासात रहायचं हे मुंबईच्या अंपायर्सना त्या मानानं सोपं जातं. एखादी टीम जास्त प्रेशर आणते किंवा एखादी कमी असं नाही. प्रत्येकाची वेगळी पध्दत असते. ऑस्ट्रेलियन्स थोडे अॅग्रेसिव्ह असतात. ते तुमच्या फार चटकन लक्षात येतं. वेळ आली तर दुसरी एखादी टीम पण प्रेशर आणते, पण शांतपणे. तुम्हाला (लागलीच) कळणार नाही. कारण कदाचित ते तेवढे व्होकल नसतील. तुम्हाला जाता-येता हळूच काहीतरी बोलून जातील. म्हणजे काय, त्यांचं काम ते करून जातात. इंटरनॅशनल लेवलला सगळ्याच टीम्स प्रेशर आणतात.
अश्विनी : या दबावाला कसं तोंड देता?
श्री. देशपांडे : आधी म्हटल्याप्रमाणे तुलना करायची तर मुंबईत अंपायरिंग केल्यामुळे जरा सवय झालेली असते. दबाव येतोच. नवीन असताना जास्त प्रेशर घेतलं जाऊ शकतं. पण जो मानसिकदृष्ट्या कणखर असेल, त्याला हा दबाव व्यवस्थित हाताळता येतो. शेवटी काय, स्वतःवर विश्वास असावा लागतो. खेळाडू आपापलं काम करत असतात. आपल्या पध्दतीने दबावही टाकत असतात. तसंच तुमचं काम तुम्हीच करायचं असतं, अगदी दबावाला बळी न पडता! समजा हातून एखादी चूक झाली, निर्णय चुकला आहे असं वाटलं, तर ठीक आहे, झालं ते झालं! याच्यापुढे त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायला नको. ती चूक झाली म्हणून पुढे काँपेन्सेट करता कामा नये! म्हणजे एखाद्याला चुकून नॉट आऊट दिलंय, म्हणून बघू पुढली संधी कधी येतेय, थोडं जरी वाटलं तरी आऊट देईन असं व्हायला नको. प्रत्येक केस वगळी असते. अपील झालं तरी मी पहिल्यांदा जसा विचार केला, तसाच दुसर्यांदा करीन. काँपेन्सेट करत बसणार नाही. हा गुण खेळाडूदेखील ओळखतात, आणि याबद्दल आपोआप सन्मान देतात. (निर्णयात) त्यांच्या विरुद्ध गेलो तरी, 'याचा भरून काढण्याचा उद्देश नाही' हे लक्षात ठेवून असतात. त्यांचा, 'आपण हरलो-जिंकलो तरी हरकत नाही, पण क्रिकेटचं नुकसान व्हायला नको, क्रिकेट बदनाम व्हायला नको' हाच दृष्टीकोन असतो. शेवटी चांगला अंपायर असणं हे क्रिकेटच्या दृष्टीनंदेखील चांगलं आहे!
अश्विनी : भारतामधे क्रिकेट हा खेळ धर्मासारखा मानला जातो. सचिन आणि सुनील गावस्कर हे कसे देव असल्यासारखं असतं. या दोघांसमोर तुम्ही कधी पंच म्हणून उभे राहिले आहात का?
श्री. देशपांडे : सुनील गावस्कर खेळत असताना मी (पंच) नव्हतो. ते बरेच आधीचे. पण सचिन तेंडुलकरला मी अंपायरिंग केलंय. सचिन, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण फार जंटलमन आहे. मी तरी एस्टॅब्लिश झालोय, तो मला ओळखतो, पण एखादा नवीन मुलगा, अगदी काहीही क्रिकेट न खेळालेला २० वर्षांचा मुलगा जरी अंपायर म्हणून आला, तरी तो त्याला अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पंचाइतकाच सन्मानाने वागवतो! त्याने दिलेला निर्णयदेखील तसाच मान्य करतो. 'शेवटी तो पंच आहे!' हा दृष्टीकोन असतो. खरं सांगायचं तर सचिन असं बघतो की पंच रिलॅक्स्ड राहील.
अश्विनी : नॅचरली तुमचा तो आवडता खेळाडू असेल. अजून कोणकोणते तुमचे आवडते क्रिकेटपटू आहेत?
श्री. देशपांडे : मला मॅकग्रा खूप आवडतो, जो पंचगिरी करायला खूप कठीण आहे. मी त्याला पंचगिरी केली नाहिये कधी. ब्रायन लारा, शेन वॉर्न, कपिल देव, जो बॅकग्राऊंड काहीही नसताना खेडेगावातून येऊन इतक्या वर जातो, राहुल द्रविड त्याच्या पॉलिश्ड नेचरमुळे आवडतो.
अश्विनी : पंचांमध्ये कोण आवडतं?
श्री. देशपांडे : मला पाकिस्तानचे आलिम म्हणून पंच आहेत ते आणि ऑस्ट्रेलियाचे सायमन टौफेल आवडतात. सायमनना आणण्यासाठी BCCI ने ऑस्ट्रेलियाशी काँट्रॅक्ट केलं होतं, इंडियन क्रिकेटच्या अंपायर्सचं स्टँडर्ड वर आणण्यासाठी. आणि सायमन हे ५ वर्षं सतत बेस्ट अंपायर ऑफ द इयर अॅवॉर्ड मिळालेले होते ICCचे. BCCI ने बरेच पैसे इन्व्हेस्ट केले होते आणि ते गेले ३ वर्षं आम्हाला ट्रेनिंग देत होते छोट्याछोट्या गोष्टींपासून, मॅच प्रिपरेशन कसे करायचं, फिटनेस वगैरेचं. त्यांचं एक वाक्य आहे की When the opportunity comes, its is too late to prepare,You should be ready.
संधी कशी येईल ते सांगता येत नाही. तुम्ही अशी तयारी ठेवा की कुठल्याही क्षणाला काहीही होऊ दे.
तुम्ही असं समजू नका की अरे, तुम्ही साधे कुणी अंपायर आहात. मग त्यावेळेला असं होऊ शकतं की अरे मी आधी तयारी केली असती तर बरं झालं असतं.तसंच फिटनेसचं. ओव्हरऑल मॅच झाल्यावर सगळं लिहून काढतात, फीडबॅक घेतात. आलिमचं मला हे आवडतं की ते कंपोझ्ड आहेत, रिलॅक्स्ड, बॅलन्स्डमाईंड, स्माईलिंगफेस. अंपायरच जर टेन्स्ड दिसला तर ते ओव्हरऑल इन्फेक्शियस असतं आणि अंपायर जर रिलॅक्स्ड, कूल असेल तर ऑटोमॅटिकली शांत वाटतं. त्या व्यक्तीबद्दल खात्री वाटते की योग्यच निर्णय दिला जाईल आणि जरी एखादी चूक झाली तरी ती ह्युमन एरर म्हणून झालेली असते.
म्हणून मला अलिम दार आवडतात.
अश्विनी : टेक्नॉलॉजीच्या वापराआधी पंच म्हणून काम करताना मुख्य कशावर भर दिला जात असे? पायचित किंवा यष्टीमागे झेलबादचे निर्णय देतांना पूर्वीचे नियम आणि आताचे नियम यात काय फरक आहे?
श्री. देशपांडे : बेसिक नियम तेच आहेत. फक्त टेक्नॉलॉजी आल्यामुळे प्रेशर वाढलंय. इन्फॅक्ट टीव्हीमुळे, टेक्नॉलॉजीमुळे फायदा झालाय. जेवढं कव्हरेज जास्त तेवढं अंपायरवरती प्रेशर जास्त. कारण आपली एखादी चूक करोडो लोकं बघतात. छोट्या मॅचमध्ये काय असतं, तुम्ही एखादी चूक केली तर कुणालाच काही कळत नाही. इव्हन टीव्हीच्या आधीसुद्धा नुसते रेडिओ असत. त्यामुळे १००% कुणालाच माहीत नसायचं की नक्की काय झालंय. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी आलीय ती तुम्हाला मदतही करते. आता तुम्ही स्ट्रिप्स बघता, ती पट्टी अशासाठी असते की एल्.बी.डब्ल्यू. मधे बॉल कुठे पडतो ते महत्वाचं असतं. तोच नोबॉल पडला नसेल तरच पुढचं ठरतं. लेग स्टंपच्या बाहेर पडला असेल तर एल.बी.डब्ल्यू. नॉटआऊट असतं. दुसरी गोष्ट अशी की बॅटपॅड असेल. एकदा का बॉल बॅटला लागून पायाला लागला की एल.बी.डब्ल्यू. नॉट आउट असतो. पॉइंट ऑफ इम्पॅक्ट आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जेव्हा बॉल पायाला लागतो तो त्या स्ट्रिपच्या लाईनच्या जर ऑफ स्टंपच्या बाहेर लागला आणि बॅट्समन खेळायचा प्रयत्न करत असेल तर तो नॉट आऊट असतो आणि शेवटी बॉल स्टंपला लागणारा नसेल तर नॉट आऊट असतो. या चार गोष्टी असतात.
टेक्नॉलॉजीमध्ये असं स्ट्रिक्टली एल.बी.डब्ल्यू. साठी आय.सी.सी.ने कुठलीही प्रोव्हीजन दिली नाहिये की त्यासाठी तिकडे विचारायचं. पण आता प्लेअर विचारू शकतो. आत्तापर्यंत काय होतं की आपला निर्णय फायनल असायचा पण आता प्लेअरला सुद्धा दोन हक्क असतात प्रत्येक इनिंगमध्ये की समजा एखाद्याला एल्. बी. डब्ल्यू. दिला आणि त्याला वाटलं की हे चुकलंय तर तो पंचांना विनंती करु शकतो की माझं डिसिजन टिव्हीवर रिव्ह्यू करा. मग पंच थर्ड अंपायरला विचारतो की मी दिलेला हा निर्णय बरोबर आहे की नाही ते ठरवा. तो बरोबर असेल तर कायम होतो आणि चुकीचा असेल तर बदलू शकतो. आणि जर तो निर्णय बदलला तर त्याचे दोन हक्क इन्टॅक्ट रहातात. समजा मी बॅट्समन आहे आणि मला आऊट दिलंय पंचांनी आणि मला वाटलं की मी नॉटआऊट आहे आणि मी पंचांना म्हटलं की नाही तुम्ही रिक्वेस्ट करा आणि माझा निर्णय वरती विचारा आणि वरनं थर्ड अंपायरचा असा निर्णय आला की खेळाडू म्हणतोय ते बरोबर आहे तर त्याचे दोन हक्कं इन्टॅक्ट रहातील आणि चुकलं तर एकच राहील.
अश्विनी : असे महत्वाचे निर्णय देताना आजकाल रेफरल सिस्टीम किंवा थर्ड अंपायर वापरतात. तर ते जास्त सोयीचं वाटतं का?
श्री. देशपांडे : डेफिनेटली. मी पूर्ण सपोर्ट करतो थर्ड अंपायरला. इन्डायरेक्टली प्रेशर पण कमी होतं, की जरी माझा निर्णय चुकला एखादा तरी त्यात लज्जास्पद काहीच नाहिये. ती ह्युमन एरर आहे. आणि जर क्रिकेटचा फायदा होत असेल आणि एखाद्या प्लेअरला योग्य निर्णय मिळत असेल तर टेक्नॉलॉजीची मदत घेण्यात काहीच गैर नाहिये.
अश्विनी : आयपीएल सारख्या अत्यंत वेगवान व चुरशीच्या सामन्यात पंचगिरी करणे हे सर्वात कठीण असू शकतं का?
श्री. देशपांडे : जास्त प्रेशर असतं कारण पैसा खूप असतो. फ्रँचाइजींनी बरेच पैसे लावलेले असतात त्यासाठी. त्यामुळे मनी हे अॅडिशनल प्रेशर असतं आणि परत मॅच २०-२० ची असते त्यामुळे तुम्हाला रिकव्हरीला चान्स नसतो कुठल्याही टीमला. टेस्ट मॅचमध्ये कसं ५ दिवसांत एखादी टीम परत येऊ शकते. २०-२० किंवा ५०-५० मध्ये तेवढा वेळ कमी असतो त्यामुळे तुमची एखादी चूक एखाद्या टीमला भारी पडू शकतो. तो विचार जेव्हा मनात येतो तेव्हा डेफिनेटली प्रेशर असतं. योग्य निर्णय देता आलाच पाहिजे असं वाटतं.
अश्विनी : टेस्ट क्रिकेट, वन डे आणि २०-२० क्रिकेट यापैकी कुठल्या प्रकारच्या खेळात तुम्हाला पंच म्हणून काम करायला आवडेल?
श्री. देशपांडे : टेस्ट क्रिकेट. तुम्ही कुठल्याही एस्टॅब्लिशड क्रिकेटर किंवा पंचांना विचारा, कुणीही सांगेल टेस्ट क्रिकेट इज रिअल क्रिकेट. कारण त्यात कमबॅकची संधी असते. म्हणजे चांगली टीम तिथे जिंकणारच जिंकणार.
अश्विनी : म्हणजे नुसतं कमबॅकपेक्षा मला वाटतं ते क्रिकेटचं सौंदर्य आहे. ते त्या पाच दिवसांत क्रिकेट शौकिनांना पण पुरेपूर उपभोगता येतं आणि क्रिकेट खेळणार्यांनासुद्धा त्याचं चांगलं प्रदर्शन करता येतं.
श्री. देशपांडे : एक्झॅक्टली. बॉलरला आपलं पूर्ण कौशल्य लावता येतं. इथे चारच ओव्हर्स मिळतात २०-२० मध्ये. परत फील्ड रिस्ट्रिक्शन्स अशा असतात की जिथे टोटली बॅट्समन ओरिएंटेड गेम आहे. त्यामुळे बॉलरच्या दृष्टीनेही अगदी मार खाण्यासारखंच आहे. त्यामुळे बॅलन्स्ड म्हटलं नुसतं आणि ओव्हरऑल टेंपरामेंट किंवा सगळे जर स्किल्स टेस्ट होत असतील कुठे तर टेस्ट क्रिकेटमध्ये.
अश्विनी : अशा या फास्ट क्रिकेटमध्ये असं दिसतं की त्वरित निर्णय तर प्रत्येक मॅचमध्ये घ्यावे लागतात. साधारण त्या बॉलवरचा निर्णय दिल्यानंतर त्याच्या पुढच्या, दुसर्या तिसर्या बॉलला तुम्हाला असं वाटलंय का कधी की अरे तो माझा निर्णय चुकला होता. नंतर म्हणजे ते घडून गेल्यानंतर, एखाद्याला आऊट दिल्यानंतर कधी असं वाटलंय का?
श्री. देशपांडे : नक्कीच वाटलंय आणि हे होणारच. एखाददुसरा निर्णय चुकीचा जाणारच. तर याच्यात एक गोष्ट अशी आहे की चांगला पंच असतो तो हे विसरून जातो पटकन. मगाशी म्हटलं की एखादा मी निर्णय दिला आणि मग लक्षात आलं बॅट्समनच्या रिअॅक्शनवरून किंवा दुसर्या पंचांशी डिस्कस करून. याच्यात एक प्रोव्हिजन आहे की आऊट दिलेला बॅट्समन जोपर्यंत बाऊंड्रीलाईन क्रॉस करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला परत बोलवू शकता. तुमचं डिसिजन रीव्होक करु शकता. पण कधीकधी असं नंतर सुद्धा लक्षात येतं की गेल्यावर, कदाचित आऊट असेल नसेल, पण नंतर वाटतं आपलं चुकलंही असेल. अशावेळेला आम्ही त्याला रिकव्हरी म्हणतो, की तो पटकन रिकव्हर होतो त्या सेटबॅकमधून की ठीक आहे माझी चूक झाली, मोठ्या प्लेअरला आऊट दिलं आहे आणि ती चूक झालेली आहे आणि त्याचा परिणाम कदाचित त्याच्या टीमवर होऊ शकतो. पण ते विसरून जायचं. एखादा मोठा बॅट्समन कसा खेळतो, चुकतो, विसरून जातो तसंच मोठा पंचसुद्धा चूक झाली, की मग विसरून जातो.
अश्विनी : आता तुम्ही दिलेल्या एखाद्या निकालाबद्दल एखाद्या प्लेअरने तुमच्याशी हुज्जत घातली तर तुम्ही काही कारवाई करु शकता का?
श्री. देशपांडे : हो. आता तर खूप स्ट्रिक्ट झालंय. आता मॅच रेफ्रीज असतात प्रत्येक मॅचला. पुर्वी कसं फक्त पंचच मॅच कंट्रोल करायचे. आता पंचांच्या वरती खेळाडूंची वर्तवणूक ऑब्झर्व करायला मॅच रेफ्री असतात. आणि मॅच रेफ्रीकडे बरेच हक्क आहेत आता की एखाद्याची वर्तवणूक जर वाईट झाली की लेव्हल १, लेव्हल २ म्हणजे कुठल्या लेव्हालला तो काय करतोय, आऊट दिल्यावर स्टंपला लाथ मारली तर लेव्हल २ मधे येतं किंवा जस्ट नाराजी दर्शवली तर लेव्हल १ मध्ये, शिव्या दिल्या वर आणखी वरच्या लेव्हलमध्ये. त्यामुळे हल्ली खेळाडू खूप सावध असतात. त्यांना माहीत आहे की हे आपल्याला परवडणार नाही. रेफ्री बसलेले आहेत वरती आणि इव्हन रणजी ट्रॉफीलासुद्धा बारा कॅमेर्यात कव्हर होतं. त्यांची कुठलीही वर्तवणूक लपून राहू शकत नाही. तरीपण एखाद्याने हुज्जत घातली तर आम्ही रिपोर्ट करु शकतो. की जे कदाचित कॅमेरा पकडणार नाही, समजा जाताना एखादी शिवी देऊन गेला, कदाचित कॅमेराला कळणार नाही किंवा रेफ्री जो वरती बसलाय त्यालापण कळणार नाही. किंवा प्लेअर्समध्ये आपापसांत भांडण झालं.
अश्विनी : पण तुमच्या जवळून जाताना जर का एखाद्या खेळाडूने तुम्हाला काही चुकीचा शब्द वापरला आणि तो बाकी कुणाला नीटसा ऐकूदेखील आला नाही तर तुम्ही जेव्हा हे रिपोर्ट करता तेव्हा तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागतं का?
श्री. देशपांडे : हिअरिंग असतं. त्याशिवाय रेफ्री प्लेअरला बोलावतो, अंपायरला बोलावतो, दुसर्या अंपायरला बोलावतो आणि साधारण लिप मुव्हमेंटमुळे किंवा कॅमेरामुळे किंवा त्याच्या एक्स्प्रेशनमुळे कळू शकतं की हा नक्की काहीतरी व काय बोलला आहे. आणि रेफ्रीजसुद्धा एवढे एक्स्पिरियन्स्ड झालेत की दोन तीन प्रश्नात ते त्याच्याकडून काढून घेऊ शकतात की चूक झालेली आहे आणि तो प्लेअर पण थोडासा गिल्टी असतो आणि तो कबूल करतो की चूक झाली माझ्या हातून. मी एक्साईटमेंटमध्ये होतो चुकीचं आउट दिल्यामुळे. रेफ्रीपण ओव्हरऑल विचार करतो, असं नाही की जस्ट दिली पनिशमेंट. मॅचची सिच्युएशन काय आहे? अंपायरचा निर्णय काय होता हे ऐकून ठरवतात काय शिक्षा द्यायची ते.
अश्विनी : पंच म्हणून काम करताना तुम्हाला प्रत्येक बॉलचं त्याच क्षणाला विश्लेषण करावं लागतं. म्हणजे नो बोल आहे की वाईड आहे, हाईट किती? मग तुम्ही हे कसं को-ऑर्डिनेट करता?
श्री. देशपांडे : पहिलं, बॉल टाकताना पंचांना बघायचा असतो नो बॉल, म्हणजे पहिलं डिसिजन मेकिंग आहे बॉलरने एकदा धावायला सुरुवात केली की तो नो बॉल आहे की नाही ते बघणं. एकदा कळलं की तो नो बॉल नाहिये की ते काढून टाकायचं. इमिजिएट पुढचं, की आता या बॉलने काय होणार आहे. एल.बी.डब्ल्यू.चे चान्सेस आहेत की बॉल बॅटला लागलाय? बरं नुसतं आउट नॉटआऊट नसतं, लेग बाय असते, बाय असते, वाईड बॉल असतो. नंतर बॉल कुठे जातो? बॉल कुठे लागला? पायाला कुठे लागला? अपील काय झालं? या सगळ्याचा चुरशीच्या वेळी खूप फरक पडतो म्हणून शांत डोक्याने मी प्रत्येक बॉल फॉलो करतो. पंचांचं जग हे संपूर्ण आकाश नव्हे तर एक फ्रेम आहे. तेच आपलं जग आहे. संपूर्ण मॅचभर त्या फ्रेममध्येच कॉन्सन्ट्रेशन हवं.
अश्विनी : टीव्ही पंचांचा उपयोग तुम्ही कधी करुन घेतलायत का? त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
श्री. देशपांडे : हल्ली रणजी ट्रॉफीच्या ज्या मॅचेस होतात त्या सगळ्या लाईव्ह टेलिकास्ट होतात. तिथेही थर्ड अंपायर असतोच, तिथे जेव्हा गरज लागेल तेव्हा फिल्ड अंपायर थर्ड अंपायरची मदत घेउ शकतो. ज्या मॅचेस मध्ये थर्ड अंपायरची सुविधा असते तिथे आता BCCI ने अंपायर कोचचीही सुविधा दिलीय. प्रत्येक मॅचमध्ये २ अंपायर असतातच, लाईव्ह टेलिकास्ट असेल तर थर्ड अंपायर, मॅच रेफ्री आणि अंपायर कोच अशी ५ जणांची टीम मिळून मॅच कंट्रोल केली जाते. हल्ली प्रत्येक मॅचमध्ये १२ कॅमेरे वापरले जातात. ज्या मॅचेसचे लाईव्ह टेलिकास्ट नसते तरी पण १२ कॅमेरे असतातच तेव्हा थर्ड अंपायरऐवजी अंपायर कोचकडे निर्णय मागू शकतात. या अंपायर कोचचं काम असं असतं की अशा मॅचेसमध्ये त्यांनी फिल्ड अंपायर्सना गाईड तर करायचंच शिवाय थर्ड अंपायरचं पण काम करायचं. काही ज्यूनियर मॅचेसना मॅच रेफ्री नसला तरी अंपायर कोच असतोच.
अश्विनी : एकंदरीत तुमचं हे जे करियर आहे, त्यात मानसिक, शारीरिक थकवा,दबाव म्हणजे स्ट्रेस या सगळ्याला सामोरं जावं लागतं, हे तुम्ही कसं cope up करता? त्यासाठी काही खास व्यायाम आहे का? खास दिनचर्या सांभाळावी लागते का? Relaxation tactics काही वापरता का?
श्री. देशपांडे : मी तर असं म्हणेन की ह्या सगळ्या born qualities आहेत, मुळातच एखाद्याचा स्वभाव तापट असेल तर कठीण आहे अंपायरिंग करणं. काय असतं की समजा तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट नसाल तर समजा ५ दिवसांची मॅच आहे, ४थ्या दिवशी संध्याकाळी तुमचे पाय दुखतायत,डोकं दुखतंय,नॅचरली या सगळ्याचा परिणाम तुमच्या decision making वर होतो, तुमचं शरीर साथ देत नसेल तर मन विचलीत होतं, तुम्ही concentrate करु शकत नाही. त्यामुळे फिजिकल फिटनेस अतिशय महत्वाचा, त्यासाठी जिममध्ये जाणं, मॉर्निंग वॉक, लोअर बॉडी स्ट्राँग करणं, posture चांगलं हवं, मगाशी मी सायमन टौफेल आणि अलीम दार यांची नावं घेतली, या दोघांची postures बघा तुम्ही, किती फिट दिसतात दोघं. एखादा ओबडधोबड पंच बरोबर नाही वाटत,विचित्र वाटतं. बरेचवेळा तुम्हाला धावपळ करावी लागते त्यामुळे फिजिकल फिटनेस प्रत्येकाचा वेगवेगळ्या प्रकारे असतो,कोणी मॉर्निंग वॉकला जाईल तर कोणी जिममध्ये.
अश्विनी : म्हणजे खेळाडूंना एक रेजीम असतो, जसा फिजिओथेरपिस्ट,तसा तुम्हांलाही आहे का?
श्री. देशपांडे : आम्हांलाही फिजिओथेरपिस्ट दिलेला आहे. सायमन टौफेलनी आम्हांलाही एक प्रोग्राम दिलेला आहे फॉलोअपसाठी. शिवाय तुमचं डाएट. तेलकट,गोड वर्ज्य. तुमचं वजन वाढता कामा नये. प्रत्यक्ष मॅचच्या वेळेस तुम्हाला अतिशय particular रहायला लागतं डाएटच्याबाबतीत. मॅचच्याआधीच जर तुम्ही भरपूर खाल्लं तर तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होणारच. मॅच दरम्यान कमी पण पुरेसं खाणं आवश्यक. पोटपण भरणं हवं. हेवी नको पण अशक्तपणा येता कामा नये.
अश्विनी : हे झालं शारीरिक थकवा न येण्याबद्दल. मग मानसिक थकव्यासाठी काय?
श्री. देशपांडे : त्यासाठी योगा आवश्यक.
अश्विनी : मघाशी तुम्ही म्हणालात की यासाठी थोडंसं in born qualities लागतात. समजा एखादा हुशार पंच असेल पण थोडा तापट असेल तर या गोष्टीवर मात करण्यासाठी काही मार्गदर्शन दिलेलं असतं का? काही उपाय करता येतात का अशा गुणांवर?
श्री. देशपांडे : या क्षेत्रात तापट स्वभाव उपयोगी नाही. योगा वगैरे करुन तापटपणावर नियंत्रण मिळवता येइल. mind stable ठेवण्यासाठी, emotion control करण्यासाठी बरेच लोक योगासनं करतात. हल्ली इतकं professionalism आलंय या क्षेत्रात की १००% प्रयत्न सगळ्या दृष्टींनी करतात. फिजिकल फिटनेस ठेवतात, योगा करतात, आहारावर नियंत्रण ठेवतात, overall शांत राहण्याचा प्रयत्न करतात, त्यातुनही एखादा तापट स्वभावाचा असेल तर त्याला नाही जमणार किंवा तेवढा वरती तो नाही जाऊ शकणार.
अश्विनी : बरेचदा आपण बघतो की बरेचसे खेळाडू क्रिकेटवर कॉलम्स लिहितात किंवा ब्लॉग लिहितात. तुम्ही असं काही लिखाण केलंय का?
श्री. देशपांडे : आम्हाला BCCI ची restrictions असतात. मॅचवर्क तुम्ही काही करु शकत नाही. आता लिहिणारे आहेत म्हणजे जे रिटायर्ड पंच आहेत जसे ठाण्यालाच राहणारे पिलू रिपोर्टर आहेत, दादरचे माधवराव गोठोस्कर आहेत. Code of conduct मध्ये आम्हाला सांगितलय की मॅचवर तुम्ही काही लिहायचं नाही, मॅच संपली की त्यावर काही कॉमेंटस करायच्या नाहीत, कुठलंही भाष्य करायचं नाही.
अश्विनी : एखाद्या particular मॅचबद्दल नाही पण in general असं तुम्ही लिखाण करु शकता का?
श्री. देशपांडे : general नाही, तुम्ही interview वगैरे देउ शकता पण day to day कॉलम लिहू शकत नाही. तुम्ही जर अॅक्टीव्ह अंपायर असाल तर लिहू शकत नाही पण एकदा रिटायर झाल्यावर लिहू शकता.
अश्विनी : रिटायर झालेले असे कोणते पंच आहेत बॉल्ग्स लिहितायत, कॉलम्स लिहितायत?
श्री. देशपांडे : माधवराव गोठोस्कर आहेत जे नियमित लिहीतात, पिलू रिपोर्टर आहेत, थोडक्यात लिहिणारा पण तेवढ्याच कॅलिबरचा पंच पाहिजे.
अश्विनी : तुम्ही आतापर्यंत जे सामने अटेंड केले त्या सामन्यांच्या काही आठवणी आहेत का? काही particular क्षण की ज्यावेळी तुम्हाला वेगळं वाटलं, परीक्षेचा क्षण होता असे काही?
श्री. देशपांडे : माझी पहिली मॅच तर माझ्या कायम लक्षात राहीलच. दुसरी एक मॅच मी केली होती, जिच्यात सौरव गांगुली कॅप्टन होता. ओरिसा वि. बंगाल अशी ती मॅच होती. त्या मॅचमध्ये सौरवला मी आऊट दिलं होतं. सौरव त्यावेळी इंडियाचा कॅप्टन होता. मॅच कलकत्त्याला होती ईडन गार्डन्सवर. कलकत्त्याला त्यावेळी पण ३०-४० हजार माणंसं आली होती ही रणजी ट्रॉफीची मॅच बघायला. माझ्यावर अशी वेळ आली की दोन्ही इनिंग्जमध्ये मलाच सौरवला आउट द्यावं लागलं, आऊट दिल्यावर त्याने बरेच नखरे केले, तसं तो established player होता पण मॅच संपल्यानंतर त्याने बरंच कौतुक केलं. त्याने मला सांगितलं की दोन्ही वेळेला मी आऊट होतो, तुम्ही खूप चांगली पंचगिरी केली. प्रेक्षकांकडून खूप हुर्यो झाली सौरवला मी आऊट दिल्याबद्दल, तेही कलकत्त्यात. पण स्वतः सौरवनेच सांगितलं की या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला जर अजून वर जायचं असेल तर या गोष्टी आत्मसात करता यायला पाहिजेत, यांच्यावर मात करता आली पाहिजे. प्रेक्षकांचं दडपण तुम्ही घेत जाऊ नका.
अश्विनी : आता तुम्ही स्वतः जेव्हा एखादी मॅच अटेंड करत नाही आहात, एखादी मॅच टीव्हीवर बघताय, एखादा निर्णय कसा घेतलाय यावर पंच म्हणून तुमचं लक्ष असतंच का? त्यावेळेला पंचांच्या निर्णयाचं analysis करत असता का? त्यावेळेला काही फरक पडतो का?
श्री. देशपांडे : हो नक्कीच. काय आहे की एखादी मॅच आपण टीव्हीवर बघून एखादी गोष्ट ठरवणं आणि प्रत्यक्षात तिथे उभं राहून decision देणं, त्या pressure खाली, आपल्यावर कॅमेरा आहे, करोडो लोकं आपल्यावर नजर लावून बसलेत, हे निराळं आहे. प्लेयर्सचं प्रेशर असतं अपील केल्यामुळे, इथे टीव्ही बघून शांतपणे निर्णय देणं, जिथे टेक्नॉलॉजी आहे बॉलचा आवाज वगैरे, आणि तिथे एवढ्या आवाजात तुम्हांला काही दुसरा आवाज ऐकू येत नाही, बॅटला बॉल लागलाय का वगैरे. त्यामुळे criticize करणं तर नाहीच, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत टोटली पण analyze करतो, अरे हे थोडं वेगळं वाटतय. ही चूक माझीसुद्धा होईल तिकडे, मी मैदानात असताना असं नाही की माझी चूक होणार नाही पण त्या दृष्टीने मी नक्कीच बघतो.
अश्विनी : क्रिकेट शौकीन म्हणून बघणं आणि 'क्रिकेट शौकीन + पंच' म्हणून बघणं यात फरक पडतोच,म्हणून मी हा प्रश्न विचारला.
श्री. देशपांडे : 'क्रिकेट शौकीन + पंच' या रोलमध्ये मी खरंतर जास्त एन्जॉय करतो मॅच. पण एखादा डिसिजन चुकला किंवा बरोबर आला तर appreciate पण करतो की वा, चांगला डिसिजन दिलाय. चूक झाली तर criticize नाही करत पण झाली चूक हे मान्य करतो. पण ही चूक होउ शकते, थोडक्यात त्यातून शिकतोसुद्धा.
अश्विनी : नवीन जे लोकं या करियरमध्ये येऊ पाहत असतील तर त्यांना काही तुमचा मेसेज आहे का?
श्री. देशपांडे : मेसेज असा आहे की अंपायरिंग हे खूप कठीण क्षेत्र आहे. म्हणजे जे ग्लॅमरस दिसतं, इन फॅक्ट कुठल्याही क्षेत्रात कष्टाशिवाय पर्याय नाही. अंपायरिंगसाठी मेंटली खूप स्ट्राँग पाहिजे. कारण का तर माणूस आहे म्हणजे चुका होणारच, कोणीही असं म्हणू शकत नाही की माझ्या मॅचमध्ये १००% डिसिजन्स बरोबरच असतील. चूक झाल्यानंतर त्यातून बाहेर कसं यावं हे शिकायला पाहिजे. फार वरचा विचार करायचा नाही, ही जी मॅच करतोय,भले ती साधी मॅच असेल ती तेवढ्याच importance ने करायला पाहिजे, कारण आपल्या निर्णयांवर एखाद्या मुलाचं करियर अवलंबून असतं. एखादा मुलगा लांबून येतोय खेळायला आणि आपण जर कॅज्युअल अॅप्रोचने गेलो तर माझा एखादा निर्णय त्याचं करियर बरबाद करु शकतो. तेव्हा ती मॅचसुद्धा तेवढ्याच importance ने करायची जेवढी मी एखादी international मॅच करेन. सगळ्या मॅचेस सारख्याच असतात. शॉर्टकट तर नाहीच. दर रविवारी मी मॅच करायला जायचो, चाळीस एक रविवार मी केले याप्रमाणे. सोमवार ते शनिवार नोकरी, अगदी तपश्चर्या केल्याप्रमाणे. इथेही traveling खुप असतं आम्हांला. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतं, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. शिवाय इतक्या कमी गॅप्स असतात २ मॅचेसमध्ये तर ते लाइफ अॅडॉप्ट करावं लागतं. तुम्हांला मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्हांला पहिलं म्हणजे पॅशन पाहीजे. बदलतं हवामान असतं. दिल्लीला एखादी मॅच असणं आणि लगेच चेन्नईला मॅच असणं वेगळं. डे-नाईट मॅच, बदलतं टेंपरेचर,पंचांना मुळात प्रेमच नसेल या क्षेत्राचं तर तो नाही टिकणार. अगदी कितीही हुशार असो, मेहनती असो पण प्रेम नसेल या क्षेत्राचं तर नाही टिकू शकणार तो. मी खूप लोकं असे पाहिलेत की जे हुशार आहेत पण ते नाही handle करू शकत under pressure किंवा थोड्याशा pressure ने पण collapse झालेत, त्यांनी सोडून दिलंय टॅलेन्टेड असूनसुद्धा. त्यामुळे passion,dedication महत्वाचं. अर्थात laws चं knowledge असावंच लागतं, जसे काही नियम बदलतात ते वाचायला पाहिजेत. पंचांनाच जर नियम माहीत नसतील तर पंच कशासाठी ठेवायचे.
अश्विनी : तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मायबोलीतर्फे धन्यवाद.
श्री. देशपांडे : मला आनंद आहे अशी संधी मिळाल्याबद्दल. मला खूप आवडेल की पंचांचं जे काम आहे, पंचांचा जो दर्जा आहे तो लोकांपर्यंत पोचवण्याचा. प्लेयर्सना खूपच exposure मिळतं, त्यादृष्टीने पंच म्हणा किंवा क्रिकेटशी संबंधित जी इतर क्षेत्रं आहेत जसं स्कोअरर, कोच हीसुद्धा तेवढीच महत्वाची आहेत. अंपायरिंगसुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढी इतर क्षेत्रं आहेत.
..................................................................................................................................................
ही मुलाखत घेतली आहे अश्विनी के यांनी. मुलाखतीदरम्यान आशुतोष०७११ यांनी व्हिडिओचित्रण आणि स्थिरचित्रण केले. मुलाखतीतील प्रश्न तयार करण्यात केदार, फारएंड, योग आणि इंद्रधनुष्य यांचा हातभार लागला. अश्विनी के, आशुतोष०७११ आणि मृण्मयी यांचेकडून शब्दांकन सहाय्य मिळाले. मंजूडी आणि स्वाती आंबोळे यांनी मुद्रितशोधनात केले. या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!
(वरील मुलाखतीतील फोटोंवर आशुतोष०७११ यांचा प्रताधिकार आहे.)
मस्त झाली आहे मुलाखत
मस्त झाली आहे मुलाखत
पंचांचं जग हे संपूर्ण आकाश
पंचांचं जग हे संपूर्ण आकाश नव्हे तर एक फ्रेम आहे. <<< हे वाक्य तंतोतंत पटले.
खूप आवडली मुलाखत. बर्याच गोष्टींची माहिती झाली.
क्रीडाक्षेत्रात करिअर करायचे म्हणजे सर्वसामान्य पालकाला आधी प्रश्न भेडसावतो तो म्हणजे आर्थिक खर्च आणि पुढे त्या करिअर मधून मिळणार्या मिळकतीचा. पंच या प्रोफेशनविषयी या बाबतीत श्री. देशपांडे यांचे अनुभव जाणून घ्यायला आवडतील.
विकवि संपादक, श्री राजेश
विकवि संपादक, श्री राजेश देशपांडे यांना मायबोलीचं सदस्यत्व घ्यायला सांगून, या क्षेत्राबद्दल अजून माहिती, उत्तरं हवी असतील तर ती त्यांना विनंती करुन मिळवता येतील बहुतेक. आपले मत कृपया सांगावे.
उत्तम्.पंचाना नक्की किती
उत्तम्.पंचाना नक्की किती मानधन मिळते या ऐवजी किमान समाधानकारक मिळते का हा प्रश्न यायला हवा होता असे वाटले.
मस्त झालीये मुलाखत.
मस्त झालीये मुलाखत. अभिनंदन!
मला वाटते वैयक्तीक असले तरी साधारणपणे एखाद्याला "पंचगिरी" करण्यात करियर करायचे असेल तर वेगवेगळ्या लेव्हल ला किती पगार/सामन्याचे मानधन वगैरे मिळते असा प्रश्ण करायला हरकत नव्हती. किंवा मुळातच पंच ची परिक्षा वगैरे द्यायला काय नियम, प्राथमिक आवश्यकता आहेत हेही जाणून घ्यायला आवडले असते. किमान- पंच परिक्षा, सिलेक्शन वगैरे बाबतीत बिसिसिआय ची एखादी वेब्लिंक आहे का?
पंचांचं जग हे संपूर्ण आकाश
पंचांचं जग हे संपूर्ण आकाश नव्हे तर एक फ्रेम आहे. >> वा!
छान झालाय संवाद. माहितीपूर्ण आहे.
छान मुलाखत!
छान मुलाखत!
छान झाला आहे हा संवाद!
छान झाला आहे हा संवाद! अभिनंदन अश्विनी.
अरे व्वा! मस्तच झलिये मुलाखत
अरे व्वा! मस्तच झलिये मुलाखत
अभिनंदन अक्के
मस्त मुलाखत... योगला
मस्त मुलाखत...
योगला अनुमोदन...
आणि बिली बौडनबद्दल किंवा एकूणच पंचांच्या लकबीबद्दल पण जाणून घ्यायला आवडलं असतं..
मस्तच मुलाखत ...
मस्तच मुलाखत ...
छान आहे मुलाखत!
छान आहे मुलाखत!
मस्त मुलाखत
मस्त मुलाखत
मुद्देसूद, छान मुलाखत !
मुद्देसूद, छान मुलाखत ! अभिनंदन.
एका अगदी प्राथमिक दर्जाच्या सामन्यात त्यावेळचे कसोटी पंच असलेले रुबेन याना पंचगिरी करताना पाहून मी त्याना विचारलं, " तुम्हाला कंटाळा नाही येत आतां या लेव्हलच्या सामन्यात अंपायरींग करताना ?"
तेंव्हा ते म्हणाले होते कीं पंचांची खरी कसोटी घेणारे प्रसंग [सिच्युएशन्स] मुख्यतः अशाच सामन्यात उदभवतात; फक्त मोठ्या/कसोटी सामन्यांसाठीची तयारी म्हणून या सामन्यांकडे पंचानी गंभीरतेने पहावं , कोणत्या लेव्हलचा सामना आहे, हें न पहातां ! So professional and so true !!
रुबेन हे देखील अतिशय सज्जन व आपली पंचगिरी अत्यंत जागरुक निष्ठेने करणारे आदरणीय गृहस्थ होते.
अश्विनी मस्त मुलाखत आहे. बरेच
अश्विनी मस्त मुलाखत आहे. बरेच प्रश्न विचारलेत तुम्ही. एक टि-२० मिनिटं घालवली असेल नाही? सर्व माहिती कव्हर केलीत एकाच मुलाखती मधे. इथे पंचगिरी किती कठीण आणि किती जबाबदारीची असते हे उत्तररित्या इथे वाचायला मिळालं.
काही विशिष्ट पंचाबद्दल नक्कीच वाचायला अवडले असते. जसे कि..
१. बिली बाऊडन ( अम्पायर कम एंटरटेनर )
२. रुडी क्रट्झन
३. स्टीव्ह बकनर आणि सचिन तेंडूलकर पायचीत निर्णय.
४. डेव्हीड शेफर्ड
५. आलीम दार ( आशियाई उपखंडात एका विशिष्ट दृष्टीकोनातून पाहिले जाणारे हे पंच )
६. डॅरिअल हार्पर
७. सायमन टॉफ्वेल ( सर्वात कमी वयात कारकिर्दीची सुरूवात ? )
त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलिया सारख्या देशातून बरेच यशस्वी आणि उच्च किर्तीचे अंपायर बघायला मिळाले. त्याचे काही विशेष कारण?
एक खोडकर प्रश्न :-
मॅच फिक्सिंगसाठी उद्या हे पंच जबाबदार आहेत असं म्हणाले तर? किंवा हे कितपत घडू शकतं ? अर्थात इथे गल्ली क्रिकेटमधे हे बर्याचदा पहायला मिळालं आहे.
खेळातलं पंचाचं महत्वच लक्षात
खेळातलं पंचाचं महत्वच लक्षात घेतलं जात नाही याचा एक बोलका नमुना -
केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्य व राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धात प्रतिनिधित्व करणार्या कर्मचार्यांसाठी खास नैमित्तिक रजा [ स्पेशल कॅजुअल लीव्ह ] मंजूर करण्याबाबत आदेश काढले होते;
पण याचा लाभ राज्य, राष्ट्रीय सोडाच पण आंतरराष्ट्रीय पातळीवरही पंचगिरी करणार्या कर्मचार्याना मात्र मिळत नसे ! कां, तर त्यांचा सहभाग 'प्रातिनिधीक' नसतो !! पंच हा सामन्याचा खेळाडूं इतकाच , किंबहुना अधिकच, महत्वाचा घटक असतो व तो कोणत्याही संघाचा, राज्याचा , राष्ट्राचा प्रतिनिधी नसणंच आवश्यक असतं, हे शासनाला पटेपर्यंत रुबेनसारखे शासकीय कर्मचारी कित्येक वर्षं या सवलतीला मुकले होते !!!
(No subject)
भाऊ मस्त
भाऊ मस्त
छान झालाय संवाद.
छान झालाय संवाद.