असंबद्ध..

Submitted by भानुप्रिया on 18 April, 2011 - 00:43

ह्या कवितेला एक premise आहे..अर्थात, सूज्ञ वाचकांच्या तो लक्षात येइलच..
आपल्या प्रतिक्रियांची वाट बघतेय..
--
आज झोपू नकोस रात्री..
म्हणजे झोपलास तरी जागासा रहा..
रात्र आळसावली की मग
दाराची चाहूल घे जरा..
कधीतरी आडनिड्या वेळी
तुझ्या अंगणात पैंजण रुणझुणतील..
दचकू नकोस तेव्हा..
हळूच नादणारी ती पावलं माझीच असतील..
तुझ्या अंगणातली शांतशी ती तुळस
थरारेल क्षणभर..
गाढ झोपलेला पाचोळाही कूस बदलेल..
रातकिड्यांच्या किरकिरेला भेदून जाईल
माझा एक रोखलेला हुंदका..
तू इतक्यात उठू नकोस..
अजून तुझ्या बागेतल्या गुलाबाशी बोलायचंय मला..
त्या फुलांचं आणि माझं नातं असं नाहीचे..
पण काट्यांशी जपलेला ऋणानुबंध जुनाय..
माझ्या पदराचा एक शेव,
गुलाब ठेऊन घेईल आठवण म्हणून..
अन कोपऱ्यातली रातराणीही
तिच्या सुगंधात न्हाऊ घालेल मला..
अडखळत मग माझी पावलं
तुझ्या दाराशी पोचतील..
आता मात्र तू जागा हो..
चाहूल घे माझ्या येण्याची..
'मागल्याच आठवड्यात करपलेला असून
मोगऱ्याचा गंध कुठून येतोय'
असा विचार कर जरा..
मग माझ्या पैंजणांचा वेध घेत दाराशी ये..
गोंधळला असशीलच तू..
पण तरी, दार उघड..
अगदी हळुवार..
रात्रीच्या त्या शांततेला छेद न देता..
मोगऱ्याचा गंध अस्वस्थ करेल तुला..
शोध घे त्याचा..
काहीच सापडलं नाही म्हणून जायला वळशील..
अन तुझ्या पायाशीच मग तुला
एक पुरचुंडी दिसेल..
आणखीनच संभ्रमात तू ती उचल..
तिथे उंबरठ्यात बसून हळूच उघड..
आतला मोगरा तुला मुग्ध मुग्ध करेल..
त्या मोगऱ्याला मनात साठवत असशील तू..
अन अगदी तेव्हाच..
मी ही तुझ्या मनभर पसरत जाईन..
तुझ्याही नकळत..
तुला सांगायचं राहिलेलं खूप काही
तो मोगरा सांगेल तुला..
अन उकलेल सारंच..
गूढ वाटलेलं खूप काही..
माझ्या आसवांची आवर्तनं..
पापण्यांमध्ये दडलेली अमूर्त स्वप्न..
ओठाशी येऊन थबकलेले वेडे माझे शब्द..
अन असंच काहीसं..असंबद्ध..
आता माझ्या त्या क्षणांचे अर्थ लागतील तुला..
गुलाबाच्या काट्याशी माझं नातं कळेल तुला..
'हे काय निसटलं हातातून' म्हणून शोधायला उठशील तू..
रातराणीच्या गंधात..
काट्यानी जपलेल्या माझ्या पदराच्या शेवात..
पहाटेची किरणं आता आकाशी डोकावतील..
वाऱ्यालाही जाग येईल..
किरणांत गंध अन वाऱ्यात माझ्या अस्तित्वाच्या शेवटच्या त्या खुणा..
विरून जातील..
मग सुरु होईल..नवीन एक पर्व..
शोधाचं..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गाढ झोपलेला पाचोळाही कूस बदलेल..
माझ्या आसवांची आवर्तनं..
>> या कल्पना भन्नाट आहेत.. एकूणच कविता अफाट..! लिहीत रहा.. Happy

लक्शात >>> "क्ष" टाइप करण्यासाठी किबोर्डावरील "एक्स" की चा वापर करा.

@ अमित,
धन्नो!!! तो 'क्ष' शोधत होते मी बराच काळ..

आणि प्रतिक्रियेबद्दल आभार!

ओहो अप्रतिम, वाचताना अगदी त्यामधे आपण स्वतः आहोत असे वाटायला लागते.
एवढी भन्नाट रचना असुनही एवढे कमी प्रतिसाद ?

भानु, काय अफाट आहे कविता. प्रेमात पडायला झालं अगदी. त्याच्याबरोबरीने सगळे आवाज, सुवास आणि जाणीवा झाल्या, इतके प्रभावी शब्द होते. मस्तच !

थांब परत परत वाचु दे मला.

<<<<<त्या मोगऱ्याला मनात साठवत असशील तू..
अन अगदी तेव्हाच..
मी ही तुझ्या मनभर पसरत जाईन..
तुझ्याही नकळत..
तुला सांगायचं राहिलेलं खूप काही
तो मोगरा सांगेल तुला..
अन उकलेल सारंच..
गूढ वाटलेलं खूप काही..>>>> अप्रतिम !!