सखुबत्ता (फोटोसकट)

Submitted by अल्पना on 15 April, 2011 - 01:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६ मध्यम आकाराच्या घट्ट कैर्‍या (लोणच्याच्या कैर्‍या), अर्धी वाटी तिळाचं कुट, अर्धी वाटी लोनचे मसाला, अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ, मीठ,फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहर्‍या, हिंग

क्रमवार पाककृती: 

कैर्‍यांची सालं काढून पातळ काचर्‍या कराव्यात. सोलाण्याने काचर्‍या केल्या तरी चालेल. तीळ भाजून त्याचे अर्धी वाटी कुट घ्यावे. कुटाइअतकाच कैरी लोणचे मसाला (बेडेकर, प्रविण किंवा इतर आपल्या आवडीप्रमाणे) घ्यावा. अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ किसून घ्यावा. गुळाचं प्रमाण अंदाजेचं चवीप्रमाणे ठरवा. कैर्‍यांच्या काचर्‍या, तिळाचं कुट, लोणचे मसाला, मीठ आणि गुळ एकत्र करावं. त्यात हिंग- मोहरीची फोडणी थंड करून घालावी.

DSC00077.jpg

वाढणी/प्रमाण: 
तुम्ही लोणच्याप्रमाणे खाता कि भाजीप्रमाणे यावर अवलंबून.
अधिक टिपा: 

या दिवसात केला तर सखुबत्ता जास्त नाही टिकणार पण लोणच्याचा सिझनमध्ये (मे-जुनमध्ये) केलेला सखुबत्ता ६-७ महिने टिकू शकतो. कदाचित त्यापेक्षा जास्त पण टिकेल पण तेवढा उरतच नाही. जास्त टिकण्याच्या दृष्टीने करायचा असल्यास तिळाच्या कुटाचं प्रमाण जरा कमी करावं लागेल.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२ कैर्‍या आहेत घरी. दुपारी करेन आणि मग टाकते फोटो. काल पार्ल्यात नाव वाचलं म्हणून मग लिहिली रेसेपी.

नुसते वाचुनच तोंपासु.. सगळ्यात आधी कोण्या सखुने केले होते का हे लोणचे बत्यात तिळ कुटून???? Happy

हे सही आहे. आणि माझ्या स्किल लेवलला जमेल असं वाटतंय. करून बघणार.
नाव पण हिट्ट आहे. नाव कसं पडलं काय ते जरा आईला विचारून सांग ना अल्पना!

मला वाटलं बत्ताशाची रेसिपी आहे कोणतीतरी Happy
आजच करते लगेच. काचर्‍या म्हणजे पातळ काप असे सुचवायचे आहे ना? नेहेमीच्या लोणच्याला आपण जाडू, बुटक्या फोडी करतो तशा नाहीत असे वाटतेय.

नाही, कायरसामध्ये कैरीच्या शिजवलेल्या/वाफावलेल्या फोडी असतात आणि कायरस एखाद्-दुसरा दिवसंच टिकतो. हा लोणच्याचा प्रकार आहे.

नागपूरकडे एक थोडासा असाच प्रकार केला जातो.

कैरीच्या काचर्‍या करायच्या. हिरव्यागार ताज्या मिरच्यांचे मधोमध चीर देऊन फक्त दोन लांबट तुकडे करायचे. आवडत असल्यास अगदी थोडी कोथिंबीर बारीक चिरून घालायची.
मग तेलात जिर्‍याची फोडणी करायची. मोहरी नको. हळद अगदी कमी. चिमूटभरच हवी कारण कैरीचे काप थोडे पांढरटच दिसायला हवेत. हिंग हवाच. मग मिरच्या नि कैरीचे काप तेलात टाकून परतायचे. कैरी पूर्ण गिच्च शिजायला नको. मऊ होऊ द्यायची पण तुकडे मोडायला नकोत. मीठ घालून उतरवायची. गूळ वगैरे नाही घालत यात.

खरंतर अगदी कमी जिन्नस आहेत यात पण खूप छान लागतं हे लोणचं.
अल्पना, तुझ्या मेथडने या वीकांताला करेन नक्की.

ताज्या कैरीचं लोणचं असंच करते मी, फक्त त्यात काचर्‍या नसतात, अगदी बारीक छोट्या फोडी असतात. आणि तीळकूटाचं प्रमाण कमी असतं. याच सीझनमध्ये खूपदा झालंय. आमच्याकडे कैरी खूपच हिट्ट आहे त्यामुळे रोजच कैरीची दाण्याचा कूट वाली चटणी / कैरी-कांदा चटणी / कैरी-कोथींबीर चटणी / मेथांबा यातले काही ना काही असतेच. शिवाय इथे कैर्‍या खूप लवकरच यायला लागतात.
फोडींऐवजी काचर्‍या करण्याचं काही विशेष कारण आहे का ?

धन्यवाद, अल्पना! Happy
मस्त रेसिपी. नक्की करून बघणार.

(केदार, अल्पनाचे आभार मान. :P)

अल्पना, सखुबत्ता/सखुबद्दा छान. माझा फेवरेट आहे.
आम्ही सखुबद्दा म्हणतो :).

दर उन्हाळ्यात हमखास सखुबद्दा बनतो घरी, सोबत तक्कु किंवा साखरआंबा असला की झालं आनखी काही लागत नसे.

भारी रेसिपी. मराठवाड्यातली कृती असून पण मला सखुबत्ता खाल्ल्याचे आठवत का नाहीये.
इथे फार गोडसर कैर्‍या मिळतात त्यामुळे गुळाचे प्रमाण कमी करून करावी लागेल.

मवा, मला नक्की कारण माहित नाही पण माझ्या अंदाजाप्रमाणे लोणच्याच्या फोडी कडक होवू नयेत हे कारण असावं. हे टिकाऊ लोणचं आहे, तात्पुरतं नाही. नेहेमीप्रमाणे फोडी केल्या तर गुळामूळे त्या फोडी कडक होवून जातिल. साल काढून काचर्‍या केल्यावर त्या कडक रहात नाहीत, मऊसर रहातात हे कारण असेल बहूतेक फोडी ऐवजी काचर्‍या ठेवायचे.
रुनी, आईच्या माहेरी मुंबई/पुणे/सोलापुर भागात हे लोणचं करत नाहीत. बाबांच्या घरी आमच्या गावाकडे तर कधीच कश्यातही गुळ घालत नाहीत. मराठवाड्यातले असूनही माझ्या काकु-आज्जी वैगरेंना हा प्रकार माहित नाहीये. आई बहूतेक हे लोणचं अंबाजोगाईला दवाखान्याच्या क्वार्टर्समधल्या शेजार्‍यांकडून शिकलिये. विचारावं लागेल तिला नक्की कोणाकडून शिकली होती ते.
फोटो काढलाय. पण लॅपटॉपचा ब्ल्युटुथ बंद पडलाय आणि मोबाइलची डाटा केबल सापडत नाहीये. बघते काय करता येतंय ते.

हरे राम... मला वाटलं खलबत्त्यासारखं काही उपकरण असेल. तर हे लैच तोंपासु निघालं. Happy

मी केलं काल दोन कैर्‍यांचं. मस्त झालंय. मला तो तीळकूट प्रकार लईच आवडलाय. लोणचं मसाला आणि तीळकूटाचा काय घमघमाट येतो! वावा. हा फोटो.

sakhu.jpg

Pages