ओढ

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

विमान क्रूजिंग अल्टिट्यूडला पोचलं असावं. डोळे किलकिले केले तेव्हा केबिन क्रू खाण्या-पिण्याच्या गाड्या घेऊन फिरताना दिसला. शेजारच्या सीटेवर एक बर्‍याच वयस्कर बाई बसल्या होत्या. एअर होस्टेस आमच्या रांगेजवळ आली होती.
"मिस थाँम्सन, कॉफी हवीय का आणखी?"
नावाने प्रवाशाला बोलवून विचारणं झालं म्हणजे ओळखीची किंवा प्रसिध्द व्यक्ती असली पाहिजे. मी मनातल्या मनात.
"तुम्ही काय पिणार?" बाईंच्या कपात कॉफी ओतून, तिनं मला विचारलं. मी तोवर पुन्हा डोळे मिटले होते.
"थकलेला दिस्तोय. झोपू दे." माझ्या वतीनं बाईंनी सांगून टाकलं, सुंदरी पुढे गेली. मी पुन्हा मनातल्यामनात त्यांचे आभार मानले.

खरंच खूप थकलो होतो. मनानं, शरिरानं. आता झोप लागत नव्हती आणि चित्रविचित्र रंगाच्या धाग्यांचे भेंडोळे जमिनीवर गडगडंत, धागे सोडत जावे तसे विचार पुन्हा सुरू झाले. परवा भारतातून आलो. आईच्या वर्षश्राध्दाला गेलो होतो. जाताना आईच्या, तुषारच्या, माझ्या लहानपणच्या आठवणी आठवत गेलो. 'आता सगळे धागे तुटले. परत भारतात जाण्याचं काही प्रयोजन नाही' असा मन कळकट करणारा विचार घेऊन परतलो. अण्णांच्या माघारी आईने मला आणि तुषारला मोठं केलं. तो तिकडे भारतात स्थायिक झाला. मी अमेरिकेत. त्यांचं ऑटिस्टिक पोर, त्यामुळे होणारी ओढाताण, वहिनीची वेळीअवेळी हॉस्पिटलात धाव घ्यायला लावणारी नोकरी आणि आईच्या ढासळत्या तब्बेतीमुळे तिचं शुश्रुषा केंद्रात असणं सगळं बघत होतो. थोडीफार पैशाची मदत आणि शक्य तितक्या भारतभेटी याउपर काही जमलं नाही. की जमवलं नाही? माहिती नाही. इथे जेनिशी लग्न झालं. भारतात सगळ्यांना मी दुरावल्याची भावना त्यामुळे जास्त प्रकर्षानं व्हायला लागली असेल का? कधी कळलं नाही. विचारलं नाही.

गेल्या खेपेला देखिल एकटाच गेलो होतो. तेव्हा आईची भेट होऊ शकली याचं खूप बरं वाटलं होतं. वाचा गेली होती. पण स्पर्शातून 'तू आलास, बरं वाटलं' सांगितल्याचं जाणवलं. की 'मला एकटीला सोडून गेलास, आठवणीनं व्याकूळ झाले रे' सांगत असावी? आता विचार करून फायदा नाही. या खेपेला गेलो तेव्हा तुषार मात्र माझ्याशी काही बोलला नाही. गेल्या वेळी देखिल तुटकच होता. वहिनी नवर्‍याबद्दल 'सध्या फार स्ट्रेसमधे आहे तो.' एवढंच म्हणाली. तुषारला विचारल्यावर ४० वर्षांचं साचलेलं त्याच्या मनातलं बाहेर पडलं. 'आई गेली. आता तुझी इथे यायची गरज संपली' म्हणाला. मी वैताग समजू शकत होतो आणि काही वेळा नव्हतोही. विचार केला, त्रासलेला असेल. जरा शांत झाला की होईल सुरळीत. आणखी आठवडाभर थांबलो होतो. जाताना मात्र मला अगदी शांतपणे, "मी खरं बोलतोय, अगदी मनापासून. माझी तुझ्याशी संबंध ठेवायची इच्छा नाही. आई असेपर्यंत बोललो नाही. आता सांगतो." म्हणाला. मी नुस्ताच गप्प बसलो होतो. काही बोलण्यासारखं उरलं नाही असं वाटलं. त्या रात्री मात्र त्याच्या घरातून हॉटेलात रहायला गेलो. दुसर्‍या दिवशी तिथूनच विमानतळावर. कुठल्याही नातेवाईकाला फोन करावासा वाटला नाही. निरोप न घेता निघालो. खरंच आता भारतात जाण्यासारखं काही उरलं नव्हतं.

"आर यू ओके सन?"
डोळे उघडले. न जुमानता गळत होते.
"हो हो. अगदी ठीक. थँक्यू." मी जरासं हसून खोटं बोललो. पण ते फारसं कन्व्हिन्सिंग वाटलं नसावं.
"काही खावसं वाटतंय? काही पिणार?" बाईंनी विचारलं. बर्‍याच म्हातार्‍या होत्या. डोक्यावरचा केसन् केस रुपेरी झालेला. सुरकुतलेला गोरापान चेहरा, लुकलुकणारे डोळे. प्रेमळ वाटल्या.
"हो. मागतो काहीतरी प्यायला." माझं वाक्य संपताच त्यांनी बटण दाबून हवाईसुंदरीला बोलवलं.
माझ्यासाठी प्यायला आणायला ती निघून गेली आणि बाईंनी स्वतःची ओळख करून दिली.
"मी आयरीन थॉम्सन."
मी माझं नाव सांगितलं. इकडच्या तिकड्च्या गप्पा सुरू झाल्या. प्रवासात म्हातारे लोक शेजारी बसले की मला एक प्रकारची धाकधूक असते. खूप बोलतात. नातवंडांचे फोटो बघावे लागतात. त्यांचं कौतूक ऐकावं आणि करावही लागतं. पण बाईंनी यातलं काही केलं नाही. भारताबद्दल खूप उत्सुकता दिसली. बरेच प्रश्न विचारले. तिकडे घरी कोण कोण असतं या प्रश्नावर अडखळलो. का कुणास ठाऊक, 'ही माझी भारताची शेवटची ट्रिप होती. यानंतर जाणं होणार नाही.' ही माहिती आणि कारण मी गरज नसताना सांगितलं. का सांगितलं त्याचा विचार करत बसलो. त्या मंदसं हसल्या.
"ज्यो देखिल असंच म्हणायचा."
"ज्यो, माझा नवरा." माझा प्रश्नार्थक चेहरा बघून लागलीच सांगितलं.
"न्यू यॉर्कात रहायचो, अपस्टेट, साराटोगाला. ज्योचं आणि भावंडांचं पटलं नाही. त्याचे आईवडील लवकर गेले. तिथे राहण्यात गोडी वाटेना. मग फ्लोरिडात आलो. अख्खा जन्म फ्लोरिडात काढला. नवं कुटुंब, जिवाभावाचे मित्र सगळं तिथे मिळालं. ज्यो घरच्यांना फार शिव्या घालायचा. मेले सगळे मला म्हणायचा. पण खरं सांगू का, ज्योच्या मनातली साराटोग्याची ओढ कधी संपलीच नसावी."
मी कसंनुसं हसलो. बाई इथून अप्रत्यक्ष उपदेश करायला लागतात की काय? 'नसावी' असं म्हणताहेत. म्हणजे निव्वळ आडाखे? जाऊ दे. पण त्या ज्योबद्दल भरभरून बोलत राहिल्या. 'फार अढी बसते मनात. आपल्याच लोकांची, आपल्याच जागेची. पुन्हा फिरकावसं वाटत नाही. तुमच्या ज्योसारखाच कडू झालोय मी या बाबतीत. आता कसली ओढ अन् कसलं काय.' मनात आलं, पण बोललो नाही.

विमान उतरायची तयारी सुरू झाली. "एका प्रवाशाला आधी उतरणं आवश्यक आहे. त्या विमानातून उतरेपर्यंत कृपया इतरांनी थांबावं." अनाउंन्समेंट झाली. विमान गेटजवळ येऊन थांबलं. सगळी निमूटपणे जागेवर बसून होती..... आणि आमच्या रांगेशी स्वतः विमानाचा कॅप्टन अवतीर्ण झाला.
"मिसेस थाँम्सन, इफ यु विल प्लीज.."
बाई उठल्या,
"नाइस टॉकिंग टु यू सन. रागवू नकोस आपल्या लोकांवर. हॅव अ गुड लाइफ." माझ्याकडे वळून म्हणाल्या.
"बाय द वे, ज्यो खरंच कधीही साराटोग्याला विसरला नाही." हे सांगण्याचं प्रयोजन कळलं नाही..! बाकी प्रवासी खोळंबले होते.
"आज ज्योला त्याच्या गावी घेऊन चाललेय, जवळपास ६० वर्षांनी." ज्यो काही दिसला नाही.
"मिसेस थाँम्सन, एजंट्स तुम्हाला इथल्या आमच्या ऑफिसात घेऊन जातील. कॉफिन बाहेर काढल्याचं कळवलंय ग्राउंड क्रूने. वन्स अगेन, व्हेरी सॉरी फॉर योर लॉस..." कॅप्टन म्हणाला.

मी अजूनही नुस्ताच सुन्न होऊन बसलोय!!

विषय: 
प्रकार: 

Pages

Back to top