संत नामदेवांच्या गुरुमुखी अभंगांमधील चमत्कार प्रसंग

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 3 February, 2011 - 11:51

ग्रंथसाहिबातील गुरुमुखीमध्ये लिखित व पंजाबी भाषेत रचलेल्या ''शबद'' रचनांचे वाचन करत असताना ईश्वराच्या अगाध लीलांचे वर्णन करणार्‍या संत नामदेव रचित सुंदर रचना वाचणे हा खरोखर प्रासादिक अनुभव आहे. एरवी हरीभक्तीबरोबरच समाजातील अंधश्रद्धा, भोंदूगिरी व पाखंडीपणावर आपल्या अभंगांमधून शब्दांचे आसूड उगारून खरमरीत टीका करणार्‍या संत नामदेवांच्या या एकूण ६१ रचनांमध्ये त्यांच्या आयुष्यातील काही चमत्कारांचे त्यांनी काव्यरूपात केलेले वर्णनही आगळे व अभ्यास करण्याजोगे आहे. नवरसांमधील अद्भुतरसाला, विस्मयाला जागृत करणार्‍या या रचनांमधील शब्दप्रयोग काहीवेळा मराठी धाटणीचेही आहेत.

आजच्या युगात चमत्कारांच्या विरोधात बोलणारे 'अशा घटना खरोखरी घडू शकतात का?' म्हणून त्यांना वैचारिक आव्हानही देऊ शकतील. परंतु खुद्द संत नामदेव ह्या घटनांचे वर्णन फार मार्मिकपणे करतात. त्यांत कसलाही अभिनिवेश नाही. उलट एकप्रकारचा तटस्थपणाच आढळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या सर्व रचना पंजाबी गुरुमुखीतील असून विशिष्ट संगीत रागांत रचलेल्या आहेत. ज्याची मातृभाषा मराठी आहे अशा ह्या संताने बाराव्या शतकात भागवतधर्माचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकले. नामदेवांनी पंजाबात वीस वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्य केले. तेथील भाषा, संस्कृती फक्त आत्मसातच केली असे नव्हे; तर त्या भाषेत सुंदर काव्येही रचली. हे सर्व अभंग शीख संप्रदायाच्या आद्य धर्मग्रंथाचा, गुरु ग्रंथसाहिबचा एक भाग आहेत. अभंगांच्या भाषेची प्रासादिकता, वर्णनातील नाट्यमयता, आपला भाव नेटक्या शब्दांनी मांडण्याची कला आणि ह्या सर्वांमधून ठायी ठायी जाणवणारे भक्तीमाधुर्य बघू जाता नामदेवांच्या रचनांचे आगळेपण लक्षात येऊ लागते.

आतापर्यंतच्या माझ्या वाचनात आलेल्या संत नामदेव रचित अभंगांमधील हे तीन चमत्कृतीपूर्ण प्रसंग इथे त्यांच्याच शब्दांमध्ये देऊन त्यांचा अर्थ सांगायचा माझा प्रयत्न आहे.

एका रचनेत ते आपल्या हातून देवाने (विठ्ठलाने) दूध कसे प्यायले ह्याचे सरळ, साधे, प्रांजळ वर्णन करतात :

दूधु कटोरै गडवै पानी ॥
कपल गाइ नामै दुहि आनी ॥१॥
दूधु पीउ गोबिंदे राइ ॥
दूधु पीउ मेरो मनु पतीआइ ॥
नाही त घर को बापु रिसाइ ॥१॥

कपिला गाईचं दोहन करून कटोराभर दूध आणि गडूभर पाणी नामदेव (कुल)देवासाठी घेऊन गेले. माझ्या देवाधिदेवा, गोविंद राया, हे दूध पी बरं! तू हे दूध प्यायलास की मला बरं वाटेल. नाहीतर माझे वडील नाराज होतील.

सोइन कटोरी अम्रित भरी ॥
लै नामै हरि आगै धरी ॥२॥
एकु भगतु मेरे हिरदे बसै ॥
नामे देखि नराइनु हसै ॥३॥
दूधु पीआइ भगतु घरि गइआ ॥
नामे हरि का दरसनु भइआ ॥४॥

नामदेवाने अमृतरूपी दुधाने सोन्याची कटोरी भरली आणि देवाच्या समोर धरली. हा माझा भक्त माझ्या हृदयात निवास करतो (असे म्हणत) देवाने (नारायणाने) नामदेवाकडे पाहून स्मित केले. देवाने दूध प्यायले, भक्त घरी परतला, अशा रीतीने नामदेवाला हरीचे दर्शन झाले.

किती सरळसोट वर्णन.... पण थेट हृदयाला भिडणारे! ''माझ्या देवाधिदेवा, गोविंद राया, हे दूध पी बरं! तू हे दूध प्यायलास की मला बरं वाटेल. नाहीतर माझे वडील नाराज होतील.'' हा त्यांचा आग्रह जितका निर्व्याज, निरागस आहे तितकाच त्यामागील भावही!
''देवाने दूध प्यायले, भक्त घरी परतला, अशा रीतीने नामदेवाला हरीचे दर्शन झाले.'' जणू काही नामदेव दुसर्‍याच कोणाबद्दल सांगत आहेत अशा तर्‍हेने केलेले हे वर्णन!

पुढे एका अभंगात तत्कालीन वर्णव्यवस्था, जातिभेदापायी नामदेवांना एकदा देवळाबाहेर हुसकावले जाते त्या प्रसंगाचे वर्णन आहे. व्यथित अंतःकरणाने नामदेव देवळाच्या पिछाडीस हरिनामाला आळवत बसतात. आणि काय आश्चर्य!! काही काळाने देऊळच फिरते आणि पिछाडीस बसलेल्या ह्या हरिभक्ताला सन्मुख होते.

प्रसंगाचे वर्णन करताना नामदेव म्हणतात :

हसत खेलत तेरे देहुरे आइआ ॥
भगति करत नामा पकरि उठाइआ ॥
हीनड़ी जाति मेरी जादिम राइआ ॥
छीपे के जनमि काहे कउ आइआ ॥१॥

हसत खेळत मी तुझ्या मंदिरी आलो. हे भगवंता, तुझी आराधना करत असताना नामदेवाला पकडून मंदिराबाहेर हुसकावले गेले. हे देवा, माझी जात हीन आहे. मी शिंप्याच्या घरी का जन्मलो?

लै कमली चलिओ पलटाइ ॥
देहुरै पाछै बैठा जाइ ॥२॥
जिउ जिउ नामा हरि गुण उचरै ॥
भगत जनां कउ देहुरा फिरै ॥३॥

मी माझं कांबळं उचललं आणि देवळाच्या पिछाडीस जाऊन बसलो. नामदेवाने जसजसे भगवंताचे स्तुतीगान सुरू केले तसे देऊळ मूळस्थानावरून फिरले आणि देवाच्या या पामर भक्ताकडे तोंड करून बसले.

आपण हीन कुळात का जन्माला आलो ह्या नामदेवांच्या प्रश्नात जी आर्तता आहे ती व्याकुळ करणारी आहे. त्यामागचे दु:ख हे आपल्या प्राणप्रिय भगवंताची मनाजोगती आराधना करता न येण्याचे दु:ख आहे.

ह्या अभंगासंदर्भात जी कथा प्रसिद्ध आहे ती अशी की, एकदा विठोबा खेचर, नामदेव व ज्ञानेश्वर ह्या देवळाच्या समोर इतर वारकर्‍यांसमवेत भजनकीर्तनात मग्न होते तेव्हा तेथील पुजार्‍यांनी त्यांना हटकले व तिथून बाहेर काढले. मग सर्व वारकर्‍यांसह नामदेव मंदिराच्या पिछाडीस गेले व तिथे भजनाचे रंगी दंग झाले. आणि काय आश्चर्य! देवाने आपल्या प्रिय भक्ताच्या आळवणीला साद देत सारे देऊळच फिरवले व भक्ताला दर्शन दिले.
देवाने आपल्या भक्ताकडे मुख करून त्याच्या कीर्तनाचा, स्तुतीगानाचा आनंद घेतला.
औरंगाबाद जवळ औंढे नागनाथाचे जे प्रसिद्ध शिवमंदिर आहे तेच हे मंदिर अशी कथा आहे. ह्या देवळाच्या पिछाडीस नंदी आहे.

तिसर्‍या अभंगात नामदेव ईश्वराच्या कृपेने मृत गाय कशी जिवंत झाली व दूध देऊ लागली हे वर्णितात.
ह्या वर्णनातील सुलतान हा मोहम्मद बिन तुघलक हा सुलतान होय. तसे हा सुलतान तत्त्वज्ञान, तर्क, गणित, अवकाशविज्ञान, वैद्यकशास्त्र, भाषा इत्यादींत पारंगत होता, परंतु हिंदूंचा द्वेष करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.

नामदेवांच्या हरीभक्तीने व लोकप्रियतेने अस्वस्थ होऊन तुघलकाने त्यांना साखळदंडांत बंदिस्त केले. त्याची अट होती, तुझा विठ्ठल खराच असेल तर त्याला बोलाव व मेलेल्या गायीला पुन्हा जिवंत करून दाखव. अन्यथा मी तुझा येथेच वध करेन. नामदेवांच्याच शब्दांमध्ये हा प्रसंग :

सुलतानु पूछै सुनु बे नामा ॥
देखउ राम तुम्हारे कामा ॥१॥
नामा सुलताने बाधिला ॥
देखउ तेरा हरि बीठुला ॥१॥
बिसमिलि गऊ देहु जीवाइ ॥
नातरु गरदनि मारउ ठांइ ॥२॥

सुलतान म्हणाला, ''नामदेवा, मला तुझ्या देवाची करामत बघायची आहे.''
सुलतानाने नामदेवाला अटक केली आणि फर्मान सोडले, ''मला तुझा देव दाखव.''
''ही मेलेली गाय जिवंत करून दाखव, नाहीतर मी तुझं शिर आताच्या आता इथे धडावेगळं करेन.''

बादिसाह ऐसी किउ होइ ॥
बिसमिलि कीआ न जीवै कोइ ॥३॥
मेरा कीआ कछू न होइ ॥
करि है रामु होइ है सोइ ॥४॥

नामदेव उत्तरले, ''महाराज, हे असं कसं घडून येणार? कोणीही मेलेल्याला पुन्हा जिवंत करू शकत नाही. मी स्वतः ह्याबाबत काहीच करू शकत नाही. जे काही राम (ईश्वर) करेल त्याप्रमाणे घडेल.''

बादिसाहु चड़्हिओ अहंकारि ॥
गज हसती दीनो चमकारि ॥५॥
रुदनु करै नामे की माइ ॥
छोडि रामु की न भजहि खुदाइ ॥६॥
न हउ तेरा पूंगड़ा न तू मेरी माइ ॥
पिंडु पड़ै तउ हरि गुन गाइ ॥७॥

उद्धट राजा ह्या उत्तराने संतप्त झाला आणि त्याने नामदेवावर हत्तीचा हल्ला घडवून आणला. नामदेवाची आई रडू लागली आणि म्हणू लागली, ''तू तुझ्या रामाला सोडून देऊन त्याच्या अल्लाची भक्ती का करत नाहीस?''
नामदेवाने उत्तर दिले, '' मी तुझा मुलगा नाही आणि तू माझी माता नाहीस! माझं शरीर नष्ट झालं तरी मी हरीचं स्तुतीगान करतच राहीन.''

करै गजिंदु सुंड की चोट ॥
नामा उबरै हरि की ओट ॥८॥
काजी मुलां करहि सलामु ॥
इनि हिंदू मेरा मलिआ मानु ॥९॥
बादिसाह बेनती सुनेहु ॥
नामे सर भरि सोना लेहु ॥१०॥
मालु लेउ तउ दोजकि परउ ॥
दीनु छोडि दुनीआ कउ भरउ ॥११॥

हत्तीने सोंडेने प्रहार केला, पण नामदेव हरीकृपेने त्यातून वाचले.
राजा उद्गारला, ''माझ्यासमोर काजी, मुल्ला मान तुकवितात आणि ह्या हिंदूने माझा अवमान केला आहे.''
लोकांनी राजाला विनविले, '' हे राजा, आमची प्रार्थना ऐक. नामदेवाच्या वजनाचे सोने घे आणि त्याला सोडून दे.'' त्यावर राजा उत्तरला, '' मी जर सोने घेतले तर मला माझ्या श्रद्धेचा बळी देऊन भौतिक संपत्ती गोळा करत बसल्याबद्दल नरकात जावे लागेल.''

पावहु बेड़ी हाथहु ताल ॥
नामा गावै गुन गोपाल ॥१२॥
गंग जमुन जउ उलटी बहै ॥
तउ नामा हरि करता रहै ॥१३॥
सात घड़ी जब बीती सुणी ॥
अजहु न आइओ त्रिभवण धणी ॥१४॥

पायांना साखळदंडांनी बांधून जखडलेल्या अवस्थेत नामदेवांनी हाताने ताल धरला आणि ईश्वराचे स्तुतीगान करू लागले.

''हे देवा! गंगा आणि यमुनेचे पाणी जरी उलटे वाहू लागले तरी मी तुझेच स्तुतिगान करत राहीन,'' त्यांनी आळविले. तीन तास (सात घटिका) उलटले. आणि तरीही त्रिभुवनाचा स्वामी आला नाही.

पाखंतण बाज बजाइला ॥
गरुड़ चड़्हे गोबिंद आइला ॥१५॥
अपने भगत परि की प्रतिपाल ॥
गरुड़ चड़्हे आए गोपाल ॥१६॥
कहहि त धरणि इकोडी करउ ॥
कहहि त ले करि ऊपरि धरउ ॥१७॥
कहहि त मुई गऊ देउ जीआइ ॥
सभु कोई देखै पतीआइ ॥१८॥

पंखांच्या पिसांपासून बनविलेले पाखंतण वाद्य वाजवित, गरुडारूढ विश्वेश्वर अखेरीस प्रकटला. आपल्या भक्ताचा प्रतिपालक असा तो गोपाल गरूडारूढ होऊन प्रकट झाला. ईश्वर त्याला (नामदेवाला) म्हणाला, ''तुझी इच्छा असेल तर मी पृथ्वी तिरपी करेन, तुझी इच्छा असेल तर तिला उलटी-पालटी करेन. तुझी इच्छा असेल तर मी मेलेल्या गायीला पुन्हा जिवंत करेन. सर्वजण पाहतील आणि त्यांची खात्री पटेल.''

नामा प्रणवै सेल मसेल ॥
गऊ दुहाई बछरा मेलि ॥१९॥
दूधहि दुहि जब मटुकी भरी ॥
ले बादिसाह के आगे धरी ॥२०॥
बादिसाहु महल महि जाइ ॥
अउघट की घट लागी आइ ॥२१॥

नामदेवाने प्रार्थना केली आणि गायीचे दोहन केले. त्याने वासराला गायीजवळ आणले आणि तिचे दोहन केले.
जेव्हा दुधाने घडा पूर्ण भरला तेव्हा नामदेवाने तो घडा राजासमोर नेऊन ठेवला. राजा व्यथित मनाने राजवाड्यात परतला.

काजी मुलां बिनती फुरमाइ ॥
बखसी हिंदू मै तेरी गाइ ॥२२॥
नामा कहै सुनहु बादिसाह ॥
इहु किछु पतीआ मुझै दिखाइ ॥२३॥
इस पतीआ का इहै परवानु ॥
साचि सीलि चालहु सुलितान ॥२४॥

काजी आणि मुल्लांच्या माध्यमातून राजाने नामदेवाची प्रार्थना केली, ''हे हिंदू, मला माफ कर. मी तुझ्यासमोर केवळ एखाद्या गायीसमान आहे.'' नामदेव उत्तरले, ''हे राजा, ऐक. हा चमत्कार मी घडवला का? ह्या चमत्काराचा उद्देश होता की हे राजा, तू सत्याच्या व विनयाच्या मार्गाने चालावेस.''

नामदेउ सभ रहिआ समाइ ॥
मिलि हिंदू सभ नामे पहि जाहि ॥२५॥
जउ अब की बार न जीवै गाइ ॥
त नामदेव का पतीआ जाइ ॥२६॥
नामे की कीरति रही संसारि ॥
भगत जनां ले उधरिआ पारि ॥२७॥
सगल कलेस निंदक भइआ खेदु ॥
नामे नाराइन नाही भेदु ॥२८॥१॥१०॥

नामदेवाला ह्यामुळे सगळीकडे प्रसिद्धी मिळाली. सारे हिंदू गोळा झाले व नामदेवाला भेटायला गेले. जर गाय जिवंत झाली नसती तर लोकांचा नामदेवावरचा विश्वास उडाला असता. नामदेवाची कीर्ती चारही दिशांना पसरली. इतर विनयशील भक्तही वाचले व त्याच्याबरोबर पैलतिरी जाऊ शकले. जो निंदक होता त्याला अनेक त्रास, क्लेश भोगावे लागले. नामदेव व ईश्वरात भेद उरला नाही.

---------------------

''आपल्यात व नारायणात कोणताच भेद उरलेला नाही,'' हे सांगणारी नामदेवांची वाणी घडलेल्या चमत्कारामुळे इतर हिंदूंना कशा प्रकारे जीवनदान मिळाले याचे संकेताने मोजक्या शब्दांमध्ये वर्णन करते. गाय जर जिवंत झाली नसती तर सुलतानाने फक्त नामदेवालाच चिरडले नसते तर त्याच्याबरोबर इतर भक्तांवरही आपत्ती ओढविली असती. प्राण गमावण्यापासून ते सक्तीच्या धर्मांतरापर्यंत कोणत्याही प्रकारच्या संकटाला त्यांना सामोरे जावे लागले असते. परंतु ती गाय जिवंत झाल्यामुळे पुढच्या घटना टळल्या.

आता गाय कशी काय जिवंत झाली? देवाच्या मूर्तीने दूध कसे काय प्यायले? देऊळ कसे काय फिरले? असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या प्रश्नांची उत्तरे तर्काच्या, बुद्धिवादाच्या भाषेत दिली जाऊ शकतील की नाही ही शंकाच आहे. कारण या सर्व घटना सामान्य बुद्धीपलीकडील आहेत. अनाकलनीय आहेत. नामदेवांच्या वर्णनानुसार तरी त्या त्या घटना त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडल्या. कथा, कीर्तने, पोथ्या, अभंगांतून त्या घटना लोकांपर्यंत पोहोचल्या. आज त्या संतसाहित्याचा एक अविभाज्य हिस्सा आहेत. अशा प्रसंगांतून संत नामदेवांची हरिभक्ती अधिकच दृढ झाली.

-- अरुंधती

लेखासाठी वापरलेले संदर्भ :

नामदेव व तुघलकाविषयीची माहिती : विकिपीडिया
शबद रचना : शीख संप्रदायाची संकेतस्थळे

(विशेष टीप : वरील अभंगांमधील प्रसंगांचे वर्णन करणारे नामदेवांचे मराठीतील अभंग कोणास माहित असल्यास कृपया प्रतिसादात द्यावेत ही विनंती.)

गुलमोहर: 

.

अकु, तु अशक्य आहेस. संत नामदेवांच्या आज ज्या गोष्टी मला माहित नाही त्या आज तुझ्यामुळे समजल्या. जगाच्या पाठीवरच्या अनेक अश्या गोष्टी तु शोधुन इथे आणतेस की जे वाचताना उत्कंठा निर्माण होते.

परमेश्वर काहीही घडवु शकतो. माझे गुरु संत गजानन महाराजांच्या लिला असलेला श्री गजानन विजय हा ग्रंथ मी रोज वाचतो. यात श्री गजानन महाराजांनी घडवलेल्या लिला ह्या कवी कल्पना नसुन तो इतरांनी नमुद केलेला इतिहास आहे. हा इतिहास १०० वर्षांच्या पेक्षा कमी काळाचा आहे.

मेलेले कुत्रे जिंवत होणे किंवा वठलेल्या आंम्र वृक्षाला पालवी फुटणे या सारखे चमत्कार प्रत्येक अध्यायात आहेत. आत्मस्तुतीचा दोष टाळण्यासाठी माझे वैयक्तीक अनुभव मी लिहण्याचे टाळतो.

कोणत्याही योग्याला अनेक सिध्दी प्राप्त असतात. आहार, निद्रा, भय आणि मैथुन यासारख्या सामान्य पशुच्या /पशुवत माणसाच्या गरजांपासुन /लक्षणांपासुन ते मुक्त असतात.

या सिध्दींचा ते उपयोग पोटासाठी करत नसतात तर जनांच्या हितासाठी करतात. जिथे त्यांच्या मर्यादा संपतात तिथे सर्व शक्तीमान परमेश्वर त्यांच्या इच्छा पुर्ण करायला तत्पर असतो.

अकु, मस्त माहिती.
<<नामदेवांनी पंजाबात वीस वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्य केले. तेथील भाषा, संस्कृती फक्त आत्मसातच केली असे नव्हे; तर त्या भाषेत सुंदर काव्येही रचली. हे सर्व अभंग शीख संप्रदायाच्या आद्य धर्मग्रंथाचा, गुरु ग्रंथसाहिबचा एक भाग आहेत.>>
माझ्यासाठी ही पूर्णपणे नवीन माहिती आहे. धन्यवाद.

संत नामदेवांच्या चरणी साष्टांग दंडवत.
तुमचे खूप खूप आभार..... अशीच माहिती देत रहा.....

नामदेवाना ज्ञानेश्वरानी पंजाबात पाठवले होते. कारण त्या भागातून दुसर्‍या धर्माने आक्रमण करायला सुरुवात केली होती. अशा वेळी धर्म रक्षण हा उद्देश ठेऊन ज्ञानेश्वरानी हे पाऊल उचललेले होते.

असुदे, साधना, वाल्या कोळी, नितीन, स्वाती, नानबा, रुणूझुणू, शशांक पुरंदरे, जामोप्या....
सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

काल ह्या चमत्कारांबद्दल विचार करत असताना जाणवले की नामदेव स्वतः कोठेच मी अमुक चमत्कार घडवून आणला असे म्हणत नाहीत. किंबहुना ते ही सारी ईश्वराची लीला आहे हेच सांगतात. अर्थात लोकसमुदाय ते चमत्कार नामदेवांनी घडवून आणले असेच मानतो.

अजून जाणवलेली गोष्ट म्हणजे ह्या चमत्कारांमागील व्यापक उद्देश.

देवळाच्या प्रसंगात भक्त हा कोणीही असो, भगवंताला तो प्रियच असतो, त्याच्या भक्तीपुढे बाकी सारे निकष, अगदी जगरहाटीचे नियमही तुच्छ ठरतात असे तर सुचवायचे नसेल ना?

तसेच गायीच्या प्रसंगात सुलतानाची घमेंड उतरवण्याबरोबरच तमाम ईश्वरपूजकांना त्या कठीण काळात दिलासा तर द्यायचा नसेल ना?

सर्वसामान्य नियमांच्या पलीकडले बघण्यासाठी हे संतजन अशा तर्‍हेने उद्युक्त करतात का?

अशा अनेक गोष्टी हे प्रसंग वाचताना मनात तरळून जातात.

अद्भुतरसाचे जे प्रयोजन आहे, तो भाव नकळत मनात जागृत होतो.

अकु, माझे मन हे चमत्कार ज्या स्वरुपात अभंगात / रचनेत आलेत त्या प्रकारे घडले असतील, यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही.
पण या काव्यातील आर्तता, प्रांजळपणा, भक्तीभाव यावर मात्र मी कायम जीव ओवाळून टाकेन.
सर्व संत कविंबद्दल मला अतोनात आदर वाटतो.

अश्विनी, थँक्स.

दिनेशदा, तर्काधिष्ठित विचारांची सवय असल्यावर अशा प्रकारे विश्वास ठेवणे कठीणच ना? मला तर आजही कोणी गायक अमका राग गाऊन समईतील ज्योती प्रज्ज्वलित करत असे, किंवा तमका राग गाऊन पाऊस पाडून दाखवत असे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते!!

लोकवाङ्मयात एखादी घटना अतिशयोक्ती करून सांगणे नवीन नाही. त्याबरोबर एकाच घटनेविषयी नाना तर्‍हांच्या कथा असणेही नवीन नाही. (ते तर आपण रोजच्या बातम्यांत व वर्तमानपत्रातही बघतोच की!) परंतु इथे हे अभंग नामदेवांनीच रचले व त्यांच्यात काही फेरफार न होता ते ग्रंथ साहिबाचा भाग बनले हे जर गृहित धरले तर त्या प्रसंगांची विश्वासार्हता कशी टाळणार?
अन्यथा ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेड्याच्या तोंडून वेद वदविले इत्यादी कथाही त्याच संशयाच्या भोवर्‍यात येतात. एखाद्या घटनेची सत्यासत्यता तपासायची तर त्यामागील आपला दृष्टीकोन नक्की कोणता आहे हेही तपासायला लागेल. आणि एवढे करूनही त्यातील सूक्ष्म सत्य आपल्याला गवसेलच ह्याचीही काय गॅरंटी? Happy

दिनेशदांना अनुमोदन.
तुझे आत्ताचे पोस्टही आवडले अरुंधती. Happy

आणि एवढे करूनही त्यातील सूक्ष्म सत्य आपल्याला गवसेलच ह्याचीही काय गॅरंटी?>> अगदी. अगदी.

हम्म्म. ज्ञानेश, तुम्हीच सांगा रूपक काय आहे इथे ते.

रैना, मला काल योग्य शब्द आठवत नव्हता, आज आठवला.... काही अचाट, अचंबित करणारे असे पाहिले/ ऐकले की काही क्षण मनात एक ''ठहराव'' (स्तब्धता) येते. कधी ती स्तब्धता निसर्गाचे रौद्र रूप पाहून येते, कधी आपल्यासमोर डोळ्यांवर विश्वास ठेवता येणार नाही असे काही घडते त्यातून येते.... हा जो ''ठहराव'' असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आपल्या अनेक पूर्वसंकल्पना त्यातून गळून पडतात. आणि तो क्षण ओसरल्यावर पुन्हा एकदा सत्याची चाचपणी सुरु होते. मनात प्रश्न विचारले जातात. एक प्रकारचा स्वाध्याय सुरु होतो. ''असं कसं होऊ शकतं?'' पासून ''असंही होऊ शकतं??!!!'' आणि अजूनही पुढे.... कोणास ठाऊक.... स्वतःच्या अनुभवांचे आयाम किती तोकडे आहेत, विचारांच्या चौकटी किती साचेबध्द आहेत ह्याची जाणीव.... हेच तर संतमंडळींना अभिप्रेत नसावं ना? आत्मबोधाकडे जाणारा हा प्रवास अशा धक्कातंत्रातून तर सुरु होत नसेल?

असो.... अजून नामदेव आतवर उतरायचे आहेत. बघूयात पुढे काय काय म्हणतात ते. Happy

<<काही अचाट, अचंबित करणारे असे पाहिले/ ऐकले की काही क्षण मनात एक ''ठहराव'' (स्तब्धता) येते...................................................आत्मबोधाकडे जाणारा हा प्रवास अशा धक्कातंत्रातून तर सुरु होत नसेल?>> सौ टके की बात !!

अ.कु.
नेहेमीप्रमाणेच सुंदर लेख.. शिवाय माहितीपूर्ण. नामदेवांचे पंजाब कार्य ऐकून होतो पण शबद मधील त्ञांचे अभंग माहित नव्हते.

>>आत्मबोधाकडे जाणारा हा प्रवास अशा धक्कातंत्रातून तर सुरु होत नसेल
आत्मबोध नाही पण कुठलाही "दुसर्‍या शक्यतेंकडे" किंवा "अस्तित्वात असलेल्या मान्यताप्राप्त संकल्पनांना छेद देण्याची" सुरुवात मला वाटतं व्यावहारीक स्वरूपात एखाद्या धक्य्यानेच होते.
जपानच्या सुनामीत, किंवा भूज च्या भुकंपात एखादे लहान मूल न खरचटता बचावते, तर आपल्याच समोर अत्ता धडधाकट असणारी व्यक्ती त्याच भूकंपात वा सुनामीत्प्राण गमावते- हे अनुभव "धक्कादायकच" अन त्यातून काय अर्थ समोर येतो- प्रत्त्येक घटनेमागे तर्कसुसंगत काही असतेच असे नाही? किंवा त्या वेळी त्या घटनेच्या कारणापर्यंत व्यावहारीक दृष्ट्या आपण पोचू शकत नाही, फारतर अदमास, अंदाज बांधता येतात.
आता लहान मूल देखिल असे वाचू शकते हे शक्य आहे (व्यावहारीक दृष्ट्या अशक्यच नाही का!) तर नामदेवांनी वर्णन केलेल्या घटना देखिल "शक्य" (पुन्हा एकदा अशक्यच नाही?) आहेत.

पण लेखाचा मूळ ऊद्देश या अद्भूत गोष्टींबद्दल चर्चा आहे का भक्तीमार्गातील "अद्भूत" अनुभव यांबद्दल? शेवटचा परिच्छेद त्या बाबतीत संदीग्ध वाटतो. पुढील एका प्रतीक्रीया पोस्ट मध्ये मात्र यावर थोडा प्रकाश टाकल्याचे जाणवते:
>एखाद्या घटनेची सत्यासत्यता तपासायची तर त्यामागील आपला दृष्टीकोन नक्की कोणता आहे हेही तपासायला लागेल. आणि एवढे करूनही त्यातील सूक्ष्म सत्य आपल्याला गवसेलच ह्याचीही काय गॅरंटी?

पण सत्यासत्यता तपासायला आधी द्रुष्टीकोन तपासायची गरज आहे का? आणि सूक्ष्म सत्य म्हणजे नेमके काय- अतींद्रीय अनुभव असे म्हणायचे आहे का? कारण एरवी पंचेंद्रीयांना ज्ञात गोष्टी, एखाद्याचा दृष्टीकोन बनवायला कारणीभूत असतात- एक प्रकारे तेच सत्य असते. आंधळ्या माणसाला सूर्याचा दाह, वा चंद्राची शितलता या जाणिवा आहेत, त्यांचे स्वरूप दर्शन नाही. त्यापलिकडे जावून लालभडक सूर्याचा गोळा वा शितल धवल चंद्र असे वर्णन तो करू शकतो का? (हे असे चंद्र सूर्य दर्शन अर्थातच पृत्वीतलावरून आहे, ईतर "ज्ञात" वा अज्ञात ग्रहांवरून ते कसे दिसत असतील हे माहित नाही!). थोडक्यात नामदेवांनी जी सम्यक स्वरूप प्रकट दर्शने उल्लेखलेली आहेत, त्यांची सत्यासत्यता तपासण्याची दृष्टि (व्यावहारीक अर्थाने) आपल्याला आहे का? नसेल तर आपण आंधळे आहोत असा अर्थ निघतो. Happy

एकंदरीत "अद्भूत" आहे सर्व!

धन्यवाद योग Happy

ह्या लेखाचा उद्देश खरे तर इतरांबरोबर नामदेवांचे पंजाबी गुरुमुखीतील अभंग शेअर करण्याचा होता, पण वर तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते नुसते शेअर करण्याबरोबरच त्यांबद्दल विचारमंथन सुरु झाले आणि ते लेखातूनही उमटले. फेब्रुवारीत लिहायला घेतले तरी प्रकाशित करायची हिंमत होत नव्हती, कारण अजून बरेच जाणायचे आहे.
मग नंतर विचार आला, जाण येईल तेव्हा येईल... पण हा अनमोल ठेवा तोवर आपल्यापुरताच राखून ठेवणे हे काही बरोबर नाही! तेव्हा, नामदेवांच्या अभंगांना वाचत, त्यांवर मनन करतच माझा हा लेखनप्रवास चालू आहे. नामदेवांचे पंजाबीत विविध विषयांना स्पर्श करणारे आणि मधुराभक्तीची ग्वाही देणारे अजून बरेच अभंग आहेत. माझे त्यांना मराठीत लिहिण्याचे प्रयत्नही चालू आहेत.

बाह्यघटनांनी जागृत होणारी आंतरिक दृष्टी हा तो दृष्टिकोन!

>>बाह्यघटनांनी जागृत होणारी आंतरिक दृष्टी हा तो दृष्टिकोन!
आणि मग तीच घटना दुसर्‍या वेळी वेगळया प्रकारे घडते तेव्हा "धक्का" बसतो अन तोवर स्थिरावलेल्या संकल्पना अन बनवलेला दृष्टिकोन पुन्हा तपासून पहायची गरज निर्माण होते- करेक्ट?
(१०० सेल्सियस ला पाणि ऊकळते-पण बुडबुडे वा वाफ दिसलीच नाही तर?) Happy

योग Happy

दर वेळेसच धक्का बसावा लागतो असं काही आहे का? कोणाला एकाच धक्क्याची स्मृती पुरेशी असू शकते. हे व्यक्तीसापेक्ष असू शकते, नाही का? कोणी एकाच धक्क्यातून शिकतो, कोणाला वारंवार धक्के द्यावे/ बसावे लागतात....

त्यातून काही काही संतांनी शिष्यांना त्यांच्या संकल्पनांना अनेकदा धक्का देत देतच मार्गदर्शन केले असल्याचे ऐकले आहे.

दिनेशदांना अनुमोदन.
मला संत साहित्याबद्दल वाचायला नेहमीच आवडते. सर्व संतांबद्दल अतीव आदर देखिल आहे. तरी हे चमत्कार प्रकरण कधीच पटत नाही. मला अध्यात्म याविषयात अजीबात गती नाही. त्यामूळे यावर बोलायचा अधिकारही नाही असे वाटते. तरीही सर्व सामान्य तर्क बुद्धीनुसार काही शंका नेहमीच मनात येतात.

नामदेव ई. संत महान होते यात शंकाच नाही , पण ते सिद्ध करण्यासाठी छोट्या मोठ्या चमत्काराची गरज काय ? भिंत हलवणे , दुध पिणे ई चमत्कारांचा लोकांना काय उपयोग? त्यापेक्षा त्यांनी जी ग्रंथ संपदा निर्माण केली आहे त्यातील ज्ञान जास्त महत्वाचे नाही का. पण चमत्काराला नमस्कार हाच प्रकार जास्त आढळून येतो.

कोणा संतानी कोणत्या ग्रंथात म्हणल्याप्रमाणे एखाद्या रोग्याला बरे केले हा चमत्कार मानला तर त्याच प्रमाणे आज देवी ई. सारख्या रोगाचा नायनाट करणारी लस ज्याने शोधून काढली त्या शास्त्रज्ञाला तर देवाच्या जागीच मानले पाहिजे.

बहुतेक संतांच्या काव्यातून समाज प्रबोधन आणि जाती भेद दूर करण्याचे प्रयत्न झालेले दिसतात. पण दुर्दैवाची गोष्ट ही की लोक फक्त त्यातले चमत्काराचे प्रसंग लक्षात ठेवतात आणि समाज प्रबोधनाच्या मुद्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. वेगवेगळ्या जातीतले एव्हढे संत होऊन गेले पण त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांनंतरही जातिभेद तसाच राहिला. आजही स्वतःला अतिशय अध्यात्मिक मानणारे, येता जाता देवाचे नाव घेणारे अनेक लोक मनात जातिभेद ठेवूनच वावरताना दिसतात.

<<
बहुतेक संतांच्या काव्यातून समाज प्रबोधन आणि जाती भेद दूर करण्याचे प्रयत्न झालेले दिसतात. पण दुर्दैवाची गोष्ट ही की लोक फक्त त्यातले चमत्काराचे प्रसंग लक्षात ठेवतात आणि समाज प्रबोधनाच्या मुद्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. वेगवेगळ्या जातीतले एव्हढे संत होऊन गेले पण त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांनंतरही जातिभेद तसाच राहिला. आजही स्वतःला अतिशय अध्यात्मिक मानणारे, येता जाता देवाचे नाव घेणारे अनेक लोक मनात जातिभेद ठेवूनच वावरताना दिसतात.>>

डेलिया, अगदी अगदी.....

माझ्याही मनात हाच प्रश्न अनेकदा येतो की संतांची शिकवण, त्यांनी सांगितलेले ज्ञान सोडून लोक त्यांच्या बाह्योपचाराला, वेषभूषा - केशभूषेपासून -अगदी किरकोळ गोष्टींपासून ते त्यांनी ''केलेल्या'' चमत्कारांकडेच का लक्ष देतात? संतांची शिकवण शिरोधार्थ मानणे, अंगीकारणे दूरच राहिले... त्यांना संतांच्या फक्त पाया पडण्यात, पूजाअर्चा करण्यातच का रस असतो? अनेक संतांनी ह्याबद्दल आपल्या अनुयायांना खडसावले, कोणी ताशेरे ओढले. पण परिणाम कितपत झाला?
नामदेवांच्या पुढील काही पंजाबी / गुरुमुखीतील अभंगांमध्ये समाजावरही भाष्य आहे. केवळ उपचारांमध्ये अडकून बसलेल्या लोकांवर केलेली टिप्पणी आहे.

नामदेवांसारखे थोर संत आपल्या इतर अभंगांमध्ये जातिभेद, उच्च-नीच, अंधश्रध्दा इत्यादींवर टिप्पणी करतात. पण मग त्यांचा चमत्काराचे प्रसंग अभंगांतून सांगण्याचा उद्देश नक्की काय असावा, की ती केवळ भक्ताच्या भक्तीची अभिव्यक्ती असावी, त्यातून कोणता व्यापक उद्देश साधला असावा / अपेक्षित असावा याचा विचार म्हणूनच मनात पिंगा घालत राहतो.

संतांची शिकवण शिरोधार्थ मानणे, अंगीकारणे दूरच राहिले... त्यांना संतांच्या फक्त पाया पडण्यात, पूजाअर्चा करण्यातच का रस असतो? <<< कारण आम्हाला अभ्यास करायचा कंटाळा येतो आणि परीक्षेत पास तर व्हायचे असते. मग चमत्कारानेच हे शक्य होईल ना? Happy