"संवाद"

Submitted by भूत on 24 February, 2011 - 10:33

..... आणि "म्हातारबाबा"च्या डोक्यावर गरागरा फिरणारे ते चाक तेथुन उडुन "उध्दवा"च्या डोक्यावर येवुन बसले अन तसेच गरागरा फिरु लागले !

अगदी काल परावाची गोष्ट .
..ते चार गुरु बंधु निराश होवुन गुरुंसमोर बसलेले ...अवंती नगरीच्या आश्रमात गुढ शांतता भरुन राहिलेली ...गुरुंच्या चेहर्‍यावरही तीच प्रगाढ गुढ मुद्रा...सारे प्रशांत गंभीर वातावरण ...धुपाचा मंद सुवास ... कोणीतरी घनपाठ करतोय ...त्याच्या खर्जातले सुर वातावरणाला अजुनच गुढता आणणारे ...
" हे बघा वत्सांनो , मला तुमची आगतिकता समजते ...पण तुम्हाला अजुन तुमचे नशीब शोधायला बाहेर पडला नाहीत ...ते स्वतः येवुन तुम्हाला कसे भेटेल ? असो . मी तुम्हा प्रत्येकाला एक एक मोरपीस देतोय ते घेवुन तुम्ही हिमालयाचा मार्ग आक्रामायला लागा ...जिथे हे मोरपीस पडेल तिथे तुम्हाला तुमचे नशीब सापडेल ..."शुभं भवतु" !!"
आणि ते हिमालयाचा मार्ग चालायला लागले ...गिरीकंदर वनविभुषित मार्ग क्रमुन आता ते हिमालयाच्या पायथ्याशी आले ...गंगेच्या अस्पर्शित शुध्द खळाळ्णार्‍या पाण्यासारखाच शुभ्र हिमालय साद देत होता ...त्याच्या शिखरावर पडलेली ती सोनेरी किरणे जणु काही ह्या पर्वतराजाच्या सुवर्ण मुकुटा प्रमाणे शोभुन दिसत दिसत होती ...अलकनंदेच्या किनारी जेव्हा ते पाणी प्यायला थांबले तेव्हा एकाचे मोरपीस तिथे पडले ...त्याला चांदीची खाण सापडली ....
.." मित्रांनो हे इतके पुरे आहे आपण इथेच थांबु "
"मित्रा..तुझे अभिनंदन पण हे झाले तुझे नशीब आम्हाला आमचे नशीब शोधले पाहिजे "
पुढे दुसरे मोरपीस पडले ...तिथे सोन्याची खाण सापडली ..." मित्रांनो हातर चमत्कारच ...जय गुरुदेव ...आता आपण थांबुया हावरटपणा नको " उरलेले दोघे त्याच्याकडे बघुन हसले अन त्यांचे नशीब शोधायला पुढे निघाले तितक्यात तिसरे मोरपीस पण पडले अन तिथे त्याला हिर्‍याची खाण सापडली ! " अहाहा ...गुरुदेव आपल्या कृपेने आम्ही धन्य झालो ... आता थांबुया ...हिर्‍यापेक्षा जास्त मौल्यवान काय असणार ...अतीहाव करणे चांगले नाही उध्दवा ".
.
पण उध्दव थांबला नाही... जणु काही त्याचे नशीब त्याला बोलावत होते.... खेचत होते ...तो पुढे चालत राहिला ...त्याने मंदाकिनी ओलांडली ...रामगंगा ओलांडुनही पुढे गेला ...स्वर्गारोहिणीचा प्रवास करताना त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले ...' हाच तो मार्ग जिथुन पांडव ...खरेतर फक्त युधिष्ठीर सदेह स्वर्गात गेला'...खरेच त्याचे नशीब त्याला बोलावत होते ...इतक्यात अचानक एक अनपेक्षित दृष्य त्याच्या निदर्शनास आले ...त्याला चांगलाच धक्का बसला ....
एक म्हातारा ...एकटाच उभा ...पाठीत वाकलेला ....त्याचे पाय जणु काही अनंत काळापासुन जमीनीत रुतुन बसलेले...त्याच्या डोक्यावर एक रथाचे जाडजुड काटेरी फिरते चाक ...डोक्यातुन रक्ताचे वाहते ओघळ ...अंगातील अंगरखा धुळीने वाललेल्या रक्ताने माखलेला ...अन एक असह्य दुर्गंधीने तो प्रदेश भरुन गेलेला ...स्वर्गारोहिणी ओलांडल्यावर हे असे नरकसमान दृष्य डोळ्यास पडल्याने उध्दवाचे कुतुहल जागे झाले ...ती दुर्गंधी टाळत ...नाक मुठीत धरत तो म्हातारबाबा जवळ गेला अन विचारले ..." हे काय म्हातारबाबा ?"
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
..... आणि "म्हातारबाबा"च्या डोक्यावर गरागरा फिरणारे ते चाक तेथुन उडुन "उध्दवा"च्या डोक्यावर येवुन बसले अन तसेच गरागरा फिरु लागले !!

आता म्हातारबाबाचे जमीनीत रुतलेले पाय बाहेर आले अन उध्दवाचे पाय जमीनीत रुतले गेले ...त्याला हलताच येईना तो पार बावरुन गेला ....." हे काय आहे म्हातार बाबा " त्याने रडवेल्या आवाजात टाहो फोडला ,
.
आता म्हातारबाबाच्या चेहर्‍यावर हलकेसे हास्य होते ...इतक्यावर्षांनी ह्या अभिशापातुन मुक्त झाल्याचा आनंद होता ...
"शेवटी तु भेटलासच तर मित्रा... मला विश्वास होता मी या जगात एकटा नसणार ...मी ही असाच माझे नशीब शोधत शोधत इथे आलो अन मलाही अगदी आज जसा तुला हा अभिशाप मिळालाय हावरटपणा बद्दल ...तसाच हा अभिशाप मिळाला ...असो किती वर्ष ही वेदना सहन केली माझे मलाच आठवत नाही ...आता हा भोग तुझ्या माथी....बाकी आता फक्त अशाच एखाद्या वेड्याची वाट पहाणे तुझ्या नशीबात...इथे मरणही येत नाही मित्रा !!

... आता थांबणार आहेसच तर थोड्या गप्पा मारु...कित्येक दिवस बोललोच नाहीये ...शिवाय इतक्या वर्षात जे काही ज्ञान मला प्राप्त झाले ...थोडेफार तुला सांगावे म्हणतो ...मी ही असाच गुरुंनी दिलेले ते मोरपीस घेवुन निघालो ....." म्हातारबाबा त्याची कहाणी कथन करायला लागला
.
.
किती तरी वेळ तो एकटाच बडबडत होता ... इकडे उध्दवाच्या डोक्यात अन डोक्यावरचेही चक्र शांत पणे फिरु लागले ... ही अपरिहार्य आगतिकता त्याचे मन हळु हळु स्विकारायला लागले ... अन मग त्याच्या मनाने प्रश्नांच्या गुढ डोहात डुबकी मारली ...

" मित्रा , मी एकटाच बोलणार की तु तुला आत्तापासुनच मौनाची सवय लागली ?? " म्हातारबाबाच्या ह्या प्रश्नाने त्याची तंद्री भंग पावली अन त्यांचा संवाद सुरु झाला ......
.
" हे माझ्याशीच...आपल्याशीच का व्हावं म्हातारबाबा ? आपलच नशीब फुटकं का ? तीन मित्रांना चांदी सोन्याच्या हिर्‍याच्या खाणी लाभल्या ...याही पेक्षा मौल्यवान असे काही तरी सापडेल ह्या आशेने मी आणि आपणही धावत राहिलो अन हातात काय पड्लं ...तर हा शाप ! खरच आपलच नशीब इतकं फुटकं का ??" केविलवाण्या सुरातला उध्दवाचा प्रश्न हिमालयाच्या दरीखोर्‍यातुन प्रतिध्वनीत होवुन नादत राहिला ....

" गडबड करतो आहेस मित्रा .. जरासा विचार कर सोने चांदी हिर्‍यांपेक्षा पेक्षा किती तरी पट मौल्यवान दोन गोष्टी तुला लाभल्या आहेत ....ज्ञानप्राप्तीची संधी आणि एकांत ! ज्ञानापेक्षा काही मौल्यवान मलातरी माहीत नाही ...चांदी सोने हिरे काय शेवटी शुध्द दगड मातीच आहे ना ? काल कोणाची तरी होती आज कोणाची तरी उद्या कोणाची तरी ...वारांगनेप्रमाणे ....पण ज्ञानाचे तसे नाही ते अनंत आहे आणि आज कुणाचे उद्या कोणाचे असे त्याचे नाही एकदा प्राप्त झाले की तद्रुपच होवुन जाशील मी बोलतोय ते आत्ता तुला कळणार नाही पण हळु हळु तुझ्या मनावरचा अज्ञानाचा पडदा हटत जाईल अन तुला ज्योतिस्वरुप ज्ञानाची प्राप्ति होईल ...आणि यासाठी आवशकता आहे फक्त एकांताची तो ही आता तुला मिळेल मित्रा...विचार कर किती लोकांना स्वतः बद्दल विचारकरायला असा एकांत मिळतो ..सगळेच घाण्याच्या बैला सारखे संसाराला सदैव जुंपलेले ....तुज्या त्या मित्रांचे काय रे ...त्या धनाचा उपभोग घेतील अन मरुन जातील त्यांना ज्ञान म्हणजे काय कळणार नाही ...मिळणार तर मुळीच नाही ....तु ज्या मौल्यवान गोष्टीची आशा धरुन इथवर आलास ती नकळत तुझ्या हातात पडली आहे ... स्वप्नी जे जे देखिले ते ते अवघेचि मिळाले ! "

" स्वप्न ...हः स्वप्न पाहणं पाप आहे का रे ? मी स्वप्न पाहिले त्याची ही फळं अन जे अल्प स्वल्प गोष्टीत समाधान मानुन राहिले त्यांना ते ऐहिक सुख ! "

" ह्म्म ..अगदी व्यवस्थित विचार करायला लागलास ...ज्ञानसाधनेच्या साठी मिळालेला एकांत त्या ऐहिक सुखापेक्षा किती सुखद आहे तुला हळु हळु उमजेल ....आणि स्वप्न पाहाणं नक्कीच पाप नाही मित्रा उलट तीच तर गोष्ट आपल्याला पुढे ढकलत राहाते "

" मग महत्वाकांक्षी माणसांच्या नशीबी हे भोग का ?"
" समाज ...समाज मित्रा ... समाज नेहमीच समपातळी राखायचा प्रयत्न करणार ....कोणी पुढे जाणार असेल तर त्याला मागे ओढायचे अस मागे पडणार असेल तर त्याला पुढे ओढायचे हा तर नियम आहे समाजाचा ...एकतर असामान्य पुरुषाला सामान्यांच्या बंधनात अडकवुन हैराण करायचे .....नाहीतर त्याला देव करुन टाकायचे म्हणजे "त्यांना" चालतं ..आपल्याला नाही म्हणायाला" मोकळे ... आजही तुझ्या पाठीमागे तुला तुझे मित्र एकतर मुर्ख म्हणत असतील नाहीतर देव म्हणत असतील ... "

" मग समाजात एकटं पडणं हे असं असामान्य असंण हे पाप आहे का ?"
" नक्कीच नाही ... फक्त मुर्ख ठरवले जाण्याची तयारी हवी अन चुकुन माकुन देव ठरवला गेलासच तर ते देवपण ..तेही सामान्य भक्तांच्या नियमात बांधलेलं सहन करावं लागेल .. तु असामान्य आहेस ही नक्कीच ज्याला आपण देव ठरवुन देवपणाची ...कर्मकांडाची पुटं वर्शानुवर्ष चढवत आलोय त्या "पुरुषाची" इच्छा आहे ..आपण नक्कीच त्याचे लाडके असणार ."

"मग आपल्या सारख्यांनाच हा शाप का ? ह्या शापाचा नक्की उद्देश काय?? ..."
"शोध स्वतःचा ...बस्स बाकी काही नाही .... आणि हा शाप नाही मित्रा ...आशिर्वाद आहे आशीर्वाद ...हळु हळु पटेल तुला ....फार नशीबवानांना ही संधी मिळते बाकीच्यांची आयुष्य पशुवत खाणे पिणे भोग भोगणे यात कशी संपतात त्यांचे त्यांनाही कळत नाही ..."

"जर भोगच घ्यायचा नसेल तर मग ह्या आयुष्याचा अर्थ काय... ध्येय काय " उध्द्वाच्या उद्वेगाचा हा प्रश्न ऐकुन म्हातारबाबाच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर परत आनंद प्रकट झाला
"शाब्बास मित्रा ..तुला हा प्रश्न पडला... तुझी प्रगती होत आहे ... आता ह्या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्यानेच शोधायचे .... तुला नक्की सापडेल ...तुझ्याकडे आता आख्ख्या जगाचा वेळ आहे !"
" तुला काय उत्तर सापडले म्हातारबाबा ? "
.
.
.

" हः ...आयुष्य ... आयुष्य निरर्थक आहे...काहीच ध्येय नाही... गंतव्य नाही मित्रा...बस्स जगत रहाणे ...बस्स ... काहीच अर्थ नाही ... मी बोलतो ...तु ऐकतो निरर्थक ... ऐहिक सुख उपभोगणे ...हा असा शाप भोगणे ...निरर्थक ... ज्ञान प्राप्ती होणे ...न होणे दोन्ही निरर्थक ...ज्ञान आणि अज्ञान काय रे शेवटी... वृत्तीच ना ... दोन्ही समानच .. मुळातच आपल्या अस्तित्वाला कारणच नाही हे समजुन जगणे अन ते तसे न समजता गुराढोरांसारखे आहे त्यात सुख मानुन अज्ञानात जगणे ....दोन्हीही निरर्थक ....असो...एखादी गोष्ट समजुन करणे हे न समजता करण्या पेक्षा श्रेष्ठ असते हे बोलणे ही निरर्थक.....
.
.
.
म्हातारबाबा बोलता बोलता थांबला ...अन एक अर्थहीन शांतता भरुन राहिली .....
----------------------------------------------------------------------------------------------------

"असो . आता तुला सत्याचे ज्ञान व्हायला सुरवात झाली आहे ......
तुझ्या सारखाच दुसरा कोणीतरी महत्वाकांक्षी... स्वप्नाळु... वेडा कधीना कधीतरी येथे येईल ...तेव्हा हे चाक त्याच्या डोक्यावर जाऊन बसेल ..तेव्हा तु या शापातुन मुक्त होशील अन घरी जावु शकशील ....पण तो पर्यंत तुला हा अभिशाप सहन करावाच लागेल ..." असे बोलुन म्हातारबाबाने उध्दवाकडे पाठ फिरवली अन तो मार्गस्थ झाला ....

इतक्या सगळ्या संवादानंतर निराश झालेल्या उध्दवाच्या चेहर्‍यावर एक कुत्सित हास्याची लहर उमटुन गेली ...
" म्हातार बाबा ...मला इतके ज्ञान दिलेस ...पण बहुतेक इतके वर्षे हे चाक डोक्यावर फिरुन बहुतेक तुझाही मेंदु थोडा झिजलेला दिसतोय...तुला अवंती नगरी कडे जाण्याचा रस्ताही लक्षात राहिलेला दिसत नाहीये ..."

म्हातारबाबा अचानक स्तब्ध झाला ...त्याने मागे वळुन उध्दवाकडे पाहिले ... आता उध्दवाच्या डोक्यावर ते चाक निवांतपणे फिरत होते ...तो त्या ओझ्याने पार वाकुन गेला होता ...रक्ताचे पाच दहा ओघळ त्याच्या चेहर्‍यावर आले होते ...डोळ्यामधे ती निराशा लपवण्याचा प्रयत्न करणारे ते चेहर्‍यावरील कुत्सित हास्य त्याच्या रुपाला जास्तच भयाण करत होते ....जणु काही तोच अनंतकाळापासुन तो अभिशाप भोगत होता ...अगदी थोड्याच वेळा पुर्वी इथे आलेला उध्दव तो हाच ..हे कोणाला सांगुनही पटले नसते ...

म्हातारबाबाने वळुन उध्द्वाकडे पाहिले अन त्याच्या चेहर्‍यावर हलकेसे स्मितहास्य उमटले ...डोळ्यात एक वेगळीच चमक आली ...नकळत त्याचा हात त्याच्या फाटलेल्या...रक्ताने ..धुळीने..पसाने..माखलेल्या त्याच्या अंगरख्याच्या खिशात गेला ...त्याने खिशातुन काहीतरी बाहेर काढले अन तो हिमालयशिखराकडे चालायला लागला .
.
.
उध्द्वाला म्हातार बाबाच्या त्या वागण्याचा ... त्या स्मितहास्याचा अर्थ लक्षात आला नाही ....
.
फक्त
.
.
त्याची नजर म्हातारबाबाने हातात घट्ट पकडलेल्या त्या मोरपीसावर खिळुन राहीली !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

?

कथा आवड्ली. गूढ आणि गंभीर.
इतर वेगवेगळी विराम आणि अवतरण चिन्हेही वापरुन बघायला हरकत नसावी Proud Light 1

जमली रे पंता.......

फक्त तुला अपेक्षित शेवट अजून वाचकापर्यंत पोचेल काय??? तो म्हातारा शापातून मुक्त झाल्यावरही घरचा मार्ग न पत्करता पुन्हा हिमालयाच्या दिशेनेच निघतो "मोरपीस घेऊन"...... "एंडलेस ड्रीम्स" ते हेच...... हे थोडंसं स्पष्ट करता आलं तर बघ.

पुन्हा वाचतो एकदा, तुमची कथा आली हे पाहून काहीसे नवल वाटणे, कथा वेगळीच असल्याचे जाणवणे आणि गूढ वाटणे या प्रथम प्रतिक्रिया आल्या मनात, आता नीट वाचतो पुन्हा!

दरम्यान, अभिनंदन व पुलेशु.

-'बेफिकीर'!

मला समजले की म्हातारबाबा उपलब्ध ज्ञानापेक्षा पुढचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी चालता झाला...अर्थातच मोक्षाच्या दिशेने...

जमलीय कथा पंत...सफाई येईलच हळूहळू....मला कथा गूढ न वाटता फिलॉसॉफीकल वाटली.

पुढील लेखनास शुभेच्छा!!!

पंत, खूप आवडली.
विशेषतः शेवट.
इतकी वर्ष डोक्यावर फिरतं चाक घेऊन उभा राहिल्यावर त्यातून मुक्त झाल्यावरही म्हातारबाबा
हाव सोडू शकत नाही.

मान गये गुरू...... !!
आवडली...
शेवटी दोन अर्थ निघताहेत. एक तर त्या वृद्धाची लालसा अजूनही संपलेली नाही किंवा कणखर म्हणतात त्याप्रमाणे अजून ज्ञानप्राप्तीची लालसा ! पण दुसरा अर्थ थोडा निरर्थकच वाटतोय....
कारण वृद्धाला झालेला आत्मबोध पाहता...
<<" हः ...आयुष्य ... आयुष्य निरर्थक आहे...काहीच ध्येय नाही... गंतव्य नाही मित्रा...बस्स जगत रहाणे ...बस्स ... काहीच अर्थ नाही ... मी बोलतो ...तु ऐकतो निरर्थक ... ऐहिक सुख उपभोगणे ...हा असा शाप भोगणे ...निरर्थक ... ज्ञान प्राप्ती होणे ...न होणे दोन्ही निरर्थक ...ज्ञान आणि अज्ञान काय रे शेवटी... वृत्तीच ना ... दोन्ही समानच .. मुळातच आपल्या अस्तित्वाला कारणच नाही हे समजुन जगणे अन ते तसे न समजता गुराढोरांसारखे आहे त्यात सुख मानुन अज्ञानात जगणे ....दोन्हीही निरर्थक ....असो...एखादी गोष्ट समजुन करणे हे न समजता करण्या पेक्षा श्रेष्ठ असते हे बोलणे ही निरर्थक.....>>>>
अजून काही ज्ञानाची त्याला अपेक्षा असेल हे थोडे न कळण्यासारखे आहे. Happy

मस्तच पंता....!
असं काही तरी लिहीत जा रे ! च्या मायला !
बरं ज्या मूळ गोष्टीचा बेस घेतलास तिच्यात शेवटी एक वाक्य आहे-
अतिलोभाभिभूतस्य चक्रं भ्रमति मस्तके !
पण ती कथा अशी पुढे वाढवलीस ती कल्पकता आवडली.
म्हातारबाबाच्या तोंडची काही वाक्यं बर्‍याच गोष्टींची आठवण करून देतायत Happy
गेले ते दिन गेले !! Sad

पंत,
विचार करायला प्रवृत्त करणारं छान लेखन !
म्हातारबाबाने उद्धवच्या डोक्यावर ते चक्र दिलं.
तुम्ही ’संवाद’ द्वारे वाचकांच्या डोक्यात विचारचक्र गरगरवलंत ..... Happy

“मला कथा गूढ न वाटता फिलॉसॉफीकल वाटली.” या कणखर यांच्या विधानाशी मी सहमत. या कथेतून अनेक अर्थ काढता येतील, वेगवेगळ्या प्रकारे interpretations होणं शक्य आहे. एकाने अमुक एक अर्थ काढला तर दुसरा "हे असं नसून तसं आहे" हे सहजगत्या म्हणू शकेल. असो .... मला जे वाटलं ते खालीलप्रमाणे :

ही कथा ’रूपक’ आहे असं वाटतं. चढत्या क्रमाने आसक्ती असलेले हे चारजण. सोनं, चांदी, हिरे यावरून हे जाणवतं. उद्धवची आसक्ती फार टोकाची असल्याने सुखाचा शोध घेता घेता तो दु:खाच्या अधीन झाला. म्हातार्‍याबाबत हेच घडलं असावं. म्हातार्‍याच्या डोक्यावर ते चक्र भिरभिरायला लागल्यावर प्रदीर्घ कालावधीत त्याला ज्ञानप्राप्ती झाली वगैरे बोलायला ठीक पण "मी सुटलो" हीच भावना त्याच्या मनात आली असावी. आणि म्हणूनच तो (मोरपीस कुरवाळत) जीवन म्हणजे सुखाचा शोध हेच अंतिम सत्य याची ग्वाही देत हिमालय शिखराच्या दिशेने मार्गस्थ झाला. त्याआधी त्याने केलेली, "हे निरर्थक, ते निरर्थक" इ.इ. विधाने निव्वळ फसवी किंवा मनाचं कसंबसं समाधान करण्यापुरतीच. “अन एक अर्थहीन शांतता भरुन राहिली” या वाक्यावरून हेच प्रतीत होतं.

मनुष्य सुखप्राप्तीसाठीच जीवन जगतो, हे चिरंतन सत्य. सुखाची आसक्ती ही जीवनप्रेरणा. सर्वसामान्यांना, वैयक्तिक आणि आपल्या कुटुंबापुरती सुखाची आसक्ति तर असामान्यांना, संत-महंतांना समाजाच्या सुखाची आसक्ति. विरक्ती देखील, सर्व मोहातून मोकळं होऊन मोक्ष, स्वर्ग इ. सुखद कल्पनांप्रत पोहोचण्यासाठी निर्माण झालेली एक प्रकारची आसक्तिच की ! असो ... विषय थोडासा भरकटला.

मोरपीस पडलं, सुखाचा मार्ग सापडला यावरून कानेटकरांच्या एका नाटकातला संवाद आठवला "आपलं सुख आपल्याच पायाखालच्या जमिनीत उगवतं. आपण मात्र त्यावर पाय देऊन उभे राहतो, आणि दृष्टी लावतो दूर क्षितिजाकडे.... मग सुरू होतात सुखाच्या शोधाचे वांझोटे प्रयोग"

फारच लांबलचक(पकाऊ) प्रतिसाद झालाय असं वाटतंय.
पंत, तुम्ही मस्त लेखन केलंत. पण निव्वळ आमच्या डोक्यावर हे विचारचक्र देऊन (म्हातारबाबासारखे) मोकळे होऊ नका. या सार्‍याची उकल करणारं, तुमच्या उत्तराचं मोरपीस सुयोग्य वेळात या धाग्यावर पडावं ही आग्रहाची विनंती.

पूर्वी कुठेतरी वाचली होती ही कथा... शब्द तुझे असले तरी कथा तुझी नाही हे निश्चित... मला फार पूर्वी माझ्या आजोबांनी वाचून दाखवलेली आणि कुठेतरी वाचलेली पांडवपुराणात किंवा आणखी कुठेतरी वाचलेली आठवतेय... तुझी शैली छान आहे... Happy

भुंग्या त्याने फुलवली असेल ती आणखी कल्पनाविलासातून... संवादही थोडा वेगळा आहे... पण कथा डिट्टो आहे... अगदी तो शेवटी मोरपीस घेऊन जातो तेही... Happy

पंत, छान जमली आहे कथा, लिखाणही छान आहे.

तो म्हातारा शापातून मुक्त झाल्यावरही घरचा मार्ग न पत्करता पुन्हा हिमालयाच्या दिशेनेच निघतो "मोरपीस घेऊन"...... "एंडलेस ड्रीम्स" ते हेच...... हे थोडंसं स्पष्ट करता आलं तर बघ.>>> भुंग्याला मोदक. म्हणजे नेमकं काय म्हातारबाबाची मोक्षाकडे वाटचाल की लोभाकडे..?

की हा 'समज' वाचकाच्या स्वाधिन..?

ठमे अनुमोदन... मी पण तेच लिहीणार होते आता ....... :)...

मी लहापणीच गोष्टींच्या पुस्तकात वाचलेली Happy

धन्यवाद मित्रांनो ...

उकाका ,
आपल्या प्रतिसादाला संध्याकाळी सविस्तर उत्तर देत आहे !
(मला बरेच काही लिहायचे होते अजुन त्या कथेत ...पण मलाच नचिकेत- यमाचा संवाद असल्याचा फील यायला लागला म्हणुन कथा आवरती घेतली १.)

ठमे रश्मी , मी ज्या कथेचा रेफरन्स वापरलाय ती पंचतंत्रातली आहे ...त्याचा शेवट " अतिलोभाभिभुतस्य चक्रं भ्रमति मस्तके | " असा आहे अर्थात अति लोभी अशा त्याचा डोक्यावर चक्र फिरायला लागले .....हे मी कथा लिहायचा आधी भुंग्याला सांगितले आहे ...चैतन्यलाही माहीत आहे ..(ह्या कथेचा रेफरन्स दिला नसता तर कथा कळाली नसती) ....पण तिथुन पुढे मी लिहिले आहे ते संपुर्ण जेन्युईन आहे ....यात काहीही साहित्यचौर्य नाही . असल्यास पुराव्या आधारे दाखवुन ध्यावे ...प्रायश्चित्त म्हणुन "येथुन पुढे लिहिणे थाबवेन "....आणि इतका जोरदार "खयाल टकराना " कोणाशी झाले त्या लेखकाला भेटायला आवडेल Happy
.
.
पुरावा न देता आल्यास जाहीर माफी मागावी व येथुन पुढे असले गंभीर आरोप करायच्या आधी पुरावे जमवावेत ! Proud

माफी मागण्याचा प्रश्नच नाहीये.... Happy

आणि आम्ही म्हणालोय की कथेचा गाभा सेम आहे........

जसे बॉलीवुड वाले हॉलीवुड मधुन मुव्ही आणतात तसं....... Proud

तू फक्त गोष्टीच्या मधे - पुढे आणि मागे तुझे विचार लिहीलेत ........ असो.

आणि हा गंभीर आरोप वगैरे नाहीये... हो पण तुला घ्यायचाच असेल तर घे Proud

रश्मे... मला अगदी हेच म्हणायचं होतं मला... मोदक तुला..
जुन्या बाटलीत नवी दारू भरल्यासारखं... Proud
पंता, बाकी तुला स्वतःच्या आणि वाचकांच्या अकलेबद्दल जरा जास्तच गैरसमज आहेत, असं दिसतं... असोत बापडे... आम्हाला काय त्याचं? Wink

मला असं वाटतं की जगात २ प्रकारची माणसं असतात ...पहिली ..स्वप्न पाहुन त्यांच्या पुरततेसाठी अविरत कष्ट घेणारी ...आणि इतर ...ही कथा पहिल्या प्रकारच्या माणसांबद्दल आहे . (आधी क्लीयर केले आहेच की कथा लिहिताना पंचतंत्रातल्या "चक्रं भमति मस्तके " ह्या कथेचा पाया वापरलाय ...शिवाय जीएं ची " रत्न" ही कथाही डोक्यात फिरत होती आणि खूप पुर्वी एका जिवलग मित्राशी झालेल्या अनेक चर्चेतली काही वाक्ये वापरली आहेत ).
.
.
एखादा माणुस आयुष्यभर त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करत असतो ...अन शेवटी शेवटी लक्षात यायला लागतं की आपण ज्या स्वप्ना मागं धावलो( ते हाताशी येत असताना )लक्षात येतं आपण कित्ती काय गमावलय(ह्याचं रुपक आहे ते गरगर फिरणारं चक्र डोक्यावर फिरायला लागल्यावर उध्द्वाच्या डोक्यात आलेले विचार ) ( लोकांच माहीत नाही किमान मलातरी असं होतं ) मग कुठतरी खोलवर मनात दडलेलं वाक्य बाहेर येतं " कशाला उगाच येवढा आटा पिटा केला ? साधं सोप्पं आयुष्य जगली ती माणसे काय वाईट आयुष्य जगली ?( आणि उध्दवाचे इतर प्रश्ण भंडावुन सोडतात ...)
मग मनातच अजुन जरा जास्त खोलवर दडलेली उत्तरं बाहेर यायला लागतात ...(ती सारी म्हातार्‍याच्या तोंडची स्पष्टीकरणं )

.
.
पण म्हातारा शेवटी वागतो की "ते मोरपीस घेवुन पुढे चालायला लागणे " हे म्हणजे मंदार म्हणतो तसे "इतकी वर्ष डोक्यावर फिरतं चाक घेऊन उभा राहिल्यावर त्यातून मुक्त झाल्यावरही म्हातारबाबा
हाव सोडू शकत नाही."
नाही विशाल म्हणतो तसे "ज्ञानप्राप्तीची लालसा" हे ही नाही ...

तो म्हातारा " हे निरर्थक ते निरर्थक म्हणतो " हे बोलणे ही निरर्थक आहे हे नक्कीच त्याला कळतय ... मग असं नेती नेती करुन जी शांतता राहते तीही अर्थहीन !! ...आता ह्या सार्‍या बोलण्या पार राहिला तो मोक्ष ..."अनुर्वाच्च समाधान"" ...( ते असे कथेतुन मांडणे इज नेक्ष्ट टू इम्पॉसीबल Sad इथे अनुभवच सार !)...तो म्हातरा आता ते अनुभवतोय !! आणि म्हणुनच
त्या म्हातार्‍याच्या त्या कृती चा अर्थ इतकाच की " आता त्याला संपुर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली आहे अन "कर्मत्याग हेही एक कर्मच " हे त्याला कळालय ...आता त्याला सुखाची संपत्तीची .अन ज्ञानाचीही..अपेक्षा नाही..म्हणजे नेमकं काय म्हातारबाबाची मोक्षाकडे वाटचाल की लोभाकडे..? >>> कुठेच नाही ! चालत राहणे हेच त्याचे कर्म !

..आता फक्त कर्मासाठी कर्म!!

असो ! अधिकार नसता बर्‍याच गहन विषयांवर बरेच बोलुन गेलो ...पण ते सारे निरर्थक
.
.
समर्थ म्हणतात तसे ..शब्द म्हणजे फलकट ..लक्ष्यांशच सार ...!!

... अंतर्स्थितिचिये खुणा ! अंतर्निष्टची जाणती !!

जय हो !

सर्वांचे आभार ! भुंग्याचे विशेष आभार ! चैतन्य , भर्तुहरीच्या जीवनक्रमावर एक कथा मनात आहे ..कधीतरी बोलुया नक्की !!

________________________________________________________
पण कथा डिट्टो आहे... अगदी तो शेवटी मोरपीस घेऊन जातो तेही>>>
हिकडचं घेवुन तिकडे स्वतःच्या नावार लिहिणे ह्याला साहित्यचौर्यच म्हणतात ..आणि जगाच्यालेखी हा गुन्हा आहे.
.
.
तेव्हा रश्मी , ठमे...
माझी तुम्हा दोघीनाही नम्र विनंती आहे " जिथे कुठे ही कथा तुम्हाला आधी वाचल्याचे आठवते त्याची लिन्क किंव्वा स्कॅन मला पाठवा . एकदा हा सुर्य हा जयद्रथ होवुन जावुदेच !
.
.
आता याकथेवर तुमचा पुढचा प्रतिसाद "त्या कथेची स्कॅनची लिन्क " हाच असु द्या ! उगाच तोंडाच्या वाफा नकोत Happy

बाकी ठमे माझी अक्कल काढलीच आहेस तर हे घे Proud

" ये नाम केचिदिह प्रथयन्त्यवज्ञा !
जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः!
उत्पस्यतेहि मम कोपि समानधर्म:!
कालोह्यं निरवधीर्विपुलाच पृथ्वी: " उत्तररामचरितम् - भवभुती: !! Light 1

पंत, का आपली एनर्जी वाया घालवताय........ Wink

मी वरचे ठमे आणि वाघीणीचे प्रतिसाद वाचून तिनदा प्रतिसाद लिहायला घेतले होते आणि लिहिलेले खोडून टाकले. विचार हाच केला की तुझं स्पष्टीकरण येईलच, आपण वाद न चिघळवलेला बरा.

असो. नव्या कथेवर काम करा...........

एकदा लिहून वाचकांच्या हाती सोपवलं की त्यांना प्रतिसाद द्यायला मोकळं ठेवावं......

पु.ले.शु.

प्रसादराव,

१. कथा आवडली. आज नीट वाचली. विषय गंभीर आहे. म्हणजे कथा ओरिजिनली फक्त एक कथाच आहे, पण कथेतील पात्रांनी छेडलेले विषय फार गंभीर आहेत.

२. मलाही शेवट अधिक स्वच्छ व्हायला हवा होता असे वाटले. पण ते मला वाटणे व प्रत्यक कथाकाराला वाटणे / न वाटणे यात फरक आहेच.

३. ही कथा आपण पुढेही नेऊ शकाल असेही वाटले.

४. साहित्यचौर्य वगैरे आरोप कुणी करावेत ह एक प्रश्नच आहे. निदान स्वतःचे काहीतरी लिहावे (ज्यात फक्त आयुष्यात आलेले अनुभव इतकेच नसेल तर कल्पनाविलासही सशक्त असेल) आणि मग नीटनेटके आणि कल्पनाविलासयुक्त लेखन केलेल्याला काही आरोपांनी बळी ठरवावे.

काहीतरी स्वतःचे म्हणून सांगू शकाल का एकदाच
करताय रोज नुसती धमाल, अगदी खुशाल खुशाल

अशी परिस्थिती आहे बहुतेकांची!

तेव्हा अशा आरोपांकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून पुढे लिहायला घ्यावेत अशी विनंती!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

पंत तुमी काय बी केलं तरी तुमाला ईरोद व्हणार बगा...

तवा, ईरोदास न जुमानता जोरकस इरादा ठिवून लिवंत र्‍हायचं...भ्यायची काय बी गरज न्हाय!!

पंत लई झ्याक लिवलंय बगा....कणखररावास्नी कम्प्लीट अनुमोदन
कुत्ता भौके हाथि चाले ही हिन्दी मधली म्हन लक्शात ठेवायची बगा

Pages

Back to top