आत्म्याचा इतिहास
त्याला परवा निक्षून सांगीतलं मी,
"आज मला बोलायचंय तुझ्याशी,
गंभीरपणे, काही मूलभूत गोष्टींविषयी."
त्याने, नेहमी सारखं मोनालिसा स्मित केलं.
"ठीक तर.मला सांग तुझा इतिहास.
तो कळल्याशिवाय मला तू कसा समजणार?"
" इतिहासाला सुरुवात असते, शेवट असतो..
कारण इतिहासाचा सबंध काळाशी असतो ना ?"
" त्यात नवीन ते काय? पुढे बोल."
" काय बोलू कप्पाळ? तुला समजतंय का,
काळ म्हणजे काय संकल्पना आहे?
मी आणि काळ यांचा सांधा कुठे जुळलाय?
मग मला कसा असेल इतिहास ?"
"कसं शक्य आहे ते ? या विश्वांत सगळं,
म्हणजे अगदी सगळं, कालसापेक्ष असतं, खरं ना ?
काळाचा संदर्भ नसेल तर आस्तित्वहि नसेल. मान्य ?"
" पण मला आहे की आस्तित्व? तू तर बोलतोयस माझ्याशी? "
" तू तर म्हणतोस की काळ, काम, वेग
कशाशीहि तुझा संबंध नाही? अशक्य."
" का ? तू जीवंत आहेस की नाही ?"
" हा काय प्रश्न झाला?अर्थातच आहे. "
" कशावरून ?"
" म्हणजे काय ? मी बोलू-ऐकू शकतो,
नाचू-गाऊ, हिंडू-फिरू शकतो,
स्पर्श, गंध कळतात मला. "
" कशामुळे ?"
" माझ्या कुडीत आहे प्राण, चेतना, त्यामुळे. "
"उत्तम. म्हणजे चेतनेचं आस्तित्व तुला मान्य आहे ?"
"नुसतं मान्यच नाही , प्रत्यक्ष अनुभवतोय ना मी?"
" मग सांग बघू, या चेतनेचा इतिहास मला.
तुझ्या कुडीत प्राण संचारला, त्यापूर्वी कुठे होता तो ?
उद्या समजा तू मेलास्, तर कुठे जाईल तो ?
नाही ना सांगता येणार तुला? म्हणजेच,
चेतनेला आस्तित्व आहे, ती तू अनुभवतोस, पण
तिचा इतिहास तुला माहीत नाही ? खरं?
मग माझ्याच बाबतीत इतिहासाचा हट्ट का ?"
.. याचं हे नेहमीचंच.
एका ठिकाणी बोलणं सुरू करावं
तर भलतीकडेच वळवतो गाडी.
माणसानं बोलावं तरी कसं याच्याशी ?
-बापू.
प्रश्न
बापु,
प्रश्न लिहीलात मग उत्तर कुठाय?
मोनालिसा स्मित आणि संवाद सहीच!
आत्म्याचा इतिहास
धन्यवाद.
उत्तर ज्याचं त्यनं शोधायचं. कविता कराव्या, गाणी गावी, चित्रं काढावी, नाचावं, मिळेल त्या वाटा तुडवत जावं. 'त्या'च्याशी असंच बोलावं.
बापू
सुंदर!
सुंदर उत्तराबद्दल धन्स!
नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.
चिन्नु, धन्यवाद! बापू
चिन्नु,
धन्यवाद!
बापू