कार्यालयीन कामकाजातून वेळ काढून नाशिकला मामाच्या गावाला जायचा उद्देश यावेळी निराळा होता. तो म्हणजे सांदण दरी ला भेट द्यायचा. अर्थात पूर्वीच नियोजन केल्याप्रमाणे २४ एप्रिल ला मी आणी माझा मामेभाउ हृषीकेश व आमचा मित्र हेमंत देशमुख असे तिघे पहाटे ५.३० वाजता नासिक वरून निघालो ते हृषीकेशच्या चारचाकीने. नासिक-मुंबई महामार्गाने घोटीच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. थोड्याच वेळात डावीकडे औंढ्या, पट्टा, डुबेरे व उजवीकडे अंजनेरी,डांग्या, घारगड, कावनई असे किल्ले दिसू लागले. समोरच कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगडाची सह्याद्रीतील सर्वोच्च रांग दिसू लागली.
आम्ही घोटीच्या अलीकडून डावीकडे वळण घेतले व मोरधन किल्ल्याच्या कातळभिंतीच्या शेजारून असलेल्या सडकेने बारी गाठले. बारी हे कळसूबाईच्या पायथ्याचे गाव. आसपासच्या सर्व शिखरांत कळसुबाई आपले सर्वोच्च शिखर त्यावरील मंदिरासह मिरवत होती.
आम्ही खालूनच त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो ते भंडारदरा धरणापाशी असलेल्या शेंडी गावात पोहोचलो.
इथून सांदण दरीला दोन रस्ते जातात. एक शेंडीच्या अलीकडून घाटघरच्या मार्गाने साम्रद गावाला जातो (२३ किमी) व दुसरा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला वळसा घालून घनचक्कराच्या पदरातून रतनवाडीच्या मार्गाने साम्रदला पोहोचतो (२६ किमी). आम्ह्लाला अर्थातच रतनगडाच्या पायथ्याल्या असलेल्या रतनवाडीच्या शिल्पसमृद्ध श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घ्यावयाचे असल्याने आम्ही रतनवाडीच्या मार्गाने निघालो.
हा रस्ता निर्विवादपणे देखणा आहे. घनचक्कराच्या कडेने, तलावाच्या बाजूने कधी दाट झाडीतून तर कधी उघड्या आभाळाच्या साक्षीने ह रस्ता चढ उतार घेत वळणे वळणे घेत जातो. वाटेने कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगडाची रांग, बाजूलाच घनचक्कर रांग, त्याचे मुडा हे सह्याद्रीतील तिसर्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर हे रौद्र दर्शन देतात. रतनगड व खुट्टा सुळका कायमच साथीला असतात. ३० मिनिटातच रतनवाडीला पोहोचलो.
अमृतेश्वर मंदीर व त्याच्या जवळच असलेली कोरीव काम असलेली पुष्करणी (कुंड) आमच्या पुढ्यातच होती. मंदीराच्या पाठीमागेच रतनगड व त्याचा खुट्टा सुळका उठावला होता.
पुष्करणी ही अतीशय देखणी व शिल्पसमृद्ध आहे. शंख, चक्र, गदाधारी विष्णू च्या अनेक प्रतिमा आहेत. शेषशायी भगवान विष्णू व लक्ष्मी तसेच गजाननाचीही प्रतिमा आहे.
पुष्करणी पाहून आम्ही श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घेतले. १२०० वर्षांपूर्वीचे हे अतीशय देखणे हेमाड्पंथी कोरीव मंदीर आहे. मंदीराला पुर्वाभिमुख मुख्य द्वार व पश्चिमाभिमुख दुसरे द्वार अशी २ द्वारे आहेत. विविध शिल्पाकृतींचा खजिनाच इथे भरला आहे.
हे सर्व डोळ्यांत व कॅमेर्यात साठवून चहा, पोहे खावून आम्ही आमच्या मुख्य उद्दिष्टाकडे म्हणजे सांदण दरीकडे जाण्यासाठी साम्रदकडे निघालो( रतनवाडीपासून साम्रद ५ किमी) थोड्याच वेळात तिथे पोहोचलो. इथेतर सह्याद्री आपले राकट सौंदर्य दाखवत उभा होता. रतनगड, खुट्टा यांचे एका वेगळ्याच बाजूने अतीशय प्रेक्षणीय दर्शन होत होते. बाजूलाच आजोबाचा महाकाय पर्वत आपल्याला आजोबा का म्हणतात ते दाखवून देत होता. कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगड पाठीमागच्या बाजूने रौद्र दर्शन देत होते.
साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आहे. तिथे गाडी लावून आम्ही खंडूमामा यांस सांदण दरीची वाट दाखवण्यास बरोबर घेतले. १०/१५ मिनिटातच कातळाच्यासड्यावरून आमची वाट दाट झाडीत शिरली. व थोड्याच वेळात आम्ही एका घळीच्या मुखाशी आलो. सांदण दरीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे.
सांदण दरीचे मुख.--
घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. दगडांनी तो बंदिस्त केल्यामुळे अतिशय निर्मळ असे ते थंडगार असे ते पाणी पिवून आम्ही उल्ह्सित झालो. घळ उतरायला लागलो. सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आम्ही आत दरीच्या नाळेत प्रवेश केला.
आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय निरुंद नाळ होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती.
पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला. साधारण १.५ फूट खोल १२/१३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून आम्ही कौशल्याने मार्ग काडून पलीकडे गेलो. आता तीव्र उतार सुरु झाला होता. नाळ अधिकाधिक अरूंद होत होती. कुठेही सपाट मार्ग नव्हता. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षर्शः तिथे खच पडला होता.
आता आमचा मार्ग दुसर्या मोठ्या पाणसाठयाने अडवला होता. एका बाजूला ४.५ फूट खोल पाणी दुसर्याबाजूला ३ फूट खोल पाणी होते. हेही कधीही आटत नाही कारण सुर्य इकडे कधीही पोहोचू शकत नाही. अतिशय थंडगार अश्या त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार हा शब्दातीत आहे. प्रत्यक्ष अनूभवातूनच तो घ्यावा.
अजूनही आमचा नाळेतूनच प्रवास चालला होता. जवळ जवळ १.५ किमी अश्या ह्या अरूंद नाळेच्या टोकाशी पोहोचायला ३० /४० मिनिटे लागतात. दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाश्याच्या छोट्या तुकड्यापलीकडे काहीही दिसत नाही.
आता आम्ही नाळेच्या टोकाशी आलो होतो. आत इथून सह्य पर्वताचे उग्र दर्शन होते होते. ३५०० फूट सरळ तुटलेले कडे व रतनगडाचा कडा प्रेक्षणीय दिसत होता. ही नाळ पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जावुन मिळते. अर्थात आम्ही त्याच्या वाटेला गेलो नाही हे सांगणे न लगे.
१५/२० मिनिटे तिथे थांबून आम्ही मागे फिरलो. परत त्या पाण्याचा थरार अनुभवला. दगडगोट्यांवरून दडस दडस चढून आम्ही घळीच्या बाहेर पडलो.
अप्रतीम अश्या ह्या निसर्गनवलाने आम्ही अवाक झालो होतो. ही अरूंद घळ पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रीत परीणामामुळे बनली असावी. पूर्ण सांदण दरीत कधीही उन पोहोचत नाही त्यमुळे कायमच सुखद गारवा असतो.
आता परत आजोबा, रतनगड, खुट्टा , कळसुबाई रांगेचे डोळे भरून दर्शन घेतले.
साम्रद गावात अचानक छोटे चक्रीवादळ आले.
साम्रद वरून घाटघरच्या वाटेने निघालो. घाटघरचा रौद्र कोकणकडा व पायथ्याचा तलाव व त्यावरील विद्युत प्रकल्पाचे इथून सुंदर दर्शन होते.
तिथे थोडावेळ थांबून आम्ही आता धरणाच्या दुसर्या बाजूने निघालो. कळसूबाईच्या मागच्या पदरातून वळसा मारून परत शेंडी गाव व तिथून बारी, घोटी वरून आम्ही ३ च्या सुमारास नाशिकला पोहोचलो ते परत पुन्हा इथे यायच्या विचारानेच.
प्रकाशचित्रे
2) सांदण दरी
अरे लै भारी!! फोटु तर एकदम
अरे लै भारी!! फोटु तर एकदम मस्तच!!!
अप्रतिम. मी कधी ऐकलेही
अप्रतिम. मी कधी ऐकलेही नव्हते. (त्या भागात भटकलो आहे तरी )
सहज विचारतो. अलिकडे कुणाच्या लेखनात रंधा धबधब्याचा उल्लेखही नसतो. आता आटला का तो पूर्ण ?
तो आटत नाही कधी. धरणातून
तो आटत नाही कधी. धरणातून आवर्तन सुरु झाले कि तो पण सुरु होतो.
मस्त फोटू नि वर्णन.. माझा
मस्त फोटू नि वर्णन.. माझा राहूनच गेला आहे हा ट्रेक..
या दरीचा उल्लेख बर्याच ठिकाणी संधन व्हॅली असा केला जातो. नक्की कोणते ??
संधान व्हॅली हा आंग्लाळलेला
संधान व्हॅली हा आंग्लाळलेला शब्द वाटतो. मराठीकरण करून सांदण दरी.
वाह सुरेख वर्णन आणि सुंदर
वाह सुरेख वर्णन आणि सुंदर प्रचि. पण ती सांदणदरी जरा भितीदायक दिसते. असं वाटतं की कोणत्याही क्षणी ते कातळ जवळ येऊन ही भेग बंद होईल.
ओमान देशात पण अशीच एक पण जरा
ओमान देशात पण अशीच एक पण जरा रुंद दरी आहे. त्या भागाचे नाव नाखल. त्यातून एक नदी वाहते. त्या अरुंद दरीतून इजिप्शियन लोक फटाक्यातले बाण सोडत असत. मस्त आवाज घुमायचा त्याचा. तिथे त्या सरकारने चांगल्या सोयी केल्या आहेत.
सही फोटो सगळे.. गेली २-३
सही फोटो सगळे.. गेली २-३ वर्षे ह प्लॅन बनवतोय पण योग येत नाहीये... ह्या वर्षीतरी जमतेय का बघूया..
तशी ही सांधण व्हॅली हल्लीच जरा जास्त प्रसिद्ध झालीय...साम्रद गावातील लोकपण आता तिकडे गेले की ह्याचीच माहिती देतात.. पण साम्रद गावातून रतनगडला जायची वाट विचारली की वाट मोडली आहे असे सांगतात असो...
अप्रतिम!!!! दगड, रोमा वाचलं
अप्रतिम!!!!
दगड, रोमा वाचलं ना??
कधी काढायच्या गाड्या?
जबरी रे... रतनगडला गेलोय ..पण
जबरी रे...
रतनगडला गेलोय ..पण या मार्गाने नाही.
सांदन दरीतुन रतनगड करायचा मानस आहे बघुया कधी जमते.आनंदयात्री,यो नक्की करुया..
हा आमचा अनुभव .. http://www.maayboli.com/node/12976
पण साम्रद गावातून रतनगडला
पण साम्रद गावातून रतनगडला जायची वाट विचारली की वाट मोडली आहे असे सांगतात असो...
>> मागच्या वर्षी एका माणसाने त्या वाटेने हा ट्रेक केला होता...
फकस्त मध्ये कुठेतरी नाडा (दोर) घेऊन चढायला लागते...
खूप सुरेख वर्णन व फोटो. १२७
खूप सुरेख वर्णन व फोटो. १२७ सिनेमाची आठवण आली रे बाबौ ! धन्य तो सह्याद्री. तुम्हाला गिरीरोहणास अनेक शुभेच्छा.
बापरे! धन्य ती सह्याद्रीची
बापरे!
धन्य ती सह्याद्रीची रौद्रता! धन्य सांदणदरी!! आणि धन्य तुम्ही लोकं!!!
सर्वच बेहद्द आवडले. तिथे जावेसे वाटू लागले.
अप्रतिम! तिथे जावेसे वाटू
अप्रतिम!
तिथे जावेसे वाटू लागले. >>> अगदी अगदी
मागच्या वर्षी एका माणसाने
मागच्या वर्षी एका माणसाने त्या वाटेने हा ट्रेक केला होता...फकस्त मध्ये कुठेतरी नाडा (दोर) घेऊन चढायला लागते>>>>>रोहित आम्ही हा ट्रेक केला होता ३ वर्षांपुर्वी.. करोली घाट ते रतनगड...साम्रद वरुन त्रंबक दरवाजामार्गे रतनगडावर पोचायला २ तास लागतात आणी वाटेत कुठेही दोराची आवश्यकता भासत नाही...
वाटेत कुठेही दोराची आवश्यकता
वाटेत कुठेही दोराची आवश्यकता भासत नाही...>>
अरे वा सही म जायलाच पाहिजे...
अजुन एक ...त्या करोली घाटातुन आजोबा पर्वताच्या पायथाशी जायला वाट आहे का? म्हणजे ती वाट त्या आश्रमापर्यंत घेऊन जाते अस एकलय्.म्हणजे येथुन तुम्ही डायरेक्ट कोकणात (आसनगाव...पण ते अंतर खुप आहे)उतरु शकता.
अन तेथे एक दरी आहे त्याच्यात डोंबिवलीच्या एका ग्रुपने रॅपलिंग केल होत अस आम्हाला रतनगडला भेटलेल्या एका ट्रेकरने सांगितल.
परत परत इथे यावेसे वाटतेय. या
परत परत इथे यावेसे वाटतेय.
या अरुंद दरीला खिंड असा शब्द आहे ना ? इतक्या लांबीची आणि खोलीची खिंड, महाराष्ट्रात आणखी कुठे असल्याचे कधी वाचले नाही.
दिनेशदा... हि बघा ती दरी
दिनेशदा... हि बघा ती दरी ...
निसर्गाचा चमत्कार... अजुन काय बोलणार...
हा फोटो आंतरजालावरुन साभार..

मुळ विषयाला थोडे
मुळ विषयाला थोडे विषयांतर...
त्या करोली घाटातुन आजोबा पर्वताच्या पायथाशी जायला वाट आहे का>>>> नाही.... करोली घाट खाली कोकणातील डेणे गावात उतरतो. डेण्यावरुन आजोबाला जाता येते.....
साम्रद वरुन तीन घाट खाली कोकणात उतरतात.. करोली घाट (करवली घाट) - साम्रद ते डेणे, चोंढा घाट - साम्रद ते घाटघर मार्गे चोंढा आणी तिसरा साम्रद ते डेणे बाण सुळक्याची वाट
आजोबाच्या आश्रमापर्यंत उतरायला रतनगडापलीकडील कुमशेत गावावरुन वरुन डायरेक्ट वाट आहे त्याला कुमशेत घाट म्हणतात.
अन तेथे एक दरी आहे त्याच्यात डोंबिवलीच्या एका ग्रुपने रॅपलिंग केल होत >>> त्यांनी बहुतेक बाण सुळक्याच्या वाटेने रॅपलिंग केले असावे..
आभार रोहित. पण ही दरी
आभार रोहित.
पण ही दरी पाण्यापेक्षा, भूगर्भातील हालचालीनी झाल्याची शक्यता जास्त आहे (मेकॅनोज गोल्ड मधे दाखवलेय तसे ) पाण्याने झाली असती, तर आजही तिथे वाहती नदी असती. (हा आपला माझा अंदाज)
आज जिथे ठोसेघरचा धबधबा आहे तो भाग पण असाच दिसतो. पण बराच रुंद आहे म्हणा.
काहीही म्हणा, जायलाच पाहिजे तिथे आता. त्याचा सिंहगड होऊ नये हि इच्छा.
बरोबर आहे. भूगर्भीय
बरोबर आहे. भूगर्भीय हालचालींमुळे प्रस्तरभंग होउन ही महाप्रचंड घळ निर्माण झाली असावी. एकदा इथे जा नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव मिळेल.
सुरेख वर्णन आणि फोटो
सुरेख वर्णन आणि फोटो
पावसाळ्यात तर शक्यच नसेल इथे जायला.
डोंगरवेडा...... मनापासून
डोंगरवेडा...... मनापासून धन्यवाद.
तू इथे वर्णन केलेली इतर सर्व या भागातली ठिकाणं बघितली आहेत, पण सांदण दरीबद्दल कल्पनाच नव्हती...... फोटो पाहून आणि रूट वर्णन वाचून एवढे नक्की की फारच जवळ पोचूनही ही आम्ही पाहिलेली नाही.......
पण आता नक्कि जाईन तिथे....... पुन्हा एकदा धन्यवाद...!!!
सुरेख वर्णन आणि फोटो >>>>जबरी
सुरेख वर्णन आणि फोटो >>>>जबरी अगदी
आणखी थोडी अवांतर विचारणा-
आणखी थोडी अवांतर विचारणा- कुमशेतवरुन आजोबा माथा करुन खाली वाल्मिकी आश्रमाकडे जायला कुठल्या घाटवाटा आहेत? वेळ किती लागतो? ..आणि वाटा कशा आहेत?
योगेश करडीले नामक व्यक्तीने
योगेश करडीले नामक व्यक्तीने काही मुलांना सोबत देऊन इथे जायची व्यवस्था केली होती, त्यांनी या दरीला 'गॉर्ज' असे संबोधले होते.. आम्ही इथे स्वयंपाक केला होता..
कुमशेतवरून पाथरा घाटाने
कुमशेतवरून पाथरा घाटाने कोकणात कुंडवाडी-डेहणेला जाता येते. पण हा घाट अत्यंत अवघड आहे. दोर आवश्यक. पाथराजवळच गुयरीचे दार ही घाटवाट पण आहे. .ही पण तशी अवघडच पण पाथर्याच्या मानाने सौम्यच.दोन्ही वाटांनी ५/६ तास तर लागतातच. तसेच उंबरदार ही पण कुमशेत-डेहणेला जाणारी घाटवाट आहे. तसेच साम्रदवरून खाली उतरायला करोली घाटाव्यतिरीक्त चोंढ्या-मेंढ्या घाट (घाटघर-चौंढे) सोपी वाट, निसणी (साम्रद-साकुर्ली/डेहणे) अवघड, देवीघाट (घाटघर-चौंढे(धाकटे)) सोपी या वाटाही आहेत.
फारच सुन्दर, जावेसे वाटते.
फारच सुन्दर,
जावेसे वाटते.
डोंगरवेड्या... सांदण दरीचे
डोंगरवेड्या...
सांदण दरीचे फोटू आणि वर्णन वाचून जीव अगदी खल्लास झाला.सह्याद्रीची ओढ इतकी आहे की दोन वर्षापूर्वी नविन बाईक घेतली तेव्हा भंडारदरा,रतनगड,घाट्घर परीसर एकट्यानेच तुडवला होता..पण सांदण दरी राहीली होती.आता परत लवकरच बेत आखतो.
घाटघरचा जो कोकणकडा आहे,त्याचा काही भाग खालच्या चौंढे धरणावर २६ जुलै २००५ च्या मुसळधार पावसामुळे कोसळला होता,त्यामुळे तेथे काम करणारे जवळपास ३० मजूर मरण पावले होते.
सांदण दरीची अजून मस्त मेजवाणी घ्यायची असेल तर "भटकू पंक्या" च्या खालील ब्लोगला भेट देणे अतीआवश्यक आहे..
http://www.pankajz.com/2010/06/sandhan-valley.html
तसेच भंडारदरयाचा अजून एक जातीवंत भटक्या योगेश कर्डीले यांचे एक संकेतस्थळ..
http://www.amazingsahyadri.com/
खुप एकले होते. आज तुज्यामुळे
खुप एकले होते. आज तुज्यामुळे पाहिले. खुप सुंदर फोटो आणी वर्णन सुद्धा.