शिक्षण - जगण्याचे

Submitted by पुरंदरे शशांक on 26 January, 2011 - 04:36

ही कविता कशा संदर्भात आहे हे कळण्यासाठी -
माझ्या मुलीबाबत घडलेली घटना - १०-१२ वर्षांची असेल - भर उन्हाळा, मे महिना - दुपारी १२-१ ची वेळ - तिने अगदी तापलेल्या रस्त्यावरुन गरीब आई-मुलीला चालताना पाहिले - मुलगी पळतच होती बिचारी अनवाणी असल्याने - त्या मुलीला अनवाणी बघितल्यावर माझ्या मुलीला वाटले -आपल्याकडील एखादा जुन्या चपला देउया तिला -चपला शोधेपर्यंत त्या दोघी मायलेकी लांब गेल्या होत्या - माझी मुलगी चपला घेउन रस्त्यावर अनवाणी धावली मात्र - एका क्षणात तिला जाणवला तो ऊन्हाचा चटका - ५-६ पावले ही चालू शकली नाही ती- तेव्हा तिच्या लक्षात आले की त्या अनवाणी चालणार्‍या मुलीची काय अवस्था असेल. त्यानंतर कितीतरी वेळ ती रडत राहिली - जुन्या चपला देखील आपण देउ शकलो नाही या व्यथेमुळे - तेव्हा मला माझ्या मुलीला उद्देशून असे काहीसे लिहावेसे वाटले.

आई -बाबांचे बोट असे धरुन धरुन
चालणार कधी सुटी ही वाटत होते राहून राहून

काय ही शिकणार नीरस शाळेत जाउन
जीवन का उमगेल गणित-शास्त्र वाचून

ऊन्हात पोळणारे पाय जेव्हा दिसतात
जीवनाचा खरा धडा सुरु करुन देतात

दुसर्‍याचे दु:ख जाणता जेव्हा येईल
जीवनाच्या शिक्षणाला खरी सुरवात होईल

दुसर्‍याचे मन जेव्हा ओळखायला शिकशील
जीवनाचे कोडे थोडे उलगडायला लागशील

आता मी खूपच आश्वस्त आहे
जीवन हळूहळू तिच्यात उतरत आहे

मिळत नसेल बक्षीस, नसेल नंबर वर
संवेदनशील मन, उंचावेल जीवनस्तर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"ऊन्हात पोळणारे ...... धडा सुरु करुन देतात"

"मिळत नसेल .......उंचावेल जीवनस्तर"

........ आशय खूपच चांगला आहे.