बरेच दिवस डोक्यात घोळत होतं. आज मुहूर्त लागला.
संस्कृतातल्या काही काव्यांचा किंवा श्लोकांचा म्हणू मुक्त आस्वाद घ्यायचा हा प्रयत्न आहे. (मुक्त आस्वाद घ्यायचा आणि स्वतःचं संस्कृतज्ञान पाजळायचा:) )
नीतिशतक पूर्ण (१० भागात) लिहायचा मानस आहे.
श्री गणेशाच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडेल असा विश्वास आहे.
नीतिशतकम् |
नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक अशा शतकत्रयाचा कर्ता भर्तृहरि याच्याबद्दल बर्याच कथा आणि दंतकथा अस्तित्वात आहेत.
त्यामुळे त्या वादात न पडता नीतिशतकाला सुरुवात करूया.
नीतिशतक = नीतिविषयक शतश्लोकांचा एक संग्रह म्हणजेच नीतिशतक.
नीतिशतक हा प्रत्येकी १० श्लोकांच्या १० पद्धतींमध्ये विभागलेला संग्रह आहे. प्रत्येक 'पद्धती' मध्ये समानलक्षण असे श्लोक आहेत. नीतिशतकातले अनेक श्लोक किंवा त्यांचे शेवटचे चरण भाषणात क्वोट केले जातात.
उदा. सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयन्ते | इ.
आज मङ्गलाचरण आणि मूर्खपद्धति पाहूया.
मङ्गलाचरण- कुठल्याही शुभकार्याच्या प्रारंभी देवाला नमस्कार करायची पद्धत आहे, तसेच ग्रंथारंभी देवाला वाङ्मयरूपी नमस्कार करणारा श्लोक म्हणजेच मङ्गलाचरण.
चूडोत्तंसितचन्द्रचारुकलिकाचञ्चत्शिखाभास्वरो
लीलादग्धविलोलकामशलभः श्रेयोदशाग्रे स्फुरन् |
अन्तःस्फूर्जदपारमोहतिमिरप्राग्भारमुच्छेदयन्
श्चेतःसद्मनि योगिनां विजयते ज्ञानप्रदीपो हरः ||१|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)
अर्थ- या श्लोकात 'हराचा विजय असो' असे त्याच्या अनेक विशेषणांचा वापर करून सांगितले आहे.
कशा हराचा विजय असो? तर जो योगी लोकांच्या चित्तरूपी घरात राहतो आणि ज्ञानरूपी दीप आहे, अशा हराचा विजय असो.
चारु (सुंदर) अशा चंद्रकोरीने ज्याचा मुकुट शोभून दिसतो, ज्याने कामदेवाला अगदी लीलया भस्मसात् केले आहे, जो श्रेयप्रद आहे आणि जो आमच्या अंतरात स्फुरणार्या अपार अशा मोहरूपी अंधःकाराचा नाश करतो अशा हराचा विजय असो.
हराला ज्ञानरूपी दिव्याची उपमा दिली आहे आणि मग दिवा जे करतो (अंधाराचा नाश, दिव्यावर झेपावणार्या पतंगाचा नाश इ.) तेच हराच्या ठिकाणीही कसे आहे ते सांगितले आहे. दिवा तेजस्वी असतो तर हराच्या मुकुटात तेजस्वी चंद्र §आहे. दिव्यावर झेपावणारा पतंग भस्मसात् होतो, तर हराने कामदेवालाही तसेच भस्मसात् केले, दिवा अंधाराचा नाश करतो, तर हरही आमच्या मनातला मोहरूपी अंधार घालवून टाकतो. त्यामुळे पहिल्याच श्लोकात भर्तृहरि वाचणार्याला खिशात टाकतो !
(याच नीतिशतकाच्या मङ्गलाचरणाबद्दलही काही वाद आहेतच दुर्दैवाने. काहींच्या मते वरील श्लोक नीतिशतकाचे मङ्गलाचरण नसून वैराग्यशतकाचे आहे- कारण कामदेवाला भस्मसात् करणारा शंकर हे वैराग्याचं प्रतीक आहे म्हणून आणि नीतिशतकाचं मङ्गलाचरण खालीलप्रमाणे आहे. तेही देऊन ठेवतो. श्लोक छानच आहे. )
दिक्कालाद्यनवच्छिन्नानन्तचिन्मात्रमूर्तये |
स्वानुभूत्येकमानाय नमः शान्ताय तेजसे ||१ || (वृत्त- श्लोक)
अर्थ- स्वानुभूती, अर्थात स्वतः अनुभव घेणे हे एकमेव ज्याचे परिमाण आहे अशा परमानंदरूप तेजाला नमस्कार असो.
ते तेज कसे आहे, तर दिशा आणि काल यांच्या पलिकडचे आणि अनंतज्ञानरूप असलेले असे ते तेज आहे.
पद्धति १ - अज्ञनिन्दा (मूर्खपद्धति)
समर्थांच्या दासबोधातल्या किमान दुसर्या समासाबद्दल तरी मला असं खूप वाटतं की ती प्रेरणा त्यांना भर्तृहरीच्या नीतिशतकावरून मिळाली असावी. कारण तिथेही मूर्खलक्षण पहिल्यांदा आहे.
अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः |
ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि नरं न रञ्जयति || २|| (वृत्त- आर्या)
अर्थ- जो अज्ञ असतो अडाणी असतो त्याला सहज एखादी गोष्ट पटवून देता येते (कारण तो तुम्ही पटवून द्याल ते मान्य करेल)
जो विशेषज्ञ असतो त्याला तर अडाणी माणसापेक्षा लवकर एखादी गोष्ट पटवून देता येते (कारण तो जाणकार असतो आणि तुम्ही सांगत असलेली गोष्ट समजून घेऊ शकतो), पण जो अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाला आहे, अर्थात थोड्याशा ज्ञानाचा ज्याला गर्व आहे, त्या माणसाचे समाधान करणे (एखादी गोष्ट त्या माणसाला पटवणे) ब्रह्मदेवालाही शक्य नाही.
प्रसह्य मणिमुद्धरेन्मकरवक्त्रदंष्टाङ्कुरात्
समुद्रमपि सन्तरेत्प्रचलदूर्मिमालाकुलम् |
भुजङ्गमपि कोपितं शिरसि पुष्पवद्धारये-
-न्न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ||३|| (वृत्त- पृथ्वी)
एक वेळ धाडस करून मगरीच्या दाढेत हात घालून तिथे अडकलेले (मगरीने गिळलेले) रत्न बाहेर काढता येईल,
लाटांनी खवळलेला समुद्रही पोहत पार करता येईल,
रागाने फणा काढलेला साप एखाद्या फुलाप्रमाणे डोक्यावर धरता येईल,
पण मूर्खाचं समाधान करणं अशक्य !
लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन्
पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः |
कदाचिदपि पर्यटञ्शशविषाणमासादये-
-न्न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ||४|| (वृत्त- पृथ्वी)
अर्थ- प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे,
तृषार्ताची तृष्णा मृगजल पिऊनीहि वितळे |
सशातेही लाभे विपिनि फिरता शृंगहि जरी,
परंतू मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी | (वामन पंडित)
विश्लेषणाची गरज नसावी हास्य
व्यालं बालमृणालतन्तुभिरसौ रोद्धुं अमुज्जृम्भते
छेत्तुं वज्रमणीञ्शिरीषकुसुमप्रान्तेन संनह्यते |
माधुर्यं मधुबिन्दुना रचयितुं क्षाराम्बुधेरीहते
नेतुं वाञ्छति यः खलान्पथि सतां सूक्तै: सुधास्यन्दिभि: ||५|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)
अर्थ- मूर्ख/दुष्ट लोकांना सदुपदेश करून चांगल्या मार्गाला लावायचा प्रयत्न करणारा माणूस कोणती अशक्यप्राय गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्याचा हा श्लोक.
जो माणूस दुष्टाला सज्जनांच्या मार्गावरून चाल असा उपदेश करतो तो जणु हत्तीला कमळाच्या कोवळ्या देठांनी अडवायचा प्रयत्न करतो. जणू वज्रमण्याला शिरीष फुलाच्या दांड्याने कापायचा प्रयत्न करतो, जणु मधाच्या एका थेंबाने खारट पाण्याच्या समुद्रात गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
तात्पर्य- वरील सगळ्या गोष्टी जशा अशक्य, तसे मूर्ख्/दुष्ट माणसास सज्जन मार्गी लावणे अशक्य!
स्वायत्तमेकान्तहितं विधात्रा विनिर्मितं छादनमज्ञताया: |
विशेषतः सर्वविदां समाजे विभूषणं मौनमपण्डीतानाम् ||६|| (वृत्त- उपजाति)
अर्थ- ब्रह्मदेवाने जणू मूर्खाच्या केवळ हितासाठीच मौन नावाचं आभूषण निर्माण केलं.
हे आभूषण त्याला विशेषकरून सर्वज्ञ लोकांत वावरताना फार उपयोगी आहे, कारण ते त्याच्या अज्ञतेला झाकणारं झाकण आहे. आणि हे झाकण/भूषण हे स्वायत्त म्हणजे स्वत:च्या ताब्यातलं आहे, स्वतःच्या इच्छेने वापरता येणारं आहे.
यदा किञ्चिज्ज्ञोऽहं गज इव मदान्धः समभवं
तदा ससर्वज्ञोस्मीत्यभवदवलिप्तं मम मनः |
यदा किञ्चित्किञ्चिद्बुधजनसकाशादवगतं
तदा मूर्खोस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः || ७ || (वृत्त- शिखरिणी)
अर्थ- भर्तृहरीने इथे स्वतःलाही मूर्ख म्हणवून घेतलं आहे. ज्ञानी लोकांचा विनय आहे हा.
असो,अर्थ,
जेव्हा माझ्याकडे फार थोडं ज्ञान होतं तेव्हा मला मी 'सर्वज्ञ' आहे असं वाटायचं आणि माझं मन त्या अभिमानाने भरून गेलं होतं. मी जणू मदांध हत्तीसारखा झालो होतो.
पण जेव्हा खर्या ज्ञानी लोकांकडून मला थोडं थोडं ज्ञान मिळत गेलं तेव्हा मला समजून चुकलं की मी मूर्ख आहे,मला अजून बरंच शिकण्यासारखं आहे, आणि मग माझा गर्व ताप पळून जावा तसा गळून पडला.
कृमिकलुचितं लालाक्लिन्नं विगन्धिजुगुप्सितं
निरुपमरसप्रीत्याखादन्नरास्थिनिरामिषम् |
सुरपतिमपि श्वा पार्श्वस्थं विलोक्य न शङ्कते
न हि गणयति क्षुद्रो जन्तु: परिग्रहफल्गुताम् ||८|| (वृत्त- हरिणी)
अर्थ- क्षूद्र स्वार्थ असणारे लोक त्यासाठी वाटेल ते करताना त्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात येत नाही.
कुत्रं एक हाड चघळतंय की ज्याच्यावर माशा बसल्या आहेत, लाळेनं जे बरबटलं आहे, ज्याला अतिशय घाण वास येतो आहे.
अशात त्या कुत्र्यासमोर देवाधिदेव इंद्र जरी आला तरी ते आरामात ते हाड एखाद्या मिष्टान्नाप्रमाणे चघळत बसेल. खरोखर, क्षूद्र स्वार्थ असणार्याला त्याच्या त्या स्वार्थातला फोलपणा लक्षात येत नाही.
शिरः शार्वं स्वर्गात्पशुपतिशिरस्तः क्षितिधरं |
गिरीन्द्रादुत्तुङ्गादवनिमवनेश्चापि जलधिम् |
अधोऽधो गङ्गेयं पदमुपगता स्तोकमथवा
विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः ||९|| (वृत्त- शिखरिणी)
अर्थ- विवेकहीन माणूस कसा अधोगतीस जातो हे गंगेच्या उदाहरणाने स्पष्ट केले आहे.
गंगा विवेकहीन होती म्हणून ती आधी पृथ्वीवर यायला तयार नव्हती.
मग शंकरांच्या कोपामुळे तिला आधी स्वर्गातून शंकराच्या जटेत यावं लागलं, तिथून हिमालयावर.
मग उत्तुंग अशा हिमालयावरून खाली जमिनीवर आणि जमिनीवरून शेवटी समुद्रात जावं लागलं.
स्वर्गात होती ती समुद्रात आली. आणि तिचं हे अधःपतन अनेक मार्गांनी झालं (उदा. स्वर्गातून शंकराच्या जटेत, तिथून हिमालयावर इ.इ.)
त्याचप्रमाणे जो विवेकशून्य आहे, त्याची अधोगतीही अनेक मार्गांनी होते हे निश्चित.
शक्यो वारयितुं जलेन हुतभुक्छत्रेण सूर्यातपः
नागेन्द्रो निशिताङ्कुशेन समदो दण्डेन गोगर्दभौ |
व्याधिर्भेषजसङ्ग्रहैश्च विविधैर्मन्त्रप्रयोगैर्विषं
सर्वस्यौषधमस्ति शास्त्रविहितं मूर्खस्य नास्त्यौषधम् ||१०|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)
अर्थ- सगळ्यावर औषध आहे पण मूर्खाच्या मूर्खपणाला काहीही औषध नाही.
अग्नी पाण्याने शांत करता येतो, सूर्याचा दाह छत्री घेतल्याने कमी करता येतो, मदोन्मत्त हत्तीला अंकुशाने काबूत आणता येते आणि गाय, गाढव वगैरे प्राण्यांना काठीने आवरता येते. एखादी व्याधी असेल तर त्यावर औषध घेऊन बरे होता येते, तर वेगवेगळ्या मंत्रांनी वीष उतरवता येते. सगळ्या गोष्टींचं शास्त्रशुद्ध निराकरण करता येतं, पण मूर्खाच्या मूर्खपणावर औषध नाही !
येषां न विद्या न तपो न दानं,
ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म: |
ते मृत्युलोके भुवि भारभूता
मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति ||११|| (वृत्त- उपजाति)
अर्थ-
ज्यांच्याकडे कुठली विद्या नाही, तप (साधना) करण्याची बुद्धी नाही, जे दान करत नाहीत, ना ज्ञान ना चारित्र्य ना कुठले गुण ना धर्मपालन असे लोक म्हणजे केवळ या पृथ्वीवर भाररूप आहेत. ते म्हणजे मनुष्याच्या रूपातले पशूच.
थोडासा अतिशयोक्तीकडे झुकणारा अर्थ असला, तरीही मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर वरील गोष्टींपैकी किमान एक तरी गोष्ट करावी, तरच मनुष्य म्हणवून घ्यावे असं सुचवणारा हा श्लोक आहे.
नीतिशतक - भाग १- अज्ञनिन्दा (मूर्खपद्धति) समाप्त !
छान उपक्रम. वाचत रहाणार.
छान उपक्रम. वाचत रहाणार.
वा वा ! छानच उपक्रम. लिही रे
वा वा ! छानच उपक्रम.
लिही रे चैतन्य.
छान उपक्रम. धन्यवाद.
छान उपक्रम. धन्यवाद.
छान आहे.. लिहीत रहा
छान आहे.. लिहीत रहा
वाचत आहे !!!
वाचत आहे !!!
वा, मस्त
वा, मस्त
चैतन्य, खरंच एक चांगला उपक्रम
चैतन्य,
खरंच एक चांगला उपक्रम आहे हा.
ज्ञानात भर पडण्यास अतीशय उपयुक्त.
अरेरे ही मुर्खलक्षणे वाचुन मन
अरेरे ही मुर्खलक्षणे वाचुन मन फार खिन्न झाले. मुर्खाला समजाविण्याचा या जगात काहीच उपाय नसावा ?
खुद्द देवांनी हात टेकले तिथे पामरांची काय कथा ?