आई नावाचं अजब रसायन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

दर वेळी आईकडे रहायला गेलं की हक्कानं लाड करून घेते, इकडची काडी तिकडे करत नाही, समोर आलेलं आयतं खाते वगैरे वगैरे. पण ह्या वेळी आईकडे अचानक जायचा योग आला (म्हणजे, इट वॉजन्ट प्रीप्लॅन्ड यू नो!). आई जराशी आजारी होती, त्यामुळे ’मी किती कामाची आहे’ हे तिला दाखवून द्यायचा मी चंग बांधला. ठरवलं, की यंदा आईकडे जाऊन आईचंच माहेरपण करायचं. एकही काम तिला करू द्यायचं नाही. एरवी मीच नाही का माझ्या घरात सगळं करते? तिकडेही करायचं. वगैरे वगैरे.

एरवी कधीही, म्हणजे कधीही, अगदी दहा मिनिटांसाठी जरी आईकडे मी गेले, की घरात शिरल्या शिरल्या आई माझं ’हेड टू टो’ अवलोकन करते. मी केसांना कोणत्या रंगाचं रबरबँड बांधलंय पासून मी पायात काय घातलंय इथपर्यंत सर्वांवर तिची ’पिक्चर स्टाईल’ नजर पडते. मी घातलेला मंगळसूत्राचा ’प्रकार’ हा हमखास आयटम त्यात असतोच.
"हे काय नवीनच आज?"
"अगं मंगळसूत्र आहे!" मी गळ्यात बांधलेल्या चेनकडे आणि त्यात क्षीणपणे अडकलेले दोनच काळे मणी ह्यांची ढाल करत किल्ला लढवते.
"हे? असं?" आई दोनच शब्दात मला धारातीर्थी पाडते!
"आजकालची फॅशन आहे गं."
"मंगळसूत्र रोज बदलतात? आणि ही कसली जांभळी टिकली? रंगीत, उभ्या, आडव्या कसल्याकसल्या टिकल्या लावतेस तू? लाल, गोल ठसठशीत टिकल्या लावाव्यात, ते नाही.." आई सुरूच होते.
मी नांग्या टाकून निमूट घरात शिरते.

हा सीन ह्यावेळी होऊच द्यायचा नाही असा निश्चय केल्यामुळे, मी लग्नातलं लांब मंसू, शिल्पा चारचाँद टिकली, ओढणी नीट घेतलेला पारंपारिक पंजाबी ड्रेस, कोल्हापुरी चप्पल असा आईच्या भाषेत ’नीट पेहराव’ करून गेले. दारातच एखाद्या विजयी योद्ध्याप्रमाणे उभी राहिले. आज खात्री होतीच, की आईला बोट ठेवायला जागा मिळणार नाहीये. अपेक्षेप्रमाणे दार उघडताच परत एकदा माझं अवलोकन झालंच. मी तिच्याकडे ’अब क्या करोगे मामू’ स्टायलीत मंद हसत वगैरे बघत होते. पण मी विसरले- की शेवटी ती आईच!
"आज इतकी व्यवस्थित तू?"
हा वरवर अत्यंत साधा वाटणारा प्रश्न असला, तरी त्यामागे किमान चार अर्थ आहेत. पहिलाच- "एरवी तर गबाळी असतेस. आज बरा वेळ मिळाला?" असा अत्यंत बोचरा असल्यामुळे मी बाकीच्या तीन अर्थांना हातच घातला नाही!
दारातच शरणागती पत्करून मी आत शिरले!

असे अनेक प्रसंग येणार, आई दोनचार शेलक्या वाक्यात आपली वाट लावणार, आपल्याला आपल्या मनासारखं वागू देणार नाही- अशा सर्व कल्पना होत्याच. तरीही ह्यावेळी हतोत्साहित व्हायचं नाही, हेही पक्कं ठरवलं होतं. आई हे एक अजब रसायन असतं. मुलींना लग्न होण्याआधी ’नंतर करायचंच आहे गं’ म्हणत काही करू देत नाही. आणि लग्न झाल्यानंतर ’तिथे करतच असतेस, इथे नाही करायचं हं’ असं म्हणत नंतरही काही करू देत नाही! एकूणात आईला मुलीने घरकामात मदत केलेली अजिबात चालत नाही. बाजारहाट, खरेदी चालेल. पण स्वयंपाक, घरातली स्वच्छता, किरकोळ भांडी घासणे वगैरे साफ नामंजूर! त्यात तिची तब्येत नीट नाही, म्हणून पाय चेपणे, डोकं दाबून देणे म्हणजे अंगावर काटाच! ह्यामागचं लॉजिक काही समजत नाही. आता आमच्या लग्नालाही दोन आकडी वर्ष उलटून गेली. आम्हीही आईइतका टापटीपीने नाही, तरी जमेल तसा बरा संसार करतो आहोतच की. पण ते संसारकौशल्य आईच्या हाताखाली एकदम कुचकामी! तिथे आपण मुलगी, आणि ती आई. पार आपली चाळीशी, पन्नाशी आली तरी! ती म्हणेल तेच आणि तसंच करायचं. स्वत:च डोकं चालवायचं नाही! नो अपील.

तरीही चिवटपणे मी आत आल्याआल्या आईला विचारलंच,
"आई, मस्तपैकी चहा करू?"
"तू??" (काय अविश्वास आहे पहा!)
"का? मला चहा येतो म्हटलं करता. आमच्या घरी सगळ्यांना आवडतो मी केलेला चहा." मी फुशारक्या मारत वगैरे..
"पण तू फार गोड करतेस. दूधही जास्त असतं. त्यापेक्षा मीच करते. कपभर की अर्धा पीशील?" (मी असा चहा करते??- माझं मला कळेपर्यंत आईचं चहाचं आधण चढवूनही झालेलं होतं!)

आता मोर्चा माझ्या मुलाकडे, अर्थात तिच्या नातवाकडे वळतो. तो अत्यंत धडपड्या असल्याने त्याचे गुडघे बारा महिने खपल्या वागवत असतात. त्याला आता मी काय करू? त्याचं खेळणं बंद करू? त्याला घरात बसवून ठेवू? मुलं आहेत, पडणारच की. पण आईला हे अन्य मुलांच्या बाबतीत चालतं, तिच्या नातवाच्याबाबतीत चालत नाही.
"किती गं लागलंय त्याला.."
"हो ना गं.. सारखा कुठे कुठे धडपडत असतो बघ.."
"तू जरा लक्ष ठेवत जा त्याच्यावर."
आता मी हताश!
"आई, लक्ष ठेवू म्हणजे काय करू? हे आत्ताचं शाळेत लागलंय पळण्याच्या शर्यतीत. आता त्याच्याबरोबर शाळेत जाऊन बसू का? की खाली मित्रांबरोबर खेळतो तेव्हा मीही त्याच्याबरोबर पळू? पडला, की औषध लावते, टीटॅनस देऊन आणलंय, त्याला सांगते नीट खेळ, लक्ष दे.. आता ह्या व्यतिरिक्त काय करू सांग!"
"बोलण्यात ना तुमचा कोणी हात धरू शकत नाही!" काहीच पॉईंट न मिळाल्यामुळे आई ईमोशनल अत्याचाराचं अस्त्र परजते! ह्यात ’तुमचा’ म्हणून आईचा अजून एक भारी वार असतो- तुमचा म्हणजे मी आणि बाबा! निरुत्तर झाल्यानंतरची नेहेमीची वाक्य आहेत ही!
"अगं पण ह्यात माझं काय चुकलं सांग ना? आणि मी ह्याच्याचएवढी असताना सत्राशेसाठवेळा पडत होते, ती काय तुझं माझ्याकडे लक्ष नव्हतं म्हणून का?"
"तुझ्यावेळचं काही आठवत नाही बाई.. नातवंडांचं सहन होत नाही. आता वय झालं! चल, ती भाजी चिरून दे पटपट म्हणजे वेळेवर उरकेल.." -इ. अत्याचार कन्टिन्यूज!

काही आर्ग्यूमेन्ट नसलं की आई मला कामाला लावते, तसंच तिने आताही केलं आणि भाजी माझ्या ताब्यात आली! :-))

संध्याकाळी काही नातेवाईक येणार होते. आईला म्हटलं, मी करते उपमा. तू मस्त गप्पा मारत बस! तिने माझ्याकडे तिच्या त्या आशंकित मुद्रेने पाहिलंन, पण दिला एकदाचा ओटा ताब्यात! पाहुण्यांमध्ये माझी एक बहिण होती, तिची छोटी मुलगी होती, माझा लेक होताच. ते दोघं खेळत होते, म्हणून ती माझी बहीण अन मी गप्पा मारत आतच थांबलो. एकीकडे मी उपम्याची तयारी करत होते. आईने बारिकसारिक गोष्टी कुठे ठेवल्यात माहित नसल्याने, सत्रावेळा तेच डबे अन कपाटं मी उघडत होते. एकीकडे रवा कढईत गॅसवर होता. दार उघड-बंदचे आवाज ऐकून आईला बाहेर गप्पा मारत बसणं शक्यच नव्हतं. आलीच ती आत. आल्याआल्या मी केलेया पसार्‍यावर एक नजर. दुसरी नजर कढईतल्या रव्यावर. तिसरी मुलांवर.

"काय शोधत्येस गं?"
"आई, भरल्या मिरच्या कुठायत?"

"त्या कशाला?" - आई हिरव्या मिरच्याच घालते. आणि स्वादिष्ट उपम्यात हिरव्याच मिरच्या असतात अशी पक्की समजूत असल्यामुळे माझं व्हेरिएशन पसंत पडणं शक्य नव्हतं!
"छान लागतात अगं." -आईच्या बोचर्‍या प्रश्नानं घायाळ न होता मी उत्साह कायम ठेवला.
"त्या तिथे आहेत. एकच घे. तिखट आहेत. मुलांनाही खायचाय उपमा. आणि हा डाव का घेतलास? त्याने नीट फिरवता येत नाही. तो झारा घे. आणि आधण कमी कर, रवा होतोय ना भाजून अजून?" आईचे बाँम्ब जोरात यायला लागले, तशी मी गडबडले.
"हो हो, करते सगळं, तू जा.." म्हणत कसंबसं तिला बाहेर पाठवलं. परत आमच्या गप्पा चालू झाल्या. तोवर रवा भाजला गेला होता. तो उतरवून मी फोडणी आणि चुकून, अगदी चुकून सवयीने हळदीचे चार कण फोडणीत पडले. घालता घालताच लक्षात आलं होतं खरं, की उपम्यात हळद नसते, पण तोवर दोनचार कणांचा उशिर झाला होता. तो अर्थातच महाग पडला.
"हळद घातलीस फोडणीत?" आई गेल्याजन्मी नक्की घार असणार!!
"किंचित पडली गं, चुकून.."
"हं. कॉफी करते मी आता. तू बस गप्पा मारत." ह्या एकाच वाक्यातला दडलेला अर्थ समजला की नाही? म्हणजे ’गप्पाच मारायच्या आहेत, तर बसून गप्पा मार. एकीकडे गप्पा, एकीकडे उपमा- मग बिघडतो तो. परत तुला माझ्या पद्धतीची कॉफी करता येणार नाही. त्यापेक्षा मीच करते.’

दुसर्‍या दिवशी मी रोजच्याच वेळेला उठले. म्हणजे आईकडे एरवी उशिरा उठते, तशी नाही. एरवी मी घरी ह्या वेळेला उठून पोळ्या, भाजी करून मुलाचं आवरून त्याला शाळेतही पाठवते बरंका- प्लीज नोट! पण आईला मी अजून लहानच वाटते! मी उठेपर्यंत तिची कणीक भिजवून झाली, भाजी चिरून झाली, चहा करून झाला. मी अवाक! म्हटलं उगाच लवकर उठले!
"अगं, मी केलं असतं हे सगळं. तू कशाला धडपडत उठलीस उगाच? मी तुझं करायला आलेय ना? तूच काय माझी सेवा करत्येस वर?"
"अगं म्हटलं छोटूला शाळेत जायला उशिर नको व्हायला. सगळं पटापट करून टाकलं हातासरशी.."
"आई, अगं आता घाई नाहीये. असली तरी मी करेन मॅनेज. तू नको गं त्यासाठी धडपड करूस. आणि विश्वास ठेव. मी करते अगं आता. एकही दिवस माझ्यामुळे छोटूची शाळा नाही बुडलीये!"
"अगं धडपड काय? मुलींना कामाला लावायला बरोबर वाटत नाही.."
"आई, पण आता कर ना आराम थोडा. मी आहे ना? एरवी आहेसच की तू.." हे बहुतेक पोचलं कुठेतरी.. कारण त्यावर तरी तिने आरग्यू केलं नाही!

तरी परत संध्याकाळी ’ते रे माझ्या मागल्या..’!! ऑफिस करून घरी पोचते तोवर मी शाळेतून यायचे तेव्हा जसं मांडलेलं असायचं, तसं संध्याकाळचं खाणं, प्लेट्स, पाणी, भांडी, दूधाचा कप, साखरेचा डबा सगळा सरंजाम तयार! आता मात्र मी डोक्याला हात लावला!
"किस मिट्टीकी बनी हो तुम माँ?"
"अगं, इतकी सवय झाली आहे ना, की हात आपोआप चालतात!"
काय बोलणार यावर? मी पूर्ण शरणागती पत्करली. त्यानंतर दोन दिवस ती म्हणेल ते आणि तसंच आणि तेवढंच केलं. निमूटपणे मी कामं करतेय असं दिसल्यावर तिचंही मन द्रवलं आणि जास्तीची दोनचार कामं उदारपणे करण्याची मला मुभा मिळाली. तेवढंच पुण्य गाठीशी.

चार दिवसांनी माझी घरी परतायची वेळ झाली. थोडीफार सेवा, मदत, भरपूर गप्पा, चर्चा, उपदेश असं देऊनघेऊन झालं होतं. इतकी वर्ष झाली माझ्या लग्नाला, तरीपण निघताना नेहेमी दाटून येतो, तसा घसा दाटून आलाच. छोटू हे पाहून बावरला. म्हणून वातावरण हलकं करायला म्हणाले, "आई, आता माझ्याकडे रहायला ये. मग तू मला इथे तुझ्या मनासारखं वागायला लावतेस, तसं तुला माझ्याकडे माझंच ऐकायला लावते की नाही बघ! तिथे फक्त आराम करायचा, कळलं?"
"कशाचा आराम? त्यापेक्षा तुझं स्वयंपाकघर जरा नीट लावूया. वर्षभराचं सामान, चटण्या, साखरांबे, लोणची करून टाकू. एरवी तुला कधी वेळ होतो? सगळं माझ्यावर सोपव!"

झालं! म्हणजे मी हिला आरामासाठी बोलावतेय आणि हिचे कामाचेच प्लॅन्स चालू! वर तिथेही ती मलाच नाचवणार! कॉमेन्ट्सचा आणि कटाक्षांचा तर विचारच करायला नको! मी कपाळाला हात लावला आणि माझ्या इम्पॉसिबल आईला मिठी मारून निघाले!

काही जागा अशा असतात, जिथे आपण कायम लहानच असतो!
.

विषय: 
प्रकार: 

मस्त जमलंय पौर्णिमा. पहिला पॅरा सोडला (कपडे, मंसू वगैरे) तर बाकी सगळं तसंच. आपण काही करायला घेतलं की मागून आयांच्या सूचना सुरु होतात ते ऐकून वाटतं की शेवटी तूच कर तुझ्या पद्धतीने.

आपणही शेवटी तोच वारसा चालवणार हे ही अगदी खरं.

छान लिहिलयं.
माझी आई मात्र या बाबतीत अगदी वेगळी. वयाच्या बाराव्या वर्षीच तिला तिच्या आईची 'आई' व्हायला लागले. कामाच्या बाया, प्रसंगी धाकटी भावंड यांना हाताशी घेऊन तिने घर सांभाळले. त्यामुळे की काय एखादी गोष्ट अशीच झाली पाहिजे असा आग्रहीपणा कधीच नव्हता. ८वी-९वीत बेसीक स्वयंपाक शिकवल्यावर आई रवीवारी बिन्धास माझ्या ताब्यात तिचं स्वैपाकघर द्यायची. फसलेले प्रयोगही गोड मानायची. पुढे होस्टेलवरुन सुट्टीत आल्यावर तिच चालायचे 'ते तू अमक्या पद्धतीने करतेस ना तस चिकन कर या रवीवारी. बाबांना खूप आवडते तुझ्या हातचे.' किंवा 'मी नविन रेसिपी लिहून ठेवलेय केकची. आज दुपारी ट्राय करायचा?' मावशीचेही वागणे आईसारखेच.
मात्र माझ्या साबाईंचे वागणे अगदी 'टिपिकल आई' स्टाईल. मी नविन म्हणून माझ्यावर सुचनांचा भडीमार असायचाच पण ३५ शी उलटलेली, दोन मुलांची आई असलेली माझी नणंदही त्यातून सुटायची नाही. Proud त्यातुन किचन आणि लिविंग रुमचा प्लॅन ओपन असल्याने त्यांच्या नजरेतून काही सुटायचे नाही. Wink

आईग्गं..... थेट काळजात गेलं गं बाई... माझ्याकडे बाबा पण एक रसायनच आहेत ... सकाळी उठल्यावर पहिल्या चहाचा कप तेच हातात देतात. ह्म्म्म..... कधी माहेरी जायला मिळणार मला? Sad

खूप गोड लिहिलयं पौर्णिमा. सगळ्या आया अगदी सेम. आज मी एखादा पदार्थ करते, मदत करते म्हणल्यावर आईचं उत्तर असतं "मला काय इथे मखरात बसायला बोलवलयं का" Happy

सुरेखच लिहिलं आहेस पूनम. काल ब्लॉगवर वाचलं होतंच. परत वाचतानाही तितकंच आवडलं. तुझी सहजसोपी, ओघवती शैली मला फार फार आवडते Happy

पहिला पॅरा सोडला (कपडे, मंसू वगैरे) तर बाकी सगळं तसंच. आपण काही करायला घेतलं की मागून आयांच्या सूचना सुरु होतात ते ऐकून वाटतं की शेवटी तूच कर तुझ्या पद्धतीने>>>.
सायो ला सेम पिंच
आत्ताच भारतातुन परत आलेय, त्यामुळे लेखात लिहीलेले सगळे अनुभव अगदी ताजे आहेत.

छान लिहिलयस. सगळ्या आया अशाच हे खरंच, आता मी पण हळू हळू तशीच होत चाललेली आहे बहुधा Happy नवरा किंवा लेक किचन मधे काही करत असले तर १ मिनिट काही सूचना केल्याखेरीज निश्चिंत बसत नाही !! Happy

मस्त लिहिलय. आवडल एकदम. वरती मैत्रेयीने म्हटल्याप्रमाणे मी पण बहुदा आता माझी आई होत चालली आहे. स्वयंपाकघरात बापलेक काहीही करायला लागले कि माझ्या सुचना सुरु होतात. Proud

छान लिहिलयसं , आवडलं.
तुझ्या आईसारखचं इतर काही माबोकरणींच्या आयानींही त्यांच्या मुलींना असच धाकात ठेवावं म्हणजे जरा बरं होईल. Biggrin

काही वाक्ये तर खासच..... जसे कि...

एरवी कधीही, म्हणजे कधीही, अगदी दहा मिनिटांसाठी जरी आईकडे मी गेले, की घरात शिरल्या शिरल्या आई माझं ’हेड टू टो’ अवलोकन करते. मी केसांना कोणत्या रंगाचं रबरबँड बांधलंय पासून मी पायात काय घातलंय इथपर्यंत सर्वांवर तिची ’पिक्चर स्टाईल’ नजर पडते. मी घातलेला मंगळसूत्राचा ’प्रकार’ हा हमखास आयटम त्यात असतोच.

"अगं, इतकी सवय झाली आहे ना, की हात आपोआप चालतात!"

"कशाचा आराम? त्यापेक्षा तुझं स्वयंपाकघर जरा नीट लावूया. वर्षभराचं सामान, चटण्या, साखरांबे, लोणची करून टाकू. एरवी तुला कधी वेळ होतो? सगळं माझ्यावर सोपव!"

आता माझे पावशेर.
आचरटपणा करण्यापेक्षा असे काहीतरी भरीव काम करावे. फक्त या लेखासाठी मागचे सर्व अपराध माफ तुमचे.

जड घेवु नका कारण मी हे हलक्या हाताने लिहीले आहे. Wink
आणि
आणि आणि....
दादाला हे मुळीच सांगु नका.

तुमच्या संभाव्य उध्दट उत्तराला फाट्यावर मारण्यात येईल. Proud

खूप छान लिहिलंयस पूनम Happy

आणि हा डाव का घेतलास? त्याने नीट फिरवता येत नाही. तो झारा घे. >>> याबाबत मात्र मी काकूंसारखीच आहे. उपमा, पोहे करताना झाराच, भात वाढताना भातवडी, आमटीत डावच वापरायचा. >>> माझा पण हाच फंडा आहे Happy

माझ्या आईने माझ्या लग्नाच्या आधी किंवा नंतर माहेरी गेल्यावर "हे अस्सच, ते तस्सच" असं काही म्हटलंच नाही मला त्यामुळे तो अनुभव नाही. ती कसर साबा भरुन काढतात आणि मी देखिल छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद न घालता निमूटपणे त्यांच्या सुचना पाळत बसते Wink . आता आई, बाबा आणि काका असं माहेरच माझ्या कडे आलंय आणि आई/काका तान्ही बाळंच झाल्यामुळे या संवादांची देवाण घेवाणच नाही. मला देखिल लहान होऊन आईपाशी कौतुक करुन घ्यावंसं खूपवेळा वाटतं पण आता या जन्मी ते शक्य नाही. बाबा मात्र जेव्हा बाबागिरी करतात, तेव्हा बरं वाटतं Happy

Pages