गूळपोळी

Submitted by मनःस्विनी on 7 January, 2010 - 02:40
gulpoli
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सारणः
अर्धा वाटी गूळ किसलेला नाहीतर चुरा गूळ,
चार चमचे बारीक बेसन,
१ चमचा दूध,
२ चमचे शुद्ध तूप,
२ चमचे सफेद तीळ,
२ चमचे सुखे पांढरे खोबरे(काळी पाठ नसलेले) नाहीतर चुरा,
२ चमचे खसखस्(एच्छिक आहे. सर्वच जण टाकत नाहीत)
वेलची,
केसर,
तव्याला चुना

पारी:
१ वाटी कणीक,
२ चमचा बारीक रवा,
४ चमचे बारीक बेसन
४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन,
पाणी लागेल तसे,
मिठ चवीला.

क्रमवार पाककृती: 

पारी कृती:
१. सगळी पिठ व रवा एक करून मध्ये खड्डा करून मिठ घालून मध्ये मोहन घालायचे व मस्त क्रम्स करायचे.
२. मग पाणी लागेल तसे घालून घट्ट भिजवून झाकून अर्धा एक तास तरी ठेवावे. रवा भिजतो.
३. एक तासाने हाताला जरासेच तेल घेवून एकदम मळायचे मस्त. तेल ओतायचे नाही पुन्हा. रवा एक्जीवे झाला पाहिजे. पुन्हा झाकून ठेवायचे.

सारणः
१. तीळ, सुखे खोबरे कीस, खसखस कोरडे असे वेगवेगळे मंद आचेवर जरासेच भाजून घ्यायचे,रंग बदलला नाही पाहिजे. बेसन ही तूपात खरपूस भाजावे वास येइपर्यन्त. मग जरासाच दूधाचा हबका मारावा.
२. मग सर्व(बेसन व गूळ सोडून) बर्‍यापैकी थंड करायचे व वाटायचे वेगवेगळे. ह्याचसाठी वेगळे वाटायचे की तेल सुटून मिक्सी खराब होवू शकतो. मध्ये मध्ये थांबून चमचा फिरवून अंदाज घेत वाटायचे नाहीतर तेल निघून पातं अडकते व मिक्सी खराब होइल. हि पूड तयार ठेवणे.
३. आता आधी गूळ व बेसन हातानेच वेगळा मिक्स करून घेवून मळणे व वरील पूड टाकणे. फूड प्रोसेसर असेल तर मस्त. पण खूप फिरवू नये गूळ उष्णतेने वितळेल. व मिश्रण खूप कोरडे करू नये थोडेसे ओलसर असेल तर गोळे करायला बरे पडते. असे गोळे करून झाकून ठेवावे. कोरडे करू नये.
४. वेलची पूड्,केसर कुस्करून टाकावे.

लाटणे:
एकतर उंडा करून मध्ये भरून लाटणे.
पण ह्याच्यापेक्षा दोन पातळ चपाती करून सारण सर्व बाजूने पसरवायचे पण कडे पर्यन्त मिश्रण भरू नये. गूळ वितळून बाहेर येतो. मग आधी कडेकडेने लाटावे.( साधनाच्या मांडे कृती मध्ये दाखवलेय ना तसेच).
१.कडेने पातळ असा उंडा करायचा. त्याने कडा पातळ रहातात.
gupo1.jpg
२.मोदकासारखा उंडा करून जितके ज्यास्त सारण भरता येइल तितके भरायचे,
gulpoli.jpggupo2.jpg
३. हातानेच मग मोदकासारखा जवळ आणून तोंड बंद करून हातानेच जरा चपटा करायचा कडेने पातळ ठेवत.
gupo3.jpg
४.मग हलक्या हाताने लाटायचा, मी पातळच लाटते. गूळ जर मस्त मिक्स असेल तर नाही येत बाहेर.
gupo4.jpg
५. पोळी एका बाजूने भाजली की पलटायची.
gupo5.jpg
६. मस्त फुगते.
gupo6.jpg
७. खुसखुशीत पोळी मध्ये तोडून बरी पडते..
gupo9_0.jpggupo8.jpg

अधिक टिपा: 

१.तवा हा खूप गरम नाही पण योग्य गरम पाहिजे. नाहितर चिकटते. दिनेश ह्यांनी मला गेल्यावेळेला चुना लावायला सांगितला तव्याला. मी चुना लावूनही केल्या व चुना न लावता. फक्त गॅस नीट ठेवायचा व तव्याचे तापमान नीट सांभाळायचे. एक बाजू भाजली की दुसरी पलटून भाजायची. ज्यास्त वेळा उलट पलट करु नये. गूळ बाहेर आल्याने चिकटतो व उलटत नाही गॅस खूपच गरम झाला तर व पोळी कच्ची रहाते.
एकदा सवय झाली दोन तीन पोळी झाली की होते मग नीट.
२. गूळ कडक असेल तर स्टील डब्यात घालून कूकरमध्ये शिटी शिवाय १० मिनीटे घालायचा व मग लगेच बाहेर काढून फोडायचा.
३. तीळाचे प्रमाण व खोबरे आपल्या आवडीप्रमाणे कमी ज्यास्त करु शकतो.
४.जर तीळ्,खसखस ,खोबरे भाजले ना की आपोआप तेल सुटते वाटताना मग गूळ अ‍ॅड केला की लगेच ते तेलच बाईंडिंग सारखे काम करते. मी बघ असे लाडू वळून ठेवलेत. मस्त तेलकट व आपोआप वळतात. मग पोळीत लाटले की पसरतात देखील मस्त जराशा दाबाने.

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेचकी मन्जूडे. हिम्मत नाही कशी? यावेळी केल्याच पैजेत बै गुळपोळ्या तू. (चल, लापि पण दिल्ये, आता कामाला लाग! :फिदी:)

परत वाचला सबंध बाफ, मजा आली वाचताना Happy

बाफ वाचताना मजा येतेय... गूळपोळी करताना नाही. स्वहस्ते केलेला गूळ तव्यावर पोळीबाहेर येऊन नाचत बुडबुडत जळायला लागला की अवसानघात होतो. तव्यासकट सगळं प्रकरण वरून खाली फेकून द्यावंसं वाटतं. त्यापेक्षा मी तुझ्याकडे येऊन गूळपोळ्या चापेन पूनम Wink सिंडीकडे गूळपोळी खायला जाणं शक्य नाहीये.

अगं, आधी तीनच कर.
१) पहिलीचा बाहेर येईल.
२) दुसरीचा 'बाहेर येईल' ह्या भीतीने तू कमीच घालशील, त्यामुळे पुरेसा होणार नाही.
३) मऽऽग तिसरी बरोबर होईल
Proud

'गूळपोळी करू की नको' ह्या मोडात असताना सिंडीचा ह्याच विषयावरचा लेख अवश्य वाच. चांगलाच स्फूर्तीदायक आहे तो Proud

Lol

सिंडीचा लेख ऊबदार आणि दिलासादायक आहे. मी नाही वाचत सारखा... स्फुर्ती आली तर प्रॉब्लेम व्हायचा.

आज लवकर घरी जाऊन गुळपोळीचा बेत होता, पण माझ्या कलिगने माझ्याआधीच त्याला लवकर जायचेय हे जाहिर केले Sad आता बसा इथेच ६ पर्यंत... Sad

पाकृ फक्त ग्रुपसभासदांसाठीच ठेवली तर ती सर्च मध्ये दिसत नाही.... Sad त्यामुळे असल्या बहुमोली पाकृ आम जनतेसाठीही खुल्या कराव्यात ही विनंती. Happy

काल गूळ्पोळ्या व्यवस्थीत झाल्या. बाफ वाचताना मजा आली. वर पुनमने म्हटल्याप्रमाणेच पहिल्या तीन पोळ्यांचे झाले. Happy नंतरच्या झटपट झाल्या. मी जून्यामाबोवरची मुडीची रेसीपी वापरली.मात्र दोन पार्‍या न करता उंडा करुन केल्या. मनु, तुझी सचित्र कृती पण छान आहे.

मनू, युवर रेसिपी रॉक्स!!
मस्त झाल्या पोळ्या. मी पहिल्यांदाच केल्या. अजिबात चिटकल्या नाही तव्याला. मी उंडे भरुन केल्या. मला ते दोन पोळ्यांमध्ये सारण भरुन अजिबात करता येत नाहीत.
इतकी सोपी रेसिपी शेअर केल्या बद्दल थँक्यु. Happy
हा फोटो.
Gulachee Pole.JPG

मनु तुझ्या रेसिपीने गुळपोळी केली आज. धन्यवाद ईतक्या छान रेसिपी बद्दल. गूळ अजिबात पाघळला नाही. छान खुसखुशीत पोळ्या झाल्यात. दुपारी गुळपोळी वर येथेच्छ ताव मारून घरवालाभी खुश. मिनी बाई तुमच्या पोळ्या पण छान दिसताहेत. सर्व मायबोलीकरांना संक्रांतीच्या शुभेच्छा !!

IMG_5849 copy.JPG

गेले ३-४ दिवस ह्या बाफ वर येते आहे आणि नुस्ती वाचून घेते आहे. पण करायची हिम्मत होत नाहिये .
आज्-उद्या झटका आला तर पाहू. सिंडरेला च्या लेखाची पण पारयण झाली. पण लेखा इतक्या पोळ्या खुसखुशीत सोडा, झाल्याच नहित तर हि भिती पाय मागे खेचते आहे.
स्वतःला सांगून पण पहिलं कि मुली तुला गुळपोळ्या इतक्या कही आवडत पण नाही, तरिही मनःशांती काही नाही.
सगळ्याच पोळ्यंचे फोटो लै भारी!

या सगळ्यांकडून अप्रत्यक्ष प्रेरणा घेऊन मी काल गूळपोळ्या केल्याच! जमल्या!
मी चॅट करताना आईला विचारून घेतलं, शिवाय रुचिरा आणि इकडचे अनुभव....
छान झाल्या. "हिने पहिल्यांदाच केल्या, पण तसं वाटत नव्हतं इतक्या छान झाल्या होत्या" असं नवर्‍याने साबांना सांगितलं फोनवर, आणि धन्य धन्य वाटलं!
त्या आनंदात फोटोच नाही काढला! Sad

वा! फोटोत छान दिसताहेत गुळपोळी.

मिनी व प्रॅडी , छान दिसताहेत पोळ्या. You are welcome always! हि माझ्या आईची रेसीपी आहे.

प्रॅडी, पोळ्या छान गोलाकार लावून फोटो काढलाय. मी ह्यावेळेला पुपो केल्यात व तीळाचे लाडू. माझ्या गुपो खूप मोठ्या असतात म्हणून मी दोन भाग करते.

सर्वांना सक्रांतीच्या शुभेच्छा!.

प्रॅडी, छान दिसतायेत पोळ्या. (कधी येवु खायला Proud ) तू पण मनुने दिलेलं प्रमाण दुप्पट घेऊन केल्यास का पोळ्या. तुझ्या फोटोत ९ पोळ्या दिसतायेत. मी दुप्पट प्रमाण घेउन माझ्यापण ९ झाल्या पोळ्या.

मी मोठ्या वाटीच्या मापाने केल्या. कणीक थोडी जास्त भिजवली होती. बाकी रहा सवाल घर आने का.. आमंत्रण बर्याच पूर्वी केलंय. सवड झाली की जरूर येण्याचे करावे. आपले स्वागत आहे.

मनू , तुस्सी ग्रेट हो ! इथे सगळ्यांचे फोटोज पाहून आज धीर एकवटून गुळाच्या पोळ्या केल्या . Happy मला तरी आवडल्यात , खरा रिपोर्ट अहो संध्याकाळी खाऊन देतील . Happy

तळटीप :- माझ्या पोळीवर मी कमी तूप घालून खाल्लीये . Wink

DSC_0145_1.jpg

आत्ताच केल्या. लेकिंनी मजेत खाल्ल्या. मी प्रथमच केल्या, आणि कणिक, सारण आणि तवा सगळच फेकून द्यावसं वाटायची वेळ नशिबाने आली नही. Thank you so much for recipe.

मस्तच... सगळ्या गुळ्पोळी सुगरणिंना सलाम.... मंजूडीशी सहमत असल्यामुळे एकटी तर अजिबात हा घाट घालणार नाही Happy वड्यांची मस्त रेसिपी आहे का इथे?

ह्या रेसिपीने आज पोळ्या केल्या. मस्त खुसखुशीत झाल्या. धन्यवाद मनःस्विनी!
सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

धन्यवाद मनःस्विनी ! पहिल्याच प्रयत्नात झकास झाल्या गुळपोळ्या.
मी कनक गुळाची पावडर घेतली, त्यामुळे गुळ किसणे हा नकोसा प्रकार पण डिलीट Happy

मनःस्विनी, फार फार छान रेसीपी आहे ही. अनेकजणांजवळ, अनेक वेळा कॉलर टाईट केली आहे आजवर ह्या पद्धतीच्या गुळाच्या पोळ्यांनी.

हुश्श्य! पोळ्या घडल्या. तव्यावर तांडव झाले पण तरिही एंड रिझल्ट चवीला रॉकिंग आहे.
माझ्या नशेबाने मी किंवा घरची मंडळी खायचे नखरे अजिबातच करत नाहीत त्यामु कौतुक पण झाले.

छानच जमल्यात. या पद्धतीने केल्या तर आठवडाभरही छान राहतात.
मी मागे सारण, पिठे सगळे एकत्र करुन नारळाच्या दूधाने भिजवून केल्या होत्या ( मायबोलीवर लिहिल्या होत्या बहुतेक ) त्या लाटायला सोप्या जातात आणि चवीलाही छान लागतात.

Pages