गानभुली - कानडा वो विठ्ठलू

Submitted by दाद on 13 January, 2011 - 22:25

http://globalmarathi.com/PlayMusic.aspx?SearchText=kanada%20vo&tids=5102...

सकाळचे... सहा वगैरे वाजले असावेत. स्वयंपाकघरातून सकाळची गडबड ऐकू येतेय. आईने बहुतेक पहिली हाक मारलीये, मी झोपेतच ’पाचच मिंण्टं नाsss अजून’... म्हणून कूस बदललीये आणि परत डोळे मिटू मिटू जाताना...
कानावर पडते... तार शहनाईची ओळखीची धून..... दोनदा.
त्यामागे लहरत येतो आशाताईंचा उंच पट्टीतला, किनरा तरी स्वच्छ आवाज...

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती
रत्नकीळ फाकती प्रभा
अगणित लावण्य-तेज पुंजाळले
नवर्णवे तेथिची शोभा...
कानडा वो विठ्ठलू करनाटकू
येणे मज लावियेला वेधू.....

गाण्याची चाल ऐकताना सोप्पी वाटते अन विलक्षण वेधक आहे... असं काहीतरी मोहन आहे त्या गाण्यात की, हे गाणं संपेपर्यंत आईनं दुसरी हाकही मारू नये असं वाटल्याचं मला अजूनही आठवतं.

ही ज्ञानेश्वरांची एक अप्रतिम रचना, एक विरहिणी, कदाचित सगळ्यात सुंदर विरहिणी, तिला हृदयनाथांची चाल, आशाताईंचा आवाज वगैरे वगैरे सगळे संदर्भ निर्वेष करूनही कोणत्याही क्षणी मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात तारशहनाईच्या त्या सुपरिचित धूनेसह जागं होणारं हे गाणं.
घरातलं लाडकं लहानगं झोपेतून उठलं की त्याक्षणी तिथे असणार्‍या कुणाचाही कसा कब्जा घेतं.... कशी हसर्‍या चेहर्‍याने माणसं आतून फुलून येत त्याला सामोरी जातात, उचलून घेतात... तस्सं होतं हे गाणं जागं झालं की.... सगळं कोड-कौतुक पुरवून घेतल्याविना सुटका नसत्ये.... माझ्यापुरतं तरी... खरंच आहे हे.

काय नाही ह्या विरहिणीत?
अगणित लावण्याच्या तेज:पुंज पुतळ्याचं कौतुक आहे. त्याच्या रूपाचा, गुणाचा महिमा आहे अन... ते अनुभवू जाताजाताच पडलेलं निर्गुणाच्या मिठीचं संमोहन आहे.
विरहिणी म्हणून अतीव दु:खात, द्वैताचा अनुभव घेता घेता आलेलं अद्वैताचं द्रष्टेपण आहे. अन क्षणात परत द्वैताचं भान येऊन आसावल्या जीवाची झालेली घालमेल आहे.

ती म्हणते, ’द्वैत-अद्वैताची ही अनुभूती. इतकी आतली अन उत्कट की वाचेच्या ’परा’ स्थितीच्याही आधीच्या स्फुरणाची! ही मी कशी शब्दबद्धं करू? ह्या अनुभवाला प्रकट करण्यासाठी जे शब्दांचं, त्यांच्या तरल अर्थांच्या वलयांचं गुंठण हवं... माझ्या ह्या अनुभूतीला त्याचंही ओझं!... ती कशी वाणीच्या मखरात बसवणार मी?’
अशी त्या विरहिणीची असमर्थता व्यक्तं करीत असता, ज्ञानिया इतक्या थोडक्या शब्दांत जे सांगून गेला ते भारंभार पोथ्या-पुराणंही सांगू धजणार नाहीत.

’मी तरी अश्शी आहे.... ज्या सख्याच्या ओढीनं हा जीव आसुसला त्याचं वसणं हृदयीचं आहे हे जाणूनही, अनुभूतीच्या क्षेत्री त्याची वाट बघत ओठंगून उभी राहिले नं?... ह्याला काय म्हणावं आता?
जो कायेमाजी स्पर्श बनून, जिव्हेत रसना बनून, कर्णांत नाद बनून, श्वासात गंध बनून अन डोळ्यामाजी दृष्टी बनून वसला त्याला क्षेम देऊ गेले..... ज्याचा आदी अंत नाही अशा त्या ब्रम्हाकाराचे पाय शोधू गेले... काय हा वेडेपणा बाई? अशी कशी भुलले ह्या द्वैताच्या खेळीला?’, असं ते विरहिणीचं गूज सांगता सांगता ज्ञानदेव किती सहज राज-योग, राज-गुह्य सांगून जातात.
**********************************************************************************
आता थोडकं गाण्याविषयी. एक ती तारशहनाई आणि मृदुंग यावेगळी फारशी वाद्य ह्या गाण्यात नाहीत. एकदा कडव्यात शिरल्या की आशाताई सर्वस्व होतात ह्या गाण्याच्या. एखाद्या माहेरवाशिणीला संधी मिळताच आपल्या कुंकवाच्या धन्याविषयी किती बोलू अन किती नाही व्हावं, तस्सं अखंड कडवं आशाताईंच्या आवाजात भडाडा बोलतं. मध्ये एकही इतर वाद्याचा तुकडा नाही.
ज्ञानदेवांचे शब्दं अन त्यांना किंचित गंधलेपन केल्यासारखे सूर घेऊन आशाताईंच्या गळ्याची तार झिणझिणत रहाते. हृदयनाथांनी जणू जाणुनबुजून शब्दं-सूरांच्या ह्या द्वैत-अद्वैत खेळीला वाद्यांच्या इतर सुरावटींचं ओझं ठेवलं नसावं.

करनाटकू मधली ’अ’करातली तान किती सुरेख. खरतर आकारातल्या तानेसाठी ’ना’ वर तान घेणं किती सरळ सोप्पं झालं असतं? पण त्या "ना" वरला झोल, वळसा पुन्हा ऐकून बघा, गुणगुणून बघा. आपल्याच मानेला झक्कास वळसा येतो... आपल्या जीवीच्या जिवलगाची, खेळियाची नाटकं, कृततकोपाने सांगणार्‍या ह्या विरहिणीचा हा विभ्रम सुरांमधून किती सहज साकार झालाय.
येणे मज लावियेला वेधू... तिला लागलेला वेध, आशाताईंच्या स्वच्छं तारषड्जाच्या बाणाने ऐकणार्‍याच्या आरपार जातो.

पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे.... त्या ’न’ वरली मुरकी..... संपूर्णं ओळीतली तक्रार ह्या एका अक्षरावरल्या नक्षिदार मुरकीत उतरलीये.

दोन कडव्यांच्या मधे एका ठिकाणी, ’येणे मज लावियेला वेधू’ मधल्या ’वेधू’ वर गेलेली आशाताईंची हरकत अशी की प्रत्येक वेळी गाणं ऐकताना ... प्रत्येक वेळी हं, त्या विरहिणीने दाटून येणारा कढ, डोळे मिटून आतल्याआत जिरवलाय असं मला वाटतं.... अगदी विद्ध होता होता थांबवलेला स्वर!

’क्षेमा लागी जीवा उतावीळ माझा’ मधे ’माझा’ वर तीक्ष्ण तारषड्ज आणि त्यातून निघालेली एक सणसणीत तान खालच्या सप्तकात षड्जाला शिवून झटक्यात परत गेलेली.. अवघ्या पाच मात्रांत. माहीत असूनही प्रत्येकवेळी ती तान ऐकताना श्वास रोखते मी.... आणि आशाताई समेवर येतात पण माझा ठोका चुकतो.

चाल हृदयनाथांची आहे. किती सुंदर? खूपदा एकल्यानं ओळखीची, घरचीच झालेली.... सोप्पी वाटावी अशी! पण त्यात किती वळसे, वेलांट्या, आडवळणं, तालाशी खेळणं.... हे सारं सारं आहे. अन तरीही किती लिलया पेललय हे गाणं आशाताईंनी, त्याला तोड नाही.
रुसवा, तक्रार, जीवाचं पाणी, असमर्थता, भक्ती, समर्पण हे सारे सारे भाव आपल्या स्वर लगावातून दाखवू शकणार्‍या आशाताईंनी स्वरात चितारलेली ही ज्ञानदेवांची अतीव सुंदर विरहिणी!
हिचं कोड-कौतुक पुरवावं तितकं कमीच.

समाप्त

गुलमोहर: 

आणि आशाताई समेवर येतात पण माझा ठोका चुकतो.>>> सहीच.
आणि 'समाप्त' का बरं? मैफल जमलीय, इतक्यात जाउ नका!

छान

तेच तर, 'समाप्त' काढून टाका... यमनकल्याण ऐकावा तर आशाताईंची दोन गाणी ऐकलीच पाहिजेत.. कानडा वो विठ्ठलु आणि निगाहे मिलाने को जी चाहता है.. आताच दुसरे गाणे ऐकून आलो आणि तुमचा हा लेख वाचला... पहिल्या गाण्याचीही कमतरता भरुन निघाली.. Happy thanks

खरंतर ही रचना कधी भिडलीच नाही. 'तेरे पास रह के भी दूर हूं' असे झाले हिच्या बाबतीत.
पण तुमचे लेखन भिडले. एकदा पुन्हा कोर्‍यापाटीने ऐकायचा प्रयत्न करणार आता.

जामोप्या- 'निगाहे मिलाने को' बाबत अगदी अगदी.

धन्यवाद, दोस्त...
समाप्तं - हा लेख.
गानभुलीचे अजून लेख येतील की... डोक्यात किणकिण खूप... अन दोनच हात, टायपायला दहाच बोटं, चौवीसच तास असल्या "न खर्‍यां"मधून Happy झडतिल तितक्या मैफिली....
ह्या गाण्यातल्या तालाच्या गमती इतक्या आहेत... शब्दांत मांडताच आल्या नाहीत. ते एक कुणाला करता येत असेल तर जरूर पोस्टा इथे. मला आवडेल.
रैने, <खरंतर ही रचना कधी भिडलीच नाह<> कसं ते? पण होतं असं नै?
नाहीच जुळत नाळ.

मस्तच.. खूप छान.. Happy
या भाषेतला जो लडिवाळपणा आहे तो केवळ मोहुन टाकणारा आहे... विठ्ठलु, वेधु... या मनीच थेट त्या मनी पोहचवणारी भाषा... Happy
सुन्दर लेख.. Happy

http://merakuchhsaman.blogspot.com/

की ब्बात है...!!
एकदम तबियतशीर लेख..!
खूपच आवडला.
आशा ताईंच्या यमन मधे ३ गाणी फेवरिटः
एक: कानडावु विठ्ठलू
दोनः निगाहे मिलाने को
तीनः मागे उभा मंगेश (काय तालाचा खेळ आहे या गाण्यात पण मस्त...आहा! यावरही लिहा काहीतरी)

लडिवाळपणा, माधुर्य, भक्तीरस.... सर्वांनी ओतप्रोत असं कानडा वो विठ्ठलू .... लेख सुरेख जमलाय दाद! Happy

कानडा वो विठ्ठलू ....खुपच लोभस शब्द आणि तितकाच दैवी आवाज!
अप्रतिम अभंगाचे तितकेच अप्रतिम रसग्रहण Happy

दाद, निव्वळ शब्दांतून सगळ चित्र उभ करण्याची हातोटी आहे तुम्हाला. गाण्यांवर, संगितावर मनापासून प्रेम केल्याशिवाय हे शक्य नाही. किती चोख निरिक्षण आणि मांडणी. ______/\______

अतिशय सुंदर लिहिलेय.वाचताना गाणे परत परत आठवत गेले..

मुळात विरहिणी लिहिलीय सुंदर आणि त्यात आशाने जीव ओतुन गायलीय.... मंगेशकर कुटूंबियांचे हिमालयाएवढे उपकार आहेत.

मागे उभा मंगेश (काय तालाचा खेळ आहे या गाण्यात पण मस्त...आहा! यावरही लिहा काहीतरी)

ह्या गाण्यामधे तर आपसुख नजरा देवाला शोधायला लागतात. जिथे जावं तिथे सुख आणि सुखंच आहे असं भासायला लागतं फक्त.

>>करनाटकू मधली ’अ’करातली तान किती सुरेख. खरतर आकारातल्या तानेसाठी ’ना’ वर तान घेणं किती सरळ सोप्पं झालं असतं? पण त्या "ना" वरला झोल, वळसा पुन्हा ऐकून बघा, गुणगुणून बघा. आपल्याच मानेला झक्कास वळसा येतो...
मस्त! अतिशय गोड अनुभव.

दाद, निव्वळ शब्दांतून सगळ चित्र उभ करण्याची हातोटी आहे तुम्हाला. गाण्यांवर, संगितावर मनापासून प्रेम केल्याशिवाय हे शक्य नाही. >>> अगदी हेच लिहायला आले होते इथे Happy

धन्यवाद.... सगळ्यांचे आभार.
हॄदयनाथांच्या संगीतरचना तालाला खूप आडवळणी असतात. ह्या गाण्यात तर इतक्या ठिकाणी त्यांनी इतकं करून ठेवलय की विचारू नका. मला खरच ते शब्दांत मांडताच येईना.
कदाचित ही समोर बसून गप्पांमधे... पदर-पदर उलगडण्याची चीज आहे.
(असं काही मायबोलीवर हवं होतं नाही?)
असो... काळाच्या कसोटीला उतरणार्‍या काहीच संगीत दिग्दर्शकांपैकी हृदयनाथ एक ह्याबद्दल वादच नाही.

दाद, अशक्य सुंदर लिहिलंय तुम्ही ... आणि गाण्याबद्दल काय बोलायचं ? ह्रदयनाथांच्या चाली आशाताईंच्या गळ्यातून रेशमाच्या लडींसारख्या सरसर उलगडतात. आपण गायला गेलं की गुंतेच व्हायला लागतात ... दमछाक होते अक्षरशः !
इथे माझ्या आवडत्या जागा लिहायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की जवळजवळ सगळं गाणंच लिहलं जातंय म्हणून थांबले Happy

मस्त लिहिलय.. !
सुरुवातीचा परिच्छेद अगदी कित्येक वेळा अनुभवलाय.. बर्‍याचदा हे गाणं झोपेतच ऐकलं होतं.. Happy

Pages