गानभुली - कानडा वो विठ्ठलू

Submitted by दाद on 13 January, 2011 - 22:25

http://globalmarathi.com/PlayMusic.aspx?SearchText=kanada%20vo&tids=5102...

सकाळचे... सहा वगैरे वाजले असावेत. स्वयंपाकघरातून सकाळची गडबड ऐकू येतेय. आईने बहुतेक पहिली हाक मारलीये, मी झोपेतच ’पाचच मिंण्टं नाsss अजून’... म्हणून कूस बदललीये आणि परत डोळे मिटू मिटू जाताना...
कानावर पडते... तार शहनाईची ओळखीची धून..... दोनदा.
त्यामागे लहरत येतो आशाताईंचा उंच पट्टीतला, किनरा तरी स्वच्छ आवाज...

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती
रत्नकीळ फाकती प्रभा
अगणित लावण्य-तेज पुंजाळले
नवर्णवे तेथिची शोभा...
कानडा वो विठ्ठलू करनाटकू
येणे मज लावियेला वेधू.....

गाण्याची चाल ऐकताना सोप्पी वाटते अन विलक्षण वेधक आहे... असं काहीतरी मोहन आहे त्या गाण्यात की, हे गाणं संपेपर्यंत आईनं दुसरी हाकही मारू नये असं वाटल्याचं मला अजूनही आठवतं.

ही ज्ञानेश्वरांची एक अप्रतिम रचना, एक विरहिणी, कदाचित सगळ्यात सुंदर विरहिणी, तिला हृदयनाथांची चाल, आशाताईंचा आवाज वगैरे वगैरे सगळे संदर्भ निर्वेष करूनही कोणत्याही क्षणी मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात तारशहनाईच्या त्या सुपरिचित धूनेसह जागं होणारं हे गाणं.
घरातलं लाडकं लहानगं झोपेतून उठलं की त्याक्षणी तिथे असणार्‍या कुणाचाही कसा कब्जा घेतं.... कशी हसर्‍या चेहर्‍याने माणसं आतून फुलून येत त्याला सामोरी जातात, उचलून घेतात... तस्सं होतं हे गाणं जागं झालं की.... सगळं कोड-कौतुक पुरवून घेतल्याविना सुटका नसत्ये.... माझ्यापुरतं तरी... खरंच आहे हे.

काय नाही ह्या विरहिणीत?
अगणित लावण्याच्या तेज:पुंज पुतळ्याचं कौतुक आहे. त्याच्या रूपाचा, गुणाचा महिमा आहे अन... ते अनुभवू जाताजाताच पडलेलं निर्गुणाच्या मिठीचं संमोहन आहे.
विरहिणी म्हणून अतीव दु:खात, द्वैताचा अनुभव घेता घेता आलेलं अद्वैताचं द्रष्टेपण आहे. अन क्षणात परत द्वैताचं भान येऊन आसावल्या जीवाची झालेली घालमेल आहे.

ती म्हणते, ’द्वैत-अद्वैताची ही अनुभूती. इतकी आतली अन उत्कट की वाचेच्या ’परा’ स्थितीच्याही आधीच्या स्फुरणाची! ही मी कशी शब्दबद्धं करू? ह्या अनुभवाला प्रकट करण्यासाठी जे शब्दांचं, त्यांच्या तरल अर्थांच्या वलयांचं गुंठण हवं... माझ्या ह्या अनुभूतीला त्याचंही ओझं!... ती कशी वाणीच्या मखरात बसवणार मी?’
अशी त्या विरहिणीची असमर्थता व्यक्तं करीत असता, ज्ञानिया इतक्या थोडक्या शब्दांत जे सांगून गेला ते भारंभार पोथ्या-पुराणंही सांगू धजणार नाहीत.

’मी तरी अश्शी आहे.... ज्या सख्याच्या ओढीनं हा जीव आसुसला त्याचं वसणं हृदयीचं आहे हे जाणूनही, अनुभूतीच्या क्षेत्री त्याची वाट बघत ओठंगून उभी राहिले नं?... ह्याला काय म्हणावं आता?
जो कायेमाजी स्पर्श बनून, जिव्हेत रसना बनून, कर्णांत नाद बनून, श्वासात गंध बनून अन डोळ्यामाजी दृष्टी बनून वसला त्याला क्षेम देऊ गेले..... ज्याचा आदी अंत नाही अशा त्या ब्रम्हाकाराचे पाय शोधू गेले... काय हा वेडेपणा बाई? अशी कशी भुलले ह्या द्वैताच्या खेळीला?’, असं ते विरहिणीचं गूज सांगता सांगता ज्ञानदेव किती सहज राज-योग, राज-गुह्य सांगून जातात.
**********************************************************************************
आता थोडकं गाण्याविषयी. एक ती तारशहनाई आणि मृदुंग यावेगळी फारशी वाद्य ह्या गाण्यात नाहीत. एकदा कडव्यात शिरल्या की आशाताई सर्वस्व होतात ह्या गाण्याच्या. एखाद्या माहेरवाशिणीला संधी मिळताच आपल्या कुंकवाच्या धन्याविषयी किती बोलू अन किती नाही व्हावं, तस्सं अखंड कडवं आशाताईंच्या आवाजात भडाडा बोलतं. मध्ये एकही इतर वाद्याचा तुकडा नाही.
ज्ञानदेवांचे शब्दं अन त्यांना किंचित गंधलेपन केल्यासारखे सूर घेऊन आशाताईंच्या गळ्याची तार झिणझिणत रहाते. हृदयनाथांनी जणू जाणुनबुजून शब्दं-सूरांच्या ह्या द्वैत-अद्वैत खेळीला वाद्यांच्या इतर सुरावटींचं ओझं ठेवलं नसावं.

करनाटकू मधली ’अ’करातली तान किती सुरेख. खरतर आकारातल्या तानेसाठी ’ना’ वर तान घेणं किती सरळ सोप्पं झालं असतं? पण त्या "ना" वरला झोल, वळसा पुन्हा ऐकून बघा, गुणगुणून बघा. आपल्याच मानेला झक्कास वळसा येतो... आपल्या जीवीच्या जिवलगाची, खेळियाची नाटकं, कृततकोपाने सांगणार्‍या ह्या विरहिणीचा हा विभ्रम सुरांमधून किती सहज साकार झालाय.
येणे मज लावियेला वेधू... तिला लागलेला वेध, आशाताईंच्या स्वच्छं तारषड्जाच्या बाणाने ऐकणार्‍याच्या आरपार जातो.

पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे.... त्या ’न’ वरली मुरकी..... संपूर्णं ओळीतली तक्रार ह्या एका अक्षरावरल्या नक्षिदार मुरकीत उतरलीये.

दोन कडव्यांच्या मधे एका ठिकाणी, ’येणे मज लावियेला वेधू’ मधल्या ’वेधू’ वर गेलेली आशाताईंची हरकत अशी की प्रत्येक वेळी गाणं ऐकताना ... प्रत्येक वेळी हं, त्या विरहिणीने दाटून येणारा कढ, डोळे मिटून आतल्याआत जिरवलाय असं मला वाटतं.... अगदी विद्ध होता होता थांबवलेला स्वर!

’क्षेमा लागी जीवा उतावीळ माझा’ मधे ’माझा’ वर तीक्ष्ण तारषड्ज आणि त्यातून निघालेली एक सणसणीत तान खालच्या सप्तकात षड्जाला शिवून झटक्यात परत गेलेली.. अवघ्या पाच मात्रांत. माहीत असूनही प्रत्येकवेळी ती तान ऐकताना श्वास रोखते मी.... आणि आशाताई समेवर येतात पण माझा ठोका चुकतो.

चाल हृदयनाथांची आहे. किती सुंदर? खूपदा एकल्यानं ओळखीची, घरचीच झालेली.... सोप्पी वाटावी अशी! पण त्यात किती वळसे, वेलांट्या, आडवळणं, तालाशी खेळणं.... हे सारं सारं आहे. अन तरीही किती लिलया पेललय हे गाणं आशाताईंनी, त्याला तोड नाही.
रुसवा, तक्रार, जीवाचं पाणी, असमर्थता, भक्ती, समर्पण हे सारे सारे भाव आपल्या स्वर लगावातून दाखवू शकणार्‍या आशाताईंनी स्वरात चितारलेली ही ज्ञानदेवांची अतीव सुंदर विरहिणी!
हिचं कोड-कौतुक पुरवावं तितकं कमीच.

समाप्त

गुलमोहर: 

मनाच्या अगदी आतल्या कप्प्यातल्या ज्ञानीयाच्या दोन रचना. एक ही. क्षणभर त्या कानडा विठ्ठलाचे रुप ठसठशीतपणे दाखवते आणि मग तितक्याच सहजतेने ते पुसून टाकते. दुसरी 'अवचिता परिमळू' तो परिमळ जाणवून, त्याच्या येण्याची चाहूल देऊन जाते, दोन्ही अप्रतिम.

दाद, तुमचा लेख नेहमीप्रमाणेच सुंदर. सगळ्याच विराण्यांचे अनुभव तुमच्या शब्दात मांडा ही विनंती. Happy

मला आशाचे गाणे आवडते असे म्हणणे म्हणजे, मला मन आहे असे म्हणण्यासारखेच आहे. कुठल्याच गाण्यात आशाच्या पुढे कुणी जाऊ शकेल, असे कुणालाच पटणार नाही.
पण या रचनेच्या बाबत असे निदान माझ्या बाबतीत तरी घडले.
डॉ अशोक रानडे यांच्या चालीत, हि रचना श्रुती साडोलीकर यांनी गायली होती. त्याची चाल वेगळी असूनही लक्षात राहिलीय.

अप्रतिम लिहीले आहे! एका अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल एवढे सुंदर वाचायला मिळाले. दाद - गाण्यातील वेगवेगळ्या जागांचे निरीक्षणही जबरी आवडले.

अप्रतिम आस्वाद! असा संगीतकार आणि असा श्रोता म्हणजे सम समा संयोग! जे भावलं ते बर्‍याचदा नेमकं शब्दात पकडता येत नाही. तीही प्रतिभा तुमच्याकडे आहे. 'गानभुली' तला प्रत्येक लेख उत्सुकता वाढवणारा आणि अपेक्षा पूर्ण करणारा असतो.
बापू

सुम्दर

गोड. माझ्याकडे हे गाण निरुपणासकट आहे. निरुपण कोणाच आहे ठाउक नाही.

किरु आठवतय का रे ?

पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार... माझ्यासारखेच "वेडे" आहेत आजू-बाजूला.. बरं वाटतं... आपल्याच वेडाबद्दल फारसं वेडं वाटत नाही Happy

केव्वळ अप्रतिम!!
अतिशय सुंदर लिहिलेय.वाचताना गाणे आपसुकच गुणगुणायला लागले.. Happy
दाद, निव्वळ शब्दांतून सगळ चित्र उभ करण्याची हातोटी आहे तुम्हाला. गाण्यांवर, संगितावर मनापासून प्रेम केल्याशिवाय हे शक्य नाही. >>> १००% अनुमोदन Happy

अहाहा !!

मस्त लेख !!

|| क्षेमा लागी जीव उताअवीळ माझा | म्हणोनिया स्फुरताति बाहु |
क्षेम देवु गेले तव मीचि मी येकली | आसावला जीव राहो ||

अहाहा !!

दाद,
धन्यवाद. अतिशय सुंदर.

विठ्ठल कानडा कसा झाला याच कोड पडत. कधी काळी महाराष्ट्रात होस्पेटच्या राज्याची सत्ता होती तेव्हा कर्नाटक महाराष्ट्र असा भेद नव्हता बहुदा.
विठ्ठलू, करनाटकू हे ऊ अक्षराचे लेणे कर्नाटकीच असेही वाचले होते.

मराठीचे आद्य संत ज्ञानेश्वर असताना कानडीचा काही संपर्क राहणे अपेक्षीतच आहे.

विराण्या १७०० आहेत असे एका व्याख्यानात ऐकले. केव्हड्या मोठ्या विषयाला आपण हात घातला आहे.

किती सुरेख लिहिलंय तुम्ही.
रेडिओमुळे हे गाणं लहानपणीच्या सकाळीशी गडदपणे निगडीत झाले होते. खरेच संपूर्ण गाणे होईस्तोवर कुणी काही बोलू नये असे वाटायचे. शब्द अपरिचित ढंगाचे असल्याने आकर्षक होतेच पण आशाबाईंचा आवाजही संमोहन घालायचा.

’येणे मज लावियेला वेधू’ >> असं आहे का ते?? मी इतके दिवस 'येणे मज लावियला वेडू' असं समजत होतो.

हरचंदजी मलाही तसेच वाटायचे Happy

दाद.. खरच तुमचे लेखन अजरामर आहे! कधीही, काहीही वाचा निव्वळ आनंद देऊन जाते!

त्या आनंदडोहाच्या ओढीने मी पुनःपुन्हा तुमचे लेखन वाचत रहाते!

>>>>>>काय नाही ह्या विरहिणीत?
अगणित लावण्याच्या तेज:पुंज पुतळ्याचं कौतुक आहे. त्याच्या रूपाचा, गुणाचा महिमा आहे अन... ते अनुभवू जाताजाताच पडलेलं निर्गुणाच्या मिठीचं संमोहन आहे.>>>>>>>> सुंदर! अतिव सुंदर.

Pages