रमाई

Submitted by शुभांगी. on 21 May, 2010 - 04:45

शेताच्या बांधावरुन चालताना रमाईने गरज नसताना डोक्यावरचा पदर सावरला आणि ती झपझप चालू लागली. आठ दिवसापुर्वीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला.

पाटील,"रमाबाई, अवो बामणाच्या बाईने कसल हो शेत कसायच? असल्या नाजुक हातानी काय काम करणार तुमी आन काय ती जुंधळ पिकवणार? मला कसायला द्या, सगळा खर्च करुन तुमच्या वाटणीच देतो की जुंधळ आणुन अगदी घरपोच"

रमाईच्या पोटात तुटल, काशीनाथराव असताना कधी हा माणूस आपल्याशी तोंड वर करुन सुद्धा बोलला नाही आणि आज सरळ सरळ आपल्या शेतावरच हा टपलाय.पाटलाला दुखवुन देखील चालणार नव्हत कसा ही असला तरी शेजारी शेत होत त्याच आणि अडीअडचणीला त्याच्याकडे मदत मागायला जाव लागणार होत.

"भाऊ, आलेही नसते कधी ईकडे. पण परमेश्वराने वाढुन ठेवलय ना पानात. आता मी कंबर कसली तरच काहीतरी होईल माझ्या मुलाबाळांच. नाहीतर लांडगे आहेतच की टपलेले घाव घालायला. तुम्ही आहात मला कसली काळजी नाही आणि प्रसंगात शत्रुसुद्धा मदत करतात तुम्ही तर शेजारी."

पाटलाच्या मनात कितीही असल तरी ही बाई काही ऐकणार नाही हे त्याला कळुन चुकल. आणि रमाईच्या वाकडयात जाण्यात काही अर्थ नाही हे तो जाणुन होता.

काशीनाथराव कधीही कोणाच्या अध्यातमध्यात नव्हते त्यामुळे गावकर्‍यांची साथ तिलाच मिळाली असती."
पाटील्,"आता तुमीच ठरवा काय ते, आम्ही आपल सांगितल. बर काय लागल तर सांगा हाये आमी शेजारी"

पाटलाला सांगीतल खर पण रमाईचा स्वतःचा पाय निघत नव्हता शेतावर जाण्यासाठी. आपल्यावर अशीसुद्धा वेळ येवू शकते याचा कधी विचारच केला नव्हता तिने. काशिनाथराव असताना कधी उंबर्‍याबाहेर सुद्धा पडायची वेळ यायची नाही अगदी जाव लागलच तर रामाच्या देवळापर्यंत, तेव्हाही कोणितरी सोबत असायच. सांत्वनाला आलेली मंडळी जेव्हा पांगली तेव्हा रमाईला जाणवल की आता हा सगळा डोलारा आपल्यालाच सांभाळायचाय. कोणी सोबत करणार नाही. कारण गुळाची ढेपच संपली म्हणल्यावर आजुबाजुला मुंगळे कसे येणार?

वसंता, कुसुम, शालन्,जगु आणि धाकटी सुनिता नाही म्हणल तरी खाणारी तोंड सगळी, कोणकोण आणि कितीदिवस पुरणार आपल्याला. आपल्यालाच काहीतरी हालचाल केली पाहिजे. ब्राम्हणाच्या बाईने नवरा गेल्यावर हातात पोळपाट लाटण घेवुन मोडकळीला आलेल्या संसाराचा गाडा पुढे रेटायचा अशीच समज असलेल्या चार्-दोन बायका भेटायला सुद्धा येवुन गेल्या. पण रमाईला अस दारोदार फिरण मान्य नव्हत मग करणार तरी काय होती ती. आपल चिंचोलीला शेत आहे एवढच माहित होत तिला.

बाराव्याला आलेल्या लोंकामधे जेव्हा कुलकर्णी वकिल तिला दिसले तेव्हाच तिला वाटले की याच्याशी बोलल तर समजेल नक्की किती जमीन आहे आणि काशिनाथरावांच्या नावावर काय आहे ते. पण तिला तेवढी वाट बघावी लागली नाही, कुलकर्णी वकिल स्वत: तिला भेटायला आत आले.

"वहिनी, तुम्हाला आता सांगायला हरकत नाही पण काशिनाथरावांची बरीचशी जमीन गहाण आहे सावकाराकडे वेळोवेळी काढलेल्या कर्जापोटी. जी काय दोन्-तीन एकर जमीन आहे ती विकली तर निदान पोरांची शिक्षण तर होतील व हाताशी थोडा पैसा राहिल."

"मला कधी बोलले नाहीत हे"

"अहो तुम्ही कधी विचारल का? आणि हे सगळे सरंजामी थाट पाऊस पाण्याविना कसे पुरवले असतील त्यांनी याचा विचार केलात की आपोआप उत्तर मिळेल तुम्हाला"

कुलकर्णी वकील जरी त्यांचे वकील असले तरी घरातलेच असल्यासारखे असल्याने त्यांच्या बोलण्याचा रमाईला राग आला नाही उलट स्वतःच्याच अज्ञानाची लाज वाटली.
"तेही खरच म्हणा, आता विकायच राहू दे बाजुला सद्ध्या. मोलानं वगैरे लावता येइल का??

"बघतो मी पण हातात काय येइल सांगता येत नाही"

"मी कुणालातरी मदतीला घेवुन कसायच म्हणाले तर जमेल का??"

"वहिनी तुम्ही???"

आलेले हसु दाबत कुलकर्णी वकिल रमाईला चार दोन शब्द बोलुन निघुन गेले. आणि रमाईचा निर्णय झाला शेत कसण्याचा. शेतावर पिकलेली ज्वारी खाण्याव्यतिरिक्त रमाईचा शेताशी कधीच काहीही संबंध आला नव्हता आणि अचानक हे सगळ म्हणजे पुनः परिक्षा द्यावी लागणार होती. पण धीर सोडेल तर ती रमाई कसली??

तीने शेजारच्या बायकांच्या साथीने शेतात जायला सुरवात केली. खुप त्रास झाला तिला सुरवातीला. शेतात काम करणार्‍या बायकांवर देखरेख, गड्यांच जेवणखाण त्यासाठी बडवाव्या लागणार्‍या भाकरी सगळ ती अगदी मन लावुन करत होती कारण समोर दिसणारी मुलांची केविलवाणी तोंड बघितली की तिला अजुनच जोर चढायचा.

दिवस कधीच सारखे नसतात. आज कष्टाचे तर उद्या सुखाचे दिवस निश्चितच येणार होते म्हणुन सगळा प्रयत्न चालला होता तिचा. अशातच एक दिवस वसंता घरातुन निघुन गेला. काय, कस, कुठे या प्रश्नांची उत्तर शोधायची तिला गरजच पडली नाही कारण तेवढा वेळ आणि पैसा नव्हता जवळ. मुक अश्रु ढाळण्यापलिकडे काय करु शकत असेल तर पोलिस कंप्लेंट, तीही केली तिने ठाण्यात, पण तिला सुद्धा माहित होते की एकदा गेला तो गेला आता कितीही प्रयत्न केला तरी तो येणार नव्हता.

घरातल्या गरीबीपेक्षा बाहेर भुलवणार मोहमयी जग वयाच्या १५व्या वर्षी जास्त आपल वाटल होत त्याला. कानावर बातम्या यायच्या आधी तिच्या त्याने चोरुन विड्या ओढल्याच्या. रमाईच्या कनवटीचे एक दोन रुपये कमी झाले की तिला कळायच कितीही मारल तरी आपण त्याच्या शक्तीपुढे अगदीच कोते ठरत आहोत म्हणुन. त्याच भविष्य तिने त्याच्या डोळ्यात वाचल होतं. पण पोटचा गोळा होता शेवटी तिच्या, त्यामुळे वाईट वाटायच.

अधुन मधुन आठवण यायची वसंताची. कसाही असला तरी शेतात मदत करायचा तो. आज अगदीच एकाकी झाली परत एकदा ती. कुसुम बाकिच्यांना सांभाळायची त्यामुळे तिच्या शाळेचे तीन तेराच वाजले होते. पण जेवढ जमेल तेवढ रमाई तिला शिकवायचा प्रयत्न करायची. पण वसंता गेल्यापासुन जगनवर तिची बारीक नजर होती त्याला ती अजीबात एकट सोडायची नाही. दुध पोळल की ताक देखील फुंकुन प्यायची सवय लागते तस झाल होत तिला.

दिवस चालले होते. तिच्या कष्टाने आज तीन एकराची तेरा एकर जमीन झाली होती. तिच्या शब्दाला वजन आल होत. पंढरपूर सारख्या गावात शेती आणि वारी हे दोनच उद्योग होते तेव्हा. कितीतरी लोकांचा उदरनिर्वाह फक्त आषाढी आणि कार्तीकीवरच चालायचा. रमाई त्यात सुद्धा मागे नव्हती वाड्याचे आता तीन मजले झाले होते, वर पत्रा टाकला असला तरी ५० माणुस बसेल एवढी जागा होती. आजपर्यंत त्या विठोबाने खुप साथ दिली होती. वारीत सामान ठेवायला माणशी १०रु मिळाले तरी बरीच रक्कम जमायची. या सगळ्या उद्योगांमुळेच रमाईला आज चांगले दिवस आले होते.

मुलांनी पण चांगलीच साथ दिली, बरोबरीत कष्ट केले. यथावकाश रमाईने कुसुम व शालनला सरकारी दरबारात असणार्‍यांच्या घरी उजवले. लग्न अगदी साग्रसंगीत करुन दिले दोघींचे कुठेही काशीनाथरावांची कमी जाणवू दिली नाही. तिची दुरदृष्टी तिच्या कामी आली. सरकारी लोकांना पेन्शन मिळते हा एकच स्वार्थ होता त्याच्यात.

आता सुनिता आणि जगनच शिक्षण करुन थोडी विश्रांती घ्यावी हा विचार करायला तिने सुरवात केली होती. कारण सगळ साम्राज्य उभ करुन झाल, मुल मार्गाला लागली आपल जीवन सार्थकी लागल हा साधा सरळ हिशोब होता तिचा.

जगनच लग्न करुन तिने सुन घरात आणली नक्षत्रासारखी पण थोडी नाजुक. तिला फुलासारख जपल जेवढ स्वतःच्या मुलींना नाही जपल तिने. सुनिता चांगल्या घरी पडली. प्रेमाबरोबर संस्कारांचे पण धडे दिले तिने नातवंडांना.
नाती उच्चशिक्षित झाल्या पण घरात सगळ करता आल पाहिजे हा रमाईचा शिकस्ता असल्यामुळे अमेरिकेत जाउनसुद्धा भाकरी थापायच काही विसरल्या नाहीत.

नियती कधी कुणाचा सारीपाट उधळुन लावेल नेम नाही. सगळ सुरळीत चालू असता जगनला राजकारणात शिरायची हौस आली. रमाईने खुप समजावुन सांगायचा प्रयत्न केला पण ती त्याला थांबवु शकली नाही. त्याच शेतीवरच लक्ष उडाल. तो दिवस रात्र पक्षाच्या कार्यालयात राहु लागला. आणि रमाईच्या साम्राज्याला खिंडार पडायला सुरवात झाली. ४० वर्षे कष्टाने उभारलेली इमारत आता हळूहळू ढासळायला सुरवात झाली. संपत्तीत भर घातली तर ती वाढते अन्यथा ती संपते हे साध सुत्र ती मुलाला नाही समजावु शकली.

आता वयोमानानुसार तिच्या हातात तेवढी ताकत उरली नव्हती की शब्दात जोर. नातू आता उघड उघड तिला बोलू लागले. तिनेच निर्माण केलेल्या जगात ती परकी झाली. मुली यायच्या चौकशी करुन जायच्या तिला आग्रह करायच्या त्यांच्याकडे यायचा पण स्वाभिमानी स्त्री ती. कधी कुणाच्या दारी गेली नाही. लग्न करुन या वाड्यात आले आता माझा देह इथेच पांडुरंगाच्या दारी ठेवेन असा पण केला होता जणु तिने.

जगनचे शेतीवरचे लक्ष तर उडाले होतेच आता घरी येणारे वारकरी पण येइनासे झाले. त्याला तो उद्योग कमी प्रतीचा वाटायचा त्यामुळे त्यामार्गे येणारे उत्पन्न कमी झाले. हळुहळु शेतीचे तुकडे मग घरातल्या वस्तुंना बाहेरचा मार्ग दिसायला लागला.

शेतात दोनदा लाखो खर्च करुन मोटार बसवली ,पण पाणी लागले नाही. नदीपासुन पाईप्लाईन टाकली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आधीच कष्टाची वानवा त्यात दुष्काळाने डोके वर काढले. संकट सगळ्या बाजुंनी फेर धरुन नाचु लागली. रमाईच्या डोळ्यादेखत ही सगळी वाताहात चालली होती पण ती काही करु शकत नव्हती. कारण तिचे कष्ट नातवंडांनी पाहिले नव्हते, त्यांनी फक्त तिचा पैसा पाहिला होता.

मग कधीतरी जगनने मुलाच्या सांगण्यावरुन राजस्थानातुन १० म्हशी आणुन दुधाची डेयरी टाकली. पण त्यांना सांभाळणार्‍या गड्याच्या कुटुंबाचा खर्च निघणार्‍या दुधाच्या फायद्यापेक्षा जास्त होता. त्यातल्या दोन म्हशी एकाएकी मेल्यावर कळाले की त्या सगळ्या म्हशींना कुठला तरी रोग झाला होता. मग ज्या किमतीला त्या विकत आणल्या होत्या त्याच्या कितीतरी पट कमी दराने त्या विकल्या. लाखाचे हजार झाले तरी डोकं ताळ्यावर आल नव्हत. मग पिठाची गिरणी, बेकरी असे बरेच उद्योग झाले पण कुठेच यश आल नाही.

रक्तातच असल्याने जगनला कष्टाची सवय होती पण रमाईचा मुत्सद्देपणा नव्हता. पुलाखालुन बरच पाणी गेल होत. स्वत:ची चुक जगनला समजली होती पण खुप उशीर झाला होता. नव्या जोमाने सरकारी कर्ज काढुन त्याने शेतात प्रयोग केले पण तिथेही अपयश आल. कधी नव्हे ते रमाईच्या घराने देणेकर्‍यांचे तोंड बघितले.

रमाई सगळ शांतपणे बघत होती. तिची गात्र थकली होती. निस्तेज डोळे अनंतात विलिन होण्याची वाट बघत असावेत बहुदा. त्या पांडुरंगाला कधी दया येतेय याचीच तिला काळजी होती. देणी इतकी वाढली की आता जगन घराबाहेर पडेनासा झाला. अशाच एका दुर्दैवी क्षणी आजुबाजुला कोणी नसताना रमाईने शेवटचा श्वास घेतला. आईचा मृत्यु जगन सहन करु शकला नाही कारण काही अंशी तोच जबाबदार होता तिच्या मृत्युला. बाकीच्यांनी त्याच्याशी संबंध तोडले.

रमाईच्या वर्षश्राद्धाच्या बरोबर तिसर्‍या दिवशी जगनचे प्रेत चंद्रभागेच्या तीरावर सापडले. पुरात सापडलेल्यांना वाचवणारा, पट्टीचा पोहणारा आज सडलेल्या अवस्थेत होता. नाकातोंडात पाणी गेल्यावर जगण्याचा मोह होऊन हात पाय पाण्यात चालु नयेत म्हणुन त्याने स्वतःचे हात पाय बांधुन नदीत उडी मारली होती.

सुखात लोळणारी एक पिढी पुन्हा एकदा रस्त्यावर आली होती. दुर्दैव म्हणा किंवा योगायोग, बरोबर एक वर्षाने पुन्हा एकदा वाड्याने रमाईच्या सुनेचा मृत्यु बघितला.

रमाईने स्वतःच्या कष्टाने निर्माण केलेल विश्व तिच्याबरोबरच संपल. एक अध्याय तिथेच संपला.

कालांतराने नातवंडांनी तो वाडा विकला, शेत विकले आणि कर्ज मिटवले काही प्रमाणात. पुन्हा नव्याने सुरवात केली आयुष्याला नव्या ठिकाणी.

आज तो वाडा तिथेच आहे पण मालक वेगळा. तिथे धर्मशाळा चालते. दारावर येणारी महारीण पण बामणीणबाय म्हणुन वेड्या आशेने दारावर थांबते भाकरी वाढेल कुणी म्हणुन. गाई गोग्रासाकरता थांबतात. आजही नाती कधी पंढरपुरला आल्या की वाड्याच्या दारात घुटमळतात. सगळ जिथल्या तिथ आहे फक्त रमाई नाही तिथं कुठ.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.

आवडली

छान Happy

छान लिहीलीयेस.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!