मोगरा फुलला मोगला फुलला
फुले वेचिता बहरू कळियांसी आला
http://www.youtube.com/watch?v=kGyvZ1R8kec
सिद्धबेटी ह्या लेकरांना, आई-वडिलांविना रहाण्याची आता सवय झाली आहे. गहिनीनाथांची गुरु-कृपा लाभलेल्या निवृत्ती दादाने आपल्या अनुजाला, ज्ञानदेवाला शिष्य म्हणून स्वीकारलं आहे. ज्ञानदेवाची त्या पथावर झपाट्याने वाटचाल चालू आहे.
अन अचानक एका मऊ मवाळ सांजवेळी, जेव्हा सूर्य किरणांचा पिसारा मिटून घेत निघू लागला आहे... अशा गोरज वेळेला... समाधीस्त अशा ज्ञानदेवांच्या अंतर्यामी मात्रं वेगळीच पहाट फुटते आहे. आपले गुरू, निवृत्तीनाथांनी दावलेली वाट चालता चालता आपण, ती चाललेली वाट, अन ते पोचण्याचं अंतिम ठिकाण, ही निर्लेप समाधीची अवस्था हे सारं एकच असल्याचं ध्यानी आलं आहे.
दुजा भाव नाही. जे पंचेंद्रियांना बाहेर अनुभूत होतं आहे... ते आपल्याच आत्मरूपाचा अविष्कार आहे.
ज्ञानदेव म्हणून जातात.... ह्या ज्ञानवृक्षाला लागलेली फुलं वेचू जातो तर कळ्यांना बहर येतो आहे... नव्हे नव्हे धुमारे फुटताहेत. आपला शिष्य म्हणून स्वीकार करून जे ज्ञानवृक्षाचं बीज गुरूदेवांनी मनाच्या अंगणी रोवलं.... त्याचा वेल गगनावेरी गेला... सार्या स्थिर-चळावर त्याच वेलाचा मांडव, दृष्टी जाईल तिथे तिथे त्याच फुलांचा डवर, श्वासा-श्वासाला त्याच गंधाचं लेपन. आता जो प्रकाश उदेजला, त्याला अस्तावणे ठाऊक नाही.
उकललेल्या मनाच्या गुंथ्याचं हे मऊ रेशीम... आपल्याचपाशी राखलं तर परत गुंतेल, आपल्या अस्तित्वाला कातरत राहील ही जाणीवसुद्धा त्याच प्रकाशाचा जीवात्म्याला झालेला स्पर्शं.
ह्या समाधी स्थितीला येण्याचा प्रवास जरी त्यांचा स्वत:चा असला तरी, त्याच्या कृतार्थतेचंही ओझं झाल्यासारखं त्याचं श्रेय अर्पण करून मोकळं होण्याची त्यांना जणू घाई लागलीये. त्याचं श्रेयच काय, पण मनाच्या ह्या ब्रम्हस्वरूपाचंही ओझं झाल्यासारखं, त्याच सुक्षणी, आपल्याच आनंदस्वरुपी मनाच्या उकललेल्या गुंथीचं वस्त्रं विणून ते आपल्या बाप-रखुमादेवीवरास अर्पून स्वत: वेगळे झाले आहेत, ज्ञानदेव.
चितस्वरूप, आनंदस्वरूप, स्वभावमान आत्मस्वरूपाचं चिरंतर भान!
***************************************************************************
मला दिसलेलं हे गाणं असं.... प्रत्यक्षात ज्ञानदेवांनी कोणत्या स्थितीत हे शब्दं उच्चारले असतिल, देव जाणे. पण त्यांच्या ज्ञानमार्गाच्या प्रवासातला हा सुरूवातीचाच काळ असावा असं मला वाटतं. कदाचित संप्रज्ञात समाधीच्या स्थितीत आलेला हा अनुभव असेल...
ह्या अभंगात म्हटलेला बहर हा, त्यांचे गुरू निवृत्तीनाथ ह्यांनी त्यांच्या मनाच्या अंगणात लावलेल्या ज्ञानाच्या रोपाचा आहे... असं "मला" वाटतं.
आता थोडं गाण्याबद्दल.
आधीच कबूल करत्ये... ज्ञानेश्वरांच्या रचना मी मन लावून ऐकण्याआधी कान लावून ऐकण्याचं सारं श्रेय जातं संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका लताबाईंना. माझ्यासाठी, चवीचवीने गाणं ऐकण्याच्या टप्प्यांतली पहिली पायरी म्हणजे सूर... किंवा चाल! शब्द नव्हेत.
ही ’आदतसे निहायत मजबूर’ अशा म्या पामराची मर्यादा आहे. ह्या जन्मी त्यातून बाहेर पडण्याची लक्षणं अजून तरी दिसत नाहीत.... असो..
गोरख कल्याण हा माझा एक आवडता राग. हृदयनाथांच्या अनेक संगीत रचना ह्या रागाशी रेंगाळताना दिसतात. ही त्यातलीच एक.
हे हेतुपुरस्सर आहे का नाही माहीत नाही पण, गाण्याची सम "फुलला" वर नाही. निव्वळ गीत म्हणून हा अभंग म्हणून वाचताना, आपण नकळत "फुलला" वर जोर देतो.
साधारणपणे गाण्यातल्या समेवरल्या शब्दावर आघात येतो. शब्दं जरा जोरात, ठोस म्हटला जातो. म्हणूनच गाण्याची स्वाभाविक सम "फुलला" असूनही हृदयनाथांनी तिला शब्दांवेगळीच ठेवलीये. सम मोगराच्या आधीच येते.... गाणं ऑफ्बीट चालू होतं. त्यामुळे सम आल्यानं जो साहजिक आघात येतो पूर्णतः टाळलाय.... हृदयनाथांच्या ह्या विचाराला लाख सलाम.
(हे विवेचन जरा अधिकच तांत्रिक झालय... पण तबला वाजवणार्या, शिकणार्या, गाण्यातल्या बनचुक्यांना रोचक वाटेल.. बाकीच्यांना वैतागवाडी)
व्यक्तिश: मला हे जाणून घ्यायला आवडेल की, हे गाणं गाण्यासाठी, चाल आणि शब्दांचे अर्थ समजून घेण्यापलिकडे लतादीदींनी ह्यावर अजून काय मेहनत घेतली असेल?
असं वाटण्याचं कारण म्हणजे, किती किती संयमानं गायलय हे गाणं, त्याला तोड नाही. कुठे एक जास्तीची हरकत नाही, मुरकी नाही, तान नाही, अगदी स्वराला हेलकावाही नाही... इतकच काय पण हे गाणं गाताना त्यांनी श्वासही मोजून-मापून घेतले असतील असं वाटतं.
’मोगरा फुलला’ ह्यात ’फुलला’ चा उच्चार इतका मृदू, हलके आहे की, जणू जगात कुणालाच कसलाच पत्ता नसताना अलवार उमलणारी मोगर्याची कळी.
’कळियासी आला’ ह्यातली तानही इतकी अलगद घरंगळली आहे की, जणू मोगर्याचा नुस्ता दरवळ... हा दरवळ झुळुकीवर आरुढ होऊन नाही हं... त्याला झुळुकीच्या स्पर्शाचा शाप आहे....
हा वेगळाच..... आपणासवेच, लहरत आलेला... सुक्ष्मं गंध जाणवणारा... अस्पर्श.
आपण स्वत: गुणगुणायला सुरूवात केली की जाणवतं हा संयम किती महत्वाचा. नकळत स्वरांना हेलकावे येतात, अगदी "चांगलं गातात" म्हणवणार्यांच्याकडूनही. गळ्यावरचे, कानांवरचे, मनावरचे संगीताचे/गायकीचे संस्कार पुसून असं आरशासारखं लख्खं कसं गाऊ शकल्या असतील, लतादीदी?
-- समाप्तं
आवडलं. खूप तरल.
आवडलं. खूप तरल.
अतिशय सुंदर लेख. फार आवडला
अतिशय सुंदर लेख. फार आवडला
माझ्यासाठी, चवीचवीने गाणं ऐकण्याच्या टप्प्यांतली पहिली पायरी म्हणजे सूर... किंवा चाल! शब्द नव्हेत. >>> माझंही अगदी असंच होतं. शब्दांकडे मुद्दाम लक्ष द्यावं लागतं.
<<’मोगरा फुलला’ ह्यात ’फुलला’
<<’मोगरा फुलला’ ह्यात ’फुलला’ चा उच्चार इतका मृदू, हलके आहे की, जणू जगात कुणालाच कसलाच पत्ता नसताना अलवार उमलणारी मोगर्याची कळी.
’कळियासी आला’ ह्यातली तानही इतकी अलगद घरंगळली आहे की, जणू मोगर्याचा नुस्ता दरवळ... हा दरवळ झुळुकीवर आरुढ होऊन नाही हं... त्याला झुळुकीच्या स्पर्शाचा शाप आहे....
हा वेगळाच..... आपणासवेच, लहरत आलेला... सुक्ष्मं गंध जाणवणारा... अस्पर्श.>>
........फिदा ! किती हळुवार आणि अचूक वर्णन ! असल्या भावना इतक्या सहज शब्दांत पकडणं कसं जमतं ?
आधीच्या गानभुलीं इतकाच हासुद्धा आवडला.:)
अप्रतिम लेख .. संपुर्ण
अप्रतिम लेख .. संपुर्ण गानभुली पुन्हा पुन्हा वाचण्यासारखीच आहे.
जे पंचेंद्रियांना बाहेर अनुभूत होतं आहे... ते आपल्याच आत्मरूपाचा अविष्कार आहे. >> खूप सुंदर. !
उकललेल्या मनाच्या गुंथ्याचं
उकललेल्या मनाच्या गुंथ्याचं हे मऊ रेशीम... आपल्याचपाशी राखलं तर परत गुंतेल, आपल्या अस्तित्वाला कातरत राहील ही जाणीवसुद्धा त्याच प्रकाशाचा जीवात्म्याला झालेला स्पर्शं. >> वाह उस्ताद!
दाद, <<’फुलला’ चा उच्चार
दाद,
<<’फुलला’ चा उच्चार इतका मृदू, हलके आहे की, जणू जगात कुणालाच कसलाच पत्ता नसताना अलवार उमलणारी मोगर्याची कळी. >>
जाणवल होतं हे, पण नकळतीच्या सीमारेषेवरुन.
हा प्रकार गझलगायकीत जास्त वापरला जातो का ? ती गझल आठवत्येय ? "जिंदगी जब भी तेरे बज्म मे लाती है हमे |"..
त्यात "याद तेरी कभी दस्तक, कभी सरगोशीसे" ह्या ओळीतलं दस्तक ऐक. नॉक नॉक एकू येतं, तेही हलकेच ,आणि पुढच सरगोशी पण अगदी लपून छपून...
भावसरगम मध्ये एकदा पंडीतजी म्हणाले होते "शब्द अर्थ वाहून नेतात आणि सूर अर्थांना वाहवून नेउ शकतात"
रेफरन्स होता "राया माझ्या अंबाड्याला बांधावा गजरा / बांधावा ग जरा....."
दाद, काय लिहीतेस ! वॉव !! हेच
दाद, काय लिहीतेस ! वॉव !!
हेच तिसरं गाणं का गं?
छान लिहिलंय ... हे गाणं
छान लिहिलंय ... हे गाणं इतक्या नाजूकपणे गायलं गेलय की.. तुम्ही म्हणल्याप्रमाणे जास्त आघात गाण्याची मजा घालवू शकतात.. आणि त्यामुळेच तबलाही हलका आणि ठेक्यासाठी वापरलाय..
अप्रतिम... परत एकदा!! या
अप्रतिम... परत एकदा!!
या गाण्यामागचा प्रचंड 'विचार' जबरदस्त मांडला आहे.
तुझ्या लेखाची वाट पहात होते
तुझ्या लेखाची वाट पहात होते आणि ते असंच काही असेल याची खात्री होती की काय अस झालं वाचून...
ते फुलला आणि कळियासी आला...ऐकताना आणि गाताना असंख्य वेळा; अरे इथे काय जादुये? काय रेंगाळायला होतं इथे असं व्हायच पण का ते अजून समजल नाहीये. आता जरास्स समजल्यासारखं वाटतय खरं; पण अजून काहीतरी नक्की असणार असं वाटतय.
या प्रत्येक विराणीत अस काय काय वेगळ जाणवत राहतच
मनातल्या मनात हृदयनाथांना, लताबाईंना आणि अर्थात ज्ञानदेवांना प्रत्येकवेळा सांष्टांग दंडवत घातला जातो...आता तुही आठवशीलच.
वा! जिओ!!! अप्रतिम. तुमच्या
वा! जिओ!!!
अप्रतिम.
तुमच्या लेखणाची खासियत म्हणजे शब्दान्च्या मुळाशी भावनेचा झरा असतो. तुमच्या प्रत्येक लेखात जिवन समॄध्द व्हाव असे काहीतरी वाचायला मिळते. धन्यवाद.
मस्तच ! संगीताच्या बाबतीत मी
मस्तच !
संगीताच्या बाबतीत मी फक्त कानसेन (आणि ते ही फक्त सुगम संगीतातच) पण, अशी शब्दाच्या बाहेर सम असलेली गाणी म्हणायला, साथ करायला अवघड असावीत ना?
अप्रतिम लिहिलंय! लताबाईंनी
अप्रतिम लिहिलंय! लताबाईंनी गायलेले आणि हृदयनाथांनी संगीत दिलेले माऊलींचे अभंग आणि मीराबाईंची भजने ऐकताना एक अलौकिक अनुभूती येते. आपण आपण न राहता त्या काळाशी, त्या भावनेशी तादात्म्य पावतो! धन्यवाद दाद.
<<मनातल्या मनात हृदयनाथांना,
<<मनातल्या मनात हृदयनाथांना, लताबाईंना आणि अर्थात ज्ञानदेवांना प्रत्येकवेळा सांष्टांग दंडवत घातला जातो...आता तुही आठवशीलच.>>...........१०० % अनुमोदन श्यामलीला.
फारच सुंदर लिहिलय. लतानी
फारच सुंदर लिहिलय. लतानी यातल्या सगळ्याच रचना फार सुंदर गायल्यात. तिने ज्ञानेश्वरीचा एक अध्याय पण गायला होता. ते पण असेच मन शांत करणारे गायन होते (कि पठण) आता नाही मिळत तो कुठे.
आता आशाच्या विराणीबद्दल पण लिहायला पाहिजे.
मा.बो. वरचा तुमचा ’गानभुली-
मा.बो. वरचा तुमचा ’गानभुली- मोगरा फुलला’ हा लेख वाचण्यातून सुटला होता. [मी हल्ली तिकडे नियमितपणे जात नाही]. नशीब बलवत्तर म्हणून उशीरा का होईना पण तुमचा अप्रतिम लेख वाचला.
श्रेष्ठ कवितांची एकाहून अधिक interpretations असू शकतात, नव्हे ती तर श्रेष्ठत्वाची एक खूणच असते. तुम्हाला जे प्रतीत झालं ते रुढार्थापेक्षा वेगळं असलं तरी ते तार्किक तर आहेच पण त्याही पलीकडे जाऊन, मी म्हणेन की ज्यांच्याकडे विलक्षण संवेदनशीलता आहे आणि तरल कल्पनाशक्ती आहे, त्यांनाच हे असं काही वेगळं प्रतीत होऊ शकतं. हीच तर वाचकाची प्रतिभा! कवि आणि वाचक दोन्ही जेंव्हा असे प्रतिभावंत असतात तेंव्हा होणारी रस-निष्पत्ती म्हणजे एक अनोखा सोहळा असतो.
त्या पुढची पायरी म्हणजे, आपल्याला जे प्रतीत होतं ते समर्थपणे शब्दांकित करता येणं. ह्या कसोटीवरही तुम्ही पूर्णपणे उतरला आहात. तुमच्या या post ला शेकडो सलाम आणि तितकेच धन्यवाद्ही!
द.भि. कुलकर्णींनी जी.ए.कुलकर्णींच्या कथांवर लिहिलेल्या समीक्षा-लेखांच्या संग्रहाला संजय भास्कर जोशींनी प्रस्तावना लिहिली आहे, तीत समीक्शेचे ’प्रातितिक’ आणि ’तार्किक’ असे दोन प्रकार असल्याचं म्हटलं आहे.तुमचा लेख म्हणजे ज्ञानेश्वरांच्या एका अभंगाची ’प्रातितिक’ लाजवाब समीक्शाच आहे!
प्रभाकर [बापू] करंदीकर.
छान आहे लेख.
छान आहे लेख.
हे मी कसं काय मिसलं. ? बरं
हे मी कसं काय मिसलं. ? बरं झालं लेख वर आला.
दाद- लै लै भारी.
त्यातला जो काही लताबाईंचा आवाज आहे तो तसा पुन्हा कधी त्यांनाच लावता आला की नाही कोण जाणे. तो आवाज अगदी पातळ किनरा नाही. त्यात एक मॅच्युरिटी आहे. अतीव शांत आहे.
आणि बासरी.. बासरी... कहर आहे ती बासरी.
गुरूजी म्हणतात ' बहौत चैन है गोरख कल्याण में. बडा सुकुन है '. खरोखर हा अभंग ऐकुनच त्याची प्रचिती येते.
मी पण मिसला की हा लेख..
मी पण मिसला की हा लेख..
मस्तच लिहीलाय...
मेंदू आणि मनातून (काहींना हे
मेंदू आणि मनातून (काहींना हे मान्य नसेल) येणारे संदेश घेत बोटं तबल्यावर चालावीत तशी इथं कळफलकावर चाललेली दिसतात. लय आलीय या लेखनाला. तुमच्यातला तालाचा विद्यार्थी या लेखांतून चमकत जातोय...
इथले काही प्रतिसादही अगदी एखाद्या मैफिलीतल्या 'वा, क्या बात है' सारखेच उमटले आहेत. वा!!!
हे वाचायच राहुनच गेल होते.
हे वाचायच राहुनच गेल होते. बरे झाले आज धागा वर आला. धन्यवाद दाद.
दाद तुझ्या मुळे हे गाण ऐकलं.
दाद तुझ्या मुळे हे गाण ऐकलं. म्हणजे जस ऐकायला पाहिजे तसं.
अरे... पुन्हा वर आला
अरे... पुन्हा वर आला लेख.
धन्यवाद, बापू. तुम्हा सगळ्यांचेच खूप आभार. गाणं जसं मला "दिसतं" तसं तुम्हाला दिसावं ह्यासाठी धडपड. ह्याहीपेक्षा वेगळ्या कोनातून, अधिक गहिर्या छटांमधे हे गाणं तुम्हाला दिसलं असेल.
अनेक ऐकण्यातून गाणं वेगळ्याच स्तरावर, "भाषेत" तुमच्याशी बोलायला लागतं. दोस्तं होऊन जातं....
गाण्यातून समाधी आणि समाधीतलं
गाण्यातून समाधी आणि समाधीतलं गाणं म्हणजे काय हे या लेखामुळे नीट समजलं! धन्स दाद.
अरे काय लिहून जाता तुम्ही ?
अरे काय लिहून जाता तुम्ही ? एखाद्या मैफिलीचाच आनंद मिळतो बघा तुमचे लेख वाचून -शब्दातीत -
जरा त्या पहिल्या बासरीच्या सुरांविषयी लिहाना - ते बासरीचे सूर पूर्ण गाण्याबरोबर मोगर्याच्या सुवासासारखे दरवळत रहातात अगदी - ती रचना, ते संगीत, लताबाईंचा आवाज - सर्वच स्वर्गीय - फक्त अनुभवण्यासारखेच - पण ते तुम्ही शब्दात पकडू जाता - लीलया -वा वा जियो जियो !
काय वर्णन करणार ?
असंच तब्येतीनं लिहीत रहा!
असंच तब्येतीनं लिहीत रहा! जबरदस्त भिडतं तुझं लिहिलेलं!
सुरेख!
सुरेख!
हे सर्व वाचून गाणं समजून कसं
हे सर्व वाचून गाणं समजून कसं ऐकावं हे थोडंफार लक्षात आलं
’मोगरा फुलला’ ह्यात ’फुलला’
’मोगरा फुलला’ ह्यात ’फुलला’ चा उच्चार इतका मृदू, हलके आहे की, जणू जगात कुणालाच कसलाच पत्ता नसताना अलवार उमलणारी मोगर्याची कळी............ अगदी अगदी
दाद, अप्रतिम लिहिलंस. हे
दाद, अप्रतिम लिहिलंस. हे वाचताना बाजूला लताबाईंच गाणंही ऐकत आहे. तुला कळलेलं हे गाणं शब्दात जे काही मांडलयस ना ते केवळ अप्रतिम आहे.
Pages