लिहिण्यास सुरुवात करतानाच मनात बरेच प्रश्न आहेत . उदा :- हे लिहून पूर्ण होईल की नाही कारण गद्य लेखन हा आपला पिंडच नोहे ह्याची पटत चाललेली खात्री , लिहून झालंच तर मायबोलीचा आयडी आणि पासवर्ड आठवेल की नाही , आठवलेच तर सध्या तिथे कुठले विभाग आहेत , कुठल्या विभागात हे लेखन जाईल , प्रकाशित झालंच तर ' हा कोण वैभव जोशी जो इतक्या जिव्हाळ्याने मायबोलीबद्दल बोलतो आहे ?' असे प्रश्न तर लोकांना पडणार नाहीत ना ? वगैरे वगैरे ... तरीही....
निमित्त आहे आशाताईंनी माझ्या हातून लिहिलं गेलेलं एक गाणं गायल्याचं.
पाच एक वर्षांपूर्वी मी जेव्हा फिरत फिरत मायबोली ह्या संकेतस्थळावर आलो तेव्हा शालेय अभ्यास सोडून एकही अवांतर मराठी शब्द लिहिलेला नव्हता . संकेतस्थळावर असलेल्या यादीत कुठेतरी टिचकी मारायची म्हणून गुलमोहर विभाग उघडला गेला तेव्हापासून मी अजूनही कवितेतून बाहेर पडलो नाहीये. अवांतर वाचन (पद्य) शून्य असल्याने चारोळी विभाग जास्त जवळचा वाटला हे सांगणे न लगे. ४-५ दिवस आ वासून इतरांची प्रतिभा पाहण्यात गेल्यानंतर काहीतरी विचित्र घडू पाहतंय याची जाणीव झाली. दिवसरात्र डोक्यात जागा बदलत फिरणारे शब्द , त्यातून तयार होणार्या नवनवीन आकृती, त्यांची रंगसंगती .. झपाटून गेल्यागत झालं होतं. ' हे भलतंच ' (संदीप ची आठवण आली लिहितांना ) असं म्हणून चारचौघांत नॉर्मल वागणं आणि आत आत हरवत जाणं तेव्हापासूनच सुरु झालं असावं कदाचित. सुचत असलेल्या शब्दांना काही अर्थ आहे का हाच मूळ प्रश्न असल्याने ती चारोळी किंवा कविता आहे की नाही इथपर्यंत मजलच जायची नाही. मराठी कविता (!) असलेली ग्रीटिंग्स विकत घेऊन मैत्रिणींना इंप्रेस करणार्या एका मित्राला घाबरत घाबरत चार ओळी ऐकवल्या आणि त्याने ' तू बरा लिहू शकशील ' असं बन मस्का चहात बुडवत सांगितलं. पहिली दाद . खूपसा धीर गोळा करून मायबोली वर नाव नोंदवलं , बरेच दिवस दिलेल्या खिडकीतच काहीबाही लिहून पाहिलं आणि एक दिवस 'प्रकाशित करा' नावाच्या बटनावर टिचकी मारली. डोळे घट्ट मिटून. तिथे येणारं लिखाण आणि त्यावरच्या उत्स्फूर्त आणि अभ्यासू दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया आधी वाचनात आलेल्या होत्या त्यामुळे प्रकाशित केल्यानंतर रजा टाकून घरी निघून गेल्याचं आठवतंय. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक नवीन कविता / गीत / गज़ल हातून लिहिली गेल्यानंतर लपून बसावंसं वाटतं .. पहिली प्रतिक्रिया 'आपोआप' येईपर्यंत. स्वत:हून कुणाला 'कशी वाटली?' विचारण्याचं धाडस आजही नाही. पूर्वी मित्रमैत्रिणींची प्रतीक्षा असायची आता संगीतकार , दिग्दर्शक , निर्मात्यांची असते इतकंच. पण फोन / मेसेज येईतो मधला सारा काळ निव्वळ अस्वस्थता .....
मौनात नाहल्या सांजभारल्या वेळा
अंगाखांद्यावर अबोल पाखरशाळा
पायी पडलेली अर्थहीन ही धूळ
शब्दांत मिळेना नि:शब्दाचे मूळ
आकस्मिक यावे वादळ , व्हावी सुटका
पाखरे उडावी मुळी न करता गलका
खोलात मुळाशी हाती यावे अंबर
उन्मळून पडता शोभेचा औदुंबर.
दुसर्या दिवशी बिचकत बिचकत चारोळी विभाग उघडला तेव्हा आपल्याला व्यसन लागतंय याची अंधुकदेखील जाणीव नव्हती. क्षिप्रा नावाच्या कवयित्रीने ' तू पूर्ण कविता छान लिहू शकशील , का लिहीत नाहीस ?' असा प्रतिसाद दिलेला होता. 'म्हणजे कसं????' असं कुणालाच विचारू शकलो नाही. दोन चारोळ्या एकत्र केल्या म्हणजे एक कविता होत नसते , दोन यमक जुळणार्या ओळी लिहिल्या गेल्या तर एक गज़लचा मतला होत नसतो , चार वृत्तबद्ध ओळी म्हणजे रुबाई नव्हे हे प्रश्न कसे सुटत गेले माहीत नाही. छंद, मुक्तछंद , मीटर, वृत्त , रदीफ़ , कवाफी, नज़्म , त्रिवेणी ह्या गोष्टी आयुष्यात कधी , कुठून , कशा आल्या आणि लॅंडिंग नोट्स , स्कॅनिंग , पिचिंग , हार्मनी , इंट्रो म्युझिक , एम १ , एम २ , हे शब्द कधी ओठांवर रुळले कळलंच नाही , कळूही नये.
पहिली कविता कुठली , पहिली गज़ल कुठली , पहिलं रेकॉर्डॆड गाणं कुठलं ह्या नोंदी ठेवण्याचा स्वभाव नसल्याने , थॅंकफुली , हे लिखाण 'मी' पणाकडे झुकणार नाही अशी आशा आहे. 'पुढची' ओळ कुठून येते आहे ह्या एकाच हव्याहव्याशा अस्वस्थतेच्या भरवशावर हा प्रवास सुरू आहे. हा प्रवास परवा एका अत्यंत सुखद वळणावर काही काळ नि:शब्द झाला.
मार्च-एप्रिल २०११ मधे येऊ घातलेल्या एका म्युझिकल सिनेमासाठी माझ्याकडून गाणी लिहिली गेली आणि त्यातील एका गाण्यासाठी आशाताईंना विनंती करण्यात आली तेव्हापासून 'झोप उडणे' ह्या उक्तीचा माझ्यासारख्या निशाचरालाही प्रत्यय आला. त्यांना पायलट गाण्याची सीडी मिळाली असेल का, सोबत दिलेल्या कागदावरचं अक्षर लागलं असेल ना??? , चालीचा प्रश्न नव्हताच कारण श्री. नरेंद्र भिडे म्हणजे नखशिखांत मेलोडियस माणूस! पण कविता आवडली असेल का? कवितेमुळे तर गाणं नाकारणार नाहीत ना ? साधारण किती दिवसांनी त्यांचा फोन येत असतो? नाहीतर काय करायचं असतं? त्यांनी नाकारलंच तर त्यांच्या आवाजात आता ऑलरेडी ऐकू येत असलेलं गाणं दुसर्याच्या आवाजात कसं ऐकायचं ? असे अनेक संभ्रम घेऊन काही लाख क्षण जगून (!) झाल्यानंतर नरेंद्र भिडेंच्या मोबाईल वर 'आशाताई भोसले ' असं नाव झळकलं. (हे एक नवल आहे. थोडसं विषयांतर पण मोबाईलवर नाव सेव्ह करतानादेखील फक्त 'आशा भोसले ' असं का करवत नसावं? त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी म्हणून एका मोठ्ठ्या पोस्टरवर त्यांचा फोटो आणि कविता छापण्यासाठी आम्ही ज्या प्रिंटरकडे गेलो होतो तिथे काम करणार्या औरंगजेबाला आमच्या उत्साहाशी काहीच देणंघेणं नव्हतं पण हा फोटो आशाताई भोसलेंचा आहे असं सांगितल्यावर त्याने इमेज फाईल 'आशाजी' ह्या नावाने सेव्ह केली .. हे काय असतं???? असो.) स्पीकर मोडवर फोन टाकला तर त्यांच्या लक्षात येईल ह्या भीतीने नरेंद्रने डाव्या हाताने मला लीलया कानाशी ओढलं ..
भिडे, नमस्कार मी आशा भोसले बोलते आहे (आं????? नका ना सांगू. अहो नरेंद्रचा रिंगटोन कुठला तरी कर्कश धिंगाणा असूनही तुमचा फोन आल्यावर सुरेल वाजला ना !!!!)
"गाणं ऐकलं मी. सुरेख केलं आहे. शब्द तर फार सुंदर आहेत................................."
पुढचा संवाद मी ऐकला नाही .. नंतर नरेंद्रने पुन्हा पुन्हा भेटेल त्यांना सांगितला तेव्हाही नाही. तो मला (न) आलेला , सर्वात कमी वेळ चाललेला आणि सर्वात जास्त काळ ऐकू येणारा एकमेव फोन. त्या वाक्यानंतरची सर्व शांतता मायबोलीच्या मालकीची . 'ये कहॉं आ गये हम' या ओळी ज्याला सुचतात त्याला लाख सलाम. 'यूँ ही साथ चलते चलते' म्हणणं माझ्या ओठी शोभत नाही कारण मधली दोनअडीच वर्षं मी मायबोलीसोबत प्रत्यक्ष चाललेलो नाहीये. तरीही अधूनमधून भेटणार्या मायबोलीकर मित्रांकडून नवीन कवी- कवयित्री , गुलमोहराबद्दल जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता असायची जी लपवायचाही मूर्ख प्रयत्न मी वेळोवेळी केलेला आहे. घर आपुलकीचं होतंच पण आपली आवडती खोली , आवडता कोपरा आता कसा दिसतो ही उत्सुकता कुठलाही चेहरा कसा लपवू शकेल?
आशाताई केवळ रात्री आणि ते ही स्टुडिओचे दिवे मालवून डबिंग करतात इथपासून ते किमान ४-५ वेळा रेकॉर्डिंग कॅन्सल होतंच होतं , आता मुंबईच्या वार्या करा इथपर्यंत सर्व वदंता धडधड नावाने हृदयात वावरत होत्या. आणि तो जिवंतपणाचा बुरखा घेऊन मी त्या आठवड्यात ज्यांना ज्यांना भेटलो आहे त्यांचे लवकरच ' काय रे किती महिने झाले , भेट नाही' असे फोन येतील ह्या बाबत माझ्या मनात अजिबातच शंका नाही. आणि एक दिवस रेकॉडिंग कॅन्सल झालंच. पहाटे ५ वाजता मुंबईला जायला निघालेल्या तीन गाड्या स्टार्ट होण्याआधी 'आज आवाज नीट लागत नाहीये रियाजात , पण उद्या सकाळी ११ वाजता नक्की करू या' असा निरोप आला. ते सांगणं इतकं खरं असावं की कुणीच काही न बोलता सारे आपापल्या घरी जाऊन झोपले (असावेत). दुसर्या पहाटेस मात्र कसं कोण जाणे पण जाग येतानाच जाणवत होतं की हाच तो दिवस. गाडीत वेगवेगळ्या संगीतकारांची , गायकांची थट्टा मस्करीद्वारे व्हर्च्युअली कारकीर्द बरबाद करण्याच्या नेहेमीच्या प्रयत्नांतदेखील पुरेसा जोश नव्हता. प्रत्येकजण अधूनमधून काही क्षण अंतर्मुख होत होता . आयुष्यात एव्हाना बरेच हंबलिंग एक्सपीरिअन्सेस येऊन गेले आहेत तरीही एखादा अनुभव येण्याआधी , इतका आधी चाहूल देतो हे विस्मयकारक होतं. ' त्या काही ११ म्हणजे ११ ला येत नसतात बरं का ' वगैरे वाक्यं दर दहा मिनिटाला कानावर आदळत असूनही तिथे १०.३० पर्यंत पोहोचण्याची ओढ कमी होत नव्हती. वाटेत माझी कार पंक्चर झाली . एकाच्याही तोंडून साग्रसंगीत उध्दार बाहेर पडला नाही. वी वेअर जस्ट नॉट अवरसेल्व्ज. कुणीतरी ट्रॅफिक , पंक्चर अशा किरकोळ अडचणींतून उचलून स्टुडिओसमोर ठेवल्याप्रमाणे १०.२५ ला कार पार्क झाली. पहाटे ५.३० ला निघून इतके तास कसे लागले? कुठे नक्की जास्त वेळ गेला ? पवई पासून अंधेरीपर्यंत रश अवर्सची मरणाची ट्रॅफिक असून मग कसे काय पोहोचलो ?? काही आठवत नाही.
स्टुडिओ दुसर्या मजल्यावर . लिफ्ट नाही (!!! आपलं ठीक आहे त्या कशा येणार????) १०.३० पासून ट्रॅक्स लोड करणे , साऊंड बॅलन्स करणे ह्यातच जवळपास अर्धा तास गेला. १०.५५ ला एक फोन करायला हवा म्हणजे निदान निघतील तरी पेडर रोड वरून अशी पुटपुट दोन तीन माईक्समधून आली पण फोन करण्याचं धाडस कोण करणार? चहा तरी घेऊ म्हणून वळेपर्यंत १०.५८ ला आशाताई स्टुडिओच्या दारात. वय वर्षे ७८ , दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं (ऐकीव माहिती) , व्यवस्थित जिने चढून , अजिबात दम न लागता 'नमस्कार , चला सुरू करू या???????????????' एक बाहेरची रूम (जिथे आम्ही सगळे उभे होतो) , एक मॉनिटर रूम आणि एक रेकॉर्डिंग रूम . नरेंद्र भिडे आणि आशाताई मॉनिटर रूममध्ये गेल्यानंतर बाहेर जे काय उरलं होतं त्याला केवळ पोकळीच म्हणता येईल. ' आत जास्त गडबड नको आहे हां त्या गाताना ' असे धडे अनेको दिवसांपासून भिडे गुरुजींनी गिरवून घेतले असल्याने आत जाणं वगैरे प्रश्नच उद्भवत नव्हते. पण नरेंद्रनेच दार उघडून मला आणि दिग्दर्शक आदित्य इंगळेला आत मधे बोलावलं.
'बसा ना तुम्ही इथे ' केवळ नमस्कार करायला वाकलो होतो म्हणूनच तोंडभर पसरलेलं समाधान लपलं असावं. आदित्यने मेकिंग शूट करायला सुरुवात केली . मधेच तो मला ' अरे हे पॉझ चं बटन हेच ना?' वगैरे विचारत असावा. पण ट्रॅक सुरू झाला होता आणि त्या गाणं समजून घेत होत्या. म्हणजे कसं की ' इथे मोन्टाज असणार ना? हा आलाप फेडिंग आहे नक्की ' वगैरे वगैरे . १२-१५ ओळींवरून आणि साडेचार मिनिटाच्या ट्रॅकवरून सिनेमा इतका समजू शकतो? ' हे गाणं ज्या अक्कांच्या तोंडी आहे त्या किती वर्षांच्या आहेत? सुंदर आहेत का? ' नानाविध तर्हांनी गाणं कोळून प्यायलं. बरं हे सुरू असताना ज्या आज्ञाधारकपणे संगीतकाराच्या सूचना लिहून घेत होत्या त्याला तोड नाही. ते उसनं नाही आणता येत. 'ओह! शुध्द निषाद आहे होय .. तरीच म्हणते मी ' करत कागदावर पटापट खुणा.'पुण्याचे बामण.. शब्दोच्चार नीट लागतात तुम्हाला , आम्ही वर्हाडी ' म्हणत बाबूजींचा 'ष' आणि पाठोपाठ खळखळून हसणं. आतापर्यंत खूप जणांचं हसणं ऐकलं आहे पण ओठ विलगण्याआधी थेट सूर लागलेलं हे पहिलं. एकदा इथेच ट्रॅकवर गाते म्हणाल्या.
(सांगलीहून गायक होण्यासाठी मुंबईस आलेल्या तरुणाची ही गोष्ट . 'पाहुणा' नावाच्या अभिराम भडकमकर लिखित नाटकावर आधारलेली. मुंबईत तो ज्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहतो त्या आक्का. सडेतोड , वेळप्रसंगी फटकळ , "गाणी गाऊन दोन वेळचं गिळायला मिळत नाही पाहुणे ऽऽऽ" म्हणणार्या. त्या दोघांमधे गहिरं होत जाणारं नातं आणि एका वळणावर , अपयशांनी खचून त्याचं अक्कांच्या कंबरेला मिठी मारून रडणं आणि दोघे आपापल्या खोलीत अंधारात असताना बॅकड्रॉपला वाजणारं हे गाणं)
एक अनोळखी फूल
झुले माझ्या वेलीवर
माझे कुतुहल जागे
त्याची नीज अनावर
त्याचे रंग रूप न्यारे
त्याचा गंधही निराळा
परी पाहूनिया त्याला
दाटे मायेचा उमाळा
कुण्या अंगणाचे ऋण... आले कुशीत कुठून
फुटे डोळ्यांना पाझर... भिजू लागला पदर
गाठ भेट , नाती गोती
नशिबाचा खेळ सारा
कधी ओल्या चिंब लाटा
कधी कोरडा किनारा
एक नाळ तुटायाला ... पुरे होतो एक क्षण
एक धागा जुळायाला.. किती उशीर ... उशीर !!!
ट्रॅक रिहर्सल ला कुणी असं १००% गातात का? असं वाटे वाटेतो त्या रेकॉर्डिंग रूम मधे गेल्या , स्वत:च्या हाताने माईक लावून घेतला स्वत:ला हवा तसा आणि रिहर्सलची पाटी स्वच्छ पुसत गाणं दहापट उंचीवर नेऊन ठेवलं. माईकसमोर ताठ उभे राहून एक एक जागा लखलखीत करून टाकली. दुस-या अंतर्याला डोळे मिटले तर आत्ममग्न चित्रकार , रांगोळी काढण्यात रमलेली स्त्री , स्वत:वरच बरसणारा पाऊस असं वाटवाटेल ते दिसत राहिलं. २० मिनिटे रिहर्सल , ४० मिनिटात फायनल डब ! आहे?
नंतर बरेच ऐहिक क्षण लाभले. 'हे शब्द गायला मिळाले , लिखाण थांबवू नका (ह्या रेकॉर्डिंगनंतर खरोखर त्याच दिवशी लेखन थांबवण्याची माझी इच्छा होती जी नरेंद्र ने त्यांना सांगितली) , कवीची सही हवी (जी देण्याचा उद्दामपणा घडला नाही नशिबाने!) ' पासून कविता वाचून दाखवताना त्यांना न आवरलेले अश्रू ...............
पण .. पण ते ऐहिकच शेवटी. त्या जे गा(य)ल्या ते अलौकिक. असे पुन्हा होणे नाही. पुन्हा दुसरं एखादं गाणं गायल्या तरीही बहुतेक नाही कारण तेव्हा मी अधिक निर्ढावलेला असेन. त्यानंतर वांग्याच्या भाजीपासून ते बिरड्याच्या उसळीपर्यंत सर्व चर्चा करून त्या जेव्हा बाहेर पडल्या .. त्या क्षणी मनात पहिला आलेला विचार ..मायबोली !
ह्या आधीही मी मायबोलीवरती रिपोर्ट कार्ड मिळाल्यानंतरच्या उत्साहात पळत पळत आलो आहे. अखिल भारतीय कविसंमेलनात कविता सादर केल्यानंतर म्हणा किंवा पहिला अल्बम रेकॉर्ड झाल्यानंतर म्हणा. मध्यंतरी मात्र ह्यात खंड पडला होता. वेळेअभावीच असे नाही म्हणणार . काही गैरसमजही होते . काही समज दृढ होत गेले होते . घर म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. परंतू कवितेशी निगडित प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीनंतर प्रकर्षाने मायबोलीची आठवण होणं अपरिहार्य आहे. मुळात मी कवी नव्हे. जे काही घडलं ते इथे आल्याने घडलं. मी इथून निघता निघता 'मेट्रन' नावाचा आयडीही घेतला होता . थोडा मनोरंजनासाठी म्हणा , थोडा काही नॉन इश्यूज सेट्ल करण्यासाठी म्हणा . काही काळ मजा आली , काही काळ आसुरी आनंदही मिळाला असावा. पण त्यात कायमस्वरूपी काही नव्हतं. जे लोक प्रत्यक्ष भेटले आहेत किंवा मेल, चॅट मधून बोलले आहेत त्यांच्यासोबत आत्मीयता अजूनही टिकून आहे. ज्यांना कधी भेटू शकलो नाही त्यांच्याबद्दल केवळ भेटण्याची उत्सुकता आहे. एवढंच खरं.
आता पुन्हा तसे रागलोभाचे , रुसव्याफुगव्यांचे बंध जुळण्याइतका मी निरागस राहिलो आहे की नाही कल्पना नाही पण प्रवासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर , अगदी पूर्वीगत धावतपळत नाही आलो तरीही, मला हे रिपोर्ट कार्ड दाखवायला इथेच प्रथम यावसं वाटलं. पुढचं खरंच माहीत नाही. सर्वांना मन:पूर्वक शत शत धन्यवाद आणि शुभेच्छा !!!
क्षणभंगुर सारी माया , सारे मोह
आकंठ बुडावे असा एक ना डोह
नैमित्तिक इथले फुलणे , झुरणे , सुकणे
ही माती शाश्वत, बाकी सारे.. देह !!!
===============================================================================
मी पहिली इथे अस म्हणायला
मी पहिली
इथे अस म्हणायला मनापासून आनंद होतोय
आता प्रतिक्रीया....ते काय असतं? वैभवनी असं काही लिहिल्यावर त्यावर आपण लिहितो त्याला प्रतिक्रिया म्हणाव का?... का नुसत्याच शुभेच्छाच द्याव्यात? तू अजून खूप खूप मोठा झालेला आम्हाला पहायचय. एवढ म्हणायच असेल तर कोणते शब्द वापरावेत. तू परत आलायस अस म्हणावं का? आता पुन्हा तू इथे लिहिणार आहेस हा प्रश्न विचारावा....? बरच काही. पण सध्या फक्त मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
क्षणभंगुर सारी माया , सारे मोह
आकंठ बुडावे असा एक ना डोह
नैमित्तिक इथले फुलणे , झुरणे , सुकणे
ही माती शाश्वत, बाकी सारे.. देह !!!>>>एवढ सगळ लिहून अनुभवून पुन्हा असं म्हणू शकतोस इथेच तुझं वेगळेपण सिद्ध होतं.
अभिनंदन! मला माहीत
अभिनंदन! मला माहीत नव्हते.
मस्त लिहीले आहे. आवडले एकदम!
अभिनंदन. खूप आनंद झाला. आता
अभिनंदन. खूप आनंद झाला.
आता ते गाणे आशाचा आवाजात कधी ऐकायला मिळेल असे झालेय.
मस्त लेख. लेखाला नावच इतकं
मस्त लेख. लेखाला नावच इतकं विशेष दिलय की प्रत्येकजण आत डोकावल्याशिवाय राहणार नाही.
शेवटच्या ओळी सुरेखच
वैभव, खरच तुझा अभिमान आहे
वैभव, खरच तुझा अभिमान आहे आम्हाला. तुझं अभिनंदन आणि खूप सार्या शुभेच्छा!
अतिशय सुरेख लिहिलय.....
अतिशय सुरेख लिहिलय..... आवडलं...
abhinMdan
वा! वा! सुंदर लिहिलंय.
वा! वा! सुंदर लिहिलंय.
'पुन्हा घेतली मी भरारी वगैरे...' - हे वैभव जोशी तुम्हीच ना? (माफ करा, पण मी कवितांच्या वाट्याला फारशी जात नाही. पण मध्यंतरी नील, किरु यांच्या सेलफोनवर रेकॉर्ड केलेली ही रचना ऐकली, ऐकायला खूप छान वाटली आणि वैभव जोशी हे नाव तेव्हापासून लक्षात राहीलं होतं.)
अभिनंदन ! पुढील वाटचालीस
अभिनंदन ! पुढील वाटचालीस शुभेच्छा.
शेअर केल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.
खुप छान प्रवास लिहिलाय
खुप छान प्रवास लिहिलाय माबोवरचा अगदी चांगल्या वाईटासह त्यामुळेच जास्त भावला.
बाकी आशाताईंनी तुमचं (तुम्ही लिहिलेल )गाणं गायल म्हणजे खरच खुप छान. लिहित रहा.
जन्मजात कुणीच लेखक कवी नसतो आजुबाजुच्या घटना, निसर्ग त्याला प्रोत्साहित करुन त्याच्याकडुन लिहुन घेत असतो.
सुंदर लिहिलंय. मनापासुन
सुंदर लिहिलंय.
मनापासुन अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!!!
'पुन्हा घेतली मी भरारी वगैरे...' - हे वैभव जोशी तुम्हीच ना? (माफ करा, पण मी कवितांच्या वाट्याला फारशी जात नाही. पण मध्यंतरी नील, किरु यांच्या सेलफोनवर रेकॉर्ड केलेली ही रचना ऐकली, ऐकायला खूप छान वाटली आणि वैभव जोशी हे नाव तेव्हापासून लक्षात राहीलं होतं.)>>>>>ललिता, सेम पिंच :-). मी सुद्धा नील, किरू कडुनच "'पुन्हा घेतली मी भरारी वगैरे.." हि रचना ऐकली. सुंदरच!!!!
निमित्त आहे आशाताईंनी माझ्या
निमित्त आहे आशाताईंनी माझ्या हातून लिहिलं गेलेलं एक गाणं गायल्याचं.>>>
अभिनंदन !
दोन चारोळ्या एकत्र केल्या म्हणजे एक कविता होत नसते , दोन यमक जुळणार्या ओळी लिहिल्या गेल्या तर एक गज़लचा मतला होत नसतो , चार वृत्तबद्ध ओळी म्हणजे रुबाई नव्हे हे प्रश्न कसे सुटत गेले माहीत नाही. छंद, मुक्तछंद , मीटर, वृत्त , रदीफ़ , कवाफी, नज़्म , त्रिवेणी ह्या गोष्टी आयुष्यात कधी , कुठून , कशा आल्या आणि लॅंडिंग नोट्स , स्कॅनिंग , पिचिंग , हार्मनी , इंट्रो म्युझिक , एम १ , एम २ , हे शब्द कधी ओठांवर रुळले कळलंच नाही , कळूही नये.
>>>> याविषयी अजुन जाणुन घ्यायला आवडेल !
कदाचित ...आपला अनुभव नवोदितांना मार्गदर्शक ठरेल ....
अभिनंदन आणि
अभिनंदन आणि शुभेच्छा!
आशाताईंबरोबरचा अनुभव वाचताना छान वाटलं. सुरेख लिहिलय तुम्ही. गाणं ऐकायला नक्कीच आवडेल.
जबरदस्त, अत्यंत मनस्वी आणि
जबरदस्त, अत्यंत मनस्वी आणि थेट. आवडले!
अभिनंदन. कवितांच्या वाट्याला
अभिनंदन. कवितांच्या वाट्याला न जाणार्या माझ्यासारखीने पण अनेकांकडून तुमच्या कवितांबद्दल ऐकलंय.
मनापासून लिहिलेला हा प्रवास वाचायला आवडला.
अभिनंदन आणि सदिच्छा!!!
अभिनंदन आणि सदिच्छा!!!
अभिनंदन रे वैभवा. मस्तच. तुला
अभिनंदन रे वैभवा. मस्तच.
तुला मायबोलीचं देणं, आणि आम्हाला तुझ्या शब्दांचं देणं.
अभिनंदन.
अभिनंदन.
आतापर्यंत खूप जणांचं हसणं
आतापर्यंत खूप जणांचं हसणं ऐकलं आहे पण ओठ विलगण्याआधी थेट सूर लागलेलं हे पहिलं. >>> वैभव
हा कोण वैभव जोशी जो इतक्या
हा कोण वैभव जोशी जो इतक्या जिव्हाळ्याने मायबोलीबद्दल बोलतो आहे ?'
हे काय बोलण झाल ? खुपशे माबोकर तुमचे फॅन आहेत.
वैभवजी परत माबो वर चालु करा तुमच्या चारोळ्या आणि कविता.
ती तुमची ऋतू येत होते ऋतु जात होते गझल अजुन आठवते. मला लिंक मिळाली तर टाकतेच.
तुमचे मनःपुर्वक अभिनंदन.
वैभव अभिनंदन आणि शुभेच्छा
वैभव
अभिनंदन आणि शुभेच्छा .
लेख तर खूप सुंदर झालाय. वाचताना वाटतं अरे हे तर आपलंच मन बोलतंय. खूप आवडला लेख.
वैभव, खरच तुझा अभिमान आहे
वैभव, खरच तुझा अभिमान आहे आम्हाला..अभिनंदन आणि खूप सार्या शुभेच्छा! शामलीला अनुमोदन !!
मनःपूर्वक अभिनंदन..
मनःपूर्वक अभिनंदन..
खूप खूप अभिनंदन!
खूप खूप अभिनंदन!
वैभव, तुझं अनेकदा अभिनंदन!
वैभव,
तुझं अनेकदा अभिनंदन! मनापासून! आणि अधिक जे आवडले ते हे की येथे ते येऊन सर्वांशी शेअर करणे!
पुढील कारकीर्दीसाठी अनेक शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
अभिनंदन!!!!!
अभिनंदन!!!!!
मस्त लिहिलं आहेस. straight
मस्त लिहिलं आहेस. straight from the heart!
मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!
ग्रेट.. आशा भोसलेंनी
ग्रेट.. आशा भोसलेंनी गाण्याला सुंदर म्हटले म्हणजे ग्रेटच असणार..
माझ्याकडे सोबतीचा करार होती. कित्ती वेळा ऐकली, अजुनही आहे, पण आता सिडी खराब झालीय
अतिशय सुंदर कविता दिल्याबद्दल धन्यवाद...
हे गाणे अतिशय सुंदर आहे... आता ऐकायला कधी मिळतेय त्याची उत्सुकता आहे.
मित्रा.. तुझ्या कित्येक
मित्रा.. तुझ्या कित्येक शब्दांतून जीवन अनुभवलं अन त्यावरच तरला गेला काही खडतर काळ तरी... अनेक संकटात ब्लँक झालेलो असताना जर काही सोबत होतं तर फक्त तुझे शब्द.. फक्त वैभव जोशीचे शब्द! माझ्यासाठी माझ्यापुरतं तरी वैभव जोशी म्हणजेच काव्य!
...पण ह्या लेखात.. ह्या दोन हजार पंचेचाळीसच्या आसपास असलेल्या शब्दात.. कधी स्वप्नातही विचार न केलेलं ते वाक्य तुझ्या मनात का अन कसं आलं ह्या विचाराने आत्ता तरी पछाडून सोडलंय..
तुझ्या पुढच्या सगळ्याच वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा मित्रा!
वैभवा - अभिनंदन मित्रा
वैभवा - अभिनंदन मित्रा !
तुझ्या कारकिर्दीचा आलेख असाच उंचावत राहू दे !
हे लेखनही थेट .. तुझ्या कवितांसारखेच .. भिडणारे.
अभिनंदन!
अभिनंदन!
Pages