'श्रम ही है श्रीराम हमारा' असं म्हणणार्या बाबांनी वरोड्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर 'आनंदवन' उभारलं. कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला. ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. विकास आणि प्रकाश या त्यांच्या अफाट कर्तृत्ववान मुलांनी बाबांचा वारसा चालवला. डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे हे गेली अनेक वर्षं भामरागडच्या जंगलात राहून आदिवासींचं जगणं सुसह्य व्हावं, म्हणून प्रयत्नरत आहेत.
१९७३ साली हेमलकशाला लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा तिथले माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलीकडचं जग त्यांना माहीत नव्हतं. आज मात्र तिथे सुसज्ज रुग्णालय आहे, शाळा आहे. तिथली मुलं शिकून डॉक्टर, वकील होतात. वैद्यकीय उपचारांअभावी होणार्या मृत्यूंचं प्रमाण अत्यल्प आहे. या 'अंधाराकडून उजेडाकडे' झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे, विलास मनोहर, जगन मचकले, दादा पांचाळ, गोपाळ फडणीस, रेणुका मनोहर आणि आता दिगंत, अनघा व अनिकेत या सार्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची, दुर्दम्य जिद्दीची कहाणी म्हणजे 'प्रकाशवाटा' हे डॉ. प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्र. या पुस्तकातील ही काही पानं...
लग्न झाल्याच्या दुसर्याच दिवशी आम्ही ताडोबाला गेलो. नंतर तिथून आलापल्ली-भामरागडकडे. तिथेच एक रात्र मुक्काम केला. तिथल्या फॉरेस्ट-ऑफिसरना आम्ही लग्न झाल्या झाल्या जंगलात आलो आहोत आणि इथेच काम करणार आहोत, या गोष्टीचं फार कौतुक वाटलं. लग्नाच्या आधी मंदाने ही जागा पाहिली नव्हती. मी कल्पना दिली होती; पण प्रत्यक्ष काम कोणत्या परिस्थितीत करावं लागेल याचा अंदाज तिला लग्नानंतरच आला. मंदाने आनंदवन, सोमनाथचे प्रकल्प पाहिले होते. तिथे त्या वेळी बर्याच सुधारणा झाल्या होत्या. हे प्रकल्प शहराच्या जवळही होते. हेमलकशालाही असंच काही तरी असेल, असं तिला वाटलं असणार. प्रत्यक्षात तसं नव्हतं. तरी ती शांत होती.
लग्न झाल्यावर आणि ताडोबा-भामरागडला फिरून आल्यावर आम्ही दोघंही नागपूरला परतलो. नागपूरच्या जवळ 'अशोकवन' नावाचा आणखी एक कुष्ठरोगी पुनर्वसन प्रकल्प होता. आम्ही तिथे राहिलो. तिथूनच नागपूरला ये-जा करायचो.
अनेकजणांना नकार देऊन मंदाने माझ्याशी लग्न केलं, याचा परिणाम मात्र मला पुढे भोगावा लागला. झालं असं, की मंदाने लग्नाआधी पहिला हाऊस जॉब मेडिकलला सर्जरीत केला होता. तिथल्या सर्जनची इच्छा होती, की तिने आपल्या एका विद्यार्थ्याशी लग्न करावं. ते दोघंही तेव्हा एकाच वॉर्डात काम करत होते. मंदाने त्याला नकार दिला. ते सर्जन तिच्यावर सक्ती तर करू शकले नाहीत, पण तो राग त्यांनी माझ्यावर काढला. माझा हाऊस जॉब संपून मी जेव्हा 'नागपूर मेडिकल कॉलेज'ला रजिस्ट्रेशनसाठी गेलो तेव्हा ते तिथे होते. त्यांनी सरळ मला प्रवेश नाकारला. नकाराला कारण काहीच नव्हतं. बाराजणांना प्रवेश मिळणार होता, आणि त्यात माझा नंबर पाचवा होता. तरीही त्यांनी त्यांच्या अखत्यारीत मला प्रवेश दिला नाही. हा माझ्यावर सरळ सरळ अन्याय होता. त्या वेळेस मला बर्याचजणांनी कोर्टात दाद मागायचा सल्ला दिला; पण मी तसं केलं नाही... कोर्टात निर्णय माझ्या बाजूने होईल याची खात्री असूनही. एक तर मला या प्रकारे प्रवेश मिळाला असता, तरी त्यांच्याच हाताखाली काम करायचं असल्याने त्यांनी त्रास दिलाच असता. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मी पोस्टग्रॅज्युएशन करत होतो. ती हेमलकशाची जागा अजून ताब्यात आली नसल्याने मी पुढे काय करणार हे ठरवलेलं होतं. त्यामुळे कोर्ट-कचेरीसारख्या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलं.
नागपूरलाच 'इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज' होतं. मेडिकल फॅकल्टीचे डीन डॉ. दशपुत्रे यांना भेटून मी त्यांना माझी अडचण सांगितली. त्यांनी मला प्रवेश द्यायचं कबूल केलं. पण तिथली रजिस्ट्रारची जागा फक्त स्थानिक लोकांसाठी होती. त्यामुळे मला प्रवेश मिळाला तरी प्रत्यक्ष काम करता येणार नव्हतं. नुसतं यायचं, स्वतः काही करायचं नाही, फक्त इतर विद्यार्थी ऑपरेशन कसं करताहेत ते लांबून बघायचं. मला हे पसंत नव्हतं; पण माझ्यापुढे पर्याय तरी काय होता?
दरम्यान, मंदाने तिचं शिक्षण संपल्यावर 'गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज'मध्ये नोकरी सुरू केली. तेव्हा तिला ८५० रुपये पगार होता. आमच्या दोघांचा खर्च त्यातून सहज भागायचा. मनासारखं काम करायला न मिळाल्यानं माझी अस्वस्थता मात्र वाढत होती. हेमलकशाच्या जागेसाठी अर्ज देऊन तीन वर्षं होत आली होती. पण माझ्या सुदैवाने याच सुमारास हेमलकसा व नागेपल्ली या दोन्ही जागांचे अर्ज मंजूर झाल्याचं पत्र सरकारकडून मिळालं आणि माझा मार्ग खुला झाला.
आनंदवनातून हेमलकसा होतं अडीचशे किलोमीटरवर. रस्ते अगदीच खराब होते. काही ठिकाणी तर रस्तेच नव्हते. त्यामुळे तिथे जायला तब्बल एक दिवस लागायचा. वाटेत नदी आणि ओढेही होते. पावसाळ्यात ते भरून वाहायचे. अशा वेळी अडकून बसायला होणार. म्हणून वाटेत मुक्काम करायला एक जागा असावी म्हणून आम्ही 'नागेपल्ली'ची जागाही मागितली होती.
जागा मंजूर झाल्याचं पत्र शासनाकडून मिळताच बाबा आपल्या काही कार्यकर्त्यांसह हेमलकशाला जाऊन धडकले. २३ डिसेंबर १९७३ या दिवशी त्यांनी तिथे मुक्काम ठोकला. याच दिवशी 'लोकबिरादरी प्रकल्पा'च्या कामाचा खर्या अर्थाने प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच. पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हते. "तू तुझ्या वेळेला ये - मी कामाला सुरुवात करतो," असं म्हणून ते तिथे पोहोचले. पण बाबांची इच्छा, काम उभारण्याची ओढ याच्याशी सरकारी कारभाराचा मेळ कसा बसणार? त्यामुळे हा प्रकल्प उभा करण्याच्या कामात सुरुवातीलाच विघ्न निर्माण झालं.
हेमलकशाची जागा मूळ वनखात्याची होती. त्यांनी ती महसूलखात्याला दिली आणि महसूलखात्याने बाबांना, म्हणजे 'महारोगी सेवा समिती'ला दिली होती. ही जागा मिळाल्यामुळे नवा प्रकल्प उभारता येणार, या भावनेने बाबांना अगदी स्फुरण चढलं होतं. ज्या कार्यकर्त्यांना घेऊन बाबा हेमलकशाला पोहोचले होते, त्यांच्या राहण्यासाठी - वावरण्यासाठी जंगलातील काही जागा मोकळी करणं आवश्यक होतं. त्यामुळे बाबांनी तिथे जाऊन झाडं तोडायला सुरुवात केली. झाडं तोडली जात आहेत हे कळताच तिथे वनाधिकारी आले आणि त्यांनी "तुम्ही बेकायदा आमच्या जागेत कसे घुसलात?" असा आक्षेप घेणं सुरू केलं. बाबा म्हणाले, "कागदोपत्री जागा माझी आहे." त्यावर ते म्हणाले, "पण त्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही." ते ऐकेनात. त्यामुले मोठा पेच निर्माण झाला.
खरं तर बाबा थेट हेमलकशाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनाधिकार्याला खटकलं होतं. आपल्याला त्यांनी आधी कल्पना द्यायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. थोडक्यात, त्याला महत्त्व न दिल्याने तो चिडला होता. तेव्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथे होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढला. "झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही त्यांच्याकडून वसूल करा," असं त्यांनी वनाधिकार्याला सुचवलं. वनाधिकार्याने ही सूचना स्वीकारली आणि तोडलेल्या झाडांची काही एक किंमत ठरवली. तेवढी रक्कम दिल्यानंतरच कुठे हे प्रकरण मिटलं.
हेमलकशाची जागा मिळाली तेव्हा मी नागपुरात शिकत होतो. पण जागा मिळेपर्यंत वेळ काढण्यासाठीच मी शिकत असल्याने जागा ताब्यात आल्याचं कळल्यानंतर मी माझं शिक्षण सोडून हेमलकशाला जायचं ठरवलं. नागपूरच्या कॉलेजमध्ये मी जे काही करत होतो त्यात मला अजिबात आनंद वाटत नव्हता, त्यामुळे हेमलकशाला जायला मी खूपच उत्सुक झालो होतो. त्यामुळे सर्जरीची परीक्षा तोंडावर आली असतानाही ती सोडून मी हेमलकशाला जायचा निर्णय घेतला. या निर्णयाचं बाबांना खूप वाईट वाटलं. मी शिक्षण पूर्ण करावं, थोडासा अनुभवही घ्यावा आणि मग हेमलकशाला यावं असं त्यांना वाटत होतं. तेव्हा ते काही बोलले नाहीत. मात्र, सर्जरीचा अनुभव गाठीशी असावा अशी त्यांची इच्छा असल्यामुळे आमचे स्नेही डॉ. वैद्य यांच्याकडे घटप्रभेला जाऊन मी वीस दिवस हॉस्पिटलात सर्जरीचा अनुभव घेतला.
मार्च १९७४ मध्ये मी हेमलकशाला गेलो, तोपर्यंत बाबांनी पॅरामेडिकल सेवा द्यायला सुरुवात केली होती. कामाची थोडी सुरुवात झाली की मग मंदाने यायचं, असं ठरवलं होतं. (त्यामुळे ती नागपूरलाच राहिली. ती डिसेंबर १९७४ मध्ये नोकरी सोडून हेमलकशाला आली. )
हेमलकशाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग बघणार्यांना येणार नाही. तेव्हा तिथे नुसतं दाट जंगल होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली, की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. सगळीकडे नीरव शांतता. आवाज फक्त वन्य प्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीच्या पाण्याचे. साप आणि विंचू यांचं अस्तित्व पावलापावलांवर होतं. गाव-शहरापासून संपूर्णपणे तुटलेला आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल असा हा भाग होता. आरोग्यसेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणं ही गोष्ट तुलनेने खूपच सोपी वाटावी, अशी परिस्थिती तेव्हा हेमलकशात होती. एखाद्या खेड्यात जेव्हा आरोग्यसेवा देण्याचा प्रकल्प उभारला जातो तेव्हा तिथे राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा उपलब्ध असतात. निदान आजूबाजूला माणसं तरी असतातच असतात. हेमलकशात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. वीज नव्हती, पाणी नव्हतं, राहायची जागा नव्हती, माणसंही नव्हती. होतं फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी.
मी हेमलकशाला पोहोचण्यापूर्वी बाबांच्या बरोबर अजित मळकर्णेकर, नागेश हटकर, राज सुलाखे हे कार्यकर्ते तिथे पोहोचले होते. जगन मचकले, दादा पांचाळ हेही १९७४ सालीच आले. दादा पांचाळ हे सोमनाथच्या शिबिराला आले होते. तिथले काम बघून ते प्रभावित झाले आणि आपलं शिक्षण सोडून देऊन ते हेमलकशाला येऊन थांबले. जगन मचकले हा मूळचा नांदेडचा. तोही शिबिराला आला होता आणि खूपच प्रभावित झाला होता. बाबांनी त्याला 'या प्रकल्पासाठी नागेपल्लीला राहशील का' असं विचारल्यानंतर तो लगेच तयार झाला. पाठोपाठ विलास मनोहर, गोपाळ फडणीसही आले. शरद कुलकर्णी, मुकुंद दीक्षित हेही होते. नंतर जगदीश गोडबोलेही पुण्याहून काही दिवस येऊन राहिला होता. पाहता पाहता एक चांगली टीम त्यातून आकारत गेली.
सुरुवातीला आमचा मुक्काम झाडाखालीच होता. पण झाडाखाली तरी किती दिवस राहणार? त्यामुळे राहण्यासाठी काही तरी सोय करायला हवी होती. मग प्रकाश पेडणेकर नावाच्या कार्यकर्त्याने एक झोपडी बांधली. जंगलाच्या मध्यभागी झोपडी बांधणं हे कठीणच काम होतं. पण आधी थोडी झाडं तोडून आसपासचा भाग साफसूफ केल्यानंतर झोपडी बांधता आली. या झोपडीमुळे डोक्यावर किमान छप्पर तरी आलं. आम्ही कार्यकर्ते संख्येने थोडेसेच असल्याने सगळे एका झोपडीत राहू शकायचो. पण पुढे मंदा आल्यावर झोपडी अपुरी पडायला लागली. मग ती मोठी केली. इतरही एक-दोन झोपड्या तिथे बांधल्या. हेमलकशाला काम सुरू करायचं, हा हेतू मनाशी धरून आम्ही दहा-बाराजण बाबांबरोबर तिथे आलो होतो हे खरे; पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की इथे अक्षरशः शून्यातून काहीतरी निर्माण करायचं होतं. काम करण्याच्या दृष्टीने आमच्यासाठी कोणतीही सुविधा तिथे नव्हती. आम्ही थोडासा शिधा बरोबर घेऊन गेलो होतो. तेवढंच काय ते आमच्यापाशी होतं. राहण्यासाठीची किमान व्यवस्था उभारणं, पाण्याची सोय करणं, या गोष्टी केल्यानंतरच खरं काम सुरू होणार होतं. आधी स्वतःचं थोडं बस्तान बसवणं आणि तेथील वातावरणाशी जुळवून घेणं आमच्यासाठी आवश्यक होतं.
डोक्यावर छप्पर उभारण्याबरोबरच पाण्याची सोय करण्यावर आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलं. आम्ही जिथे आमचा मुक्काम ठोकला होता तिथे शेजारीच एक नाला होता. या स्रोतातून पाणी मिळवण्याच्या भूमिकेतून आम्ही त्याच्या शेजारी एक तात्पुरती विहीर खोदली. विहीर कसली, खड्डाच! ते पाणी आम्ही पिण्यासाठी वापरायचो. वापरायचं पाणी नदीवरून आणायचो. नदी दोन-अडीच किलोमीटरवर होती. त्यामुळे बैलगाडीत ड्रम टाकून फेर्या करायचो. आम्ही सगळे शक्यतो नदीवरच अंघोळीला जायचो. कारण नीट राहायला जिथे जागा नाही तिथे अंघोळीला बंदिस्त जागा कुठून असणार? सुरुवातीला टॉयलेट्सचीही सोय नव्हती. मला या सगळ्याची थोडीफार सवय होती. मंदाला मात्र हे सगळंच नवीन होतं.
अशा परिस्थितीत राहणं हे काही दिवसांसाठी ठीक होतं; पण एकेक करून एकेक काम हाती घेणं आणि ज्या हेतूने आम्ही इथे आलो होतो त्या आरोग्यसेवेला सुरुवात करणं आवश्यक होतं. हे काम करायचं तर त्याला मनुष्यबळ हवं. आम्ही मोजकेच कार्यकर्ते होतो. बाबांनी या गोष्टीचा आधीच विचार केलेला होता. कुष्ठरोगावर उपचार घेऊन बर्या झालेल्या आनंदवनातील काही कुष्ठरोग्यांना त्यांनी प्रकल्पावर आणलं. हे सगळे बरे झाले असले तरी त्यांचं कुटुंब, समाज त्यांना स्वीकारायला तयार नव्हता. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, असा बाबांसमोर प्रश्न होता. कुष्ठरोग्यांना निव्वळ बरं करणं, एवढाच मर्यादित हेतू त्यांच्यासमोर नव्हता. त्यांना आत्मविश्वास परत मिळवून देणं, हे बाबांच्या सगळ्या कामामागचं उद्दिष्ट होतं. कुष्ठमुक्त होऊनही आपल्याला लोक स्वीकारत नाहीत म्हटल्यावर त्या माणसाला वैफल्य येण्याची शक्यता होती. तसं होऊ नये म्हणून बाबांनी या सगळ्यांना वेगवेगळ्या कामांत गुंतवलं. ज्याला ज्यात रस आहे ते काम त्याला शिकवलं. त्यामुळे हे सगळे कुष्ठरोगी शेती, नर्सरी, लाकूडकाम, विटा करणं, अशा कामांमध्ये गुंतले गेले. आपल्याला समाज स्वीकारत नाही, याचं दु:खही त्यातून कमी होण्यास मदत झाली. शंकरदादा नावाचे एक बाबांचे सहकारी होते. बाबांचा जणू उजवा हातच! तेही कुष्ठरोग झाल्यानेच आनंदवनात आले होते. माणूस मोठा कर्तबगार. त्यांनी पुढे सोमनाथचा प्रकल्प सांभाळला. बाबांनी अशा किती तरी जणांत 'आपण खूप काही करू शकतो' हा विश्वास निर्माण केला.
असेच काही कार्यकर्ते त्यांनी हेमलकशालाही आणले. झाडं तोडणं, खोदाई करणं, कच्चे रस्ते करणं, या कष्टाच्या कामांत त्यांनी स्वतःला झोकून दिलं. आम्ही त्यांना मदत करत होतोच; पण त्यांनी या सगळ्यासाठी खूप कष्ट घेतले. आनंदवनात माळरानावर वसाहत उभी राहिली तेव्हा मी लहान होतो. आता तेच काम इथे जंगलात करताना आनंदवनाच्या उभारणीमागील कष्ट जाणवत होते. झाडं तोडताना, दगड फोडताना हात भरून यायचे; पण आपण काही तरी नवीन निर्माण करतोय याचा आनंदही व्हायचा.
काही दिवसांच्या सतत परिश्रमांनंतर थोडी मोकळी जागा तयार झाली. त्यात आमच्या झोपडीप्रमाणेच कुष्ठरोगी कार्यकर्त्यांसाठी राहायला एक शेड तयार केली.
याशिवाय धान्य ठेवायला, स्वयंपाक करायला आणखी एक शेड तयार केली. धान्याची पोती ठेवायला लाकडाचा एक प्लॅटफॉर्मही बनवला. कारण धान्य खाली ठेवलं तर त्याला वाळवी लागणार. त्याच शेडच्या सारवलेल्या भागात स्वयंपाकी स्वयंपाक करायचा. अशा रीतीने किमान काही एक व्यवस्था उभी राहू लागली. 'विहिरी'मुळे पाण्याची थोडीफार सोय झाली. आमच्यासाठी एवढ्या सोई खूप होत्या. शिवाय आम्ही जंगलाला आमचं घर मानलं होतं, कारण कोणता वन्य प्राणी आमच्यासमोर कसा आणि कुठून एकदम दत्त म्हणून उभा राहील याचा नेम नव्हता. पण त्यांच्यासह जगायला आम्ही शिकलो आणि पाहता पाहता हेमलकशातील आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.
मी आणि माझे सहकारी इथे आल्यावर बाबा परत आनंदवनात गेले; पण ते भेटायला यायचे, राहायचे. हेमलकशातलं हवामान एकदम टोकाचं. उन्हाळा खूप कडक, तशीच थंडीही. पाऊस तर एकदा कोसळायला लागला की थांबायचं नावच घेत नाही. अफाट पावसामुळे आणि नंतर येणार्या पुरामुळे नागेपल्ली हा जणू आमचा 'बेस कँप'च बनला. तिथून हेमलकसा ६५ किलोमीटरवर आहे, उंचावर आहे. हा सगळा रस्ता त्यामुळे अर्थातच चढाचा. तेव्हा तर रस्ता असा नव्हताच. वाटेत आठ-दहा ओढे, नाले आणि बांदिया नदी. हेमलकसा हे उंचावरचं ठिकाण आणि तिथलं दाट जंगल, यामुळे पाऊस सुरू झाला की बदाबदा कोसळायचा. हे पाणी वाहत खाली गेलं की ओढ्या-नद्यांना पूर यायचा आणि रस्ते बंद व्हायचे. मग आम्ही इकडे आणि बाकीचं जग तिकडे. एकमेकांशी काही संपर्कच नाही. पूर्णपणे 'कट-ऑफ'. जून ते डिसेंबर या काळात सगळंच बंद असायचं. वाहतूक अशी नसायचीच. एखाद्याला त्या पावसात कुठे जायची वेळ आलीच तर तो त्या ठिकाणी किती दिवसांनी पोचेल याचा काही भरवसा नाही. कारण पाणी उतरून रस्ता खुला होणं, हे काही आपल्या हाती नव्हतं.
पावसाळ्याच्या आधी बाबा हेमलकशाला यायचे. एकदा पाऊस सुरू झाला की चार-सहा महिने गाठीभेटी होणार नाहीत, अशा विचाराने ते आमच्या इथे थांबायचे. पावसाचा जोर सुरू होण्याअगोदर त्यांना आनंदवनाला परतणं भाग असायचं. पण त्यांचा पाय निघायचा नाही. कधी आकाश भरून आलेलं असायचं, तर कधी पाऊस सुरूही झालेला असायचा. अशा वेळी त्यांनी निघावं की नाही, असंही वाटायचं. जास्त वेळ थांबले तर नदी भरणार तर नाही, अशी काळजी असायची. मग ते घाईघाईने निघायचे. कारण नदी पार झाली नाही तर ते अडकून बसणार - तेही पूर ओसरेपर्यंत. तो ओसरायला कितीही दिवस लागू शकत. वाटेतले ओढे भरल्याने ते परतही येऊ शकत नसत. त्यामुळे ते गेले तरी आम्हाला काळजी वाटत राहायची. कारण ते अडकले की व्यवस्थित पोचले, हे कळायलाही काही मार्ग नसायचा.
हे झालं पावसाळ्यातलं. पण एरवीही बाबा हेमलकशाला येत तेव्हा त्यांचा प्रवास खडतर असायचा. तेव्हा रस्तेच नसल्यामुळे हेमलकशात बस वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे बाबा ट्रकने यायचे. नंतर नदी पार करावी लागायची ती डोंग्यातून. डोंगा म्हणजे लाकडाचा ओंडका कोरून केलेली छोटी होडी. ती पाण्याच्या एक इंच वर राहते. बाबा एरवी एकदम डॅशिंग. त्यांना घोड्यावर बसण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत सगळ्या गोष्टी यायच्या. फक्त त्यांना पोहता येत नव्हतं. त्यांना पाण्यापासून धोका आहे, असं कुठल्या तरी ज्योतिष्यानं बाबांच्या वडिलांना सांगितलं होतं, त्यामुळे त्यांनी बाबांना पाण्याजवळ जाऊच दिलं नव्हतं. त्यांचं पोहायला शिकणं राहून गेलं ते राहूनच गेलं.
एकदा बाबा, मी आणि मंदा डोंग्यातून नदी पार करून येत होतो. आमच्यात पोहायला येणारा मी एकटाच. बाबांना जसं पोहता येत नव्हतं तसंच मंदालाही पोहता येत नव्हतं. बाबा मला चेष्टेनं म्हणाले, "काय रे, आता होडी बुडाली तर कुणाला वाचवशील? मला की हिला?" मी अर्थातच निरुत्तर झालो. काय बोलणार?
रस्ते नसणं, नदी पार करायची चांगली सोय नसणं, या अडचणी बाबांना कधी जाणवल्याच नाहीत. काहीही झालं तरी ते हेमलकशाला येत राहिले. पण जेव्हा बाबांना तब्येतीमुळे होडीतून येणं जमेनासं झालं तेव्हा त्यांनी दुसरा मार्ग अवलंबला. ते नदीच्या काठापर्यंत ट्रकमधून झोपून यायचे आणि पलीकडच्या तीरावर मुक्काम करायचे. ते आले की तिथून जगन तसा निरोप घेऊन ३० किलोमीटर सायकल दामटत यायचा. मग आम्ही बैलगाडी घेऊन त्यांच्यापर्यंत जायचो. बाबा आनंदवनातून सहसा सकाळी निघायचे नि नदीपलिकडे दुपारपर्यंत पोचायचे. जगन निरोप घेऊन आला की आम्ही लगेच बैलगाडी घेऊन निघायचो; पण त्यांच्यापर्यंत पोचायला रात्र व्हायची. मग आम्ही तिथेच मुक्काम करायचो. त्यांना घडलेल्या बर्या-वाईट घटना मुक्कामात सांगायचो. सकाळी ते आनंदवनाकडे जायला निघायचे आणि आम्ही हेमलकशाला यायला निघायचो. डिसेंबर ते जून या काळात त्यांच्या अशा खूप चकरा व्हायच्या. आम्हाला काळजी वाटायची; पण ते ऐकायचे नाहीत.
हेमलकशाच्या प्रकल्पाबद्दल त्यांना आस्था असल्यामुळे आणि आमची गैरसोय होणार नाही याकडे त्यांचा कटाक्ष असल्यामुळे आनंदवनातून ते आवश्यक चीजवस्तू हमखास पाठवत. आम्ही जंगलात राहत असल्यामुळे आम्हाला काहीच मिळत नसे. सगळं धान्य, सामान, भाजीपाला, औषधं या बाबतीत आम्ही सर्वस्वी आनंदवनावर अवलंबून असायचो. आम्हाला बाबांप्रमाणेच विकासचा मोठा आधार होता. तो स्वतः ट्रक चालवत हे सगळं सामान आणायचा. आम्ही थोडीफार शेती सुरू केली होती, भाजीपाला लावला होता; पण तरीही ते पुरेसं नव्हतं. आनंदवनाच्या मदतीशिवाय हेमलकसा चालू शकत नव्हतं. हेमलकशाभोवती छोटी छोटी हजारेक गावं असतील; पण तिथे राहणारे आदिवासी पिकवलेलं धान्य खायचे नाहीत. फळं, कंदमुळं आणि प्राणी मारून खाणं, हाच त्यांचा आहार. त्यामुळे अशा धान्य -भाजीपाला वगैरेची त्यांना गरजच नसायची. गरज नाही तिथे दुकान कोण कशाला काढेल? शिवाय हेमलकसा हे जंगलच असल्याने जंगलात कुठली आलीत दुकानं? नाही म्हणायला भामरागडला दोन दुकानं होती. त्या दुकानांतही अगदीच किरकोळ माल (कांदे, बटाटे वगैरे) असायचा. पण तिथे जायचं तर डोंग्यातून जावं लागायचं. शिवाय त्या वस्तू महाग असायच्या. त्यामुळे आम्ही आनंदवनातून येणार्या शिध्यावरच अवलंबून होतो.
आम्ही ज्या विपरीत परिस्थितीत हेमलकशात राहत होतो, त्याची ताईला फार काळजी असायची. बाबांप्रमाणेच तीही हेमलकशाला बर्याचदा यायची. पावसाळ्याच्या चार महिन्यांत तिची एक तरी फेरी हेमलकशाला असायचीच. तिलाही या सगळ्या प्रवासाचा त्रास व्हायचा. आलापल्लीपर्यंत ट्रक व आलापल्लीपासून सत्तर किलोमीटर तिला चालत यायला लागायचं. पण आम्हाला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तिचं समाधान व्हायचं नाही. तरुण मुलं इथे अशी जंगलात राहताहेत म्हणून तिला वाईट वाटायचं. त्यामुळे ती येताना काय काय घेऊन यायची! त्या दिवसांत आमची दिवाळी असायची. इथल्या दमट हवेत तेव्हा गव्हाचं पीठ टिकायचं नाही. चार-आठ दिवसांत त्याला अळ्या लागायच्या. त्यामुळे ताजं पीठ आलं की चारेक दिवस पोळ्या मिळायच्या. एरवी वरण-भात आणि कांदा-बटाट्याची आलटून-पालटून भाजी, असंच आमचं जेवण असायचं. लहानपणी मी भात कधीच खायचो नाही, मला पोळीच लागायची. मात्र इथे साधी पोळीही खायला मिळू नये याचं ताईला फार वाईट वाटायचं. आम्ही आमच्या पद्धतीने यावर उपाय शोधला होता. आम्ही हेमलकशाला जातं नेलं होतं. पोळ्या खायची इच्छा झाली की आमच्यातले दोघंजण जात्यावर बसून पीठ दळायचे, आणि मग ते पीठ चार दिवस पुरवून आम्ही पोळ्याच खायचो.
आम्ही जंगलात असे दिवस काढतोय याची आनंदवनातल्या बाबा, ताई नि विकासला पूर्ण जाणीव होती. ताई-बाबांप्रमाणेच विकासही आम्हाला कमीत कमी त्रास होईल असं पाहायचा. हेमलकशाला काही कमी पडत नाही ना, यावर त्याचं स्वतःचं लक्ष असायचं. कुठल्याही आईवडिलांना आपली मुलं सुखात राहावी असं वाटतंच; पण आम्ही ज्या परिस्थितीत राहत होतो त्यामुळे त्यांच जीव तुटायचा. विशेषतः पावसाळ्यात सगळे मार्ग बंद व्हायचे तेव्हा तर ते फारच कासावीस व्हायचे. पण आम्हाला मात्र त्याचं तितकसं काही वाटायचं नाही; कारण एक तर मनाची तशी तयारी होती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तरुण वय असल्याने उभारी होती.
या काळात आम्हाला प्रत्येकी १५० रुपये पगार मिळायचा. राहणं, जेवणं-खाणं हे प्रकल्पावरच होत असल्याने आणि खर्च करायला काही निमित्तच नसल्याने ते पैसे खूपच होते. तेव्हा आजच्या तुलनेत लोकही कमी असल्याने आमचं 'किचन' एकच होतं. ते पुढेही तसंच राहिलं. प्रत्येकाच्या खाण्याच्या आवडीनिवडी होत्या, पण त्या पुरवणं शक्यच नव्हतं. त्यामुळे आमचा मध्य प्रदेशचा स्वयंपाकी जो स्वयंपाक करेल तो डोळे मिटून खायचा हे पथ्य आम्ही सर्वांनी कटाक्षानं पाळलं. अगदी मीठ नसलं तरी काही बोलायचं नाही. प्रकल्पावर सगळेजण या ना त्या कामात असल्याने एकत्र मेसमध्ये जेवणं ही गोष्ट सोयीची होती. त्यामुळे सकाळी ८ वाजता नाश्ता, दुपारी १२ वाजता आणि रात्री ७-८ वाजता जेवण ही पद्धत कायम ठेवली. क्वचित कुणी स्वतःच्या घरी काही बनवायचं. एरवी आम्ही, पाहुणे - सगळ्यांचं जेवण एकाच ठिकाणी.
एका बाजूला एकमेकांना असं बांधून घेण्याचा प्रयत्न चालू असताना आणि नातं तयार करण्याचा प्रयत्न चालू असतानाच काही प्रश्नही निर्माण होत होते. आपल्या माणसांपासून तोडून दूर जंगलात येऊन राहण्याचा आम्हा सर्वांचा हा पहिलाच अनुभव होता. अशा अनुभवातून जाताना प्रत्येकाला एकटेपणाला सामोरं जावंच लागतं. आम्ही सगळेच आपापली कुटुंबं सोडून इथे नवीन घर करायला आलेलो असलो, तरी आजूबाजूचं वातावरण सरावाचं होणं ही सोपी गोष्ट नव्हती. मला झोपडीत राहायची सवय होती, साप-विंचवाची सवय होती, कष्टांचीही सवय होती, पण आजूबाजूला माणसं नसताना राहायची अजिबात सवय नव्हती.
बाकीच्यांना तर हे सर्वच वेगळं वातावरण. त्यामुळे या विपरीत परिस्थितीशी जुळवून घ्यायला वेळ लागत होता. दुसरी गोष्ट म्हणजे माझे सगळेच सहकारी माझ्याच वयाचे होते. एकाच ध्येयानं भारून ते एकत्र आले होते, पण कधी कधी आमचेही मतभेद व्हायचे. अशावेळेस मन कुणाजवळ मोकळं करणार, सल्ला कुणाला मागणार, असा प्रश्न पडायचा. ही स्थिती केवळ माझीच नाही, सगळ्यांचीच होती. आयुष्याची सुरुवात करण्याच्या वयात आम्ही सगळेच आपापल्या कुटुंबांपासून खूप दूर आलो होतो. तिथे आम्हाला आमचे कुटुंबीय मनात असूनही आधार देऊ शकत नव्हते. याउलट, आम्ही सारे लोक एवढे लांब, संपर्क नसलेया ठिकाणी असल्याने आम्हालाच त्यांची खूप काळजी वाटायची. अशावेळेस जोपर्यंत काही निरोप, बातमी कळत नाही तोपर्यंत सगळं चांगलं आहे, 'नो न्यूज इज गुड न्यूज' - अशी मानसिकता आम्ही तयार केली होती. स्वतःला मानसिकदृष्ट्या कणखर बनवण्यामध्ये या सार्या बाबींचा नक्कीच वाटा राहिला असणार.
आम्हा सर्वांना अस्वस्थ करणारी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी आम्ही त्या जंगलात आलो होतो ते आदिवासी आमच्या वार्यालाही उभे राहत नव्हते. एका अर्थानं त्यांचंही बरोबरच होतं. कारण त्यांना आम्ही परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार! त्यांची भाषा आम्हाला येत नव्हती, त्यामुळे त्यांना समजावणं शक्य नव्हतं. ती भाषा शिकायची म्हणजे त्यांच्याशी काहीतरी संपर्क व्हायला हवा होता; पण नेमका तोच होत नव्हता. त्यामुळे आम्हाला खूप त्रास व्हायचा. या सगळ्याची कल्पना आधी नव्हती असं नाही. पण बर्याचदा प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरं गेल्यावरच त्याची तीव्रता, आधी न जाणवलेल्या गोष्टी कळायला लागतात. तसंच काहीसं या बाबतीत झालं.
चार लोकांत असताना एकाकी, उदास वाटलं तर मन रमवायचे मार्ग असतात... वाचन, संगीत... कुणी सिनेमाला जाऊन बसतो, तर कुणी मित्रांकडे जातो. इथे तसं काहीच नव्हतं. जंगलातली नीरव शांतता एक-दोन दिवस बरी वाटते; पण कधी कधी ती अंगावरही येते, विशेषतः तुम्ही अशा मनःस्थितीत असाल तर.
याच सुमारास मंदा नोकरी सोडून आली होती. तिची अवस्था तर अजून वाईट. हे सगळं आयुष्य तिच्यासाठी अगदीच नवीन होतं. एक मी सोडलो तर तिला मोकळेपणी बोलायलाही कुणी नव्हतं. प्रकल्पावर लग्न झालेले आम्हीच एकटे. माझी बहीण रेणुका काही दिवस राहिली होती; पण नंतर ती नर्सिंगसाठी म्हणून परत गेली. त्या भागात ना रस्ते, ना बस. त्यामुळे आमच्या लग्नानंतर सात-आठ वर्षं होऊन गेल्यानंतरही तिचे आईवडील हेमलकशाला येऊ शकले नाहीत. वडिलांना पक्षाघाताचा झटका आला होता, त्यामुळे त्यांना आणि भावाला सोडून येणं आईला शक्य नव्हतं. मंदाच्या बहिणीही बर्याच दिवसांनी भेटायला येऊ शकल्या. याअर्थाने तिला कुटुंबाचा आधार नव्हता. पण बोलायला, मन मोकळं करायला माणूस तर हवा! त्यामुळे तिला काही बोलावंसं वाटलं तर तिथे काम करणार्या शांताबाईंशी ती बोलायची.
या सगळ्या परिस्थितीचा आम्हा सगळ्यांनाच त्रास झाला; पण त्यातून एक चांगली गोष्टही घडली... आपल्यासमोर उभ्या ठाकणार्या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात येऊन आम्ही त्यातून वाट काढायला शिकलो. दुसरं म्हणजे सततच्या सहवासाने, अडचणी एकत्र सोडवण्याने आम्ही सगळे खूप जवळ आलो. आमचं सगळ्यांचं असं एक कुटुंब तयार झालं... जे अजूनही एकत्र आहे.
------------------------------------------------------------------------------------
लोकबिरादरी प्रकल्पाविषयी अधिक माहिती - www.maayboli.com/node/2479
अथवा,
http://lokbiradariprakalp.org/
'प्रकाशवाटा' या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी रॉयल्टीची रक्कम लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा, येथील खर्चासाठी वापरण्यात येणार आहे. हे पुस्तक आपण विकत घेतल्यास प्रकल्पाला मदतच होईल.
------------------------------------------------------------------------------------
प्रकाशवाटा
लेखक - डॉ. प्रकाश आमटे
प्रकाशक - समकालीन प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या - १५६
किंमत - रुपये दोनशे
------------------------------------------------------------------------------------
टंकलेखन साहाय्य - संकल्प द्रविड, अंशुमान सोवनी
पुस्तकातील निवडक भाग समकालीन प्रकाशन, पुणे, यांच्या सौजन्याने
------------------------------------------------------------------------------------
हे पुस्तक आता मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17115
चिनूक्स,
चिनूक्स, परत एकदा धन्यवाद!!
वाचायलाच हवे असे पुस्तक आहे हे!
--------------
नंदिनी
--------------
अगदी
अगदी कंपल्सरी वाचायलाच हवं असं पुस्तक असावं. ही झलकपण संपूच नयेसं वाटत होतं.
चिनुक्ष नेहमीप्रमाणे मनापासुन धन्यवाद.
व्वा!
व्वा! धन्यवाद अशा उत्त्तम पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल. मधे एकदा बहुतेक 'सकाळ' मध्ये य विषयी वाचले होते. तेव्हापासुनच वाचायची ईछ्छा आहे.
आता शोधलंच
आता शोधलंच पाहिजे पुस्तक.
परागकण
अगदि
अगदि संग्रहि ठेवण्यासारख पुस्तक, मायबोलीवर विक्रिस आहे का बघायला हव..
खुप मोलाची
खुप मोलाची माहिती या सदराद्वारे मिळते आहे, त्याबद्दल चिनुक्स यांना शतश: धन्यवाद.
प्रकाशकां
प्रकाशकांशी बोलून हे पुस्तक लवकरच मायबोली खरेदी विभागात उपलब्ध करत आहोत.
चिनुक्स,
चिनुक्स, शतश: धन्यवाद!
वरच्या सगळ्यांना अनुमोदन.
चिनूक्स,
चिनूक्स, तू वेळात वेळ काढून सगळी चांगली पुस्तके (आणि चांगली माणसेपण) आमच्यापर्यंत पोहोचवतोयस याचं इतकं कौतुक वाटतंय ना! तुझे शतश: आभार!
चिन्मय, पुन
चिन्मय,
पुन्हा एकदा धन्स रे मित्रा... आता हे पुस्तक वाचायलाच हवं
हे वाचून
हे वाचून मी ते पुस्तक भारतातून आणण्याची व्यवस्था केली आहे.
धन्यवाद मित्रा !
धन्यवाद
धन्यवाद चिन्मय. पुस्तक भारतातुन मागवायची व्यवस्था करेन आता.
हे पुस्तक
हे पुस्तक आता मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17115
धन्यवाद
धन्यवाद अॅडमिन!
परदेशस्थ मंडळींनो, एक विनंतीवजा कल्पना : भारतातून आपल्या आप्तेष्टांकरवी पुस्तक मागवायला अर्थातच हरकत नाही; पण तुम्हा-आम्हा परदेशस्थांनी मायबोलीवरच्या खरेदीविभागातून हे आणि अशी इतर पुस्तकं घेतली, तर आपल्या मायबोलीच्या उपक्रमाला पाठबळ मिळेल.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
चिनूक्स,
चिनूक्स, तू वेळात वेळ काढून सगळी चांगली पुस्तके (आणि चांगली माणसेपण) आमच्यापर्यंत पोहोचवतोयस याचं इतकं कौतुक वाटतंय ना!>>> १००% अनुमोदन ..
शतश: आभार!
चिन्मय,फार
चिन्मय,फार फार आभार्,मी पण आजच घेतो हे पुस्तक.
चिनूक्स,
चिनूक्स, अंशुमन संकल्प सर्वांचेच खूप खूप धन्यवाद.
सुंदर
सुंदर लेखन.
असे लिखाण आम्हाला वाचायला देतो म्हणुन चिनुक्सचे शतशः आभार
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .
भारावून
भारावून टाकणारं आहे हे सगळच. Albert Schweitzer आणि George Carver ह्यांची चरित्रं वाचून ही असचं भारावून जायला होतं.
आपल्याला मिळणार्या प्रत्येक सोयी-सुविधांच महत्त्व अचानक जाणवायला लागतं.
देवा रे..
देवा रे.. कसं काढलं असेल आयुष्य यांनी? किती महान लोकं आहेत ही.. त्या सर्वांना माझा साष्टांग नमस्कार..
चिनुक्स आणि टीमला खूप धन्यवाद! नक्की घेणार हे पुस्तक!
www.bhagyashree.co.cc
महान माणसे
महान माणसे ही! Inspirational!
चिनूक्स. तुझे आभार मानावेत तेवढे कमीच रे बाबा!
चिनुक्स हे
चिनुक्स
हे पुस्तक मागील आठवड्यात विकत घेतले. व रात्री एका बैठकीतच अधाश्यासरखे संपवून टाकले. आता डोक्यात तिकडे जायचेच वेड शिरले आहे. एकदा पाहून तरी आले पाहिजे.
लोकसत्ता मधे पण ह्या
लोकसत्ता मधे पण ह्या पुस्तकाचे परिक्शण आले आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layou...
लोकसत्तामधेच एक लेख आला होता पुरवणीमधे, प्रकाश आणि मंदा आमटेच्या मुलान्च्या सन्गोपणाबद्दलचा, तोही छान होता.मला link नाही सापडत आहे.
चिनुक्ष, तुला मनापासुन
चिनुक्ष, तुला मनापासुन अनेकानेक धन्यवाद. प्रकाशवाटा वाचलं. अप्रतिम.
महान, असामान्य आयुष्य जगलीत ही माणसं !
अतिशय सुंदर पुस्तक, संग्रही
अतिशय सुंदर पुस्तक, संग्रही असायलाच हवं असं.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
केवळ सहा महिन्यात या पुस्तकाच्या आठ आवृत्त्या संपल्या, व नववी आवृत्ती लवकरच विक्रीस उपलब्ध होईल. हे पुस्तक खरोखर संग्राह्य आहे. मायबोलीवरून हे पुस्तक विकत घेतल्यास मायबोलीच्या उपक्रमास व लोकबिरादरी प्रकल्पास मदत होऊ शकेल.
चिन्मय , खरच छान माहीती ,
चिन्मय , खरच छान माहीती , भारतवारीत या ठिकाणी नक्की भेट द्यायचा विचार आहे.
या पुस्तकाबद्दल इथे वाचले,
या पुस्तकाबद्दल इथे वाचले, त्यामुळे विकत घेतले आहे.
टीमचे धन्यवाद.
माझ्या संग्रहि हे पुस्तक
माझ्या संग्रहि हे पुस्तक असायलाच हवे........