साहित्य

स्वप्न दारातून गेलेले : स्वच्छंदी

Submitted by 'स्वच्छंदी on 29 May, 2026 - 13:58

पापणी भिजवून गेलेले
स्वप्न.....दारातून गेलेले

वाट पाहत थांबलो आपण
दूर गेले.. ऊन गेलेले

थांबवू नाही शकत कोणी
बाण शब्दातून गेलेले

केवढे होते गुलाबी ना?
नाव ओठातून गेलेले

सौख्य झाले दूर वेळेला
दुःख कुरवाळून गेलेले

जात नाहित आठवांमधुनी
लोक हृदयातून गेलेले

जन्म करणारच सुगंधी ना?
(मोगरे जवळून गेलेले)

*: महेश मोरे (स्वच्छंदी)*

शब्दखुणा: 

"तू माझं ऐक"

Submitted by Meghvalli on 26 May, 2026 - 03:28

तू कहीही म्हण, पण तू माझं ऐक,
तू उगाच वाद घालू नकोस, माझं ऐक।।

मी शब्दांत नाही रे, हृदयाने बोलतो,
तू अर्थ शोधू नकोस, फक्त मनाने ऐक।।

कधीतरी रस्ते सारे चुकले तरी चालतील,
तू हात मात्र सोडू नकोस, एवढंच माझं ऐक।।

जग तुला हसेल कधी, कधी तुला तोडेलही,
तू स्वतःला हरवू नकोस, हे खरंच ऐक।।

थकशील तू कधी, वाट जड होईल जेव्हा,
तू हार मानू नकोस, माझा आवाज ऐक।।

चुका होतील रे, माणूस म्हणून होतातच,
तू स्वतःला शिक्षा करू नकोस, हे प्रेमाचं ऐक।।

वारा उलट्या दिशेने वाहतो कधीकधी,
तू पाठ फिरवू नकोस, दिशा बदलून ऐक।।

काय सांगू राव

Submitted by Meghvalli on 26 May, 2026 - 02:38

काय सांगू राव, काय माझं नाव,
आलो मी कुठुन, कोणतं माझं गाव।
वाटांनी माझ्या पायांना विचारलं —
कुठल्या दिशेचा तुला खरा ठाव?

काय सांगू राव, काय माझं नाव,
चेहऱ्यामागे लपला दुसरा चेहरा राव।
आरशानेही ओळख नाकारली —
सांग रे, तू चोर की साव?

काय सांगू राव, काय माझं नाव,
जगण्यासाठी रोज मांडतो नवा डाव।
कधी जिंकतो आयुष्याशी झुंजताना,
कधी स्वतःचाच होतो पराभाव।।

काय सांगू राव, काय माझं नाव,
स्वप्नांनीही केला माझ्याशी परका भाव।
कधी रंक भेटले, कधी भेटले राव —
सर्वांचे एकच — देवा, मला पाव।।

तू आणि मी

Submitted by Meghvalli on 25 May, 2026 - 12:49

गेले ते दिवस, उरल्या फक्त आठवणी,
चंद्राच्या चांदण्यांसारख्या आपल्या मनी।
त्या आठवणींसोबत जगू — तू आणि मी।।

शब्द सारे विरून जातील काळाच्या प्रवाहात,
नातं आपलं राहील तरी एकमेकांच्या सहवासात।
हा सहप्रवास टिकवून ठेऊ — तू आणि मी।।

ऋतू जरी बदलले, वाटा जरी दूर गेल्या,
मनातली ओढ तरीही विरणार नाही।
त्या ओढीची विण जपू — तू आणि मी।।

सुखदुःखांच्या लाटांनी किनारे जरी झिजवले,
काळाच्या वादळांनी दिवस कितीही बदलले।
हातात हात घट्ट घेऊन चालू — तू आणि मी।।

अरे जगण्या

Submitted by Meghvalli on 25 May, 2026 - 02:58

अरे जगण्या, कुठं आहेस रे,
किती दिस झालं दिसलाच नाहीस।
कसा असतोस, काय करतोस —
एवढं तरी सांग की, जगण्या।।

कधी हसण्याच्या गर्दीत लपतोस,
कधी डोळ्यांतून निथळत येतोस।
हात धरायला गेलो तर —
ओंजळीतून वाळूसारखा सरतोस, जगण्या।।

पैशामागं धावत शोधलं तुला,
माणसांत गुंतूनही पाहिलं।
सापडलास मात्र दुसरीकडे —
कधी उमलत्या कळीत, कधी कोसळत्या पावसात, जगण्या।।

देवळाच्या पायऱ्या झिजवल्या,
उंबरठ्यावर डोकं टेकवलं।
भेटलास त्या कापऱ्या हंबरड्यात —
गायीच्या डोळ्यांत कालवे शोधताना, जगण्या।।

सोनचाफा

Submitted by Meghvalli on 23 May, 2026 - 04:50

तुझ्या प्रेमाचा सोनचाफा मनात दरवळतो,
अलवार सुगंध त्याचा माझ्या गीतात मिसळतो।।

शब्दांच्या पाकळ्यांवर स्वरदव तुझे अलगद चमचमतं,
माझ्या मनाच्या शांत तळ्यात चांदणं तुझे विरघळतं।।

तुझ्या मिठीत हरवावे असे प्रत्येक क्षण सांगतो,
तुझा मोहक गंध माझ्या श्वासांत मिसळतो।।

तुझ्या ओठांचा स्पर्श जसा पहिला पाऊस धरणीवर,
बेधुंद त्या अनुभवातून मी चिंब भिजून निघतो।।

तुझ्या डोळ्यांत साठलेल्या त्या प्रेमडोहाची शपथ,
डुंबला त्यात जो एकदा, तो का पुन्हा वर तरतो?

शनिवार, २३ मे २०२६ | दुपारी २:१६
— अजय सरदेसाई ‘मेघ’

तुझ्याविना

Submitted by Meghvalli on 22 May, 2026 - 04:32

तुझ्याविना

जगण्यात काय आनंद तुझ्याविना,
माझे अस्तित्व तरी काय तुझ्याविना।

हे जग किती सुंदर आहे खरोखरच,
पण त्या जगात अर्थ काय तुझ्याविना।

हे सूर्य, चंद्र, तारे सुंदरच सारे,
त्या सुंदरतेचा असर काय तुझ्याविना।

पावसाच्या सरीही कोरड्या भासतील,
भिजण्यात आनंद काय तुझ्याविना।

फुला-फुलांत रंग भरलेले ओतप्रोत,
पण त्यात गंध कुठे, केसांत तू माळल्याविना।

स्वरांत जरी माधुर्य भरलं असेल,
गाण्यात जीव कुठे तुझ्याविना।

‘मेघ’ भावनांना माझ्या स्पर्श तुझा लाभला,
नाहीतर कवितेलाही अर्थ काय तुझ्याविना।

क्षण येती क्षण निघून जाती (संपादित )

Submitted by Meghvalli on 18 May, 2026 - 03:40

क्षण येती क्षण निघून जाती,
आयुष्य जणू दिव्यात वाती।।
तेवती पणत्यात मंद ज्योती,
तेल सरता विझुनी जाती।।

वारा येतो नी वारा जातो,
थंडावा तनास देऊन जातो।।
लाट उठते अन् लाट विरते,
सागर मात्र तसाच असतो।।

मनपटलावर विचार निर्झरती,
न कळे मूळ विचार कुठून येतो।।
येती जाती भाव मनाचे,
साक्षी अंतरी कोण बसतो।।

शब्द उमटती ओठांवरती,
अर्थ कुणी आतून देतो।।
देह चालतो काळासंगे,
जीव कुणाच्या हाकेने येतो।।

या भवनातील गीत पुराणे....

Submitted by Meghvalli on 17 May, 2026 - 07:38

या भवनात ते गीत पुराणे गुंजते अजून,
आर्त संगीत ते पुराणे वाजते भिंतीस बिलगून।।

बंद खिडकी मागे अजुनी येतो विरळ श्वास कुणाचा,
विरलेले ते स्वर कुणाचे शोधत फिरतो वारा दमुन।।

धूसर सावल्या प्रतिक्षेत बसल्या कोणाच्या अजुन,
चांदणेही हरवून बसले या अंगणी उतरुन।।

विझल्या दीपांमधुनी अजुनी धूर उठतो हळूच,
जणू काळोखाशी कुणीतरी बोलत आहे रुसून।।

रिकाम्या या दालनामध्ये काळ थबकला कधीचा,
भंगलेल्या त्या आरशातले चेहरे गेले विरघळून।।

आता उरल्या फक्त स्मृती या दाराशी टेकून,
भवन स्वतःलाच ऐकत बसते त्या गीतास बिलगून।।

"ती" : आठवण

Submitted by Meghvalli on 17 May, 2026 - 04:23

आज पुन्हा त्या आठवणीस मी रस्त्यात गाठले होते,
तिने ओळख दिलीच नाही, अश्रू डोळ्यांत दाटले होते।।

मग मीच सांगितली ओळख कॉलेजमधली,
डोळ्यांत झलक ओळखीची… तरी ओठ मिटलेच होते।।

बसमधून जाताना दिलेले स्मित ती विसरली होती,
कॉलेज आयुष्यातील ते पान कधीच फाटले होते।।

कॅन्टीनच्या त्या टेबलावर धूळ साचली होती,
त्या गप्पांचे आवाज तिथेच हरवले होते।।

निरोप घेताना हातही थरथरले क्षणभर,
शब्द मात्र ओठांआड कुठेतरी अडकले होते।।

गर्दीतही काही क्षण थांबून काळ पाहत होता,
जुने दिवस डोळ्यांमध्ये हळूच परतले होते।।

Pages

Subscribe to RSS - साहित्य