कलाबाश

kalabash_tree.jpg

कलाबाश, हा शब्द खुप ओळखीचा वाटतोय ना. पण त्याचा अर्थ नेमका नाही सांगता यायचा. कदाचित तो कलाबक्ष, अश्या एखाद्या ऐतिहासिक व्यकिरेखेची आठवण करुन देत असावा.

kalabash_tree_leaves.jpg

झाडांच्या बाबतीत हा शब्द मी ऐकला तो नायजेरियात. एकदा मला तिथल्या बाजारात दुधी भोपळा मिळाला. मी त्याचा हलवा केला. माझी हाऊसमेड सगळे बघत होती, तिचा प्रश्न अर्थातच, हे तूम्ही खाता ? मी होकार दिला व विचारले तूम्ही काय उपयोग करता ? तर ती म्हणाली, हा फ़ारच कोवळा आहे, आम्ही तो वेलीवर पुर्ण वाढवतो, सूकवतो. सूकला कि आतून पोखरतो आणि मग त्याचा पाणी भरुन ठेवण्यासाठी उपयोग करतो. यात भरून ठेवलेले पाणी म्हणे खुप गार होते.

पुढे झाडांच्या बाबतीत पण हे नाव वाचले. अगदी सुंदर असे हे झाड. हिरव्यागार पानांमूळे छान दिसते. आकारानेही सुबक. आता झाड बघितले कि त्याची फ़ुले कशी असतील, हा विचार मला छळत राहतो, मग तिथे चकरा सुरु होतात. या झाडानेही फ़ुले दाखवलीच, पण तिथेही वेगळेपण आहेच.

kalabash_fule.jpg

फ़ुले हि अशी मातीच्या रंगाची. थेट खोडालाच लागलेली. आतून किंचीत शुभ्र. वास अगदी उग्र. घाणेरडा वाटेल असा. का बरे असावीत अशी वेडीविद्री फ़ुले ? विचार करता माझे मन मलाच म्हणू लागले, तू कोण लागून गेलास ? तूझ्यासाठी थोडीच फ़ुलली आहेत हि फ़ुले ? तू काय करणार आहेस या फ़ुलांचे ?

kalabash_ful.jpg

बघाना, माणुस म्हणजे कोण हो, या झाडांच्या नजरेत काय किम्मत माणसाची ? शून्य. मुळात झाडांची फ़ुले काय माणसाच्या नजरसुखासाठी थोडीच फ़ुलतात ? ती तर जाहिरात असते. त्या झाडाच्या परागीभवनासाठी. आणि त्यांचे फ़ुलणे असते या मित्राना आकर्षून घेण्यासाठी.

आता अशी फ़ुले कोणाला आकर्षित करुन घेऊ शकतात ? हि फ़ुले उमलतात रात्रीची आणि याचे परागीभवन करतात, वटवाघुळे. त्यामुळे हा रंग, आकार आणि गंधदेखील त्यांच्यासाठीच. वटवाघळे म्हणजे काहि फुलपाखरांसारखा नाजुक किटक नाही, त्यामुळे त्याना बसणे सोयीचे व्हावे म्हणुन हि फ़ुले भक्कम खोडावरच येतात.

Crescentia cujete असे याचे शास्त्रीय नाव. या झाडाला भलीमोठी फ़ळेही लागतात. खाण्यासाठी उपयोग होत नसला तरी कठिण कवचामुळे, सुकल्यावर साठवण्यासाठी उपयोग होतो. ( म्हणजे कुठेतरी पहिला संदर्भ आहेच कि, आणि दुधी भोपळ्याच्या वेलाला कलाबाश क्रीपर असे नावही आहे.)

अशीच खास वटवाघळांच्या सोयीसाठी फ़ुले येणारे दुसरे एक झाड असते, त्याचे नाव सॉसेज ट्री. मराठीत वाघुळफ़ुले. कालच्याच रविवारी, बसमधून दिसले, दादरच्या पाच बागेजवळ. आता फ़ुलांचा फ़ोटो मिळवायला जायलाच हवे.