अजून एक विश लिस्ट

हे दिवस म्हणजे गाडी स्वतः न चालवण्याचे दिवस आहेत अगदी. दुसर्‍याच्या हाती गाडीचं चाक देऊन आपण निवांतपणे आजू बाजूची झाडं पहावीत. रोज काही हे सुख लाभत नाही. तरी सुद्धा एक डोळा रस्त्यावर अन एक लोकांच्या अंगणातल्याअ झाडा पानावर ठेवून ड्राइव्ह करणं तितकसं कठीण नाही - थोडं खरंखुरं मल्टी टास्किन्ग अन थोडं विंडोज सारखं टाईम स्लाईसिंग केलं की झालं!

यंदाची या सीझनची विश लिस्ट अशी
विस्टेरिया - कसले नाजूक फुलांचे घोस लगडलेले असतात. पांढरे, गुलाबी अन फिकट जांभळे घोस वार्‍याने डुलताना पाहिलं की गाडी तिथेच कडेला घेऊन थोडावेळ फुलांकडे बघत बसावंसं वाटतं.
लायलॅक - जुन्या घरात ६-७ फुटांची मोठी झाडं होती. एखादाच गुच्छ जरी घरात आणला तरी सगळं घर दरवळून जात असे.
जांभळे बिअर्डेड आयरिस - ते ज्यांनी पाहिलेत त्यांना कळेल मला का हवेत ते.
पॉपी - होम डेपो च्या बोडक्यावर मी किती पैसे ओतलेत ह्याच्या बियांकरता अन झाडांकरता. पण आमच्या नशिबी' अंगणात पॉपी फुलणे' योग नसावा बहुधा!
हिरवा अन लाल जपानी मेपल - लॉटरीच लागायला हवी ही झाडं घ्यायची म्हणजे. यंदा छोटी रोपटी मिळाली तर ती तरी लावीन म्हणते.
हरणं न खारी यांच्या पासून बचाव होतील असे ट्युलिप अन डॅफोडिल. महागडे कंद मागवायचे. कंबरडं मोडेस्तोवर ते एक एक करून जमिनीत पुरायचे . शेवटी कंद खारी खातात अन कोवळी पानं आली की हरणं फस्त करतात अरेरे
सध्या येवढंच पुरे - पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी!