अक्षरवार्ता

नव्याजुन्या पुस्तकांची ओळख करून देणारा, त्यांचं स्वागत करणारा मायबोलीवरील हा नवीन विभाग. नुकतीच प्रकाशित झालेली, किंवा उत्कृष्ट असूनही जरा दुर्लक्षितच राहिलेली अशी दर्जेदार पुस्तकं या विभागात आपल्याला चाळता येतील. दर महिन्याला निवडक अशा पुस्तकांतील काही भाग इथे आपल्याला वाचता येईल. ही पुस्तकं मायबोलीवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ग्रंथाली, राजहंस, मृण्मयी, चिनार, समकालीन यांसारख्या मातब्बर प्रकाशनांचं सहकार्य आपल्याला यासाठी मिळाले आहे.

'नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध' - मुक्ता मनोहर

Submitted by चिनूक्स on 14 December, 2011 - 13:04

बलात्कार हा स्त्रीच्या शरीरावर होणारा अतिशय घृणास्पद आणि टोकाचा अत्याचार! बलात्कार म्हणजे स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी ताकद, वासनांधता, सत्तेचा, पैशाचा माज, शत्रूवर सूड उगवण्यासाठीचं शस्त्र किंवा वंशविच्छेदाची व्यापक गरज. शारीरिक गरज, वासना भागवण्यासाठी बलात्कार केला जातो. युद्धात, धर्म-वंशयुद्धांत आपलं बळ दाखवण्यासाठी, शत्रूचं खच्चीकरण करण्यासाठी बलात्कार केला जातो. जगभरात रोज लक्षावधी स्त्रियांवर बलात्कार होत असतात. भारतात दर पंधरा मिनिटांनी एका स्त्रीवर बलात्कार होतो, असं एनसीआरबीची आकडेवारी सांगते.

'पेज थ्री' - मंगला गोडबोले

Submitted by चिनूक्स on 12 September, 2011 - 23:47

स्त्रियांना विनोद कळत नाही, आणि त्यांना विनोद करता येत नाही, असा एक समज मराठी वाचकांमध्ये पूर्वापार आहे. रमेश मंत्री, गंगाधर गाडगीळ अशा लेखकांनी त्यांच्या लेखनांतून, मुलाखतींमधून या समजाला चांगलंच खतपाणी घातलं. शकुंतला फडणीस, पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, मंगला गोडबोले यांनी मात्र सातत्यानं दर्जेदार विनोदी लेखन करत या समजाला छेद देण्याचं काम उत्तमरीत्या केलं.

विषय: 

प्लॅटफॉर्म नंबर झिरो - अमिता नायडू

Submitted by चिनूक्स on 24 August, 2011 - 21:57

रेल्वे स्टेशनावर, किंवा रस्त्यांवर गर्दीत बरेचदा फाटक्या, मळक्या कपड्यातला एखादा बारका हात आपल्या समोर येतो. आपण सवयीनं तिकडं दुर्लक्ष करतो. फारच मागे लागला, तर पोलिसांकडे द्यायची धमकी देतो. मग तो हात दुसर्‍या कोणासमोर पसरला जातो. हा पसरलेला हात कोणाचा याचा विचार क्षणभरसुद्धा आपण करत नाही, इतकं हे आपल्याला सवयीचं झालेलं असतं.

'आऊट ऑफ द बॉक्स' - हर्षा भोगले

Submitted by चिनूक्स on 9 August, 2011 - 13:40

भारतीय क्रिकेटचा चेहरा आणि आवाज म्हणून जगन्मान्य असलेल्या हर्षा भोगलेनं पहिल्यांदा क्रिकेट सामन्यांचं धावतं समालोचन केलं, त्याला आता एकवीस वर्षं होतील. उणीपुरी पाच वर्षं हर्षानं रेडिओवर समालोचन केलं. मग भारतात उपग्रह वाहिन्यांनी पाय पसरायला सुरुवात केली, आणि ’भारतीय क्रिकेटचा चेहरा’ अशी नवी ओळख हर्षाला मिळाली. टीव्हीवरची त्याची समालोचनं गाजलीच, शिवाय ’हर्षा की खोज’ हा त्याचा कार्यक्रम, त्याचे प्रश्नमंजूषेचे कार्यक्रमही प्रेक्षकांनी उचलून धरले. क्रिकइन्फोनं २००८ साली त्याला ’सर्वोत्तम समालोचक’ हा किताब बहाल केला. त्यामुळे खेळाडू नसलेला हा क्रिकेटमधला तसं पाहिलं तर पहिला सेलिब्रिटी.

'अंधारवारी' - हृषिकेश गुप्ते

Submitted by चिनूक्स on 18 July, 2011 - 13:51

भीती ही मानवी मनाचा अविभाज्य भाग आहे. या भीतीचा अनुभव घेणंही कधीकधी आनंददायक असतं, कारण तिचा संबंध गूढतेशी, रहस्याशी, साहसाशी असतो. गूढ, रहस्यमय असं काही अनुभवणं ही मानवी मनाची गरजच असते, आणि चित्रपटांमधून, पुस्तकांमधून काही अंशी ती पूर्णही होते. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी गेली काही दशकं खिळवून ठेवलं आहे. आता हृषिकेश गुप्ते या तरुण लेखकानं आपल्या गूढकथांद्वारे हा वारसा पुढे नेला आहे.

विषय: 

बखर अंतकाळाची - श्री. नंदा खरे

Submitted by चिनूक्स on 21 June, 2011 - 11:37

जागतिकीकरणाला विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रारंभ झाला, असा एक सर्वसाधारण समज आहे. भारतात यामुळे फार मोठे बदल झाले. आपल्या अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले गेले. अर्थव्यवस्थेबरोबर मूल्यव्यवस्थाही काहीशी बदलली. हिंसाचार वाढला आणि असहिष्णुताही वाढली. नेमकं असंच काही शतकांपूर्वीही घडलं होतं. व्यापाराच्या निमित्तानं फिरंगी भारतात आले, आणि इथे राज्य केलं. एतद्देशीय राजांनी कधी त्यांच्यासमोर नमतं घेतलं, तर कधी त्यांना विरोध केला. या विलक्षण संघर्षाच्या काळात कोणी एक अंताजी खरे महाराष्ट्रात होऊन गेला. या अंताजीनं पेशवेकालीन महाराष्ट्राची बखर लिहून ठेवली. अंताजीची शैली मोठी मस्त.

सगे सोयरे - श्री. वसंत चिंचाळकर

Submitted by चिनूक्स on 20 May, 2011 - 02:57

सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. वसंत चिंचाळकर यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भेटलेल्या व्यक्तींची शब्दचित्रं 'सगे सोयरे' या पुस्तकात संकलित केली आहेत. यांपैकी काही शब्दचित्रं चरित्रात्मक आहेत. या व्यक्तींमध्ये वसंत सोमण, आलमेलकर, पद्मजा फेणाणी, उ. झाकीर हुसेन यांसारखे कलाकार आहेत, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. व्ही. गिरी यांसारखे राजकारणी आहेत, बाबा आमटे, डॉ. विकास महात्मे, गाडगेबाबा, शाहू महाराज आहेत. बापूंची कुटी आहे आणि पाऊस, उन्हाळाही आहे.

'सगे सोयरे' या नचिकेत प्रकाशनाच्या पुस्तकातील 'तुळसा काकी' हे शब्दचित्र..

'विवेक आणि विद्रोह' - डॉ. अरुणा ढेरे

Submitted by चिनूक्स on 3 May, 2011 - 00:54

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत रूढींच्या पाशात अडकलेल्या आणि कमालीचं जडत्व आलेल्या महाराष्ट्रीय समाजाला नव्या विचारांचं वारं लागावं, म्हणून अनेक समाजधुरिण प्राणपणानं लढले. बुरसटलेले विचार आणि परकीय सत्तेचा पाश अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत या मंडळींनी एका पुराणप्रिय समाजाला डोळे उघडे ठेवून बघायला, स्वतःच्या डोक्याचा वापर करून विचार करायला शिकवलं. ज्यांचा मुक्तपणे जगण्याचा हक्कच नाकारला गेला होता, अशा विधवांना आणि दलितांना मोकळा श्वास महाराष्ट्रातल्या काही सुधारणावाद्यांमुळेच घेता आला. या सुधारणावाद्यांनी सामाजिक परिस्थितीविरुद्ध विद्रोह केला, पण विवेकाच्या आधारानं.

'अठरा धान्यांचं कडबोळं' - अनुवाद : डॉ. विद्युल्लेखा अकलूजकर

Submitted by चिनूक्स on 27 March, 2011 - 23:54

मराठी साहित्यात अनुवादांचं स्थान मोठं आहे. वामन मल्हार जोश्यांपासून भारती पांडे, अपर्णा वेलणकरांपर्यंत अनेकांनी परभाषेतील साहित्य मराठीत आणलं. मात्र हे अनुवाद बहुतांशी नाटकं, कादंबर्‍या आणि क्वचित कविता व प्रवासवर्णनांपर्यंतच मर्यादित राहिले. उत्तमोत्तम कथा मराठीत फारशा आल्या नाहीत. फार वर्षांपूर्वी जयवंत दळवी 'यूसिस'मध्ये कार्यरत होते, तेव्हा त्यांनी प्रभाकर पाध्ये आणि शांताबाई शेळक्यांकडून इंग्रजी कथांचे मराठीत अनुवाद करून घेतले होते. हे अनुवाद बरेच गाजले. शांताबाईंनी केलेल्या या अनुवादांचं दुर्गाबाई भागवतांनी स्वतंत्र लेख लिहून कौतुक केलं होतं. नंतर मात्र असे प्रयत्न झाले नाहीत.

'माझ्या जगात मी' - श्रीमती आशा भेंडे

Submitted by चिनूक्स on 7 March, 2011 - 03:40

श्री. आत्माराम भेंडे आणि श्रीमती आशा भेंडे यांची रंगभूमीवरील व चित्रपट-जाहिरातक्षेत्रांतली कारकीर्द तशी सर्वांच्याच परिचयाची आहे. उत्तम अभिनेते व दिग्दर्शक म्हणून नावाजले गेलेले श्री. आत्माराम भेंडे यांचं 'आत्मरंग' हे आत्मचरित्र काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी नाव कमावलं. प्रामाणिकपणे नोकरी करून अनेक मानसन्मान मिळवले. बबन प्रभूंसारख्या मनस्वी कलाकाराबरोबर नाटकं गाजवली, आणि त्यांना आधारही दिला. एक सज्जन कलावंत, असा लौकिक मिळवला.

विषय: 

आपुला चि वाद आपणांसी - श्री. चंद्रकांत वानखडे

Submitted by चिनूक्स on 7 February, 2011 - 00:59

आपल्याला हवं तसं जगणं फारसं सोपं नसतं. सर्वसामान्यांनी एक चाकोरी स्वीकारलेली असते. अमुक इतकं शिक्षण, मग नोकरी, लग्न, दोन मुलं. सामाजिक भान असेल तर थोडंफार घरानोकरीव्यतिरिक्त सामाजिक कार्य. ही चाकोरी मोडून आपल्या आनंदाला प्राधान्य देणारे फार कमी. श्री. चंद्रकांत वानखडे मूळचे विदर्भातले. कॉलेजात असताना जयप्रकाश नारायणांच्या 'तरुण शांती सेने'च्या संपर्कात आले, आणि त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा सापडली. नागपूरला भरलेल्या शांती सेनेच्या शिबिरात आर्थिक क्रांती, संघर्ष, अहिंसा, श्रमदान अशा सर्वस्वी अनोळखी शब्दांनी त्यांना भुरळ घातली.

Pages