जुल्काफिया

सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

Submitted by जागो मोहन प्यारे on 6 May, 2012 - 04:11

अंतराळी कालगंगी अढळ तारा बापुजी
सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

पेटत्या हीमालयाची रोजची होई व्यथा
तोफगोळ्यांचा धुमसता नित्य मारा बापुजी

विहिर सुकली रान सुकले ऊष्ण उन्हाच्या झळा
आपुल्या शेळीस आणू कुठुन चारा बापुजी

भ्रष्ट नेते देश लुटती खाटकाची गाय ही
संस्कृतीचे वाजवीती रोज बारा बापुजी

पीक येवो वा न येवो नित्य कर्जे काढली
फाटला घेऊन बोजा सात बारा बापुजी

पाचशेची नोट कोणी काल दारी फेकली
धुंद लोकांच्या सभेचा आज नारा बापुजी

गुलमोहर: 

बालकाच्या शुष्क गाली तू लळा शोधून ये

Submitted by जागो मोहन प्यारे on 5 May, 2012 - 16:53

बालकाच्या शुष्क गाली तू लळा शोधून ये
जन्मता त्या टाकणार्‍या तू खळा शोधून ये

जीवनाची द्वाड रेती निसटली हातातुनी
सोडुनी गेला तुला त्या तू पळा शोधून ये

जीवनाचा अर्थ पाणी सांगती जन सारखे
बुडविली नौका तुझी त्या तू जळा शोधून ये

कर्म करता कर्म करणे आणि जा विसरूनिया
बोलते गीता तरीही तू फळा शोधून ये

बंध होते प्रीतिचे अन स्वार्थ नव्हता कोणता
आपल्याला जोडणार्‍या तू बळा शोधून ये

गुलमोहर: 
Subscribe to RSS - जुल्काफिया