आजकाल एकटेच फार वाटते
Submitted by मिल्या on 9 April, 2012 - 05:49
आजकाल एकटेच फार वाटते
रक्तही अलिप्त, निर्विकार वाटते
मौन बाळगून काय साधतेस तू?
शस्त्र हे मला तरी दुधार वाटते
केवढे मधाळ काल बोललीस तू?
आणलेस ओठही उधार वाटते
जीवना मला दिलास तू वसंत पण
वेल मी जिला कळीच भार वाटते
मी तुझ्या घरासमोर थांबलो कुठे?
तू चुकून लावलेस दार वाटते!!!
’ये... जरा बसू निवांत...’ बोललास तू
काय मी तुझी नवी शिकार वाटते?
दान द्यायची कशी अजब तर्हा तिची?
ज्यास त्यास फक्त ती नकार वाटते
रात्र घाव घालण्यास सज्ज जाहली
शांतता तिचे नवे हत्यार वाटते
गुलमोहर:
शेअर करा