सवंगडी

बनाव

Submitted by क्रांति on 30 September, 2011 - 13:43

जुने सवंगडी तरी नवीन डाव रंगला
नवी विटी, जुनेच राज्य, बेबनाव रंगला

न मंदिरात राहिला, न भव्य मंडपामध्ये
प्रभू तिथे, जिथे खरा मनात भाव रंगला

कधी न उत्सवात अन्य रंग सांडले इथे,
रुधीररंग खेळण्यात नित्य गाव रंगला

सुकेल आज ना उद्या, म्हणून पाहिले न मी
टपोरते कळी तसा फिरून घाव रंगला

असेल चूक एवढी, तिथेच तो विसावला
विघातकी कृतींमध्ये जिथे जमाव रंगला

कधीच तू न जाणले तुझ्याच काळजामध्ये
तुझ्याविरुद्ध केवढा छुपा बनाव रंगला!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सवंगडी